व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उदार मनाच्या व्यक्तीला अनेक आशीर्वाद मिळतात

उदार मनाच्या व्यक्तीला अनेक आशीर्वाद मिळतात

बलिदानं ही नेहमीच खऱ्या उपासनेचा महत्त्वाचा भाग राहिली आहेत. प्राचीन काळी, इस्राएली लोक प्राण्यांची बलिदानं द्यायचे. तसंच, खरे ख्रिस्तीही पहिल्यापासूनच “स्तुतीचे बलिदान” देण्यासाठी ओळखले जातात. पण, अशीही काही बलिदानं आहेत ज्यांमुळे देवाला खूप आनंद होतो. (इब्री १३:१५, १६) अशा बलिदानांमुळे आपल्यालाही आनंद आणि अनेक आशीर्वाद मिळतात. ही गोष्ट, खाली दिलेल्या काही उदाहरणांतून दिसून येते.

हन्ना ही प्राचीन काळातली देवाची एक विश्वासू सेवक होती. आपल्याला मूल व्हावं अशी तिची तीव्र इच्छा होती. पण तिला मूल होत नव्हतं. मग तिने प्रार्थनेत देवाला नवस केला, की जर तिला मुलगा झाला तर “तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा” म्हणून ती त्याला समर्पित करेल. (१ शमु. १:१०, ११) काही काळानंतर, हन्ना गर्भवती राहिली आणि तिला मुलगा झाला. त्याचं नाव शमुवेल ठेवण्यात आलं. त्याचं दूध सुटल्यानंतर हन्ना आपला नवस पूर्ण करण्यासाठी त्याला निवासमंडपात घेऊन गेली. हन्नाने दाखवलेल्या या निःस्वार्थ मनोवृत्तीबद्दल यहोवाने तिला अनेक आशीर्वाद दिले. तिला आणखी पाच मुलं झाली आणि तिचा मुलगा शमुवेल पुढे एक संदेष्टा आणि बायबल लेखक बनला.—१ शमु. २:२१.

हन्ना आणि शमुवेल यांच्याप्रमाणेच, आज ख्रिश्चनांनाही आपल्या निर्माणकर्त्याची सेवा करण्यासाठी आपलं जीवन समर्पित करण्याचा बहुमान लाभला आहे. यहोवाची सेवा करण्यासाठी आपण जे काही त्याग करू त्याबद्दल यहोवा आपल्याला भरभरून आशीर्वाद देईल, असं वचन येशूने दिलं.—मार्क १०:२८-३०.

आणखी एक उदाहरण लक्षात घ्या. दुर्कस ही पहिल्या शतकातली एक ख्रिस्ती स्त्री होती. इतरांना मदत करण्यासाठी बलिदानं देण्यात, म्हणजेच “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात” ती तत्पर होती. पण दु:खाची गोष्ट म्हणजे “ती आजारी पडून मरण पावली.” त्यामुळे तिच्या मंडळीतले सर्वच जण शोकात बुडाले. त्यांनी जेव्हा ऐकलं की प्रेषित पेत्र जवळच्याच भागात आहे, तेव्हा त्यांनी त्याला लगेच तिथे येण्याची विनंती केली. पेत्रने येऊन दुर्कसला परत जिवंत केलं. बायबलमध्ये नमूद केलेलं हे पहिलं असं पुनरुत्थान आहे जे एका प्रेषिताने केलं होतं. पेत्रने केलेला हा चमत्कार पाहून सर्वांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! (प्रे. कार्ये ९:३६-४१) खरंच, दुर्कसने केलेली बलिदानं देव मुळीच विसरला नव्हता. (इब्री ६:१०) तिने दाखवलेल्या या उदार मनोवृत्तीचं आपल्याला अनुकरण करता यावं म्हणून देवाने दुर्कसचा अहवाल त्याच्या वचनात लिहून ठेवला आहे.

प्रेषित पौलनेसुद्धा इतरांची काळजी घेण्यासाठी आपला वेळ आणि ताकद खर्च करण्याद्वारे उदारतेच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं आहे. करिंथमधल्या आपल्या ख्रिस्ती बांधवांना लिहिताना तो म्हणाला: “माझ्याजवळ जे काही आहे ते सर्व मी तुमच्यासाठी आनंदाने खर्च करीन आणि स्वतःसुद्धा तुमच्यासाठी खर्ची पडेन.” (२ करिंथ. १२:१५) इतरांसाठी स्वतःला खर्ची केल्याने केवळ वैयक्तिक समाधान मिळतं असं नाही, तर सगळ्यात मुख्य म्हणजे आपल्याला यहोवाचे आशीर्वाद आणि त्याची स्वीकृतीही मिळते. ही गोष्ट प्रेषित पौल स्वतःच्या अनुभवावरून शिकला होता.—प्रे. कार्ये २०:२४, ३५.

या उदाहरणांवरून स्पष्ट होतं, की राज्याच्या कार्यासाठी आणि आपल्या बंधुभगिनींच्या मदतीसाठी आपण आपला वेळ आणि ताकद खर्च करतो, तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो. पण, राज्य प्रचाराच्या कार्याला योगदान देण्याचे आणखीनही काही मार्ग आहेत. उदाहरणार्थ, स्वेच्छेने अनुदान देण्याद्वारेही आपण देवाचा सन्मान करू शकतो. आपल्या दानाचा उपयोग जगव्याप्त प्रचारकार्यासाठी केला जातो; यातूनच मिशनरींना व खास पूर्ण वेळच्या सेवकांना मदत केली जाते. याशिवाय, आपण स्वेच्छेने देत असलेल्या दानांचा उपयोग प्रकाशनांचं भाषांतर करण्यासाठी, व्हिडिओ तयार करण्यासाठी, आपत्तीच्या वेळी मदतकार्य पुरवण्यासाठी आणि नवीन राज्य सभागृहांच्या बांधकामासाठी केला जातो. आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की जो “उदार” मनोवृत्ती दाखवतो त्याला भरभरून आशीर्वाद मिळतील. शिवाय, आपल्या मौल्यवान वस्तू यहोवाला देण्याद्वारे आपण त्याचा सन्मान करतो.—नीति. ३:९; २२:९.

^ परि. 10 भारतात हे “Jehovah’s Witnesses of India” ला देय असावे.

^ परि. 12 भारतीय पासपोर्ट धारक पुढे दिलेल्या वेबसाईटचा उपयोग करू शकतात: www.jwindiagift.org.

^ परि. 14 अंतिम निर्णय घेण्याआधी स्थानिक शाखा कार्यालयाशी याबद्दल खातरी करून घ्या.

^ परि. 21 भारतात, “आपल्या मौल्यवान गोष्टींनी यहोवाचा सन्मान करा” नावाची पत्रिका मराठी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम व हिंदी या भाषांत उपलब्ध आहे.