व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका

कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका

“कोणत्याही मनुष्यामुळे आपले बक्षीस गमावू नका.”—कलस्सै. २:१८.

गीत क्रमांक: ३२, ५५

१, २. (क) देवाचे सेवक कोणतं बक्षीस मिळण्याची वाट पाहत आहेत? (ख) कोणती गोष्ट आपल्याला आपल्या बक्षिसावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

अभिषिक्त ख्रिश्चनांसमोर एक अनमोल आशा आहे. ती म्हणजे, स्वर्गीय जीवनाची आशा. ही आशा, “देवाने . . . दिलेल्या वरील बोलावण्याचे बक्षीस” आहे, असं प्रेषित पौल म्हणाला. (फिलिप्पै. ३:१४) स्वर्गात अभिषिक्त जन येशू ख्रिस्तासोबत राज्य करतील आणि मानवांना परिपूर्ण स्थितीत आणण्यासाठी त्याच्यासोबत कार्य करतील. (प्रकटी. २०:६) ही खरोखरच किती अद्‌भुत आशा आहे! दुसरी मेंढरेसुद्धा एका वेगळ्या आशेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. ते पृथ्वीवर नंदनवनात सर्वकाळाच्या जीवनाचं बक्षीस मिळवण्याची आशा बाळगतात. आणि आपल्या या आशेमुळे ते अतिशय आनंदी आहेत!—२ पेत्र ३:१३.

प्रेषित पौलला मनापासून असं वाटत होतं, की त्याच्या सोबतीच्या अभिषिक्त ख्रिश्चनांनी विश्वासू राहावं आणि बक्षीस मिळवावं. म्हणूनच तो त्यांना म्हणाला: “स्वर्गातील गोष्टींवर लक्ष लावा.” (कलस्सै. ३:२) त्या ख्रिश्चनांनी आपल्या स्वर्गीय जीवनाच्या अनमोल आशेवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक होतं. (कलस्सै. १:४, ५) खरंतर, यहोवाने आपल्या लोकांसाठी राखून ठेवलेल्या आशीर्वादांवर मनन केल्याने, त्याच्या सर्वच सेवकांना आपल्या बक्षिसावर लक्ष केंद्रित करायला मदत होईल; मग, त्यांची आशा स्वर्गीय जीवनाची असो किंवा पृथ्वीवरील जीवनाची.—१ करिंथ. ९:२४.

३. पौलने कोणत्या गोष्टींच्या बाबतीत ख्रिश्चनांना सावध केलं?

पौलने ख्रिश्चनांना अशा काही गोष्टींविषयी सावध केलं, ज्यांमुळे ते आपलं बक्षीस गमावण्याची शक्यता होती. उदाहरणार्थ, कलस्सैकरांना लिहिताना त्याने खोट्या ख्रिश्चनांविषयी सांगितलं. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याऐवजी हे खोटे ख्रिस्ती मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करण्याद्वारे देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत होते. (कलस्सै. २:१६-१८) पौलने आपल्या पत्रात, अशाही काही गोष्टींवर चर्चा केली ज्या आजसुद्धा पाहायला मिळतात. आणि या गोष्टींमुळे आपणही आपलं बक्षीस गमावून बसण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, अनैतिक इच्छांचा प्रतिकार कसा करायचा; तसंच, आपले कुटुंबातले सदस्य आणि बंधुभगिनी यांसोबतच्या आपल्या नातेसंबंधात काही समस्या निर्माण झाल्या तर त्या कशा सोडवायच्या, यांवर त्याने चर्चा केली. या बाबतींत पौलने दिलेला सल्ला आपल्यासाठी नक्कीच मोलाचा ठरू शकतो. तेव्हा, कलस्सैकर यांना लिहिलेल्या पत्रात पौलने प्रेमळपणे ज्या गोष्टींविषयी इशारा दिला त्यांचं आता आपण परीक्षण करू या.

अनैतिक इच्छा मारून टाका

४. अनैतिक इच्छांमुळे आपण आपलं बक्षीस गमावण्याची शक्यता आहे असं का म्हणता येईल?

पौलने आपल्या बांधवांना त्यांच्या अद्‌भुत आशेची आठवण करून दिल्यानंतर पत्रात पुढे असं लिहिलं: “अनैतिक लैंगिक कृत्ये, अशुद्धपणा, अनावर लैंगिक वासना, वाईट इच्छा आणि लोभीपणा . . . यांसारख्या गोष्टी उत्पन्न करणाऱ्या पृथ्वीवरील आपल्या शरीराच्या अवयवांना मारून टाका.” (कलस्सै. ३:५) अनैतिक इच्छा अतिशय प्रबळ असू शकतात. त्यांमुळे, यहोवासोबतचा नातेसंबंध आणि भविष्याबद्दल असलेली आशा आपण गमावून बसू शकतो. एका बांधवाचं उदाहरण विचारात घ्या. तो अनैतिक इच्छांना बळी पडला होता. अर्थात, त्याबद्दल त्याने पश्‍चात्ताप केला आणि नंतर त्याला मंडळीत पुन्हा स्वीकारण्यातही आलं. तो बांधव म्हणतो, की त्याच्या अनैतिक इच्छा इतक्या प्रबळ झाल्या होत्या, की तो “भानावर येईपर्यंत खूप उशीर झाला होता.”

५. धोकादायक परिस्थितींत आपण स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो?

यहोवाच्या नैतिक स्तरांचं उल्लंघन होण्याची शक्यता असलेल्या परिस्थितींत आपल्याला विशेष काळजी घेण्याची गरज आहे. उदाहरणार्थ, लग्नाआधी गाठीभेटी करणाऱ्या जोडप्याने काही गोष्टींच्या बाबतींत सुरुवातीपासूनच स्पष्ट मर्यादा ठरवणं सुज्ञतेचं आहे; जसं की, स्पर्श करणं, चुंबन घेणं किंवा एकांतात वेळ घालवणं. (नीति. २२:३) याशिवाय, नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जावं लागतं किंवा कामाच्या ठिकाणी विरुद्धलिंगी व्यक्तीसोबत काम करावं लागतं, तेव्हाही नैतिकता धोक्यात घालणारी परिस्थिती निर्माण होऊ शकते. (नीति. २:१०-१२, १६) अशा वेळी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? तुम्ही यहोवाचे साक्षीदार आहात अशी स्वतःची ओळख करून द्या. तसंच, सभ्यपणे वागा, आणि इश्कबाजी (फ्लर्टिंग) करण्याचे परिणाम किती घातक होऊ शकतात हे कधीही विसरू नका. याशिवाय, आपण निराश असतो किंवा आपल्याला एकाकीपणा जाणवतो तेव्हासुद्धा विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशा वेळी कोणीतरी आपल्याला भावनिक आधार द्यावा असं आपल्याला वाटत असेल. आणि भावनिक आधारासाठी आपण इतके आसुसलेले असू, की आपल्याबद्दल आपुलकी दाखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे आपण सहज वळू. पण, असं करणं अतिशय धोकादायक असू शकतं. तुम्हाला कधी भावनिक आधाराची गरज वाटल्यास, असं काहीही करू नका ज्यामुळे तुम्ही तुमचं बक्षीस गमावून बसाल. त्याऐवजी, आधारासाठी यहोवाकडे आणि आपल्या बंधुभगिनींकडे वळा.—स्तोत्र ३४:१८; नीतिसूत्रे १३:२० वाचा.

६. मनोरंजनाची निवड करताना आपण नेहमी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

अनैतिक इच्छा मारून टाकण्यासाठी, अनैतिक स्वरूपाचं मनोरंजन टाळणं गरजेचं आहे. आज पाहायला मिळणारं बहुतेक मनोरंजन आपल्याला सदोम आणि गमोरा या शहरांतल्या गोष्टींची आठवण करून देतं. (यहू. ७) मनोरंजन क्षेत्रातले लोक अनैतिक लैंगिक कृत्यं अशा पद्धतीनं मांडतात जणू ते अगदीच सामान्य आहे आणि त्याचे कोणतेही वाईट परिणाम नाहीत. त्यामुळे आपण नेहमी सावध असलं पाहिजे. आज जगातलं कोणतंही मनोरंजन आपण विचार न करता स्वीकारू नये. त्याऐवजी, मनोरंजनाची निवड करताना आपण पुरेशी काळजी घेतली पाहिजे. आपण असं मनोरंजन निवडलं पाहिजे ज्यामुळे जीवनाचं बक्षीस आपण गमावून बसणार नाही.—नीति. ४:२३.

प्रेम आणि दयाळूपणा “परिधान करा”

७. ख्रिस्ती मंडळीत काही वेळा आपल्याला कोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं?

आपण ख्रिस्ती मंडळीचा भाग आहोत याचा आपल्याला आनंद आहे. ख्रिस्ती सभांमध्ये आपण देवाच्या वचनाचा अभ्यास करतो, एकमेकांवर प्रेम करतो आणि एकमेकांना आधार देतो. असं केल्यामुळे, जीवनाच्या बक्षिसावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला मदत होते. पण, काही वेळा गैरसमज झाल्यामुळे बंधुभगिनींमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या जर लगेच सोडवल्या नाहीत, तर रागाची भावना सहज मनात घर करू शकते.—१ पेत्र ३:८, ९ वाचा.

८, ९. (क) जीवनाचं बक्षीस मिळवण्यासाठी कोणते गुण आपल्याला मदत करू शकतात? (ख) मंडळीतल्या एखाद्याने आपलं मन दुखावल्यास कोणती गोष्ट आपल्याला शांती टिकवून ठेवायला मदत करू शकते?

आपण जर मनात राग बाळगला तर जीवनाचं बक्षीस गमावून बसू शकतो. म्हणूनच, प्रेषित पौलने कलस्सैकरांना सल्ला दिला: “पवित्र व प्रिय असे देवाचे निवडलेले लोक या नात्याने करुणा, दयाळूपणा, प्रेमळपणा, नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता परिधान करा. कोणाविरुद्ध काही तक्रार असली, तरी एकमेकांचे सहन करत राहा आणि एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करत जा. यहोवाने जशी तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली आहे, तशी तुम्हीही केली पाहिजे. पण, या सर्व गोष्टींशिवाय प्रेमाचे वस्त्र घाला, कारण हे ऐक्याचे परिपूर्ण बंधन आहे.”—कलस्सै. ३:१२-१४.

प्रेम आणि दयाळूपणा हे गुण आपल्याला इतरांना क्षमा करण्यास मदत करू शकतात. एखाद्याच्या बोलण्यामुळे किंवा कृत्यामुळे जर आपलं मन दुखावलं असेल, तर आपण स्वतःला अशा प्रसंगांची आठवण करून देऊ शकतो जेव्हा आपणही इतरांचं मन दुखावलं होतं आणि त्यांनी आपल्याला क्षमा केली होती. त्यांनी दाखवलेल्या प्रेमामुळे आणि दयाळूपणामुळे आपल्याला खरंच किती कृतज्ञ वाटलं होतं! (उपदेशक ७:२१, २२ वाचा.) पण, आपण विशेषकरून ख्रिस्ताने दाखवलेल्या प्रेमासाठी आभारी आहोत. कारण, त्या प्रेमामुळेच खऱ्या उपासकांमध्ये शांती आणि एकता टिकून राहते. (कलस्सै. ३:१५) आपण सर्व जण एकाच देवावर प्रेम करतो, एकच संदेश घोषित करतो आणि जवळपास एकसाख्याच समस्यांना तोंड देतो. त्यामुळे, आपण प्रेम आणि दयाळूपणा दाखवून एकमेकांना क्षमा केली, तर मंडळीतली एकता वाढेल आणि जीवनाच्या बक्षिसावर लक्ष केंद्रित करायला आपल्याला मदत होईल.

१०, ११. (क) हेवा किंवा ईर्ष्या करणं इतकं घातक का आहे? (ख) या वाईट भावनेमुळे जीवनाचं बक्षीस गमावू नये म्हणून आपण कोणती काळजी घेऊ शकतो?

१० मनात हेवा किंवा ईर्ष्या बाळगल्यामुळेही आपण जीवनाचं बक्षीस गमावून बसू शकतो. ही भावना किती घातक असू शकते हे दाखवणारी कितीतरी उदाहरणं बायबलमध्ये दिली आहेत. उदाहरणार्थ, काइनने ईर्ष्येपोटी हाबेलचा खून केला. तसंच, कोरह, दाथान आणि अबीराम यांनीसुद्धा मोशेबद्दल मनात हेवा बाळगला आणि त्याच्याविरुद्ध बंड केलं. त्याचप्रमाणे शौल राजानेही दावीदचा हेवा केला आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. बायबलमध्ये जे म्हटलं आहे ते किती खरं आहे. ते म्हणतं: “जिथे ईर्ष्या आणि द्वेष असतो, तिथे अव्यवस्था आणि प्रत्येक वाईट गोष्टही असते.”—याको. ३:१६.

११ मनापासून प्रेमळ आणि दयाळू असण्याचा प्रयत्न केल्यास आपल्याला इतरांबद्दल लगेच हेवा किंवा ईर्ष्या वाटणार नाही. बायबल म्हणतं: “प्रेम सहनशील आणि दयाळू असते. प्रेम हेवा करत नाही.” (१ करिंथ. १३:४) हेव्याची किंवा ईर्ष्येची भावना मनात मूळ धरू नये म्हणून आपण यहोवासारखा दृष्टिकोन बाळगला पाहिजे. आणि आपले बंधुभगिनी एकाच शरीराचा, अर्थात मंडळीचा भाग आहेत या दृष्टीने त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे. बायबल म्हणतं: “एका अवयवाचा सन्मान झाला, तर बाकीच्या सर्व अवयवांना आनंद होतो.” (१ करिंथ. १२:१६-१८, २६) बंधुभगिनींपैकी एखाद्याचं भलं झालं तर आपण त्याचा हेवा करणार नाही; उलट, त्याच्या आनंदात सहभागी होऊ. या बाबतीत, शौल राजाचा मुलगा योनाथान याने किती चांगलं उदाहरण मांडलं होतं याचा विचार करा. योनाथानच्या जागी दावीदला राजा म्हणून निवडण्यात आलं तेव्हा योनाथानने त्याचा द्वेष केला नाही. उलट, त्याने दावीदला धीर आणि आधार दिला. (१ शमु. २३:१६-१८) योनाथानप्रमाणेच आपल्यालासुद्धा प्रेम आणि दयाळूपणा दाखवता येईल का?

कुटुंब या नात्याने बक्षीस मिळवा

१२. बायबलचा कोणता सल्ला तुमच्या कुटुंबाला जीवनाचं बक्षीस मिळवायला मदत करू शकतो?

१२ कुटुंबातले सर्व सदस्य बायबलच्या तत्त्वांनुसार वागले, तर कुटुंबातली शांती आणि आनंद टिकून राहील. तसंच, कुटुंब या नात्याने जीवनाचं बक्षीस मिळवणंही त्यांना शक्य होईल. पौलने कुटुंबांना एक मोलाचा सल्ला दिला: “पत्नींनो, आपल्या पतींच्या अधीन असा, कारण असे करणे प्रभूमध्ये योग्य आहे. पतींनो, आपल्या पत्नींवर प्रेम करा आणि त्यांच्याशी कठोरपणे वागू नका. मुलांनो, सर्व बाबतींत आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, कारण यामुळे प्रभूला आनंद होतो. वडिलांनो, आपल्या मुलांना वैताग आणू नका, नाहीतर ते खचून जातील.” (कलस्सै. ३:१८-२१) हा सल्ला तुमच्या कुटुंबाला कसा लाभदायक ठरू शकतो?

१३. एक ख्रिस्ती बहीण, सत्यात नसलेल्या पतीच्या मनात यहोवाची सेवा करण्याची इच्छा कशी निर्माण करू शकते?

१३ एक परिस्थिती विचारात घ्या. कदाचित तुम्ही एक ख्रिस्ती बहीण असाल; पण तुमचा पती मात्र सत्यात नसेल. आणि तो तुमच्याशी नीट वागत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही काय कराल? तुम्ही कदाचित त्याच्यावर रागवाल, त्याच्याशी वादही घालाल. पण त्यामुळे खरंच काही फरक पडेल का? त्याच्याशी वाद घालून तुम्ही तुमची बाजू मांडण्यात कदाचित यशस्वी व्हालही; पण, यामुळे यहोवाची सेवा करण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होईल का? कदाचित नाही. याउलट, तुम्ही जर पतीच्या मस्तकपदाचा आदर केला, तर कुटुंबातली शांती टिकवून ठेवण्यास तुमचा हातभार लागेल. तसंच, यामुळे यहोवाच्या नावाचा गौरवसुद्धा होईल. तुमचं चांगलं उदाहरण पाहून कदाचित तुमच्या पतीच्या मनात यहोवाची सेवा करण्याची इच्छा निर्माण होईल. आणि पुढे तुम्ही दोघंही जीवनाचं बक्षीस मिळवू शकाल.—१ पेत्र ३:१, २ वाचा.

१४. सत्यात नसलेली पत्नी आपला आदर करत नाही असं वाटत असेल, तर एक ख्रिस्ती बांधव काय करू शकतो?

१४ आणखी एक परिस्थिती विचारात घ्या. कदाचित तुम्ही एक ख्रिस्ती बांधव असाल, पण तुमची पत्नी मात्र सत्यात नसेल. आणि ती तुमचा आदर करत नाही असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही काय कराल? तुम्ही तिच्यावर ओरडून अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला, तर ती खरंच तुमचा आदर करेल का? मुळीच नाही! यहोवा तुमच्याकडून अपेक्षा करतो, की तुम्ही येशूचं अनुकरण करणारे प्रेमळ पती असावे. (इफिस. ५:२३) मंडळीचे मस्तक असलेला येशू नेहमी धीर आणि प्रेमळपणा दाखवतो. (लूक ९:४६-४८) येशूचं अनुकरण केल्यास, कदाचित काही काळाने तुमच्या पत्नीच्या मनातही यहोवाची सेवा करण्याची इच्छा निर्माण होईल.

१५. आपलं आपल्या पत्नीवर प्रेम आहे हे एक ख्रिस्ती पती कसं दाखवतो?

१५ पतींना सल्ला देताना यहोवा म्हणतो: “पतींनो, आपल्या पत्नींवर प्रेम करा आणि त्यांच्याशी कठोरपणे वागू नका.” (कलस्सै. ३:१९) एक प्रेमळ पती आपल्या पत्नीचा आदर कसा करतो? तो तिची मतं विचारात घेतो आणि तिचं म्हणणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे याची तिला जाणीव करून देतो. (१ पेत्र ३:७) पत्नीच्या म्हणण्याप्रमाणे करणं नेहमीच शक्य नसलं, तरी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतल्याने पतीला चांगले निर्णय घेण्यास मदत होऊ शकते. (नीति. १५:२२) पत्नीने आपला आदर केला पाहिजे अशी मागणी प्रेमळ पती करत नाही; तर, तो तिचा आदर कमावण्याचा प्रयत्न करतो. तसंच, पती आपल्या पत्नीवर आणि मुलांवर प्रेम करतो, तेव्हा सर्वांनाच अधिक आनंदाने यहोवाची सेवा करणं शक्य होतं. शिवाय, पुढे कुटुंब या नात्याने जीवनाचं बक्षीस मिळवणंही त्यांना शक्य होईल.

कौटुंबिक समस्यांमुळे जीवनाचं बक्षीस गमावू नये म्हणून आपण काय करू शकतो? (परिच्छेद १३-१५)

तरुणांनो—कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका!

१६, १७. तरुणांनो, आपल्या आईवडिलांच्या शिस्तीचा त्रास करून घेण्याचं तुम्ही कसं टाळू शकता?

१६ तुम्ही जर एक किशोरवयीन असाल आणि तुमचे पालक तुम्हाला समजून घेत नाहीत किंवा ते खूपच कडक आहेत असं तुम्हाला वाटत असेल, तर काय? या गोष्टीचा तुम्हाला कदाचित इतका त्रास होत असेल, की यहोवाची सेवा करावी की नाही असा प्रश्न तुम्हाला पडत असेल? पण, यामुळे जर तुम्ही यहोवाची सेवा करणं सोडून दिलं, तर तुमचा निर्णय किती चुकीचा होता हे लवकरच तुम्हाला कळून येईल. कारण, या जगातली कोणतीही व्यक्ती तुमच्यावर तितकं प्रेम करू शकणार नाही, जितकं प्रेम तुमचे ख्रिस्ती आईवडील आणि मंडळीतले बंधुभगिनी करतात.

१७ जरा या गोष्टीचा विचार करा: तुमच्या आईवडिलांनी जर कधीच तुमची चूक सुधारली नाही, तर त्यांना खरंच तुमची काळजी आहे हे तुम्हाला कसं कळेल? (इब्री १२:८) अर्थात, तुमचे आईवडील परिपूर्ण नाहीत. त्यामुळे, शिस्त लावण्याची त्यांची पद्धत कदाचित तुम्हाला आवडत नसेल. पण, त्यावरच लक्ष देऊ नका; तर ते असं का वागतात किंवा बोलतात यामागची कारणं समजून घेण्याचा प्रयत्न करा. शांत राहा, टोकाची प्रतिक्रिया देऊ नका. बायबल म्हणतं: “जो मितभाषण करतो त्याच्या अंगी शहाणपण असते; ज्याची वृत्ती शांत तो समंजस असतो.” (नीति. १७:२७) सल्ला स्वीकारून त्यापासून शिकणारी प्रौढ व्यक्ती बनण्याचं ध्येय ठेवा; मग, तो सल्ला कोणत्याही पद्धतीने दिलेला असो. (नीति. १:८) यहोवावर प्रेम करणारे आईवडील आपल्यासाठी मोठा आशीर्वाद आहेत हे कधीही विसरू नका. तुम्हाला सर्वकाळाचं जीवन मिळावं म्हणून तुम्हाला मदत करण्याची त्यांची इच्छा आहे.

१८. तुम्ही आपल्या बक्षिसावर लक्ष केंद्रित करण्याचा निश्चय का केला आहे?

१८ आपल्याला स्वर्गीय जीवनाची आशा असो किंवा पृथ्वीवरील जीवनाची, आपण सर्वच जण एका अद्‌भुत भवितव्याची वाट पाहू शकतो. आपली आशा खरी आहे. कारण, ती विश्वाच्या निर्माणकर्त्याने दिलेल्या पुढील अभिवचनावर आधारलेली आहे: “परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल.” (यश. ११:९) लवकरच अशी वेळ येत आहे, जेव्हा पृथ्वीवर असलेल्या सर्वांना देवाकडून शिक्षण मिळेल. आणि ते बक्षीस मिळवण्यासाठी आज आपण जे काही प्रयत्न करू ते मुळीच व्यर्थ ठरणार नाहीत. तेव्हा, यहोवाने तुम्हाला जे अभिवचन दिलं आहे ते नेहमी आठवणीत ठेवा. आणि, कोणत्याही गोष्टीमुळे आपलं बक्षीस गमावू नका!