व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४५

एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा

एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा

“एकमेकांशी एकनिष्ठ प्रेमाने आणि दयेने वागा.”—जख. ७:९, तळटीप.

गीत ५० देवाच्या प्रीतीचा आदर्श

सारांश *

१-२. एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची कोणती काही कारणं आपल्याकडे आहेत?

एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची अनेक कारणं आपल्याकडे आहेत. त्यांपैकी काही नीतिवचनं या पुस्तकात दिली आहेत. जसं की: “एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा कधीही सोडू नकोस. . . . मग देवाच्या आणि माणसाच्या नजरेत तुला सखोल समज असलेला म्हणून ओळखलं जाईल आणि तुझ्यावर त्यांची कृपा होईल.” “एकनिष्ठ प्रेम दाखवणाऱ्‍या माणसाच्या वागणुकीमुळे त्याला फायदा होतो.” आणि ‘जो नीतीने आणि एकनिष्ठ प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवन मिळतं.’—नीति. ३:३, ४; ११:१७, तळटीप; २१:२१.

या नीतिवचनांत एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची तीन कारण सांगितली आहेत. पहिलं कारण म्हणजे, एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे आपण यहोवाच्या नजरेत मौल्यवान ठरतो. दुसरं म्हणजे, एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे आपल्या स्वतःला फायदा होतो. जसं की, इतरांसोबत आपली चांगली मैत्री होते. आणि तिसरं कारण म्हणजे, एकमेकांशी एकनिष्ठ प्रेमाने वागल्यामुळे आपल्याला भविष्यात अनेक आशीर्वाद आणि सर्वकाळाचं जीवन मिळेल. खरंच, यहोवाने सांगितल्याप्रमाणे ‘एकमेकांशी एकनिष्ठ प्रेमाने आणि दयेने वागण्याची’ अशी बरीच कारणं आपल्याकडे आहेत.—जख. ७:९.

३. या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण चार प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: (१) आपण एकनिष्ठ प्रेम कोणाला दाखवलं पाहिजे? (२) एकनिष्ठ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत रूथच्या पुस्तकातून आपण काय शिकू शकतो? (३) आज आपण एकनिष्ठ प्रेम कसं दाखवू शकतो? आणि (४) एकनिष्ठ प्रेम दाखवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

आपण एकनिष्ठ प्रेम कोणाला दाखवलं पाहिजे?

४. एकनिष्ठ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत आपण यहोवाचं अनुकरण कसं करू शकतो? (मार्क १०:२९, ३०)

मागच्या लेखात आपण पाहिलं होतं, की जे यहोवावर प्रेम करतात आणि त्याची उपासना करतात त्यांनाच तो एकनिष्ठ प्रेम दाखवतो. (दानी. ९:४) आपण देवाची प्रिय मुलं असल्यामुळे आपल्यालाही त्याचं अनुकरण करायची इच्छा आहे. (इफिस. ५:१) म्हणून आपण आपल्या भाऊबहिणींना एकनिष्ठ प्रेम दाखवलं पाहिजे. दुसऱ्‍या शब्दांत, आपण आपल्या भाऊबहिणींना जिव्हाळा आणि आपुलकी दाखवली पाहिजे.—मार्क १०:२९, ३० वाचा.

५-६. माणुसकीच्या नात्याने दाखवलेल्या प्रेमाचं एक उदाहरण द्या.

एकनिष्ठ प्रेमाचा अर्थ जितका चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ, तितकं जास्त आपल्याला ते आपल्या भाऊबहिणींना दाखवता येईल. त्यामुळे हे प्रेम आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आता आपण पाहू, की एकनिष्ठ प्रेमामध्ये आणि माणुसकीच्या नात्याने दाखवलेल्या प्रेमामध्ये काय फरक असतो.

माणुसकीच्या नात्याने दाखवलेल्या प्रेमाचं एक उदाहरण आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. एकदा पौल आणि त्याच्यासोबत असलेले लोक जहाजातून प्रवास करत होते. अचानक समुद्रात मोठं वादळ आलं आणि त्यांचं जहाज मिलिता नावाच्या बेटाजवळ येऊन फुटलं. पौल आणि त्याच्यासोबतचे लोक कसेबसे मिलिता बेटावर येऊन पोहोचले. त्या वेळी बेटावरच्या लोकांनी त्यांना मदत केली. खरंतर, बेटावरचे ते लोक पौलला आणि त्याच्यासोबतच्या लोकांना ओळखत नव्हते. त्यांच्याशी त्यांचा काहीच संबंध नव्हता. पण तरीही त्यांनी पौलला आणि त्याच्यासोबत असलेल्या लोकांना मदत केली. आणि बायबल म्हणतं, की त्यांनी त्यांना “खूप दया” दाखवली. (प्रे. कार्य. २८:२, ) पौल आणि त्याच्यासोबतच्या लोकांचं जहाज फुटलं होतं, दुर्घटना झाली होती. म्हणून, फक्‍त माणुसकीच्या नात्याने बेटावरच्या लोकांनी त्यांना प्रेम दाखवलं होतं. त्यामुळे त्याला एकनिष्ठ प्रेम म्हणता येणार नाही.

७-८. (क) एखादी व्यक्‍ती एकनिष्ठ प्रेम का दाखवते? (ख) आपण रूथच्या पुस्तकातल्या काही भागांवर का चर्चा करणार आहोत?

एकनिष्ठ प्रेम हे माणुसकीच्या नात्याने दाखवलेल्या प्रेमापेक्षा वेगळं कसं आहे? त्यासाठी बायबलमध्ये ज्यांनी एकनिष्ठ प्रेम दाखवलं, त्यांनी ते का दाखवलं यावर विचार करू या. त्यांनी ते फक्‍त करावं लागतं म्हणून किंवा फक्‍त कर्तव्य म्हणून केलं नाही, तर मनापासून इच्छा असल्यामुळे केलं. दावीदचाच विचार करा. योनाथानचे वडील दावीदला मारून टाकायचा प्रयत्न करत होते. पण तरी दावीदने आपल्या प्रिय मित्रावर, योनाथानवर एकनिष्ठ प्रेम केलं. योनाथान आपला मित्र आहे म्हणून फक्‍त कर्तव्यापोटी दावीदने त्याच्यावर प्रेम केलं नाही, तर योनाथानवर त्याचं मनापासून प्रेम होतं म्हणून त्याने ते केलं. नंतर योनाथानचा मृत्यू झाला त्याच्या कित्येक वर्षांनंतरसुद्धा दावीद त्याच्या मुलाला, म्हणजे मफीबोशेथला एकनिष्ठ प्रेम दाखवत राहिला.—१ शमु. २०:९, १४, १५; २ शमु. ४:४; ८:१५; ९:१, ६, ७.

बायबलमधल्या रूथच्या पुस्तकातूनही आपल्याला एकनिष्ठ प्रेमाबद्दल बरंच काही शिकायला मिळतं. तर चला, या पुस्तकांत सांगितलेल्या व्यक्‍तींकडून एकनिष्ठ प्रेमाच्या बाबतीत आपल्याला काय शिकायला मिळतं ते पाहू या. आणि या शिकलेल्या गोष्टी आपण आपल्या मंडळीत कशा लागू करू शकतो ते पाहू या. *

एकनिष्ठ प्रेमाच्या बाबतीत आपण रूथच्या पुस्तकातून काय शिकू शकतो?

९. यहोवा आपल्या विरुद्ध उठला आहे असं नामीला का वाटलं?

बायबलमधल्या रूथच्या पुस्तकात आपण नामी, तिची सून रूथ आणि देवावर प्रेम करणाऱ्‍या बवाज नावाच्या एका माणसाबद्दल वाचतो. बवाज हा नामीच्या पतीकडून तिचा नातेवाईक लागत होता. इस्राएलमध्ये दुष्काळ पडल्यामुळे नामी, तिचा पती आणि तिची दोन्ही मुलं मवाब देशात राहायला गेली होती. पण तिथे नामीचा पती वारला. शिवाय तिथेच तिच्या दोन्ही मुलांचं लग्नही झालं होतं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे ती दोन्ही मुलंही तिथेच वारली. (रूथ १:३-५; २:१) या दोन धक्कादायक घटनांमुळे नामी दुःखात पार बुडून गेली. ती इतकी निराश झाली, की यहोवा आपल्या विरुद्ध उठला आहे असं तिला वाटू लागलं. तिला नेमकं कसं वाटत होतं हे तिच्या शब्दांतूनच कळतं. ती म्हणाली: “यहोवाचा हात माझ्याविरुद्ध उठलाय.” ती असंही म्हणाली: “सर्वशक्‍तिमान देवाने मला फार दुःख दिलंय.” इतकंच नाही, तर ती असंपण म्हणाली: ‘यहोवाच माझा विरोधी झालाय आणि सर्वशक्‍तिमान देवानेच माझ्यावर संकटं आणलीत.’—रूथ १:१३, २०, २१.

१०. नामीचे कठोर शब्द ऐकून यहोवाला कसं वाटलं, आणि त्याने काय केलं?

१० नामीचे हे कठोर शब्द ऐकून यहोवाला तिचा राग आला का? मुळीच नाही. उलट दुःखात बुडालेल्या या विश्‍वासू स्त्रीच्या भावना त्याने समजून घेतल्या आणि तिला सहानुभूती दाखवली. कारण “अत्याचार झाल्यामुळे कधीकधी बुद्धिमान माणूसही वेड्यासारखा वागू लागतो,” हे यहोवाला माहीत आहे. (उप. ७:७) पण नामीला हे समजून घेणं गरजेचं होतं, की तिच्या या दुःखाच्या काळात यहोवा तिच्या विरोधात नाही, तर तिच्यासोबत आहे. मग यहोवाने हे कसं दाखवलं? (१ शमु. २:८) त्याने रूथला, नामीला एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची प्रेरणा दिली. आणि रुथनेही खूप प्रेमाने आणि धीराने तिला मदत केली. तिने नामीला दुःखातून सावरायला आणि यहोवाचं अजूनही तिच्यावर प्रेम आहे हे समजून घ्यायला मदत केली. रूथच्या या उदाहरणातून आपण काय शिकू शिकतो?

११. आपण दुःखात असलेल्या भाऊबहिणींची मदत का केली पाहिजे?

११ एकनिष्ठ प्रेम दुःखात असलेल्यांना मदत करायची प्रेरणा देतं.  रूथने नामीची साथ सोडली नाही, तर ती शेवटपर्यंत तिच्यासोबत राहिली. आणि हेच आपणही आपल्या भाऊबहिणींच्या बाबतीत केलं पाहिजे. ते जेव्हा दुःखी असतात, निराश असतात तेव्हा आपण त्यांच्यासोबत असलं पाहिजे. कारण आपलं त्यांच्यावर प्रेम आहे, आणि त्यांना मदत करायची आपली मनापासून इच्छा आहे. (नीति. १२:२५, तळटीप; २४:१०) प्रेषित पौलनेही हाच सल्ला आपल्याला दिला. तो म्हणाला: “निराश झालेल्यांचं सांत्वन करा, दुर्बळांना आधार द्या आणि सर्वांशी सहनशीलतेने वागा.”—१ थेस्सलनी. ५:१४.

निराश असलेल्या भाऊबहिणींचं धीराने ऐकून आपण त्यांना मदत करू शकतो (परिच्छेद १२ पाहा)

१२. एखाद्या भावाला किंवा बहिणीला मदत करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता?

१२ असं दिसून आलं आहे, की दुःखात असलेल्या एखाद्या भावाला किंवा बहिणीला मदत करायचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्यांचं धीराने ऐकणं आणि आपलं त्यांच्यावर प्रेम आहे याची त्यांना जाणीव करून देणं. दुःखात असलेल्या यहोवाच्या अशा प्रिय मेंढराकडे आपण लक्ष देतो तेव्हा यहोवा ते कधीच विसरत नाही. (स्तो. ४१:१) नीतिवचनं १९:१७ मध्ये म्हटलं आहे: “जो गोरगरिबांना मदत करतो, तो यहोवाला उसनं देतो; त्यांच्यावर केलेल्या दयेची तो परतफेड करेल.”

इस्राएल देशाला जाणाऱ्‍या रस्त्यावर, रूथ नामीला ‘मीसुद्धा तुमच्यासोबत येईन,’ अशी वारंवार विनंती करत असताना, आणि मागे अर्पा परत मवाबला जात असताना दिसत आहे (परिच्छेद १३ पाहा)

१३. रूथने जे केलं ते कौतुक करण्यासारखं का होतं, आणि त्यातून तिचं एकनिष्ठ प्रेम कसं दिसून आलं? (पहिल्या पानावरचं चित्र पाहा.)

१३ नामीच्या पतीचा आणि मुलांचा मृत्यू झाल्यानंतर नामीच्या बाबतीत काय झालं याचा जर आपण विचार केला, तर एकनिष्ठ प्रेम काय असतं हे आपल्याला आणखी चांगल्या प्रकारे समजेल. नामीने जेव्हा ऐकलं, की “यहोवाने आपल्या लोकांना अन्‍नधान्य देऊन पुन्हा आशीर्वाद दिला आहे,” तेव्हा ती मवाबमधून परत आपल्या घरी जायला निघाली. (रूथ १:६) ती निघाली तेव्हा तिच्या दोन सुनाही तिच्यासोबत जायला निघाल्या. पण जात असताना नामीने त्यांना आपल्या माहेरी मवाब देशात जायला सांगितलं. तिने तीन वेळा त्यांना परत जायला सांगितलं. मग काय झालं? तेव्हा “अर्पाने आपल्या सासूचा मुका घेतला आणि ती निघून गेली. पण रूथ नामीला सोडून जायला तयार नव्हती.” (रूथ १:७-१४) नामीने सांगितल्याप्रमाणे अर्पा परत आपल्या माहेरी मवाब देशात निघून गेली. पण रूथने जे केलं ते खरंच कौतुक करण्यासारखं होतं. कारण अर्पाप्रमाणे तीसुद्धा आपल्या माहेरी जाऊ शकली असती. पण तिने तसं केलं नाही. नामीबद्दल तिला एकनिष्ठ प्रेम असल्यामुळे ती तिच्यासोबतच राहिली. (रूथ १:१६, १७) रूथने हे फक्‍त कर्तव्य म्हणून केलं नाही, तर नामीवर तिचं मनापासून प्रेम होतं म्हणून केलं. असं करून रूथने खऱ्‍या अर्थाने एकनिष्ठ प्रेम दाखवलं. मग तिच्यापासून आपण काय शिकू शकतो?

१४. (क) आजसुद्धा आपले अनेक भाऊबहीण एकनिष्ठ प्रेम कसं दाखवतात? (ख) इब्री लोकांना १३:१६ यात सांगितल्याप्रमाणे कोणत्या गोष्टीमुळे यहोवाला आनंद होतो?

१४ एकनिष्ठ प्रेम अपेक्षेपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन दाखवलं जातं.  आजसुद्धा आपले भाऊबहीण एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवतात; अगदी अशा भाऊबहिणींनासुद्धा ज्यांना ते व्यक्‍तिगतपणे ओळखत नाहीत. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती आली हे कळताच तिथल्या भाऊबहिणींना मदत करण्यासाठी ते लगेच पुढे येतात. मंडळीत एखाद्याला आर्थिक समस्या आहे हे समजताच त्या व्यक्‍तीला कशी मदत करता येईल याचा विचार करून ते तिला व्यावहारिक मार्गांनी मदत करतात. पहिल्या शतकातल्या मासेदोनियातल्या ख्रिश्‍चनांप्रमाणेच ते एक पाऊल पुढे जाऊन प्रेम दाखवतात. आपल्या गरजू बांधवांना मदत करण्यासाठी ते अनेक त्याग करतात आणि “आपल्या ऐपतीपेक्षाही जास्त” देतात. (२ करिंथ. ८:३) असं एकनिष्ठ प्रेम पाहून यहोवाला खरंच किती आनंद होत असेल!—इब्री लोकांना १३:१६ वाचा.

आज आपण एकनिष्ठ प्रेम कसं दाखवू शकतो?

१५-१६. रूथ १:१५-१८ या वचनांतून आपल्याला रूथबद्दल कोणती गोष्ट कळते?

१५ रूथ आणि नामीच्या गोष्टीतून आपण अनेक चांगल्या गोष्टी शिकू शकतो? त्यांपैकी काहींचा आता आपण विचार करू या.

१६ प्रयत्न करत राहा.  रूथने जेव्हा नामीला म्हटलं, की ‘मीपण तुमच्यासोबत यहूदा देशात येईन,’ तेव्हा सुरुवातीला नामीने तिला रोखण्याचा प्रयत्न केला. पण रूथ तिला सोडायला तयार नव्हती. ती प्रयत्न करत राहिली. त्यामुळे पुढे काय झालं? “रूथचा निर्णय पक्का आहे हे पाहून नामीने तिला समजावण्याचं सोडून दिलं.”—रूथ १:१५-१८.

१७. कोणती गोष्ट आपल्याला प्रयत्न करत राहायला मदत करेल?

१७ आपण काय शिकतो:  हेच, की एखाद्या दुःखी किंवा निराश झालेल्या व्यक्‍तीला मदत करताना आपल्याला कदाचित खूप धीर दाखवावा लागेल. पण आपण प्रयत्न करायचं सोडू नये. मदतीची गरज असलेली एखादी बहीण सुरुवातीला कदाचित लगेच आपली मदत स्वीकारणार नाही. * पण तिच्याबद्दल आपल्याला एकनिष्ठ प्रेम असेल, तर आपण प्रयत्न करायचं सोडून देणार नाही. (गलती. ६:२) कारण तिला मदत करण्याच्या आपल्या प्रयत्नांना ती कधी ना कधी नक्कीच प्रतिसाद देईल.

१८. रूथला कोणत्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल?

१८ जास्त मनाला लावून घेऊ नका.  नामी आणि रूथ बेथलेहेममध्ये आल्या तेव्हा नामी आपल्या ओळखीच्या लोकांना भेटली. ती त्यांना म्हणाली: “मी गेले तेव्हा माझ्याकडे सगळं काही होतं, पण यहोवाने मला रिकाम्या हाती परत पाठवलंय.” (रूथ १:२१) विचार करा, नामीचे हे शब्द ऐकल्यावर रूथला कसं वाटलं असेल! कारण नामीला मदत करण्यासाठी तिने कोणतीही कसर सोडली नव्हती. ती तिच्यासोबत रडली होती, तिने तिला दिलासा दिला होता आणि कितीतरी दिवस प्रवास करून ती इथपर्यंत तिच्यासोबत आली होती. आणि इतकं सगळं करूनसुद्धा नामी आता म्हणते, की “यहोवाने मला रिकाम्या हाती परत पाठवलंय.” बाजूलाच उभ्या असलेल्या रूथने तिच्यासाठी जे काही केलं होतं त्याचा तिने एका शब्दानेसुद्धा उल्लेख केला नाही. विचार करा, या गोष्टीचं रूथला किती वाईट वाटलं असेल! पण तरीसुद्धा तिने नामीची साथ सोडली नाही.

१९. दुःखात असलेल्या भाऊबहिणींना मदत करताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१९ आपण काय शिकतो:  रूथसोबत झालं तसं आपल्यासोबतही होऊ शकतं. दुःखात असलेल्या एखाद्या बहिणीला आपण खूप मदत केली असेल, पण ती असं काहीतरी बोलून जाईल ज्यामुळे आपल्याला कदाचित खूप वाईट वाटेल. पण आपण ते जास्त मनाला लावून घेऊ नये. उलट, तिला मदतीची गरज आहे हे ओळखून तिला साथ देत राहिलं पाहिजे, आणि तिला सांत्वन देता यावं म्हणून यहोवाकडे मदत मागीतली पाहिजे.—नीति. १७:१७.

आज मंडळीतले वडील बवाजचं अनुकरण कसं करू शकतात? (परिच्छेद २०-२१ पाहा)

२०. नामीला मदत करत राहण्यासाठी रूथला कोणत्या गोष्टीमुळे बळ मिळालं?

२० गरज असते तेव्हा दिलासा द्या.  रूथने नामीला एकनिष्ठ प्रेम दाखवलं होतं. पण आता रुथला स्वतःलाच दिलासा आणि प्रोत्साहनाची गरज होती. आणि तेच करायची यहोवाने बवाजला प्रेरणा दिली. तो रूथला म्हणाला: “या सर्व गोष्टींसाठी यहोवा तुला आशीर्वाद देवो. तू ज्याच्या पंखांखाली आश्रय घ्यायला आलीस, तो इस्राएलचा देव यहोवा तुला पुरेपूर मोबदला देवो.” बवाजचे हे दिलासा देणारे शब्द ऐकून रूथला खरंच किती बरं वाटलं असेल! म्हणून ती बवाजला म्हणाली: “तुम्ही माझ्याशी प्रेमळपणे बोलून मला दिलासा दिलाय.” (रूथ २:१२, १३) रूथला गरज होती तेव्हा बवाजने तिला दिलासा दिला आणि त्यामुळे नामीला मदत करत राहायचं बळ तिला मिळालं.

२१. यशया ३२:१, २ यात सांगितल्याप्रमाणे मंडळीतल्या वडिलांनी काय केलं पाहिजे?

२१ आपण काय शिकतो:  हेच, की जे इतरांना एकनिष्ठ प्रेम दाखवतात त्यांनासुद्धा कधीकधी दिलासा आणि प्रोत्साहनाची गरज असते. रूथ नामीची खूप काळजी घ्यायची आणि त्यामुळे बवाजने तिचं कौतुक केलं. आज मंडळीतले अनेक भाऊबहीण इतरांची प्रेमळपणे काळजी घेतात. म्हणून बवाजप्रमाणेच ख्रिस्ती वडीलसुद्धा त्यांचं मनापासून कौतुक करतात. त्यामुळे इतरांची मदत करत राहायला या भाऊबहिणींना आणखी बळ मिळतं.—यशया ३२:१, २ वाचा.

जे एकनिष्ठ प्रेम दाखवतात त्यांना कसा फायदा होतो?

२२-२३. नामीच्या विचारांत कसा बदल झाला, आणि कशामुळे? (स्तोत्र १३६:२३, २६)

२२ काही काळानंतर बवाजने रूथ आणि नामीला उदारपणे भरपूर अन्‍नधान्य दिलं. (रूथ २:१४-१८) बवाजची उदारता पाहून नामीने काय केलं? ती म्हणाली: “जिवंतांवर आणि मरण पावलेल्यांवर एकनिष्ठ प्रेम दाखवण्याचं ज्याने सोडलं नाही, तो यहोवा देव त्याला आशीर्वाद देवो.” (रूथ २:२०क) नामीच्या विचारांमध्ये हा किती चांगला बदल होता! आधी ती म्हणाली होती: ‘यहोवा माझ्याविरुद्ध उठलाय.’ पण आता ती आनंदाने म्हणते: ‘यहोवाने मला एकनिष्ठ प्रेम दाखवण्याचं सोडलं नाही.’ नामीच्या विचारांमध्ये हा चांगला बदल कशामुळे झाला होता?

२३ नामीला आता जाणवू लागलं होतं, की यहोवाने तिला कधीच सोडलं नव्हतं. ती मवाब देशातून यहूदाला जायला निघाली तेव्हा यहोवाने रूथला तिच्यासोबत जाण्याची आणि तिला आधार देण्याची प्रेरणा दिली होती. (रूथ १:१६) याशिवाय, यहोवाने त्यांच्या ‘सोडवणाऱ्‍याला,’ म्हणजे बवाजलासुद्धा त्यांना प्रेमळपणे मदत करायची प्रेरणा दिली होती. * यहोवाच तिला मदत करत होता हे आता नामीला जाणवलं. (रूथ २:१९, २०ख) तिने नक्कीच असा विचार केला असेल: ‘आता मला समजलं, की यहोवाने मला कधीच सोडलं नव्हतं. माझ्या दुःखाच्या काळात तो नेहमी माझ्यासोबत होता!’ (स्तोत्र १३६:२३, २६ वाचा.) रूथ आणि बवाजने आपली मदत करायचं सोडलं नाही याबद्दल नामीने यहोवाचे किती आभार मानले असतील! शेवटी नामी आपल्या दुःखातून सावरली आणि पुन्हा उत्साहाने यहोवाची उपासना करू लागली. त्यामुळे नामीला स्वतःला, तसंच रूथ आणि बवाज यांनासुद्धा नक्कीच खूप आनंद झाला असेल.

२४. आपण एकमेकांना एकनिष्ठ प्रेम का दाखवत राहिलं पाहिजे?

२४ तर मग, रूथच्या पुस्तकातून आपण एकनिष्ठ प्रेमाबद्दल काय शिकलो? हेच, की दुःखात असलेल्या आपल्या भाऊबहिणींबद्दल आपल्या मनात जर एकनिष्ठ प्रेम असेल, तर आपण त्यांना मदत करायचं सोडणार नाही. उलट, एक पाऊल पुढे जाऊन आपण त्यांना मदत करायचा प्रयत्न करू. तसंच, मंडळीतल्या वडिलांनीसुद्धा इतरांना मदत करणाऱ्‍या भाऊबहिणींना वेळोवेळी प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे. दुःखात असलेल्या आपल्या भाऊबहिणींना आपण जेव्हा मदत करतो आणि त्यामुळे ते पुन्हा उत्साहाने यहोवाची सेवा करू लागतात, तेव्हा आपल्यालाही खूप आनंद होतो. (प्रे. कार्यं २०:३५) तर एकनिष्ठ प्रेम दाखवण्याची अशी अनेक कारणं आपल्याकडे आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला यहोवाचं अनुकरण करायचं आहे आणि त्याला खूश करायचं आहे. कारण यहोवा ‘एकनिष्ठ प्रेमाने भरलेला’ देव आहे.—निर्ग. ३४:६; स्तो. ३३:२२.

गीत ३५ देवाच्या धीराबद्दल कृतज्ञता

^ परि. 5 आपण आपल्या भाऊबहिणींना एकनिष्ठ प्रेम दाखवावं असं यहोवाला वाटतं. एकनिष्ठ प्रेम काय असतं हे आणखी चांगल्या प्रकारे समजण्यासाठी प्राचीन काळातल्या देवाच्या काही सेवकांची उदाहरणं आपल्याला मदत करतील. या लेखात आपण रूथ, नामी आणि बवाज यांच्या उदाहरणांतून काय शिकायला मिळतं ते पाहू.

^ परि. 8 या लेखात सांगितलेल्या गोष्टी आणखी चागंल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही आधीच रूथ पुस्तकाचा १ आणि २ अध्याय वाचून ठेवू शकता.

^ परि. 17 आपण नामीच्या उदाहरणावर विचार करत असल्यामुळे इथे गरजू बहिणींचा उल्लेख केला आहे. पण या लेखात दिलेले मुद्दे भावांनाही तितकेच लागू होतात.

^ परि. 23 रूथ आणि नामीसाठी बवाजने “सोडवणारा” म्हणून आपली जबाबदारी कशी पार पाडली याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा  या पुस्तकातला, “सद्‌गुणी स्त्री” हा पाचवा अध्याय पाहा.