व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ७

आपण आपल्या पित्यावर, यहोवावर खूप प्रेम करतो!

आपण आपल्या पित्यावर, यहोवावर खूप प्रेम करतो!

“आधी त्याने आपल्यावर प्रेम केले, म्हणून आपण प्रेम करतो.”—१ योहा. ४:१९.

गीत २३ यहोवा आमचे बळ!

सारांश *

१-२. आपल्याला यहोवाच्या कुटुंबाचा भाग बनणं कसं शक्य झालं आणि का?

यहोवाने आपल्याला त्याच्या उपासकांच्या कुटुंबाचा भाग बनण्याचं आमंत्रण दिलं आहे. खरंच, हा आपल्यासाठी किती मोठा बहुमान आहे! हे कुटुंब अशा सदस्यांनी बनलेलं आहे ज्यांनी देवाला आपलं जीवन समर्पित केलं आहे आणि जे त्याच्या मुलाच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवतात. आपलं कुटुंब एक आनंदी कुटुंब आहे. कारण, आज आपल्या जीवनाला अर्थ आहे आणि भविष्यात आपल्याला सर्वकाळच्या जीवनाची आशा आहे; मग ती स्वर्गात असो किंवा पृथ्वीवर.

यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे. आपण त्याच्या कुटुंबाचा भाग बनण्यासाठी त्याने खूप मोठा त्याग केला आहे. (योहा. ३:१६) त्याने “किंमत देऊन” आपल्याला विकत घेतलं आहे. (१ करिंथ. ६:२०) खंडणीमुळे आपल्याला यहोवासोबत जवळचं नातं जोडणं शक्य झालं. विश्‍वातल्या सगळ्यात महान व्यक्‍तीला, पिता म्हणण्याचा सन्मान आपल्याला मिळाला आहे. यहोवा हा सर्वात चांगला पिता आहे याबद्दल मागच्या लेखात आपण चर्चा केली होती.

३. आपण स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकतो? (“ यहोवा मला खरंच ओळखतो का?” ही चौकटसुद्धा पाहा)

एका बायबल लेखकाप्रमाणे आपल्याही मनात प्रश्‍न येऊ शकतो की “यहोवाने माझ्यासाठी जे सारे केले आहे, त्याची फेड करण्यासाठी मला आता त्याला कोणते अर्पण वाहता येईल?” (स्तो. ११६:१२, सुबोधभाषांतर)  खरंतर, यहोवाने केलेल्या उपकारांची परतफेड आपण कधीच करू शकत नाही. तरीही त्याने दाखवलेल्या प्रेमामुळे आपण त्याच्यावर प्रेम करतो. प्रेषित योहानने म्हटलं: “आधी त्याने आपल्यावर प्रेम केले, म्हणून आपण प्रेम करतो.” (१ योहा. ४:१९) आपलं आपल्या स्वर्गीय पित्यावर प्रेम आहे हे आपण कोणत्या मार्गांनी दाखवू शकतो?

यहोवाच्या जवळ राहा

आपल्या स्वर्गीय पित्याला, यहोवाला प्रार्थना करण्याद्वारे, त्याच्या आज्ञा पाळण्याद्वारे आणि इतरांना त्याच्यावर प्रेम करायला मदत करण्याद्वारे आपण त्याच्यावर प्रेम असल्याचं दाखवतो (परिच्छेद ४-१४ पाहा)

४. याकोब ४:८ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण यहोवाचे मित्र का बनलं पाहिजे?

यहोवाची इच्छा आहे की आपण त्याच्याशी मैत्री करावी आणि त्याच्याशी बोलावं. (याकोब ४:८ वाचा.) तो आपल्याला “प्रार्थना करत” राहण्याचं प्रोत्साहन देतो आणि त्या ऐकण्यासाठी तो नेहमी तयार असतो. (रोम. १२:१२) एखादी व्यक्‍ती खूप व्यस्त किंवा थकलेली असेल तर ती कदाचित आपलं ऐकून घेणार नाही, पण यहोवा आपलं नेहमी ऐकतो. आपण बायबल आणि बायबल समजण्यासाठी उपलब्ध असलेली प्रकाशनं वाचतो, तेव्हा आपणही त्याचं ऐकत असतो. तसंच, ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देण्याद्वारेसुद्धा आपण त्याचं ऐकत असतो. मुलं आपल्या आईवडिलांशी नेहमी बोलतात आणि त्यांचं ऐकतात तेव्हा त्यांच्यातलं नातं घनिष्ठ होतं. त्याच प्रकारे, आपण यहोवाशी नियमितपणे बोललो आणि त्याचं ऐकलं तर आपलं त्याच्यासोबतचं नातं घनिष्ठ होईल.

परिच्छेद ५ पाहा

५. यहोवाने आपली प्रार्थना ऐकावी यासाठी आपण काय करू शकतो?

आपली प्रार्थना कशी असली पाहिजे यावर विचार करा. यहोवाची इच्छा आहे की प्रार्थना करताना आपण त्याच्यासमोर आपलं मन मोकळं करावं. (स्तो. ६२:८) आपण स्वतःला प्रश्‍न विचारू शकतो: ‘माझी प्रार्थना वरवरची किंवा इतरांनी केलेल्या प्रार्थनांची नक्कल असते की ती मनापासून आणि स्वतःच्या शब्दात मांडलेली असते?’ यात काहीच शंका नाही की तुमचं यहोवावर मनापासून प्रेम आहे आणि त्याच्यासोबत नातं टिकवून ठेवायची तुमची इच्छा आहे. पण यासाठी तुम्ही नियमितपणे त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे. तेव्हा, ज्या गोष्टी तुम्ही कोणाला सांगू शकत नाही त्या गोष्टी त्याला सांगा. तुम्हाला कोणत्या गोष्टींमुळे आनंद होतो आणि कोणत्या गोष्टींमुळे चिंता होते त्या त्याला सांगा. तुम्ही यहोवाकडे मदत मागू शकता याची खातरी बाळगा.

६. आपल्या स्वर्गीय पित्यासोबत जवळचं नातं टिकवून ठेवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

आपल्याला यहोवाच्या जवळ राहायचं असेल तर त्याने आपल्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल आपण कदर बाळगली पाहिजे. मग आपणही स्तोत्रकर्त्याप्रमाणे म्हणू शकतो: “हे परमेश्‍वरा, माझ्या देवा, तू आम्हासाठी केलेली अद्‌भुत कृत्ये व आमच्याविषयीचे तुझे विचार पुष्कळ आहेत; तुझ्यासमोर त्यांची क्रमवार मांडणी करता येणार नाही; मी ते सांगू लागलो तर ते माझ्या गणनेपलीकडे आहेत.” (स्तो. ४०:५) आपल्याला यहोवाबद्दल कदर आहे असा फक्‍त आपण विचारच  करत नाही, तर आपल्या शब्दांद्वारे आणि कार्यांद्वारे व्यक्‍तही  करतो. यावरून दिसून येतं की आपण जगातल्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहोत. कारण आज आपण अशा लोकांमध्ये राहात आहोत ज्यांना देवाने त्यांच्यासाठी केलेल्या गोष्टींची कदर नाही. खरंतर, लोक उपकारांची जाण न ठेवणारे असतील हे ‘शेवटच्या दिवसांतलं’ एक चिन्ह आहे. (२ तीम. ३:१, २) आणि आपल्याला त्यांच्यासारखं वागण्याची बिलकूल इच्छा नाही!

७. आपण काय करावं अशी यहोवाची इच्छा आहे आणि का?

आपल्या मुलांनी वाद घालू नये तर एकीने राहावं अशी पालकांची इच्छा असते. त्याच प्रकारे, यहोवाची इच्छा आहे की त्याच्या सर्व उपासकांमध्ये ऐक्य असावं. खरंतर, आपसातलं प्रेम हे खऱ्‍या ख्रिश्‍चनांचं ओळखचिन्ह आहे. (योहा. १३:३५) आपल्याही भावना स्तोत्रकर्त्याप्रमाणे आहेत. त्याने म्हटलं: “पाहा, बंधूनी ऐक्याने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे!” (स्तो. १३३:१) आपलं भाऊबहिणींवर प्रेम असतं तेव्हा आपलं यहोवावर प्रेम असल्याचं दिसून येतं. (१ योहा. ४:२०) आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे की आपण अशा कुटुंबांचे भाग आहोत ज्यात भाऊबहीण “एकमेकांशी प्रेमाने” वागतात व “कोमलतेने सहानुभूती” दाखवतात.—इफिस. ४:३२.

देवाच्या आज्ञांचं पालन करून प्रेम दाखवा

परिच्छेद ८ पाहा

८. १ योहान ५:३ यात सांगितल्याप्रमाणे आपण यहोवाच्या आज्ञेत राहण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे?

यहोवाची इच्छा आहे की मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहावं. यहोवा आपला पिता असल्यामुळे आपण त्याच्या आज्ञेत राहावं अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (इफिस. ६:१) आपण त्याच्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे कारण तो आपला निर्माणकर्ता, आपल्या गरजा पुरवणारा आणि कोणत्याही मानवी पित्यापेक्षा सर्वात बुद्धिमान आहे. पण त्याच्या आज्ञांचं पालन करण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपलं त्याच्यावर असलेलं प्रेम. (१ योहान ५:३ वाचा.) यहोवावर प्रेम करण्याची आपल्याजवळ बरीच कारणं असली तरी तो आपल्याला असं करण्याची बळजबरी करत नाही. यहोवाने आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळे आपण त्याच्या आज्ञेत राहण्याची निवड करतो, तेव्हा त्याला आनंद होतो.

९-१०. यहोवाचे स्तर माहीत करून घेणं आणि त्यानुसार जगणं का महत्त्वाचं आहे?

आपल्या मुलांनी सुरक्षित राहावं अशी आईवडिलांची इच्छा असल्यामुळे ते त्यांच्या सुरक्षेसाठी नियम बनवतात. मुलं जेव्हा त्यांचं पालन करतात तेव्हा ते आईवडिलांचा आदर करत असल्याचं आणि त्यांच्यावर भरवसा असल्याचं दाखवतात. आईवडिलांच्या आज्ञांचं पालन करणं जर इतकं महत्त्वाचं आहे तर विचार, की आपण आपल्या स्वर्गीय पित्याने ठरवलेले स्तर माहीत करून घेणं आणि त्यांचं पालन करणं किती जास्त महत्त्वाचं आहे. असं केल्यामुळे आपण यहोवाला दाखवून देतो की आपलं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि आपण त्याचा मनापासून आदर करतो. आणि यामुळे आपल्याला फायदाही होतो. (यश. ४८:१७, १८) याच्या उलट, जे यहोवाला आणि त्याच्या स्तरांना नाकारतात ते स्वतःचं नुकसान करून घेतात.—गलती. ६:७, ८.

१० यहोवाला आनंद होईल अशा प्रकारे जीवन जगल्यामुळे आपण शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक रीत्या सुरक्षित राहतो. आपल्यासाठी सर्वात चांगलं काय आहे हे यहोवाला माहीत आहे. अमेरिकेत राहणारी ऑरोरा म्हणते: “यहोवाच्या आज्ञांचं पालन केल्यामुळे सर्वात चांगलं जीवन जगता येतं हे मला समजलं आहे.” आणि ही गोष्ट आपल्याबाबतीतही खरी आहे. म्हणून यहोवाच्या प्रेमळ मार्गदर्शनाचं पालन केल्यामुळे आपल्याला कसा फायदा झाला आहे यावर आपण विचार केला पाहिजे.

११. प्रार्थनेमुळे आपल्याला कशी मदत होते?

११ यहोवाची आज्ञा पाळणं आपल्याला कठीण जातं तेव्हाही प्रार्थना केल्यामुळे आपल्याला मदत होते. आपण पापी असल्यामुळे आपल्याला कधीकधी आज्ञाधारक राहणं कठीण जाऊ शकतं पण तरीही आपण त्याची आज्ञा पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत राहिला पाहिजे. स्तोत्रकर्त्याने यहोवाकडे कळकळून विनंती केली: “मला बुद्धि दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन.” (स्तो. ११९:३४) डिनिस नावाची एक पायनियर म्हणते: “मला जेव्हापण यहोवाची आज्ञा पाळणं कठीण जातं तेव्हा योग्य ते करण्यासाठी मला ताकद मिळावी म्हणून मी यहोवाला प्रार्थना करते.” यहोवा अशा प्रकारच्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच देईल याची आपण खातरी बाळगू शकतो.—लूक ११:९-१३.

आपल्या पित्यावर प्रेम करण्यासाठी इतरांना मदत करा

१२. इफिसकर ५:१ मध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काय केलं पाहिजे?

१२ इफिसकर ५:१ वाचा. यहोवाची “प्रिय मुले” या नात्याने आपण त्याचं अनुकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. इतरांशी वागताना आपण प्रेम, दया आणि क्षमाशीलता या त्याच्या गुणांचं अनुकरण करतो. यहोवाबद्दल ज्यांना माहीत नाही ते जेव्हा आपली चांगलं वागणूक पाहतात तेव्हा त्यांना यहोवाबद्दल जाणून घेण्याची प्रेरणा मिळू शकते. (१ पेत्र २:१२) यहोवा ज्या प्रकारे आपल्यासोबत वागतो त्या प्रकारे ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांसोबत वागलं पाहिजे. आईवडील जेव्हा यहोवाचं अनुकरण करतात तेव्हा मुलांनाही यहोवासोबत एक जवळचं नातं जोडावसं वाटेल.

परिच्छेद १३ पाहा

१३. आपण धैर्य मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे?

१३ सहसा लहान मुलांना आपल्या वडिलांबद्दल अभिमान वाटतो आणि त्यांना आपल्या वडिलांबद्दल इतरांशी बोलताना आनंद होतो. त्याच प्रकारे, आपल्यालाही आपला स्वर्गीय पिता यहोवा, याच्याबद्दल अभिमान वाटतो आणि इतरांना त्याच्याबद्दल कळावं अशी आपली इच्छा आहे. आपल्याही भावना दावीद राजासारख्याच आहेत. त्याने म्हटलं: “प्रभुविषयीचाच अभिमान माझ्या मनी वसेल.” (स्तो. ३४:२, मराठी कॉमन लॅंग्वेज ) पण आपला स्वभाव लाजाळू असेल आणि आपण यहोवाबद्दल इतरांना सांगायला कचरत असू तर काय? आपण धाडसी कसं बनू शकतो? खरंतर, आपण इतरांना यहोवाबद्दल सांगतो तेव्हा यहोवाला खूप आनंद होतो आणि यामुळे इतरांना फायदाही होतो. या गोष्टींवर जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला धाडसाने यहोवाबद्दल इतरांना सांगण्याची प्रेरणा मिळते. आपण खातरी बाळगू शकतो की यहोवा आपल्याला लागणारं धैर्य नक्कीच देईल. त्याने पहिल्या शतकातल्या बांधवांना धैर्यवान व्हायला मदत केली, त्याच प्रकारे तो आज आपल्यालाही मदत करेल.—१ थेस्सलनी. २:२.

१४. आपण कोणत्या कारणांमुळे शिष्य बनवण्याच्या महत्त्वाच्या कामात भाग घेतो?

१४ यहोवा भेदभाव करत नाही आणि आपणही भेदभाव न करता सर्व पार्श्‍वभूमीच्या लोकांना प्रेम दाखवतो तेव्हा त्याला आनंद होतो. (प्रे. कार्ये १०:३४, ३५) आपलं लोकांवर प्रेम आहे हे दाखवण्याच्या अनेक चांगल्या मार्गांपैकी एक म्हणजे त्यांना प्रचार करणं. (मत्त. २८:१९, २०) असं केल्यामुळे काय साध्य होतं? जे लोक सत्य स्वीकारतात त्यांचं आताचं जीवन तर सुधारतंच पण भविष्यात त्यांना सर्वकाळ जगण्याची आशाही मिळते.—१ तीम. ४:१६.

आपल्या पित्यावर प्रेम करा आणि आनंदी राहा

१५-१६. आपल्याजवळ आनंदी राहण्याची कोणती कारणं आहेत?

१५ यहोवा एक प्रेमळ पिता असल्यामुळे त्याची इच्छा आहे की त्याच्या कुटुंबाने आनंदी राहावं. (यश. ६५:१४) आपल्याला कठीण समस्यांचा सामना करावा लागत असला, तरी आनंदी राहण्याची आज आपल्याकडे बरीच कारणं आहेत. जसं की, आपला स्वर्गीय पिता आपल्यावर खूप प्रेम करतो याची आपल्याला पक्की खातरी आहे. तसंच, आपल्याकडे देवाचं वचन बायबल याचं अचूक ज्ञान आहे. (यिर्म. १५:१६) आणि आपण अशा एका खास कुटुंबाचे भाग आहोत ज्याचे सदस्य यहोवावर, त्याच्या उच्च नैतिक स्तरांवर आणि एकमेकांवर प्रेम करतात.—स्तो. १०६:४, ५.

१६ आपण आनंदी राहू शकतो कारण आपल्याला पक्की आशा आहे की भविष्यात आपल्याला आताच्या तुलनेत एक चांगलं जीवन मिळेल. आपल्याला माहीत आहे की यहोवा सर्व दुष्ट लोकांना काढून टाकेल आणि त्याच्या सरकाराद्वारे तो संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवेल. आपल्या मरण पावलेल्या प्रिय जनांना पुन्हा जिवंत केलं जाईल तेव्हा आपण त्यांना पुन्हा भेटू ही सुंदर आशासुद्धा आपल्याकडे आहे. (योहा. ५:२८, २९) खरंच किती आनंद देणारे क्षण असतील ते! आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वर्गात आणि पृथ्वीवर असलेले सर्व जण आपल्या प्रेमळ पित्याचा गौरव, स्तुती आणि उपासना करतील. कारण या सर्व गोष्टी मिळण्याचा त्यालाच हक्क आहे!

गीत २ यहोवा, तुझे आभार मानतो

^ परि. 5 आपला पिता यहोवा, आपल्यावर खूप प्रेम करतो हे आपल्याला माहीत आहे. त्याने आपल्याला त्याच्या उपासकांच्या कुटुंबाचा भाग बनण्याची संधी दिली आहे आणि यामुळे आपणही त्याच्यावर प्रेम करू लागलो. आपली काळजी घेणाऱ्‍या प्रेमळ पित्यावर आपलं प्रेम आहे हे आपण कसं दाखवू शकतो? असं आपण कोणत्या विशिष्ट मार्गांनी करू शकतो याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे.