व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देत राहा

नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देत राहा

“लोकांना प्रोत्साहन मिळेल असं काही तुम्हाला सांगायचं असेल, तर सांगा.”—प्रे. कृत्ये १३:१५, NW.

गीत क्रमांक: ५३, ४५

१, २. एकमेकांना प्रोत्साहन देणं का गरजेचं आहे?

अठरा वर्षांची क्रिस्टीना [1] म्हणते: “माझ्या आईवडिलांनी मला प्रोत्साहन दिलं, असं फारच कमी वेळा घडलं आहे. ते नेहमी माझ्या चुकाच शोधत असतात. मी समजूतदारपणे वागत नाही असं ते मला म्हणतात आणि मी किती जाड आहे याची ते मला सतत आठवण करून देतात. हे सगळं ऐकून मला वाईट वाटतं. त्यांचे शब्द माझ्या मनाला खूप लागतात आणि मी रडतेसुद्धा. त्यामुळे मी त्यांच्यासोबत बोलण्याचं टाळते. माझी काहीच किंमत नाही असं मला वाटतं.” खरंच, जीवनात प्रोत्साहन मिळणं किती गरजेच आहे, नाही का?

दुसरीकडे पाहता, जेव्हा आपण इतरांना प्रोत्साहन मिळेल असं काही बोलतो, तेव्हा त्याचा किती सकारात्मक परिणाम होतो याचा विचार करा. रूबेन म्हणतो: “बऱ्याच वर्षांपासून मी कमीपणाच्या भावनांशी झगडत आहे. एकदा मंडळीतील एका वडिलांसोबत प्रचार करत असताना त्यांना जाणवलं की मी खूप निराश आहे. माझ्या मनातील भावना जेव्हा मी त्यांच्यासमोर व्यक्त केल्या तेव्हा त्यांनी माझं अगदी आपुलकीनं ऐकून घेतलं. मग मी करत असलेल्या चांगल्या गोष्टींची त्यांनी मला आठवण करून दिली. तसंच, आपल्यापैकी प्रत्येकाचं मोल अनेक चिमण्यांपेक्षाही जास्त आहे असं जे येशूने म्हटलं होतं त्याचीही त्यांनी मला आठवण करून दिली. जेव्हा-जेव्हा मी या वचनावर विचार करतो तेव्हा-तेव्हा मला खूप बरं वाटतं.” रूबेन पुढे म्हणतो की त्या वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे त्याला खूप मदत झाली.—मत्त. १०:३१.

३. (क) प्रोत्साहन देण्याविषयी प्रेषित पौलाने काय सांगितलं? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

आपण नेहमी एकमेकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं उत्तेजन बायबल आपल्याला देतं. प्रेषित पौलाने इब्रीमधील ख्रिश्चनांना असं लिहिलं: “सावध असा, बंधूंनो, तुमच्यापैकी कोणाचीही अंतःकरणे दुष्ट व अविश्वासू असू नयेत, ती जिवंत देवापासून दूर नेतात. उलट, आज म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन [प्रोत्साहन] द्या.” असं करणं का गरजेचं आहे ते स्पष्ट करत पौल पुढे म्हणतो: “यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत.” (इब्री ३:१२, १३, ईझी-टू-रीड व्हर्शन) विचार करा, जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला प्रोत्साहन देते, तेव्हा तुम्हाला किती बरं वाटतं! तर मग, आपल्या बंधुभगिनींना प्रोत्साहन देण्याची आपल्याजवळही काही कारणं आहेत का? यहोवा देवाने, येशूने आणि पौलाने इतरांना ज्या प्रकारे प्रोत्साहन दिलं त्यावरून आपण काय शिकू शकतो? आणि आपण कोणत्या काही मार्गांनी इतरांना प्रोत्साहन देऊ शकतो? या प्रश्नांवर आपण आता चर्चा करू.

सर्वांनाच प्रोत्साहनाची गरज आहे

४. कोणाकोणाला प्रोत्साहनाची गरज आहे? पण आज बरेच लोक इतरांना प्रोत्साहन का देत नाहीत?

आपल्या सर्वांनाच प्रोत्साहनाची गरज आहे. आणि खासकरून आईवडिलांनी आपल्या मुलांना नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे. तिमथी इवान्स नावाचे एक शिक्षक असं म्हणतात: “ज्या प्रकारे रोपट्याला पाण्याची, त्याच प्रकारे मुलांनाही . . . प्रोत्साहनाची गरज आहे.” ते पुढे असं म्हणतात: “प्रोत्साहनामुळे मुलांना याची जाणीव होते की इतर जण आपली किंमत आणि कदर करत आहेत.” आपण “शेवटल्या काळी” जगत असल्यामुळे, लोक स्वार्थी आणि “ममताहीन” झाले आहेत. (२ तीम. ३:१-५) काही असेही आहेत ज्यांना लहानपणी त्यांच्या आईवडिलांकडून प्रोत्साहन मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांनाही आपल्या मुलांना प्रोत्साहन देणं फार कठीण जातं. मोठ्यांनाही प्रोत्साहनाची गरज आहे. पण, पाहायला गेलं तर असं खूप क्वचितच घडतं. उदाहरणार्थ, अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की, कामाच्या ठिकाणी ते जी मेहनत घेतात त्याबद्दल कधीही त्यांची प्रशंसा केली जात नाही.

५. आपण इतरांना प्रोत्साहन कसं देऊ शकतो?

इतरांनी केलेल्या चांगल्या गोष्टींसाठी त्यांची प्रशंसा करण्याद्वारे आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो. तसंच, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यात असलेल्या काही चांगल्या गुणांचाही आपण उल्लेख करू शकतो. यासोबतच, जेव्हा ते निराश किंवा दुःखी असतात तेव्हा त्यांना आपण सांत्वन आणि धीर देऊ शकतो. (१ थेस्सलनी. ५:१४) सहसा आपण आपल्या बंधुभगिनींसोबत जास्त वेळ घालवतो, त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनेक संधी आपल्याजवळ असतात. (उपदेशक ४:९, १० वाचा.) तेव्हा स्वतःला विचारा: ‘जेव्हा संधी मिळते तेव्हा, इतरांवर माझं प्रेम का आहे आणि मी त्यांची कदर का करतो, हे मी त्यांना सांगतो का?’ बायबल काय म्हणतं याकडे लक्ष द्या. त्यात म्हटलं आहे: “समयोचित बोल किती उत्तम!”—नीति. १५:२३.

६. सैतान देवाच्या लोकांना निराश करण्याचा प्रयत्न का करतो, हे उदाहरण देऊन स्पष्ट करा.

नीतिसूत्रे २४:१० मध्ये म्हटलं आहे: “संकटकाली तुझे धैर्य खचले तर तुझी शक्ती अल्प होय.” सैतानाला माहीत आहे की जर तो आपल्याला निराश करू शकला, तर यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंधही कमकुवत करण्यात तो यशस्वी होऊ शकेल. सैतानाने ईयोबासोबत हेच करण्याचा प्रयत्न केला. ईयोबावर मोठमोठी संकटं आणून त्याने त्याला निराश करण्याचा प्रयत्न केला. पण, यात तो यशस्वी झाला नाही. ईयोब शेवटपर्यंत यहोवाला एकनिष्ठ राहिला. (ईयो. २:३; २२:३; २७:५) आपणसुद्धा सैतानाशी यशस्वी रीत्या लढा देऊ शकतो. जेव्हा आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि मंडळीतील बंधुभगिनींना प्रोत्साहन देतो, तेव्हा त्यांना आनंदी राहण्यास आणि यहोवासोबत असलेला त्यांचा नातेसंबंध टिकवून ठेवण्यास आपण मदत करत असतो.

प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत असलेली अप्रतिम उदाहरणं

७, ८. (क) यहोवाने कशा प्रकारे आपल्या लोकांना प्रोत्साहन दिलं आहे? (ख) पालक कशा प्रकारे यहोवाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

यहोवा. स्तोत्रकर्त्याने लिहिलं: “परमेश्वर भग्नहृदयी लोकांच्या सन्निध असतो.” पुढे त्याने म्हटलं की निराश झालेल्यांचा तो उद्धार करतो. (स्तो. ३४:१८) यिर्मया संदेष्टा जेव्हा निराश झाला होता आणि घाबरला होता, तेव्हा यहोवाने त्याला मदत करण्याचं वचन दिलं. (यिर्म. १:६-१०) दानीएलाला धीर व प्रोत्साहन देण्यासाठी यहोवाने एका देवदूताला पाठवलं. त्या देवदूताने दानीएलाला “परमप्रिय” असं म्हटलं. (दानी. १०:८, ११, १८, १९) तुम्हीही तुमच्या मंडळीतील बंधुभगिनींना, पायनियरांना आणि यहोवाची अनेक वर्षांपासून सेवा करत असलेल्या वृद्धांना उत्तेजन देऊ शकता का?

येशूने लाखो-करोडो वर्षं यहोवासोबत काम केलं होतं. पण, असं असलं तरी पृथ्वीवर असताना येशूला प्रोत्साहनाची आणि प्रशंसेची गरज नाही, असा यहोवा देवाने विचार केला नाही. खरंतर येशूने जेव्हा आपल्या सेवाकार्याची सुरवात केली तेव्हा, आणि पृथ्वीवरील त्याच्या शेवटच्या वर्षी यहोवाने स्वर्गातून त्याच्याविषयी असं म्हटलं: “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्त. ३:१७; १७:५) आपला स्वर्गातील पिता आपल्याविषयी संतुष्ट आहे, त्याला आपला अभिमान आहे आणि त्याचं आपल्यावर प्रेम आहे हे ऐकल्यावर येशूला खरंच किती प्रोत्साहन मिळालं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? नंतर, या पृथ्वीवरील शेवटल्या रात्री जेव्हा येशू खूप दबावाखाली होती, तेव्हाही यहोवाने एक स्वर्गदूत पाठवून त्याला धीर व सांत्वन दिलं. (लूक २२:४३) पालकही, आपल्या मुलांना नेहमी उत्तेजन देण्याद्वारे यहोवाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. मुलं जेव्हा एखादी चांगली गोष्ट करतात तेव्हा त्यांची प्रशंसा करा. शिवाय, जेव्हा शाळेत त्यांना दबावांचा सामना करावा लागतो, तेव्हा त्यांना धीर द्या. आणि या दबावांचा यशस्वी रीत्या सामना करता यावा म्हणून त्यांना मदत करा.

९. येशूने आपल्या प्रेषितांसोबत जसा व्यवहार केला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

येशू. पृथ्वीवरील आपल्या शेवटल्या रात्री येशूने आपल्या प्रेषितांचे पाय धुतले. असं करण्याद्वारे नम्र असणं किती महत्त्वाचं आहे हे त्याने त्यांना शिकवलं. पण, प्रेषितांनी घमेंडी वृत्ती बाळगली आणि आपल्यात श्रेष्ठ कोण याविषयी वाद घातला. पेत्रानेही अगदी अभिमानाने असं म्हटलं की तो येशू ख्रिस्ताला कोणत्याही परिस्थितीत सोडून जाणार नाही. (लूक २२:२४, ३३, ३४) पण, येशूने आपल्या शिष्यांच्या अशा चुकांवर लक्ष केंद्रित केलं नाही. याउलट, ते त्याला एकनिष्ठ राहिले यासाठी त्याने त्यांची प्रशंसा केली. आणि ते त्याच्यापेक्षाही मोठी कार्यं करतील असं अभिवचनदेखील त्याने त्यांना दिलं. शिवाय, यहोवाचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे अशी खात्री त्याने त्यांना दिली. (लूक २२:२८; योहा. १४:१२; १६:२७) स्वतःला विचारा: ‘इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करण्याद्वारे आणि त्यांच्यातील चांगल्या गुणांसाठी त्यांची प्रशंसा करण्याद्वारे मी येशूचं अनुकरण करतो का?’

१०, ११. पौलाने कशा प्रकारे आपल्या बांधवांना प्रोत्साहन दिलं, आणि त्यासाठी काय करण्याची त्याची तयारी होती?

१० प्रेषित पौल. आपल्या पत्रांमध्ये प्रेषित पौलाने अनेकदा आपल्या बांधवांची स्तुती केली. त्यांच्यापैकी काहींसोबत त्याने बरेच वर्षं प्रवास केला होता आणि त्यांना तो चांगल्या प्रकारे ओळखू लागला होता. पण, आपल्या पत्रांमध्ये त्याने त्यांच्या चुकांबद्दल लिहिलं नाही. उलट, त्यांची प्रशंसा केली. उदाहरणार्थ, तीमथ्याबद्दल त्याने असं म्हटलं की, “तो माझा प्रिय व प्रभूच्या ठायी विश्वासू पुत्र असा आहे.” तो इतरांच्या गरजांची चांगल्या प्रकारे काळजी घेईल याची त्याला खात्री असल्याचंही त्याने सांगितलं. (१ करिंथ. ४:१७; फिलिप्पै. २:१९, २०) पौलाने तीताबद्दलही असं म्हटलं की, “तो माझा साथी व तुमच्याकरता सहकारी साथी आहे.” (२ करिंथ. ८: २३) पौलाला आपल्याविषयी काय वाटतं हे जेव्हा तीमथ्य आणि तीत या दोघांना समजलं असेल, तेव्हा त्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल.

११ बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी पौल आणि त्याचा सोबती बर्णबा या दोघांनी आपला जीवही धोक्यात घातला. उदाहरणार्थ, लुस्त्रमधील अनेक लोक पौल आणि बर्णबाला जिवे मारण्यास पाहत होते. हे माहीत असूनही तिथं नवीनच शिष्य बनलेल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहण्यास त्यांना मदत करण्यासाठी ते दोघं तिथं परत गेले. (प्रे. कृत्ये १४:१९-२२) नंतर, इफिससमध्ये संतापलेल्या जमावामुळे पौलाच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, पण तरीही बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी तो इफिससमध्ये काही काळासाठी थांबला. प्रेषितांची कृत्ये यात असं म्हटलं आहे: “पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन [प्रोत्साहन] दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला. आणि तो मासेदोनियाला निघाला. मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला. मग पौल ग्रीसला आला.”—प्रे. कृत्ये २०:१, २, ईझी-टू-रीड व्हर्शन.

एकमेकांना प्रोत्साहन द्या

१२. सभांना उपस्थित राहणं आपल्यासाठी चांगलं का आहे?

१२ यहोवा नेहमी आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच करतो. याच कारणामुळे तो आपल्या सर्वांना नियमित रीत्या सभांमध्ये हजर राहण्यास सांगतो. सभांमध्ये आपण त्याच्याविषयी शिकतो आणि एकमेकांना प्रोत्साहन देतो. (१ करिंथ. १४:३१; इब्री लोकांस १०:२४, २५ वाचा.) लेखाच्या सुरवातीला उल्लेख करण्यात आलेली क्रिस्टीना म्हणते: “आपल्या सभांबद्दल एक गोष्ट मला सर्वात जास्त आवडते. ती म्हणजे तिथं मला मिळणारं प्रेम आणि प्रोत्साहन. कधीकधी मी खूप निराश असते. पण, राज्य सभागृहात पोचल्यावर बहिणी मला भेटायला येतात, मला मिठी मारतात आणि म्हणतात की मी खूप चांगली दिसत आहे. ते मला सांगतात की त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि जी आध्यात्मिक प्रगती मी करत आहे त्याचंही त्यांना कौतुक वाटतं. त्यांच्या या शब्दांमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं आणि खूप बरं वाटतं.” एकमेकांना प्रोत्साहन देणं खरंच किती गरजेचं आहे!—रोम. १:११, १२.

१३. यहोवाची बऱ्याच वर्षांपासून सेवा करणाऱ्यांनाही प्रोत्साहनाची गरज का आहे?

१३ यहोवाची बऱ्याच वर्षांपासून सेवा करणाऱ्यांनाही प्रोत्साहनाची गरज पडते. यहोशवाचाच विचार करा. जेव्हा इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात प्रवेश करणार होते, तेव्हा यहोवाने त्यांचं नेतृत्व करण्यासाठी यहोशवाची निवड केली. यहोशवा यहोवाची बऱ्याच वर्षांपासून सेवा करत होता. पण, तरी मोशेने त्याला प्रोत्साहन द्यावं असं यहोवाने त्याला सांगितलं. यहोवा बोलला: “यहोशवाला अधिकारारूढ कर व त्याला धीर [“प्रोत्साहन,” NW] देऊन दृढ कर कारण तोच या लोकांचा पुढारी होऊन त्यांना पलीकडे नेईल आणि जो देश तुझ्या दृष्टीस पडेल तो त्यांना वतन म्हणून मिळवून देईल.” (अनु. ३:२७, २८) पुढे जाऊन इस्राएली लोक अनेक लढाया लढणार होते; आणि एक लढाई ते हारलेदेखील. त्यामुळे, त्यांचं नेतृत्व करणाऱ्या यहोशवाला प्रोत्साहनाची खरोखरच गरज होती. (यहो. ७:१-९) आज आपणही मंडळीतील वडिलांना आणि विभागीय पर्यवेक्षकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कारण, देवाच्या लोकांची काळजी घेण्यासाठी ते बरीच मेहनत घेतात. (१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३ वाचा.) एका विभागीय पर्यवेक्षकाने असं म्हटलं: “आमच्या भेटीमुळे बांधवांना किती आनंद झाला आहे हे सांगण्यासाठी आणि आमचे आभार मानण्यासाठी, बांधव आम्हाला पत्र लिहितात. अशी पत्रं आम्ही फार जपून ठेवतो आणि जेव्हाही आम्ही निराश किंवा दुःखी असतो तेव्हा ती वाचतो. अशा पत्रांमुळे खरंच आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं.”

मुलांना प्रेमळपणे प्रोत्साहन दिल्यामुळे, त्यांना यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास मदत होते (परिच्छेद १४ पाहा)

१४. सल्ला देताना प्रोत्साहन देणंदेखील फायद्याचं आहे, हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येतं?

१४ एका प्रसंगी प्रेषित पौलाला करिंथकरातील बांधवांना ताडन देण्याची व सुधारण्याची गरज पडली. पण तिथल्या बांधवांनी जेव्हा पौलाने दिलेल्या सल्ल्याचं पालन केलं, तेव्हा त्याने त्यांची प्रशंसाही केली. (२ करिंथ. ७:८-११) त्याने केलेल्या प्रेशंसेमुळे त्यांना नक्कीच चांगलं ते करत राहण्यासाठी प्रोत्साहन मिळालं असेल. मंडळीतील वडील आणि पालक पौलाच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात. आंद्रियास, ज्यांना दोन मुलं आहेत ते असं म्हणतात: “प्रोत्साहन दिल्यामुळे मुलांची आध्यात्मिक रीत्या वाढ होण्यास मदत होते. तसंच, ते भावनिक रीत्याही मजबूत होतात. प्रोत्साहनामुळे तुम्ही देत असलेला सल्लाही त्यांच्या हृदयापर्यंत पोचण्यास मदत होते. योग्य काय आणि अयोग्य काय, हे आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे माहीत असतं. पण, जेव्हा आपण त्यांना सतत प्रोत्साहन देत राहतो, तेव्हा जीवनात योग्य तेच करत राहण्याची त्यांना प्रेरणा मिळते.”

तुम्ही इतरांना प्रोत्साहन कसं देऊ शकता?

१५. इतरांना प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग कोणता आहे?

१५ बंधुभगिनी घेत असलेल्या मेहनतीची आणि त्यांच्यात असलेल्या चांगल्या गुणांची तुम्हाला किती कदर वाटते हे त्यांना सांगा. (२ इति. १६:९; ईयो. १:८) असं करण्याद्वारे आपण हे दाखवून देऊ की आपण यहोवा देवाचं आणि येशूचं अनुकरण करत आहोत. कारण राज्याच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी आपण करत असलेल्या सर्व गोष्टींची ते कदर करतात; मग आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला जास्त प्रमाणात सेवा करता येत नसली तरीही. (लूक २१:१-४; २ करिंथकर ८:१२ वाचा.) आपल्या मंडळीतही कदाचित काही असे वृद्ध बंधुभगिनी असतील, ज्यांना सभेला आणि सेवाकार्याला नियमित रीत्या हजर राहण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मग, बंधुभगिनी घेत असलेल्या मेहनतीसाठी त्यांची प्रशंसा करून तुम्ही त्यांना प्रोत्साहन देता का?

१६. आपण इतरांना केव्हा प्रोत्साहन दिलं पाहिजे?

१६ इतरांना प्रोत्साहन देण्याच्या प्रत्येक संधीचा फायदा उचला. एखादी व्यक्ती जेव्हा काही चांगलं करते, तेव्हा तिची प्रशंसा करण्याचं विसरू नका. पौल आणि बर्णबा जेव्हा पिसिदियातील अंत्युखिया या ठिकाणी होते, तेव्हा सभास्थानातील अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं: “माणसांनो, बांधवांनो लोकांना प्रोत्साहन मिळेल असं काही तुम्हाला सांगायचं असेल, तर सांगा.” (प्रे. कृत्ये १३:१३-१६, NW) या संधीचा फायदा उचलून पौलाने तिथल्या लोकांना प्रोत्साहन दिलं. (प्रे. कृत्ये १३:४२-४४) आपण इतरांना प्रोत्साहन दिल्यास, त्यांच्याकडूनही आपल्याला प्रोत्साहन मिळू शकतं.—लूक ६:३८.

१७. इतरांची प्रशंसा करण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे?

१७ प्रोत्साहन देताना प्रामाणिक राहा व काही कामांचा खास उल्लेख करा. थुवतीरा इथल्या मंडळीची प्रशंसा करताना येशूने त्यांनी केलेल्या काही खास कामांचा उल्लेख केला. (प्रकटीकरण २:१८, १९ वाचा.) याबाबतीत आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो? कदाचित तुमच्या मंडळीत अशी एक आई असेल जी एकटीच आपल्या मुलांचं संगोपन करत आहे. कठीण असूनही ती आपल्या मुलांचं ज्या प्रकारे संगोपन करत आहे त्यासाठी तुम्ही तिची प्रशंसा करू शकता. किंवा तुम्ही जर पालक असाल, तर यहोवाची सेवा करण्यासाठी तुमची मुलं जी मेहनत घेत आहेत त्यासाठी तुम्ही त्यांची प्रशंसा करू शकता. ते करत असलेल्या कोणत्या चांगल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या ते त्यांना सांगा. इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण जर त्यांनी केलेल्या काही खास गोष्टींचा उल्लेख केला, तर आपण त्यांची खरंच मनापासून प्रशंसा करत आहोत हे त्यांना समजेल.

१८, १९. यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध मजबूत ठेवण्यास आपण इतरांना कशी मदत करू शकतो?

१८ यहोवाने मोशेला सांगितलं की त्याने यहोशवाला प्रोत्साहन द्यावं आणि त्याचा धीर वाढवावा. हे खरं आहे की आज यहोवा स्वतः आपल्याला एखाद्या विशिष्ट व्यक्तीला प्रोत्साहन देण्यास सांगणार नाही. पण, जेव्हा आपण इतरांना प्रोत्साहन देण्यासाठी मेहनत घेतो तेव्हा त्याला नक्कीच आनंद होतो. (नीति. १९:१७; इब्री १२:१२) उदाहरणार्थ, जेव्हा एखादा बांधव मंडळीत जाहीर भाषण देतो, तेव्हा त्याच्या भाषणातील कोणता मुद्दा आपल्याला विशेष आवडला हे आपण त्याला सांगू शकतो. कदाचित आपण त्याला सांगू शकतो की, त्याने जे म्हटलं त्यामुळे एखाद्या समस्येचा सामना करण्यास आपल्याला मदत मिळाली किंवा मग एखादं शास्त्रवचन चांगल्या प्रकारे समजण्यास आपल्याला मदत झाली. दुसऱ्या मंडळीतून जाहीर भाषण देण्यासाठी आलेल्या एका बांधवाला बहिणीने पत्र लिहिलं आणि सांगितलं: “आपण जरी थोड्या वेळासाठी बोललो असलो तरी तुम्ही ओळखलंत की मी निराश आहे. आणि मग तुम्ही मला सांत्वन आणि प्रोत्साहन दिलं. मला तुम्हाला हे खासकरून सांगावंसं वाटतं की, भाषणादरम्यान आणि माझ्याशी बोलताना तुम्ही ज्या प्रकारे दयाळूपणाने व प्रेमळपणे बोललात ती यहोवाकडून मला मिळालेली एक देणगीच आहे असं मला वाटलं.”

१९ पौलाने सांगितलं: “एकमेकांना उत्तेजन [प्रोत्साहन] द्या. आणि जसे आता तुम्ही करत आहात तसे आध्यात्मिक रीतीने एकमेकांना पूर्ण मनाने बळकट करा.” (१ थेस्सलनी. ५:११, ईझी-टू-रीड व्हर्शन) पौलाने दिलेल्या या सल्ल्याचं पालन केल्यास आपण एकमेकांना यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध मजबूत ठेवण्यास मदत करू शकतो. यासोबतच, नेहमी एकमेकांना प्रोत्साहन देण्याद्वारे आपण यहोवाचंही मन आनंदित करू शकतो.

^ [१] (परिच्छेद १) काही नावं बदलण्यात आली आहेत.