व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

बायबल म्हणतं की एखादा अपराध सिद्ध होण्यासाठी कमीतकमी दोन साक्षीदार असणं महत्त्वाचं आहे. (गण. ३५:३०; अनु. १७:६; १९:१५; मत्त. १८:१६; १ तीम. ५:१९) पण एका पुरुषाने एखाद्या लग्न ठरलेल्या मुलीवर “रानात” बलात्कार केला आणि ती बचावासाठी ओरडली, तर नियमशास्त्राप्रमाणे ती निर्दोष असायची, पण त्या पुरुषावर मात्र व्यभिचार केल्याचा आरोप लावला जायचा. या घटनेचे कोणीच साक्षीदार नसले तरी त्या पुरुषाला दोषी पण त्या मुलीला निर्दोष का ठरवलं जायचं?

अनुवाद २२:२५-२७ या वचनांमध्ये दिलेला अहवाल मुळात त्या पुरुषाला दोषी ठरवण्याबद्दल नाही, कारण त्याचा अपराध आधीच सिद्ध झाला आहे. या वचनांत दिलेला नियम त्या मुलीला निर्दोष सिद्ध करण्यावर जोर देतो. हे समजण्यासाठी आपल्याला त्या वचनांच्या आजूबाजूची वचनं पडताळून पाहावी लागतील.

अनुवाद २२:२३, २४ या वचनांत सांगितलं आहे की “गावात” एका पुरुषाने लग्न ठरलेल्या मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवले. या कृत्यामुळे त्या पुरुषावर व्यभिचार करण्याचा आरोप लावण्यात आला. असं यासाठी, कारण त्या काळी लग्न ठरलेल्या मुलीला विवाहित समजलं जायचं. पण ज्या मुलीसोबत व्यभिचार करण्यात आला आहे तिच्यावर व्यभिचाराचा आरोप लावण्यात यायचा का? वचनांत म्हटलं आहे की “तिने गावात असून आरडाओरडा केला नाही.” तिने आरडाओरडा केला असता तर इतरांना तिचं ओरडणं नक्कीच ऐकू गेलं असतं आणि ते तिला वाचवण्यासाठी आले असते. पण ती मुलगी ओरडली नाही. त्यामुळे ती मुलगीसुद्धा त्या पुरुषासोबत व्यभिचाराच्या अपराधात वाटेकरी होती. म्हणून त्या दोघांनाही दोषी ठरवण्यात यायचं.

पुढे नियमात एका वेगळ्या परिस्थितीबद्दल सांगितलं आहे. तिथे म्हटलं आहे, “ती तरुणी त्या माणसाला आडरानात आढळली व त्याने तिला पकडून तिच्यावर बलात्कार केला तर बलात्कार करणाऱ्‍या माणसालाच ठार मारावे. त्या तरुणीला काही करू नये. प्राणदंडास पात्र असे कोणतेही पातक तिच्या हातून घडलेले नाही. कुणा माणसाने हल्ला करून आपल्या एखाद्या शेजाऱ्‍याला ठार मारावे असा हा प्रकार आहे. ती मागणी झालेली तरुणी त्याला आडरानात आढळली आणि तिने आरडाओरड केली असली तरी तिला सोडवायला कुणी नव्हते.”—अनु. २२:२५-२७, मराठी कॉमन लँग्वेज.

अशा परिस्थितीत मुलगी जे सांगेल त्यावर न्याय करणारे विश्‍वास ठेवायचे. असं का? कारण ते असं धरून चालायचे की “तिने आरडाओरड केली असली तरी तिला सोडवायला कुणी नव्हते.” त्यामुळे तिने व्यभिचार केला नाही असं मानलं जायचं. पण त्या पुरुषाने लग्न ठरलेल्या मुलीला “पकडून तिच्यावर बलात्कार केला” किंवा बळजबरी करून तिच्याशी संबंध ठेवले म्हणून बलात्कार आणि व्यभिचार या अपराधासाठी त्याला दोषी ठरवण्यात यायचं.

म्हणूनच, मोशेच्या नियमशास्त्रात जरी एका स्त्रीला निर्दोष ठरवण्यावर जोर देण्यात आला होता तरी अहवालात सांगितल्यानुसार तो पुरुष बलात्कार आणि व्यभिचार या अपराधांसाठी दोषी होता. आपण खातरी बाळगू शकतो की न्याय करणारे नक्कीच “कसून चौकशी” करत असतील आणि देवाच्या स्तरांनुसार निर्णय घेत असतील. या स्तरांचा देवाने स्पष्टपणे बऱ्‍याच वेळा उल्लेख केला होता.—अनु. १३:१४; १७:४; निर्ग. २०:१४.