व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नवीन मंडळीशी कसं जुळवून घेता येईल?

नवीन मंडळीशी कसं जुळवून घेता येईल?

अॅलन त्याच्या घरापासून १,४०० किलोमीटर दूर असलेल्या एका ठिकाणी राहायला गेला आणि तिथल्या मंडळीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो म्हणतो: “या मंडळीत येताना मनात थोडीशी भीती होती. इथं मला नवीन मित्र मिळतील की नाही, अशी काळजी वाटत होती.” *

तुम्ही जर एखाद्या नवीन ठिकाणी राहायला गेला असाल, तर तिथल्या मंडळीशी जुळवून घेताना तुम्हालाही कदाचित असंच वाटत असेल. नवीन मंडळीशी जुळवून घेण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते? तसंच, मंडळीशी जुळवून घेणं तुम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त अवघड जात असेल, तर काय? किंवा मग, मंडळीत आलेल्या नवीन बंधुभगिनींना मंडळीशी जुळवून घेण्यासाठी तुम्ही कशी मदत करू शकता?

जुळवून घेणं आणि जोमानं वाढणं

या उदाहरणाचा विचार करा: एखादं झाड काढून दुसरीकडे लावलं जातं, तेव्हा नवीन वातावरणाशी जुळवून घेणं त्याला कठीण जातं. झाड जमिनीतून काढताना त्याची खोलवर पसरलेली बहुतेक मुळं कापून टाकावी लागतात. पण नवीन ठिकाणी लावल्यावर झाडानं लगेच मूळ धरणं गरजेचं असतं. त्याच प्रकारे दुसऱ्या मंडळीत गेल्यावर कदाचित तुमच्याही मनावर ताण आला असेल. कारण, तुमच्या आधीच्या मंडळीत तुम्ही नक्कीच अनेक मित्र जोडले असतील आणि तिथल्या आध्यात्मिक नित्यक्रमाची तुम्हाला सवय झाली असेल. त्यामुळे एका अर्थाने त्या मंडळीत तुमची “मुळं” खोलवर रुजलेली होती. पण आता एका नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि आध्यात्मिक रीत्या जोमाने वाढण्यासाठी तुम्हाला नव्याने “मुळं” रुजवावी लागतील. त्यासाठी बायबलच्या तत्त्वांचं पालन केल्यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते. त्यांतली काही तत्त्वं आता आपण पाहू.

जो नियमितपणे देवाचं वचन वाचतो, तो अशा एका झाडासारखा आहे, “जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत . . . आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.”स्तो. १:१-३.

मजबूत राहण्यासाठी झाडाला पाणी शोषून घेण्याची गरज असते. त्याचप्रमाणे आध्यात्मिक रीत्या मजबूत राहण्यासाठी एका ख्रिस्ती व्यक्तीने नियमितपणे देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामुळे दररोज बायबल वाचा, नियमितपणे सभांना उपस्थित राहा. तसंच, कौटुंबिक उपासना आणि व्यक्तिगत अभ्यासही चुकवू नका. आध्यात्मिक रीत्या मजबूत राहण्यासाठी तुम्ही आधी ज्या गोष्टी करत होता, त्याच गोष्टी नवीन मंडळीत आल्यानंतरही करत राहा.

“जो इतरांना उत्तेजन देतो त्याला स्वतःला उत्तेजन मिळेल.”नीति. ११:२५, मराठी कॉमन लँग्वेज.

क्षेत्र सेवेत मनापासून सहभाग घेतल्यामुळे तुम्ही उत्साही व्हाल आणि नवीन परिस्थितीशी लवकर जुळवून घ्यायलाही तुम्हाला मदत होईल. केविन नावाचे मंडळीतले एक वडील म्हणतात: “नवीन मंडळीत आल्या-आल्या सहायक पायनियर सेवा सुरू केल्यामुळे मला आणि माझ्या पत्नीला खूप मदत झाली. त्यामुळे इथल्या बंधुभगिनींशी आणि पायनियरांशी आमची ओळख झाली. तसंच, क्षेत्र कसं आहे याची कल्पनाही आम्हाला आली.” रॉजर नावाचा आणखी एक बांधव त्याच्या घरापासून १,६०० किलोमीटर दूर असलेल्या एका मंडळीत सेवा करत आहे. तो म्हणतो: “मंडळीशी जुळवून घेण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, शक्य तितकं प्रचाराला जाणं. तसंच, मंडळीत कुठलंही काम करायचं असेल तर ते करण्यास तुम्ही तयार असाल, हे मंडळीतल्या वडिलांना आधीच सांगून ठेवा. जसं की, सभागृहाची स्वच्छता करणं, कोणी आलं नाही तर त्यांचं भाषण देणं किंवा सभेला येण्यासाठी एखाद्याला मदतीची गरज असल्यास त्याला मदत करणं. तुमची ही निःस्वार्थ मनोवृत्ती पाहून मंडळीतले बंधुभगिनी लवकरच तुम्हाला आपलंसं करतील.”

“तुमची मने मोठी करा.”२ करिंथ. ६:१३.

मन मोठं करून मंडळीतल्या सर्व बंधुभगिनींना प्रेम दाखवा. मेलिसा आपल्या कुटुंबासोबत नवीन मंडळीत गेली, तेव्हा तिने आणि तिच्या कुटुंबाने नवीन मित्र बनवण्याकडे लक्ष दिलं. ती म्हणते: “आम्ही सभेच्या आधी आणि नंतर सर्व बंधुभगिनींना भेटायचो. त्यामुळे फक्त नमस्ते म्हणण्याच्या पलीकडे आम्हाला त्यांच्याशी गप्पा मारता आल्या.” असं केल्यामुळे मेलिसाला आणि तिच्या कुटुंबाला बंधुभगिनींची नावं लवकर लक्षात ठेवण्यास मदत मिळाली. शिवाय पाहुणचार दाखवल्यामुळे त्यांची मैत्री आणखी पक्की झाली. मेलिसा म्हणते: “सेवाकार्यासाठी व इतर गोष्टींसाठी संपर्क करता यावा म्हणून आम्ही एकमेकांचे फोन नंबरही घेतले.”

नवीन लोकांना भेटण्याच्या विचाराने जर तुमच्या मनावर दडपण येत असेल, तर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींनी सुरुवात करू शकता. जसं की, इतरांशी बोलण्याची इच्छा नसली, तरी सुरुवातीला तुम्ही फक्त स्मितहास्य करू शकता. असं केल्यामुळे इतरांना तुमच्याशी मैत्री करणं सोपं जाईल. बायबल म्हणतं: “जो माणूस हसतो तो इतरांना आनंद देतो.” (नीति. १५:३०, ईझी टू रीड व्हर्शन) रेचल ही बहीण जिथं लहानाची मोठी झाली होती तिथून दूर असलेल्या एका ठिकाणी राहायला गेली. ती म्हणते, “मी जास्त बोलत नाही. म्हणून नवीन मंडळीतल्या बंधुभगिनींशी बोलायला मला खूप प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे सभागृहात कोणी एकटं बसलेलं आहे का, ते मी पाहते आणि त्या व्यक्तीशी जाऊन बोलते. कदाचित ती व्यक्तीसुद्धा माझ्यासारखीच लाजाळू असेल.” तुम्हीसुद्धा, प्रत्येक सभेच्या आधी किंवा नंतर एका नवीन बंधू किंवा भगिनीशी बोलण्याचं ध्येय ठेवू शकता का?

सुरुवातीच्या काही आठवड्यांमध्ये नवीन लोकांना भेटण्यासाठी तुम्ही कदाचित खूप उत्साही असाल. पण काही काळानंतर मात्र “नव्याची नवलाई” संपू शकते. त्यामुळे नवीन मित्र बनवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागतील.

एखादं झाड काढून दुसरीकडे लावलं जातं, तेव्हा नवीन वातावरणाशी जुळवून घेणं त्याला कठीण जातं. पण लवकरच ते मूळ धरतं

जुळवून घेण्यासाठी स्वतःला वेळ द्या

इतर झाडांच्या तुलनेत काही झाडांना नवीन वातावरणात मूळ धरण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. त्याचप्रमाणे एखाद्या नवीन मंडळीशी जुळवून घेताना काही बंधुभगिनींना इतरांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. तुम्हाला जर नवीन ठिकाणी येऊन बराच काळ झाला असेल आणि मंडळीशी जुळवून घ्यायला अवघड जात असेल, तर बायबलची ही तत्त्वं तुम्हाला मदत करू शकतात:

“आपण हिंमत हारून चांगले ते करत राहण्याचे सोडू नये; कारण जर आपण खचून गेलो नाही, तर योग्य वेळी आपल्या पदरी पीक पडेल.”गलती. ६:९.

जुळवून घेण्यासाठी तुम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल, तर तो द्या. गिलियड प्रशिक्षण घेतलेल्या मिशनरींचं उदाहरण विचारात घ्या. त्यांपैकी अनेक जण मायदेशी भेट द्यायला जाण्याआधी आपल्या परदेशातल्या नेमणुकीत अनेक वर्षं सेवा करतात. त्यामुळे तिथल्या बंधुभगिनींशी मैत्री करणं आणि संस्कृतीशी जुळवून घेणं त्यांना सोपं जातं.

अलेहान्द्रो हा बांधव बऱ्याच वेळा वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेला आहे. त्यामुळे नवीन मंडळीशी जुळवून घेणं ही काही पटकन होण्यासारखी गोष्ट नाही, हे तो स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. तो म्हणतो: “आम्ही नवीन ठिकाणी गेलो तेव्हा माझी पत्नी म्हणाली होती, की ‘माझ्या सगळ्या मैत्रिणी तर जुन्या मंडळीतच आहेत.’” त्यावर त्याने तिला आठवण करून दिली, की दोन वर्षांआगोदरही ती हेच म्हणाली होती. पण त्या दोन वर्षांत तिने इतरांमध्ये व्यक्तिगत आस्था घेतली आणि त्यामुळे अनोळखी असलेले बंधुभगिनी तिचे जवळचे मित्र बनले होते.

“पूर्वीचे दिवस आतापेक्षा का बरे होते असे विचारू नकोस कारण तुझी ही विचारपूस शहाणपणाची नाही.”उप. ७:१०, मराठी कॉमन लँग्वेज.

नवीन मंडळीची तुलना जुन्या मंडळीसोबत करण्याचं टाळा. उदाहरणार्थ, आधीच्या मंडळीतल्या बंधुभगिनींपेक्षा नवीन मंडळीतले बंधुभगिनी कदाचित फारसं बोलणारे नसतील किंवा जास्त बोलणारे असतील. तुम्हाला जसं वाटतं, की तुमच्या चांगल्या गुणांकडे त्यांनी लक्ष द्यावं, तसंच तुम्हीही त्यांच्या चांगल्या गुणांकडे लक्ष द्या. नवीन ठिकाणी आल्यामुळे, ‘आपण खरंच “संपूर्ण बंधुसमाजावर” प्रेम करतो का?’ असा पुन्हा विचार करण्यास काही जण प्रवृत्त झाले आहेत.—१ पेत्र २:१७.

“मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल.” लूक ११:९.

मदतीसाठी नेहमी प्रार्थना करा. मंडळीत सेवा करणारे एक वडील, डेव्हिड म्हणतात: “स्वतःच्या बळावर परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याच गोष्टी केवळ यहोवाच्या मदतीने करणं शक्य आहे. म्हणून प्रार्थना करा!” आधी जिचा उल्लेख करण्यात आला होता ती रेचल म्हणते: “आपण अजूनही मंडळीपासून वेगळे आहोत असं जेव्हा मला आणि माझ्या पतीला वाटतं, तेव्हा आम्ही नेमक्या त्याच गोष्टीबद्दल यहोवाला प्रार्थना करतो. आम्ही म्हणतो: ‘आमच्या वागण्या-बोलण्यात असं काही आहे का ज्यामुळे इतरांना आमच्याशी मैत्री करायला आवडत नाही? तसं काही असेल, तर ते आमच्या लक्षात आणून दे.’ आणि मग, बंधुभगिनींसोबत आम्ही जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतो.”

पालकांनो, जर तुमच्या मुलांना इतरांशी मैत्री करणं अवघड जात असेल, तर त्याबद्दल त्यांच्यासोबत मिळून प्रार्थना करा. तसंच, असं काहीतरी करा ज्यामुळे मुलांना बंधुभगिनींचा प्रोत्साहनदायक सहवास मिळेल आणि नवीन मित्रही बनवता येतील.

नवीन बंधुभगिनींना आपुलकी दाखवा

मंडळीत आलेल्या नवीन बंधुभगिनींना तुम्ही कशी मदत करू शकता? सुरुवातीपासूनच त्यांचे चांगले मित्र बनण्याचा प्रयत्न करा. आपण जर मंडळीत नवीन असतो तर इतरांनी आपल्याशी कशा प्रकारे वागावं अशी अपेक्षा आपण केली असती, याचा विचार करा आणि त्याप्रमाणे वागा. (मत्त. ७:१२) तुमच्या कौटुंबिक उपासनेसाठी किंवा दर महिन्याचा JW ब्रॉडकास्टिंग कार्यक्रम पाहण्यासाठी तुम्ही त्यांना बोलावू शकता का? तुम्ही प्रचारासाठी त्यांच्यासोबत जाऊ शकता का? तुम्ही त्यांना साध्याशा जेवणासाठी जरी बोलावलं, तरी तुमचा हा पाहुणचार ते कदाचित कधीही विसरणार नाहीत. मंडळीत आलेल्या नवीन लोकांना तुम्ही आणखी कोणत्या व्यावहारिक मार्गांनी मदत करू शकता?

कार्लोस म्हणतो: “आम्ही नवीनच मंडळीत आलो तेव्हा एका बहिणीने आम्हाला अशा काही दुकानांची यादी दिली जिथं वस्तू स्वस्त मिळतात. त्यामुळे आम्हाला खूप मदत झाली.” तुमच्या इथं राहायला आलेल्या बंधुभगिनींना हवामानाशी कसं जुळवून घ्यायचं हे सांगितल्यामुळेही फायदा होऊ शकतो. जसं की, उन्हाळ्यात, हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात कशा प्रकारचे कपडे घालावेत हे तुम्ही त्यांना सांगू शकता. तसंच, चांगल्या प्रकारे प्रचारकार्य करता यावं म्हणून तिथल्या ऐतिहासिक पार्श्‍वभूमीची आणि धार्मिक विश्वासांची माहितीही तुम्ही त्यांना देऊ शकता.

जुळवून घेणं नक्कीच फायद्याचं आहे

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या अॅलनला नवीन मंडळीत येऊन एक वर्ष होऊन गेलं आहे. तो म्हणतो: “सुरुवातीला बंधुभगिनींशी ओळख करून घेण्यासाठी मला मेहनत करावी लागली. पण आता असं वाटतं ते जणू माझं कुटुंबच आहे, आणि मी खूप आनंदी आहे.” एक गोष्ट अॅलनला कळून चुकली आहे. ती म्हणजे, नवीन मंडळीत गेल्यामुळे आपण मित्र गमावत नाही; उलट आयुष्यभर साथ देणारे नवीन मित्र मिळवतो.

^ परि. 2 काही नावं बदलण्यात आली आहेत.