व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्या विश्‍वासाचं व आज्ञाधारकतेचं अनुकरण करा

नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्या विश्‍वासाचं व आज्ञाधारकतेचं अनुकरण करा

“नोहा, दानीएल व ईयोब . . . आपल्या धार्मिकतेमुळे आपला तेवढा जीव बचावतील.”—यहे. १४:१४.

गीत क्रमांक: ६, ५४

१, २. (क) नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्या उदाहरणाचं परीक्षण केल्याने आपल्याला धैर्य कसं मिळू शकतं? (ख) यहेज्केल १४:१४ मधले शब्द लिहिण्यात आले तेव्हा परिस्थिती कशी होती?

आजारामुळे, पैशाच्या चणचणीमुळे किंवा छळामुळे तुम्ही समस्यांचा सामना करत आहात का? यहोवाच्या सेवेत आनंदी राहणं तुम्हाला कठीण वाटतं का? जर तुमचं उत्तर ‘हो’ असेल तर नोहा, दानीएल आणि ईयोबच्या उदाहरणांवरून तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. तेसुद्धा आपल्यासारखे अपरिपूर्ण होते आणि त्यांनासुद्धा आपल्यासारख्याच समस्यांना तोंड द्यावं लागलं. काही वेळा तर त्यांच्या जीवालादेखील धोका होता. पण ते यहोवाला विश्‍वासू राहिले आणि यहोवाच्या नजरेत ते विश्‍वासाचे आणि आज्ञाधारकतेचे चांगले उदाहरण ठरले.—यहेज्केल १४:१२-१४ वाचा.

यरुशलेमचा विनाश इ.स.पू. ६०७ मध्ये झाला आणि त्यानंतर फक्‍त पाच वर्षांनीच म्हणजे इ.स.पू. ६१२ मध्ये यहेज्केलने बाबेलमध्ये असताना या लेखाचं मुख्य शास्त्रवचन लिहिलं. * (यहे. १:१; ८:१) यरुशलेममध्ये फक्‍त काही लोक नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्यासारखे आज्ञाधारक आणि विश्‍वासू होते आणि म्हणून त्यांचा जीव वाचला. (यहे. ९:१-५) यिर्मया, बारूख, एबद-मलेख आणि रेखाबी लोक हे त्यांच्यापैकी होते.

३. या लेखात आपण काय शिकणार आहोत?

नोहा, दानीएल आणि ईयोब यहोवाच्या नजरेत नीतिमान होते. आज यांच्यासारख्याच लोकांना यहोवा दुष्ट जगाच्या नाशापासून वाचवेल. (प्रकटी. ७:९, १४) यहोवाच्या नजरेत जे योग्य आहे ते करण्याच्या बाबतीत या तिघांनी चांगलं उदाहरण मांडलं. यहोवाने या चांगल्या उदाहरणांचा उल्लेख का केला हे आपण शिकू या. आता आपण पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: (१) त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? (२) आपण त्यांच्या विश्‍वासाचं आणि आज्ञाधारकतेचं अनुकरण कसं करू शकतो?

९०० पेक्षा जास्त वर्षं विश्‍वासू आणि आज्ञाधारक राहणारा नोहा

४, ५. नोहासमोर कोणत्या काही समस्या होत्या आणि त्याच्याबद्दल कोणती गोष्ट उल्लेखनीय आहे?

नोहासमोर कोणत्या काही समस्या होत्या? फक्‍त नोहाच्या काळातच नाही, तर त्याचा पणजोबा, हनोख याच्या काळातही लोक खूप वाईट होते. ते यहोवाबद्दल “धक्कादायक” गोष्टी बोलायचे. (यहू. १४, १५) त्यानंतर तर लोक आणखीनच वाईट होत गेले. नोहाच्या काळापर्यंत तर पृथ्वी “जाचजुलमांनी भरली होती.” दुष्ट देवदूत पृथ्वीवर आले आणि मानवांचे शरीर धारण करून त्यांनी स्त्रियांशी लग्न केलं. त्यांची मुलं क्रूर आणि हिंसक होती. (उत्प. ६:२-४, ११, १२) पण नोहा त्या सर्वांपेक्षा फार वेगळा आहे हे लोकांच्या लक्षात आलं. बायबल म्हणतं: “नोहावर परमेश्‍वराची कृपादृष्टि होती.” त्याच्या आजूबाजूला असणारे लोक वाईट कामं करायचे. पण नोहाने मात्र नेहमी योग्य तेच केलं. तो खऱ्‍या “देवाबरोबर चालला.”—उत्प. ६:८, ९.

या गोष्टींवरून आपल्याला नोहाबद्दल काय समजतं? पहिली ही, की त्याने जलप्रलय येण्याच्या आधी त्या दुष्ट जगात बरीच वर्षं यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली. म्हणजे फक्‍त ७० किंवा ८० वर्षं नाही तर जवळजवळ ६०० वर्षं! (उत्प. ७:११) दुसरी ही, की त्याला मदत करायला किंवा प्रोत्साहन द्यायला आजच्या सारखी तेव्हा कोणतीही मंडळी नव्हती. इतकंच काय तर, असं दिसून येतं की त्याच्या भाऊबहिणींनीसुद्धा त्याला साथ दिली नाही. *

६. नोहा धाडसी होता हे त्याने कसं दाखवलं?

चांगली व्यक्‍ती असणं एवढंच पुरेसं आहे, असा नोहाने विचार केला नाही. यहोवावर त्याचा विश्‍वास आहे हे त्याने निर्भयपणे इतरांना सांगितलं. बायबलमध्ये त्याला “नीतिमत्त्वाचा प्रचारक” म्हणण्यात आलं आहे. (२ पेत्र २:५) प्रेषित पौलने नोहाबद्दल म्हटलं: “विश्‍वासाद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले.” (इब्री ११:७) हे खरं आहे, की लोकांनी त्याची थट्टा केली व त्याला रोखण्याचादेखील प्रयत्न केला. त्यांनी कदाचित त्याला इजा पोहोचवण्याचीही धमकी दिली असावी. पण नोहा लोकांना घाबरला नाही. (नीति. २९:२५) नोहाला विश्‍वास होता यामुळे यहोवाने त्याला धैर्य दिलं. त्याच प्रमाणे यहोवा आपल्या प्रत्येक विश्‍वासू सेवकाला धैर्य देतो.

७. जहाज बांधताना नोहासमोर कोणत्या काही समस्या होत्या?

नोहाला मोठं जहाज बांधण्याची कामगिरी मिळाली त्याच्या ५०० वर्षांआधीपासूनच तो यहोवाला विश्‍वासू होता. त्या जहाजामुळे काही लोकांचा आणि प्राण्यांचा जीव वाचणार होता. (उत्प. ५:३२; ६:१४) इतकं मोठं जहाज बांधणं हे काही सोपं काम नाही, असं कदाचित नोहाला वाटलं असावं. ते बांधत असताना लोक त्याच्यावर हसतील आणि त्याच्यासाठी समस्या निर्माण करतील, हेदेखील त्याला माहीत असावं. पण नोहा विश्‍वासू होता आणि त्याने यहोवाची आज्ञा पाळली. त्याला “जे काही सांगितले ते त्याने केले.”—उत्प. ६:२२.

८. यहोवा आपल्या कुटुंबाच्या गरजा पुरवेल यावर नोहाचा भरवसा होता हे त्याने कसं दाखवून दिलं?

नोहासमोर आणखी एक समस्या होती. त्याला आपल्या पत्नीच्या आणि मुलांच्या गरजा पूर्ण करायच्या होत्या. जलप्रलय येण्याआधी शेती करण्यासाठी लोकांना खूप कष्ट करावे लागायचे. नोहालाही कष्ट करावे लागले. (उत्प. ५:२८, २९) असं असलं तरी कुटुंबाच्या गरजा कशा पूर्ण होतील, याचीच तो सर्वात जास्त चिंता करत बसला नाही. कदाचित जहाज बांधायला ४० ते ५० वर्षं लागली असावीत आणि नोहा ते बांधण्यात व्यस्त होता. पण तरी त्याचं यहोवावर पूर्णपणे लक्ष केंद्रित होतं. आणि जलप्रलय आल्याच्या ३५० वर्षांनंतरही नोहाचं यहोवावर पूर्णपणे लक्ष केंद्रित होतं. (उत्प. ९:२८) आज्ञाधारकता आणि विश्‍वासूपणा यांबाबतीत नोहा खरंच आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे!

९, १०. (क) आपण नोहाच्या विश्‍वासाचं आणि आज्ञाधारकतेचं अनुकरण कसं करू शकतो? (ख) देवाच्या आज्ञा पाळण्याचा जर तुमचा निर्धार पक्का आहे तर तुम्ही कोणत्या गोष्टीची खात्री बाळगू शकता?

आपण नोहाच्या आज्ञाधारकतेचं आणि विश्‍वासाचं कसं अनुकरण करू शकतो? यहोवाच्या नजरेत जे योग्य आहे त्याची बाजू घेण्याद्वारे, सैतानाच्या जगाचा भाग न होण्याद्वारे आणि यहोवाला आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवण्याद्वारे आपण त्याचं अनुकरण करू शकतो. (मत्त. ६:३३; योहा. १५:१९) या कारणांमुळे साहजिकच जग आपला द्वेष करेल. उदाहरणार्थ, लग्न आणि लैंगिक संबंध यांबाबतीत देवाचे नियम पाळण्याचा आपला निर्धार असल्यामुळे प्रसारमाध्यमात लोक आपल्याबद्दल कदाचित नकारात्मक गोष्टी बोलतील. (मलाखी ३:१७, १८ वाचा.) नोहासारखं आपणही लोकांना घाबरत नाही. आपण यहोवाचं भय बाळगतो म्हणजेच, आपण त्याचा मनापासून आदर करतो आणि त्याचं मन दुखवत नाही. फक्‍त तोच आपल्याला सर्वकाळाचं जीवन देऊ शकतो हे आपल्याला माहीत आहे.—लूक १२:४, ५.

१० स्वतःला विचारा: ‘दुसरे माझ्यावर हसले किंवा त्यांनी माझी टीका केली तरीही मी यहोवाच्या नजरेत जे योग्य आहे ते करत राहीन का? कुटुंबाच्या गरजा पूर्ण करणं मला कठीण जात असेल, तेव्हाही यहोवा त्या पूर्ण करेल असा मी भरवसा बाळगतो का?’ जर तुम्हीसुद्धा नोहासारखा यहोवावर विश्‍वास ठेवून त्याची आज्ञा पाळली, तर यहोवा नक्कीच तुमची काळजी घेईल अशी खात्री तुम्ही बाळगू शकता.—फिलिप्पै. ४:६, ७.

दुष्ट शहरात राहूनदेखील विश्‍वासू आणि आज्ञाधारक राहणारा दानीएल

११. बाबेलमध्ये दानीएल आणि त्याच्या तीन मित्रांना कोणत्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

११ दानीएलसमोर कोणत्या काही समस्या होत्या? दानीएलला इच्छा नसतानाही बाबेलमध्ये राहावं लागलं होतं. त्या विदेशी शहरात खोट्या देवांची उपासना आणि भूतविद्या मोठ्या प्रमाणात केली जायची. तिथले लोक यहुदी लोकांना नापसंत करायचे. ते त्यांची आणि त्यांच्या देवाची, यहोवाची निंदा करायचे. (स्तो. १३७:१, ३) हे पाहून यहोवावर प्रेम करणाऱ्‍या दानीएल आणि इतर यहुद्यांना खूप दुःख झालं असेल! तसंच, दानीएल आणि त्याचे तीन मित्र म्हणजे हनन्या, मीशाएल व अजऱ्‍या यांना बाबेलच्या राजदरबारात काम करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार होतं. अशा वेळी बऱ्‍याच लोकांचं त्यांच्यावर लक्ष असावं. राजाला जे अन्‍न दिलं जायचं तेच अन्‍न यांनीदेखील खावं, अशी त्यांच्याकडून अपेक्षा होती. पण त्या अन्‍नात यहोवाच्या नजरेत अशुद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश होता आणि त्याच्या लोकांनी त्या खाव्यात अशी त्याची इच्छा नव्हती. म्हणून हे अन्‍न खाऊन दानीएलला स्वतःला भ्रष्ट करून घ्यायचं नव्हतं.—दानी. १:५-८, १४-१७.

१२. (क) दानीएल कसा होता? (ख) यहोवा त्याच्याबद्दल काय विचार करायचा?

१२ दानीएलसमोर आणखी एक समस्या होती पण ती सुरुवातीला इतकी मोठी वाटली नाही. दानीएल निपुण होता आणि म्हणून राजाने त्याला काही विशेष अधिकारही दिले होते. (दानी. १:१९, २०) असं असलं तरी तो घमेंडी बनला नाही किंवा आपण नेहमीच योग्य सल्ला देतो, असा त्याने विचार केला नाही. तो नम्र होता आणि आपली मर्यादा ओळखून होता. आपल्या यशाचं श्रेय तो नेहमी यहोवाला द्यायचा. (दानी. २:३०) जरा विचार करा: अनुकरण करण्यासारख्या चांगल्या उदाहरणांमध्ये यहोवाने नोहा आणि ईयोबसोबत दानीएलचाही उल्लेख केला! यहोवाने हा उल्लेख केला तेव्हा नोहा आणि ईयोबने तर आयुष्यभर विश्‍वासूपणे यहोवाची सेवा केली होती. पण दानीएल मात्र तरुण होता. तरीदेखील यहोवाने त्याचा उल्लेख या विश्‍वासू सेवकांसोबत केला. खरंच, यहोवाला त्याच्याबद्दल पूर्ण खात्री होती! आणि यहोवाने जे म्हटलं ते खरं ठरलं. कारण दानीएल आयुष्यभर देवाला विश्‍वासू आणि आज्ञाधारक राहिला. जेव्हा दानीएल जवळपास १०० वर्षांचा झाला, तेव्हा देवाच्या दूताने त्याला “हे दानीएला, परमप्रिय पुरुषा” असं प्रेमळपणे म्हटलं.—दानी. १०:११.

१३. कोणत्या कारणामुळे यहोवाने दानीएलला उच्च पद मिळवून दिलं असावं?

१३ यहोवाच्या साहाय्याने दानीएल आधी बाबेल साम्राज्यात आणि नंतर मेद-पारस साम्राज्यात एक खूप महत्त्वपूर्ण अधिकारी बनला. (दानी. १:२१; ६:१, २) यहोवाने त्याच्या लोकांना मदत करण्यासाठी जसं इजिप्तमध्ये योसेफला आणि पारसमध्ये मर्दखय व एस्तेरला उच्च पद मिळवून दिलं होतं तसंच त्याने दानीएलच्या बाबतीतही केलं. * (दानी. २:४८) जरा कल्पना करा: यहेज्केल आणि बंदिवासात असलेल्या इतर जणांना मदत करण्यासाठी यहोवाने ज्या प्रकारे दानीएलचा वापर केला हे पाहून त्यांना कसं वाटलं असेल? त्यांना नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल!

आपण यहोवाला एकनिष्ठ राहिलो, तर तो आपल्याला परमप्रिय समजेल (परिच्छेद १४, १५ पाहा)

१४, १५. (क) आपली परिस्थिती दानीएलसारखी कशी आहे? (ख) दानीएलच्या आईवडिलांकडून आज पालक काय शिकू शकतात?

१४ आपण दानीएलच्या आज्ञाधारकतेचं आणि विश्‍वासाचं अनुकरण कसं करू शकतो? आपण ज्या जगात राहत आहोत ते पूर्णपणे अनैतिकता आणि खोट्या उपासनेने भरलेलं आहे. खोट्या उपासनेचं साम्राज्य असलेली मोठी बाबेल हिचा लोकांवर खूप मोठा पगडा आहे. बायबल तिला “दुरात्म्यांचं निवासस्थान” असं म्हणतं. (प्रकटी. १८:२) पण आपण या जगात विदेशी लोकांसारखे आहोत. यामुळे आपण इतरांपेक्षा खूप वेगळे आहोत हे लोकांना दिसून येतं आणि ते आपली थट्टा करतात. (मार्क १३:१३) असं असलं तरी दानीएलसारखा आपलादेखील यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध असला पाहिजे. जेव्हा आपण नम्र असू, यहोवावर आपला भरवसा असेल आणि आपण त्याची आज्ञा पाळू, तेव्हा आपणदेखील त्याच्या नजरेत परमप्रिय ठरू.—हाग्ग. २:७.

१५ दानीएलच्या आईवडिलांकडून पालक महत्त्वाचे धडे शिकू शकतात. दानीएल लहान असताना यहूदामध्ये होता आणि तिथले बरेचसे लोक खूप दुष्ट होते. तरीही दानीएलचं यहोवावर असलेलं प्रेम वाढत गेलं. पण हे प्रेम आपोआप विकसित झालं असेल का? नाही. त्याच्या आईवडिलांनी त्याला यहोवाबद्दल शिकवलं असेल. (नीति. २२:६) इतकंच काय, तर दानीएलच्या नावाचा अर्थ ‘देव माझा न्यायाधीश आहे’ असा होतो. यावरूनसुद्धा कळून येतं की त्याच्या आईवडिलांचं देवावर प्रेम होतं. म्हणून पालकांनो, धीराने आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवत राहा. हार मानू नका. (इफिस. ६:४) त्यांच्यासोबत प्रार्थना करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. यहोवाच्या नजरेत जे योग्य आहे ते त्यांना शिकवण्याचा पुरेपूर प्रयत्न करा. यासाठी यहोवा तुम्हाला नक्कीच खूप आशीर्वाद देईल!—स्तो. ३७:५.

श्रीमंत आणि गरीब असतानाही विश्‍वासू आणि आज्ञाधारक राहणारा ईयोब

१६, १७. ईयोबच्या जीवनात आधी आणि नंतर कोणत्या समस्या आल्या?

१६ ईयोबसमोर कोणत्या काही समस्या होत्या? ईयोबला आपल्या जीवनात खूप मोठमोठ्या बदलांचा सामना करावा लागला होता. सुरुवातीला ईयोब “पूर्व देशातल्या सर्व लोकात थोर होता.” (ईयो. १:३) तो खूप श्रीमंत आणि नावाजलेला असून लोक त्याचा खूप आदर करायचे. (ईयो. २९:७-१६) असं असलं तरी आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत किंवा आपल्याला देवाची गरज नाही, असा विचार त्याने कधीच केला नाही. हे आपण कशावरून म्हणू शकतो? कारण यहोवाने त्याला “माझा सेवक” असं म्हटलं. तो असंही म्हणाला, की ईयोब “सात्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा” आहे.—ईयो. १:८.

१७ पुढे अचानक ईयोबचं जीवन पूर्णपणे बदलून गेलं. त्याने सर्वकाही गमावलं आणि तो इतका निराश झाला की त्याला मरून जावंसं वाटलं. त्याच्यावर आलेल्या समस्या सैतानामुळे होत्या हे आपल्याला माहीत आहे. ईयोब यहोवाची सेवा स्वार्थासाठी करत आहे, असं सैतान म्हणाला. (ईयोब १:९, १० वाचा.) हा आरोप यहोवासाठी खूप गंभीर होता. सैतान दुष्ट असून तो खोटं बोलत आहे, हे सिद्ध करण्यासाठी यहोवाने काय केलं? ईयोब देवाला एकनिष्ठ आहे आणि तो देवाची सेवा प्रेमापोटी करतो, हे सिद्ध करण्याची संधी त्याने ईयोबला दिली.

१८. (क) ईयोबबद्दल कोणती गोष्ट तुम्हाला आवडली? (ख) यहोवा ईयोबशी जसं वागला त्यावरून आपण यहोवाबद्दल काय शिकतो?

१८ ईयोबवर फक्‍त एकदाच समस्या आणून सैतान काही गप्प बसला नाही. त्याने त्याच्यावर एकापाठोपाठ एक समस्या आणल्या आणि त्याच्यावर सर्व समस्या देवामुळेच येत आहेत असा विचार करायला लावला. (ईयो. १:१३-२१) ईयोबचे नावापुरते असलेले तीन मित्र त्याला खूप टोचून बोलले. तो दुष्ट आहे आणि देव त्याला शिक्षा करत आहे असं ते म्हणाले. (ईयो. २:११; २२:१, ५-१०) इतकं सर्व घडलं, तरी ईयोब यहोवाला एकनिष्ठ राहिला. हे खरं आहे की काही वेळा तो बोलण्यात चुकला. (ईयो. ६:१-३) पण यहोवाला माहीत होतं, की ईयोब दुःखी आणि निराश असल्यामुळेच असं बोलला. दादागिरी करणाऱ्‍या मनुष्याप्रमाणे सैतानाने ईयोबला सतावलं आणि त्याचा वारंवार अपमान केला, पण तरी ईयोबने यहोवाला सोडलं नाही. हे सर्व यहोवा पाहत होता. दुःखाचा हा काळ लोटल्यानंतर, यहोवाने ईयोबला आधीपेक्षा सर्वकाही दुप्पट दिलं. इतकंच नाही, तर यहोवाने त्याचं आयुष्य १४० वर्षं वाढवलं. (याको. ५:११) ईयोबने पुढेही यहोवाची सेवा पूर्ण मनाने केली. हे आपण खात्रीने कसं म्हणू शकतो? कारण आपल्या लेखाचं मुख्य वचन, यहेज्केल १४:१४ हे ईयोब होऊन गेल्याच्या कित्येक शतकांनंतर लिहिण्यात आलेलं.

१९, २०. (क) आपण ईयोबच्या विश्‍वासाचं आणि आज्ञाधारकतेचं अनुकरण कसं करू शकतो? (ख) यहोवासारखं आपणसुद्धा इतरांशी दयाळूपणे कसं वागू शकतो?

१९ आपण ईयोबच्या विश्‍वासाचं आणि आज्ञाधारकतेचं अनुकरण कसं करू शकतो? आपली परिस्थिती चांगली असो वा वाईट, आपल्या जीवनात यहोवा ही सर्वात महत्त्वपूर्ण व्यक्‍ती आहे हे दाखवण्याचा आपण निर्धार केला पाहिजे. आपला त्याच्यावर पूर्णपणे भरवसा असला पाहिजे आणि पूर्ण मनाने आपण त्याची आज्ञा पाळली पाहिजे. असं करण्याची आपल्याकडे ईयोबपेक्षा जास्त कारणं आहेत. याचा विचार करा: सैतानाबद्दल आपल्याला बरंच काही माहीत आहे आणि त्याचे डावपेचही आपण जाणतो. (२ करिंथ. २:११) बायबलमुळे आणि खासकरून ईयोबच्या पुस्तकामुळे आपल्याला माहीत आहे, की देवाने दुःखाला अनुमती का दिली आहे. आणि देवाचं राज्य एक खरेखुरे सरकार आहे आणि त्याचा राजा येशू आहे, हेही आपण दानीएलच्या भविष्यवाणीवरून जाणतो. (दानी. ७:१३, १४) तसंच, हे राज्य लवकरच संपूर्ण पृथ्वीवर शासन करेल आणि सर्व दुःखांचा अंत करेल, हेसुद्धा आपल्याला माहीत आहे.

२० आपले बांधव दुःखाचा सामना करत असतात तेव्हा आपण त्यांच्याशी दयाळूपणे वागलं पाहिजे हेदेखील ईयोबच्या अनुभवावरून आपल्याला शिकायला मिळतं. ईयोबसारखं तेदेखील कदाचित बोलण्यात चुकतील. (उप. ७:७) पण अशा वेळी आपण त्यांच्याबद्दल वाईट विचार करू नये किंवा त्यांनी काहीतरी चुकीचं केलं आहे असा आपण त्यांच्यावर आरोप लावू नये. याउलट, आपण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं करण्याद्वारे आपणदेखील आपला पिता, यहोवासारखं प्रेमळ आणि दयाळू होऊ.—स्तो. १०३:८.

यहोवा “तुम्हाला बळ देईल”

२१. १ पेत्र ५:१० मध्ये दिलेल्या शब्दांवरून आपल्याला नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्या अनुभवांची आठवण कशी होते?

२१ नोहा, दानीएल आणि ईयोब इतिहासातल्या वेगवेगळ्या काळात जगले आणि त्यांची परिस्थितीही एकमेकांपासून खूप वेगळी होती. पण त्यांच्यात एका गोष्टीबद्दल साम्य होतं, ते म्हणजे त्यांनी धीराने सर्व समस्यांचा सामना केला. त्यांच्या अनुभवांवरून आपल्याला प्रेषित पेत्रचे शब्द आठवतात. तो म्हणाला: “तुम्ही थोड्या काळापर्यंत दुःखे सोसल्यावर, सर्व प्रकारची अपार कृपा करणारा देव स्वतः तुमचे प्रशिक्षण पूर्ण करेल। . . . तो तुम्हाला दृढ करेल, तुम्हाला बळ देईल व स्थिर उभे राहण्यास साहाय्य करेल.”—१ पेत्र ५:१०.

२२. पुढच्या लेखात आपण काय शिकणार आहोत?

२२ १ पेत्र ५:१० मध्ये दिलेले शब्द आजदेखील देवाच्या सेवकांबाबत खरे ठरतात. यहोवा त्याच्या सेवकांना आश्‍वासन देतो की तो त्यांना दृढ करेल आणि बळ देईल. आणि आपल्यालाही वाटतं की यहोवाने आपल्याला बळ द्यावं व आपण दृढ होऊन त्याला विश्‍वासू राहावं. म्हणूनच नोहा, दानीएल आणि ईयोब यांच्या विश्‍वासाचं व आज्ञाधारकतेचं अनुकरण करण्याची आपली इच्छा आहे. यहोवाला चांगल्या रीतीने ओळखत असल्यामुळे ते त्याला विश्‍वासू कसे राहू शकले हे आपण पुढच्या लेखात शिकणार आहोत. इतकंच नाही, तर यहोवा त्यांच्याकडून अपेक्षा करत असलेल्या सर्वकाही गोष्टी त्यांना ‘समजत’ होत्या हेदेखील आपण पाहणार आहोत. (नीति. २८:५) आपणसुद्धा याबाबतीत त्यांचं अनुकरण करू शकतो.

^ परि. 2 यहेज्केलला बाबेलमध्ये इ.स.पू. ६१७ मध्ये नेण्यात आलं. त्यानंतर सहाव्या वर्षी म्हणजे इ.स.पू. ६१२ मध्ये त्याने यहेज्केल ८:१–१९:१४ ही वचनं लिहिली.

^ परि. 5 नोहाचा पिता लामेख याचा देवावर विश्‍वास होता. पण जलप्रलय येण्याच्या पाच वर्षांआधीच त्याचा मृत्यू झाला. आणि जर जलप्रलयाच्या वेळी नोहाची आई, भाऊ, बहीण जिवंत असतील तर त्यांचादेखील इतर लोकांसोबत नाश झाला असेल कारण ते यहोवाचे सेवक नव्हते.

^ परि. 13 हनन्या, मीशाएल आणि अजऱ्‍या यांनासुद्धा यहोवाने तशीच मदत केली असावी. त्यांना यहुदी लोकांना मदत करता यावी म्हणून यहोवाने असं केलं असावं.—दानी. २:४९.