व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या वचनांनुसार सुसंघटित

देवाच्या वचनांनुसार सुसंघटित

“परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला; त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले.”—नीति. ३:१९.

गीत क्रमांक: १५, १६

१, २. (क) देवाची उपासना करण्यासाठी एखाद्या संघटनेच्या मार्गदर्शनाची गरज आहे की नाही, याबद्दल काही लोकांचं काय मत आहे? (ख) या लेखात आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत?

काही लोक म्हणतात: “देवाची उपासना करण्यासाठी तुम्हाला एखाद्या विशिष्ट संघटनेद्वारे मार्गदर्शन मिळवण्याची गरज नाही. तुमचं देवाबरोबर नातं असलं म्हणजे पुरे.” असा दृष्टिकोन बाळगणं योग्य आहे का? बायबलमधील अहवालांवरून काय दिसून येतं?

या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की, यहोवा हा व्यवस्थेचा परमेश्वर आहे आणि त्याने आपल्या लोकांना संघटित केलं आहे. तसंच देवाची संघटना आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल मार्गदर्शन पुरवते तेव्हा आपण कोणता दृष्टिकोन बाळगायला हवा, यावरदेखील आपण या लेखात चर्चा करणार आहोत. (१ करिंथ. १४:३३, ४०) पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी देवाच्या वचनातून मिळणारं मार्गदर्शन स्वीकारलं आणि त्यामुळे ते जगातील बहुतेक भागांत सुवार्ता पोहचवू शकले. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांप्रमाणेच आज आपणही बायबलच्या मार्गदर्शनानुसार चालतो आणि देवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या सूचनांचं पालन करतो. त्यामुळे आज आपणही राज्याची सुवार्ता संपूर्ण जगभरात पोहचवू शकत आहोत. यासोबतच आपण मंडळीमध्ये नैतिक रीत्या शुद्धता, तसंच शांती आणि एकता टिकवून ठेवत आहोत.

यहोवा हा व्यवस्थेचा परमेश्वर आहे

३. यहोवा हा व्यवस्थेचा परमेश्वर आहे ही गोष्ट कशावरून दिसून येते?

यहोवाने जी सृष्टी बनवली आहे त्याचं जवळून परीक्षण केल्यास आपल्याला हे कळून येतं की यहोवा हा व्यवस्थेचा परमेश्वर आहे. बायबल आपल्याला सांगतं, “परमेश्वराने पृथ्वीचा पाया ज्ञानाने घातला; त्याने बुद्धीने आकाश निर्माण केले.” (नीति. ३:१९) आजही या विश्वात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मानवांना अजूनही माहीत नाहीत. बायबल सांगतं, यहोवाने बनवलेल्या सृष्टीची “केवळ चाहूल” मानवांच्या कानी पडली आहे. (ईयो. २६:१४) भौतिक विश्वातील ज्या-ज्या गोष्टींचा अभ्यास मानवांनी केला त्यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, ती म्हणजे या संपूर्ण विश्वात अव्यवस्था किंचितही दिसून येत नाही. (स्तो. ८:३, ४) अवकाशात लाखो-करोडो तारे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आपआपल्या मार्गावरून फिरत आहेत. तसंच आपल्या सौरमालेचा विचार करा, सूर्याभोवती फिरणाऱ्या या ग्रहांना जणू त्यांचा मार्ग नेमून दिला आहे, अगदी अशा प्रकारे ते सूर्याभोवती फिरत आहेत. फक्त यहोवा देवामुळेच, तारे आणि ग्रहांमध्ये दिसून येणारी ही अद्‌भुत व्यवस्था शक्य आहे. यहोवाने ज्या प्रकारे “बुद्धिचातुर्याने आकाश” व पृथ्वीची निर्मिती केली आहे त्यावर जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण त्याची स्तुती व उपासना करण्यास, तसंच त्याला एकनिष्ठ राहण्यास प्रेरित होतो.—स्तो. १३६:१, ५-९.

४. वैज्ञानिकांना अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरं का देता आली नाहीत?

आपल्या भौतिक विश्वातून वैज्ञानिकांना जे काही शिकायला मिळालं, त्यातून त्यांनी असे बरेचसे शोध लावले आहेत ज्यांमुळे मानवी जीवन सुरळीत झालं आहे. पण बऱ्याच महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरं हे वैज्ञानिक अजूनही देऊ शकलेले नाहीत. उदाहरणार्थ, अवकाशाचा अभ्यास करणारे हे सांगू शकत नाहीत की या विश्वाची सुरवात नेमकी कशी झाली? किंवा मग झाडं, प्राणी, आणि मानव या पृथ्वीवर का अस्तित्वात आहेत? यासोबतच अनेक जण या प्रश्‍नाचंही उत्तर देऊ शकत नाहीत की, माणसांच्या मनात सदासर्वकाळ जगण्याची इच्छा का आहे? (उप. ३:११) अनेकांना या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत, याच्या मागचं एक कारण म्हणजे वैज्ञानिक आणि इतर काही लोक देवाचं अस्तित्व नाकारतात आणि उत्क्रांतीवर विश्वास ठेवतात. पण देव आपल्याला त्याच्या वचनातून म्हणजे बायबलमधून या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो.

५. मानव निसर्गाच्या नियमांवर कसे अवलंबून आहेत?

निसर्गामध्ये आढळणारे सर्व नियम यहोवाने ठरवले आहेत, आणि हे नियम कधीही बदलत नाहीत. सर्व मानव या नियमांवर अवलंबून आहेत. इंजिनिअर, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पायलट, डॉक्टर आणि इतर बरेच जण याच नियमांच्या आधारावर आपलं काम करत असतात. उदाहरणार्थ, मानवांचं हृदय शरीरात एकाच ठिकाणी आढळतं. त्यामुळे उपचार किंवा ऑपरेशन करण्याआधी डॉक्टरला हे माहीत असतं की पेशंटच्या शरीरात हृदय कुठं सापडेल. तसंच, उंचावरून एखाद्याने उडी मारल्यास तो पडेल आणि कदाचित त्याचा मृत्यूदेखील होईल हेही आपल्या सर्वांना माहीत आहे. आपण सर्व जण निसर्गातील नियमांचं पालन करतो, जसं की गुरुत्वाकर्षणाचा नियम. कारण या नियमांचं पालन केल्यामुळे आपण जिवंत राहू शकतो, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत आहे.

यहोवाने सुसंघटित केलेले

६. आपल्या उपासकांनी सुसंघटित असावं अशी यहोवा देव अपेक्षा करतो, हे आपण कोणत्या आधारावर म्हणू शकतो?

या विश्वाची रचना व व्यवस्था यहोवाने फार अद्‌भुत रीत्या केली आहे. यावरून त्याची उपासना करणारेदेखील सुसंघटित असावेत अशी तो अपेक्षा करतो, हे स्पष्टच आहे. त्याची उपासना आपण कोणत्या प्रकारे करावी हे समजण्यासाठी त्याने आपल्याला त्याचं वचन बायबल दिलं आहे. त्याच्या वचनातून आणि संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं पालन केल्यानेच आपण एक आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो.

७. बायबलमधील पुस्तकांमध्ये सुसंगतता आहे, हे कशावरून दिसून येतं?

बायबल ही मानवजातीसाठी देवाकडून असलेली एक अमूल्य देणगी आहे. काही तज्ञांचं असं म्हणणं आहे की बायबल हे मानवी पुस्तक आहे, जे काही यहूदी आणि ख्रिस्ती पुस्तकांना एकत्र मिळवून बनवलं गेलं आहे. पण बायबलमधील पुस्तकं कोणी लिहावीत, कधी लिहावीत आणि त्यात काय लिहावं या सर्व गोष्टी देवाने ठरवल्या होत्या. म्हणून या सर्व पुस्तकांत सुसंगतता दिसून येते. आणि त्यामुळे मानवजातीसाठी असलेला देवाचा संदेश समजण्यास बायबलमधील सर्वच पुस्तकं आपल्याला मदत करतात. बायबलच्या पहिल्या पुस्तकापासून ते शेवटल्या पुस्तकापर्यंत आपल्याला एका “संतती” विषयी वाचायला मिळतं. ही “संतती” संपूर्ण पृथ्वीचं एका सुंदर नंदनवनात रूपांतर करेल असं बायबलमध्ये सांगण्यात आलं आहे. ही “संतती” म्हणजे ख्रिस्त येशू आहे हे आपल्याला माहीत आहे. आणि त्याचं राज्य हे सिद्ध करेल की यहोवाच संपूर्ण विश्वाचा सर्वोच्च अधिकारी आहे.—उत्पत्ति ३:१५; मत्तय ६:१०; प्रकटीकरण ११:१५ वाचा.

८. इस्राएली लोक कशा प्रकारे सुसंघटित होते?

यहोवाने इस्राएली लोकांना नियम दिले आणि त्यांना सुसंघटित केलं. उदाहरणार्थ, “दर्शनमंडपाच्या द्वारापाशी” सेवा करत असलेल्या स्त्रिया संघटित रीत्या काम करायच्या. (निर्ग. ३८:८) तसंच, अरण्यातून जाताना निवासमंडपासंबंधी व छावणीसंबंधी काही सूचना देण्यात आल्या होत्या. यांत इस्राएली लोकांनी तळ कसा द्यावा आणि कूच कशी करावी याविषयी अगदी व्यवस्थित व सविस्तर रीत्या सांगण्यात आलं होतं. दावीद राजानेही देवाच्या मंदिरात काही विशिष्ट कामं करण्यासाठी याजक व लेवी यांची योग्य प्रकारे व्यवस्था केली. (१ इति. २३:१-६; २४:१-३) इस्राएली लोकांनी जेव्हा यहोवाच्या आज्ञा पाळल्या, तेव्हा यहोवाने त्यांना आशीर्वादित केलं. त्यामुळे त्यांच्यामध्ये शांती व एकता होती व ते सुसंघटित होते.—अनु. ११:२६, २७; २८:१-१४.

९. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्या कशा प्रकारे सुसंघटित होत्या?

पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्याही संघटित रीत्या कार्य करत होत्या. त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी काही ख्रिस्ती बांधवांनी मिळून बनलेलं एक नियमन मंडळ होतं. सुरवातीला या नियमन मंडळात फक्त प्रेषित होते. नंतर यात मंडळीच्या काही वडिलांचाही समावेश करण्यात आला. (प्रे. कृत्ये ६:१-६; १५:६) मंडळ्यांना काही सल्ले व सूचना देण्यासाठी यहोवाने या नियमन मंडळातील बांधवांना आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या सहबांधवांना पत्र लिहिण्यास प्रेरीत केलं. (१ तीम. ३:१-१३; तीत १:५-९) नियमन मंडळाकडून मिळालेल्या सूचना आणि मार्गदर्शनाचा पहिल्या शतकातील या ख्रिस्ती मंडळ्यांना कसा फायदा झाला?

१०. नियमन मंडळाकडून मिळणारं मार्गदर्शन स्वीकारल्याने पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्यांना कसा फायदा झाला? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१० प्रेषितांची कृत्ये १६:४, ५ वाचा. नियमन मंडळाने म्हणजेच “यरुशलेमेतील प्रेषित व वडील यांनी जे ठराव केले होते,” ते इतर मंडळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी काही बांधवांनी त्यांना भेटी दिल्या. पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्यांनी, नियमन मंडळाने दिलेल्या मार्गदर्शनाचं पालन केलं. त्यामुळे या “मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत” गेली. त्यांच्या उदाहरणावरून आज आपण काय शिकू शकतो?

तुम्ही मार्गदर्शन स्वीकारत आहात का?

११. देवाच्या संघटनेकडून सूचना किंवा मार्गदर्शन मिळाल्यानंतर सहायक सेवक आणि मंडळीतील वडिलांनी काय करण्याची गरज आहे?

११ शाखा समिती किंवा राष्ट्र समिती, विभागीय पर्यवेक्षक आणि मंडळीतील वडील यांनी देवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या सूचनांचं आणि मार्गदर्शनाचं पालन करणं गरजेचं आहे. खरंतर पुढाकार घेणाऱ्या बांधवांचं मार्गदर्शन आपण सर्वांनीच स्वीकारायला हवं असं बायबल आपल्याला सांगतं. (अनु. ३०:१६; इब्री १३:७, १७) जे यहोवाची एकनिष्ठपणे सेवा करतात ते बंडखोर वृत्ती बाळगत नाहीत, आणि त्यांना मिळणाऱ्या सूचनांविषयी आणि मार्गदर्शनाविषयी ते कुरकूर करत नाहीत. पुढाकार घेणाऱ्या बांधवांचा आदर न करणाऱ्या दियत्रफेस याच्याप्रमाणे होण्याची आपली मुळीच इच्छा नाही. (३ योहान ९, १० वाचा.) जेव्हा आपण आपल्याला मिळणारं मार्गदर्शन स्वीकारतो आणि त्याप्रमाणे वागतो, तेव्हा आपण मंडळीमध्ये शांती आणि एकता टिकवून ठेवण्यास हातभार लावत असतो. म्हणून आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण स्वतःला विचारू शकतो: ‘यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी मी इतर बंधुभगिनींना प्रोत्साहन देतो का? देवाच्या संघटनेकडून मिळणारं मार्गदर्शन व सूचनांचं मी लगेच पालन करतो का?’

१२. मंडळीतील वडिलांची आणि सहायक सेवकांची नेमणूक कशा प्रकारे केली जाते?

१२ काही वर्षांपूर्वी नियमन मंडळाकडून, मंडळीत सहायक सेवक आणि वडिलांची नेमणूक कशी केली जावी याविषयी बदल करण्यात आला. १५ नोव्हेंबर २०१४ सालाच्या टेहळणी बुरूजमधील वाचकांचे प्रश्न” यात याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यात सांगण्यात आलं होतं की, पहिल्या शतकात मंडळीमध्ये वडिलांची आणि सहायक सेवकांची नेमणूक करण्याचा अधिकार नियमन मंडळाने प्रवासी पर्यवेक्षकांना दिला होता. सप्टेंबर २०१४ पासून विभागीय पर्यवेक्षकांनी मंडळ्यांमध्ये अशा प्रकारच्या नेमणूका करण्यास सुरवात केली. जेव्हा मंडळीमध्ये वडील म्हणून किंवा सहायक सेवक म्हणून नेमण्यासाठी एखाद्या बांधवाची मंडळीतील वडील शिफारस करतात, तेव्हा विभागीय पर्यवेक्षक त्या बांधवाला व त्याच्या कुटुंबाला अधिक चांगल्या रीतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, अशा बांधवासोबत विभागीय पर्यवेक्षक कदाचित प्रचारकार्य करतील. त्याच्यासोबत प्रचारकार्यात जाण्याद्वारे ते त्याला आणखी चांगल्या रीतीने जाणून घेतील. (१ तीम ३:४, ५) त्यानंतर जेव्हा मंडळीतील वडील आणि विभागीय पर्यवेक्षक भेटतील, तेव्हा बायबलच्या वचनांमधून वडिलांसाठी आणि सहायक सेवकांसाठी असलेल्या पात्रतेचं ते बारकाईनं परीक्षण करतील.—१ तीम. ३:१-१०, १२, १३; १ पेत्र ५:१-३.

१३. मंडळीतील वडिलांकडून मिळणारं मार्गदर्शन स्वीकारण्यास आपण तयार आहोत, हे आपण कसं दाखवून देऊ शकतो?

१३ आज ख्रिस्ती वडीलही आपल्याला बायबलवर आधारित मार्गदर्शन पुरवत असतात. मंडळीची काळजी वाहण्याचा आणि तिचं आध्यात्मिक रीत्या संरक्षण करण्याचा त्यामागचा त्यांचा उद्देश असतो. ते पुरवत असलेलं मार्गदर्शन स्वीकारण्यास आपण तयार असलं पाहिजे, कारण ते आपल्यासाठी फायदेशीर आहे. (१ तीम. ६:३) पहिल्या शतकात काही ख्रिस्ती “अव्यवस्थितपणाने वागणारे” होते. ते स्वतः कोणतंही काम करत नव्हते. पण स्वतःच्या अधिकारात नाहीत अशा मंडळीतील कामांत मात्र ते लुडबुड करायचे. मंडळीतील वडिलांनी त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी आपली चुकीची वागणूक सोडली नाही. अशा व्यक्तींशी कशा प्रकारे व्यवहार करावा याविषयी पौलाने मंडळीला सांगितलं. तो म्हणाला, “तो मनुष्य लक्षात ठेवा आणि . . . त्याची संगत धरू नका.” ख्रिश्चनांना अशा व्यक्तीची संगत धरायची नव्हती. पण त्याचबरोबर त्याला शत्रूदेखील समजायचं नव्हतं. (२ थेस्सलनी. ३:११-१५) आज मंडळीत जी व्यक्ती देवाच्या स्तरांनुसार चालत नाही, अशा व्यक्तीला मंडळीतील वडील आध्यात्मिक रीत्या मार्गदर्शन देऊन मदत करण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, एखादी अशी व्यक्ती जी सत्यात नसलेल्या व्यक्तीसोबत लग्नाच्या उद्देशानं गाठीभेटी करते. (१ करिंथ. ७:३९) जर अशी व्यक्ती वडिलांनी दिलेल्या मार्गदर्शनाकडे डोळेझाक करत असेल आणि आपली वागणूक सुधारत नसेल, तर ख्रिस्ती वडील त्याविषयावर मंडळीमध्ये भाषण देण्याचा निर्णय घेऊ शकतात. या भाषणामध्ये अशा प्रकारचं वर्तन मंडळीसाठी कसं धोकादायक ठरू शकतं आणि ख्रिस्ती मंडळीवर दोष लावण्यासाठी इतरांना कसं कारण ठरू शकतं, याबद्दल ते सांगतील. जर तुमच्या मंडळीमध्ये वडिलांनी अशा विषयावर भाषण दिलं तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? ती व्यक्ती कोण आहे हे तुम्हाला माहीत असेल तर त्या व्यक्तीशी तुम्ही “संगत” धरण्याचं टाळाल का? जर तुम्ही तिची संगत धरणं टाळलं, तर तुम्ही कदाचित तिला या गोष्टीची जाणीव होण्यास मदत कराल की तिची वागणूक ही तिच्या स्वतःसाठी तर हानिकारक आहेच, पण त्यामुळे यहोवालाही खूप वाईट वाटतं. या गोष्टीची जाणीव झाल्यामुळे कदाचित अशा प्रकारची व्यक्ती स्वतःमध्ये सुधारणा करेल. [1]

मंडळीतील नैतिक शुद्धता, शांती आणि एकता टिकवून ठेवा

१४. मंडळी शुद्ध राखण्यास आपण कशा प्रकारे हातभार लावू शकतो?

१४ मंडळीमधून चुकीच्या गोष्टी दूर ठेवण्यासाठी आपण प्रत्येकाने काय करण्याची गरज आहे, याविषयी देवाचं वचन आपल्याला सांगतं. करिंथमधील मंडळीमध्ये काय घडलं त्याचा विचार करा. करिंथमधल्या बंधुभगिनींवर पौलाचं प्रेम होतं. त्यातील बऱ्याच जणांना त्याने सत्य शिकण्यासाठी मदत केली होती. (१ करिंथ. १:१, २) पण त्यातील एक जण अनैतिक जीवन जगत होता आणि मंडळीतील बांधवांनी त्या व्यक्तीला मंडळीतून बाहेरही घालवून दिलेलं नव्हतं. पौलाला जेव्हा हे समजलं तेव्हा त्याला कसं वाटलं असेल याची कल्पना करा. पौलाने करिंथमधल्या मंडळीतील वडिलांना सांगितलं: त्या व्यक्तीला “सैतानाच्या स्वाधीन” करा. म्हणजेच, त्या व्यक्तीला त्यांनी मंडळीतून बहिष्कृत करण्याची गरज होती. (१ करिंथ. ५:१, ५, ७, १२) आज एखाद्या व्यक्तीने एखादं गंभीर पाप केलं आणि पश्‍चात्तापी वृत्ती दाखवली नाही, तर मंडळीतील वडील त्या व्यक्तीला बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतील. अशा वेळी देवाच्या वचनांत सांगितल्यानुसार तुम्ही त्या व्यक्तीशी कोणत्याही प्रकारे संगती करणं टाळाल का? जर आपण देवाच्या वचनांनुसार वागलो तर आपण मंडळी शुद्ध राखण्यास हातभार लावत असू. तसंच आपण त्या व्यक्तीलाही याची जाणीव करून देण्यास मदत करू की, तिला पश्‍चात्ताप करण्याची आणि देवाकडे क्षमा मागण्याची गरज आहे.

१५. मंडळीमध्ये आपण शांती कशी टिकवून ठेवू शकतो?

१५ करिंथच्या मंडळीमध्ये आणखी एक समस्या होती. या मंडळीमधील काही बांधव आपल्या इतर ख्रिस्ती बांधवांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करत होते. पौलाने त्यांना म्हटलं: “त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करत नाही?” (१ करिंथ. ६:१-८) आज मंडळीतील काही ख्रिस्ती बांधवांनी इतर बांधवांसोबत बिझनेस सुरू केला आहे. पण काही कारणांमुळे बिझनेसमध्ये गुंतवलेले पैसे त्यांनी गमावले किंवा दुसऱ्या बांधवाने आपल्याशी लबाडी केली आहे असं त्यांना वाटलं. त्यामुळे त्यांनी आपल्या बांधवांविरुद्ध न्यायालयात खटले दाखल केले आहेत. पण ख्रिस्ती मंडळीमध्ये जेव्हा अशा गोष्टी घडतात, तेव्हा इतरांना यहोवा देवावर आणि त्याच्या मंडळीवर दोष लावण्यास कारणं मिळतात. आणि अशा गोष्टींमुळे ख्रिस्ती मंडळीतही मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. देवाचं वचन आपल्याला आपल्या ख्रिस्ती बांधवांसोबत शांतीने राहण्यासाठी आर्जवतं; मग यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा तोटा सहन करावा लागला तरीही. [2] खरंतर, आपल्यातील तंटे किंवा मतभेद कशा प्रकारे सोडवावेत याविषयी येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलं आहे. (मत्तय ५:२३, २४; १८:१५-१७ वाचा.) येशूने दिलेल्या सल्ल्याचं जेव्हा आपण पालन करतो, तेव्हा ख्रिस्ती मंडळीत आपण शांती आणि एकता टिकवून ठेवतो.

१६. देवाच्या लोकांमध्ये एकता का आहे?

१६ देवाचं वचन आपल्याला सांगतं: “पाहा, बंधूंनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” (स्तो. १३३:१) जेव्हा इस्राएली लोकांनी यहोवाच्या आज्ञा पाळल्या, तेव्हा त्यांच्यात एकता टिकून राहिली आणि ते सुसंघटित होते. यहोवा देवाने त्याच्या लोकांविषयी भविष्यवाणी केली होती: “मी त्यांस बस्राच्या [“मेंढवाड्यातील,” NW] मेंढरांप्रमाणे एकत्र करेन.” (मीखा २:१२) यहोवाने हेही सांगितलं होतं की, त्याचे लोक त्याच्या वचनांतून सत्य शिकतील आणि त्याची एकतेने सेवा करतील. यहोवा म्हणाला: “मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने करतील.” (सफ. ३:९) आज आपण यहोवाची सेवा एकतेने करत आहोत. खरंच यासाठी आपण यहोवाचे किती आभारी आहोत!

जेव्हा एखादी ख्रिस्ती व्यक्ती चुकीच्या दिशेने आपलं पाऊल टाकते, तेव्हा मंडळीतील वडील तिला प्रेमळपणे योग्य मार्गावर पुन्हा येण्यास मदत करतात (परिच्छेद १७ पाहा)

१७. मंडळीमधील एखादी व्यक्ती जेव्हा काही गंभीर चूक करते, तेव्हा मंडळीतील वडिलांची काय जबाबदारी आहे?

१७ एखादी ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा काही गंभीर चूक करते, तेव्हा मंडळीतील वडिलांनी त्या व्यक्तीला सुधारण्यासाठी लगेचच पावलं उचलली पाहिजेत आणि प्रेमळ रीत्या तिला आध्यात्मिक मदत पुरवली पाहिजे. वडिलांनी मंडळीला आध्यात्मिक रीत्या संरक्षण द्यावं, तिच्यामध्ये एकता आणि नैतिक शुद्धता राखावी अशी यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करतो, याची जाणीव वडिलांना आहे. (नीति. १५:३) करिंथकराच्या पहिल्या पत्रात आपल्याला वाचायला मिळतं की त्या मंडळीवर पौलाचं खूप प्रेम होतं, आणि जेव्हा तिथल्या बांधवांना सुधारण्याची गरज पडली तेव्हा पौलाने त्यांना सुधारलंही. करिंथमधल्या बांधवांनी पौलाने दिलेला सल्ला आणि मार्गदर्शन लगेचच लागू केलं हे आपल्याला माहीत आहे. कारण, करिंथकरांस पहिले पत्र लिहिल्यानंतर काही महिन्यांतच पौलाने त्यांना दुसरं पत्र लिहिलं आणि त्यांची प्रशंसा केली. जेव्हा एखादी ख्रिस्ती व्यक्ती नकळत चुकीच्या दिशेनं आपलं पाऊल टाकते, तेव्हा मंडळीतील वडिलांनी तिला प्रेमळपणे योग्य मार्गावर पुन्हा येण्यास मदत केली पाहिजे.—गलती. ६:१.

१८. (क) देवाच्या वचनातील मार्गदर्शनाचा पहिल्या शतकातील ख्रिश्चनांना कसा फायदा झाला? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?

१८ पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी जेव्हा देवाच्या वचनातील मार्गदर्शन स्वीकारलं, तेव्हा मंडळीमध्ये एकता, शांती आणि नैतिक रीत्या शुद्धता राहिली. (१ करिंथ. १:१०; इफिस. ४:११-१३; १ पेत्र ३:८) याचा परिणाम म्हणजे पहिल्या शतकातील ख्रिश्चन “आकाशाखालच्या सर्व सृष्टीत” देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करू शकले. (कलस्सै. १:२३) आजदेखील यहोवाच्या लोकांमध्ये एकता आहे आणि ते सुसंघटित आहेत. शिवाय ते संपूर्ण जगभरात देवाच्या राज्याची घोषणाही करत आहेत. विश्वाचा सर्वोच्च अधिकारी यहोवा, याच्या नावाला महिमा देणं, त्याच्या वचनातील मार्गदर्शन स्वीकारणं व त्याच्या आज्ञा पाळणं हीच आजच्या खऱ्या ख्रिश्चनांची मनापासून इच्छा आहे. (स्तो. ७१:१५, १६) याविषयीचे आणखी काही पुरावे आपण पुढील लेखामध्ये पाहू.

^ [१] (परिच्छेद १३) यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित पृष्ठ १३४-१३६ पाहा.

^ [२] (परिच्छेद १५) कोणत्या परिस्थितीत आपल्या ख्रिस्ती बांधवाविरुद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याचा निर्णय एखादा बांधव घेईल, याविषयीची अधिक माहिती देवाच्या प्रेमात टिकून राहा” पृष्ठ २५५ तळटीप, यात देण्यात आली आहे.