व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगाची विचारसरणी नाकारा

जगाची विचारसरणी नाकारा

जगातलं “तत्त्वज्ञान व निरर्थक अशा फसव्या गोष्टी सांगून कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये, म्हणून सांभाळा.”—कलस्सै. २:८.

गीत क्रमांक: २३, २६

१. पौलने कलस्सैकर मंडळीला पत्रात काय लिहिलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

इ.स. ६०-६१ मध्ये, पौल रोममधल्या तुरुंगात होता तेव्हा त्याने कलस्सैकर मंडळीला एक पत्र लिहिलं. या पत्रात त्याने त्यांना हे समजावून सांगितलं, की “आध्यात्मिक समज” मिळवणं इतकं महत्त्वाचं का आहे. आध्यात्मिक समज म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत यहोवासारखा दृष्टिकोन बाळगणं. (कलस्सै. १:९) पौल म्हणाला: “कोणीही तुम्हाला मन वळवणारे तर्क करून बहकवू नये, म्हणून मी हे सांगत आहे. ख्रिस्तानुसार नसलेले, तर मानवी परंपरांनुसार व जगाच्या प्राथमिक गोष्टींनुसार असलेले तत्त्वज्ञान व निरर्थक अशा फसव्या गोष्टी सांगून कोणीही तुम्हाला कैद करून घेऊन जाऊ नये, म्हणून सांभाळा.” (कलस्सै. २:४, ८) त्यानंतर पत्रात पौलने हे समजावून सांगितलं, की जगातल्या काही लोकप्रिय कल्पना चुकीच्या का आहेत, आणि चुकीच्या असल्या तरी लोकांना त्या का आवडतात. उदाहरणार्थ, जगात अशा काही कल्पना आहेत ज्यांमुळे लोकांना वाटतं की ते इतरांपेक्षा अधिक बुद्धिमान किंवा श्रेष्ठ आहेत. जगाची ही चुकीची विचारसरणी नाकारण्यास आणि जगातल्या चालीरीतींपासून दूर राहण्यास आपल्या ख्रिस्ती बांधवांना मदत व्हावी म्हणून पौलने त्यांना हे पत्र लिहिलं.—कलस्सै. २:१६, १७, २३.

२. या लेखात आपण जगाच्या विचारसरणीची काही उदाहरणं का पाहणार आहोत?

जगातल्या लोकांसारखी विचारसरणी बाळगणारे लोक यहोवाच्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करतात. आणि आपण काळजी घेतली नाही, तर हळूहळू त्यांच्या विचारसरणीचा आपल्यावरही प्रभाव पडून देवावरचा आपला विश्वास कमकुवत होऊ शकतो. आज टीव्ही-इंटरनेटच्या माध्यमातून, किंवा शाळा व कामाच्या ठिकाणी आपल्यापैकी प्रत्येकावर जगाच्या चुकीच्या विचारसरणीचा भडिमार होत असतो. मग, हा वाईट प्रभाव टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? या लेखात आपण जगाच्या विचारसरणीची पाच उदाहरणं पाहू. तसंच ही विचारसरणी आपल्याला कशी नाकारता येईल हेही आपण शिकू.

देव आहे हे मानण्याची गरज आहे का?

३. अनेकांना कोणता विचार आवडतो आणि का?

“देवाला न मानताही मी एक चांगली व्यक्ती बनू शकते,” असं म्हणणारे लोक अनेक देशांमध्ये सर्रासपणे पाहायला मिळतात. देव खरोखर अस्तित्वात आहे की नाही यावर कदाचित त्यांनी खोल विचार केलेला नसेल. पण काहीही करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे ही भावना कदाचित त्यांना हवीहवीशी वाटत असेल. (स्तोत्र १०:४ वाचा.) तर काहींना वाटतं, की “देवाला न मानताही आपण एक चांगलं नैतिक जीवन जगू शकतो” असं म्हटल्याने आपण फार बुद्धिमान आहोत हे दिसून येईल.

४. ‘विश्वाचा कोणी निर्माणकर्ता नाही’ असं मानणाऱ्या व्यक्तीसोबत आपण कसा तर्क करू शकतो?

‘या विश्वाचा कोणी निर्माणकर्ता नाही,’ असा विचार करणं तर्कशुद्ध आहे का? या प्रश्‍नाचं उत्तर मिळवण्यासाठी काही लोक विज्ञानाकडे वळतात, तेव्हा ते गोंधळून जातात. पण मुळात, याविषयीचं सत्य अगदी सरळ आणि सोपं आहे. उदाहरणार्थ, एखादं घरं आपोआप उभं राहतं का? नाही! कोणालातरी ते बांधावं लागतं. आणि घरापेक्षा जैविक सृष्टीची रचना तर कितीतरी जास्त जटिल आहे. सजीवांमधली सगळ्यात साधी पेशीसुद्धा स्वतःपासून दुसरी पेशी तयार करू शकते. पण घर असं करू शकतं का? नाही. याचाच अर्थ, पेशीमध्ये माहिती साठवण्याची आणि ती माहिती नवीन पेशीला देण्याची क्षमता असते. यामुळे नवीन पेशीसुद्धा स्वतःसारख्या इतर पेशी तयार करू शकतात. अद्‌भुत क्षमता असलेल्या या पेशी कोणी तयार केल्या? याचं उत्तर बायबल देतं: “प्रत्येक घर कोणी ना कोणी बांधलेले असते, पण ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या तो देव आहे.”—इब्री ३:४.

५. ‘चांगलं काय आणि वाईट काय हे समजण्यासाठी देवाला मानण्याची गरज नाही,’ या जगाच्या विचाराबद्दल काय म्हणता येईल?

‘चांगलं काय आणि वाईट काय हे समजण्यासाठी देवाला मानण्याची गरज नाही,’ असं जे म्हणतात त्यांच्याशी आपण कसा तर्क करू शकतो? देवाचं वचन आपल्याला सांगतं, की जे लोक देवावर विश्वास ठेवत नाहीत त्यांनासुद्धा काही चांगली तत्त्वं माहीत असतात. (रोम. २:१४, १५) उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती कदाचित तिच्या आईवडिलांचा आदर करत असेल आणि त्यांच्यावर प्रेम करत असेल. पण, बऱ्या-वाईटाचे स्तर ठरवणाऱ्या निर्माणकर्त्याला जर ती व्यक्ती मानत नसेल, तर नैतिकतेबद्दल तिचे स्तर कितपत योग्य असतील? (याको. ४:१२क) आज जगातल्या अनेक विद्वान लोकांना याची खातरी पटली आहे, की जगातल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला देवाच्याच मदतीची गरज आहे. (यिर्मया १०:२३ वाचा.) त्यामुळे, ‘चांगलं काय आणि वाईट काय हे समजण्यासाठी देवाला मानण्याची व त्याच्या स्तरांचं पालन करण्याची गरज नाही,’ असा विचार आपण कधीही करू नये.—स्तो. १४६:३.

आपल्याला धर्माची गरज आहे का?

६. आज धर्माबद्दल अनेकांचं काय मत आहे?

“आपण धर्माशिवायही आनंदी राहू शकतो.” अनेक लोकांना वाटतं की, धर्म कंटाळवाणा आहे आणि त्याला काहीच अर्थ नाही. तसंच, काही धर्म नरकाग्नीची शिकवण देतात, दान देण्याची जबरदस्ती करतात किंवा राजकारणाला पाठिंबा देतात. त्यामुळे, ‘आम्ही धर्माशिवायही आनंदी आहोत!’ असं म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. अशा प्रकारचे लोक कदाचित असंही म्हणतील की, ‘देवावर आमची श्रद्धा आहे, पण आम्हाला कोणत्याही धर्माचा भाग व्हायचं नाही.’

७. खऱ्या उपासनेमुळे आनंद कसा मिळतो?

मग, धर्माशिवाय आपण खरंच आनंदी राहू शकतो का? हो, खोट्या धर्माशिवाय आपण नक्कीच आनंदी राहू शकतो. पण, ‘आनंदी देवाचे,’ यहोवाचे मित्र बनल्याशिवाय आपल्याला जीवनात खरा आनंद मिळू शकत नाही. (१ तीम. १:११) यहोवा जे काही करतो ते इतरांच्या भल्यासाठीच करतो. आणि त्याचे सेवक असल्यामुळे आपणही आनंदी आहोत. कारण, आपणसुद्धा इतरांना मदत करण्याचे मार्ग शोधत असतो. (प्रे. कार्ये २०:३५) उदाहरणार्थ, खऱ्या उपासनेमुळे कुटुंबांना आनंदी राहण्यास कशी मदत होते याचा विचार करा. आपण विवाह जोडीदाराशी विश्वासू राहायला आणि एकमेकांचा आदर करायला शिकतो. तसंच, मुलांनाही आदर करायला शिकवतो आणि कुटुंबातल्या सदस्यांवर मनापासून प्रेम करतो. याशिवाय, खरी उपासना यहोवाच्या लोकांना मंडळीत शांतीने एकत्रितपणे काम करण्यास आणि एकमेकांना खरं प्रेम दाखवण्यास मदत करते.—यशया ६५:१३, १४ वाचा.

८. जीवनात खरा आनंद कोणत्या गोष्टीमुळे मिळू शकतो हे समजण्यास मत्तय ५:३ हे वचन आपल्याला कशी मदत करतं?

एखादी व्यक्ती देवाची सेवा न करता खरोखर आनंदी राहू शकते का? पुढील गोष्टीवर विचार करा: आज लोकांना कशातून आनंद मिळतो? काही जणांना करियर, खेळ किंवा छंद यांतून आनंद मिळतो. तर इतरांना आपल्या कुटुंबीयांची आणि मित्रपरिवाराची काळजी घेण्यात समाधान मिळतं. हे खरं आहे, की या गोष्टींतून काही प्रमाणात आनंद आणि समाधान मिळतं. पण जीवनात आणखीनही बरंच काही आहे. आपली निर्मिती ही प्राण्यांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे आपण निर्माणकर्त्याला जाणून घेऊ शकतो आणि त्याची उपासना करू शकतो. या गोष्टींमधून आनंद मिळावा अशाच प्रकारे देवाने आपल्याला बनवलं आहे. (मत्तय ५:३ वाचा.) उदाहरणार्थ, यहोवाची उपासना करण्यासाठी आपण जेव्हा बंधुभगिनींसोबत एकत्र येतो, तेव्हा आपल्याला आनंद होतो आणि उत्तेजन मिळतं. (स्तो. १३३:१) तसंच, जगव्याप्त बंधुसमाजाचा भाग असल्यामुळे, शुद्ध नैतिक जीवन जगल्यामुळे आणि एका सुंदर भविष्याची आशा असल्यामुळेही आपण आनंदी आहोत.

आपल्याला नैतिक मूल्यांची गरज आहे का?

९. (क) लैंगिक संबंधांबद्दल जगातल्या लोकांचा कसा दृष्टिकोन आहे? (ख) विवाहाबाहेर लैंगिक संबंध ठेवणं चुकीचं आहे असं देवाचं वचन का सांगतं?

“विवाहाबाहेर लैंगिक संबंध ठेवण्यात काय गैर आहे?” जगातले लोक कदाचित म्हणतील, की “तुम्ही लोक इतकं काटोकोरपणे का नियम पाळता? फक्त जीवनाचा आनंद लुटा.” पण देवाचं वचन आपल्याला अनैतिक लैंगिक कृत्यांपासून दूर राहण्याचा इशारा देतं. * (१ थेस्सलनीकाकर ४:३-८ वाचा.) आपल्यासाठी नैतिकतेचे स्तर ठरवण्याचा अधिकार यहोवाला आहे, कारण त्यानेच आपल्याला निर्माण केलं आहे. ज्या स्त्री-पुरुषाचं एकमेकांसोबत लग्न झालं आहे, केवळ तेच एकमेकांसोबत लैंगिक संबंध ठेवू शकतात असं देवाचं वचन आपल्याला सांगतं. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि त्यामुळे त्याने आपल्याला हे नियम दिले आहेत. या नियमांचं पालन केल्यामुळे मानवांचं जीवन अधिक चांगलं होऊ शकतं हे यहोवाला माहीत आहे. जी कुटुंबं देवाने दिलेल्या आज्ञांचं पालन करतात, त्यांमध्ये आदर आणि प्रेम अधिक प्रमाणात दिसून येतं; तसंच अशा कुटुंबांना सुरक्षित वाटतं. पण याउलट, यहोवाच्या आज्ञा व स्तर माहीत असूनही जे लोक त्यांचं उल्लंघन करतात त्यांचा न्याय यहोवा करेल.—इब्री १३:४.

१०. ख्रिस्ती व्यक्ती अनैतिक लैंगिक कृत्यांपासून स्वतःला दूर कसं ठेवू शकते?

१० अनैतिक लैंगिक कृत्यांपासून आपण दूर कसं राहू शकतो, हे बायबल आपल्याला शिकवतं. असं करण्याचा एक महत्त्वपूर्ण मार्ग म्हणजे, आपण ज्या गोष्टी पाहतो त्यांवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे. येशूने म्हटलं: “जो कोणी एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहत राहतो त्याने केव्हाच आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केला आहे. म्हणून जर तुझा उजवा डोळा तुला अडखळायला लावत असेल, तर तो उपटून टाक आणि फेकून दे.” (मत्त. ५:२८, २९) त्यामुळे आपण पोर्नोग्राफी आणि अश्‍लील संगीतापासून दूर राहिलं पाहिजे. पौलने लिहिलं: “अनैतिक लैंगिक कृत्ये . . . यांसारख्या गोष्टी उत्पन्न करणाऱ्या पृथ्वीवरील आपल्या शरीराच्या अवयवांना मारून टाका.” (कलस्सै. ३:५) तसंच, आपण जे काही बोलतो आणि विचार करतो त्यावरही आपलं नियंत्रण असलं पाहिजे.—इफिस. ५:३-५.

जगात करियर करण्यावर लक्ष केंद्रित करावं का?

११. चांगलं करियर आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे असं आपल्याला का वाटू शकतं?

११ “चांगलं करियर केलं तर तुम्ही आनंदी व्हाल.” अनेक जण कदाचित तुम्हाला सांगतील, की करियर करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. खासकरून असं करियर ज्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी, श्रीमंती आणि अधिकार मिळू शकेल. चांगलं करियर आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे असं अनेकांना वाटत असल्यामुळे, त्यांच्या या विचारसरणीचा आपल्यावरही प्रभाव पडू शकतो.

१२. चांगलं करियर केल्यामुळे तुम्ही आनंदी होऊ शकता का?

१२ प्रसिद्धी किंवा अधिकार मिळवून देणारं करियर केल्याने तुम्ही खरोखर आनंदी व्हाल का? नाही. सैतानाचं उदाहरण घ्या. त्याला प्रसिद्धी आणि अधिकार मिळवायचा होता. आणि एका अर्थाने त्याला तो मिळालाही. पण आनंदी होण्याऐवजी तो अतिशय क्रोधित झाला आहे. (मत्त. ४:८, ९; प्रकटी. १२:१२) याउलट, आपण इतरांना देवाविषयी आणि त्याने दिलेल्या अभिवचनाविषयी शिकवत असल्यामुळे किती आनंदी आहोत याचा विचार करा. जगातलं कोणतंही करियर असा आनंद देऊ शकत नाही. शिवाय, चांगल्या करियरच्या मागे धावताना लोक स्पर्धात्मक, रागीट किंवा इतरांचा हेवा करणारे बनतात. आणि इतकं सगळं करूनही जीवनात त्यांना समाधान मिळत नाही. अशा लोकांविषयी बायबल सांगतं, की ते “व्यर्थ व वायफळ उद्योग” करतात.—उप. ४:४.

१३. (क) नोकरी-व्यवसायाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असला पाहिजे? (ख) पौलला खरा आनंद कशामुळे मिळाला?

१३ हे खरं आहे, की आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला काम करण्याची गरज आहे. आणि आपल्या आवडीचं काम निवडणं चुकीचं नाही. पण आपलं काम किंवा नोकरी ही आपल्या जीवनातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाही. येशूने म्हटलं: “कोणीही दोन मालकांची सेवा करू शकत नाही; कारण तो एकतर एका मालकाचा द्वेष करेल आणि दुसऱ्यावर प्रेम करेल; किंवा एका मालकाशी एकनिष्ठ राहून दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तुम्ही एकाच वेळी देवाची आणि धनाची सेवा करू शकत नाही.” (मत्त. ६:२४) यहोवाची सेवा केल्याने आणि इतरांना बायबलचं सत्य शिकवल्याने जीवनात खरा आनंद मिळतो. प्रेषित पौलने स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला. तरुण असताना त्याने चांगलं करियर करण्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. पण नंतर, लोकांना देवाचं वचन शिकवल्याने त्यांच्या जीवनात होणारा बदल पाहून तो खऱ्या अर्थाने आनंदी झाला. (१ थेस्सलनीकाकर २:१३, १९, २० वाचा.) यहोवाची सेवा केल्यामुळे आणि इतरांना देवाविषयीचं सत्य शिकवल्यामुळे जो आनंद मिळतो, तो जगातल्या कोणत्याही करियरमुळे मिळू शकत नाही.

आपण इतरांना देवाबद्दल शिकण्यास मदत करतो तेव्हा आनंदी होतो (परिच्छेद १२-१३ पाहा)

जगातल्या समस्या आपण सोडवू शकतो का?

१४. जगातल्या समस्या मानव सोडवू शकतात, हा विचार अनेक जणांना का पटतो?

१४ “जगातल्या समस्या मानवच सोडवू शकतात,” हा विचार अनेकांना पटतो. कारण, तसं जर झालं तर मानवांना देवाच्या मार्गदर्शनाची गरज पडणार नाही आणि मग मनाला वाटेल तसं त्यांना वागता येईल. तुम्ही कदाचित लोकांना असं बोलताना ऐकलं असेल, की युद्ध, गुन्हेगारी, आजारपण आणि गरिबी यांसारख्या समस्या कमी होत चालल्या आहेत. एक अहवाल असंही म्हणतो: “आज मानवाने खूप प्रगती केली आहे. यामागचं कारण म्हणजे, मानवाने हे जग सुधारण्याचा निर्धार केला आहे.” पण, हे विधान खरं आहे का? जगातल्या समस्या कशा सोडवाव्यात याचं उत्तर मानवांना खरंच सापडलं आहे का? वस्तुस्थिती काय आहे ते आपण पाहू या.

१५. जगातल्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे असं आपण कशावरून म्हणू शकतो?

१५ युद्ध: पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान ६ कोटीपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले. केवळ २०१५ मध्ये, युद्धामुळे किंवा छळामुळे १ कोटी २४ लाख लोकांना आपली घरं सोडून दुसरीकडे स्थलांतर करावं लागलं. आणि आजवर विस्थापित झालेल्या लोकांची एकूण संख्या ६ कोटी ५ लाख इतकी आहे. गुन्हेगारी: काही भागांमध्ये गुन्हेगारीचे थोडेफार प्रकार कमी झाले आहेत. पण गुन्हेगारीचे दुसरे प्रकार मात्र वाढले आहेत. जसं की, सायबर गुन्हे, कौटुंबिक हिंसाचार, आतंकवाद आणि भ्रष्टाचार. आजारपण: हे खरं आहे, की काही रोगांवर मानवांना उपाय सापडले आहेत. पण, २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेला एक अहवाल सांगतो, की दर वर्षी वयाच्या साठ वर्षांखाली असलेले ९० लाख लोक हृदयरोग, पक्षाघात, कॅन्सर, श्वसनाशी संबंधित असलेले रोग, आणि डायबेटिज यांमुळे मृत्युमुखी पडतात. गरीबी: वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार एकट्या आफ्रिका खंडात दारिद्र्य-रेषेखाली राहणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत अनेक पटींनी वाढली आहे. १९९० मध्ये ही संख्या २८ कोटी होती, तर २०१२ मध्ये ती वाढून ३३ कोटी झाली आहे.

१६. (क) जगातल्या सर्व समस्या केवळ देवाचं राज्यच का सोडवू शकतं? (ख) देवाचं राज्य काय करेल याबद्दल यशया आणि स्तोत्रकर्त्याने काय सांगितलं?

१६ वरील आकडेवारी पाहून आपल्याला आश्चर्य वाटत नाही. कारण, आजच्या आर्थिक आणि राजकीय संघटनांवर स्वार्थी लोकांचं नियंत्रण आहे. हे लोक जगातून युद्ध, गुन्हे, आजारपण आणि गरिबी काढून टाकू शकत नाहीत. ही गोष्ट फक्त देवाचं राज्यच करू शकतं. यहोवा देव मानवजातीसाठी काय करेल याचा विचार करा. त्याचं राज्य युद्धाला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी काढून टाकेल. जसं की, स्वार्थीपणा, भ्रष्टाचार, देशभक्ती, खोटा धर्म, आणि सैतानालासुद्धा. (स्तो. ४६:८, ९) देवाचं राज्य गुन्हेगारीचा समूळ नाश करेल. आजसुद्धा देवाचं राज्य लाखो लोकांना एकमेकांवर प्रेम करायला आणि भरवसा ठेवायला शिकवत आहे. देवाच्या राज्याशिवाय कोणतंही सरकार हे करू शकत नाही. (यश. ११:९) यहोवा देव लवकरच आजार काढून टाकेल आणि सर्व लोकांना परिपूर्ण आरोग्य देईल. (यश. ३५:५, ६) तो गरिबीसुद्धा काढून टाकेल आणि सर्वांना एक आनंदी जीवन मिळवण्यास आणि त्याच्यासोबत चांगला नातेसंबंध जोडण्यास मदत करेल. या सर्व गोष्टी कोणत्याही प्रकारच्या धनसंपत्तीपेक्षा कितीतरी पटींनी अधिक मौल्यवान आहेत.—स्तो. ७२:१२, १३.

“प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे” याचा आधीच विचार करा

१७. जगाची विचारसरणी तुम्ही कशी नाकारू शकता?

१७ तुमच्या विश्वासाची परीक्षा पाहणारी जगातली एखादी लोकप्रिय कल्पना तुम्ही ऐकली, तर त्याविषयी बायबल काय सांगतं यावर संशोधन करा. तसंच, त्याबद्दल एखाद्या प्रौढ ख्रिस्ती बांधवाशी किंवा बहिणीशी बोला. लोकांना ती कल्पना का आवडते, ती चुकीची का आहे आणि तुम्ही ती कशी नाकारू शकता याचा विचार करा. पौलने जे सांगितलं त्याचं पालन केल्यामुळे जगाच्या विचारसरणीपासून आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. पौल म्हणाला: “बाहेरच्यांशी सुज्ञपणे वागा . . . म्हणजे प्रत्येकाला कसे उत्तर द्यावे हे तुम्हाला समजेल.”—कलस्सै. ४:५, ६.

^ परि. 9 बायबलच्या काही भाषांतरांत, योहान ७:५३ ते ८:११ या वचनापर्यंत आढळणारा मजकूर, खरंतर मूळ शास्त्रवचनांचा भाग नव्हता. काही जण ही वचनं वाचून असा चुकीचा अर्थ काढतात, की ज्या व्यक्तीने कधीही पाप केलं नाही केवळ तीच व्यक्ती अनैतिक लैंगिक कृत्य केलेल्या व्यक्तीचा न्याय करू शकते. पण, देवाने इस्राएली लोकांना जे नियम दिले होते त्यात त्याने सांगितलं होतं: “एखादा पुरुष एखाद्या विवाहित स्त्रीबरोबर व्यभिचार करत असताना आढळला, तर त्या दोघांना ठार मारावे.”—अनु. २२:२२, सुबोधभाषांतर.