व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आध्यात्मिक व्यक्‍ती बनण्यासाठी प्रगती करत राहा

आध्यात्मिक व्यक्‍ती बनण्यासाठी प्रगती करत राहा

“आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालत राहा.”—गलती. ५:१६.

गीत क्रमांक: १६, १०

१, २. एका बांधवाला स्वतःबद्दल काय जाणवलं? त्याने कोणते बदल केले?

तरुण असतानाच रॉबर्टचा बाप्तिस्मा झाला होता. पण सत्य अजूनही त्याच्या मनात पूर्णपणे रुजलं नव्हतं. तो म्हणतो: “मी काही चुकीचं करत नव्हतो, पण आध्यात्मिक गोष्टी फक्‍त करायच्या म्हणून करत होतो. मी सर्व सभांना जायचो आणि वर्षातून काही वेळा सहायक पायनियरींगही करायचो. त्यामुळे मी वरवर आध्यात्मिक रीत्या मजबूत दिसत होतो. पण आतून वाटत होतं की मी कुठेतरी कमी पडतोय.”

तो नेमकं कुठे कमी पडत आहे याची जाणीव त्याला लग्नानंतर झाली. खेळ म्हणून तो आणि त्याची पत्नी एकमेकांना बायबलवर आधारित प्रश्‍न विचारायचे. त्याच्या पत्नीला बायबलचं चांगलं ज्ञान होतं आणि ती सहज त्या प्रश्‍नांची उत्तरं द्यायची. पण रॉबर्टला बऱ्‍याच प्रश्‍नांची उत्तरं माहीत नव्हती. यामुळे त्याला लाजल्यासारखं व्हायचं. तो म्हणतो: “मला काहीच येत नाही असं वाटायचं. मग मी विचार केला की, ‘मला जर माझी आध्यात्मिक मस्तकपदाची जबाबदारी पूर्ण करायची असेल, तर मला काहीतरी बदल करायची गरज आहे.’” मग त्याने स्वतःमध्ये बदल केले. तो पुढे म्हणतो: “मी बायबलचा अभ्यास, सखोल अभ्यास केला आणि मग हळूहळू मला बऱ्‍याच गोष्टी समजू लागल्या. मला वचनं समजू लागली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडू शकलो.”

३. (क) आपण रॉबर्टच्या उदाहरणावरून काय शिकतो? (ख) आपण कोणत्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर आता चर्चा करणार आहोत?

रॉबर्टच्या उदाहरणावरून आपण एक महत्त्वाचा धडा शिकतो. तो म्हणजे आपल्याजवळ बायबलचं थोडंफार ज्ञान असेल, आपण सभांना आणि प्रचाराला नियमितपणे जात असू, पण याचा अर्थ आपण आध्यात्मिक आहोत असा होत नाही. कदाचित आपण आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगण्यासाठी प्रयत्नही केला असेल, पण आत्मपरीक्षण करताना आपल्याला स्वतःमध्ये काही कमतरता दिसतील. त्या सुधारण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. (फिलिप्पै. ३:१६) या लेखात आपण तीन महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: (१) आपण आध्यात्मिक आहोत का हे ओळखण्यासाठी आपण काय करू शकतो? (२) आपण आध्यात्मिक रीत्या प्रगती कशी करू शकतो? (३) आध्यात्मिक रीत्या मजबूत राहिल्यामुळे आपल्याला रोजच्या जीवनात कशी मदत होते?

आपली आध्यात्मिक स्थिती ओळखा

४. इफिसकर ४:२३, २४ या वचनांतील सल्ला कोणासाठी देण्यात आला आहे?

आपण देवाची सेवा करायला सुरवात केली तेव्हा आपण स्वतःमध्ये बरेच बदल केले. आणि बदल करण्याची ही प्रक्रिया बाप्तिस्म्यानंतर थांबली नाही. बायबल आपल्याला सांगतं: “विचारांना दिशा देणाऱ्‍या मनोवृत्तीत तुम्ही सतत नवीन होत जावे.” (इफिस. ४:२३, २४) आपण अपरिपूर्ण असल्यामुळे आपल्याला स्वतःमध्ये सतत बदल करत राहण्याची गरज आहे. कदाचित आपण बऱ्‍याच वर्षांपासून विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली असेल, पण तरीही त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध घनिष्ठ ठेवण्यासाठी प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे.—फिलिप्पै. ३:१२, १३.

५. आपली मनोवृत्ती आध्यात्मिक आहे का, हे जाणून घ्यायला कोणते प्रश्‍न आपल्याला मदत करतील?

आपण तरुण असो वा वृद्ध, आपल्या सर्वांनाच प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारू शकतो: ‘मी आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करत आहे हे मला जाणवतं का? मी नेहमी ख्रिस्तासारखा बनण्याचा प्रयत्न करतो का? माझी मनोवृत्ती आणि सभांमध्ये मी जसा वागतो त्यावरून काय दिसून येतं? मी सहसा ज्याबद्दल बोलतो त्यावरून जीवनात मला हव्या असलेल्या गोष्टींबद्दल काय दिसून येतं? अभ्यासाची माझी सवय, माझा पेहराव आणि दिलेल्या सल्ल्याबद्दल माझी प्रतिक्रिया यावरून काय दिसून येतं? एखादी चुकीची गोष्ट करण्याचा मोह होतो तेव्हा मी काय करतो? मी प्रौढ ख्रिस्ती बनलो आहे का?’ (इफिस. ४:१३) या प्रश्‍नांमुळे आध्यात्मिक रीत्या आपण किती प्रगती केली आहे हे जाणून घ्यायला आपल्याला मदत होईल.

६. आपण आध्यात्मिक आहोत का हे जाणून घेण्यासाठी आणखी कशाची आपल्याला मदत होऊ शकते?

आपण आध्यात्मिक मनोवृत्तीचे आहोत की नाही, हे ओळखण्यासाठी काही वेळा आपल्याला इतरांची मदत लागू शकते. प्रेषित पौलने सांगितलं की शारीरिक मनोवृत्तीच्या मनुष्याला याची जाणीव नसते की त्याच्या वागण्यामुळे यहोवाला दुःख होतं. पण याउलट आध्यात्मिक मनोवृत्तीचा मनुष्य देवाचे विचार समजू शकतो. त्याला याची जाणीव असते की आपण जर शारीरिक वृत्ती बाळगली तर ते यहोवाला आवडणार नाही. (१ करिंथ. २:१४-१६; ३:१-३) मंडळीतील वडील ख्रिस्तासारखा विचार करतात. यामुळे एखादी व्यक्‍ती शारीरिक मनोवृत्ती दाखवत आहे हे ते लगेच ओळखतात आणि तिला मदत करायचा प्रयत्न करतात. पण, वडिलांनी आपल्याला मदत करायचा प्रयत्न केला, तर आपण ती स्वीकारून स्वतःमध्ये बदल करणार का? आपण जर असं केलं तर आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्याची आपली इच्छा आहे हे दिसून येईल.—उप. ७:५, ९.

आध्यात्मिक रीत्या प्रगती करा

७. आध्यात्मिक मनोवृत्तीच्या मनुष्याला फक्‍त बायबलचं ज्ञान असणं पुरेसं नाही, असं आपण का म्हणू शकतो?

आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगण्यासाठी फक्‍त बायबलचं ज्ञान असणंच पुरेसं नाही. शलमोन राजाला यहोवाबद्दल खूप ज्ञान होतं आणि त्याच्या काही सुज्ञ शब्दांचा समावेश तर बायबलमध्येही करण्यात आला आहे. पण नंतर हळूहळू यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध कमकुवत होत गेला आणि तो यहोवाला विश्‍वासू राहिला नाही. (१ राजे ४:२९, ३०; ११:४-६) तर मग, बायबलचं ज्ञान घेण्यासोबतच आणखी कशाची गरज आहे? आपण आपला विश्‍वास मजबूत करत राहण्याची गरज आहे. (कलस्सै. २:६, ७) आपण हे कसं करू शकतो?

८, ९. (क) विश्‍वास मजबूत करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल? (ख) अभ्यास आणि मनन करण्यामागे आपला उद्देश काय असला पाहिजे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

पहिल्या शतकात पौलने ख्रिश्‍चनांना “प्रौढतेपर्यंत पोचण्यासाठी खटपट” करण्याचं प्रोत्साहन दिलं. (इब्री ६:१) हा सल्ला आपण आज कसा लागू करू शकतो? एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे देवाच्या प्रेमात टिकून राहा या पुस्तकाचा अभ्यास करणं. या अभ्यासामुळे आपल्याला बायबलची तत्त्वं रोजच्या जीवनात लागू करायला मदत मिळेल. तुम्ही जर या पुस्तकाचा अभ्यास केला असेल, तर तुमचा विश्‍वास मजबूत करण्यासाठी तुम्ही आपल्या इतर प्रकाशनांचा अभ्यास करू शकता. (कलस्सै. १:२३) अभ्यास करण्यासोबतच आपल्याला शिकलेल्या गोष्टींवर मनन करण्याचीही गरज आहे. शिकलेल्या गोष्टी लागू करण्यासाठी मदत व्हावी म्हणून आपण यहोवाला प्रार्थना केली पाहिजे.

यहोवाचे नियम पाळून त्याला खूश करण्याची इच्छा वाढवणं, हा अभ्यास आणि मनन करण्यामागचा आपला मुख्य उद्देश असला पाहिजे. (स्तो. ४०:८; ११९:९७) यासोबतच, आपल्या आध्यात्मिक प्रगतीत अडथळा निर्माण होईल अशा सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.—तीत २:११, १२.

१०. आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी तरुण काय करू शकतात?

१० तुम्ही एक तरुण आहात का आणि तुम्ही काही आध्यात्मिक ध्येयं ठेवली आहेत का? बेथेलमध्ये काम करणारा एक बांधव सहसा संमेलनांमध्ये बाप्तिस्मा घेणाऱ्‍या तरुणांना भेटतो आणि त्यांना त्यांच्या आध्यात्मिक ध्येयांबद्दल विचारतो. या बांधवाला भेटलेल्या बऱ्‍याच तरुणांनी आधीच विचारपूर्वक ठरवलं आहे की त्यांना भविष्यात यहोवाची सेवा कशी करायची आहे. काही जणांनी पूर्णवेळेची सेवा करण्याचं ठरवलं आहे, तर इतर काहींनी प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याची योजना केली आहे. पण काही तरुणांनी याबद्दल काहीच विचार केलेला नाही. याचा अर्थ असा होऊ शकतो का, की या तरुणांना आध्यात्मिक ध्येयं ठेवण्याचं महत्त्व माहीत नाही? तुम्ही तरुण असाल तर स्वतःला विचारा: ‘आईबाबा म्हणतात म्हणून मी सभांना आणि प्रचाराला जातो का? की माझं स्वतःचं यहोवासोबत एक जवळचा नातेसंबंध आहे?’ खरंतर आपल्या सर्वांनीच आध्यात्मिक ध्येयं ठेवणं गरजेचं आहे. ही ध्येयं आपल्याला आध्यात्मिक रीत्या प्रगती करायला मदत करतील.—उप. १२:१, १३.

११. (क) आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (ख) आपण कोणाचं अनुकरण करू शकतो?

११ आपल्याला कोणत्या बाबतीत सुधार करण्याची गरज आहे हे माहीत झाल्यावर आपण पावलं उचलणं गरजेचं आहे. यावर आपलं जीवन अवलंबून आहे म्हणून आपण या गोष्टीला खूप गंभीर रीत्या घेतलं पाहिजे. (रोम. ८:६-८) आपण परिपूर्ण असावं अशी यहोवा अपेक्षा करत नाही, तर मदतीसाठी तो आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देतो. पण आपण स्वतः मेहनत घेणं गरजेचं आहे. नियमन मंडळाचे सदस्य बंधू जॉन बार यांनी लूक १३:२४ या वचनाबद्दल एकदा असं म्हटलं होतं की, “अरुंद दरवाज्यातून बरेच लोक जाऊ शकत नाहीत कारण ते प्रगती करण्याचा मनापासून प्रयत्न करत नाही.” याकोबने एका स्वर्गदूतासोबत कुस्ती केली आणि त्याला आशीर्वाद मिळेपर्यंत त्याने हार मानली नाही. आपण याकोबचं अनुकरण केलं पाहिजे. (उत्प. ३२:२६-२८) हे खरं आहे की बायबलचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. पण बायबल वाचन एखाद्या कादंबरी वाचनासारखं मनोरंजक असावं अशी अपेक्षा आपण करू नये. बायबलचे अनमोल सत्य शोधण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे.

१२, १३. (क) रोमकर ५:५ मध्ये दिलेला सल्ला लागू करायला कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? (ख) पेत्रच्या उदाहरणामुळे आणि त्याने दिलेल्या सल्ल्यामुळे आपल्याला कशी मदत होते? (ग) आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी आपण काय करू शकतो? (“ आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?” ही चौकट पाहा.)

१२ आपण आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपली विचारसरणी बदलायला पवित्र आत्मा आपल्याला मदत करेल. यामुळे आपण हळूहळू ख्रिस्तासारखं विचार करायला शिकू. (रोम. १५:५) चुकीच्या इच्छा मनातून काढून टाकायला आणि देवाला आवडणारे गुण विकसित करायला पवित्र आत्मा आपल्याला मदत करेल. (गलती. ५:१६, २२, २३) प्रयत्न करूनही आपल्याला जाणवलं की आपला कल अजूनही भौतिक गोष्टींकडे आणि शारीरिक इच्छा पूर्ण करण्याकडे आहे, तरी आपण हार मानू नये. आपण चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी यहोवाला त्याचा पवित्र आत्मा मागत राहिला पाहिजे. (लूक ११:१३) आपण प्रेषित पेत्रचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवू शकतो. त्यालाही प्रत्येक वेळी ख्रिस्तासारखा विचार करणं लगेच जमलं नाही. (मत्त. १६:२२, २३; लूक २२:३४, ५४-६२; गलती. २:११-१४) असं असलं तरी त्याने हार मानली नाही, तो प्रयत्न करत राहिला आणि यहोवाने त्याला मदत केली. पेत्र ख्रिस्तासारखं विचार करायला हळूहळू शिकला. आपणही ते शिकू शकतो.

१३ आपल्याला मदत होईल अशा काही खास गुणांचा पेत्रने उल्लेख केला. (२ पेत्र १:५-८ वाचा.) आत्मसंयम, धीर, बांधवांबद्दल आपुलकी आणि इतर चांगले गुण विकसित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण दररोज स्वतःला विचारू शकतो: ‘आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्यासाठी मी आज कोणता गुण विकसित करण्याचा प्रयत्न करू शकतो?’

रोजच्या जीवनात बायबलची तत्त्वं लागू करा

१४. आपली मनोवृत्ती आध्यात्मिक असली तर याचा रोजच्या जीवनावर कसा परिणाम होईल?

१४ आपण ख्रिस्तासारखा विचार केला तर त्याचा परिणाम कामावर किंवा शाळेत असताना आपण जसं वागतो यावर होईल. तसंच, आपलं बोलणं आणि आपले निर्णय यावरही त्याचा परिणाम होईल. आपल्या निर्णयांवरून दिसून येईल की आपण ख्रिस्ताचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपली मनोवृत्ती आध्यात्मिक असल्यामुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येईल, अशी कोणतीही गोष्ट आपण टाळू. एखादी चुकीची गोष्ट करण्याचा आपल्याला मोह होतो तेव्हा आध्यात्मिकतेमुळे आपल्याला त्या गोष्टीपासून दूर राहायला मदत होईल. कोणताही निर्णय घेण्याआधी आपण स्वतःला विचारू: ‘या परिस्थितीत बायबलची कोणती तत्त्वं मी लागू करू शकतो? ख्रिस्त या परिस्थितीत असता तर त्याने काय केलं असतं? काय केल्याने यहोवाला आनंद होईल?’ अशा प्रकारे विचार करण्याची आपण सवय लावून घेतली पाहिजे. आता आपण काही परिस्थितींचा विचार करू या. प्रत्येक परिस्थितीसाठी बायबलचं एक तत्त्व आपण पाहू. यामुळे आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत होईल.

१५, १६. ख्रिस्तासारखा विचार केल्यामुळे आपल्याला पुढील बाबतीत योग्य निर्णय घ्यायला कशी मदत होईल: (क) लग्नासाठी जोडीदार निवडताना. (ख) मित्र निवडताना.

१५ लग्नासाठी जोडीदार निवडणं. यासाठी २ करिंथकर ६:१४, १५ या वचनांत आपल्याला तत्त्व मिळतं. (वाचा.) पौलने अगदी स्पष्टपणे सांगितलं की एका आध्यात्मिक मनोवृत्तीच्या व्यक्‍तीचा दृष्टिकोन शारीरिक मनोवृत्तीच्या व्यक्‍तीपेक्षा खूप वेगळा असतो. हे तत्त्व तुम्हाला योग्य जोडीदार निवडण्यासाठी कसं मदत करू शकतं?

१६ मित्र निवडणं. यासाठी १ करिंथकर १५:३३ या वचनात आपल्याला तत्त्व मिळतं. (वाचा.) आध्यात्मिक मनोवृत्तीची व्यक्‍ती अशा लोकांशी कधीच मैत्री करणार नाही जे तिला आध्यात्मिक गोष्टींपासून दूर नेतील. तुम्ही वेगवेगळ्या परिस्थितींत हे तत्त्व कसं लागू करू शकता यावर विचार करा. उदाहरणार्थ, हे तत्त्व तुम्ही सोशल नेटर्वकवर मैत्री करण्याबद्दल कसं लागू करू शकता? अनोळखी लोकांसोबत ऑनलाईन गेम्स खेळावेत की नाहीत, हे ठरवताना या तत्त्वामुळे तुम्हाला कशी मदत होऊ शकते?

माझ्या निर्णयांमुळे मला आध्यात्मिक प्रगती करायला, ध्येयं ठेवायला आणि इतरांसोबत शांतीने राहायला मदत होईल का? (परिच्छेद १७ पाहा)

१७-१९. आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगल्यामुळे आपल्याला पुढील बाबतीत कशी मदत होते: (क) निरर्थक गोष्टी टाळण्यासाठी. (ख) चांगले ध्येयं ठेवण्यासाठी. (ग) मतभेद सोडवण्यासाठी.

१७ आपल्या आध्यात्मिक प्रगतीला धोका निर्माण करणाऱ्‍या गोष्टी. याबद्दल आपल्याला एक महत्त्वाचा इशारा इब्री लोकांना ६:१ या वचनात मिळतो. (वाचा.) या वचनात ‘निरर्थक कामं’ असं जे म्हटलं आहे त्याचा काय अर्थ होतो? या अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला आध्यात्मिक रीत्या प्रगती करायला काहीच मदत होत नाही. निरर्थक कामांविषयी दिलेल्या या ताकिदीमुळे आपल्याला पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळतील: ‘ही गोष्ट किंवा हे कार्य माझ्या फायद्याचं आहे की याने माझं नुकसान होईल? मी या व्यवसायात आपला वेळ, पैसा गुंतवावा का? जगातील परिस्थिती बदलण्यासाठी कार्य करत असलेल्या संघटनेच्या कामात भाग घेणं चुकीचं का आहे?’

माझ्या निर्णयांमुळे मला आध्यात्मिक प्रगती करायला, ध्येयं ठेवायला आणि इतरांसोबत शांतीने राहायला मदत होईल का? (परिच्छेद १८ पाहा)

१८ आध्यात्मिक ध्येयं. डोंगरावरील उपदेशात येशूने आपल्याला ध्येय ठेवण्याबद्दल चांगला सल्ला दिला. (मत्त. ६:३३) आध्यात्मिक मनोवृत्तीची व्यक्‍ती राज्याला जीवनात नेहमी पहिल्या स्थानी ठेवते. हे तत्त्व आपल्याला पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळवायला मदत करेल: ‘मी माझं शालेय शिक्षण झाल्यावर युनिव्हर्सिटीचं शिक्षण घ्यावं का? मी कोणती नोकरी निवडावी?’

माझ्या निर्णयांमुळे मला आध्यात्मिक प्रगती करायला, ध्येयं ठेवायला आणि इतरांसोबत शांतीने राहायला मदत होईल का? (परिच्छेद १९ पाहा)

१९ मतभेद. बंधुभगिनींमध्ये वाद होतात, तेव्हा पौलने रोममधील ख्रिश्‍चनांना दिलेला सल्ला आपल्याला ते वाद सोडवायला मदत करू शकतो. (रोम. १२:१८) आपण ख्रिस्ताचं अनुकरण करतो, त्यामुळे आपण सर्वांसोबत “शांतीने” राहण्याचा प्रयत्न करतो. इतरांसोबत मतभेद होतात तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असते? इतरांचं मत स्वीकारणं आपल्याला खूप जड जातं का? किंवा आपण शांती टिकवून ठेवणारे आहोत असं इतर जण आपल्याबद्दल बोलतात का?

२०. तुम्हाला कोणत्या कारणांमुळे आध्यात्मिक प्रगती करायची आहे?

२० वरील तत्त्व आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करतील आणि यावरून दिसून येईल की आपण देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारतो. आपण आध्यात्मिक मनोवृत्ती बाळगली तर जीवनात आपण आनंदी आणि समाधानी असू. आपण लेखाच्या सुरुवातीला रॉबर्टचं उदाहरण पाहिलं होतं. तो म्हणतो: “यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडल्यानंतर, मी एक चांगला पती आणि पिता बनू शकलो. मी आनंदी आणि समाधानी झालो.” आपण आध्यात्मिक रीत्या प्रगती करण्याचा होता होईल तितका प्रयत्न केला तर आपल्याला अनेक फायदे होतील. आपलं आजचं जीवन तर आनंदी होईलच, पण त्यासोबतच भविष्यात आपल्याला “खरे जीवन” मिळेल.—१ तीम. ६:१९.