व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४५

पवित्र आत्मा आपल्याला कशी मदत करतो?

पवित्र आत्मा आपल्याला कशी मदत करतो?

“जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.”—फिलिप्पै. ४:१३.

गीत ३८ आपला भार यहोवावर टाक

सारांश *

१-२. (क) आपल्याला प्रत्येक दिवसाच्या समस्यांचा सामना करण्यासाठी कशामुळे मदत होते? स्पष्ट करा. (ख) या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

“मला ज्या समस्येला तोंड द्यावं लागलं तिचा जेव्हा मी विचार करतो, तेव्हा मला जाणवतं की मी स्वतःच्या बळावर तिचा सामना कधीच करू शकलो नसतो!” असंच काहीसं तुम्ही म्हटल्याचं तुम्हाला आठवतं का? आपल्यापैकी बऱ्‍याच जणांनी कधी न्‌ कधी असं म्हटलं असेल. एखाद्या गंभीर आजारामुळे किंवा आपल्या प्रिय व्यक्‍तीला मृत्यूत गमावल्यामुळे तुमच्यावर दुःखाचं डोंगर कोसळलं असेल. आणि त्या वेळी तुम्ही ज्या प्रकारे सावरलात ते आठवून कदाचित तुम्ही असं म्हटलं असेल. जीवनातला तो कठीण काळ आठवून तुम्हाला जाणवतं, की त्या वेळी प्रत्येक दिवशी लढा देणं हे फक्‍त आणि फक्‍त यहोवाच्या पवित्र आत्म्याद्वारे मिळालेल्या ‘असाधारण सामर्थ्यामुळे’ शक्य झालं होतं.—२ करिंथ. ४:७-९.

या दुष्ट जगाच्या प्रभावाचा विरोध करण्यासाठीही आपण पवित्र आत्म्यावर अवलंबून राहतो. (१ योहा. ५:१९) तसंच, आपल्याला “दुष्ट आत्मिक शक्‍तींबरोबर” लढण्यासाठी लागणारी ताकदसुद्धा हवी आहे. (इफिस. ६:१२) मग या सर्व दबावांचा सामना करण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला कोणत्या दोन मार्गांनी मदत करू शकतो यावर आता आपण चर्चा करू या. तसंच, आपण पवित्र आत्म्यापासून पूर्णपणे फायदा मिळवण्यासाठी काय करू शकतो यावरही चर्चा करू या.

पवित्र आत्मा आपल्याला ताकद देतो

३. समस्येचा सामना करण्यासाठी यहोवा कोणत्या एका मार्गाने आपल्याला मदत करतो?

समस्येत असतानाही आपल्या जबाबदाऱ्‍या व्यवस्थित रीतीने पार पाडण्यासाठी यहोवाचा पवित्र आत्मा आपल्याला ताकद देतो. प्रेषित पौलच्या जीवनात समस्या होत्या तरी ‘ख्रिस्ताच्या सामर्थ्यावर’ अवलंबून राहिल्यामुळे तो यहोवाची सेवा करत राहू शकला. (२ करिंथ. १२:९) आपल्या दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान पौलने प्रचारकार्यात बरीच मेहनत घेण्यासोबतच स्वतःचा खर्च भागवण्यासाठी कामही केलं. तो करिंथमध्ये अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्या घरी राहिला. ते तंबू बनवण्याचं काम करायचे. पौललाही तंबू बनवण्याचं काम येत असल्यामुळे त्याने काही दिवस त्यांच्यासोबत काम केलं. (प्रे. कार्ये १८:१-४) पौलला काम करण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी पवित्र आत्म्यामुळे ताकद मिळाली.

४. २ करिंथकर १२:७ख-९ या वचनांनुसार पौलला कोणत्या समस्येचा सामना करावा लागला?

२ करिंथकर १२:७ख-९ वाचा. या वचनांत पौलने त्याच्या “शरीरात एक काटा” असल्याचं म्हटलं तेव्हा त्याच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? त्याला म्हणायचं होतं की त्याच्या जीवनात एक वेदनादायक समस्या होती. आपल्या पायात काटा रुतल्यावर जशी आपल्याला खूप वेदना होते, तशीच एखादी वेदनादायक समस्या त्याच्या जीवनात होती. त्याने त्या समस्येबद्दल म्हटलं, की जणू “सैतानाचा एक दूत, [त्याच्या] तोंडात मारत” आहे. सैतान किंवा दुष्ट स्वर्गदूतांनी कदाचित पौलवर थेटपणे समस्या आणल्या नसतील, म्हणजेच त्यांनी त्याच्या शरीरात थेटपणे काटा रुतवला नसेल. पण त्या दुष्ट आत्मिक प्राण्यांनी जेव्हा पौलच्या शरीरात “काटा” पाहिला असेल तेव्हा तो आणखी खोलवर रुतवण्याचा, म्हणजेच त्याची समस्या आणखी वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल. मग अशा वेळी पौलने काय केलं?

५. यहोवाने पौलच्या प्रार्थनांचं उत्तर कसं दिलं?

पौलची सुरुवातीला इच्छा होती की यहोवाने त्याच्या शरीरातून तो “काटा” काढून टाकावा. तो म्हणतो: “तो काटा काढून टाकण्यासाठी मी तीन वेळा प्रभूला [यहोवाला] विनंती केली.” पण, पौलने अनेक वेळा प्रार्थना करूनदेखील तो काटा त्याच्या शरीरातून निघाला नाही. मग याचा अर्थ असा होतो का की यहोवाने त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं नाही? त्याने नक्कीच त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं! यहोवाने त्याच्या समस्या दूर केल्या नाहीत, पण त्याला त्या सहन करण्याची ताकद दिली. यहोवाने त्याला म्हटलं: “माझी अपार कृपा तुझ्यासाठी पुरेशी आहे, कारण दुर्बलतेतच माझं सामर्थ्य परिपूर्ण होतं.” (२ करिंथ. १२:८, ९) खरंतर, यहोवाच्या मदतीमुळेच पौल आनंदी राहू शकला आणि मनाची शांती टिकवून ठेवू शकला.—फिलिप्पै. ४:४-७.

६. (क) यहोवा कदाचित आपल्या प्रार्थनांचं उत्तर कसं देईल? (ख) परिच्छेदात उल्लेख केलेल्या वचनांतल्या अभिवचनांतून तुम्हाला कसं बळ मिळतं?

परीक्षेतून आपली सुटका व्हावी म्हणून तुम्हीही पौलसारखं यहोवाकडे कळकळून विनंती केली असेल. पण अनेक वेळा अगदी मनापासून प्रार्थना करूनही तुमची समस्या होती तशीच राहिली असेल किंवा कदाचित आणखीच वाढली असेल. मग अशा वेळी यहोवा तुमच्यावर नाराज तर नाही ना, असा विचार कदाचित तुमच्या मनात आला असेल. असं असल्यास पौलचं उदाहरण लक्षात घ्या. यहोवाने ज्या प्रकारे त्याच्या प्रार्थनांचं उत्तर दिलं, त्या प्रकारे तो तुमच्या प्रार्थनांचंही नक्कीच उत्तर देईल! यहोवा कदाचित तुमची समस्या दूर करणार नाही, पण पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला त्या वेळी सहन करण्यासाठी लागणारी ताकद मात्र नक्की देईल. (स्तो. ६१:३, ४) तुम्ही कदाचित “खाली पाडले” जाल पण यहोवा तुम्हाला कधीच एकटं सोडणार नाही.—२ करिंथ. ४:८, ९; फिलिप्पै. ४:१३.

पवित्र आत्म्यामुळे पुढे जात राहण्यासाठी मदत होते

७-८. (क) पवित्र आत्म्याची तुलना आपण वाऱ्‍याशी कशी करू शकतो? (ख) पवित्र आत्मा कसा कार्य करतो याबद्दल प्रेषित पेत्रने काय म्हटलं?

पवित्र आत्मा आपल्याला आणखी कोणत्या बाबतीत मदत करतो? आपण पवित्र आत्म्याची तुलना वाऱ्‍याशी करू शकतो. समुद्रात वादळी स्थिती निर्माण झाली असली, तरी योग्य दिशेला वाहणाऱ्‍या वाऱ्‍यामुळे एका जहाजाला किंवा नावेला आपल्या ठरलेल्या ठिकाणी सुखरूप पोहोचण्यासाठी मदत होते. त्याच प्रकारे, आपल्या जीवनात वादळासारख्या समस्या उद्‌भवल्या असल्या तरी पवित्र आत्मा त्या वाऱ्‍यासारखं आपल्याला नवीन जगात सुखरूपणे पोहोचायला मदत करतो.

प्रेषित पेत्र मासेमारी करायचा आणि यामुळे त्याला समुद्री प्रवासाबद्दल बरंच काही माहीत होतं. म्हणूनच कदाचित त्याने पवित्र आत्मा कसा कार्य करतो याबद्दल सांगताना, नावेतून प्रवास करण्याशी संबंधित असलेला एक वाक्यांश वापरला. त्याने लिहिलं: “भविष्यवाणी ही कधीही माणसाच्या इच्छेनुसार झाली नाही, तर माणसे देवाच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने बोलली.” इथे “मार्गदर्शनाने” यासाठी असलेल्या ग्रीक भाषेतल्या शब्दाचा शब्दशः अर्थ, “आत्म्याने वाहून नेले” असा होतो.—२ पेत्र १:२१, तळटीप.

९. पेत्रने ‘वाहून नेले’ हा वाक्यांश वापरला तेव्हा त्याला वाचकांच्या डोळ्यांसमोर कोणतं शब्दचित्र उभारायचं होतं?

“वाहून नेले” या वाक्यांशातून प्रेषित पेत्रने कोणतं शब्दचित्र रेखाटलं? हे समजण्यासाठी प्रेषितांची कार्ये पुस्तकाचा लेखक, लूक याने काय लिहिलं त्याकडे लक्ष द्या. पेत्रने ज्या ग्रीक शब्दाचा वापर केला त्यासारख्याच शब्दाचा वापर लूकनेही केला. एक नाव “वारा नेईल” त्या दिशेने कशा प्रकारे जाते याचं वर्णन करण्यासाठी त्याने त्या शब्दाचा वापर केला. (प्रे. कार्ये २७:१५) प्रेषित पेत्रने, बायबलचे लेखक हे पवित्र आत्म्याने ‘वाहून नेण्यात आले’ असं जे म्हटलं त्यावर एका बायबल विद्वानाने टिप्पणी केली. त्याच्या मते पेत्रने ‘वाहून नेण्यात आले’ या वाक्यांशाचा वापर यासाठी केला कारण त्याला वाचकांच्या डोळ्यांसमोर ‘नावेतून प्रवास करण्याचं’ शब्दचित्र उभारायचं होतं. पेत्रला म्हणायचं होतं, की ज्या प्रकारे वारा एका नावेला तिच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मदत करतो, त्याच प्रकारे पवित्र आत्म्याने बायबल लेखकांना त्यांचं काम करायला मार्गदर्शन दिलं. त्या विद्वानाने असंही म्हटलं, की बायबल लेखक हे जणू अशा जहाजांप्रमाणे होते ज्यांची ‘शिडे उभारण्यात आली’ होती. शीड म्हणजे जहाजाला गती येण्यासाठी बांधलेलं मोठं कापड. यहोवाने बायबल लेखकांना ‘वारा’ म्हणजेच पवित्र आत्मा देऊन त्याच्या वाटणीचं काम केलं होतं. आणि त्या बायबल लेखकांनीही पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार कार्य करून त्यांच्या वाटणीचं काम केलं.

पहिलं पाऊल: यहोवाने आपल्या सेवकांना दिलेल्या कार्यांत नियमितपणे भाग घेत राहा

दुसरं पाऊल: या आध्यात्मिक कार्यांमध्ये भाग घेण्यासाठी आपल्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करा (परिच्छेद ११ पाहा) *

१०-११. पवित्र आत्म्याने आपल्याला मार्गदर्शन द्यावं यासाठी आपण कोणत्या दोन गोष्टी करणं गरजेचं आहे?

१० हे खरं आहे, की यहोवा आज लोकांना बायबलची पुस्तकं लिहिण्यासाठी प्रेरित करत नाही. असं असलं तरी यहोवा आज त्याच्या पवित्र आत्म्याचा वापर आपल्या सेवकांना मार्गदर्शन देण्यासाठी करतो. यहोवा त्याच्या वाटणीचं काम अजूनही करत आहे. मग आपण देवाच्या पवित्र आत्म्याकडून फायदा कसा मिळवू शकतो? त्यासाठी आपल्याला आपल्या वाटणीचं काम करावं लागेल. हे आपण कसं करू शकतो?

११ या उदाहरणाचा विचार करा. नाव चालवणाऱ्‍या नाविकाला जर वाऱ्‍यापासून फायदा मिळवायचा असेल तर त्याने दोन गोष्टी करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, त्याने आपली नाव वारा वाहतो त्या दिशेला फिरवायला हवी. नाव जर वारा वाहतो त्यापासून दूर बंदरावरच राहिली तर ती पुढे जाणार नाही. दुसरी गोष्ट, नाविकाने नावेचं शीड उभारून ते पूर्णपणे उघडलं पाहिजे ज्यामुळे वारा नावेला पुढे नेईल. त्याच प्रकारे, आपल्याला पवित्र आत्म्याची मदत असली तरच आपण यहोवाची सेवा करू शकू. तेव्हा पवित्र आत्म्याकडून आपल्याला फायदा मिळवायचा असेल तर आपल्याला दोन पावलं उचलावी लागतील. पहिलं पाऊल म्हणजे, देवाचा पवित्र आत्मा त्याच्या सेवकांना जे मार्गदर्शन देतो त्यानुसार कार्य करणं. दुसरं पाऊल म्हणजे, आपल्या नावेचं शीड उभारून त्याला ‘पूर्णपणे उघडण्याचा’ प्रयत्न करणं. याचाच अर्थ, देवाने आपल्याला जी कामं दिली आहेत ती जमेल तितक्या चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणं. (स्तो. ११९:३२) आपण ही पावलं उचलतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्याला विरोधाच्या आणि परीक्षांच्या लाटांशी झुंज देत पुढे जात राहायला मदत करतो. तसंच, आपण नवीन जगात पोहोचेपर्यंत पवित्र आत्मा आपल्याला विश्‍वासाने यहोवाची सेवा करत राहायला ताकदही देत राहील.

१२. आता आपण कशावर चर्चा करणार आहोत?

१२ पवित्र आत्मा आपल्याला कोणत्या दोन मार्गांनी मदत करतो यावर आतापर्यंत आपण चर्चा केली आहे. पवित्र आत्मा आपल्याला ताकद देतो आणि समस्यांचा सामना करताना विश्‍वासात टिकून राहायला मदत करतो. तसंच, तो आपल्याला यहोवाच्या सेवेत पुढे जात राहायला आणि सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर टिकून राहायलासुद्धा मदत करतो. पवित्र आत्म्यापासून पूर्णपणे फायदा मिळवण्यासाठी आपल्याला कोणत्या चार गोष्टी करणं गरजेचं आहे यावर आता आपण चर्चा करणार आहोत.

पवित्र आत्म्याकडून पूर्णपणे फायदा मिळवा

१३. २ तीमथ्य ३:१६, १७ या वचनांनुसार बायबलची वचनं आपली मदत कशी करू शकतात? पण त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे?

१३ पहिली गोष्ट, देवाच्या वचनाचा अभ्यास करा. (२ तीमथ्य ३:१६, १७ वाचा.) “देवाच्या प्रेरणेने” यासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा शब्दशः अर्थ ‘देवाने श्‍वास फुंकला’ असा होतो. देवाने पवित्र आत्म्याचा वापर करून बायबल लेखकांच्या मनात जणू आपले विचार ‘फुंकले’. आपण बायबल वाचतो आणि त्यातल्या माहितीवर मनन करतो तेव्हा देवाचं मार्गदर्शन आपल्या मनात जातं. त्या प्रेरित विचारांमुळे आपल्याला देवाच्या इच्छेनुसार आपल्या जीवनात बदल करण्याची प्रेरणा मिळते. (इब्री ४:१२) पण पवित्र आत्म्याकडून पूर्णपणे फायदा मिळवण्यासाठी आपण नियमितपणे बायबल वाचन करण्यासोबतच, त्यात दिलेल्या माहितीबद्दल खोलवर विचार करण्यासाठी वेळही काढला पाहिजे. आपण असं केलं तर देवाच्या वचनांत दिलेल्या गोष्टींचा आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर प्रभाव होईल.

१४. (क) पवित्र आत्मा आपल्या सभांमध्ये उपस्थित असतो असं आपण का म्हणू शकतो? (ख) सभांमध्ये असताना आपण पवित्र आत्म्याकडून पूर्णपणे फायदा कसा मिळवू शकतो?

१४ दुसरी गोष्ट, भाऊबहिणींसोबत देवाची उपासना करा. (स्तो. २२:२२) यहोवाचा आत्मा सभांमध्ये उपस्थित असतो. (प्रकटी. २:२९) आपण असं का म्हणू शकतो? कारण आपण आपल्या भाऊबहिणींसोबत उपासना करण्यासाठी एकत्र येतो तेव्हा आपण पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करतो आणि देवाच्या वचनांवर आधारित असलेली राज्यगीते गातो. तसंच, पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त झालेले बांधव बायबलवर आधारित मार्गदर्शन देतात तेही आपण ऐकतो. त्यासोबतच तो बहिणींना त्यांचे भाग तयार करण्यासाठी आणि ते सादर करण्यासाठीही मदत करतो. पण पवित्र आत्म्याकडून पूर्णपणे फायदा मिळवण्यासाठी आपण सभेत उत्तरं देण्याची तयारी करणं महत्त्वाचं आहे. असं करण्याद्वारे ज्या प्रकारे नावेचं ‘शीड पूर्णपणे उघडलेलं’ असतं, त्या प्रकारे सभांमध्ये असताना आपण पवित्र आत्म्याकडून पूर्णपणे फायदा मिळवायला तयार असू.

१५. पवित्र आत्मा आपल्याला सेवाकार्यात कशी मदत करतो?

१५ तिसरी गोष्ट, प्रचार करा. आपण जेव्हा बायबलचा वापर करून प्रचार आणि शिकवण्याचं कार्य करतो तेव्हा सेवाकार्यात आपण पवित्र आत्म्याला आपली मदत करू देतो. (रोम. १५:१८, १९) पवित्र आत्म्याकडून पूर्णपणे फायदा मिळवण्यासाठी आपल्याला नियमितपणे सेवाकार्यात भाग घेणं आणि बायबलचा शक्य तितका वापर करणं गरजेचं आहे. प्रचारात लोकांशी चांगल्या प्रकारे चर्चा करण्याचा एक मार्ग म्हणजे, सभेसाठी कार्यपुस्तिका यात दिलेले चर्चेसाठी नमुने यांचा वापर करणं.

१६. पवित्र आत्मा मिळवण्याचा थेट मार्ग कोणता आहे?

१६ चौथी गोष्ट, यहोवाला प्रार्थना करा. (मत्त. ७:७-११; लूक ११:१३) पवित्र आत्मा मिळवण्याचा थेट मार्ग म्हणजे यहोवाकडे त्यासाठी प्रार्थना करणं. यहोवापर्यंत आपली प्रार्थना पोहोचण्यात किंवा त्याच्याकडून आपल्याला पवित्र आत्मा मिळण्यात कोणतीच गोष्ट आड येऊ शकत नाही; मग ती तुरुंगाची भिंत असो किंवा सैतानाचे कोणतेही प्रयत्न असो. (याको. १:१७) पवित्र आत्म्याकडून फायदा मिळवण्यासाठी आपण कशी प्रार्थना केली पाहिजे? हे जाणून घेण्यासाठी आता आपण लूकच्या शुभवर्तमानात दिलेल्या प्रार्थनेच्या उदाहरणाचं बारकाईने परीक्षण करू या. *

प्रार्थना करत राहा

१७. लूक ११:५-९, १३ यांत दिलेल्या येशूच्या उदाहरणावरून आपण प्रार्थनेबद्दल कोणता धडा शिकू शकतो?

१७ लूक ११:५-९, १३ वाचा. येशूने सांगितलेल्या उदाहरणावरून आपल्याला समजतं की आपण पवित्र आत्म्यासाठी कशी प्रार्थना केली पाहिजे. त्या उदाहरणात सांगितलं आहे, की एक माणूस “न लाजता एकसारखा मागत असल्यामुळे” त्याला हवी असलेली गोष्ट मिळाली. खूप रात्र झाली असली तरी तो माणूस आपल्या मित्राकडे मदत मागायला कचरला नाही किंवा घाबरला नाही. (जुलै २०१८ जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ यात nwtsty अभ्यासासाठी माहिती-लूक ११:५-९ पाहा.) येशूने या उदाहरणावरून प्रार्थनेबद्दल काय शिकवलं? त्याने म्हटलं: “मागत राहा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल; शोधत राहा म्हणजे तुम्हाला सापडेल; आणि ठोठावत राहा म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल.” यातून आपल्याला कोणता धडा शिकायला मिळतो? पवित्र आत्म्याकडून मदत मिळवायची असेल तर आपण न लाजता एकसारखं प्रार्थनेत पवित्र आत्मा मागत राहिला पाहिजे.

१८. येशूने सांगितलेल्या उदाहरणानुसार यहोवा आपल्याला पवित्र आत्मा देईल असा भरवसा आपण का बाळगू शकतो?

१८ येशूने दिलेल्या उदाहरणातून आपल्याला हेदेखील समजायला मदत होते की यहोवा आपल्याला पवित्र आत्मा का देतो. त्या उदाहरणातल्या माणसाला त्याच्या घरी आलेल्या पाहुण्याचा चांगला पाहुणचार करायचा होता. रात्री उशिरा आलेल्या पाहुण्याला आपण काहीतरी खायला दिलं पाहिजे असं त्याला वाटत होतं. पण त्या वेळी त्याच्याकडे काहीच नव्हतं. येशूने म्हटलं की या माणसाने न लाजता एकसारखं मागितल्यामुळे त्याच्या मित्राने त्याला भाकरी दिली. येशूला यातून काय शिकवायचं होतं? हेच की जर एक मानव न लाजता वारंवार मागत असल्यामुळे समोरचा अपरिपूर्ण मनुष्य त्याला मदत करायला तयार होऊ शकतो, तर मग स्वर्गात राहणाऱ्‍या आपल्या दयाळू पित्याकडे आपण वारंवार पवित्र आत्मा मागितल्यावर तो आपल्याला देणार नाही का? नक्कीच देईल! त्यामुळे आपल्याला पूर्ण भरवसा आहे, की आपण पवित्र आत्मा मिळवण्यासाठी यहोवाकडे प्रार्थना केली तर तो आपल्या प्रार्थनांचं उत्तर नक्कीच देईल.—स्तो. १०:१७; ६६:१९.

१९. आपला विजय होईल असं आपण खातरीने का म्हणू शकतो?

१९ लक्षात असू द्या की सैतान आपल्यावर हल्ला करतच राहील. तरी आपण खातरीने म्हणू शकतो की आपलाच विजय होईल. आपण ही गोष्ट इतक्या खातरीने कशी म्हणू शकतो? कारण पवित्र आत्मा आपल्याला दोन मार्गांनी मदत करतो. पहिला, धीराने समस्यांचा सामना करण्यासाठी तो आपल्याला ताकद देतो. आणि दुसरा, ज्या प्रकारे वारा नावेच्या शिडांमध्ये भरलेला असल्यामुळे नाव पुढे जात राहते, त्याच प्रकारे आपण नवीन जगात पोहोचत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा आपल्याला यहोवाच्या सेवेत पुढे जात राहण्यासाठी मदत करतो. तेव्हा पवित्र आत्म्याकडून पूर्णपणे फायदा मिळवण्याचा पक्का निर्धार करा!

गीत ६ देवाच्या सेवकाची प्रार्थना

^ परि. 5 या लेखात सांगितलं आहे की पवित्र आत्मा आपल्याला समस्यांचा सामना करण्यासाठी कशी मदत करू शकतो. तसंच, पवित्र आत्म्यापासून पूर्णपणे फायदा मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो हेही या लेखात सांगण्यात आलं आहे.

^ परि. 16 इतर कोणत्याही शुभवर्तमानाच्या लेखकापेक्षा लूकने या गोष्टीवर जास्त भर दिला की येशूच्या जीवनात प्रार्थनेचं खूप महत्त्वाचं स्थान होतं.—लूक ३:२१; ५:१६; ६:१२; ९:१८, २८, २९; १८:१; २२:४१, ४४.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन: पहिलं पाऊल: एक जोडपं राज्य सभागृहात आलं आहे. ते आपल्या सहविश्‍वासू भाऊबहिणींसोबत एका अशा ठिकाणी उपस्थित आहे जिथे यहोवाचा आत्मा आहे. दुसरं पाऊल: त्या जोडप्याने सभेत भाग घेण्याची आधीच तयारी केली आहे. ही दोन पावलं या लेखात दिलेल्या इतर गोष्टींबाबतीतही लागू होतात म्हणजेच, देवाच्या वचनाचा अभ्यास करणं, प्रचारकार्यात भाग घेणं आणि यहोवाला प्रार्थना करणं.