अभ्यास लेख ५०
यहोवा आपल्या सुटकेची योजना करतो
“देशातील सर्व रहिवाशी मुक्त झाल्याची घोषणा करावी.”—लेवी. २५:१०.
गीत १६ देवराज्याचा आश्रय घ्या!
सारांश *
१-२. (क) काही देशांमध्ये कोणती गोष्ट साजरी केली जाते आणि इस्राएली लोक काय साजरं करायचे? (“ सुटकेचं वर्ष काय होतं?” ही चौकट पाहा) (ख) लूक ४:१६-१९ मध्ये येशूने कशाबद्दल सांगितलं?
बऱ्याच देशांमध्ये लोक महत्त्वाच्या घटनांचं पन्नासावं वर्ष साजरं करतात. सहसा याला सुवर्णमहोत्सव म्हणून ओळखलं जातं. हा महोत्सव काही दिवसांचा, आठवड्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त काळाचा असू शकतो. पण काही काळानंतर तो संपतो आणि लोकांनाही त्याचा विसर पडतो.
२ प्राचीन इस्राएलमधल्या लोकांकडे पन्नासाव्या वर्षाला खास समजण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं, ते म्हणजे त्या वर्षी त्यांना सुटका मिळायची. पण हे आपल्यासाठी आजदेखील का खास आहे? कारण योबेल वर्षाच्या तरतुदीच्या तुलनेत यहोवाने आपल्यासाठी आणखी मोठी आणि चांगली अशी एक तरतूद केली आहे. या तरतुदीमुळे आपल्याला पाप आणि मृत्यूपासून कायमची सुटका मिळू शकते. या सुटकेबद्दल येशूनेदेखील सांगितलं होतं.—लूक ४:१६-१९ वाचा.
३. लेवीय २५:८-१२ या वचनांनुसार इस्राएली लोकांना योबेल किंवा सुटकेच्या वर्षाचा कसा फायदा झाला?
३ येशूच्या शब्दांचा अर्थ चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण आधी यहोवाने इस्राएली लोकांसाठी केलेल्या सुटकेच्या वर्षाच्या योजनेबद्दल पाहू. यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं: “पन्नासाव्या वर्षाला पवित्र मानावे आणि देशातील सर्व रहिवाशी मुक्त झाल्याची घोषणा करावी; या वर्षाला तुम्ही योबेल म्हणावे; या वर्षी तुम्ही आपआपल्या वतनात व आपआपल्या कुटुंबात परत जावे.” (लेवीय २५:८-१२ वाचा.) मागच्या लेखात आपण पाहिलं की आठवड्याच्या शब्बाथाच्या योजनेमुळे इस्राएली लोकांना फायदा झाला. पण योबेल किंवा सुटकेचं वर्ष याचा इस्राएली लोकांना कसा फायदा झाला? समजा एखाद्या इस्राएली व्यक्तीवर खूप कर्ज असल्यामुळे तिला आपली जमीन विकावी लागली असेल, तर योबेल वर्षादरम्यान तिला ती जमीन परत मिळायची. त्यामुळे ती व्यक्ती आपल्या “वतनात” परत जाऊ शकत होती आणि नंतर तिच्या मुलांना ती जमीन वारसा म्हणून मिळणं शक्य व्हायचं. तसंच, एखाद्या व्यक्तीने जर कर्ज फेडण्यासाठी स्वतःला किंवा आपल्या मुलांना दास म्हणून विकलं असेल, तर सुटकेच्या वर्षात ती व्यक्ती आपल्या “कुटुंबात” परत जाऊ शकत होती. या तरतुदीमुळे कोणालाही कायमचं दास म्हणून राहायची गरज नव्हती. यामुळे यहोवाची लोकांप्रती असलेली काळजी स्पष्टपणे दिसून आली.
४-५. सुटकेच्या वर्षाबद्दल शिकून घेणं आपल्यासाठी गरजेचं का आहे?
४ सुटकेच्या वर्षाचा आणखी एक फायदा कोणता होता? यहोवाने इस्राएली लोकांना सांगितलं होतं: “तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल.” (अनु. १५:४) आज जगात याच्या अगदी उलट घडत आहे. गरीब हा दिवसेंदिवस गरीब होत चालला आहे, तर श्रीमंत आणखी श्रीमंत होत चालला आहे!
५ ख्रिस्ती या नात्याने आज आपल्याला मोशेच्या नियमशास्त्राच्या अधीन राहायची गरज नाही. त्यामुळे सुटकेच्या वर्षात केल्या जाणाऱ्या गोष्टी, जसं की दासांची सुटका, कर्जमाफी किंवा जमीन परत देणं या गोष्टी आज आपण करत नाही. (रोम. ७:४; १०:४; इफिस. २:१५) असं असलं तरी आपण सुटकेच्या वर्षाबद्दल शिकून घेणं गरजेचं आहे. असं का? कारण यामुळे यहोवाने पापापासून सुटका मिळवण्याची जी योजना केली आहे तिची आपल्याला आठवण होते.
येशूने सुटकेची घोषणा केली
६. मानवांना कशापासून सुटका मिळवण्याची गरज आहे?
६ आपण सर्व पापाचे दास असल्यामुळे आपल्या सर्वांचीच दयनीय अवस्था आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच सुटकेची गरज आहे. या दास्यात असल्यामुळे आपल्याला म्हातारपण, आजारपण आणि मृत्यू यांचा सामना करावा लागतो. या कटू सत्याची जाणीव आपल्याला आरशात पाहिल्यावर किंवा आजारपणात डॉक्टरांकडे गेल्यावर होते. तसंच, आपल्या हातून जेव्हा पाप घडतं तेव्हादेखील आपण निराश होतो आणि पापी असल्याची जाणीव आपल्याला होते. प्रेषित पौलने कबूल केलं की तो त्याच्या “शरीरात असलेल्या पापाच्या नियमाचा कैदी” आहे. त्याने असंदेखील म्हटलं: “खरोखर, माझी किती दयनीय स्थिती आहे! मरणाच्या अधीन असलेल्या माझ्या या शरीरापासून कोण माझी सुटका करेल?”—रोम. ७:२३, २४.
७. सुटकेबद्दल यशयाने काय भाकीत केलं होतं?
यश. ६१:१) ही भविष्यवाणी कोणाविषयी होती?
७ पण आनंदाची गोष्ट म्हणजे यहोवाने आपल्यासाठी पापापासून सुटका मिळवण्याची एक तरतूद केली. ही सुटका मिळणं येशूमुळे शक्य झालं. येशू पृथ्वीवर येण्याच्या ७०० पेक्षा जास्त वर्षांआधी संदेष्टा यशयाने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या सुटकेबद्दल भाकीत केलं होतं. या सुटकेचे फायदे, इस्राएली लोकांना सुटकेच्या वर्षात मिळणाऱ्या फायद्यांपेक्षा खूप जास्त असणार होते. यशयाने म्हटलं: “प्रभु परमेश्वराचा आत्मा मजवर आला आहे; कारण दीनास शुभवृत्त सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे; भग्न हृदयी जनास पट्टी बांधावी, धरून नेलेल्यांस मुक्तता” मिळावी यासाठी मला पाठवले आहे. (८. यशयाने सुटकेबद्दल केलेली भविष्यवाणी कोणावर पूर्ण होते?
८ येशूने आपलं सेवाकार्य सुरू केलं तेव्हा सुटकेबद्दल असलेल्या त्या महत्त्वाच्या भविष्यवाणीची पूर्णता व्हायला सुरुवात झाली. एकदा येशू आपल्या गावात, नासरेथमध्ये असलेल्या सभास्थानात गेला आणि तिथे त्याने जमलेल्या यहुदी लोकांसमोर यशयाने लिहून ठेवलेली तीच भविष्यवाणी वाचली. येशूने त्या भविष्यवाणीमधले शब्द स्वतःवर लागू केले. त्याने म्हटलं: “यहोवाचा पवित्र आत्मा माझ्यावर आहे, कारण गरिबांना आनंदाचा संदेश सांगण्यासाठी त्याने माझा अभिषेक केला आहे. बंदिवानांची सुटका करण्यासाठी आणि अंधांची दृष्टी परत आणण्यासाठी, तसंच जुलूम सोसणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि यहोवाची स्वीकृती प्राप्त करण्याचं वर्ष घोषित करण्यासाठी त्याने मला पाठवलं आहे.” (लूक ४:१६-१९) येशूने ही भविष्यवाणी कशी पूर्ण केली?
सुरुवातीला कोणाची सुटका करण्यात आली?
९. येशूच्या काळातल्या लोकांना कोणत्या प्रकारच्या सुटकेची आशा होती?
९ यशयाने भाकीत केलेली सुटका आणि येशूने सांगितलेली सुटका हिचे फायदे मिळण्याची सुरुवात पहिल्या शतकात झाली. असं आपण येशूच्या शब्दांच्या आधारावर म्हणू शकतो. त्याने म्हटलं होतं: “तुम्ही नुकतंच ऐकलेलं हे वचन आज पूर्ण झालं आहे.” (लूक ४:२१) त्या वेळी सभास्थानात जमलेले बरेच लोक कदाचित विचार करत होते की रोमी सरकारपासून सुटका मिळवण्यासाठी एखादा मोठा राजकीय बदल होईल. येशूच्या शिष्यांनाही कदाचित असंच वाटलं असेल, कारण या घटनेच्या काही काळानंतरच दोन शिष्यांनी म्हटलं होतं: “हाच मनुष्य इस्राएलची सुटका करेल अशी आमची आशा होती.” (लूक २४:१३, २१) पण आपल्याला माहीत आहे की येशूने कधीच लोकांना रोमी सरकार करत असलेल्या अन्यायाविरुद्ध आंदोलन करायला सांगितलं नाही. याऐवजी त्याने लोकांना सांगितलं की “जे कैसराचं आहे ते कैसराला द्या.” (मत्त. २२:२१) तर मग त्या वेळी येशूने कोणत्या अर्थाने लोकांची सुटका केली?
१०. येशूने लोकांना कोणत्या गोष्टीपासून सुटकेचा मार्ग दाखवून दिला?
१० देवाच्या पुत्राने दोन मार्गांनी लोकांना सुटका मिळवून दिली. पहिला मार्ग म्हणजे, येशूने लोकांना धार्मिक पुढारी शिकवत असलेल्या खोट्या शिकवणींपासून मुक्त होण्यासाठी मदत केली. त्या काळात मानवी परंपरा आणि चुकीचे विश्वास पाळायला बऱ्याच यहुदी लोकांना भाग पाडलं जायचं. एका अर्थी ते त्यांचे दास बनले होते. (मत्त. ५:३१-३७; १५:१-११) धार्मिक पुढारी दावा करत होते की ते इतरांना देवाची उपासना करायला शिकवत आहेत. पण ते स्वतः देवाच्या इच्छेनुसार वागत नव्हते. मसीहाला आणि तो शिकवत असलेल्या गोष्टींना नाकारण्याद्वारे ते जणू आध्यात्मिक अंधारात आणि पापाच्या दास्यातच राहिले. (योहा. ९:१, १४-१६, ३५-४१) पण येशूने मात्र लोकांना सत्याची ओळख करून दिली आणि त्याने स्वतः एक चांगलं उदाहरण मांडलं. असं करण्याद्वारे त्याने नम्र लोकांना खोट्या शिकवणींपासून मुक्त होण्याचा मार्ग दाखवून दिला.—मार्क १:२२; २:२३–३:५.
११. येशूने लोकांना आणखी कोणत्या मार्गाने सुटका मिळवून दिली?
११ येशूने आणखी एका मार्गाने लोकांना सुटका मिळवून दिली. त्याने लोकांना पापाच्या दास्यातून सुटका मिळवण्याचा मार्ग खुला केला. येशूने दिलेल्या बलिदानाच्या आधारावर यहोवाला मानवांना क्षमा करणं शक्य झालं. ही क्षमा अशा लोकांना मिळणार होती जे येशूवर आणि त्याने दिलेल्या खंडणीवर विश्वास ठेवतात. (इब्री १०:१२-१८) येशूने म्हटलं होतं: “जर पुत्राने तुम्हाला बंधनातून मुक्त केलं तरच तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हाल.” (योहा. ८:३६) ही मुक्तता किंवा सुटका बऱ्याच बाबतीत इस्राएली लोकांना योबेल वर्षात मिळणाऱ्या सुटकेपेक्षा श्रेष्ठ होती. उदाहरणार्थ, योबेल वर्षात मुक्त झालेला दास, कदाचित परिस्थितीमुळे पुन्हा दास्यात जाऊ शकत होता आणि कालांतराने वय झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालाच असता. पण येशूने लोकांसाठी केलेला सुटकेचा प्रबंध हा सदासर्वकाळ टिकणारा आहे.
१२. येशूने सुटकेची जी घोषणा केली त्याचा फायदा सर्वात आधी कोणाला झाला?
१२ इ. स. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या दिवशी यहोवाने आपल्या पवित्र आत्म्याद्वारे प्रेषितांना आणि इतर विश्वासू स्त्री-पुरुषांना अभिषिक्त केलं. यहोवाने त्यांना दत्तक घेतलं आणि आपली मुलं म्हणून स्वीकारलं. यामुळे त्यांचं पुढे जाऊन स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान होणार होतं आणि ते येशूसोबत राज्य करणार होते. (रोम. ८:२, १५-१७) नासरेथमधल्या सभास्थानात येशूने केलेल्या सुटकेच्या घोषणेचा सर्वात आधी या स्त्री-पुरुषांनाच फायदा झाला. हे स्त्री-पुरुष आता खोट्या शिकवणींपासून आणि यहुदी धार्मिक पुढाऱ्यांच्या मानवी परंपरांपासून मुक्त झाले होते. यासोबतच, पापाच्या घातक परिणामांपासून मुक्त होण्यासाठी आता देवाने त्यांच्यासाठी एक तरतूद केली होती. इ.स. ३३ मध्ये ख्रिस्ताच्या अनुयायांना अभिषिक्त करण्याद्वारे या लाक्षणिक सुटकेच्या वर्षाची सुरुवात झाली. आणि या लाक्षणिक वर्षाचा शेवट ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्याच्या शेवटी होईल. पण तोपर्यंत कोणकोणत्या गोष्टी साध्य केल्या जातील?
लाखो लोकांना सुटका मिळेल
१३-१४. अभिषिक्त जनांसोबतच आणखी कोणाला येशूने सांगितलेल्या सुटकेचा फायदा होऊ शकतो?
१३ आज सत्यात असलेले नम्र मनाचे लाखो लोक “दुसरी मेंढरे” या गटातले आहेत. (योहा. १०:१६) या लोकांना येशूसोबत स्वर्गात राज्य करण्याची नाही, तर पृथ्वीवर सदासर्वकाळ जीवन जगण्याची आशा आहे.
१४ तुमचीही हीच आशा असेल, तर अभिषिक्त जन अनुभवत असलेले काही आशीर्वाद तुम्हीही आज अनुभवत असाल. येशूने दिलेल्या खंडणीच्या आधारावर तुम्ही तुमच्या पापांसाठी देवाकडे क्षमा मागू शकता. यामुळे तुम्हाला देवाची पसंती मिळू शकते आणि तुमचा विवेकही शुद्ध राहू शकतो. (इफिस. १:७; प्रकटी. ७:१४, १५) यासोबतच, खोट्या धर्माच्या शिकवणींपासून तुम्हाला मिळालेल्या सुटकेबद्दलही विचार करा. यामुळे तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळाले आहेत. येशूने म्हटलं होतं: “तुम्हाला सत्य समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातून मुक्त करेल.” (योहा. ८:३२) हे स्वातंत्र्य असल्याचा आपल्या सर्वांनाच आनंद आहे.
१५. भविष्यात आपल्याला कशापासून सुटका मिळेल आणि कोणते आशीर्वाद मिळतील?
१५ भविष्यात तुम्ही आणखी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सुटकेची आशा ठेवू शकता. लवकरच येशू खोट्या धर्माचा आणि दुष्ट राजकीय शक्तींचा प्रकटी. ७:९, १४) लाखो लोकांचं पुनरुत्थान केलं जाईल आणि त्यांनादेखील आदामच्या पापामुळे झालेल्या वाईट परिणामांपासून सुटका मिळवायची संधी दिली जाईल.—प्रे. कार्ये २४:१५.
नाश करेल. त्या विनाशातून यहोवाची उपासना करणारा “मोठा लोकसमुदाय” वाचेल. मग यहोवा या लोकसमुदायाला पृथ्वीवरील नंदनवनात अनेक आशीर्वाद देईल. (१६. मानव भविष्यात कशापासून मुक्त होतील?
१६ हजार वर्षांच्या शासनकाळात येशू आणि त्याचे सहराजे मानवजातीला शारीरिक आणि आध्यात्मिक रीत्या परिपूर्ण बनण्यासाठी मदत करतील. हा हजार वर्षांचा काळ देवाचा मूळ उद्देश पूर्ण करण्यासाठी असेल, आणि हा इस्राएलमध्ये असलेल्या सुटकेच्या वर्षासारखाच असेल. या काळाच्या शेवटी यहोवाची विश्वासूपणे सेवा करणारे लोक परिपूर्ण बनतील आणि पापापासून पूर्णपणे मुक्त होतील.
१७. यशया ६५:२१-२३ या वचनांमध्ये देवाच्या लोकांबद्दल काय सांगितलं आहे? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)
१७ नवीन जगात जीवन कसं असेल याबद्दल यशया ६५:२१-२३ या वचनांमध्ये सांगितलं आहे. (वाचा.) या वचनांमधून आपल्याला कळतं की आपल्या सर्वांकडे भरपूर काम असेल. देवाचे लोक अर्थपूर्ण आणि आनंद मिळणारं काम करतील. हजार वर्षांच्या काळाच्या शेवटी “सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाईल आणि तिला देवाच्या मुलांचे गौरवी स्वातंत्र्य मिळेल.”—रोम. ८:२१.
१८. आपण भविष्यात आनंदी असू हे आपण कशावरून म्हणू शकतो?
१८ इस्राएली लोकांनी काम आणि विश्रांती यांमध्ये संतुलन राखावं यासाठी यहोवाने व्यवस्था केली होती. यहोवाचा दृष्टिकोन बदललेला नाही आणि त्यामुळे ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यातही तो आपल्या लोकांना काम आणि विश्रांती यांमध्ये संतुलन राखायला मदत करेल. तेव्हा यहोवाची उपासना करण्यासाठी वेळ देणं गरजेचं असेल. आज आनंदी राहण्यासाठी यहोवाची उपासना करणं गरजेचं आहे आणि नवीन जगातही हेच खरं असेल. ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राज्यात सर्व विश्वासू सेवकांकडे आनंददायी काम असेल आणि ते सर्व मिळून यहोवाची उपासना करतील.
गीत ५४ खरा विश्वास बाळगू या!
^ परि. 5 यहोवाने इस्राएली लोकांच्या सुटकेसाठी एक खास तरतूद केली आणि त्याने त्याची घोषणा करायला सांगितली. या खास तरतुदीला योबेल, म्हणजेच सुटकेचं वर्ष म्हटलं जायचं. आज आपण नियमशास्त्राच्या अधीन नसलो, तरी या सुटकेच्या तरतुदीबद्दल शिकून घेणं आपल्यासाठी गरजेचं आहे. इस्राएलमध्ये पाळलं जाणारं योबेल वर्ष, यहोवाने आपल्यासाठी केलेल्या एका मोठ्या तरतुदीची आठवण कशी करून देतं आणि त्याचा आपल्याला कसा फायदा होतो याबद्दल आपण या लेखात पाहणार आहोत.
^ परि. 61 चित्राचं वर्णन: योबेल किंवा सुटकेच्या वर्षी दासांची सुटका व्हायची आणि ते आपल्या कुटुंबाकडे आणि वतनाकडे परत जाऊ शकत होते.