व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

खरा उद्देश असलेल्या जीवनाच्या शोधात

खरा उद्देश असलेल्या जीवनाच्या शोधात

मी भूमध्य समुद्राच्या अगदी मधोमध होतो. जहाजाने प्रवास करत असताना माझ्या लक्षात आलं, की जहाजाला एका ठिकाणी छिद्र आहे आणि त्यातून भरपूर पाणी आत शिरत आहे. त्यात अचानाक वादळ सुरू झालं. मी भयंकर घाबरलो आणि बऱ्‍याच वर्षांनंतर पहिल्यांदाच देवाला प्रार्थना केली. पण मी या संकटात कसा सापडलो ते सुरुवातीपासून सांगतो.

सात वर्षांचा असताना, मी माझ्या कुटुंबासोबत ब्राझीलमध्ये राहत होतो

माझा जन्म १९४८ साली नेदरलँड्‌समध्ये झाला. त्याच्या पुढच्याच वर्षी माझं कुटुंब ब्राझीलमधल्या साओ पाउलो इथे राहायला गेलं. माझे आईवडील खूप धार्मिक होते. ते नेहमी चर्चला जायचे आणि रोज संध्याकाळी जेवल्यानंतर आम्ही एकत्र मिळून बायबल वाचायचो. मग १९५९ मध्ये आम्ही पुन्हा दुसरीकडे, म्हणजे अमेरिकेत राहायला गेलो. तिथे आम्ही मॅसेच्युसेट्‌स राज्यात कायमचं सेटल झालो.

आठ जणांचं कुटुंब सांभाळण्यासाठी वडील खूप कष्ट करायचे. त्यांनी वेगवेगळी कामं केली. कधी सेल्समन म्हणून तर कधी रस्ते बनवण्याच्या कामात कामगार म्हणून. शेवटी त्यांना एका आंतरराष्ट्रीय एअरलाईनमध्ये नोकरी मिळाली. जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली तेव्हा आम्ही सगळेच खूप खूश झालो. कारण या नोकरीच्या निमित्ताने आता आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला मिळणार होतं.

शाळेत असताना मी नेहमी विचार करायचो, ‘मोठा झाल्यावर मी काय बनणार?’ माझे काही मित्र पुढचं शिक्षण घेण्यासाठी युनिव्हर्सिटीत गेले, तर काही जण मिलिट्रीत भरती झाले. मला मात्र मिलिट्रीत जायचं नव्हतं. कारण लढायचं सोडा, साधं भांडायलासुद्धा मला आवडत नव्हतं. म्हणून मिलिट्रीत जायचं टाळण्यासाठी मी युनिर्व्हर्सिटीत शिकायला गेलो. पण इतरांना मदत करायची इच्छा माझ्या मनात कुठेतरी होती. कारण त्यामुळे माझ्या जीवनाला काहीतरी अर्थ मिळेल असं मला वाटायचं.

माझे युनिव्हर्सिटीतले दिवस

कित्येक वर्षं मी खरा उद्देश असलेलं जीवन शोधत होतो

 

जीवनाची सुरुवात कशी झाली याबद्दल मला नेहमीच कुतुहल होतं. त्यामुळे युनिव्हर्सिटीत गेल्यावर मी मानवशास्त्राचा विषय निवडला. त्यात आम्हाला उत्क्रांतिवादाबद्दल शिकवलं जायचं, आणि अशी अपेक्षा केली जायची की तेच खरंय असं आम्ही मानावं. पण त्यातल्या काही गोष्टींमध्ये काहीच लॉजिक नव्हतं आणि तरीही डोळे झाकून आम्हाला त्यावर विश्‍वास ठेवावा लागायचा. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून ही पद्धत अगदीच चुकीची होती.

शिवाय, अभ्याक्रमात नैतिक मूल्यांबद्दल तर काहीच शिकवलं जात नव्हतं. उलट, कसंही करून आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं यावरच जोर दिला जायचा. मला पार्ट्यांमध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत मौज करण्यात आणि ड्रग्ज घेण्यात आनंद वाटायचा. पण हा आनंद काही क्षणांचाच होता. त्यामुळे ‘यालाच खरं जीवन म्हणायचं का?’ असा प्रश्‍न मला भेडसावू लागला.

मग काही काळानंतर मी बोस्टन शहरातल्या एका युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घेतलं. फी भरण्यासाठी मी उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करायचो. तिथेच मी पहिल्यांदा एका यहोवाच्या साक्षीदाराला भेटलो. तो माझ्यासोबतच काम करायचा. त्याने मला दानीएलच्या चवथ्या अध्यायात सांगितलेल्या ‘सात काळांच्या’ भविष्यवाणीचा अर्थ समजावून सांगितला, आणि म्हटलं की ‘आज आपण शेवटच्या काळात जगतोय.’ (दानी.४:१३-१७) माझ्या लगेच लक्षात आलं, की मी जर या विषयांवर त्याच्याशी अशीच चर्चा करत राहिलो आणि त्यांवर जर माझा विश्‍वास बसला, तर मला माझ्या जीवनात खूपसारे बदल करावे लागतील. त्यामुळे मी त्याला नेहमी टाळायचा प्रयत्न करायचो.

मला दक्षिण अमेरिकेत जाऊन लोकांची सेवा करायची होती. म्हणून मी तसाच अभ्यासक्रम निवडला. गरजू लोकांना मदत केल्याने माझ्या जीवनाला एक उद्देश मिळेल असं मला वाटायचं. पण माझ्या लक्षात आलं, की यातूनही माझ्या जीवनाला काही विशेष अर्थ मिळणार नाही. शेवटी, निराश होऊन मी माझं शिक्षण अर्धवटच सोडून दिलं.

जीवनाचा उद्देश शोधण्यासाठी मी दूरदूरच्या देशांत फिरत राहीलो

१९७० च्या मे महिन्यात मी नेदरलँड्‌समधल्या ॲम्सटरडॅममध्ये राहायला गेलो. वडील ज्या एअरलाईन कंपनीत काम कराचे त्याच कंपनीत मलापण काम मिळालं होतं. या नोकरीच्या निमित्ताने मी भरपूर प्रवास केला. मी आफ्रिका, अमेराका, युरोप आणि आशिया खंडातल्या वेगवेगळ्या देशांत गेलो. मला एक गोष्ट लक्षात आली, की देश कुठलाही असो तिथे मोठमोठ्या समस्या होत्या आणि त्या कशा सोडवायच्या हे कोणालाही माहीत नव्हतं. म्हणून आपण आयुष्यात काहीतरी चांगलं साध्य केलं पाहिजे या उमेदीने मी बोस्टन शहरातल्या त्याच युनिव्हर्सिटीत पुन्हा ॲडमिशन घेतलं.

पण शिकत असताना मला लवकरच हे जाणवलं, की जीवनाबद्दल असलेल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरं मला अजूनही मिळत नाहीएत. काय करावं हे सूचत नसल्यामुळे मी मानवशास्त्राच्या प्रोफेसरांशी बोललो. तेव्हा ते मला म्हणाले: “मग इथे काय करतोस, सोडून दे!” हे ऐकून मी चपापलोच. पण एका क्षणाचाही विचार न करता मी कायमचाच युनिव्हर्सिटीतून बाहेर पडलो.

पण माझ्या जीवनाला अजूनही काहीच उद्देश नाही हे मला जाणवत होतं. त्यामुळे मी अशा एका गटात सामील झालो ज्यांतले लोक रूढी-परंपरा मानत नव्हते. पण लोकांना प्रेमाने आणि शांतीने राहायचं प्रोत्साहन देत होते. मग काही मित्रांना घेऊन मी अमेरिकेतून प्रवास करत करत खाली मेक्सिकोच्या अकापुल्को शहरात पोचलो. तिथे आम्ही स्वच्छंदी जीवन जगणाऱ्‍या हिप्पी लोकांसोबत काही दिवस काढले. पण मला दिसून आलं, की त्यांच्या जीवनाला काहीच अर्थ नव्हता. आणि आनंद फक्‍त नावालाच होता. उलट, त्यांच्या अशा जीवनशैलीत नैतिकतेची जागा बेईमानीने आणि विश्‍वासघाताने घेतली होती.

माझा शोध शेवटी जहाजावर आला

माझ्या मित्रासोबत मिळून, मी एक सुंदरसं बेट शोधत होतो

याच काळात माझ्या बालपणीचं स्वप्न पुन्हा मनात डोकावू लागलं. मला समुद्रप्रवास करायचा होता, पण जहाजाचा कॅप्टन म्हणून. आणि हे स्वतःचं जहाज असल्याशिवाय शक्य नव्हतं. टॉम नावाच्या माझ्या एका मित्राचंपण असंच स्वप्न होतं. म्हणून आम्ही दोघांनी मिळून जगाची सफर करायचा निश्‍चय केला. मला समाजाच्या बंधनांपासून लांब असलेलं एक सुंदरसं बेट शोधायचं होतं, जिथे मला राहता येईल.

मी आणि टॉम, स्पेनच्या बार्सलोना शहरातल्या एरेनिस-डे-मार इथे गेलो. तिथे आम्ही लीग्रा नावाचं ३१ फूटांचं शिडाचं एक जहाज विकत घेतलं. ते समुद्रात नेता यावं म्हणून आम्ही त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू केलं. आम्हाला कुठेही पोचायची घाई नव्हती, म्हणून आम्ही त्याचं इंजिन काढलं आणि त्या ठिकाणी पिण्याचं पाणी ठेवायची व्यवस्था केली. छोट्या छोट्या बंदरांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही १६ फुटांचे दोन वल्हे घेतले. शेवटी, आम्ही हिंदी महासागरातल्या सेशेल्स द्वीप-समूहाला जायला निघालो. आफ्रिकेच्या पश्‍चिम किनारपट्टीवरून दक्षिण आफ्रिकेतल्या केप-ऑफ-गुड-होपला वळसा घालून पुढे जायचा आमचा बेत होता. नक्षत्रांचा आणि ताऱ्‍यांची स्थिती पाहून, नकाशांचा आणि पुस्तकांचा उपयोग करून, तसंच छोट्या-छोट्या उपकरणांचा उपयोग करून आम्ही दिशा ठरवायचो. या सगळ्या गोष्टींचा वापर करून आम्हाला आमचं ठिकाण किती अचूकपणे शोधता येत होतं या गोष्टीचं मला नवल वाटायचं.

पण थोडंच अंतर कापल्यानंतर, हे जुनं लाकडी जहाज प्रवासासाठी योग्य नाही हे आमच्या लक्षात आलं. जहाजाला एक मोठं छिद्र होतं आणि त्यातून दर तासाला अंदाजे २२ लीटर पाणी आत शिरत होतं. आणि सुरुवातीला म्हटलं, त्याप्रमाणे मी भयंकर घाबरलो होतो आणि बऱ्‍याच वर्षांनंतर पहिल्यांदाच मी देवाला प्रार्थना केली. मी त्याला असं वचन दिलं, की ‘जर मी वाचलो, तर तुला जाणून घ्यायचा प्रयत्न करीन.’ बघता बघता वादळ शांत झालं आणि मी माझं वचन पाळलं.

समुद्रात असतानाच मी बायबल वाचायला सुरुवात केली. विचार करा क्षितिजापर्यंत पाणीच पाणी दिसतंय. आजूबाजूला मासे आणि डॉल्फीन पाण्याबाहेर उसळी मारताएत. आणि डोळ्यात भरणारं ते दृश्‍य बघत भूमध्य समुद्रात मी माझ्या जहाजात वाचत बसलोय. रात्रीच्या वेळी ताऱ्‍यांनी भरलेलं आकाश पाहून मी रोमांचित व्हायचो. मानवांची काळजी करणारा कोणीतरी देव असला पाहिजे याची मला आणखीनच खातरी पटू लागली.

समुद्रात काही आठवडे घालवल्यानंतर आम्ही स्पेनमधल्या ॲलिकांटे बंदरावर आलो. तिथे आम्ही आमचं जहाज विकायला काढलं. हे जहाज विकून आम्हाला नवीन जहाज घ्यायचं होतं. पण इंजिन नसलेलं असं जुनं, फुटकं जहाज कोण घेणार? पण गिऱ्‍हाईक मिळेपर्यंत बायबल वाचायला मला चांगला वेळ मिळाला.

मी जितकं वाचत गेलो तितकी मला खातरी पटू लागली की बायबल हे एक असं पुस्तक आहे, ज्यात जीवनात यशस्वी होण्यासाठी मोलाचं मार्गदर्शन दिलं आहे. बायबलमध्ये शुद्ध नैतिक जीवन जगण्याबद्दल अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. पण मग स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारा मी आणि इतर अनेक जण याकडे का दुर्लक्ष करतात हे मला समजत नव्हतं.

मी स्वतःमध्ये बदल करायचं आणि त्यासाठी लागतील त्या गोष्टी करायचं ठरवलं. मी ड्रग्ज घ्यायचं सोडून दिलं. बायबलच्या उच्च नैतिक स्तरांप्रमाणे जीवन जगणारी माणसं नक्कीच असतील असं मला वाटायचं आणि त्यांना भेटायची माझी इच्छा होती. देवाने त्यांच्याशी माझी भेट घालून द्यावी म्हणून मी दुसऱ्‍यांदा देवाला प्रार्थना केली.

खऱ्‍या धर्माचा शोध

खरा धर्म शोधायचा असेल तर एकेक करून प्रत्येक धर्माचा अभ्यास केला पाहिजे असं मला वाटत होतं. ॲलिकांटे शहरातून फेरफटका मारत असताना मला बरीच धार्मिक स्थळं दिसली. पण बहुतेक सगळ्याच ठिकाणी मूर्ती किंवा प्रतिमा होत्या. म्हणून मनातल्या मनात मी त्यांच्यावर फुली मारली.

एका रविवारी, दुपारच्या वेळी मी एका टेकडीवर बसलो होतो. तिथून संपूर्ण बंदर दिसत होतं. मी याकोब २:१-५ ही वचनं वाचत होतो. त्यात असं सांगितलंय की आपण गरीब-श्रीमंत असा भेदभाव करू नये. मग काही वेळाने पुन्हा जहाजाकडे जाताना मला एक धार्मिक स्थळ दिसलं. त्याच्या प्रवेशद्वारावर, “यहोवाच्या साक्षीदारांचं राज्य सभागृह,” असं लिहिलं होतं.

मी विचार केला, ‘यांचीपण परीक्षा घेऊन बघावी. ते माझ्याशी कसं वागतात ते बघू या.’ म्हणून मी वाढलेली दाढी घेऊन आणि फाटकी जीन्स घालून अनवाणी पायांनी त्या सभागृहात गेलो. तिथे दारातच एका व्यक्‍तीने माझं स्वागत केलं आणि मला एका वयस्कर स्त्रीच्या शेजारी नेऊन बसवलं. त्या स्त्रीने खूप प्रेमाने मला वक्त्याने सांगितलेली शास्त्रवचनं शोधायला मदत केली. सभा संपल्यावर सगळे जण मला खूप आपुलकीने भेटू लागले. ते पाहून मी भारावून गेलो. त्यांच्यातल्या एकाने मला चर्चा करण्यासाठी आपल्या घरी बोलवलं. पण माझं बायबल वाचून पूर्ण झालं नव्हतं. म्हणून मी त्याला म्हटलं: “मी सांगेन तुम्हाला.” सभांना मात्र मी न चुकता जात राहिलो.

पुढे बऱ्‍याच आठवड्यांनी मी त्या व्यक्‍तीच्या घरी गेलो. मी त्याला बायबलबद्दल बरेच प्रश्‍न विचारले आणि त्याने मला त्यांची उत्तरं दिली. मग एका आठवड्यानंतर त्याने मला एक बॅग दिली. त्यात चांगले चांगले कपडे होते. त्याने मला सांगितलं, की हे कपडे ज्याचे आहेत तो सध्या जेलमध्ये आहे. कारण, एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा पाळण्यासाठी त्याने युद्धात भाग घ्यायला नकार दिला. (यश. २:४; योहा. १३:३४, ३५) आता मला पक्की खातरी पटली, की मी आजपर्यंत ज्यांच्या शोधात होतो ते लोक मला सापडले आहेत! मी अशा लोकांना शोधत होतो जे बायबलमध्ये सांगितलेल्या शुद्ध, नैतिक तत्त्वांचं पालन करत होते. आता मला एक सुंदरसं बेट शोधायचं नव्हतं, तर बायबलचा सखोल अभ्यास करायचा होता. म्हणून मी परत नेदरलँड्‌सला गेलो.

नोकरीच्या शोधात

चार दिवसांचा प्रवास करून मी नेदरलँड्‌समधल्या ग्रोनिनगन शहरात पोचलो. तिथे मला माझा खर्च भागवण्यासाठी नोकरीची गरज होती. मी एका फर्निचरच्या दुकानात नोकरीसाठी अर्ज केला. अर्जामध्ये माझ्या धर्माबद्दल विचारण्यात आलं होतं. मी “यहोवाचा साक्षीदार” असं टाकून दिलं. दुकानाच्या मालकाने ते वाचलं आणि त्याचा चेहराच बदलला. तो म्हटला, “मी तुला कॉल करतो.” पण त्याचा कॉल कधीच आला नाही.

म्हणून मग मी फर्निचरच्या दुसऱ्‍या एका दुकानात काही काम मिळेल का असं विचारलं. त्याने मला माझा डिप्लोमा आणि आधी केलेल्या कामाचा अनुभव विचारला. मी त्याला सांगितलं की मी एका लाकडी जहाजाच्या दुरुस्तीचं काम केलंय. आणि आश्‍चर्य म्हणजे त्याने लगेच मला दुपारपासून काम सुरू करायला सांगितलं. पण एक अट घातली: “तुझ्यामुळे इथे काहीही प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे. कारण मी एक यहोवाचा साक्षीदार आहे आणि बायबलच्या तत्त्वांप्रमाणे चालतो.” मी एकदम चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, “मीपण साक्षीदार आहे!” पण माझा अवतार बघून तो मला म्हणाला, “ठीकए, मग मी तुझ्यासोबत बायबल अभ्यास सुरू करतो!” मीही लगेच तयार झालो. आत्ता मला समजलं, की त्या आधीच्या मालकाने मला का कॉल केला नाही. खरंच, यहोवा माझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करत होता. (स्तो. ३७:४) त्या बांधवाच्या दुकानात मी वर्षभर काम केलं. त्या दरम्यान त्याने माझा बायबल अभ्यास घेतला आणि जानेवारी १९७४ ला मी बाप्तिस्मा घेतला.

शेवटी मला जीवनाचा उद्देश सापडला!

पुढच्याच महिन्यात मी एक नवीन करियर निवडलं—मी पायनिर सेवा सुरू केली आणि त्यातून मला खूप समाधान मिळालं. त्यानंतरच्या महिन्यात मी ॲम्सटरडॅमला नुकत्याच सुरू झालेल्या स्पॅनिश भाषेच्या एका गटाला मदत करण्यासाठी गेलो. स्पॅनिश आणि पोर्तुगीज भाषांमध्ये बायबल अभ्यास घेताना मला खूप मजा यायची. मग मे १९७५ ला मला खास पायनियर म्हणून सेवा करायची संधी मिळाली.

एके दिवशी ईनेके नावाची एक पायनियर बहीण आमच्या स्पॅनिश सभेला आली. तिला तिच्या एका बायबल विद्यार्थ्याला आमच्या मंडळीतल्या स्पॅनिश भाऊबहिणींशी ओळख करून द्यायची होती. तिथूनच माझी आणि ईनेकेची ओळख झाली आणि आम्ही एकमेकांना पत्र लिहू लागलो. लवकरच आमच्या लक्षात आलं, की आमच्या दोघांची ध्येयं सारखीच आहेत. मग १९७६ मध्ये आम्ही लग्न केलं आणि १९८२ पर्यंत आम्ही दोघांनी मिळून पायनियर सेवा केली. त्यानंतर गिलियड प्रशालेच्या ७३ व्या वर्गासाठी आम्हाला बोलवण्यात आलं. त्यानंतर आम्हाला पूर्व आफ्रिकेला सेवा करण्यासाठी पाठवलं गेलं. आमच्यासाठी ती खरंच खूप आनंदाची गोष्ट होती. आम्ही केनियातल्या मोम्बासा या ठिकाणी पाच वर्षं सेवा केली. मग १९८७ साली आम्हाला टान्झानियाला सेवा करायला पाठवण्यात आलं. कारण तिथे प्रचारकार्यावरची बंदी उठवण्यात आली होती. तिथे २६ वर्षं सेवा केल्यावर आम्ही पुन्हा केनियाला आलो.

पूर्व आफ्रिकेतल्या लोकांना बायबलची सत्यं शिकवण्यात मला आणि माझ्या पत्नीला खूप आनंद मिळायचा

नम्र मनाच्या लोकांना बायबलचं सत्य शिकवल्यामुळे आमच्या जीवनाला खरा अर्थ मिळाला. मला आठवतं, मोम्बासामधला माझा पहिला बायबल विद्यार्थी मला पब्लिक विटनेसिंग करताना भेटला होता. मी त्याला दोन मासिकं दिली तेव्हा त्याने मला विचारलं, “हे संपल्यावर पुढे काय?” आम्ही पुढच्याच आठवड्यात, तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल  या पुस्तकातून बायबल अभ्यास सुरू केला. हे पुस्तक नुकतंच स्वाहिली भाषेत प्रकाशित झालं होतं. त्या माणसाने पुढच्याच वर्षी बाप्तिस्मा घेतला आणि तो एक रेग्यूलर पायनियर बनला. तेव्हापासून त्याने आणि त्याच्या पत्नीने मिळून जवळपास १०० लोकांना सत्यात यायला आणि बाप्तिस्मा घ्यायला मदत केली.

यहोवा आपल्या लोकांना खरा उद्देश असलेलं जीवन कसं देतो हे मी आणि ईनेकेने स्वतः अनुभवलंय!

जीवनाचा उद्देश काय आहे हे मला पहिल्यांदा समजलं, तेव्हा मला बायबलमधल्या त्या व्यापाऱ्‍यासारखंच वाटलं. या व्यापाऱ्‍याला एक मौल्यवान मोती सापडला तेव्हा त्याला तो कोणत्याही परिस्थितीत गमावायचा नव्हता. (मत्त. १३:४५, ४६) आता मला जीवनाचा उद्देश शोधायला इतरांनापण मदत करायची होती. खरंच, यहोवा आपल्या लोकांना खरा उद्देश असलेलं जीवन कसं देतो हे मी आणि माझ्या पत्नीने स्वतः अनुभवलंय!