व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ४४

यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा तुम्हाला कसा फायदा होतो?

यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा तुम्हाला कसा फायदा होतो?

“[यहोवाचं] एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.”—स्तोत्र १३६:१.

गीत १८ देवाचे खरे प्रेम

सारांश *

१. यहोवा आपल्याला काय करायचं प्रोत्साहन देतो?

एकनिष्ठ प्रेम यहोवासाठी खूप महत्त्वाचं आहे. (होशे. ६:६) आणि आपल्या सेवकांसाठीही ते तितकंच महत्त्वाचं असावं असं त्याला वाटतं. म्हणूनच मीखा संदेष्ट्याद्वारे त्याने आपल्याला असं प्रोत्साहन दिलं आहे, की आपण “एकनिष्ठ प्रेमावर प्रेम करावं.” (मीखा ६:८, तळटीप) पण त्यासाठी एकनिष्ठ प्रेम काय असतं ते आधी आपण समजून घेतलं पाहिजे.

२. एकनिष्ठ प्रेम म्हणजे काय?

पवित्र शास्त्र नवे जग भाषांतर  यात “एकनिष्ठ प्रेम” हे शब्द जवळजवळ २३० वेळा आले आहेत. पण याचा काय अर्थ होतो? या भाषांतरात “बायबलची शब्दार्थसूची” दिली आहे. त्यात या शब्दांबद्दल असं म्हटलं आहे: “हिब्रू शब्द कसद याचं भाषांतर सहसा एकनिष्ठ प्रेम असं करण्यात आलं आहे. याचा अर्थ, असं प्रेम जे विश्‍वासूपणा, निष्ठा, जिव्हाळा आणि नेहमी साथ देण्याचा निश्‍चय यांनी प्रवृत्त झालेलं असतं. ‘एकनिष्ठ प्रेम’ हे शब्द सहसा देवाचं माणसांवर असलेल्या प्रेमाच्या बाबतीत वापरले जातात. पण लोकांचं एकमेकांवर असलेल्या प्रेमासाठीही ते वापरले जातात.” एकनिष्ठ प्रेम दाखवण्याच्या बाबतीत यहोवापेक्षा चांगलं उदाहरण आणखी कुणाचंच नाही. यहोवा सर्व मानवांना एकनिष्ठ प्रेम कसं दाखवतो, हे या लेखात आपण पाहणार आहोत. आणि पुढच्या लेखात आपण हे पाहणार आहोत, की आपण एकमेकांना यहोवासारखंच एकनिष्ठ प्रेम कसं दाखवू शकतो?

यहोवा “एकनिष्ठ प्रेमाने भरलेला” देव आहे

३. यहोवाने मोशेला स्वतःबद्दल काय सांगितलं?

इस्राएली लोक इजिप्तमधून बाहेर पडले त्याच्या काही काळानंतर यहोवाने मोशेला आपल्या नावाबद्दल आणि गुणांबद्दल असं म्हटलं: “यहोवा, यहोवा, दयाळू, करुणामय आणि सहनशील देव; एकनिष्ठ प्रेम आणि सत्याने भरलेला. हजारोंवर एकनिष्ठ प्रेम करणारा; चुका, अपराध आणि पाप क्षमा करणारा.” (निर्ग. ३४:६, ७) आपल्या सुंदर गुणांबद्दल सांगताना यहोवाने त्याच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल एक खास गोष्ट सांगितली. ती कोणती होती?

४-५. (क) यहोवाने स्वतःच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल कोणती खास गोष्ट सांगितली? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांची उत्तरं पाहणार आहोत?

मोशेला स्वतःबद्दल सांगताना यहोवा फक्‍त असं म्हणाला नाही, की तो एकनिष्ठ प्रेम दाखवणारा देव आहे. तर त्याने असं म्हटलं, की तो “एकनिष्ठ प्रेमाने भरलेला” देव आहे. बायबलमध्ये आणखी सहा वेळा आपल्याला हे शब्द वाचायला मिळतात. (गण. १४:१८; नहे. ९:१७; स्तो. ८६:१५; १०३:८; योए. २:१३; योना ४:२) पण या सर्व ठिकाणी हे शब्द मानवांच्या बाबतीत नाही, तर फक्‍त यहोवाच्या बाबतीत वापरण्यात आले आहेत. यावरून दिसून येतं, की यहोवाने एकनिष्ठ प्रेमावर खूप भर दिला आहे. आणि त्याच्यासाठी हा गुण खूप महत्त्वाचा आहे. * म्हणूनच दावीद राजानेसुद्धा असं म्हटलं: “हे यहोवा, तुझं एकनिष्ठ प्रेम आकाशाला भिडलंय, . . . हे देवा, तुझं एकनिष्ठ प्रेम किती अनमोल आहे! तुझ्या पंखांच्या छायेत माणसं आश्रय घेतात.” (स्तो. ३६:५, ७) देवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल आपल्यालाही दावीदसारखंच वाटतं का?

एकनिष्ठ प्रेम म्हणजे काय, हे समजून घेण्यासाठी चला आता आपण दोन प्रश्‍नांची उत्तरं पाहू या: यहोवा कोणाला एकनिष्ठ प्रेम दाखवतो? आणि यहोवा एकनिष्ठ प्रेम दाखवतो तेव्हा आपल्याला कसा फायदा होतो?

यहोवा कोणाला एकनिष्ठ प्रेम दाखवतो?

६. यहोवा कोणाला एकनिष्ठ प्रेम दाखवतो?

बायबल सांगतं, की लोक वेगवेगळ्या गोष्टींवर प्रेम करतात. जसं की, ‘शिक्षण,’ ‘ज्ञान,’ ‘बुद्धी’ आणि ‘जगातल्या गोष्टी.’ (नीति. १२:१; २९:३; १ योह. २:१५) पण एकनिष्ठ प्रेम मात्र अशा कोणत्याही गोष्टींवर किंवा वस्तूंवर दाखवलं जात नाही, तर फक्‍त लोकांना दाखवलं जातं. पण यहोवा सगळ्यांनाच एकनिष्ठ प्रेम दाखवतो असं नाही. ज्यांचं त्याच्यासोबत एक जवळचं नातं आहे  फक्‍त त्यांनाच तो हे प्रेम दाखवतो. आपल्या या मित्रांना तो नेहमी एकनिष्ठ राहतो. त्यांच्यासाठी त्याने एका सुंदर भविष्याची योजना केली आहे. आणि तो कायम त्यांच्यावर प्रेम करत राहील.

यहोवा सगळ्यांनाच चांगल्या गोष्टी पुरवतो; जे त्याची उपासना करत नाहीत त्यांनासुद्धा (परिच्छेद ७ पाहा) *

७. यहोवाने कशा प्रकारे सगळ्याच मानवांना प्रेम दाखवलं?

यहोवाने खरंतर सगळ्याच मानवांना प्रेम  दाखवलं आहे. येशूने निकदेम नावाच्या एका माणसाला म्हटलं: “देवाने जगावर इतकं प्रेम केलं, की त्याने आपला एकुलता एक मुलगा दिला. कारण त्याची अशी इच्छा आहे, की जो कोणी त्याच्या मुलावर विश्‍वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं.”—योहा. ३:१, १६; मत्त. ५:४४, ४५.

दावीद राजाने आणि दानीएल संदेष्ट्याने जे म्हटलं, त्यावरून दिसून येतं की यहोवा आपल्या सेवकांना एकनिष्ठ प्रेम दाखवतो. कारण ते त्याला ओळखतात, त्याची भीती बाळगतात, त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात (परिच्छेद ८-९ पाहा)

८-९. (क) यहोवा आपल्या सेवकांना एकनिष्ठ प्रेम का दाखवतो? (ख) आता आपण कशावर चर्चा करणार आहोत?

आधी पाहिल्याप्रमाणे यहोवा फक्‍त आपल्या सेवकांनाच, म्हणजे ज्यांचं त्याच्यासोबत एक जवळचं नातं आहे, त्यांनाच एकनिष्ठ प्रेम  दाखवतो. ही गोष्ट, दावीद राजाने आणि दानीएल संदेष्ट्याने जे म्हटलं त्यावरून दिसून येते. उदाहरणार्थ, दावीदने असं म्हटलं: “तुला ओळखणाऱ्‍यांना  तू नेहमी एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा.” आणि “जे यहोवाची भीती बाळगतात, त्यांच्याबद्दल त्याचं एकनिष्ठ प्रेम . . . सर्वकाळ टिकून राहतं.” आणि दानीएलने असं म्हटलं: “हे खऱ्‍या देवा यहोवा, . . . तुझ्यावर प्रेम करणाऱ्‍यांवर  आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्‍यांवर  तू एकनिष्ठ प्रेम करतोस.” (स्तो. ३६:१०; १०३:१७; दानी. ९:४) यावरून दिसून, येतं की यहोवा आपल्या सेवकांना एकनिष्ठ प्रेम दाखवतो. कारण ते त्याला ओळखतात, त्याची भीती बाळगतात, त्याच्यावर प्रेम करतात आणि त्याच्या आज्ञा पाळतात. दुसऱ्‍या शब्दांत, जे यहोवाचे खरे उपासक आहेत त्यांनाच तो एकनिष्ठ प्रेम दाखवतो.

हे खरं आहे, की यहोवा सर्व मानवांना जे प्रेम दाखवतो ते आपण त्याचे उपासक बनण्याआधीपासूनच अनुभवत आहोत. (स्तो. १०४:१४) पण त्याचे उपासक असल्यामुळे आज आपल्याला त्याच्या एकनिष्ठ प्रेमाचाही फायदा होत आहे. तो आपल्याला असं वचन देतो, की आपल्यावर असलेलं त्याचं “एकनिष्ठ प्रेम कधीही नाहीसं होणार नाही.” (यश. ५४:१०) ही गोष्ट दावीदनेही अनुभवली म्हणून तो म्हणाला: “यहोवा आपल्या एकनिष्ठ सेवकावर विशेष कृपा करेल.” (स्तो. ४:३) मग जर यहोवा आपल्यावर इतकं प्रेम करतो, तर आपण काय केलं पाहिजे? याबद्दल स्तोत्रकर्ता म्हणतो: “शहाणा या गोष्टींकडे लक्ष देईल; यहोवाने एकनिष्ठ प्रेमाने केलेल्या कार्यांवर तो मनन करेल.” (स्तो. १०७:४३) हे शब्द लक्षात ठेवून, चला तर आता पाहू आपण या की यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळे कोणत्या तीन मार्गांनी आपल्याला फायदा होतो.

यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

यहोवा आपल्या सेवकांना आणखीही बरेच आशीर्वाद देतो (परिच्छेद १०-१६ पाहा) *

१०. यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळे आपल्याला कसा फायदा होतो? (स्तोत्र ३१:७)

१० यहोवाचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं. या गोष्टीचा स्तोत्र १३६ मध्ये २६ वेळा उल्लेख करण्यात आला आहे. या स्तोत्राच्या पहिल्याच वचनात आपण असं वाचतो: “यहोवाचे आभार माना, कारण तो चांगला आहे; त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.” (स्तो. १३६:१) पुढे २ ते २६ या प्रत्येक वचनात आपल्याला हे शब्द वाचायला मिळतात: “त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं.” आणि त्यापुढची वचनं वाचल्यावर आपल्या लक्षात येतं, की यहोवा किती वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला त्याचं एकनिष्ठ प्रेम दाखवतो. आणि ते वाचून आपण थक्क होतो. “त्याचं एकनिष्ठ प्रेम सर्वकाळ टिकून राहतं,” हे शब्द या स्तोत्रात वारंवार येतात. त्यावरून आपल्याला याची खात्री मिळते, की यहोवाचं आपल्या लोकांवर असलेलं प्रेम कधीही बदलत नाही. यहोवा आपल्या लोकांच्या बाबतीत लगेच आशा सोडून देत नाही. उलट तो कायम त्यांच्या जवळ राहतो, खासकरून संकटाच्या काळात. आणि हे जाणून खरंच आपल्याला किती दिलासा मिळतो! यहोवाच्या या प्रेमाचा आपल्याला कसा फायदा होतो:  संकटाच्या काळात यहोवा नेहमी आपल्या सोबत असतो हे जाणून आपल्याला धीर मिळतो आणि आनंदाने त्याची सेवा करत राहायला मदत मिळते.—स्तोत्र ३१:७ वाचा.

११. स्तोत्र ८६:५ या वचनाप्रमाणे यहोवा क्षमा करायला तयार का असतो?

११ एकनिष्ठ प्रेमामुळेच यहोवा आपल्याला क्षमा करतो.  यहोवा जेव्हा हे पाहतो, की पाप केलेल्या एखाद्या व्यक्‍तीने पश्‍चात्ताप केला आहे आणि आपल्या चुकीच्या मार्गावरून ती मागे फिरली आहे, तेव्हा तो आपल्या एकनिष्ठ प्रेमामुळेच तिला क्षमा करतो. याबद्दल स्तोत्रकर्त्या दावीदने असं म्हटलं: “त्याने आपल्या पापांप्रमाणे आपल्याला शिक्षा दिली नाही आणि आपल्या अपराधांच्या मानाने आपल्याला मोबदला दिला नाही.” (स्तो. १०३:८-११) दोषीपणाच्या भावनेमुळे आपण किती दुःखी होतो, हे दावीदने स्वतः अनुभवलं होतं. पण यहोवा क्षमा करायला नेहमी तयार असतो, हेसुद्धा दावीदला माहीत होतं. कोणत्या गोष्टीमुळे यहोवा क्षमा करायला तयार असतो? याचं उत्तर आपल्याला स्तोत्र ८६:५ (वाचा.) यामध्ये मिळतं. त्यात दावीदने म्हटल्याप्रमाणे, यहोवाच्या अपार प्रेमामुळेच तो त्याला हाक मारणाऱ्‍या सर्वांना क्षमा करतो.

१२-१३. पूर्वी केलेल्या चुकांमुळे जर आपलं मन आपल्याला खात असेल तर कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळेल?

१२ आपल्या हातून एखादी गंभीर चूक होते, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. पण ही एक चांगली गोष्ट आहे. कारण त्यामुळे आपण पश्‍चात्ताप करायचा आणि आपली चूक सुधारायचा प्रयत्न करतो. पण काहींच्या बाबतीत असं होतं, की पूर्वी केलेल्या चुका ते विसरूच शकत नाहीत. त्यांचं मन सतत त्यांना दोष देत राहतं. आणि या दोषीपणाच्या भावनेमुळे त्यांना असं वाटतं, की आपण कितीही पश्‍चात्ताप केला, यहोवाला कितीही माफी मागितली, तरी तो आपल्याला माफ करणार नाही. तुम्हालाही असं वाटत असेल, तर यहोवा तुम्हाला एकनिष्ठ प्रेम दाखवायला किती उत्सुक आहे, हे जाणून तुम्हाला खूप दिलास मिळेल.

१३ यामुळे आपल्याला कसा फायदा होतो:  आपण अपरिपूर्ण असलो तरी शुद्ध विवेकाने आणि आनंदाने यहोवाची सेवा करू शकतो. कारण ‘येशूचं रक्‍त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं.’ (१ योहा. १:७) तेव्हा आपल्यातल्या काही कमतरतांमुळे आपण जर निराश होत असू, तर आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की पश्‍चात्ताप करणाऱ्‍या व्यक्‍तीला माफ करायला यहोवा नेहमी तयार असतो. देवाच्या एकनिष्ठ प्रेमाचा आणि क्षमेचा एकमेकांशी किती जवळचा संबध आहे ते दावीदने सांगितलं. तो म्हणाला: “कारण आकाश पृथ्वीपेक्षा जितकं उंच आहे, तितकंच त्याचं भय मानणाऱ्‍यांसाठी, त्याचं एकनिष्ठ प्रेम मोठं आहे. पश्‍चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितकेच त्याने आपले अपराध आपल्यापासून दूर केले आहेत.” (स्तो. १०३:११, १२) खरंच, यावरून दिसून येतं, की यहोवा आपल्याला ‘मोठ्या मनाने क्षमा करायला’ तयार आहे.—यश. ५५:७.

१४. यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळे आपलं संरक्षण होतं, याचं दावीदने कसं वर्णन केलं?

१४ यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळे आध्यात्मिक रितीने आपलं संरक्षण होतं.  यहोवाला प्रार्थना करताना दावीदने असं म्हटलं: “तू माझा आश्रय आहेस; तू मला संकटापासून सुरक्षित ठेवशील. सुटकेच्या जल्लोषाने तू मला वेढशील। . . . यहोवावर भरवसा ठेवणाऱ्‍यांवर तो आपल्या एकनिष्ठ प्रेमाची पाखर घालतो.” (स्तो. ३२:७, १०) प्राचीन काळात शहराभोवती असलेल्या भिंतींमुळे शहरातल्या लोकांचं संरक्षण व्हायचं. यहोवाचं एकनिष्ठ प्रेमसुद्धा सुरक्षा देणाऱ्‍या त्या भिंतीसारखंच आहे. त्याच्यासोबतचं आपलं नातं कमजोर करणाऱ्‍या कोणत्याही धोक्यापासून ते आपलं संरक्षण करतं. शिवाय, त्याच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच तो आपल्याला जवळ घेतो.—यिर्म. ३१:३.

१५. यहोवाचं एकनिष्ठ प्रेम आपल्यासाठी एका सुरक्षित आश्रयासारखं कसं आहे?

१५ यहोवा आपल्या लोकांचं संरक्षण कसं करतो, हे सांगताना दावीदने आणखी एका शब्दचित्राचा वापर केला. त्याने म्हटलं: “देव माझा सुरक्षित आश्रय आहे, तो माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखवतो.” यहोवाबद्दल दावीद असंही म्हणाला: “तो माझा गड आहे; तो माझ्यावर एकनिष्ठ प्रेम करतो. तो माझा सुरक्षित आश्रय आणि माझा सोडवणारा आहे. तो माझी ढाल आहे; मी त्याचा आश्रय घेतलाय.” (स्तो. ५९:१७; १४४:२) इथे, देवाच्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल बोलताना दावीदने सुरक्षित आश्रयाचा किंवा गडाचा उल्लेख का केला? याचं कारण म्हणजे, जगाच्या पाठीवर आपण कुठंही असलो तरी यहोवा आपल्या सेवकांना त्याच्यासोबतचं आपलं नातं जपायला मदत करतो आणि त्यांचं संरक्षण करतो. आणि हीच खातरी आपल्याला स्तोत्र ९१ मध्ये वाचायला मिळते. हे स्तोत्र लिहिणारा असं म्हणतो: “मी यहोवाला म्हणीन: ‘तू माझा आश्रय, माझा दुर्ग आहेस.’” (स्तो. ९१:१-३, ९, १४) मोशेनेसुद्धा असंच शब्दचित्र वापरलं. (स्तो. ९०:१, तळटीप) इतकंच नाहीत, तर आपल्या आयुष्याच्या शेवटी, मोशेने यहोवाबद्दल एक सुंदर गोष्ट सांगितली. तो म्हणाला: “प्राचीन काळापासून देव तुझा आश्रय आहे, त्याचे सर्वकाळाचे बाहू तुला आधार देतात.” (अनु. ३३:२७) या शब्दांवरून यहोवाबद्दल आपल्याला काय समजतं?

१६. यहोवा कोणत्या दोन मार्गांनी आपल्याला मदत करतो? (स्तोत्र १३६:२३)

१६ यहोवा आपलं संरक्षण करेल असा भरवसा आपल्याला असतो, तेव्हा आपल्याला खूप सुरक्षित वाटतं. पण काही वेळा आपल्याला खूप निराश वाटतं आणि ही भावना काही केल्या मनातून जात नाही. अशा वेळी यहोवा काय करतो? (स्तोत्र १३६:२३ वाचा.) अशा वेळी, तो आपल्याला त्याच्या ‘बाहूंनी आधार देतो,’ म्हणजे आपल्याला प्रेमाने उचलून घेतो आणि निराशेच्या भावनेतून सावरायला मदत करतो. (स्तो. २८:९; ९४:१८) यामुळे आपल्याला कसा फायदा होतो:  आपल्या दुःखाच्या काळात यहोवा आपल्याला आधार देईल याची खातरी असल्यामुळे दोन मार्गांनी आपल्याला मदत होते. एक म्हणजे, आपण कुठेही असलो तरी यहोवा आपलं संरक्षण करेल असा भरवसा आपण ठेवू शकतो. आणि दुसरं म्हणजे, यहोवा आपली मनापासून काळजी करतो हा भरवसासुद्धा आपण ठेवू शकतो.

यहोवा एकनिष्ठ प्रेम दाखवत राहील याची खातरी आपण बाळगू शकतो

१७. आपण कोणती खातरी बाळगू शकतो? (स्तोत्र ३३:१८-२२)

१७ तर आतापर्यंत आपण पाहिलं, की आपल्यावर संकटं येतात तेव्हा यहोवा त्याच्यासोबतचं आपलं नातं जपायला आपल्याला मदत करतो. (२ करिंथ. ४:७-९) यिर्मया संदेष्ट्याने म्हटलं: “यहोवाच्या एकनिष्ठ प्रेमामुळेच आमचा नाश झाला नाही, कारण त्याची दया कधीच संपत नाही.” (विलाप. ३:२२) यहोवा कायम आपल्याला एकनिष्ठ प्रेम दाखवत राहील याची खातरी आपण बाळगू शकतो. कारण स्तोत्रकर्त्याने असं म्हटलं: “यहोवाचं भय मानणाऱ्‍यांवर; त्याच्या एकनिष्ठ प्रेमाची आस धरणाऱ्‍यांवर त्याची नजर असते.”—स्तोत्र ३३:१८-२२ वाचा.

१८-१९. (क) आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? (ख) पुढच्या लेखात आपण कशावर चर्चा करणार आहोत?

१८ तर मग आपण नेहमी कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? यहोवाचे सेवक बनण्याआधी आपण यहोवाचं ते प्रेम अनुभवलं, जे तो सगळ्याच मानवांना दाखवतो. पण त्याचे सेवक बनल्यानंतर आपण त्याच्या एकनिष्ठ प्रेमाचाही अनुभव घेत आहोत. या एकनिष्ठ प्रेमामुळेच यहोवा आपल्याला आधार देतो आणि आपलं संरक्षण करतो. या प्रेमापोटीच तो कधीही आपली साथ सोडणार नाही. आणि आपल्याबद्दल असलेला त्याचा उद्देश तो जरूर पूर्ण करेल. कारण त्याच्यासोबतचं आपलं मैत्रीचं नातं कायम टिकून राहावं असं त्याला वाटतं. (स्तो. ४६:१, २, ७) त्यामुळे आपल्यासमोर कोणतीही परीक्षा आली, तरी यहोवा शेवटपर्यंत आपल्याला विश्‍वासू राहायचं बळ देईल, याची खातरी आपण बाळगू शकतो.

१९ या लेखात आपण पाहिलं, की यहोवा त्याच्या सेवकांना एकनिष्ठ प्रेम कसं दाखवतो. आणि त्याच्यासारखंच आपणसुद्धा एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवावं असं त्याला वाटतं. आपल्याला हे कसं करता येईल, याची चर्चा पुढच्या लेखात केली जाईल.

गीत २६ देवासोबत चालत राहा!

^ परि. 5 एकनिष्ठ प्रेम म्हणजे काय? यहोवा कोणावर एकनिष्ठ प्रेम करतो? आणि ज्यांच्यावर तो हे प्रेम करतो त्यांना कसा फायदा होतो? या प्रश्‍नांची उत्तरं या आणि पुढच्या लेखांत दिली आहेत.

^ परि. 4 “यहोवा एकनिष्ठ प्रेमाने भरलेला देव आहे,” ही गोष्ट बायबलच्या इतर वचनांमध्येही सांगितली आहे.—नहेम्या १३:२२; स्तोत्र १०६:७; आणि विलापगीत ३:३२ पाहा.

^ परि. 54 चित्रांचं वर्णन: यहोवा सगळ्याच लोकांना प्रेम दाखवतो आणि त्यामध्ये आपणसुद्धा आहोत. हे प्रेम तो कोणत्या काही मार्गांनी दाखवतो हे वर दिलेल्या छोट्या चित्रांमध्ये दाखवलं आहे. त्यांपैकी सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे त्याने आपल्यासाठी स्वतःच्या मुलाचं बलिदान दिलं.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: जे या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवतात आणि त्याचे सेवक बनतात, त्यांना तो एका खास मार्गाने प्रेम दाखवतो. यहोवा सर्वच मानवांना जे प्रेम दाखवतो ते प्रेम तर ते अनुभवताच, पण त्यासोबतच ते त्याचं एकनिष्ठ प्रेमही अनुभवतात. तो ज्या मार्गांनी त्यांना एकनिष्ठ प्रेम दाखवतो त्यांपैकी बरेच मार्ग वर छोट्या चित्रांमध्ये दाखवले आहेत.