व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाहुणचार—एक आनंददायी अनुभव

पाहुणचार—एक आनंददायी अनुभव

“कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा.”—१ पेत्र ४:९.

गीत क्रमांक: ५०, २०

१. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांसमोर कोणत्या कठीण परीक्षा होत्या?

जवळपास इ.स. ६२ ते ६४ या वर्षांदरम्यान, प्रेषित पेत्रने “पंत, गलतीया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या प्रांतात विखुरलेल्या तात्पुरत्या रहिवाशांना” पत्र लिहिलं. (१ पेत्र १:१) हे बांधव वेगवेगळ्या ठिकाणांहून आले होते. ते ‘अग्नीपरीक्षांचा’ म्हणजेच छळाचा सामना करत होते आणि त्यांना उत्तेजनाची व मार्गदर्शनाची गरज होती. तसंच, ते खूप कठीण काळातही जगत होते. पेत्रने लिहिलं: “सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे.” दहा वर्षांच्या आत यरुशलेमचा नाश होणार होता. मग या कठीण काळाचा सामना करण्यासाठी कोणती गोष्ट सर्व ख्रिश्‍चनांना मदत करणार होती?—१ पेत्र ४:४, ७, १२.

२, ३. पेत्रने बांधवांना पाहुणचार दाखवण्याची विनंती का केली? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

पेत्रने बांधवांना एक गोष्ट करण्याची विनंती केली. ती म्हणजे: “एकमेकांचे आदरातिथ्य करा.” (१ पेत्र ४:९) “आदरातिथ्य” किंवा पाहुणचार या शब्दासाठी असलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “अनोळख्यांना आपुलकी किंवा दया दाखवणं” असा होतो. मग पेत्र अनोळखी लोकांचा पाहुणचार करायला सांगत होता का? नाही. तो अशा बंधुभगिनींबद्दल बोलत होता, जे एकमेकांना ओळखत होते आणि एकत्र कामही करायचे. मग, पाहुणचार केल्यामुळे त्यांना कसा फायदा होणार होता?

असं केल्यामुळे त्यांचा एकमेकांशी असलेला नातेसंबंध मजबूत होणार होता. तुमच्या बाबतीत काय? तुमचा कोणी पाहुणचार केल्याचं आणि तुम्ही त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवल्याचं तुम्हाला आठवत असेल. किंवा इतरांचा पाहुणचार केल्यामुळे त्यांच्याशी तुमचा नातेसंबंध मजबूत झाल्याचं तुम्हाला आठवत असेल. बांधवांना चांगल्या प्रकारे ओळखण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांचा पाहुणचार करणं. पेत्रच्या काळात परिस्थिती खूप वाईट होती. त्यामुळे ख्रिश्‍चनांना एकमेकांसोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडणं गरजेचं होतं. या “शेवटच्या दिवसांत” आपणही हेच केलं पाहिजे.—२ तीम. ३:१.

४. या लेखात आपण कोणकोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

आपण कोणकोणत्या मार्गांनी ‘एकमेकांचा’ पाहुणचार करू शकतो? पाहुणचार करण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला रोखू शकतात व आपण त्यात सुधारणा कशी करू शकतो? आणि चांगले पाहुणे बनण्यासाठी कोणती गोष्ट आपली मदत करू शकते?

पाहुणचार दाखवण्याच्या संधी

५. ख्रिस्ती सभांमध्ये आपण पाहुणचार कसा दाखवू शकतो?

सभांमध्ये: यहोवा आणि त्याची संघटना आपल्याला सभांना यायचं आमंत्रण देते. सभांना आलेल्या सर्वांना, खासकरून नवीन लोकांना आनंद व्हावा अशी आपली इच्छा आहे. (रोम. १५:७) तेही यहोवाचे पाहुणे आहेत. त्यामुळे ते कसेही दिसत असले किंवा त्यांनी कसेही कपडे घातले असले, तरीही प्रेमळपणे त्यांचं स्वागत करा. (याको. २:१-४) समजा, सभेमध्ये एक नवीन व्यक्‍ती एकटी आली तर तुम्ही काय करू शकता? तुम्ही त्या व्यक्‍तीला तुमच्या शेजारी बसवू शकता. तुम्ही जर तिला सभेत काय होतं हे समजण्यासाठी किंवा बायबलमधली वचनं शोधण्यासाठी मदत केली, तर कदाचित ती त्यासाठी तुमचे आभारही मानेल. “पाहुणचार करत” राहण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असेल.—रोम. १२:१३.

६. आपण सर्वात जास्त कोणाचा पाहुणचार केला पाहिजे?

चहासाठी किंवा जेवणासाठी: बायबल काळातले लोक सहसा इतरांना आपल्या घरी जेवायला बोलवून पाहुणचार दाखवायचे. यावरून हे दिसायचं की त्यांना एकमेकांशी मैत्री करायची होती आणि शांती राखायची होती. (उत्प. १८:१-८; शास्ते १३:१५; लूक २४:२८-३०) मग प्रश्‍न येतो की आपण सर्वात जास्त कोणाचा पाहुणचार केला पाहिजे? आपल्या मंडळीतल्या बंधुभगिनींचा. आज जगाची व्यवस्था खूप वाईट होत चालली आहे. त्यामुळे आपल्याला बंधुभगिनींवर अवलंबून राहण्याची आणि त्यांचे विश्‍वासू मित्र बनण्याची जास्त गरज आहे. २०११ साली नियमन मंडळाने अमेरिकेच्या बेथेल कुटुंबाच्या टेहळणी बुरूज अभ्यासाच्या वेळेत बदल केला. हा अभ्यास संध्याकाळी ६:४५ वाजता व्हायचा. त्याची वेळ बदलून त्यांनी संध्याकाळी ६:१५ अशी केली. पण हा बदल का करण्यात आला? या संबंधित घोषणा करताना असं सांगण्यात आलं, की जर सभा लवकर संपली तर बेथेल सदस्य कदाचित पाहुणचार करण्यासाठी एकमेकांना निमंत्रण देऊ शकतील आणि ते स्वीकारूही शकतील. इतर शाखांनीही असंच केलं आहे. बेथेल कुटुंबाला एकमेकांना जवळून ओळखण्याची एक चांगली संधी मिळाली.

७, ८. पाहुणे वक्त्यांना आपण पाहुणचार कसा दाखवू शकतो?

कधीकधी इतर मंडळीतले बांधव, विभागीय पर्यवेक्षक किंवा बेथेलचे प्रतिनिधी आपल्या मंडळीत भाषण देण्यासाठी येतात. अशा वेळी, आपण त्यांचा पाहुणचार करू शकतो का? (३ योहान ५-८ वाचा.) पाहुणचार करण्याचा एक मार्ग म्हणजे, त्यांना आपल्या घरी चहासाठी किंवा जेवणासाठी बोलवणं.

अमेरिकेतल्या एका जोडप्याचं उदाहरण विचारात घ्या. बहीण म्हणते: “अनेक वर्षं आम्हाला बऱ्‍याच वक्त्यांचा व त्यांच्या पत्नींचा पाहुणचार करण्याची संधी मिळाली.” ती म्हणते, की या सर्व अनुभवांमुळे त्यांचा विश्‍वास मजबूत झाला आणि मजाही आली. पुढे ती बहीण म्हणते: “आणि याचा आम्हाला कधीच पस्तावा झाला नाही.”

९, १०. (क) कोणाकोणाला आपल्या घरी जास्त दिवसांसाठी राहण्याची गरज पडू शकते? (ख) ज्यांची घरं लहान आहेत ते मदत करू शकतात का? उदाहरण द्या.

मुक्कामाला येणारे पाहुणे: बायबलच्या काळात पाहुण्यांना सहसा राहण्यासाठी जागा दिली जायची. (ईयो. ३१:३२; फिले. २२) आज आपल्याला कदाचित तसंच करण्याची गरज पडू शकते. आपण कोणाला आपल्या घरी राहायला बोलवू शकतो? विभागीय पर्यवेक्षक जेव्हा मंडळींना भेटी देतात, तेव्हा सहसा त्यांना राहण्यासाठी जागा हवी असते. आणि हीच गोष्ट वेगवेगळ्या ईश्‍वरशासित प्रशालांमधल्या विद्यार्थ्यांसाठी आणि बांधकाम करणाऱ्‍या स्वयंसेवकांसाठीही लागू होते. तसंच नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्यांनी आपलं घर गमावलं आहे त्यांच्या बाबतीत काय? त्यांचं घर पुन्हा बांधेपर्यंत त्यांना कदाचित दुसरीकडे राहायला जागा हवी असेल. आपण असा विचार करू नये की ज्यांचं मोठं घर आहे फक्‍त तेच त्यांना मदत करू शकतात. पण कदाचित त्यांनी याआधीही बऱ्‍याच वेळा मदतीचा हात दिला असावा. तुमचं घर जरी लहान असलं, तरीही तुम्ही अशांना आपल्या घरी राहायला बोलवू शकता.

१० दक्षिण कोरिया इथल्या बांधवाकडे एकदा ईश्‍वरशासित प्रशालांमधले काही विद्यार्थी राहायला आले. त्याबद्दल आठवून तो म्हणतो: “सुरुवातीला आम्ही कचरलो कारण आमचं नुकतंच लग्न झालं होतं आणि आमचं घरही लहान होतं. पण विद्यार्थ्यांना आमच्या घरी राहू देणं हा खरंच एक चांगला अनुभव होता. एक नवीन जोडपं यानात्याने आम्ही हे पाहू शकलो की जेव्हा एखादं जोडपं सोबत मिळून यहोवाची सेवा करतं आणि आध्यात्मिक ध्येयं गाठतं, तेव्हा त्यांना खूप आनंद होतो.”

११. तुमच्या मंडळीत आलेल्या नवीन बांधवांना पाहुणचार दाखवण्याची गरज का आहे?

११ मंडळीत आलेले नवीन बंधूभगिनी: इतर मंडळीमधून काही बंधूभगिनी किंवा कुटुंब तुमच्या क्षेत्रात राहायला आले असतील. ते कदाचित तुमच्या मंडळीला मदत करण्यासाठी आले असावेत किंवा पायनियर म्हणून त्यांना तुमच्या मंडळीत नेमलं असावं. हा त्यांच्यासाठी एक मोठा बदल आहे. त्यांना एका नवीन क्षेत्राशी, मंडळीशी आणि एका वेगळ्या संस्कृतीशी जुळवून घ्यावं लागेल किंवा त्यांना कदाचित एक नवीन भाषा शिकावी लागेल. तुम्ही त्यांना चहासाठी, जेवणासाठी किंवा सोबत फिरायला जाण्यासाठी बोलवू शकता का? यामुळे त्यांना नवीन मित्र बनवायला आणि त्यांच्या बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला मदत होईल.

१२. पाहुणचार करण्यासाठी तुम्हाला खूप काही करण्याची गरज नाही हे कोणत्या अनुभवातून दिसून येतं?

१२ पाहुणचार करण्यासाठी तुम्हाला खूप काही करण्याची गरज नाही. (लूक १०:४१, ४२ वाचा.) एक बांधव व त्याची पत्नी यांना त्यांच्या मिशनरी सेवेच्या सुरुवातीला आलेला, एक अनुभव लक्षात घ्या. त्याबद्दल बांधव म्हणतात: “आम्ही तरुण होतो, आम्हाला कमी अनुभव होता आणि आम्हाला घरची खूप आठवण यायची. एकदा संध्याकाळी तर माझ्या पत्नीला घरची खूपच आठवण आली. मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काही फायदा होत नव्हता. मग साडेसात वाजता दारावर एक थाप ऐकू आली. दारात एक बायबल विद्यार्थी हातात तीन संत्री घेऊन उभी होती. आम्ही तिथे नवीनच राहायला आलो होतो म्हणून ती आमचं स्वागत करायला आली होती. आम्ही तिला घरात घेतलं आणि तिला प्यायला पाणी दिलं. मग आम्ही तिच्यासाठी चहा आणि हॉट चॉकलेट बनवलं. आम्हाला त्या वेळी तिची स्वाहिली भाषा येत नव्हती आणि तिला आमची इंग्रजी भाषा येत नव्हती.” बांधव याबद्दल म्हणतात की या अनुभवामुळे त्यांना स्थानिक मंडळीत नवीन मित्र बनवायला आणि आनंदी राहायला मदत झाली.

पाहुणचार करताना येणाऱ्‍या अडथळ्यांवर मात करा

१३. पाहुणचार केल्यामुळे तुम्हाला कशी मदत होते?

१३ तुम्ही पाहुणचार करायला कचरता का? कचरत असाल तर तुम्ही एक चांगली संधी गमावली आहे, कारण पाहुणचार ही आनंदी असण्याची आणि कायमस्वरूपी मित्र बनवण्याची एक चांगली संधी आहे. एकटेपणा दूर करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे पाहुणचार करणं. पण एक व्यक्‍ती कोणत्या कारणांमुळे पाहुणचार करायला कचरू शकते?

१४. पाहुणचार करण्यासाठी किंवा स्वीकारण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आणि शक्‍ती नसली तर आपण काय करू शकतो?

१४ वेळ आणि शक्‍ती: यहोवाचे लोक खूप व्यस्त असतात आणि त्यांना खूप जबाबदाऱ्‍या सांभाळाव्या लागतात. त्यामुळे कदाचित काहींना असं वाटेल की पाहुणचार करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा वेळ किंवा शक्‍ती नाही. तुम्हालाही जर असंच वाटत असेल, तर पाहुणचार करण्यासाठी किंवा तो स्वीकारण्यासाठी तुम्हाला कदाचित तुमच्या आराखड्यात बदल करावा लागेल. असं करणं महत्त्वाचं आहे कारण बायबल आपल्याला पाहुणचार करण्याचं प्रोत्साहन देतं. (इब्री १३:२) यामुळे आपण म्हणू शकतो की पाहुणचार करण्यासाठी वेळ काढणं हे योग्यच आहे. यासाठी कदाचित तुम्हाला कमी महत्त्वाच्या गोष्टींवर जास्त वेळ खर्च करणं टाळावं लागेल.

१५. आपण पाहुणचार करू शकत नाही असं कदाचित काहींना का वाटू शकतं?

१५ तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता? तुम्हाला पाहुणचार करण्याची इच्छा आहे, पण तसं करणं तुम्हाला जमणार नाही असं तुम्हाला कधी वाटतं का? कदाचित तुमचा स्वभाव लाजाळू असेल. म्हणून तुम्ही या चिंतेत असाल की तुमचे पाहुणे कंटाळतील. किंवा कदाचित तुमच्याकडे जास्त पैसे नसतील आणि इतर बंधुभगिनींसारखं तुम्ही पाहुणचार करू शकत नाही, असं तुम्हाला वाटत असेल. पण एक गोष्ट लक्षात असू द्या की एक सुंदर घर असण्यापेक्षा, ते घर स्वच्छ, नीटनेटकं आणि तिथे मैत्रीपूर्ण वातावरण असणं जास्त महत्त्वाचं आहे.

१६, १७. पाहुण्यांना बोलवताना वाटत असलेल्या चिंतेवर तुम्ही कशी मात करू शकता?

१६ पाहुणचार कसा करावा याची चिंता फक्‍त तुम्हालाच वाटते असं नाही. असे इतरही आहेत ज्यांना अशी चिंता सतावते. ब्रिटनमध्ये राहणारे एक वडील म्हणतात: “पाहुणचाराची तयारी करताना खूप चिंता वाटू शकते. पण यहोवाच्या सेवेतले फायदे आणि समाधान लक्षात घेता, या चिंता फार क्षुल्लक आहेत हे जाणवतं. मला पाहुण्यांसोबत जास्त काही नाही तर नुसतीच कॉफी घ्यायला आणि बोलायला मजा येते.” पाहुण्यांमध्ये वैयक्‍तिक आस्था घेणं नेहमीच चांगलं असतं. (फिलिप्पै. २:४) अनेकांना त्यांचे अनुभव सांगायला खूप आवडतं आणि ते ऐकण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आणखीन एक वडील म्हणतात: “माझ्या मंडळीतल्या मित्रांना घरी बोलवल्यामुळे मला त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेणं शक्य झालं. तसंच त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळवणं; खासकरून ते सत्यात कसे आले हे जाणून घेणंही मला जमलं.” जर तुम्ही तुमच्या पाहुण्यांमध्ये वैयक्‍तिक आस्था घेतली, तर सगळे जण त्या वेळेचा आनंद लुटू शकतील.

१७ एका पायनियर बहिणीचा अनुभव लक्षात घ्या. तिच्या घरी सहसा ईश्‍वरशासित प्रशालांमधले विद्यार्थी राहायचे. ती म्हणते: “मी आधी खूप चिंता करायचे, कारण माझ्या घरात जास्त सुखसोयी नव्हत्या आणि माझ्याकडे वापरलेलं फर्निचर होतं. पण प्रशालेच्या प्रशिक्षकाच्या पत्नीशी बोलल्यामुळे मला खूप दिलासा मिळाला. ती म्हणाली, की आपल्या पतीसोबत प्रवासी कार्य करताना सर्वात चांगले आठवडे ते असायचे जेव्हा ती दोघं आध्यात्मिक बांधवांसोबत राहायची. ज्यांच्याकडे ते राहायचे त्यांच्याकडे कदाचित जास्त भौतिक गोष्टी नसायच्या. पण यहोवाची सेवा करणं आणि जीवन साधं ठेवणं असं त्यांचंही ध्येय असायचं. ती जे बोलली त्यामुळे मला माझ्या आईची आठवण झाली. कारण ती नेहमी आम्हा भावंडांना म्हणायची की ‘आपल्या आवडत्या माणसाबरोबर मीठ भाकर खाणे [कधीही] चांगले.’” (नीति. १५:१७, सुबोधभाषांतर) यावरून कळतं, की आपल्याला चिंता करायची गरज नाही कारण पाहुण्यांना प्रेम दाखवणं यापेक्षा महत्त्वाचं दुसरं काही नाही.

१८, १९. इतरांबद्दल असलेल्या नकारात्मक भावनांवर मात करण्यासाठी पाहुणचार केल्यामुळे आपल्याला कशी मदत होईल?

१८ तुम्ही इतरांबद्दल काय विचार करता? तुमच्या मंडळीत असं कोणी आहे का, ज्यांचा स्वभाव तुम्हाला पटत नाही किंवा आधी कोणी तुम्हाला दुखावलं आहे आणि ते विसरणं तुम्हाला कठीण जात आहे. अशा वेळी त्यांना घरी बोलवायला कदाचित तुम्हाला आवडणार नाही. तुम्ही त्या व्यक्‍तीबद्दल नकारात्मक विचार करत असाल, पण तुम्ही प्रयत्न केले नाहीत तर त्या भावना तुमच्या मनात कायम राहतील.

१९ बायबल म्हणतं जर तुम्ही पाहुणचार केला, तर तुम्ही इतरांसोबत तुमचा नातेसंबंध सुधारू शकता अगदी तुमच्या शत्रूंसोबतही. (नीतिसूत्रे २५:२१, २२ वाचा.) जर तुम्ही एखाद्याला घरी बोलवलं, तर तुम्हाला नकारात्मक भावनांवर मात करायला आणि त्यांच्यासोबत शांतीपूर्ण नातेसंबंध जोडायला मदत होईल. सत्याकडे आकर्षित करताना यहोवाने त्याच्यात पाहिलेल्या चांगल्या गुणांवर तुम्ही लक्ष देऊ लागाल. (योहा. ६:४४) प्रेमाने प्रेरित होऊन जर तुम्ही अशा व्यक्‍तीचा पाहुणचार करत असाल, ज्याने कधी आमंत्रणाची अपेक्षाही केली नसेल, तर तिथून एक चांगली मैत्री सुरू होऊ शकेल. प्रेमानेच प्रेरित होऊन तुम्ही हे करत आहात याची खातरी तुम्ही कशी कराल? हे करण्याचा एक मार्ग म्हणजे फिलिप्पैकर २:३ मधला सल्ला लागू करणं. ते वचन म्हणतं: “नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.” आपले बंधुभगिनी आपल्यापेक्षा कोणकोणत्या बाबतीत श्रेष्ठ आहेत हा विचार आपण केला पाहिजे. कदाचित आपण त्यांच्यात असलेल्या गुणांवरून शिकू शकतो. जसं की विश्‍वास, धीर किंवा इतर ख्रिस्ती गुण. त्यांच्या चांगल्या गुणांबद्दल विचार केल्यामुळे त्यांच्यावरचं आपलं प्रेम आणखी वाढेल आणि आपल्याला पाहुणचार करायला सोपं जाईल.

एक चांगला पाहुणा

आमंत्रण देणारे सहसा आपल्या पाहुण्यांसाठी चांगली तयारी करतात (परिच्छेद २० पाहा)

२०. आमंत्रण स्वीकारण्याच्या बाबतीत आपण भरवशालायक आहोत हे दाखवणं का गरजेचं आहे? हे आपण कशा प्रकारे दाखवू शकतो?

२० स्तोत्रकर्ता दावीद याने यहोवाला विचारलं की त्याच्या मंडपात कोणता पाहुणा वस्ती करू शकतो. (स्तो. १५:१) नंतर यहोवा पाहुण्यांकडून काय अपेक्षा करतो याबद्दल दावीद सांगतो. या अपेक्षांपैकी एक अपेक्षा म्हणजे भरवशालायक असणं. बायबल अशा व्यक्‍तीबद्दल म्हणतं की तो “वाहिलेल्या शपथेने स्वत:चे अहित झाले तरी ती मोडत नाही.” (स्तो. १५:४) आपण जर एखादं आमंत्रण स्वीकारलं, तर आपण ते अगदीच महत्त्वाच्या कारणाशिवाय नाकारू नये. आमंत्रण देणाऱ्‍याने आपल्याला बोलवण्यासाठी खूप तयारी केलेली असते आणि जेव्हा आपण तिथे जात नाही तेव्हा त्याची सगळी मेहनत पाण्यात जाते. (मत्त. ५:३७) काही लोक आमंत्रण यासाठी नाकारतात कारण त्यांना वाटतं की मिळालेलं दुसरं आमंत्रण जास्त चांगलं आहे. पण असं करणं प्रेम आणि आदर न दाखवण्यासारखं ठरेल. आमंत्रण देणारा आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आपण त्याचे आभारी असलं पाहिजे. (लूक १०:७) जर तुमच्यासमोर अशी एखादी समस्या आली, जिच्यामुळे तुम्हाला जाणं शक्य होणार नसेल तर त्याबद्दल लवकरात लवकर तुम्ही आमंत्रण देणाऱ्‍याला सांगू शकता. असं करून तुम्ही प्रेम आणि विचारी वृत्ती दाखवू शकता.

२१. स्थानिक संस्कृतींचा आदर केल्यामुळे आपल्याला चांगले पाहुणे बनायला कशी मदत होते?

२१ आपण स्थानिक संस्कृतींचाही आदर केला पाहिजे. काही संस्कृतींमध्ये, अचानक आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं जातं, तर काही संस्कृतींमध्ये कोणाच्या घरी जाण्याआधी पाहुण्यांनी आधी कळवणं गरजेचं असतं. यामुळे पूर्व तयारी करता येते. काही ठिकाणी घरमालक घरी आलेल्या पाहुण्यांना आधी जेवण वाढतात आणि नंतर ते जेवतात. तर इतर काही ठिकाणी सर्व जण एकत्र जेवायला बसतात. काही ठिकाणी, पाहुणे खाण्यासाठी काही घेऊन येतात, तर दुसरीकडे पाहुण्यांनी काही घेऊन येऊ नये अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. काही संस्कृतींमध्ये पाहुणे त्यांना मिळालेलं पहिलं किंवा दुसरं निमंत्रण आदरपूर्वक नाकारतात. पण इतर संस्कृतींमध्ये पहिलं आमंत्रण नाकारलेलं लोकांना आवडत नाही. एखाद्या व्यक्‍तीने आपल्याला आमंत्रण दिलं आहे, म्हणून तिला आनंदित करण्याचा आपण होताहोईल तितका प्रयत्न केला पाहिजे.

२२. “एकमेकांचे आदरातिथ्य” करणं इतकं महत्त्वाचं का आहे?

२२ पेत्र म्हणाला: “सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे.” (१ पेत्र ४:७) जगाने कधीच अनुभवलं नाही असं मोठं संकट आपल्यावर येणार आहे. जसजशी ही व्यवस्था आणखी वाईट होत जाईल तसतसं आपलं आपल्या बंधुभगिनींवरचं प्रेम गहिरं होत गेलं पाहिजे. पेत्रने दिलेला सल्ला आज जास्त लागू होतो. तो म्हणाला: “एकमेकांचे आदरातिथ्य करा.” (१ पेत्र ४:९) पाहुणचार करणं खरंच आनंददायक आहे. तसंच, ते आज आणि सर्वकाळच्या जीवनातही महत्त्वपूर्ण असणार आहे.