व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंधकारातून बोलावण्यात आलेले

अंधकारातून बोलावण्यात आलेले

यहोवाने “तुम्हांस अंधकारांतून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले.”—१ पेत्र २:९.

गीत क्रमांक: ४३, २८

१. यरुशलेमचा नाश करण्यात आला तेव्हा काय घडलं?

इ.स.पू. ६०७ मध्ये बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर दुसरा, याने आपलं मोठं सैन्य घेऊन यरुशलेमवर हल्ला केला. बायबल म्हणतं की राजाने तिथल्या तरुणांना तलवारीने मारून टाकलं. “त्याने तरुणांवर किंवा कुमारींवर, वृद्धांवर किंवा वयातीतांवर दया केली नाही.” आणि शेवटी त्याने, “देवाचे मंदिर जाळून टाकले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकला, तेथले वाडे आग लावून जाळले व त्यातल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला.”—२ इति. ३६:१७, १९.

२. यहोवाने कोणती ताकीद दिली होती आणि यहुदी लोकांसोबत काय घडणार होतं?

यरुशलेमचा नाश करण्यात आला तेव्हा यहुदी लोकांना याचं आश्चर्य वाटलं नसावं. कारण यहोवा देवाने अनेक वर्षांपासून आपल्या संदेष्ट्यांना पाठवून त्यांना याबद्दल ताकीद दिली होती. यहोवाने यहुदी लोकांना सांगितलं होतं की, जर त्यांनी आज्ञा मोडण्याचं थांबवलं नाही तर तो त्यांना बाबेलच्या हातात देईल. यहोवाने हेदेखील सांगितलं होतं की बाबेलचे लोक अनेकांना तलवारीने जिवे मारतील आणि जे बचावतील त्यांना बंदिवासात नेण्यात येईल. (यिर्म. १५:२) यहुदी लोकांचं बंदिवासातील जीवन कसं असणार होतं? यहुदी लोक जसे बाबेलच्या बंदिवासात होते, तसंच काहीसं ख्रिश्चनांसोबतही घडलं का? आणि जर घडलं, तर नेमकं केव्हा?

बंदिवासातील जीवन

३. बाबेलमधील बंदिवासातील जीवन इजिप्तच्या बंदिवासातील जीवनापेक्षा कशा प्रकारे वेगळं होतं?

यहोवाने यहुदी लोकांना सांगितलं होतं की, जेव्हा त्यांना बंदिवासात नेण्यात येईल तेव्हा त्यांनी त्या नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यावं आणि सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. यिर्मया संदेष्ट्याद्वारे यहोवाने त्यांना सांगितलं: “तुम्ही घरे बांधून त्यात वस्ती करा; मळे लावा व त्यांची फळे खा; तुम्हास पकडून ज्या नगरास मी नेले त्यांचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा; त्या नगराचे हित ते तुमचे हित.” (यिर्म. २९:५, ७) जे यहुदी यहोवाच्या आज्ञेनुसार वागले त्यांनी बंदिवासात असतानाही सामान्य जीवनाचा आनंद घेतला. बाबेलच्या लोकांनी यहुदी लोकांना बऱ्याच बाबतीत सूट दिली होती. त्यांना संपूर्ण देशात कुठंही जाण्याची मोकळीकदेखील होती. त्या वेळी बाबेल हे व्यापाराचं मुख्य केंद्र होतं. प्राचीन लिखानांतून हे दिसून येतं की, बंदिवासात असताना यहुदी लोकांनी खरेदी-विक्री करण्याची कला शिकून घेतली आणि ते त्यात कुशलही झाले. काही यहुदी लोक तर श्रीमंतदेखील झाले. शेकडो वर्षांआधी इजिप्तच्या बंदिवासात असताना इस्राएली लोकांची जशी परिस्थिती होती, तशी परिस्थिती बाबेलच्या बंदिवासातील यहुदी लोकांची मात्र नव्हती.—निर्गम २:२३-२५ वाचा.

४. अविश्वासू यहुदी लोकांसोबत आणखी कोणाला त्रास सहन करावा लागला आणि कोणत्या कारणामुळे नियमशास्त्रात सांगितलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करणं त्यांना शक्य नव्हतं?

बंदिवासात असलेले काही यहुदी देवाचे विश्वासू सेवक होते. त्यांची काहीही चूक नसताना संपूर्ण राष्ट्रासोबत त्यांनाही बंदिवासात त्रास सहन करावा लागत होता. बंदिवासात यहुदी लोकांच्या भौतिक गरजा तर भागत होत्या, पण पूर्वीप्रमाणे यहोवाची उपासना करणं त्यांना कसं जमणार होतं? कारण, यहोवाच्या मंदिराचा आणि वेदीचा नाश करण्यात आला होता आणि यामुळे याजक संघटित रीत्या यहोवाची सेवा करू शकत नव्हते. पण, अशा परिस्थितीतही विश्वासू यहुदी लोकांनी देवाच्या नियमशास्त्राचं पालन करण्याचा नेहमी प्रयत्न केला. उदाहरणार्थ, दानीएल, शद्रख, मेशख आणि अबेद्‌नगो यांनी नियमशास्त्रात मनाई करण्यात आलेलं अन्न खाण्यास नकार दिला. बायबल असंही सांगतं की दानीएल हा नियमित रीत्या देवाला प्रार्थना करायचा. (दानी. १:८; ६:१०) पण, मूर्तीपूजक राष्ट्राच्या शासनाखाली असल्यामुळे नियमशास्त्रात सांगितलेल्या सर्व गोष्टी पूर्ण करणं यहुदी लोकांना शक्य नव्हतं.

५. यहोवाने आपल्या लोकांना कोणतं अभिवचन दिलं होतं आणि ते पूर्ण होणं ही एक विशेष गोष्ट का होती?

इस्राएली लोकांना नियमशास्त्रात सांगितलेल्या पद्धतीने पुन्हा एकदा यहोवाची उपासना करणं शक्य होणार होतं का? त्या वेळी कदाचित हे अशक्य वाटलं असावं. कारण, बाबेलचे लोक सहसा आपल्या बंदिवासात असलेल्यांना मुक्त करत नव्हते. पण, यहोवा देवाने अभिवचन दिलं होतं की त्याचे लोक बंदिवासातून मुक्त होतील; आणि पुढं घडलंही तसंच. यहोवा त्याने दिलेली अभिवचनं नेहमीच पूर्ण करतो!—यश. ५५:११.

खरे ख्रिस्ती लाक्षणिक अर्थाने कधी बाबेलच्या बंदिवासात होते का?

६, ७. आपल्या समजुतीमध्ये सुधारणा करण्याची गरज का आहे?

यहुदी लोक जसे बाबेलच्या बंदिवासात होते, तसंच काहीसं ख्रिश्चनांसोबतही घडलं का? अनेक वर्षांपासून टेहळणी बुरूजमध्ये असं सांगण्यात आलं होतं की, विश्वासू ख्रिस्ती १९१८ साली बाबेलच्या बंदिवासात गेले आणि १९१९ साली त्यांची सुटका झाली. पण, या लेखात आणि पुढील लेखात आपण पाहणार आहोत की, आपल्या या समजुतीमध्ये सुधारणा करण्याची गरज का आहे.

पुढील गोष्टींचा विचार करा: मोठी बाबेल ही खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याला सूचित करते. आणि १९१८ साली देवाचे लोक खोट्या धर्माच्या, अर्थात या मोठ्या बाबेलच्या बंदिवासात गेले नव्हते. हे खरं आहे की त्या वेळी अभिषिक्तांचा छळ करण्यात येत होता. पण, तो मुख्यतः देशातील सरकारांकडून करण्यात येत होता, खोट्या धर्मांकडून नाही. खरंतर, पहिल्या महायुद्धाच्या बऱ्याच दशकांआधी देवाच्या अभिषिक्त सेवकांनी स्वतःला खोट्या धर्मांपासून वेगळं करण्यास सुरवात केली होती. या गोष्टींवरून हे स्पष्ट होतं की, यहोवाचे लोक १९१८ साली मोठ्या बाबेलच्या बंदिवासात गेले नव्हते.

देवाचे लोक बाबेलच्या बंदिवासात केव्हा होते?

८. प्रेषितांच्या मृत्यूनंतर काय घडलं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

इ.स ३३ सालच्या पेन्टेकॉस्ट रोजी, ख्रिस्ती बनलेल्या हजारो लोकांना पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त करण्यात आलं. त्या वेळी ते “निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक” बनले. (१ पेत्र २:९, १० वाचा.) जिवंत असेपर्यंत प्रेषितांनी मंडळीची चांगली काळजी घेतली. पण प्रेषितांच्या मृत्यूनंतर काही लोकांनी मंडळीमध्ये खोट्या शिकवणी पसरवण्यास सुरवात केली. आणि शिष्यांना सत्यापासून दूर नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. या लोकांवर अॅरिस्टोटल आणि प्लेटो यांच्या तत्वज्ञानाचा मोठा प्रभाव होता. देवाच्या वचनातील सत्य शिकवण्याऐवजी ते या तत्वज्ञान्यांचेच विचार लोकांना शिकवू लागले. (प्रे. कृत्ये २०:३०; २ थेस्सलनी. २:६-८) या खोट्या शिकवणी शिकवणाऱ्यांपैकी बरेच लोक मंडळीत मोठमोठ्या जबाबदाऱ्या हाताळणारे व तिच्यावर देखरेख करणारे प्रतिष्ठित पुरुष होते. येशू ख्रिस्ताने आपल्या अनुयायांना सांगितलं होतं की, “तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा.” (मत्त. २३:८) पण तरी आता मंडळीत एक वेगळा पाळकवर्ग तयार होऊ लागला होता.

९. धर्मत्यागी ख्रिस्ती रोमी सरकाराचा भाग कसे बनले आणि त्यामुळे कोणते परिणाम घडून आले?

मूर्तीपूजक रोमी साम्राज्यावर इ.स. ३१३ साली सम्राट कॉन्स्टंटाइन राज्य करत होता. आणि त्याने खोट्या शिकवणींनी भ्रष्ट झालेल्या ख्रिस्ती धर्माला कायदेशीर स्वरूप दिलं. त्यानंतर, ख्रिस्ती समाजातील हा पाळकवर्ग रोमी सरकारासोबत मिळून काम करू लागला. उदाहरणार्थ, कॉन्स्टंटाइनने धर्मपुढाऱ्यांबरोबर एक सभा आयोजित केली, ज्याला ‘नायसियाची धर्मसभा’ असं म्हटलं जातं. त्या सभेनंतर सम्राटाने एरियस नावाच्या एका पाळकाला देशातून हद्दपार केलं. कारण येशू हाच देव आहे असं मानण्यास तो तयार नव्हता. नंतर, थिओडोशियस हा रोमवर राज्य करू लागला आणि कॅथलिक धर्म हा रोमी साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला. इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की सम्राट थिओडोशियसच्या शासनादरम्यान मूर्तीपूजक रोम एक “ख्रिश्चन” राष्ट्र बनलं. पण, वास्तविक पाहता धर्मत्यागी ख्रिश्चनांनीच रोमच्या खोट्या शिकवणी स्वीकारल्या होत्या आणि ते मोठ्या बाबेलचा एक भाग बनले होते. पण, या काळातही काही विश्वासू अभिषिक्त ख्रिस्ती होते. ते येशूने सांगितलेल्या निदणाच्या दाखल्यातील गव्हाप्रमाणे होते. हे विश्वासू सेवक देवाची उपासना करण्याकरता त्यांच्या परीने सर्व प्रयत्न करत होते. पण, त्या वेळी त्यांचं ऐकण्यास फार थोडे लोकच तयार होते. (मत्तय १३:२४, २५, ३७-३९ वाचा) ते खऱ्या अर्थाने बाबेलच्या बंदिवासात होते!

१०. लोकांनी चर्चच्या शिकवणींना का नाकारलं?

१० ख्रिस्तानंतर सुरवातीच्या काही शतकांपर्यंत लोक ग्रीक किंवा लॅटिन भाषेत बायबल वाचू शकत होते. चर्चमध्ये शिकवल्या जाणाऱ्या गोष्टी देवाच्या वचनांनुसार आहेत की नाहीत, हे ते पडताळून पाहू शकत होते. जेव्हा काही लोकांच्या लक्षात आलं की, चर्चमधील शिकवणी बायबलच्या विरोधात आहेत तेव्हा त्यांनी त्या शिकवणींना नाकारलं. पण, त्या वेळी आपलं मत इतरांसमोर मांडणं धोकादायक होतं. कारण यामुळे त्यांना जिवेही मारलं जाऊ शकत होतं.

११. पाळकांनी बायबलला कशा प्रकारे स्वतःच्या नियंत्रणात ठेवलं?

११ कालांतरानं ग्रीक किंवा लॅटिन भाषा बोलणारे फार कमी लोक उरले. आणि चर्चच्या पुढाऱ्यांनी बायबलचं लोकांना समजेल अशा भाषेत भाषांतर होऊ दिलं नाही. यामुळे, फक्त पाळक आणि काही सुशिक्षित लोकच बायबल वाचू शकत होते. तसंच, काही पाळकांना तर व्यवस्थित रीत्या लिहिता-वाचताही येत नव्हतं. चर्चमध्ये शिकवल्या जाणाऱ्या शिकवणींना जे लोक नाकारायचे त्यांना फार कठोर शिक्षा दिली जायची. विश्वासू अभिषिक्त ख्रिश्चन, लोकांपासून लपून लहानलहान गटांत एकत्र जमायचे. काहींना तर एकत्र जमणंही शक्य नव्हतं. बाबेलच्या बंदिवासात ज्या प्रकारे याजकवर्ग संघटित रीत्या काम करू शकत नव्हता, त्याच प्रकारे “राजकीय याजकगण” म्हणजेच अभिषिक्त जन संघटित रीत्या देवाची उपासना करू शकत नव्हते. मोठ्या बाबेलने लोकांना आपल्या नियंत्रणात ठेवलं होतं!

प्रकाश दिसू लागला

१२, १३. कोणत्या दोन कारणांमुळे अंधकारात प्रकाश दिसू लागला? स्पष्ट करा.

१२ खऱ्या ख्रिश्चनांना मुक्तपणे यहोवाची उपासना त्याला मान्य असलेल्या पद्धतीनं करणं कधी शक्य होणार होतं का? हो नक्कीच. याची दोन खास कारणं होती. पहिलं कारण म्हणजे छपाई यंत्राचा शोध. हा शोध लागण्यापूर्वी म्हणजेच १४५० सालाआधी बायबलच्या प्रती हातांनी लिहून तयार केल्या जायच्या, आणि हे काम काही सोपं नव्हतं. कुशल असलेल्या व्यक्तीलाही बायबलची एक प्रत तयार करण्यासाठी जवळजवळ दहा महिने लागायचे. तसंच, बायबल चर्मपत्रांवर, म्हणजे प्राण्यांच्या त्वचेने तयार केलेल्या पत्रांवर लिहिलं जायचं. यामुळे बायबलच्या खूप कमी प्रती तयार व्हायच्या आणि त्या खूप महागही असायच्या. पण, छपाई यंत्रामुळे आणि कागदामुळे या कामात कुशल असलेली व्यक्ती दर दिवशी १,३०० पेक्षा जास्त पानांची छपाई करू शकत होती.

छपाई यंत्राच्या शोधामुळे आणि बायबलचं भाषांतर करणाऱ्यांच्या धाडसी वृत्तीमुळे अंधकारात प्रकाश दिसू लागला (परिच्छेद १२, १३ पाहा)

१३ दुसरं कारण म्हणजे, बायबलचं भाषांतर. १५०० सालाच्या आसपास काही धाडसी पुरुषांनी सामान्य लोकांना समजेल अशा भाषांमध्ये बायबलचं भाषांतर केलं. आपल्याला जिवे मारलं जाऊ शकतं, हे माहीत असतानाही त्यांनी हे काम केलं. यामुळे चर्चचे पुढारी संतापून उठले. कारण त्यांना हे माहीत होतं की, जेव्हा प्रामाणिक अंतःकरणाचे लोक त्यांच्या स्वतःच्या भाषेत बायबल वाचतील तेव्हा ते प्रश्न विचारू लागतील. जसं की: ‘बायबलमध्ये पर्गेटरीच्या (मरणोत्तर प्रायश्‍चित्त भूमीच्या) शिकवणीबद्दल कुठं सांगण्यात आलं आहे? एखाद्याचा मृत्यू झाल्यावर त्याची अंत्यविधी करण्यासाठी पाळकाला पैसे दिले पाहिजेत, असं बायबलमध्ये कुठं सांगण्यात आलं आहे? पोप किंवा कार्डिनलविषयी बायबलमध्ये कुठं लिहिण्यात आलं आहे?’ चर्चमध्ये शिकवल्या जाणाऱ्या बऱ्याच खोट्या शिकवणी, ख्रिस्ताच्या शेकडो वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या अॅरिस्टोटल आणि प्लेटो यांच्या तत्वज्ञानांवर आधारित होत्या. लोक जेव्हा चर्चच्या शिकवणींवर प्रश्न उपस्थित करायचे तेव्हा चर्चच्या पुढाऱ्यांना खूप राग यायचा. जे लोक त्यांची शिकवण नाकारायचे त्यांना तर मृत्युदंडाची शिक्षा दिली जात होती. लोकांनी बायबलचं वाचन करण्याचं आणि प्रश्न विचारण्याचं थांबवावं अशी चर्चच्या पुढाऱ्यांची इच्छा होती; आणि तसं घडलंही. पण, काही धाडसी लोकांनी मोठ्या बाबेलच्या नियंत्रणात राहण्याचं नाकारलं. त्यांना देवाच्या वचनातून सत्य काय आहे हे समजलं होतं आणि त्याविषयी आणखी जाणून घेण्याची त्यांची इच्छा होती. खोट्या धर्माच्या बंदिवासातून मुक्त होण्याची वेळ आता जवळ आली होती!

१४. (क) बायबलचा अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या लोकांनी काय केलं? (ख) बंधू रस्सल यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी काय केलं?

१४ अनेकांना बायबल वाचण्याची आणि त्याचा अभ्यास करण्याची आणि त्यातून शिकलेल्या गोष्टींबाबत इतरांसोबत बोलण्याची इच्छा होती. आपला विश्वास काय असला पाहिजे याबद्दल चर्चच्या पुढाऱ्यांनी आपल्याला सांगावं असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे ते अशा देशांमध्ये पळून गेले जिथं त्यांना मोकळेपणाने बायबलचा अभ्यास करता येईल. अशा देशांपैकीच एक देश म्हणजे अमेरिका. १८७० च्या दरम्यान चार्ल्स टेझ रस्सल आणि त्यांच्यासोबत इतर काही जनांनी बायबलचा खोलवर अभ्यास करण्यास सुरवात केली. सुरवातीला बंधू रस्सल यांना जाणून घ्यायचं होतं की कोणता धर्म सत्य शिकवत आहे. त्यांनी त्या काळातील काही ख्रिस्ती धर्मपंथांच्या, तसंच काही इतर धर्मांच्या शिकवणींचीही बायबलच्या शिकवणींशी तुलना केली आणि त्यांना पडताळून पाहिलं. लवकरच त्यांना हे कळून आलं की यातील एकही पंथ किंवा धर्म बायबलमधील शिकवणींशी सुसंगत नाही. बंधू रस्सल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बायबलचा अभ्यास करून शोधलेल्या सत्य शिकवणींना चर्चचे पाळक कदाचित स्वीकारतील, या आशेने एकदा बंधू रस्सल यांनी स्थानिक चर्चच्या बऱ्याच पाळकांशीही चर्चा केली. पण चर्चच्या पुढाऱ्यांनी यात कोणतीही आस्था दाखवली नाही. त्यामुळे खोट्या धर्माचा भाग असलेल्यांसोबत आपण देवाची उपासना करू शकत नाही, हे या बायबल विद्यार्थ्यांना लवकरच समजून आलं.—२ करिंथकर ६:१४ वाचा.

१५. (क) खरे ख्रिस्ती मोठ्या बाबेलच्या बंदिवासात केव्हा गेले? (ख) पुढील लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

१५ आतापर्यंत आपण या लेखात पाहिलं की, प्रेषितांच्या मृत्यूनंतर काही काळातच खरे ख्रिस्ती मोठ्या बाबेलच्या बंदिवासात गेले. पण अजूनही आपल्याला काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला हवीत. जसं की: १९१४ च्या काही वर्षांआधी अभिषिक्त ख्रिस्ती मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून स्वतःला मुक्त करून घेत होते, असं आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो? पहिल्या महायुद्धाच्या वेळी बांधव प्रचारकार्यात थंडावल्यामुळे यहोवा देव आपल्या या सेवकांवर नाखूश होता, हे खरं आहे का? महायुद्धाच्या वेळी काही बांधवांनी आपली ख्रिस्ती तटस्थता टिकवून ठेवली नाही, त्यामुळे त्यांनी यहोवाची मर्जी गमावली असं म्हणता येईल का? आणि जर खरे ख्रिस्ती प्रेषितांच्या मृत्यूनंतर मोठ्या बाबेलच्या बंदीवासात गेले, तर ते नेमके कधी या बंदिवासातून मुक्त झाले? या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण पुढील लेखामध्ये पाहू.