व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सर्व गोष्टींसाठी आभार माना”

“सर्व गोष्टींसाठी आभार माना”

मी नेहमी इतरांचे आभार मानतो का? हा प्रश्‍न आपल्यापैकी प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे? बायबलमध्ये आधीच सांगितलं होतं की आपल्या काळातले बरेच लोक “उपकारांची जाण न ठेवणारे” असतील. (२ तीम. ३:२) तुम्हीही कदाचित अशा लोकांना भेटला असाल जे अपेक्षा करतात, की इतरांनी त्यांच्यासाठी काहीतरी करावं किंवा त्यांना काहीतरी द्यावं. तसंच, त्यांना असं वाटतं की मिळालेल्या मदतीसाठी त्यांनी इतरांचे आभार मानले नाहीत तरी चालेल. तुम्हाला अशा लोकांसोबत राहायला आवडेल का? नक्कीच नाही!

याउलट यहोवाच्या सेवकांना “कृतज्ञता दाखवा” असं सांगण्यात आलं आहे. यामुळे आपण इतरांचे “सर्व गोष्टींसाठी आभार” मानले पाहिजेत. (कलस्सै. ३:१५; १ थेस्सलनी. ५:१८) खरं पाहायला गेलं तर इतरांचे आभार मानण्यात आपलाच फायदा आहे. असं का म्हणता येईल? याची बरीच कारणं आहेत.

आभार मानल्यामुळे आपल्याला आनंदी राहायला मदत होते

इतरांचे आभार मानण्याची सवय विकसित करण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यामुळे आपल्याला स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला मदत होते. जेव्हा एक व्यक्‍ती एखाद्या गोष्टीसाठी आभार व्यक्‍त करते तेव्हा तिला तर चांगलं वाटतंच, पण त्यासोबत ज्या व्यक्‍तीचे आभार मानले जातात तिलाही चांगलं वाटतं. पण जिचे आभार मानले जातात तिला का चांगलं वाटतं? हे समजण्यासाठी एका उदाहरणाकडे लक्ष द्या. इतर जण तुमच्यासाठी एखादी गोष्ट करायला तयार असतात तेव्हा तुम्ही ती गोष्ट मिळवण्याच्या पात्रतेचे आहात असं त्यांना वाटतं. याचाच अर्थ इतरांना तुमची काळजी आहे. आणि इतर जण तुमची काळजी करतात या जाणिवेमुळे तुम्हालाही चांगलं वाटतं. रूथच्या बाबतीतही हेच घडलं. बवाज रूथशी उदारपणे वागला. कोणीतरी आपली काळजी करतं या जाणिवेमुळे रूथला आनंद झाला असेल यात काहीच शंका नाही.—रूथ २:१०-१३.

आपण खासकरून देवाचे आभार मानले पाहिजेत. यात काहीच शंका नाही, की त्याने आतापर्यंत आपल्या आध्यात्मिक आणि भौतिक गरजा पूर्ण केल्या आहेत व तो आजही करत आहे यांबद्दल आपण बऱ्‍याच वेळा विचार केला असेल. (अनु. ८:१७, १८; प्रे. कार्ये १४:१७) पण आपण देवाच्या चांगुलपणावर फक्‍त थोडा वेळ विचार करण्यापेक्षा, त्याने आपल्यासाठी आणि जवळच्या लोकांसाठी ज्या गोष्टी केल्या आहेत त्यावर खोलवर विचार  केला पाहिजे. आपल्या सृष्टिकर्त्याने आपल्याला दाखवलेल्या उदारतेबद्दल आपण जितकं जास्त मनन करू, तितकं जास्त आपण त्याचे आभार मानू. असं केल्यामुळे आपल्याप्रती असलेलं त्याचं प्रेम आणि कदर याची आपल्याला आणखी जास्त जाणीव होईल.—१ योहा. ४:९.

पण यहोवाने दाखवलेल्या उदारतेबद्दल आणि त्याने दिलेल्या आशीर्वादांबद्दल विचार करण्यासोबतच तुम्ही आणखी काहीतरी करू शकता. त्याने दाखवलेल्या चांगुलपणाबद्दल तुम्ही त्याचे आभार मानू शकता. (स्तो. १००:४, ५) म्हणूनच लोक असं म्हणतात, की ‘इतरांचे आभार मानल्याने आपल्या आनंदात भर पडते.’

आभार मानल्याने मैत्री घट्ट होते

आभार मानण्याचं आणखी एक चांगलं कारण म्हणजे त्यामुळे मैत्रीचं नातं घट्ट होतं. लोकांनी आपली कदर करावी असं आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं. जेव्हा एखाद्याने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या कामाबद्दल आपण मनापासून त्याचे आभार मानतो तेव्हा आपल्यातलं मैत्रीचं नातं आणखी घट्ट होतं. (रोम. १६:३, ४) आभार मानणारे लोक सहसा इतरांना मदत करणारेही असतात. लोक त्यांच्याशी दयाळूपणे वागत आहेत हे पाहून त्यांनाही इतरांशी दयाळूपणे वागण्याची प्रेरणा मिळते. खरंच, इतरांना मदत केल्यामुळे आपल्याही आनंदात भर पडते. हीच गोष्ट येशूनेही सांगितली. त्याने म्हटलं: “घेण्यापेक्षा देण्यात जास्त आनंद आहे.”—प्रे. कार्ये २०:३५.

कॅलिफोर्निया विश्‍वविद्यालयाचे सहसंचालक रॉबर्ट इमेंस यांनी आभार व्यक्‍त करण्याबद्दल अभ्यास केला. त्याबद्दल त्यांनी असं म्हटलं, “आभार व्यक्‍त करण्यासाठी आधी हे समजणं गरजेचं आहे की आपण एकमेकांवर अवलंबून असतो. कधी आपण लोकांना मदत करतो तर कधी ते आपल्याला मदत करतात.” खरंतर चांगलं जीवन जगण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी आपण बऱ्‍याचदा इतरांवर अवलंबून असतो. जसं की, अन्‍न किंवा वैद्यकिय मदतीसाठी आपण कदाचित इतरांवर अवलंबून असू. (१ करिंथ. १२:२१) तर हे स्पष्टच आहे की एक कृतज्ञ व्यक्‍ती तिला मिळालेल्या मदतीसाठी नेहमी इतरांचे आभार मानते. तेव्हा तुम्हीही इतरांचे आभार मानण्याची सवय लावली आहे का?

आभार मानणं आणि जीवनाबद्दल असलेला आपला दृष्टिकोन

आभार व्यक्‍त करण्याची सवय लावण्याचं आणखी एक कारण म्हणजे, आपल्याला जीवनाच्या नकारात्मक गोष्टींऐवजी सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला मदत होते. आपली विचार करण्याची क्षमता एका अर्थी गाळणीसारखी आहे. या क्षमतेमुळे आपल्याला सर्वच गोष्टींवर विचार करण्याऐवजी काही विशिष्ट गोष्टींवरच विचार करायला मदत होते. आणि याचा परिणाम म्हणजे आपण समस्यांकडे लक्ष देण्याऐवजी सकारात्मक गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. आपण जितकं जास्त कृतज्ञ असू तितकाच जास्त आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल; आणि जितका जास्त आपला दृष्टिकोन सकारात्मक असेल तितकंच आपण आणखी कृतज्ञ होऊ. कृतज्ञ मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपल्याला पौलचे शब्द जीवनात लागू करायला मदत होईल. त्याने म्हटलं: “प्रभूमध्ये नेहमी आनंदी राहा.”—फिलिप्पै. ४:४.

कृतज्ञतेची भावना आपल्याला नकारात्मक दृष्टिकोन टाळायला मदत करते. कारण एकाच वेळी कृतज्ञतेची भावना असण्यासोबतच ईर्ष्या, निराशा व क्रोध या भावना येणं शक्य नाही. उपकाराची जाणीव असलेल्या लोकांचा सहसा भौतिक गोष्टी मिळवण्याकडे कमी कल असतो. त्यांच्याकडे जे आहे त्यात ते समाधानी असतात आणि ते जास्त भौतिक गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करत नाहीत.—फिलिप्पै. ४:१२.

आशीर्वादांवर मनन करा

या शेवटच्या दिवसांमधल्या कठीण परिस्थितीमुळे आपण निराश आणि दुःखी व्हावं अशी सैतानाची इच्छा आहे. आणि एक ख्रिस्ती म्हणून आपल्याला ही गोष्ट माहीत आहे. आपण जर चुकीची मनोवृत्ती बाळगली आणि सर्वच गोष्टींबद्दल कुरकुर करू लागलो तर त्याला आनंदच होईल. पण अशा भावनेमुळे आपल्याला इतरांना आनंदाचा संदेश सांगणं कठीण जाईल. खरंतर, कृतज्ञता आणि देवाच्या पवित्र आत्म्याचे पैलू हे एकमेकांशी संबंधित आहेत. उदाहरणार्थ, देवाने आपल्याला आज ज्या गोष्टी दिल्या आहेत त्यामुळे आपण आनंदी होतो. तसंच, भविष्यात तो ज्या गोष्टी देणार आहे त्यांवर आपला विश्‍वास असल्यामुळेही आपल्याला आनंद होतो.—गलती. ५:२२, २३.

यहोवाचे लोक या नात्याने आपल्याला या लेखात कृतज्ञतेबद्दल सांगितलेल्या गोष्टी पटतील. असं असलं तरी तुम्हाला ही जाणीव होईल की आभार व्यक्‍त करणं नेहमीच सोपं नसतं. पण यामुळे निराश होऊ नका. तुम्ही कृतज्ञतेची भावना विकसित करू शकता  आणि तशी मनोवृत्ती नेहमी बाळगण्याचा प्रयत्नही करू शकता. ते कसं? प्रत्येक दिवशी आपल्या जीवनातल्या अशा काही पैलूंबद्दल विचार करा ज्यांबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. तुम्ही जितकं जास्त असं करण्याचा प्रयत्न कराल, तितकं तुम्हाला सहजपणे कृतज्ञता दाखवणं शक्य होईल. जीवनातल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्‍या लोकांपेक्षा तुम्ही जास्त आनंदी व्हाल. देव आणि इतर जण तुमच्यासाठी करत असलेल्या अशा चांगल्या गोष्टींबद्दल विचार करा ज्यांमुळे तुम्हाला आनंद होतो व प्रोत्साहन मिळतं. तुम्ही या गोष्टी लिहून ठेवू शकता. तुम्ही प्रत्येक दिवशी अशा दोन किंवा तीन गोष्टी लिहू शकता ज्यांबद्दल तुम्ही आभारी आहात.

आभार व्यक्‍त करणाच्या विषयावर अभ्यास करणाऱ्‍यांच्या मते आपण जेव्हा नेहमी आभार व्यक्‍त करतो तेव्हा आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल होतो आणि त्यामुळे आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला मदत होते. कृतज्ञ व्यक्‍ती जास्त आनंदी असते. तेव्हा, तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांवर मनन करा, तुमच्या जीवनातल्या चांगल्या अनुभवांबद्दल विचार करा आणि नेहमी आभार माना! तुमच्या जीवनात असलेल्या चांगल्या गोष्टी गृहित धरण्यापेक्षा “परमेश्‍वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे.” म्हणजेच, “सर्व गोष्टींसाठी आभार माना.”—१ इति. १६:३४; १ थेस्सलनी. ५:१८.