व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अतिशय अर्थभरीत असा एक शब्द

अतिशय अर्थभरीत असा एक शब्द

स्त्रियांना उद्देशून बोलताना येशूने कधीकधी “बाई” या शब्दाचा वापर केला. उदाहरणार्थ, १८ वर्षं कुबड असलेल्या एका स्त्रीला बरं करताना येशू म्हणाला, “बाई, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस.” (लूक १३:१०-१३) येशूच्या काळात, सहसा स्त्रियांना आदरानं उद्देशून बोलण्यासाठी या शब्दाचा वापर केला जायचा. आणि हाच शब्द येशूने आपल्या आईलादेखील उद्देशून वापरला. (योहा. १९:२६; २०:१३) पण, या आदरानं वापरल्या जाणाऱ्या शब्दापेक्षाही असा एक शब्द आहे ज्यात कोमलता आणि दयाळूपणाच्या भावनादेखील आहेत.

काही स्त्रियांना उद्देशून बोलताना बायबलमध्ये या खास शब्दाचा वापर करण्यात आला आहे. १२ वर्षं रक्तस्रावाने पीडित असलेल्या स्त्रीशी बोलताना येशूने हाच शब्द वापरला. ती स्त्री ज्या प्रकारे येशूला भेटली ते खरंतर देवाच्या नियमशास्त्राच्या विरोधात होतं. कारण अशा प्रकारे रक्तस्राव असलेल्या स्त्रीला अशुद्ध समजलं जायचं आणि तिला इतरांपासून लांब राहण्याची गरज होती. त्यामुळे तिनं जे केलं ते देवाच्या नियमशास्त्राला धरून नव्हतं किंवा चुकीचं होतं, असं कोणी म्हणेल. (लेवी. १५:१९-२७) पण आपल्या पीडेपासून मुक्त होण्यासाठी ती फार तळमळत होती. खरंतर, “तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता.”—मार्क ५:२५, २६.

हळूहळू गर्दीतून वाट काढत, तिने पाठीमागून जाऊन येशूच्या “वस्त्राच्या गोंड्याला” स्पर्श केला. तेव्हा तिचा रक्तस्राव लगेचच बंद झाला! जे घडलं त्याची कोणालाही कल्पना न येता आपण हळूच निघून जाऊ, असं त्या स्त्रीला वाटलं. पण तेव्हाच येशूने म्हटलं, “मला कोणी स्पर्श केला?” (लूक ८:४५-४७) आपण जे केलं ते लपून राहिलेलं नाही याची कल्पना येऊन ती स्त्री घाबरत व थरथर कापत येशूपुढे आली, आणि त्याच्या पाया पडून “तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला.”—मार्क ५:३३.

त्या स्त्रीला सांत्वन देण्यासाठी आणि शांत करण्यासाठी येशू प्रेमळपणे तिला म्हणाला, “मुली, धीर धर.” (मत्त. ९:२२) बायबल तज्ञांच्या मते, “मुली” या शब्दासाठी मूळ हिब्रू आणि ग्रीक भाषेत जो शब्द आहे त्याचा वापर “दयाळूपणा आणि प्रेमळपणा” दर्शवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. पुढे त्या स्त्रीला आणखी धीर आणि खात्री देण्यासाठी येशू म्हणाला, “तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”—मार्क ५:३४.

एका श्रीमंत इस्राएली माणसाने, बवाजानेदेखील रूथ या मवाबी स्त्रीला “मुली” असं म्हटलं. रक्तस्राव असलेल्या स्त्रीला ज्याप्रमाणे पुढं काय होईल हे माहीत नव्हतं. त्याचप्रमाणे रूथलाही तिच्याबाबतीत पुढं काय होईल याबद्दल कोणतीही खात्री नव्हती. खरंतर ती अनोळखी अशा एका माणसाच्या, म्हणजेच बवाजाच्या शेतात सरवा वेचत होती. बवाज तिला म्हणाला, “मुली, ऐकतेस ना?” त्यानंतर त्याने त्याच्याच शेतात तिने सरवा वेचावा असं तिला सूचवलं. रूथने बवाजाला दंडवत घातला आणि आपण एक विदेशी स्त्री असूनही बवाज आपल्यासोबत दयेनं का वागत आहे, असं विचारलं. तेव्हा बवाज तिला म्हणाला, “तू आपल्या सासूशी [नामीशी] कशी वागलीस . . . ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो.”—रूथ २:८-१२.

आज मंडळीमध्ये वडील म्हणून सेवा करणाऱ्यांसमोर, येशूचं आणि बवाजाचं खरंच किती चांगलं उदाहरण आहे! काही वेळा जेव्हा एखाद्या बहिणीला आध्यात्मिक मदतीची आणि प्रोत्साहनाची गरज पडते, तेव्हा मंडळीतील दोन वडील तिला मदत करण्यासाठी भेटू शकतात. यहोवाकडे प्रार्थनेत मार्गदर्शन मागितल्यानंतर आणि त्या बहिणीचं लक्षपूर्वक ऐकल्यानंतर, या दोन्ही वडिलांना देवाच्या वचनातून तिला सांत्वन आणि धीर देण्यास मदत होईल.—रोम. १५:४.