व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

हर्षाने यहोवाची स्तुती करा!

हर्षाने यहोवाची स्तुती करा!

“देवाची स्तोत्रे गाणे चांगले आहे.”—स्तो. १४७:१.

गीत क्रमांक: ९, 

१. राज्यगीतांमुळे आपल्याला काय फायदा होतो?

एका सुप्रसिद्ध गीतकाराने एकदा असं म्हटलं: ‘शब्दांमुळे आपल्याला विचार कळतात. पण तेच शब्द आपण जेव्हा गातो, तेव्हा ते आपल्या हृदयाला स्पर्श करतात.’ आपल्या राज्यगीतांमुळे स्वर्गीय पिता यहोवा याची स्तुती होते आणि त्याच्याबद्दल असलेलं आपलं प्रेम व्यक्त होतं. तसंच, या गीतांमुळे यहोवाच्या जवळ असल्याची भावनाही आपल्यात निर्माण होते. त्यामुळेच, आपण बंधुभगिनींसोबत मिळून गीत गात असू किंवा एकटे, स्तुतिगीतं गाण्याला खऱ्या उपासनेत इतकं महत्त्वाचं स्थान का आहे हे आपल्याला समजतं.

२, ३. (क) मंडळीसोबत गीत गाण्याबाबत काहींना काय वाटतं? (ख) आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत?

स्तुतिगीतं गाणं महत्त्वाचं आहे. पण मंडळीमध्ये मोठ्या आवाजात गीत गाण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मोठ्याने गीत गायला तुम्हाला संकोच वाटतो का? काही संस्कृतींमध्ये पुरुषांना इतरांसमोर गायला संकोच वाटतो. पण अशा प्रकारच्या मनोवृत्तीचा संपूर्ण मंडळीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. खासकरून मंडळीतले वडील गीत गात नसतील किंवा गीत चालू असताना इतर कामांमध्ये व्यस्त असतील, तर त्याचा परिणाम इतरांवरही होऊ शकतो.—स्तो. ३०:१२.

स्तुतिगीतं ही यहोवाच्या उपासनेचा भाग आहेत. त्यामुळे गीत चालू असताना आपण उठून बाहेर जाणार नाही किंवा त्या गीतांसाठी गैरहजर राहणार नाही. आपण सर्वांनी पुढील प्रश्नांवर विचार केला पाहिजे: ‘मंडळीत गीत गाण्याच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं? इतरांसमोर गाण्यासाठी संकोच वाटत असेल तर आपण काय करू शकतो? आणि पूर्ण अंतःकरणाने आपण कसं गाऊ शकतो?’

राज्यगीतं—खऱ्या उपासनेचा महत्त्वपूर्ण भाग

४, ५. प्राचीन काळात मंदिरात गायकांची कशी व्यवस्था करण्यात आली होती?

यहोवाच्या उपासकांनी नेहमीच त्याची स्तुती करण्यासाठी गीतांचा आणि संगीताचा उपयोग केला आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, इस्राएली लोक जेव्हा यहोवाला विश्वासू होते आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे चालत होते, तेव्हा गीत गाणं हा त्यांच्या उपासनेचा एक फार महत्त्वपूर्ण भाग होता. उदाहरणार्थ, दावीदने जेव्हा यहोवाचं मंदिर बांधण्यासाठी तयारी केली, तेव्हा त्याने गीत-संगीतासाठी ४,००० लेव्यांना नेमलं. त्यांच्यापैकी २८८ जण “परमेश्वराप्रीत्यर्थ गाण्याचे शिक्षण मिळून तरबेज झालेले” होते.—१ इति. २३:५; २५:७.

मंदिराच्या समर्पणाच्या सोहळ्यातही गीत आणि संगीत हे महत्त्वपूर्ण भाग होते. बायबल आपल्याला सांगतं: “कर्णे वाजवणारे व गाणारे एका सुराने परमेश्वराची स्तुती व धन्यवाद करू लागले, आणि कर्णे, झांजा आदिकरून वाघे वाजवून परमेश्वराची स्तुती ते उच्चस्वरे करू लागले.” आणि “त्या समयी . . . परमेश्वराच्या तेजाने देवमंदिर भरून गेले.” खरंच, या विलक्षण दृश्यामुळे इस्राएली लोकांचा विश्वास किती मजबूत झाला असेल!—२ इति. ५:१३, १४; ७:६.

६. राज्यपाल असताना नहेम्याने गीत आणि संगीतासाठी कोणती व्यवस्था केली?

यरुशलेम शहराची भिंत बांधण्यासाठी नहेम्याने इस्राएली लोकांना एकत्र केलं होतं. गीत-संगीताने यहोवाची स्तुती करण्यासाठी त्यानेही लेव्यांची व्यवस्था केली होती. या लेव्यांनी गायिलेल्या गाण्यामुळे यरुशलेमच्या भिंतीचा समर्पण सोहळा अधिकच आनंददायी झाला. नहेम्याने स्तुतिगीत गाणाऱ्या लेव्यांचे दोन गट केले. यांपैकी एक गट, स्तुतिगीत गात शहराच्या तटावरून म्हणजेच भिंतीवरून एका बाजूने चालत गेला, तर दुसरा गट दुसऱ्या बाजूने. आणि शेवटी, हे दोन्ही गट मंदिराच्या जवळ असलेल्या भिंतीवर एकमेकांना येऊन मिळाले. ते गात असलेल्या स्तुतिगीतांचा आवाज इतका मोठा आणि स्पष्ट होता, की लोकांना तो अगदी दूरपर्यंत ऐकू येत होता. (नहे. १२:२७, २८, ३१, ३८, ४०, ४३) आपल्या सेवकांनी उत्साहाने गायिलेल्या स्तुतिगीतांमुळे यहोवाला नक्कीच आनंद झाला असेल, याची आपण खातरी बाळगू शकतो.

७. स्तुतिगीतं गाणं हे ख्रिश्चनांसाठी उपासनेचा महत्त्वपूर्ण भाग असेल हे येशूने कसं दाखवून दिलं?

येशूच्या काळातही गीत-संगीत खऱ्या उपासनेचा महत्त्वपूर्ण भाग होते. मानवी इतिहासातल्या सगळ्यात महत्त्वाच्या रात्री काय झालं त्याचा विचार करा. येशूने आपल्या शिष्यांसोबत सांजभोजनाचा विधी पाळला केला आणि त्यानंतर त्या सर्वांनी यहोवाच्या स्तुतिसाठी गीतं गायिली.—मत्तय २६:३० वाचा.

८. यहोवासाठी गीते गाण्याच्या बाबतीत पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनी चांगलं उदाहरण कसं मांडलं?

पहिल्या शतकातल्या ख्रिश्चनांनीही देवाची स्तुतिगीतं गाण्याच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं. हे ख्रिस्ती, इस्राएली लोकांप्रमाणे मंदिरात जाऊन यहोवाची उपासना करत नव्हते; तर, उपासनेसाठी ते एकमेकांच्या घरी एकत्र यायचे. त्यांची घरं ही मंदिराप्रमाणे सुंदर आणि आकर्षक नसली, तरी ते बांधव मोठ्या आवेशानं स्तुतिगीतं गायचे. खरंतर पौलने ख्रिस्ती बांधवांना लिहिलं: “स्तुतिगीते गाऊन, देवाचे गुणगान करून आणि उपासनेची गीते गाऊन एकमेकांना शिकवत राहा व प्रोत्साहन देत राहा आणि आपल्या हृदयात यहोवासाठी गीते गा.” (कलस्सै. ३:१६) आज आपणही “कृतज्ञ अंतःकरणाने” आपली राज्यगीतं गायला हवीत. ही राज्यगीतं “विश्वासू आणि बुद्धिमान” दासाकडून “योग्य वेळी” पुरवण्यात येणाऱ्या आध्यात्मिक अन्नाचाच भाग आहेत.—मत्त. २४:४५.

तुम्ही आत्मविश्वासाने कसं गाऊ शकता?

९. (क) काही जणाना सभांमध्ये व संमेलनांमध्ये मोठ्याने गाण्यास संकोच का वाटतो? (ख) आपण यहोवाची स्तुती कशा प्रकारे केली पाहिजे, आणि यासाठी कोणी पुढाकार घेतला पाहिजे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

कोणत्या काही कारणांमुळे गीत गाण्यासाठी तुम्हाला संकोच वाटू शकतो? कदाचित तुमच्या कुटुंबात किंवा संस्कृतीमध्ये सहसा कोणी गीत गात नसेल. किंवा मग उत्तम गायक व गायिका कसं गातात हे तुम्ही टीव्ही किंवा रेडिओवर ऐकलं असेल. आणि स्वतःची तुलना त्यांच्याशी केल्यानंतर तुम्हाला निराश वाटत असेल किंवा कमीपणाची भावना तुमच्या मनात येत असेल. पण असं असलं, तरी यहोवाच्या स्तुतीसाठी गीत गाणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यामुळे तुमचं राज्यगीताचं पुस्तक समोर धरा, मान सरळ ठेवा आणि उत्साहाने व मनापासून गा! (एज्रा ३:११; स्तोत्र १४७:१ वाचा.) आज अनेक राज्य सभागृहांमध्ये मोठ्या स्क्रीन लावलेल्या आहेत. त्यांवर गीतांचे बोल दाखवले जातात. त्यामुळे गीत चांगल्या प्रकारे गाण्यासाठी आपल्याला मदत होते. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, मंडळीच्या वडिलांसाठी असलेल्या राज्य सेवा प्रशालांमध्येही आता गीतांचा समावेश करण्यात आला आहे. ही गोष्ट हेच दाखवून देते, की मंडळीच्या सभांमध्ये गीत गाण्यात वडिलांनी पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे.

१०. आपल्याला मोठ्या आवाजात गायची भीती वाटत असेल, तर आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१० अनेक जण मोठ्या आवाजात गायला घाबरतात. कारण, त्यांना वाटतं की त्यांचा आवाज चांगला नाही किंवा कदाचित त्यांचाच आवाज सर्वात मोठा असेल. पण पुढील गोष्टीचा विचार करा. बायबल सांगतं की बोलण्यात “आपण सर्वच अनेकदा चुकतो.” पण मग त्यामुळे आपण बोलायचंच थांबवतो का? नाही. (याको. ३:२) मग, आपला आवाज चांगला नसेल, तर त्यामुळे आपण यहोवाची स्तुती करणं का थांबवावं?

११, १२. गाण्याचं कौशल्य वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो?

११ आपल्याला भीती वाटण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, कसं गायचं हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. पण काही उपयुक्त सल्ले लागू करण्याद्वारे तुम्ही तुमचं गायन-कौशल्य नक्कीच वाढवू शकता. *

१२ गाताना श्वास कुठे व किती घ्यायचा हे माहीत असेल, तर तुम्ही मोठ्या आवाजात चांगल्या रितीने गाऊ शकाल. ज्या प्रकारे बल्ब चालू होण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज असते, त्याच प्रकारे बोलण्यासाठी किंवा गाण्यासाठी योग्य पद्धतीनं श्वास घेण्याची गरज असते. तुमचा आवाज बोलताना जितका मोठा असतो तितकाच किंवा त्यापेक्षा मोठा, गाताना असला पाहिजे. (गाण्याच्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी सेवा स्कूल पुस्तकात १८१ पानावर असलेले उपशीर्षक, “ठीक से साँस लीजिए” पाहा.) खरंतर, बायबलमध्येही काही ठिकाणी सांगण्यात आलं आहे, की यहोवाच्या सेवकांनी त्याची स्तुती करताना “जयघोष” करावा, म्हणजेच उत्साहानं व मोठ्याने गीत गावं.—स्तो. ३३:१-३.

१३. आपण आत्मविश्वासाने कसं गाऊ शकतो हे समजावून सांगा.

१३ तुम्ही कौटुंबिक उपासना करता किंवा एकटे असता, तेव्हा पुढील गोष्ट करून पाहा: राज्यगीतांपैकी तुमच्या आवडीचं एखादं गीत निवडा. त्या गीताचे बोल मोठ्या व दमदार आवाजात वाचून काढा. नंतर, तेवढ्याच मोठ्या आवाजात गीतामधल्या एका ओळीतले शब्द एका श्वासात वाचा. मग, तीच ओळ तेवढ्याच मोठ्या आवाजात गा. (यश. २४:१४) असं केल्यामुळे गाताना तुमचा आवाज मोठा होईल. पण आवाज मोठा झाल्यामुळे तुम्हाला घाबरण्याची किंवा कमीपणा वाटण्याची गरज नाही. उलट ही एक चांगली गोष्ट आहे.

१४. (क) गाताना तोंड नेहमीपेक्षा थोडं मोठं उघडल्याने कसा फायदा होतो? (“ गाण्याचं कौशल्य कसं वाढवाल” ही चौकट पाहा.) (ख) चांगलं गाता यावं यासाठी सेवा स्कूल पुस्तकात दिलेल्या कोणत्या सल्ल्यांमुळे तुम्हाला फायदा झाला?

१४ मोठ्या आवाजात गाण्यासाठी तुम्हाला तोंड थोडं मोठं उघडावं लागेल. त्यामुळे बोलताना तुम्ही जितकं तोंड उघडता, त्यापेक्षा थोडं मोठं तोंड उघडून गा. पण जर तुमचा आवाज बारीक किंवा पातळ असेल तर तुम्ही काय करू शकता? यासाठी तुम्ही, सेवा स्कूल पुस्तकात १८४ पानावर असलेल्या, “कुछ कमज़ोरियों पर काबू पाना” या उपशीर्षकाखाली दिलेल्या सूचनांचं पालन करू शकता.

पूर्ण अंतःकरणाने स्तुतिगीतं गा

१५. (क) २०१६ मध्ये झालेल्या वार्षिक सभेचं वैशिष्ट्य काय होतं? (ख) राज्यगीतांचं नवं पुस्तक प्रकाशित करण्यामागे कोणती काही कारणं आहेत?

१५ २०१६ च्या वार्षिक सभेमध्ये जेव्हा बंधू स्टिफन लेट यांनी राज्यगीतांचं नवीन पुस्तक प्रकाशित केलं, तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या सगळ्या लोकांना खूप आनंद झाला. प्रकाशित झालेल्या या नवीन पुस्तकाचं नाव आहे, “सिंग आऊट जॉयफूली टू जेहोवा.” हे नवीन पुस्तक प्रकाशित करण्यामागची कारणं सांगताना बंधू लेट म्हणाले, की एक कारण म्हणजे बायबलचं नवे जग भाषांतर याची सुधारित आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. या सुधारित आवृत्तीमध्ये काही शब्द आणि वाक्यांश बदलण्यात आले होते. त्यामुळे राज्यगीताच्या पुस्तकातही हे शब्द व वाक्यांश बदलण्याची गरज वाटत होती. तसंच, नवीन गीत पुस्तकात प्रचारकार्य आणि खंडणी बलिदान याविषयीची काही नवीन गाणी समाविष्ट करण्यात आली आहेत. हे पुस्तक प्रकाशित करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, राज्यगीतं हे आपल्या उपासनेचा भाग आहेत. त्यामुळे आपल्याकडे उच्च प्रतीचं एक गीतपुस्तक असावं, असं नियमन मंडळाला वाटत होतं. आणि म्हणूनच, नव्या गीत पुस्तकाचा रंगही बायबलच्या नवे जग भाषांतराप्रमाणेच आहे.

१६, १७. नवीन गीत पुस्तकात कोणते काही बदल करण्यात आले आहेत?

१६ नवीन पुस्तक वापरण्यासाठी सोपं असावं या हेतूने, त्यातल्या गीतांची विषयवार मांडणी करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, पुस्तकातली पहिली १२ गाणी यहोवा देवाविषयी आहेत, तर त्यानंतरची ८ गाणी ही येशू आणि त्याने दिलेल्या बलिदानाविषयीची आहेत. अशाच प्रकारे इतरही विषयांची मांडणी केली आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला सर्व विषयांची अनुक्रमणिका दिली आहे. यामुळे जाहीर भाषण देताना गाणं निवडणं बांधवांना सोपं जाईल.

१७ पूर्ण अंतःकरणाने गाता यावं यासाठी नवीन पुस्तकातल्या काही गीतांचे बोल बदलण्यात आले आहेत. त्यामुळे गीतांमधला आशय अधिक स्पष्ट झाला आहे. तसंच, काही गीतांच्या शीर्षकांमध्येही बदल करण्यात आला आहे. जसं की, “मनाचे रक्षण करा” या इंग्रजीमधल्या गीताचं शीर्षक बदलून “आपण आपल्या मनाचे रक्षण करू या” असं करण्यात आलं आहे. यामागचं कारण काय? सुरुवातीला या गीताचं शीर्षक इतरांना आज्ञा दिल्यासारखं होतं. पण आता त्यात आर्जवाची भावना आहे. तसंच, पूर्वी या गाण्याचे बोल इतरांनी काय केलं पाहिजे हे सुचवणारे होते. त्यामुळे सभेत, संमेलनात व अधिवेशनांत आलेल्या नवीन आस्थेवाईक लोकांना, बायबल अभ्यास करणाऱ्यांना, तरुणांना आणि बहिणींना या गीताचे बोल बोलताना थोडं अवघडल्यासारखं वाटायचं. म्हणूनच, इंग्रजीत या गीताचे शीर्षक आणि बोल बदलण्यात आले आहेत.

कौटुंबिक उपासना करताना राज्यगीतांचा चांगला सराव करा (परिच्छेद १८ पाहा)

१८. नवीन गीत पुस्तकातल्या गीतांचा सराव आपण का केला पाहिजे?

१८ “सिंग आऊट जॉयफूली टू जेहोवा” या नवीन गीत पुस्तकातली अनेक गीतं प्रार्थनेच्या स्वरूपात आहेत. या गीतांमुळे आपल्या भावना यहोवासमोर मांडायला आपल्याला मदत होईल. त्यातल्या इतर गीतांमुळे “प्रेम आणि चांगली कार्ये” करण्यासाठी उत्तेजन द्यायलाही आपल्याला मदत होईल. (इब्री १०:२४) म्हणूनच, या नवीन पुस्तकातल्या गीतांचे बोल, लय आणि ताल लक्षात घ्या. असं करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे, jw.org या आपल्या वेबसाईटवर असलेल्या गीतांचं रेकॉर्डिंग ऐकणं. तुम्ही घरी असता तेव्हा या गीतांचा सराव करा. असं केल्यामुळे तुम्हाला ही गीतं पूर्ण अंतःकरणाने आणि आत्मविश्वासाने गाता येतील. *

१९. मंडळीतले सगळे लोक यहोवाची उपासना कशी करू शकतात?

१९ राज्यगीतं गाणं हा आपल्या उपासनेचा एक महत्त्वाचा भाग आहे हे कधीही विसरू नका. यहोवावर आपलं प्रेम आहे आणि त्याने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल आपण त्याचे कृतज्ञ आहोत, हे दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे यहोवाला स्तुतिगीतं गाणं. (यशया १२:५ वाचा.) तुम्ही जेव्हा उत्साहाने स्तुतिगीत गाता, तेव्हा इतरांनाही तसं करण्याचं प्रोत्साहन मिळतं. मंडळीतले सर्व जण, म्हणजे लहान, मोठे, सत्यात नवीन असलेले असे सर्वच जण स्तुतिगीत गाऊन यहोवाची उपासना करू शकतात. स्तोत्रकर्त्यानेही म्हटलं: “परमेश्वराचे गुणगान कर.” (स्तो. ९६:१) म्हणूनच, राज्यगीतं गाण्यासाठी कोणताही संकोच बाळगू नका. नेहमी हर्षाने यहोवाची स्तुती करा!

^ परि. 11 चांगल्या प्रकारे कसं गाता येईल याविषयीचे काही सल्ले जाणून घेण्यासाठी डिसेंबर २०१४ चे JW ब्रॉडकास्ट, FROM OUR STUDIO या टॅबखाली पाहा.

^ परि. 18 संमेलन आणि अधिवेशनातला सकाळचा आणि दुपारचा कार्यक्रम हा दहा मिनिटांच्या संगीताने सुरू होतो. दहा मिनिटांचा हा भाग आपल्याला गीत गाण्यासाठी आणि पुढे होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन देतो. त्यामुळे, हा भाग सुरू होण्याआधी आपण सर्वांनी आपल्या जागी बसून हे संगीत ऐकलं पाहिजे.