व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रकाशनांत पौलच्या डोक्यावर केस नसल्याचं किंवा कमी असल्याचं का दाखवतात?

खरंतर पौल कसा दिसायचा हे कोणीच सांगू शकत नाही. आपल्या प्रकाशनांतली पौलची चित्रं पुरातत्व शास्त्राच्या पुराव्यांवर आधारित नसून कल्पनेनुसार काढलेली आहेत.

पौल कसा दिसायचा याची काही माहिती मिळाली आहे. उदाहरणार्थ १ मार्च, १९०२ च्या झायन्स वॉचटॉवरच्या अंकात असं म्हटलं होतं: “पौलच्या स्वरूपाबद्दल बोलायचं झालं तर: . . . जवळपास इ.स. १५० मध्ये लिहिण्यात आलेल्या ‘अॅक्ट्‌स ऑफ पॉल अॅन्ड थेकला’ . . . यात पौलचे जे वर्णन करण्यात आलं आहे, ते जवळजवळ योग्य आणि पिढ्यानपिढ्या लोकांनीही स्वीकारलं आहे. यात पौल उंचीने लहान, केस नसलेला, वाकलेल्या पायांचा, मजबूत अंगकाठीचा, जुळलेल्या भुवया आणि कदाचित लांब नाक असलेला असा दर्शवला आहे.”

या प्राचीन लिखाणाबद्दल बोलताना द ऑक्सफर्ड डिक्शनरी ऑफ द ख्रिश्‍चन चर्च (१९९७ अंक) यात असं म्हटलं आहे: “‘अॅक्ट्‌स ऑफ पॉल अॅन्ड थेकला’ यात दिलेली काही ऐतिहासिक माहिती खरी आहे.” हे पुस्तक लिहिण्यात आलं त्यानंतर काही शतकं या पुस्तकाला खूप सन्मानाचं समजलं जायचं. कारण या पुस्तकाची ८० ग्रीक हस्तलिखिते आणि अनेक भाषांतरे होती. यामुळे आपल्या प्रकाशनांतली पौलची चित्रं प्राचीन माहितीवर आधारित आहेत, असं आपण म्हणू शकतो.

पण हे लक्षात असू द्या की पौलच्या स्वरूपापेक्षा त्याने केलेली कार्यं महत्त्वाची आहेत. पौल सेवा करत असताना काही टीकाकारांनी त्याच्याबद्दल म्हटलं: “तो दुबळा आहे आणि त्याची भाषणे मुळीच ऐकण्यासारखी नसतात.” (२ करिंथ. १०:१०) पण आपण हे विसरू नये की येशूने दाखवलेल्या चमत्कारामुळे पौल ख्रिस्ती झाला. तसंच “विदेश्‍यांना” येशूबद्दल साक्ष देण्यासाठी तो “एक निवडलेलं पात्र” होता. यानात्याने पौलने कोणत्या गोष्टी साध्य केल्या, याचाही आपण विचार केला पाहिजे. (प्रे. कार्ये ९:३-५, १५; २२:६-८) तसंच, पौलने यहोवाच्या प्रेरणेने लिहिलेल्या बायबलच्या पुस्तकांतून आपल्याला जे फायदे होतात त्यांचाही आपण विचार केला पाहिजे.

ख्रिस्ती बनण्याआधी पौलने साध्य केलेल्या गोष्टींची त्याने कधीच बढाई मारली नाही किंवा कधी आपल्या स्वरूपाबद्दल चर्चा केली नाही. (प्रे. कार्ये २६:४, ५; फिलिप्पै. ३:४-६) त्याने कबूल केलं: “प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे; इतकेच काय, तर प्रेषित म्हणवून घेण्याचीसुद्धा माझी लायकी नाही.” (१ करिंथ. १५:९) तो पुढे असं म्हणतो: “मी जो पवित्र जनांपैकी सर्वात लहानापेक्षा लहान आहे, त्या माझ्यावर ही अपार कृपा करण्यात आली. यासाठी, की मी ख्रिस्ताकडून मिळणाऱ्‍या अमाप आशीर्वादांबद्दलचा आनंदाचा संदेश विदेश्‍यांना सांगावा.” (इफिस. ३:८) पौल कसा दिसायचा याचा विचार करत बसण्यापेक्षा, आपण त्याच्या या संदेशाला जास्त महत्त्व दिलं पाहिजे.