व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का?

तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का?

“परमेश्वर आपल्या सेवकांच्या जिवाचा उद्धार करतो. त्याचा आश्रय धरणारा कोणीही दोषपात्र ठरत नाही.”—स्तो. ३४:२२.

गीत क्रमांक: ४९, ३२

१. वारशाने मिळालेल्या पापामुळे देवाच्या अनेक विश्वासू सेवकांना कसं वाटतं?

“माझी किती दयनीय स्थिती आहे!” असं प्रेषित पौलने म्हटलं. (रोम. ७:२४) पौलप्रमाणेच, आज देवाच्या अनेक विश्वासू सेवकांनासुद्धा दुःखी आणि निराश वाटतं. कारण, यहोवाचं मन आनंदित करण्याची आपली मनापासून इच्छा असली, तरी वारशाने मिळालेल्या पापामुळे आपण सर्वच अपरिपूर्ण आहोत. आणि म्हणूनच आपण जेव्हा यहोवाचं मन दुखावतो तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. गंभीर स्वरूपाचं पाप केलेल्या काही ख्रिश्चनांना तर असंही वाटतं, की यहोवा त्यांना कधीच माफ करणार नाही.

२. (क) देवाच्या सेवकांना दोषीपणाच्या भावनेत बुडून जाण्याची गरज नाही, हे स्तोत्र ३४:२२ वरून कसं दिसून येतं? (ख) या लेखात आपण काय शिकणार आहोत? (“ धडे की लाक्षणिक अर्थ?” ही चौकट पाहा.)

शास्त्रवचनं आपल्याला आश्वासन देतात, की यहोवाचा आश्रय घेणाऱ्यांना दोषीपणाच्या भावनेत बुडून जाण्याची गरज नाही. (स्तोत्र ३४:२२ वाचा.) पण, यहोवाचा आश्रय घेणं याचा काय अर्थ होतो? यहोवाने आपल्याला दया दाखवावी आणि क्षमा करावी असं वाटत असल्यास आपण काय केलं पाहिजे? या प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी आपण प्राचीन इस्राएलातल्या शरणपुरांच्या व्यवस्थेचं परीक्षण करू या. खरंतर, ज्या नियमशास्त्राच्या कराराधीन शरणपुरांची व्यवस्था करण्यात आली होती, त्या कराराची जागा, इ.स. ३३ मध्ये पेन्टेकॉस्टच्या दिवशी, एका दुसऱ्या कराराने घेतली. पण, मुळात ते नियमशास्त्र यहोवाने दिलं होतं. त्यामुळे, शरणपुरांच्या व्यवस्थेवरून आपल्याला हे शिकायला मिळतं, की पापाकडे, पाप करणाऱ्या व्यक्तीकडे आणि पश्‍चात्ताप करणाऱ्या व्यक्तीकडे यहोवा कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो. पण त्याआधी आपण हे पाहू, की इस्राएलमध्ये शरणपुरांची व्यवस्था का करण्यात आली होती आणि ती व्यवस्था कशी कार्य करायची?

“तुमच्याकरता शरणपुरे नेमा”

३. खून करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत इस्राएली लोकांनी काय करणं गरजेचं होतं?

यहोवाच्या दृष्टीने, इस्राएलमध्ये घडलेला कोणताही रक्तपात ही एक अतिशय गंभीर गोष्ट होती. एखाद्या इस्राएली व्यक्तीने जर कोणाचा खून केला, तर “रक्तपाताबद्दल सूड घेणाऱ्याने,” म्हणजेच मृत व्यक्तीच्या सगळ्यात जवळच्या पुरुष नातेवाइकाने, त्या व्यक्तीला जिवे मारायचे होते. (गण. ३५:१९) अशा प्रकारे, निरपराध व्यक्तीचा खून केल्याबद्दल, खून करणाऱ्या व्यक्तीला स्वतःच्या जिवाची किंमत द्यावी लागायची. खून करणाऱ्याला जर लगेच ठार मारण्यात आलं नाही, तर प्रतिज्ञात देश भ्रष्ट किंवा अपवित्र होण्याचा धोका होता. म्हणूनच यहोवाने आज्ञा दिली होती, की मनुष्याचं रक्त सांडण्याद्वारे, म्हणजेच एखाद्याला ठार मारण्याद्वारे देश “भ्रष्ट करू नका.”—गण. ३५:३३, ३४.

४. एखाद्या इस्राएली व्यक्तीच्या हातून चुकून कोणाचा खून झाल्यास काय व्हायचं?

एखाद्या इस्राएली व्यक्तीच्या हातून चुकून कोणाचा खून झाल्यास काय? खून जरी चुकून झाला असला, तरी निरपराध व्यक्तीच्या रक्तपाताबद्दल ती व्यक्ती दोषी असायची. (उत्प. ९:५) पण अशा वेळी मात्र दया दाखवण्यात यावी असं यहोवाने सांगितलं होतं. अजाणतेत खून केलेली व्यक्ती ‘सूड घेणाऱ्यापासून’ स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इस्राएलातल्या सहा शरणपुरांपैकी कोणत्याही शरणपुरात पळून जाऊ शकत होती. शरणपुरात राहण्याची परवानगी मिळल्यानंतर ती व्यक्ती सुरक्षित असायची. पण त्यासाठी तिला महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत त्या शरणपुरातच राहावं लागायचं.—गण. ३५:१५, २८.

५. शरणपुरांच्या व्यवस्थेवरून आपल्याला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?

प्राचीन इस्राएलमध्ये असलेली शरणपुरांची व्यवस्था कोणात्याही मानवाने नाही, तर स्वतः यहोवाने केली होती. त्याने यहोशवाला आज्ञा दिली: “इस्राएल लोकांना सांग, मी मोशेच्या द्वारे तुम्हाला सांगितले होते की, तुमच्याकरता शरणपुरे नेमा.” यहोवाने एका खास कारणासाठी ही शरणपुरे ‘नेमायला’ किंवा राखून ठेवायला सांगितली होती. (यहो. २०:१, २, ७, ८) शरणपुरांची ही व्यवस्था खुद्द यहोवाने लावून दिली होती. त्यामुळे या व्यवस्थेवरून यहोवाबद्दल आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. जसं की, त्यावरून यहोवाचा दयाळूपणा आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आपल्याला मदत होते. तसंच, आज आपण यहोवाचा आश्रय कसा घेऊ शकतो हेसुद्धा आपल्याला शिकायला मिळतं.

त्याने “वडील मंडळीस आपली हकीगत सांगावी”

६, ७. (क) अजाणतेत खून केलेल्या मनुष्याचा न्याय करण्यात वडिलांची काय भूमिका असायची? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) त्या मनुष्याने वडिलांशी बोलणं का गरजेचं होतं?

एका इस्राएली मनुष्याकडून अजाणतेत कोणाचा खून झाल्यास त्याला एखाद्या शरणपुरात पळून जावं लागायचं आणि नगराच्या वेशीजवळ असलेल्या “वडील मंडळीस आपली हकीगत सांगावी” लागायची; आणि तिथल्या वडिलांनी त्याचा स्वीकार करायचा होता. (यहो. २०:४) मग काही काळानंतर, ज्या नगरात त्याच्याकडून खून झाला होता त्या नगरातल्या वडिलांकडे त्याचा न्याय करण्यासाठी ते त्याला पाठवायचे. (गणना ३५:२४, २५ वाचा.) त्या वडिलांना जर दिसून आलं, की त्याच्याकडून झालेला खून हा अजाणतेत झाला होता, तर ते त्याला परत त्या शरणपुरात पाठवायचे.

पण, त्या मनुष्याने वडिलांशी बोलणं गरजेचं का होतं? कारण, त्यामुळे इस्राएलची मंडळी शुद्ध राहील याची खातरी वडील करू शकत होते. शिवाय, अजाणतेत खून केलेल्या मनुष्याला यहोवाच्या दयेचा लाभही होऊ शकत होता. एका बायबल विद्वानाने असं लिहिलं, की तो मनुष्य जर वडिलांकडे गेला नाही, तर त्याला मारून टाकलं जाऊ शकत होतं. तसंच, देवाने जे सांगितलं होतं ते न केल्यामुळे त्याच्या मृत्यूसाठी तो स्वतःच जबाबदार असणार होता असंही त्या विद्वानाने म्हटलं. एखाद्या मनुष्याच्या हातून चुकून कोणाचा खून झाल्यास, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने मदत मागणं आणि दिलेली मदत स्वीकारणं खूप गरजेचं होतं. त्याने जर एखाद्या शरणपुरात धाव घेतली नाही, तर मृत व्यक्तीचा सगळ्यात जवळचा नातेवाईक त्याला ठार मारू शकत होता.

८, ९. गंभीर पाप केलेल्या ख्रिश्चनाने त्याबद्दल वडिलांशी का बोललं पाहिजे?

आज, गंभीर स्वरूपाचं पाप केलेल्या ख्रिश्चनाला यहोवासोबत पुन्हा चांगला नातेसंबंध जोडता यावा, म्हणून त्याने मंडळीच्या वडिलांशी बोलणं गरजेचं आहे. पण, असं करणं इतकं महत्त्वाचं का आहे? पहिली गोष्ट म्हणजे, गंभीर पापांचा न्याय करण्यासाठी मंडळीत वडिलांची जी व्यवस्था करण्यात आली आहे ती खुद्द यहोवाने केली आहे. (याको. ५:१४-१६) दुसरं म्हणजे, यहोवाने लावून दिलेल्या या व्यवस्थेमुळे पश्‍चात्ताप केलेल्या व्यक्तीला पुन्हा देवाची स्वीकृती मिळवण्यास आणि ते पाप पुन्हा न करण्यास मदत मिळू शकते. (गलती. ६:१; इब्री १२:११) आणि तिसरी गोष्ट म्हणजे, पश्‍चात्ताप केलेल्या व्यक्तीला यहोवाच्या दयाळूपणाचं आश्वासन देण्यासाठी आणि तिच्या मनावरचा दुःखाचा व दोषीपणाचा भार हलका करण्यासाठीच वडिलांना नियुक्त व प्रशिक्षित केलं जातं. असे वडील “वादळापासून निवारा” आहेत असं यहोवा म्हणतो. (यश. ३२:१, २) खरंच, मंडळीतल्या या व्यवस्थेवरून यहोवाचा दयाळूपणाच दिसून येत नाही का?

वडिलांशी बोलल्यामुळे आणि त्यांची मदत स्वीकारल्यामुळे मन किती हलकं होतं हे देवाच्या अनेक सेवकांनी स्वतः अनुभवलं आहे. डॅनिएल नावाच्या एका बांधवाचं उदाहरण घ्या. त्याने एक गंभीर पाप केलं होतं. पण, त्याबद्दल कित्येक महिने तो मंडळीच्या वडिलांशी बोलला नाही. तो म्हणतो: “इतका वेळ निघून गेल्यावर आता वडील मला मदत करू शकणार नाहीत असं मला वाटत होतं.” पण, आपण केलेलं पाप कधी ना कधी उघड होईल याची त्याला सतत भीती वाटायची. शिवाय प्रत्येक वेळी प्रार्थना करताना, केलेल्या पापाबद्दल यहोवाला क्षमा मागूनच प्रार्थना केली पाहिजे असं त्याला वाटायचं. पण शेवटी, तो वडिलांशी बोलला आणि त्याने त्यांची मदत घेतली. आज मागे वळून पाहताना तो म्हणतो: “वडिलांशी बोलण्याआधी मी खरंच खूप घाबरलो होतो. पण त्यांच्याशी बोलल्यानंतर मला असं वाटलं, जणू कोणीतरी माझ्या मनावरचं मोठं ओझं हलकं केलं आहे.” डॅनिएल आता यहोवाशी पुन्हा मनमोकळेपणाने बोलू शकतो; आणि आधीसारखा आता त्याचा विवेकही त्याला बोचत नाही. शिवाय, अलीकडेच तो एक सहायक सेवकसुद्धा बनला आहे.

त्याने “अशा एखाद्या नगरात पळून” जावं

१०. अजाणतेत खून केलेल्या मनुष्याने क्षमा मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं होतं?

१० अजाणतेत खून केलेल्या मनुष्याने क्षमा मिळवण्यासाठी लगेच जवळच्या शरणपुरात पळून जाणं गरजेचं होतं. (यहोशवा २०:४ वाचा.) स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने शरणपुराकडे धाव घेणं आणि महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत तिथेच राहणं आवश्यक होतं. जीव वाचवण्यासाठी पळून जाणाऱ्या मनुष्याच्या दृष्टीनं हा नक्कीच एक मोठा त्याग होता. त्याला आपला काम-धंदा, आपलं आरामदायी घर आणि प्रवास करण्याचं स्वातंत्र्य गमवावं लागायचं. * (गण. ३५:२५) पण, असं करणं त्याच्याच फायद्याचं होतं. कारण, जर तो शरणपुरातून बाहेर पडला असता तर त्यावरून हेच दिसून आलं असतं, की खून केल्याचा त्याला काहीच पस्तावा नाही. शिवाय, शरणपुरातून बाहेर पडून त्याने स्वतःचा जीवही धोक्यात घातला असता.

११. देवाच्या दयेबद्दल आपल्याला कृतज्ञता वाटते हे पश्‍चात्ताप केलेली व्यक्ती कसं दाखवू शकते?

११ आजसुद्धा पश्‍चात्ताप केलेल्या व्यक्तीने देवाची क्षमा मिळवण्यासाठी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. तिने आपला पापी मार्ग सोडून दिला पाहिजे. त्यासोबतच, गंभीर पाप करण्यास प्रवृत्त करणारी कोणतीही गोष्ट तिने टाळली पाहिजे. करिंथच्या मंडळीतल्या काही पश्‍चात्तापी ख्रिश्चनांनी काय केलं त्याबद्दल सांगताना प्रेषित पौलने म्हटलं: “देवाच्या इच्छेनुसार असलेल्या दुःखामुळे तुमच्यामध्ये इतकी उत्सुकता निर्माण झाली, की तुम्ही तुमच्यातला दोष दूर करण्यास झटला, झालेल्या चुकीबद्दल तुम्हाला मनापासून वाईट वाटले, तुमच्या मनात देवाबद्दल गाढ आदर, पश्‍चात्ताप करण्याची प्रामाणिक इच्छा व आवेश उत्पन्न झाला आणि तुम्ही आपली चूक सुधारली!” (२ करिंथ. ७:१०, ११) आपण जेव्हा पाप करण्याचं सोडून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तेव्हा हेच दाखवून देतो, की केलेल्या कृत्याचा आपल्याला मनापासून पस्तावा आहे. तसंच, देवाची दया आपल्याला आपोआप मिळेल असंही आपण गृहित धरत नाही.

१२. यहोवाच्या दयेचा लाभ घेत राहण्यासाठी एका ख्रिश्चनाला कदाचित कोणते काही त्याग करावे लागू शकतात?

१२ यहोवाच्या दयेचा लाभ घेत राहण्यासाठी एका ख्रिश्चनाला कोणते काही त्याग करावे लागू शकतात? त्याला कदाचित काही गोष्टी मनापासून आवडत असतील; पण त्यांमुळे जर तो पाप करण्यास प्रवृत्त होत असेल तर त्या गोष्टी सोडून देण्यास त्याने तयार असलं पाहिजे. (मत्त. १८:८, ९) उदाहरणार्थ, तुमचे मित्र जर तुम्हाला यहोवाला न आवडणाऱ्या गोष्टी करण्याचं उत्तेजन देत असतील, तर त्यांच्याशी संगती करण्याचं तुम्ही सोडून द्याल का? किती प्रमाणात मद्य प्यावं यावर नियंत्रण ठेवणं जर तुम्हाला कठीण जात असेल, तर वाजवीपेक्षा जास्त मद्य पिण्यास प्रवृत्त करणाऱ्या परिस्थिती तुम्ही टाळाल का? अनैतिक लैंगिक इच्छांवर ताबा मिळवणं तुम्हाला कठीण जात असल्यास, मनात अशुद्ध विचार येतील अशा गोष्टी करण्याचं किंवा असे चित्रपट व वेबसाईट पाहण्याचं तुम्ही टाळाल का? नेहमी लक्षात असू द्या, यहोवाच्या नियमांचं पालन करण्यासाठी तुम्ही जे काही त्याग करता ते कधीच व्यर्थ जात नाहीत. यहोवाने आपल्याला सोडून दिलं आहे असं वाटणं, यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही; आणि यहोवा आपल्यावर “सर्वकाळ प्रसन्न राहीन,” यापेक्षा चांगली भावना कोणतीच असू शकत नाही.—यश. ५४:७, ८

शरणपुरे “सूड उगवणाऱ्यापासून” बचाव करायची

१३. शरणपुरात पळून आलेला मनुष्य तिथे सुरक्षित आणि आनंदी जीवन जगू शकत होता, असं का म्हणता येईल?

१३ सूड उगवणाऱ्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी शरणपुरात आल्यानंतर तो मनुष्य सुरक्षित असायचा. यहोवाने म्हटलं होतं, की शरणपुरांमुळे एखाद्या मनुष्याला सूड उगवणाऱ्यापासून स्वतःचा बचाव करणं शक्य होईल. (यहो. २०:२, ३) शरणपुरात पळून आलेल्या व्यक्तीचा एकदा न्याय झाला असल्यामुळे, पुन्हा त्याच कारणावरून त्याचा न्याय करण्यात यावा अशी अपेक्षा यहोवाने केली नाही. शिवाय, सूड उगवणाऱ्या व्यक्तीलासुद्धा त्या मनुष्याला मारण्यासाठी शरणपुरात प्रवेश मिळत नसे. म्हणूनच, शरणपुरात पळून आलेला मनुष्य यहोवाच्या हाताखाली अगदी सुरक्षित असायचा. तिथे त्याची स्थिती कैद्यासारखी नसायची. शरणपुरात तो कामकाज करू शकत होता, इतरांना मदत करू शकत होता आणि शांत मनाने यहोवाची सेवा करू शकत होता. एकंदर, त्याला एक आनंदी व समाधानकारक जीवन जगणं शक्य होतं!

यहोवा तुम्हाला क्षमा करतो याची खातरी बाळगा (परिच्छेद १४-१६)

१४. पश्‍चात्तापी ख्रिस्ती व्यक्ती कोणत्या गोष्टीची खातरी बाळगू शकते?

१४ गंभीर पाप केलेल्या देवाच्या काही सेवकांच्या मनात पश्‍चात्ताप केल्यानंतरही दोषीपणाची भावना असते. काहींना तर असंही वाटतं, की त्यांनी जे केलं आहे ते यहोवा कधीच विसरणार नाही. तुम्हालाही जर असं वाटतं असेल, तर याची खातरी बाळगा की यहोवा जेव्हा क्षमा करतो तेव्हा तो पूर्णपणे क्षमा करतो. त्यामुळे, क्षमा मिळाल्यानंतर स्वतःला दोष देत राहण्याची गरज नाही. आधी उल्लेख केलेल्या डॅनिएलला कसं वाटलं ते विचारात घ्या. मंडळीच्या वडिलांनी त्याची चूक सुधारली आणि शुद्ध विवेक बाळगण्यास त्याला मदत केली, तेव्हा त्याला खूप दिलासा मिळाला. तो म्हणतो: “आता मला स्वतःला दोष देत राहण्याची गरज नव्हती. एकदा पापाची क्षमा झाली म्हणजे कायमची झाली. यहोवाने म्हटलं तसं तो आपल्या पापांचा भार उचलून दूर फेकून देतो. मग पुन्हा कधीच आपल्याला तो भार वाहावा लागणार नाही.” शरणपुरात पळून आलेल्या मनुष्याला या गोष्टीची मुळीच भीती नसायची, की सूड उगवणारा येऊन आपल्याला ठार मारेल. अगदी त्याच प्रकारे, यहोवाने आपल्या पापांची क्षमा केल्यानंतर, तो पुन्हा ते आठवून आपल्याला शिक्षा करेल, याची आपल्याला भीती बाळगण्याची गरज नाही.—स्तोत्र १०३:८-१२ वाचा.

१५, १६. येशूने दिलेल्या खंडणीमुळे आणि तो आपला महायाजक असल्यामुळे देवाच्या दयेवरचा तुमचा भरवसा आणखी कसा वाढतो?

१५ खरं पाहता, यहोवाच्या दयेवर भरवसा ठेवण्यासाठी इस्राएली लोकांपेक्षा कितीतरी मोठं कारण आज आपल्याजवळ आहे. यहोवाच्या नीतिनियमांचं पूर्णपणे पालन करता येत नसल्यामुळे आपली स्थिती “किती दयनीय आहे!” असं पौल म्हणाला. पण पुढे तो असंही म्हणाला: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो!” (रोम. ७:२५) पौलला नेमकं काय म्हणायचं होतं? आपल्या पापी इच्छांवर मात करण्यासाठी पौलला जरी संघर्ष करावा लागला असला आणि त्याने जरी पूर्वी पाप केलं असलं, तरी त्याबद्दल त्याने मनापासून पश्‍चात्ताप केला होता. त्यामुळे, तो खातरी बाळगू शकत होता, की येशूच्या खंडणी बलिदानाच्या आधारावर यहोवाने त्याला क्षमा केली आहे. येशूने दिलेल्या खंडणीमुळे आपणही शुद्ध विवेक बाळगू शकतो आणि मनाची शांती टिकवून ठेवू शकतो. (इब्री ९:१३, १४) येशू हा आपला महायाजक असल्यामुळे “त्याच्याद्वारे देवाजवळ येणाऱ्यांचे पूर्णपणे तारण करणेही त्याला शक्य आहे, कारण त्यांच्याकरता याचना करण्यासाठी तो सर्वदा जिवंत आहे.” (इब्री ७:२४, २५) प्राचीन काळात, महायाजक इस्राएली लोकांना ही खातरी बाळगण्यास मदत करायचा, की यहोवा त्यांचे पाप क्षमा करेल. आज येशू आपला महायाजक असल्यामुळे “आपल्याला योग्य वेळी साहाय्य करण्यासाठी दया व अपार कृपा मिळेल,” अशी खातरी बाळगण्याचं कितीतरी मोठं कारण आपल्याजवळ आहे.—इब्री ४:१५, १६.

१६ त्यामुळे, यहोवाचा आश्रय घेण्यासाठी आपल्याला येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. येशूने दिलेलं खंडणी बलिदान ही केवळ सर्व लोकांना लागू होणारी गोष्ट नाही; तर, त्यापासून व्यक्तिगतपणे तुम्हाला लाभ होऊ शकतो असा विश्वास बाळगा. (गलती. २:२०, २१) आणि येशूच्या खंडणी बलिदानामुळे यहोवा तुमच्या पापांची क्षमा करतो, असा विश्वास बाळगा. तसंच, खंडणीमुळेच तुम्हाला सर्वकाळाच्या जीवनाची आशा मिळते असाही विश्वास बाळगा. खरंच, येशूचं बलिदान यहोवाने तुम्हाला दिलेली एक अमूल्य भेट आहे!

१७. तुम्हाला यहोवाचा आश्रय घेण्याची इच्छा का आहे?

१७ शरणपुरांच्या व्यवस्थेवरून यहोवाचा दयाळूपणा दिसून येतो. त्या व्यवस्थेवरून आपल्याला हेही शिकायला मिळतं, की यहोवाच्या नजरेत जीवन अतिशय मौल्यवान आहे. तसंच, मंडळीचे वडील कशा प्रकारे आपल्याला मदत करू शकतात, मनापासून पश्‍चात्ताप करणं म्हणजे काय आणि यहोवा आपल्याला क्षमा करतो याची पूर्ण खातरी का बाळगू शकतो, हेसुद्धा शरणपुरांच्या व्यवस्थेवरून आपल्याला शिकायला मिळतं. तर मग, तुम्ही यहोवाचा आश्रय घेत आहात का? यापेक्षा सुरक्षित स्थान दुसरं असूच शकत नाही! (स्तो. ९१:१, २) पुढच्या लेखात आपण हे पाहणार आहोत, की शरणपुरांच्या व्यवस्थेवरून आपल्याला न्यायाचं व दयेचं सर्वोत्तम उदाहरण मांडणाऱ्या यहोवाचं अनुकरण कसं करता येईल.

^ परि. 10 यहुदी विद्वानांच्या म्हणण्यानुसार, शरणपुरात पळून जाणाऱ्या व्यक्तीचं कुटुंबही त्याच्यासोबत शरणपुरात राहायला यायचं, असं दिसतं.