व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४६

नवीन जोडप्यांनो—यहोवाच्या सेवेला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्या

नवीन जोडप्यांनो—यहोवाच्या सेवेला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व द्या

‘यहोवा माझी ताकद आहे; मी मनापासून त्याच्यावर भरवसा ठेवतो.’—स्तो. २८:७.

गीत ३६ “देवाने जे जोडले”

सारांश *

१-२. (क) अलीकडेच लग्न झालेल्या जोडप्यांनी यहोवावर विसंबून राहणं का महत्त्वाचं आहे? (स्तोत्र ३७:३, ४) (ख) या लेखात आपण काय पाहणार आहोत?

तुम्ही लग्न करायचा विचार करत आहात का? किंवा तुमचं नुकतंच लग्न झालं आहे का? असेल, तर आपल्या जोडीदारासोबत आनंदाने आयुष्य घालवण्याची स्वप्नं तुम्ही नक्कीच पाहत असाल. पण लग्न म्हटलं की समस्या आणि अडचणी आल्याच. शिवाय, अनेक महत्त्वाचे निर्णयही आलेच. या समस्यांना तुम्ही कसं तोंड देता आणि महत्त्वाचे निर्णय कसे घेता, यावरूनच तुमचं पुढचं आयुष्य कितपत आनंदी असेल हे ठरतं. पण या बाबतीत जर तुम्ही यहोवावर विसंबून राहिलात, तर तुम्ही जीवनात चांगले निर्णय घ्याल, एकमेकांसोबतचं तुमचं नातं आणखी घट्ट होईल आणि तुमच्या जीवनातला आनंद टिकून राहील. याउलट, तुम्ही जर देवाचा दृष्टिकोन विचारात घेतला नाही, तर तुमच्या जीवनात जास्त समस्या येऊ शकतात. त्यामुळे तुमचं नातं कमजोर होईल आणि तुमच्या जीवनातला आनंद नाहीसा होईल.—स्तोत्र ३७:३, ४ वाचा.

हा लेख नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना लक्षात ठेवून लिहिलेला असला, तरी यात ज्या समस्यांवर चर्चा करण्यात आली आहे त्यांचा लग्न झालेल्या सगळ्यांनाच सामना करावा लागतो. या लेखात आपण बायबल काळातल्या अशा विश्‍वासू स्त्री-पुरुषांबद्दल पाहणार आहोत ज्यांचं आपल्यासाठी खूप चांगलं उदाहरण आहे. त्यांच्याकडून आपण अशा काही गोष्टी शिकू शकतो ज्यांचा जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात, अगदी वैवाहिक जीवनातसुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. तसंच, आजच्या काळातल्या काही विवाहित जोडप्यांच्या अनुभवातून आपल्याला काय शिकायला मिळेल तेही आपण या लेखात पाहू.

नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसमोर कोणत्या समस्या येऊ शकतात?

नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना कोणत्या निर्णयांमुळे आपली सेवा वाढवणं कठीण जाऊ शकतं? (परिच्छेद ३-४ पाहा)

३-४. अलीकडेच लग्न झालेल्या जोडप्यांसमोर कोणत्या समस्या येऊ शकतात?

काही जण नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना चारचौघांसारखं नॉर्मल लाईफ जगायचा सल्ला देतील. जसं की, घरातले लोक, नातेवाईक किंवा मित्रमंडळी त्यांना असं म्हणतील, की ‘आता लग्न झालंय, तर लवकरच मूल होऊ दया.’ किंवा, ‘आता लवकरच स्वतःचं घर घ्या आणि संसार उभा करा.’

पण अशा वेळी, नवीन जोडप्यांनी जर काळजी घेतली नाही, तर ते असे निर्णय घेऊन बसतील ज्यामुळे कदाचित त्यांना कर्जबाजारी व्हावं लागेल. आणि मग ते कर्ज फेडण्यासाठी पती-पत्नी दोघांनाही जास्त वेळ नोकरी करावी लागेल. त्यामुळे जो वेळ वैयक्‍तिक बायबल अभ्यासासाठी, कौटुंबिक उपासनेसाठी आणि सेवाकार्यासाठी त्यांनी दिला पाहिजे तो नोकरी-व्यवसायातच खर्च होईल. आणि काही वेळा तर जास्त पैसे कमावण्यासाठी किंवा नोकरी टिकवून ठेवण्यासाठी त्यांना ओव्हरटाईमही करावा लागू शकतो. त्यामुळे कदाचित त्यांना सभासुद्धा चुकवाव्या लागतील. आणि असं जर झालं, तर यहोवाची जास्तीत जास्त सेवा करायची संधी ते गमावून बसतील.

५. केविन आणि मेरीच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

बहुतेक लोकांचा अनुभव दाखवून देतो, की पैसा आणि धनसंपत्ती कमवायच्या नादात ते आपल्या जीवनातला आनंद गमावून बसतात. केविन आणि मेरी काय म्हणतात याकडे लक्ष द्या. * त्यांचं लग्न झालं तेव्हा दोघंही फुल-टाईम काम करू लागले. त्यांचं असं म्हणणं होतं, की भरपूर पैसा आणि मालमत्ता असली तर आपल्याला सुखात आयुष्य जगता येईल. पण मनात कुठेतरी त्यांना हे जाणवत होतं, की आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळत नाही. केविन म्हणतो: “आम्हाला गरज होती त्यापेक्षा जास्त आमच्याकडे होतं. पण यहोवाची जास्तीत जास्त सेवा करायचं कोणतंही ध्येय आमच्यासमोर नव्हतं. खरं सांगायचं तर आमचं आयुष्य गुंतागुंतीचं झालं होतं आणि आम्ही तणावाखाली जगत होतो.” केविन आणि मेरीने जे अनुभवलं ते कदाचित तुम्हीही अनुभलं असेल. खरं समाधान पैशातून किंवा धनसंपत्तीतून मिळत नाही हे तुम्हालाही जाणवलं असेल. पण निराश होण्याची गरज नाही. कारण इतरांच्या चांगल्या उदाहरणांतून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल. सगळ्यात आधी यहोशाफाट राजाच्या उदाहरणातून पती काय शिकू शकतात ते आपण पाहू या.

यहोशाफाट राजासारखं यहोवावर विसंबून राहा

६. नीतिवचनं ३:५, ६ मध्ये दिलेल्या सल्ल्याप्रमाणे संकट आल्यावर यहोशाफाट राजाने काय केलं?

पतींनो, तुम्हाला कधी असं वाटलं का की तुम्ही जबाबदारीच्या ओझ्याखाली पार दबून गेला आहात? असाल, तर यहोशाफाट राजाच्या उदाहरणातून तुम्हाला नक्कीच एक चांगली गोष्ट शिकायला मिळेल. एक राजा म्हणून अख्ख्या राष्ट्राची जबाबदारी त्याच्यावर होती. मग ही जबाबदारी त्याने कशी पार पाडली? आपल्या प्रजेचं संरक्षण करण्यासाठी त्याला जे काही करता येत होतं, ते त्याने केलं. त्याने आपल्या शहरांच्या भिंती मजबूत केल्या आणि आपल्या सैन्यात ११ लाख ६० हजारांहून जास्त योद्धे उभे केले. (२ इति. १७:१२-१९) पण अशी एक वेळ आली जेव्हा त्याला एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. अम्मोनी, मवाबी आणि सेईरच्या डोंगराळ प्रदेशातल्या लोकांचं एक भलंमोठं सैन्य त्याच्यावर चाल करून आलं. (२ इति. २०:१, २) मग यहोशाफाटने काय केलं? नीतिवचनं ३:५, ६ (वाचा.) यात दिलेल्या सल्ल्याप्रमाणे त्याने मदतीसाठी यहोवाकडे याचना केली. त्याने यहोवाला किती कळकळून प्रार्थना केली ते आपल्याला २ इतिहास २०:५-१२ मध्ये वाचायला मिळतं. स्वर्गातल्या आपल्या प्रेमळ पित्यावर त्याचा खरंच खूप भरवसा होता हे त्याच्या शब्दांवरून दिसून येतं. मग यहोशाफाटच्या प्रार्थनेला यहोवाने कसं उत्तर दिलं?

७. यहोवाने यहोशाफाटच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं?

यहोवाने यहजिएल नावाच्या एक लेव्याचा वापर करून यहोशाफाटला असं सांगितलं: “तुम्ही फक्‍त आपल्या जागी स्थिर उभे राहा आणि यहोवा तुम्हाला कसं वाचवेल ते पाहा.” (२ इति. २०:१३-१७) ही गोष्ट खूपच वेगळी होती. कारण युद्धात कोणीही नुसतंच उभं राहत नाही, त्याला लढावंच लागतं. पण यहोशाफाटला हे कोणत्या माणसाने नाही, तर स्वतः यहोवाने सांगितलं होतं. त्यामुळे यहोशाफाटने यहोवाच्या शब्दांवर भरवसा ठेवून जसं सांगितलं होतं तसंच केलं. तो आणि त्याचे लोक शत्रूंचा सामना करायला गेले तेव्हा त्याने आपल्या सैन्यासमोर शूर योद्ध्यांना नाही, तर यहोवाची स्तुती करणाऱ्‍या लेव्यांना ठेवलं. त्या लेव्यांच्या हातांत कोणतंही शस्त्र नव्हतं. यहोशाफाटने दाखवलेला हा भरवसा यहोवाने वाया जाऊ दिला नाही. त्याने शत्रूच्या सैन्यांचा नाश केला.—२ इति. २०:१८-२३.

नवीन जोडप्यांनी प्रार्थना आणि बायबलचा अभ्यास केला, तर त्यांना यहोवाच्या सेवेला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देता येईल (परिच्छेद ८, १० पाहा)

८. यहोशाफाटच्या उदाहरणातून पती काय शिकू शकतात?

पतींनो, यहोशाफाटच्या उदाहरणांतून तुम्ही बरंच काही शिकू शकता. तुमच्यावरही कुटुंबाची जबाबदारी आहे. आणि घरच्यांना सांभाळण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही नक्कीच खूप मेहनत घेत असाल. पण जेव्हा एखादी समस्या येते तेव्हा तुम्हाला कदाचित वाटेल, की ‘ही समस्या मी स्वतः सोडवू शकतो.’ पण अशा वेळी स्वतःच्या ताकदीवर विसंबून राहण्याची चूक करू नका. उलट, मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करा. इतकंच नाही, तर आपल्या पत्नीसोबत मिळून यहोवाला कळकळीची विनंती करा. तसंच, बायबलचा आणि संघटनेच्या प्रकाशनांचा अभ्यास करा आणि त्यातून मिळालेलं मार्गदर्शन आणि सल्ला लागू करा. बायबलमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार तुम्ही निर्णय घ्याल तेव्हा सगळ्यांनाच ते पटणार नाही. ते कदाचित तुम्हाला मूर्ख म्हणतील. ‘जगात पैशाशिवाय काही चालत नाही. पैसा आहे, तर सगळं आहे,’ असंही ते म्हणतील. पण अशा वेळी यहोशाफाटचं उदाहरण लक्षात ठेवा. तो यहोवावर विसंबून राहिला आणि ही गोष्ट त्याने आपल्या कामातून दाखवून दिली. यहोवाने आपल्या या विश्‍वासू सेवकाला सोडलं नाही, आणि तो तुम्हालाही सोडणार नाही. (स्तो. ३७:२८; इब्री १३:५) मग, जीवनात खरा आनंद अनुभवण्यासाठी पती-पत्नी आणखी काय करू शकतात?

यशया संदेष्ट्याप्रमाणे आणि त्याच्या पत्नीप्रमाणे यहोवाच्या सेवेला सगळ्यात जास्त महत्त्व द्या

९. विवाहित जोडप्यांसाठी यशया संदेष्टा आणि त्याची पत्नी एक चांगलं उदाहरण का आहेत?

यशया संदेष्टा आणि त्याची पत्नी यांच्यासाठी यहोवाची सेवा सगळ्यात महत्त्वाची होती. यशया तर संदेष्टा होताच, पण बायबलमध्ये त्याच्या पत्नीलाही “संदेष्टी” म्हटलं आहे. त्याअर्थी, तीसुद्धा भविष्यवाणी सांगायचं काम करत असावी. (यश. ८:१-४) खरंच, यशयाने आणि त्याच्या पत्नीने यहोवाच्या सेवेला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देऊन विवाहित जोडप्यांसाठी किती चांगलं उदाहरण मांडलं आहे!

१०. यहोवाची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी विवाहित जोडप्यांना कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?

१० आज विवाहित जोडपी यशया संदेष्ट्याचं आणि त्याच्या पत्नीचं अनुकरण करू शकतात. तेसुद्धा यहोवाची जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करू शकतात. बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा एकत्र अभ्यास करून आणि त्या कशा पूर्ण होतात याकडे लक्ष देऊन ते यहोवावरचा आपला भरवसा आणखी वाढवू शकतात. * (तीत १:२) बायबलच्या काही भविष्यवाण्या पूर्ण करण्यात आपणही कसा हातभार लावू शकतो या गोष्टीचा ते विचार करू शकतात. उदाहरणार्थ, अंत येण्याआधी संपूर्ण जगात आनंदाच्या संदेशाचा प्रचार केला जाईल अशी जी भविष्यवाणी येशूने केली होती ती पूर्ण करण्यात ते सहभाग घेऊ शकतात. (मत्त. २४:१४) बायबलमधल्या भविष्यवाण्या कशा खऱ्‍या ठरतात हे जेव्हा ते पाहतील तेव्हा यहोवाची जास्तीत जास्त सेवा करण्याचा त्यांचा निर्धार आणखी पक्का होईल.

प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला यांच्याप्रमाणे राज्याच्या कामाला सगळ्यात जास्त महत्त्व द्या

११. प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला यांनी राज्याच्या कामाला सगळ्यात जास्त महत्त्व कसं दिलं?

११ आज तरुण जोडपी प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला यांच्याकडून बरंच काही शिकू शकतात. प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला हे रोम शहरात राहणारं एक यहुदी जोडपं होतं. येशूविषयीचा आनंदाचा संदेश ऐकून ते ख्रिस्ती बनले होते. ते आपल्या जीवनात खूप समाधानी होते. पण अचानक त्यांची परिस्थिती बदलली. सम्राट क्लोद्यने सगळ्या यहुद्यांना रोम सोडून जायचा हुकूम दिला. त्यामुळे या दोघांना काय-काय करावं लागणार होतं याचा विचार करा. त्यांना आपला ओळखीचा परिसर सोडून एका नवीन ठिकाणी जाऊन राहावं लागणार होतं. इतकंच नाही, तर तंबू बनवण्याचा आपला व्यवसायही नव्याने सुरू करावा लागणार होता. मग अचानक झालेल्या या बदलांमुळे राज्याच्या कामाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं का? या प्रश्‍नाचं उत्तर आपल्याला माहीतच आहे. करिंथ शहरात राहायला गेल्यानंतर अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांनी तिथल्या मंडळीतल्या भाऊ-बहिणींना खूप मदत केली. इतकंच नाही, तर प्रेषित पौलसोबत मिळून त्यांनी बांधवांना धीर आणि प्रोत्साहनही दिलं. नंतर त्यांनी गरज होती तिथे जाऊन प्रचाराचं काम केलं. (प्रे. कार्यं १८:१८-२१; रोम. १६:३-५) अशा प्रकारे जास्तीत जास्त यहोवाची सेवा केल्यामुळे त्या दोघांना खरंच किती आनंद मिळाला असेल!

१२. विवाहित जोडप्यांनी जीवनात आध्यात्मिक ध्येयं का ठेवली पाहिजेत?

१२ प्रिस्किल्ला आणि अक्विल्ला यांच्याप्रमाणेच आजसुद्धा विवाहित जोडपी राज्याच्या कामाला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देऊ शकतात. या बाबतीत जीवनात कोणती ध्येयं ठेवायची हे लग्नाआधीच ठरवलेलं सगळ्यात चांगलं आहे. अशा प्रकारे त्यांनी जर एकत्र मिळून निर्णय घेतला आणि आध्यात्मिक ध्येयं गाठण्याचा प्रयत्न केला, तर यहोवा कशा प्रकारे मदत करतो हे त्यांना अनुभवायला मिळेल. (उप. ४:९, १२) रस्सल आणि एलिझाबेथ यांचाच विचार करा. रस्सल म्हणतात: “लग्नानंतर आमची आध्यात्मिक ध्येयं काय असतील हे लग्नाआधीच आम्ही ठरवलं होतं.” एलिझाबेथ म्हणते: “पुढे जीवनातले इतर निर्णय घेताना या आध्यात्मिक ध्येयांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून या गोष्टींबद्दल आम्ही आधीच बोललो होतो.” याचा असा परिणाम झाला, की ते दोघंही मायक्रोनेशियामध्ये, म्हणजे जिथे प्रचारकांची जास्त गरज आहे तिथे जाऊन सेवा करू शकले.

नवीन जोडप्यांनी जीवनात आध्यात्मिक ध्येय ठेवली, तर त्यांना यहोवाच्या सेवेला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देता येईल (परिच्छेद १३ पाहा)

१३. स्तोत्र २८:७ यात सांगितल्याप्रमाणे यहोवावर भरवसा ठेवल्यामुळे काय होईल?

१३ रस्सल आणि एलिझाबेथ यांच्यासारखीच आज अनेक जोडपी आहेत. प्रचाराच्या आणि शिकवण्याच्या कामाला जास्त वेळ देता यावा म्हणून ते इतर गोष्टींमध्ये स्वतःला गुरफटून घेत नाहीत. विवाहित जोडपी जेव्हा सेवा वाढवण्याच्या उद्देशाने जीवनात आध्यात्मिक ध्येयं ठेवतात आणि ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना अनेक चांगले परिणाम दिसून येतात. यहोवा कशा प्रकारे त्यांची काळजी घेतो हे त्यांना पाहायला मिळतं. त्याच्यावरचा त्यांचा भरवसा आणखी वाढतो. आणि ते खऱ्‍या अर्थाने आनंदी होतात.—स्तोत्र २८:७ वाचा.

प्रेषित पेत्र आणि त्याच्या पत्नीसारखं यहोवाच्या अभिवचनावर भरवसा ठेवा

१४. मत्तय ६:२५, ३१-३४ या वचनांवर प्रेषित पेत्र आणि त्याच्या पत्नीचा भरवसा होता हे कसं दिसून येतं?

१४ प्रेषित पेत्र आणि त्याची पत्नी यांच्याकडूनही आज विवाहित जोडपी बरंच काही शिकू शकतात. पेत्र पहिल्यांदा येशूला भेटला त्याच्या जवळपास सहा महिन्यांनंतर किंवा कदाचित एका वर्षांनंतर त्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार होता. आपलं घर चालवण्यासाठी पेत्र मासेमारीचा व्यवसाय करायचा. त्यामुळे येशूने जेव्हा त्याला आपल्यासोबत पूर्णवेळ सेवाकार्य करायला बोलवलं, तेव्हा पेत्रला आपल्या कुटुंबाचा विचार करावा लागणार होता. (लूक ५:१-११) पेत्रने येशूसोबत पूर्णवेळ प्रचारकार्य करायचा निर्णय घेतला. आणि तो एक योग्यच निर्णय होता. त्याने घेतलेल्या या निर्णयाला त्याच्या पत्नीने नक्कीच पाठिंबा दिला असेल असं आपल्याला म्हणता येईल. कारण बायबलमध्ये सांगितलं आहे, की येशूचं पुनरूत्थान झाल्यानंतर निदान काही काळासाठी तरी पेत्रच्या पत्नीने त्याच्यासोबत प्रवास केला. (१ करिंथ. ९:५) ज्याअर्थी पेत्र ख्रिस्ती पती-पत्नींना मनमोकळेपणाने सल्ला देऊ शकला, त्याअर्थी त्याच्या पत्नीचं इतरांसमोर नक्कीच एक चांगलं उदाहरण असावं. (१ पेत्र ३:१-७) यावरून स्पष्टपणे दिसून येतं, की यहोवाच्या अभिवचनावर पेत्र आणि त्याच्या पत्नीचा पूर्ण भरवसा होता. त्यांना माहीत होतं, की राज्याच्या कामाला आपण जीवनात पहिलं स्थान दिलं, तर यहोवा नक्कीच आपला सांभाळ करेल.—मत्तय ६:२५, ३१-३४ वाचा.

१५. टियागो आणि एस्तरच्या अनुभवातून आपण काय शिकू शकतो?

१५ तुमचं लग्न होऊन बरीच वर्षं झाली असली, तरी सेवा वाढवण्यासाठी तुम्हीसुद्धा खूप काही करू शकता. ते कसं? त्यासाठी इतर जोडप्यांच्या अनुभवातून तुम्हाला बरंच काही शिकता येईल. उदाहरणार्थ, तुम्ही टेहळणी बुरूज  मासिकातली, ‘सेवाकार्यासाठी ते स्वच्छेने पुढे आले’ किंवा ‘त्यांनी स्वतःला स्वेच्छेनं वाहून घेतलं’ ही लेखमाला वाचू शकता. अशा लेखांमुळेच ब्राझीलमध्ये राहणाऱ्‍या टियागो आणि एस्तर या जोडप्याला प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करायची प्रेरणा मिळाली. टियागो म्हणतात, आजसुद्धा यहोवा आपल्या सेवकांची कशा प्रकारे काळजी घेतो, त्यांचं मार्गदर्शन करतो हे वाचल्यावर आम्हाला असं वाटलं, की आपणसुद्धा याचा अनुभव घेऊन पाहावा. काही काळानंतर ते पॅराग्वेमध्ये सेवा करायला गेले. तिथे ते २०१४ पासून पोर्तुगीज भाषेच्या क्षेत्रात सेवा करत आहेत. एस्तर म्हणते: “इफिसकर ३:२० हे आमचं आवडतं वचन आहे. त्यातले शब्द किती खरे आहेत याचा आम्ही वेळोवेळी अनुभव घेतलाय.” इफिसकरांना लिहिलेल्या पत्रात पौल आत्मविश्‍वासाने असं म्हणाला, की “आपण मागितलेल्या किंवा कल्पना केलेल्या गोष्टींपेक्षा कितीतरी पटीने जास्त यहोवा आपल्याला देऊ शकतो.” पौलचे हे शब्द किती खरे आहेत!

नवीन जोडप्यांनी अनुभवी जोडप्यांचा सल्ला घेतला, तर त्यांना यहोवाच्या सेवेला जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व देता येईल (परिच्छेद १६ पाहा)

१६. स्वतःसाठी ध्येयं ठेवताना तरूण जोडपी अजून काय करू शकतात?

१६ जे यहोवावर विसंबून राहायला शिकले आहेत अशांकडून तरुण जोडपी बरंच काही शिकू शकतात. काही जोडपी वर्षानुवर्ष पूर्णवेळची सेवा करत आले आहेत. मग आपली ध्येयं ठरवताना अशा जोडप्यांशी बोलायला काय हरकत आहे? हासुद्धा यहोवावर भरवसा ठेवण्याचा एक मार्गच आहे. (नीति. २२:१७, १९) मंडळीतले वडीलसुद्धा विवाहित जोडप्यांना वेगवेगळी ध्येयं ठेवायला आणि त्यांप्रमाणे कार्य करायला मदत करू शकतात.

१७. केविन आणि मेरीच्या बाबतीत काय घडलं, आणि त्यांच्या अनुभवातून आपण काय शिकतो?

१७ पण कधीकधी असं होऊ शकतं, की आपण ठरवल्याप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. आपण सुरुवातीला ज्यांचं उदाहरण पाहिलं, त्या केविन आणि मेरीचाच विचार करा. लग्नाच्या तीन वर्षांनंतर ते फिनलंड शाखा कार्यालयाच्या बांधकाम प्रकल्पावर स्वयंसेवक म्हणून काम करायला गेले. पण तिथे गेल्यावर त्यांना समजलं, की ते सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ तिथे राहू शकत नाहीत. हे ऐकून सुरुवातीला ते खूप निराश झाले. पण त्यानंतर लगेचच त्यांना अरबी भाषेच्या एका कोर्ससाठी बोलवण्यात आलं. आणि आज ते दोघं एका दुसऱ्‍या देशात, अरबी भाषेच्या क्षेत्रात खूप आनंदाने सेवा करत आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मेरी म्हणते: “ज्या गोष्टी आपण आधी कधीच केल्या नव्हत्या त्या करण्यासाठी आणि त्या बाबतीत यहोवावर पूर्णपणे विसंबून राहण्यासाठी सुरुवातीला खूप भीती वाटते. पण आम्ही अपेक्षाही केली नव्हती अशा प्रकारे यहोवाने नेहमी आम्हाला मदत केली. ते अनुभवल्यानंतर यहोवावरचा माझा भरवसा आणखी वाढलाय.” यावरून दिसून येतं, की तुम्ही जर पूर्णपणे यहोवावर विसंबून राहिलात, तर यहोवा नक्की तुम्हाला आशीर्वाद देईल.

१८. पती-पत्नी यहोवावर भरवसा असल्याचं कसं दाखवू शकतात?

१८ विवाह ही मानवांना यहोवाकडून मिळालेली एक खूप सुंदर गोष्ट आहे. (मत्त. १९:५, ६) विवाहित जोडप्यांनी वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्यावा असं त्याला वाटतं. (नीति. ५:१८) म्हणून आपण आपल्या जीवनात काय करणार आहोत याचा तरुण जोडप्यांनी विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनात काय करत आहात याचं परिक्षण करून पाहा. यहोवाने तुमच्यासाठी बरंच काही केलं आहे. याबद्दल तुम्हाला कदर आहे, हे दाखवण्यासाठी तुम्ही तुमची सेवा वाढवू शकता. त्यासाठी यहोवाला प्रार्थना करा. बायबलचा कोणता सल्ला किंवा मार्गदर्शन तुमच्या परिस्थितीला लागू होतं, हे पाहण्यासाठी बायबलचा अभ्यास करा. आणि तो सल्ला आपल्या जीवनात लागू करायचा प्रयत्न करा. यहोवाच्या सेवेला तुम्ही तुमच्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्व दिलं, तर तुम्ही नक्कीच आनंदी राहाल आणि तुम्हाला अनेक आशीर्वाद मिळतील!

गीत ४८ प्रतिदिनी यहोवासोबत चालू या

^ परि. 5 यहोवाच्या सेवेसाठी आपल्याजवळ किती वेळ आणि ताकद उरते हे आपण घेत असलेल्या निर्णयांवर अवलंबून असतं. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांना खासकरून असे निर्णय घ्यावे लागतात, ज्यांचा त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होऊ शकतो. या लेखामुळे त्यांना जीवनात असे निर्णय घ्यायला मदत होईल ज्यांमुळे त्यांचं जीवन खऱ्‍या अर्थाने आनंदी होऊ शकतं.

^ परि. 5 काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 10 उदाहरणार्थ, सारी धरती पर यहोवा की शुद्ध उपासना बहाल!  या हिंदी पुस्तकातल्या अध्याय ६,  आणि १९ मधून काय शिकायला मिळतं याचा विचार करा.