व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही यहोवाच्या वचनाला मौल्यवान लेखता का?

तुम्ही यहोवाच्या वचनाला मौल्यवान लेखता का?

“तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते . . . देवाचे म्हणून स्वीकारले, आणि वास्तविक ते असेच आहे.”—१ थेस्सलनी. २:१३.

गीत क्रमांक: ३७, ४८

१-३. (क) युवदीया आणि सुंतुखे यांच्यात कदाचित कोणत्या गोष्टीमुळे वाद झाला असावा? (ख) अशा प्रकारच्या समस्यांना आपण कसं टाळू शकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

बायबलची आपण मनापासून कदर करतो. कारण, ते देवाचं वचन आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यात असे सल्ले देण्यात आले आहेत ज्यांचं पालन केल्यामुळे आपण बऱ्याच समस्या टाळू शकतो. तसंच, जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपली चूक सुधारण्यासही त्यामुळे आपल्याला मदत होते. मग बायबलमधील या सल्ल्यांप्रती आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे? पहिल्या शतकातील युवदीया आणि सुंतुखे या दोन अभिषिक्त बहिणींच्या उदाहरणावर विचार करा. बायबल सांगतं की त्यांच्यात वाद झाला होता. पण, त्यामागचं कारण काय होतं हे मात्र बायबलमध्ये सांगण्यात आलेलं नाही. त्या वेळी काय घडलं असेल याची थोडी कल्पना करण्याचा आपण प्रयत्न करू.

युवदीयाने कदाचित आपल्या घरी काही बांधवांना आणि बहिणींना जेवणासाठी आमंत्रित केलं असेल. पण, तिने सुंतुखेला मात्र बोलवलं नाही. नंतर, सुंतुखेला जेव्हा समजलं की सगळ्यांनी युवदीयाच्या घरी चांगला वेळ घालवला आणि जेवणाचा आस्वाद घेतला, पण आपल्याला मात्र तिने टाळलं, तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. कदाचित तिने असा विचार केला असावा: ‘युवदीयाने मला बोलवलं नाही! मला वाटलेलं की आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत.’ सुंतुखेला वाटलं की युवदीयाला ती आवडत नसल्यामुळे ती तिला टाळण्याचा प्रयत्न करत आहे. मग सुंतुखेने काय केलं? तिनेसुद्धा आपल्या घरी त्याच बांधवांना आणि बहिणींना बोलवलं. पण युवदीयाला मात्र बोलवलं नाही. त्यांच्या या वागणुकीमुळे मंडळीतील इतर जणांना नक्कीच वाईट वाटलं असेल. बायबल सांगतं की पौलाने या दोन्ही बहिणींना सुधारण्यासाठी सल्ला दिला. तसंच, त्यांनी एकमेकांसोबत परत शांतीपूर्ण नातेसंबंध जोडावा असं उत्तेजनही त्याने दिलं. पौलाचा सल्ला युवदीयाने आणि सुंतुखेने नक्कीच स्वीकारला असावा आणि पुढेही यहोवाची आनंदाने सेवा केली असावी.—फिलिप्पै. ४:२, ३.

आज आपल्या मंडळीतही कदाचित बंधुभगिनींसोबत आपले मतभेद किंवा वाद होऊ शकतात. पण बायबलमधील सल्ला स्वीकारला, तर आपण या समस्या सोडवू शकतो. खरंतर, अशा समस्या निर्माण होण्यापूर्वीच आपण त्यांना टाळूही शकतो. तसंच, जेव्हा आपण बायबलचा सल्ला स्वीकारतो, तेव्हा देवाच्या वचनाप्रती आपल्याला मनापासून कदर असल्याचं आपण दाखवत असतो.—स्तो. २७:११.

भावनांवर नियंत्रण ठेवण्यास देवाचं वचन आपल्याला मदत करतं

४, ५. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत बायबल आपल्याला काय सांगतं?

स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं हे नेहमीच सोपं नसतं. एखादी व्यक्ती जेव्हा आपली निंदा करते किंवा टोचून बोलते, तसंच आपल्या संस्कृतीमुळे, वर्णामुळे किंवा आपण कसे दिसतो यामुळे आपल्यासोबत भेदभाव केला जातो, तेव्हा आपल्याला वाईट वाटू शकतं आणि रागही येऊ शकतो. जेव्हा अशा प्रकारे वागणारी व्यक्ती आपल्या बंधुभगिनींपैकी एखादी असते, तेव्हा खासकरून आपल्याला खूप जास्त दुःख होऊ शकतं. अशा वेळी देवाच्या वचनात दिलेल्या सल्ल्यांमुळे आपल्याला कशी मदत होते?

एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवत नाही, तेव्हा त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे यहोवाला माहीत आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटतं किंवा आपण रागात असतो, तेव्हा आपण असं काहीतरी बोलू किंवा वागू शकतो ज्याचा नंतर आपल्याला पस्तावा होईल. आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे असं यहोवा आपल्याला सांगतो. त्याच्या वचनात म्हटलं आहे: “मन उतावळे होऊ देऊन रागावू नको.” म्हणजेच आपण उतावीळ होऊन सूड उगवू नये. बायबलमधील या सल्ल्याचं पालन केल्यामुळे आपण खरंच किती समस्यांना टाळू शकतो, नाही का? (उपदेशक ७:९; नीतिसूत्रे १६:३२ वाचा.) बायबल आपल्याला इतरांना क्षमा करण्याचंही उत्तेजन देतं. येशूने हे अगदी स्पष्टपणे सांगितलं की, जर आपण इतरांना क्षमा केली नाही, तर यहोवा देवही आपल्याला क्षमा करणार नाही. (मत्त. ६:१४, १५) तेव्हा, स्वतःला विचारा: ‘धीर दाखवण्याच्या बाबतीत आणि इतरांना क्षमा करण्याच्या बाबतीत मला स्वतःमध्ये आणखी काही सुधारणा करण्याची गरज आहे का?’

६. आपण स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवलं नाही तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात?

आपण जर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवलं नाही, तर कदाचित आपण आपल्या मनात राग बाळगायला लागू; इतकंच नाही तर एखाद्याचा द्वेषही करू लागू. किंवा त्या व्यक्तीबद्दल इतर बंधुभगिनींच्या मनात तशाच भावना उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू. किंवा मग होऊ शकतं, की आपण आपल्या मनातील राग किंवा द्वेष इतरांपासून लपवण्याचा प्रयत्न करू. पण, आपण असं जरी करण्याचा प्रयत्न केला तरी आज ना उद्या ते इतरांच्या लक्षात येईलच. आणि मग आपले बंधुभगिनी कदाचित आपल्याला टाळू लागतील आणि आपल्यापासून लांब राहू लागतील. (नीति. २६:२४-२६) आपल्या मनातून राग आणि द्वेष काढून टाकण्यासाठी आणि इतरांना क्षमा करण्यासाठी मदत व्हावी म्हणून, मंडळीतील वडील आपल्याला बायबलमधून काही सल्ले देतील. (लेवी. १९:१७, १८; रोम. ३:११-१८) जेव्हा ते असं करतील, तेव्हा देवाच्या वचनातून मिळणारा सल्ला स्वीकारण्यास आपण तयार असू का?

यहोवा आज आपलं मार्गदर्शन करत आहे

७, ८. (क) यहोवा आपल्या संघटनेतील लोकांचं मार्गदर्शन कसं करत आहे? (ख) देवाचं वचन आपल्याला कोणकोणत्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन पुरवतं, आणि आपण त्याचं पालन का केलं पाहिजे?

यहोवा आज त्याच्या लोकांना मार्गदर्शन देत आहे आणि त्यांना शिकवत आहे. हे तो कसं करत आहे? त्याने येशू ख्रिस्ताला “मंडळीचे मस्तक” म्हणून नियुक्त केलं आहे आणि ख्रिस्ताने “विश्वासू व बुद्धिमान दासाला” नियुक्त केलं आहे. त्याने या विश्वासू दासावर देवाच्या लोकांना शिकवण्याची आणि मार्गदर्शन पुरवण्याची जबाबदारी सोपवली आहे. (इफिस. ५:२३; मत्त. २४:४५-४७) पहिल्या शतकातील नियमन मंडळाप्रमाणेच हा ‘विश्वासू दास’ देवाच्या वचनाची मनापासून कदर करतो. (१ थेस्सलनीकाकर २:१३ वाचा.) देवाचं वचन आपल्याला कोणकोणत्या गोष्टींबद्दल मार्गदर्शन पुरवतं?

देवाचं वचन आपल्याला नियमित रीत्या सभांना उपस्थित राहण्यास सांगतं. (इब्री १०:२४, २५) आपल्या सर्वांचा एकच विश्वास असावा, असं उत्तेजन ते आपल्याला देतं. (१ करिंथ. १:१०) आपण “पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळवण्यास” झटलं पाहिजे असं ते सांगतं. (मत्त. ६:३३) तसंच, देवाचं वचन आपल्याला घरोघरी, सार्वजनिक ठिकाणी आणि जिथंकुठं लोक मिळतील अशा ठिकाणी जाऊन सुवार्ता सांगण्याचं उत्तेजन देतं. (मत्त. २८:१९, २०; प्रे. कृत्ये ५:४२; १७:१७; २०:२०) ख्रिस्ती वडिलांना, मंडळीला नैतिक रीत्या शुद्ध ठेवण्यास ते आर्जवतं. (१ करिंथ. ५:१-५, १३; १ तीम. ५:१९-२१) शिवाय, आपल्याला देहाच्या अशुद्धतेपासून दूर राहण्यास, तसंच यहोवा ज्यांचा द्वेष करतो अशा सवयींना आणि विचारसरणीला टाळण्यासही देवाचं वचन आपल्याला सांगतं.—२ करिंथ. ७:१.

९. आपल्याला देवाचं वचन समजावं म्हणून येशू कोणाचा वापर करत आहे?

काही जण कदाचित असं म्हणतील की बायबल समजून घेण्यासाठी त्यांना इतरांच्या मदतीची गरज नाही. पण, देवाच्या लोकांना बायबलमधील शिकवणी समजाव्यात व त्यांनुसार चालता यावं म्हणून, १९१९ पासून येशू “विश्वासू व बुद्धिमान” दासाचा वापर करत आहे. बायबलचं मार्गदर्शन स्वीकारल्यामुळे मंडळीत शांती आणि एकता टिकवून ठेवण्यास आणि तिला नैतिक रीत्या शुद्ध ठेवण्यास आपण हातभार लावत असतो. स्वतःला विचारा: ‘येशूला एकनिष्ठ राहून त्याने नियुक्त केलेल्या विश्वासू दासाचं मार्गदर्शन मी स्वीकारेल का?’

यहोवाचा रथ अतिशय वेगाने पुढे वाटचाल करत आहे!

१०. यहेज्केलाच्या पुस्तकात यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गातील भागाबद्दल काय सांगितलं आहे?

१० बायबलच्या मदतीनं आपल्याला हे समजण्यास मदत होते की, स्वर्गातही यहोवाचे सेवक संघटित रीत्या कार्य करतात. उदाहरणार्थ, यहेज्केलाने दृष्टांतात एक स्वर्गीय रथ पाहिला, जो पूर्णपणे यहोवाच्या नियंत्रणात आहे. यहोवाच्या इच्छेनुसार तो रथ कोणत्याही दिशेला लगेच वळू शकतो. (यहे. १:४-२८) हा रथ यहोवाच्या संघटनेच्या स्वर्गातील भागाला चित्रित करतो; जो त्याच्या निर्देशनांनुसार लगेच कार्य करण्यास तयार असतो. याचा प्रभाव संघटनेच्या पृथ्वीवरील भागावरही होतो. देवाच्या संघटनेत मागील दहा वर्षांत जे अनेक बदल करण्यात आले आहेत त्यांचा विचार करा. या सर्व बदलांमागे यहोवा आहे आणि त्याच्या मार्गदर्शनानुसारच हे बदल केले जातात हे नेहमी लक्षात असू द्या. लवकरच अशी वेळ येईल जेव्हा यहोवाच्या मार्गदर्शनानुसार येशू ख्रिस्त आणि स्वर्गदूत मिळून या दुष्ट जगाचा नाश करतील. त्यानंतर कोणीही यहोवाच्या नावाचा अनादर करणार नाही किंवा त्याच्या राज्य करण्याच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित करणार नाही.

बांधकाम विभागात मेहनत घेणाऱ्या आपल्या बंधुभगिनींची आपण मनापासून कदर करतो (परिच्छेद ११ पाहा)

११, १२. या शेवटल्या दिवसांत यहोवाची संघटना कोणकोणत्या गोष्टी साध्य करत आहे?

११ या शेवटल्या दिवसांत यहोवाची संघटना कोणकोणत्या गोष्टी साध्य करत आहे त्याचा विचार करा. बांधकामाच्या क्षेत्रात. न्यूयॉर्कमधील वॉरविक या ठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांचं नवीन मुख्यालय बांधण्याच्या कामात शेकडो बंधूभगिनींनी बरीच मेहनत घेतली आहे. जगातील दुसऱ्या भागांतही हजारो स्वयंसेवक राज्य सभागृह आणि शाखा कार्यालयाच्या बांधकामात सहभाग घेत आहेत. हे बंधुभगिनी वर्ल्डवाईड डिझाईन किंवा कंस्ट्रक्शन डिपार्टमेंटच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. या सर्व बांधकाम प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या आपल्या बंधुभगिनींची आपण सर्वच मनापासून कदर करतो. यासोबतच, यहोवाचे इतर सेवकही या कार्याला हातभार लावण्यासाठी आपल्या परीने होताहोईल ती मदत करतात. जगभरातील बांधव दाखवत असलेल्या नम्रतेची आणि एकनिष्ठतेची यहोवा नक्कीच कदर करतो आणि त्यांना आशीर्वादही देतो.—लूक २१:१-४.

१२ प्रशिक्षणाच्या क्षेत्रात. आपल्या लोकांना प्रशिक्षण देण्यात यहोवाला आनंद मिळतो. (यश. २:२, ३) यहोवाच्या संघटनेतील वेगवेगळ्या प्रशालांचा विचार करा. जसं की पायनियर सेवा प्रशाला, सुवार्तिकांसाठी प्रशाला, गिलियड प्रशाला, बेथेल नवोदितांसाठी प्रशाला, प्रवासी पर्यवेक्षकांसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठी प्रशाला, मंडळीतील वडिलांकरता प्रशाला, राज्य सेवा प्रशाला, शाखा समिती सदस्यांसाठी आणि त्यांच्या पत्नींसाठी प्रशाला. यासोबतच, jw.org या आपल्या वेबसाईटवरही शेकडो भाषांमध्ये बायबल आणि इतर प्रकाशनं उपलब्ध आहेत. या वेबसाईटवर वेगवेगळे विभाग आहेत. जसं की लहान मुलांसाठी, कुटुंबासाठी तसंच न्यूजसाठी. तुम्ही प्रचारकार्यात व कौटुंबिक उपासनेदरम्यान jw.org या वेबसाईटचा वापर करत आहात का?

यहोवाला एकनिष्ठ राहा आणि त्याच्या संघटनेला पाठिंबा द्या

१३. यहोवाच्या लोकांवर कोणती जबाबदारी आहे?

१३ यहोवाच्या संघटनेचा भाग बनणं आणि आपल्याकडून त्याच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेणं, हा आपल्याला मिळालेला खूप मोठा सन्मान आहे. कोणत्या गोष्टींमुळे यहोवाचं मन आनंदित होतं हे जाणून घेण्यासोबतच आपल्यावर त्याच्या आज्ञा पाळण्याची आणि जे योग्य आहे ते करण्याची जबाबदारीही येते. आज जगात बहुतेक लोकांना वाईट गोष्टी करण्यात आनंद मिळतो, पण यहोवाप्रमाणे आपण नेहमी “वाइटाचा द्वेष” केला पाहिजे. (स्तो. ९७:१०) आपण कधीही अशा लोकांप्रमाणे होऊ नये जे “वाईटाला बरे व बऱ्याला वाईट म्हणतात.” (यश. ५:२०) आपल्याला यहोवाचं मन आनंदित करायचं आहे, त्यामुळे आपण सर्व बाबतीत नैतिक रीत्या शुद्ध असण्याची गरज आहे. (१ करिंथ. ६:९-११) यहोवा त्याच्या वचनातून आपल्याला जे सांगतो ते आपल्या भल्यासाठीच आहे. आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याला एकनिष्ठ राहण्याची आपली मनापासून इच्छा आहे. याच कारणांमुळे आपण नेहमी त्याच्या मार्गदर्शनाचं पालन करतो; मग आपण घरात असो, मंडळीत, कामावर, शाळेत किंवा इतर कुठंही. (नीति. १५:३) आपण आणखी कोणकोणत्या बाबतीत यहोवाला एकनिष्ठ असलं पाहिजे याचा विचार करा.

१४. आईवडील यहोवाला एकनिष्ठ असल्याचं कसं दाखवू शकतात?

१४ आपल्या मुलांना प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत. मुलांना प्रशिक्षण कसं द्यावं याबद्दल यहोवा त्याच्या वचनाद्वारे आईवडिलांना मार्गदर्शन पुरवतो. मुलांना प्रशिक्षण देण्याच्या बाबतीत जगातील लोकांच्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव पडू नये म्हणून ख्रिस्ती पालकांनी सावध असलं पाहिजे. (इफिस. २:२) उदाहरणार्थ, काही ठिकाणी कुटुंबातील वडील कदाचित असं म्हणतील, ‘आमच्या संस्कृतीत मुलांना शिकवण्याचं काम त्यांच्या आईचं आहे.’ पण, बायबल अगदी स्पष्टपणे सांगतं की मुलांना आध्यात्मिक गोष्टी शिकवण्याची जबाबदारी यहोवाने त्यांच्या वडिलांवर सोपवली आहे. (इफिस. ६:४) यहोवावर प्रेम करणाऱ्या आईवडिलांची नेहमी हीच इच्छा असते की लहान शमुवेलाप्रमाणे, त्यांच्या मुलांनीही यहोवासोबत जवळचं नातं जोडावं.—१ शमु. ३:१९.

१५. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना आपण यहोवाला एकनिष्ठ असल्याचं कसं दाखवू शकतो?

१५ निर्णय घेण्याच्या बाबतीत. अनेक वेळा आपल्याला जीवनात मोठमोठे निर्णय घ्यावे लागतात. अशा वेळी यहोवाचा काय दृष्टिकोन आहे ते लक्षात घेतल्यास आपल्याला त्याला एकनिष्ठ राहण्यास मदत होईल. याबाबतीत तो त्याच्या वचनाद्वारे आणि संघटनेद्वारे पुरवत असलेल्या मार्गदर्शनामुळे आपल्याला मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, नोकरी करण्यासाठी काही जोडपी दुसऱ्या देशात गेली आहेत. तिथं मुलांचा जन्म झाल्यावर त्यांनी त्यांना आपल्या मायदेशी नातेवाईकांकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. कारण, त्यामुळे आई आणि वडील दोघांनाही आपली नोकरी करत राहणं आणि जास्त पैसे कमवणं शक्य होईल. हे खरं आहे की आपल्या कुटुंबासंबंधी निर्णय घेण्याचा प्रत्येकाला वैयक्तिक अधिकार आहे. पण, असं असलं तरी पती-पत्नीने नेहमी स्वतःला विचारलं पाहिजे की, ‘आमच्या निर्णयाबद्दल यहोवाचा काय दृष्टिकोन आहे आणि त्याला कसं वाटेल?’ (रोमकर १४:१२ वाचा.) आपल्या कुटुंबासंबंधी किंवा कामासंबंधी कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याआधी, देवाचं वचन त्याबद्दल काय सांगतं याचा आपण विचार केला पाहिजे. आपल्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या मार्गदर्शनाची नेहमीच गरज आहे. कारण बायबल सांगतं की “पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्म. १०:२३.

१६. (क) आपल्या मुलाच्या जन्मानंतर एका स्त्रीपुढे कोणता निर्णय घेण्याची वेळ आली? (ख) योग्य निर्णय घेण्यासाठी तिला कशामुळे मदत झाली?

१६ नोकरीसाठी परदेशात गेलेल्या एका जोडप्याला एक मुलगा झाला. त्यांनी विचार केला की त्याचं संगोपन करण्यासाठी ते त्याला त्याच्या आजीआजोबांकडे पाठवतील. पण, त्याच दरम्यान त्या स्त्रीने एका यहोवाच्या साक्षीदारासोबत बायबल अभ्यास सुरू केला. मुलाला यहोवाबद्दल शिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हे ती बायबल अभ्यासातून शिकली. (स्तो. १२७:३; नीति. २२:६) मग त्या स्त्रीने यहोवाकडे कळकळून प्रार्थना केली आणि योग्य निर्णय घेण्यासाठी यहोवाकडे मदत मागितली. (स्तो. ६२:७, ८) तिच्याबरोबर बायबल अभ्यास करणाऱ्या बहिणीसोबत आणि मंडळीतील इतरांसोबतही ती याबद्दल बोलली. तिने तिच्या मुलाला त्याच्या आजीआजोबांकडे पाठवावं असं तिचे नातेवाईक आणि मित्र तिला सांगत राहिले. पण असं करणं चुकीचं ठरेल हे समजल्यामुळे तिने आपल्या मुलाला आजीआजोबांकडे न पाठवण्याचा निर्णय घेतला. मंडळीतील बांधवांनी आणि बहिणींनी आपल्या पत्नीला आणि मुलाला किती मदत केली हे जेव्हा त्या स्त्रीच्या पतीनं पाहिलं, तेव्हा याचा त्याच्यावर चांगला प्रभाव पडला. त्यानेही साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केला आणि आपल्या कुटुंबासोबत तोही सभांना उपस्थित राहू लागला. यहोवाने आपल्या प्रार्थनेचं उत्तर दिलं आहे याची जेव्हा या स्त्रीला जाणीव झाली असेल, तेव्हा तिला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा.

१७. बायबल विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी संघटना आपल्याला कोणतं मार्गदर्शन देते?

१७ मार्गदर्शनाचं पालन करण्याच्या बाबतीत. आपण जर यहोवाला एकनिष्ठ असलो तर त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं आपण नेहमी पालन करू. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीसोबत बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू केल्यानंतर आपण काय केलं पाहिजे याचा विचार करा. आपल्याला सांगण्यात आलं होतं की, प्रत्येक बायबल अभ्यासानंतर आपण विद्यार्थ्यासोबत यहोवाच्या संघटनेबद्दल काही वेळेसाठी बोललं पाहिजे. यामुळे संघटना कशी कार्य करते त्याबद्दल त्याला आणखी जास्त समजून घेण्यास मदत होईल. यासाठी आपण यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात कोणत्या सभा भरतात? हा व्हिडिओ त्याला दाखवू शकतो. तसंच, यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत? या माहितीपत्रकाचाही आपण वापर करू शकतो. बायबल काय शिकवते? या संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास झाल्यानंतर आणि विद्यार्थ्याचा बाप्तिस्मा झाला असला तरी, आपण त्याच्यासोबत देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकातूनही अभ्यास केला पाहिजे. यामुळे, त्याला “विश्वासात दृढ” होण्यास मदत होईल. (कलस्सै. २:७) यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या या मार्गदर्शनाचं तुम्ही पालन करत आहात का?

१८, १९. यहोवाचे आभार मानण्याकरता आपल्याजवळ कोणकोणती कारणं आहेत?

१८ यहोवाचे आभार मानण्याकरता आपल्याकडे बरीच कारणं आहेत. त्यातीलच एक म्हणजे, आपण यहोवामुळेच अस्तित्वात आहोत. पौलाने म्हटलं: “आपण त्याच्या ठायी जगतो, वागतो व आहो.” (प्रे. कृत्ये १७:२७, २८) तसंच, त्याने आपल्याला त्याचं वचन, बायबल दिलं आहे. थेस्सलनीकातील ख्रिश्चनांप्रमाणे आपणही बायबलची मनापासून कदर करतो. कारण त्यातील संदेश हा देवाकडून आहे याची जाणीव आपल्याला आहे.—१ थेस्सलनी. २:१३.

१९ बायबलमुळे यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास आपल्याला मदत मिळाली आहे. (याको. ४:८) आपल्या स्वर्गीय पित्याने आपल्याला त्याच्या संघटनेचा भाग होण्यासाठी निवडलं आहे यासाठीही आपण त्याचे खूप आभारी आहोत. आपल्याही भावना स्तोत्रकर्त्यासारख्याच आहेत. त्याने लिहिलं: “परमेश्वराचे उपकारस्मरण करा, कारण तो चांगला आहे; कारण त्याची दया सनातन आहे.” (स्तो. १३६:१) या स्तोत्रात “दया” या शब्दासाठी मूळ इब्री भाषेत जो शब्द वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ “एकनिष्ठ प्रेम” असा होतो. आणि या संपूर्ण स्तोत्रात तो शब्द सव्वीस वेळा आढळतो. आपण जर यहोवाला एकनिष्ठ राहिलो आणि त्याच्या संघटनेकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचं पालन केलं, तर तो आपल्याला सार्वकालिक जीवन देईल आणि सदासर्वकाळ आपल्याला एकनिष्ठ राहील!