व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिस्त—देवाच्या प्रेमाचा पुरावा

शिस्त—देवाच्या प्रेमाचा पुरावा

“यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना तो सुधारतो.”—इब्री १२:६.

गीत क्रमांक: ४३, २०

१. शिक्षण या शब्दाबद्दल बायबल काय सांगतं?

“शिक्षण” हा शब्द तुम्ही ऐकता, तेव्हा तुमच्या मनात कोणते विचार येतात? अनेकांना वाटतं, की शिक्षण म्हणजे इतरांना शिकवणं. पण यात आणखी गोष्टींचाही समावेश होतो. या शब्दाचा अर्थ सुधारणा, कानउघडणी किंवा शिक्षा देणं असाही होऊ शकतो. त्यामुळे देव आपल्याला शिक्षण देतो, तेव्हा त्यात कधीकधी शिक्षा देणंही सामील असतं. पण ती शिक्षा कधीही क्रूर किंवा नुकसानदायक नसते. उलट त्याचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपल्याला सर्वकाळाचं जीवन मिळावं अशी त्याची इच्छा आहे हे यावरून दिसून येतं. (इब्री १२:६) बायबल म्हणतं, शिक्षण आपल्यासाठी चांगलं आहे आणि कधीकधी त्याचा उल्लेख ज्ञान, बुद्धी, प्रेम आणि जीवन यांच्यासोबत करण्यात आला आहे. (नीति. १:२-७; ४:११-१३) जसं पालक आपल्या मुलांना प्रशिक्षण देतात, त्याप्रमाणे “शिक्षण” देण्याचा मुख्य उद्देश प्रशिक्षण देणं हा आहे.

२, ३. शिस्त लावण्यात शिकवणं आणि शिक्षा देणं सामील आहे असं का म्हणता येईल? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

कल्पना करा: जॉनी नावाचा एक छोटा मुलगा घरात बॉल खेळत आहे. त्याची आई त्याला म्हणते: “जॉनी घरात खेळू नकोस, काही तरी तुटेल!” पण तो ऐकत नाही आणि शेवटी बॉल लागून एक फुलदाणी फुटते. मग त्याला शिस्त लावण्यासाठी त्याची आई काय करते? त्याने काय चूक केली आहे हे ती त्याला सांगते. पालकांचं ऐकणं गरजेचं का आहे आणि त्यांचे नियम योग्य व आवश्‍यक का आहेत हे ती त्याला समजावते. जॉनीने पुन्हा अशी चूक करू नये म्हणून त्याला शिक्षा देण्याचंही ती ठरवते. काही दिवसांसाठी ती तो बॉल त्याला देत नाही. जॉनीला हे आवडलं नसलं तरी यामुळे त्याला हे समजायला मदत होते, की आई-बाबांचं न ऐकल्यामुळे वाईट परिणाम होतात.

आपण ख्रिस्ती या नात्याने देवाच्या कुटुंबाचा भाग आहोत. (१ तीम. ३:१५) योग्य व अयोग्य काय आहे हे ठरवण्याचा हक्क आपला पिता यहोवा याला आहे. तसंच आपण आज्ञापालन करत नाही तेव्हा शिस्त लावण्याचा अधिकारही त्याला आहे. आपल्या वागण्यामुळे जरी काही दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागले, तरी त्यावरून आपल्याला कळतं की यहोवाची आज्ञा पाळणं किती गरजेचं आहे. खरंतर हा शिस्त लावण्याचाच एक भाग आहे. (गलती. ६:७) देवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपण दुःखी व्हावं अशी त्याची मुळीच इच्छा नाही.—१ पेत्र ५:६, ७.

४. (क) आपण इतरांना कसं प्रशिक्षित करावं अशी देवाची इच्छा आहे? (ख) आपण या लेखात काय पाहणार आहोत?

बायबल तत्त्वांवर आधारित असलेल्या शिस्तीमुळे, एक व्यक्‍ती मुलांना शिकवण्यासाठी किंवा बायबल विद्यार्थ्याला येशूचा शिष्य बनायला मदत करण्यासाठी प्रशिक्षित होऊ शकते. आपण बायबलचा वापर करून आपल्या विद्यार्थ्याला योग्य काय आहे हे जाणून घ्यायला मदत करू शकतो. तसंच, येशूने आपल्याला ज्या आज्ञा दिल्या आहेत त्या समजायला आणि पाळायलाही मदत करू शकतो. (मत्त. २८:१९, २०; २ तीम. ३:१६) त्यांना या प्रकारे प्रशिक्षण मिळावं अशी यहोवाची इच्छा आहे. यामुळे तेदेखील इतरांना ख्रिस्ताचे शिष्य बनण्यासाठी मदत करू शकतील. (तीत २:११-१४ वाचा.) आता आपण महत्त्वाच्या तीन प्रश्‍नांवर चर्चा करू या: (१) देवाचं आपल्यावर प्रेम आहे हे त्याच्या शिस्त लावण्यावरून कसं दिसून येतं? (२) देवाने ज्यांना शिस्त लावली अशा लोकांच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (३) यहोवा आणि येशू ज्या प्रकारे शिस्त लावतात त्याचं अनुकरण आपण कसं करू शकतो?

देव प्रेमाने शिस्त लावतो

५. यहोवाकडून लावली जाणारी शिस्त त्याच्या प्रेमाचा पुरावा कसा आहे?

आपल्यावर प्रेम असल्यामुळेच यहोवा आपल्याला सुधारतो, शिकवतो आणि प्रशिक्षण देतो. आपला त्याच्यासोबत जवळचा नातेसंबंध असावा आणि आपल्याला सर्वकाळचं जीवन मिळावं अशी त्याची इच्छा आहे. (१ योहा. ४:१६) तो कधीच आपला अपमान करत नाही. तसंच, तो आपल्याशी अशा प्रकारे वागत नाही ज्यामुळे, ‘आपली काहीच किंमत नाही’ असा विचार आपल्या मनात येईल. (नीति. १२:१८) उलट, तो आपल्या चांगल्या गुणांवर लक्ष देतो आणि आपल्याला निर्णय घेण्याची मोकळीकही देतो. बायबलमधून, आपल्या प्रकाशनांमधून, आपल्या पालकांकडून आणि मंडळीतल्या वडिलांकडून जेव्हा आपल्याला सुधारलं जातं, तेव्हा ते यहोवाच्या प्रेमाचा पुरावा असल्याचं तुम्हाला दिसतं का? आपण हातून नकळत एखादी चूक होते तेव्हा वडील आपल्याला प्रेमळपणे व सौम्यपणे शिस्त लावतात. अशा वेळी ते खरंतर यहोवाच्या प्रेमाचं अनुकरण करत असतात.—गलती. ६:१.

६. एखाद्याला आपली नेमणूक गमवावी लागली तरी देव लावत असलेल्या शिस्तीमधून त्याचं प्रेम कसं दिसून येतं?

काही वेळा शिस्त लावण्यात सल्ला देण्यापेक्षा आणखीही काही सामील असतं. जर एखाद्याच्या हातून गंभीर पाप झालं असेल तर मंडळीतल्या जबाबदाऱ्‍या कदाचित त्याच्याकडून काढून घेतल्या जातील. अशा वेळीही देव लावत असलेल्या शिस्तीतून त्याचं प्रेम दिसून येतं. कारण, यामुळे बायबलचा अभ्यास करण्यासाठी, मनन करण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी त्याला जास्त वेळ देण्याची गरज आहे हे तो ओळखू शकेल. अशा प्रकारे यहोवाशी असलेला त्याचा नातेसंबंध आणखी मजबूत होईल. (स्तो. १९:७) काही काळानंतर त्याला त्याची नेमणूक पुन्हा दिली जाऊ शकते. एखाद्या व्यक्‍तीला बहिष्कृत केलं जाणंही यहोवाच्या प्रेमाचा एक पुरावा आहे. कारण त्यामुळे मंडळी वाईट प्रभावांपासून सुरक्षित राहते. (१ करिंथ. ५:६, ७, ११) देवाने लावलेली शिस्त नेहमी योग्यच असते, त्यामुळे बहिष्कृत झालेल्या व्यक्‍तीला तिने केलेल्या पापाची गंभीरता लक्षात येते. यामुळे ती व्यक्‍ती पश्‍चात्ताप करू शकते.—प्रे. कार्ये ३:१९.

यहोवा लावत असलेल्या शिस्तीमुळे आपल्याला फायदा होतो

७. शेबना कोण होता आणि त्याच्यात कोणते वाईट गुण आले?

शिस्त लावणं किती महत्त्वाचं आहे, हे समजण्यासाठी आता आपण अशा दोन व्यक्‍तींची उदाहरणं पाहू या ज्यांना यहोवाने शिस्त लावली. त्यातला एक आहे हिज्कीया राजाच्या काळातला शेबना नावाचा इस्राएली आणि दुसरा आहे आपल्या काळातला एक बांधव ग्रॅहम. शेबना हिज्कीया राजाच्या “राजमहालातील व्यवस्था पाहणारा कारभारी” होता. त्याचं पद खूप जबाबदारीचं होतं. (यश. २२:१५) पण तो गर्विष्ठ बनला आणि इतरांनी आपल्याला महत्त्वाचं समजावं असं त्याला वाटू लागलं होतं. त्याने स्वतःसाठी भव्य कबर बनवून घेतली होती आणि तो वैभवशाली ‘रथांतून’ फिरायचा.—यश. २२:१६-१८.

नम्र राहिल्यामुळे आणि मनोवृत्ती बदलण्याची तयारी दाखवल्यामुळे देवाकडून आशीर्वाद मिळतात (परिच्छेद ८-१० पाहा)

८. यहोवाने शेबनाला कशी शिस्त लावली आणि त्याचा परिणाम काय झाला?

पण शेबना गर्विष्ठ झाल्यामुळे देवाने त्याची जबाबदारी एल्याकीमला दिली. (यश. २२:१९-२१) अश्‍शूरचा राजा सन्हेरीब याने यरुशलेमवर हल्ला करण्याचं ठरवलं तेव्हा हे घडलं. नंतर हिज्किया राजाने शरण यावं आणि यहुद्यांनी घाबरून जावं यासाठी सन्हेरीबने अधिकाऱ्‍यांच्या एका गटाला आणि मोठ्या सैन्याला पाठवलं. (२ राजे १८:१७-२५) मग त्या अधिकाऱ्‍यांना भेटण्यासाठी हिज्कियाने एल्याकीम आणि त्याच्यासोबत इतर दोघांना पाठवलं. त्यातला एक म्हणजे शेबना. तो आता सचिव म्हणून काम करत होता. यावरून आपल्याला हे कळतं, की शेबना कदाचित नम्र झाला असावा. तो नाराज नव्हता किंवा त्याने वाईट वाटून घेतलं नव्हतं. कमी दर्जाचं पद स्वीकारण्यासाठी तो तयार होता. शेबनापासून आपण तीन धडे शिकू शकतो.

९-११. (क) शेबनाच्या अनुभवातून आपल्याला कोणते महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात? (ख) यहोवा शेबनासोबत ज्या प्रकारे वागला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?

शेबनाला आपलं पद गमवावं लागलं. यावरून आपण पहिला धडा हा शिकतो, की “गर्व झाला की नाश ठेवलेला” आहे. (नीति. १६:१८) आपल्याला कदाचित मंडळीत काही खास जबाबदाऱ्‍या दिल्या असतील आणि यामुळे इतर जण आपल्याला महत्त्व देत असतील. मग अशा वेळी आपण नम्र राहणार का? आपल्यात ज्या क्षमता आहेत आणि ज्या चांगल्या गोष्टी आपण साध्य केल्या आहेत, त्या फक्‍त यहोवामुळेच शक्य झाल्या आहेत हे आपण लक्षात ठेवतो का? (१ करिंथ. ४:७) प्रेषित पौलने याबद्दल ताकीद दिली की: “देवाकडून मिळालेल्या अपार कृपेने मी तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो, की कोणीही स्वतःला आपल्या योग्यतेपेक्षा मोठे समजू नये, तर . . . स्वतःबद्दल समंजसपणे विचार करावा.”—रोम. १२:३.

१० यहोवाने शेबनाला ताडन दिलं. यावरून आपण दुसरा धडा हा शिकतो, की शेबना बदलू शकतो ही आशा यहोवाने कधीच सोडली नाही. (नीति. ३:११, १२) आपण मंडळीमध्ये एखादी खास जबाबदारी गमावली असेल तर आपल्यासाठी हा एक चांगला धडा आहे. अशा वेळी रागावण्याऐवजी किंवा नाराज होण्याऐवजी आपण यहोवाला सर्वोत्तम देत राहिलं पाहिजे. लावलेल्या शिस्तीबद्दल आपण कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे? हा यहोवाच्या प्रेमाचा पुरावा आहे असा आपण विचार केला पाहिजे. जे नम्र राहतात त्यांना यहोवा आशीर्वादित करतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. (१ पेत्र ५:६, ७ वाचा.) आपण जर नम्र असू आणि आपलं हृदय मऊ मातीसारखं असेल, तर प्रेमळपणे शिस्त लावण्याद्वारे यहोवा आपल्याला आकार देऊ शकतो.

११ यहोवा शेबनासोबत ज्या प्रकारे वागला त्यावरून आपल्याला तिसरा महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. तो म्हणजे, यहोवा ज्या प्रकारे शिस्त लावतो त्यावरून जरी दिसून येत असलं की तो पापाचा द्वेष करत आहे, तरी पाप करणाऱ्‍या व्यक्‍तीचा तो द्वेष करत नाही. लोकांमध्ये जे चांगले गुण आहेत ते तो पाहतो. जर तुम्ही एक पालक किंवा मंडळीचे वडील असाल तर तुम्हीही यहोवाच्या शिस्त लावण्याच्या पद्धतीचं अनुकरण कराल का?—यहू. २२, २३.

१२-१४. (क) यहोवा शिस्त लावतो तेव्हा काहींची प्रतिक्रिया काय असते? (ख) आपला स्वभाव बदलण्यासाठी बायबलमुळे एका बांधवाला कशी मदत झाली आणि त्याचा काय परिणाम झाला?

१२ काही लोक मात्र त्यांना ताडना दिल्यामुळे इतके दुःखी होतात की ते मंडळी आणि देवापासून दूर जातात. (इब्री ३:१२, १३) मग याचा अर्थ असा होतो का, की त्यांना कोणीच मदत करू शकत नाही? असं मुळीच नाही! ग्रॅहम या बांधवाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. तो बहिष्कृत झाला होता आणि नंतर त्याला मंडळीत परत घेण्यात आलं. पण त्यानंतर त्याने प्रचार करणं आणि सभेला जाणं बंद केलं. पण एका वडिलांनी खूप मेहनत घेऊन त्याच्याशी मैत्री केली. कालांतराने ग्रॅहमने त्यांना बायबल अभ्यास करण्याची विनंती केली.

१३ ते वडील सांगतात: “गर्व ही ग्रॅहमची समस्या होती. त्याला बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतलेल्या वडिलांची तो खूप टीका करायचा. मग काही आठवडे आम्ही गर्व आणि त्याचे परिणाम याबद्दलच्या काही वचनांवर अभ्यास केला. देवाच्या वचनाच्या आरशात तो स्वतःला स्पष्टपणे पाहू शकत होता, आणि त्याला जे दिसलं ते त्याला आवडलं नाही. पण याचा त्याला फायदाच झाला. गर्वाच्या ‘ओंडक्यामुळे’ आपण आंधळे झालो आहोत आणि टीका करण्याचा आपला स्वभावच आपली मुख्य समस्या आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने आपल्या स्वभावात बदल करायला सुरुवात केली. तो नियमितपणे सभेला येऊ लागला. तसंच, तो बायबलचा मनापासून अभ्यास करू लागला आणि रोज प्रार्थना करण्याची सवय त्याने स्वतःला लावून घेतली. कुटुंबप्रमुख म्हणून त्याची जबाबदारीही त्याने स्वीकारली आणि यामुळे त्याची पत्नी आणि मुलं खूप आनंदी झाली.”—लूक ६:४१, ४२; याको. १:२३-२५.

१४ ते वडील पुढे म्हणतात: “एकदा ग्रॅहम असं काही बोलला जे माझ्या मनाला भिडलं. तो म्हणाला की ‘मी सत्यात अनेक वर्षांपासून आहे आणि मी तर पायनियरही होतो. पण आता मी मनापासून म्हणू शकतो, की माझं यहोवावर प्रेम आहे.’” लवकरच, ग्रॅहमला सभेत मायक्रोफोन हाताळण्याचं काम सोपवण्यात आलं आणि ही जबाबदारी मिळाल्याबद्दल तो खूप आनंदी होता. ते वडील पुढे सांगतात: “त्याच्या उदाहरणातून मला हे शिकायला मिळालं की जेव्हा एक व्यक्‍ती शिस्त स्वीकारण्याद्वारे स्वतःला देवापुढे नम्र करते तेव्हा देव तिला भरभरून आशीर्वाद देतो!”

शिस्त लावताना देवाचं आणि ख्रिस्ताचं अनुकरण करा

१५. आपण लावत असलेली शिस्त इतरांनी मनापासून स्वीकारावी यासाठी काय करणं गरजेचं आहे?

१५ आपल्याला जर चांगला शिक्षक बनायचं असेल, तर आपण आधी एक चांगला विद्यार्थी असणं गरजेचं आहे. (१ तीम. ४:१५, १६) त्या प्रकारेच शिस्त लावण्याची जबाबदारी जर देवाने तुम्हाला दिली असेल, तर तुम्ही नम्र असलं पाहिजे आणि यहोवाचं मार्गदर्शन स्वीकारत राहिलं पाहिजे. तुमचा नम्रपणा पाहून इतर जण तुमचा आदर करतील आणि तुमचा सल्ला किंवा मार्गदर्शन स्वीकारणं त्यांना सोपं जाईल. या बाबतीत येशूच्या उदाहरणापासून तुम्ही शिकू शकता.

१६. प्रभावीपणे शिस्त लावण्याच्या बाबतीत आणि शिकवण्याच्या बाबतीत आपण येशूकडून काय शिकू शकतो?

१६ येशू नेहमी आपल्या पित्याच्या आज्ञेत राहिला. काही वेळा त्याला तसं करणं कठीण वाटत असलं तरीही तो त्याच्या पित्याच्या आज्ञेत राहिला. (मत्त. २६:३९) त्याची शिकवण आणि बुद्धी पित्याकडून आहे याची आठवण तो त्याच्या श्रोत्यांना करून द्यायचा. (योहा. ५:१९, ३०) नम्र आणि आज्ञाधारक असल्यामुळे येशू एक दयाळू शिक्षक बनू शकला आणि म्हणूनच प्रामाणिक मनाचे लोक त्याच्याकडे यायचे. (मत्तय ११:२९ वाचा.) निराश आणि निर्बल लोकांना येशूच्या प्रेमळ शब्दांमुळे धीर मिळायचा. (मत्त. १२:२०) येशूचे प्रेषित जेव्हा आपल्यात मोठा कोण आहे याबद्दल वाद घालत होते, तेव्हा येशू त्यांच्यावर चिडू शकत होता. पण त्या वेळीही त्याने दयाळूपणे आणि प्रेमळपणे त्यांची चूक सुधारली.—मार्क ९:३३-३७; लूक २२:२४-२७.

१७. मंडळीची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी वडिलांना कोणत्या गुणांमुळे मदत होईल?

१७ बायबल तत्त्वांवर आधारित सल्ला देताना वडिलांनी ख्रिस्ताच्या उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे. असं करण्याद्वारे यहोवाचं आणि येशूचं आपल्याला मार्गदर्शन मिळावं अशी त्यांची इच्छा आहे हे दिसून येईल. प्रेषित पौल असं म्हणतो: “तुमच्या हाती सोपवलेल्या देवाच्या कळपाचे पालन करा. देखरेख करणारे या नात्याने नाइलाजाने नाही, तर देवासमोर स्वखुषीने सेवा करा; तसेच, बेइमानीने कमवलेल्या पैशाच्या लोभाने नाही, तर उत्सुकतेने सेवा करा. जे देवाची संपत्ती आहेत, त्यांच्यावर अधिकार गाजवू नका तर कळपासाठी उदाहरण बना.” (१ पेत्र ५:२-४) आनंदाने देवाच्या आणि येशूच्या अधीन राहणाऱ्‍या वडिलांना आणि ज्यांची ते काळजी करतात त्यांना यापासून फायदाच होतो.—यश. ३२:१, २, १७, १८.

१८. (क) यहोवा पालकांकडून काय अपेक्षा करतो? (ख) यहोवा पालकांची कशी मदत करतो?

१८ कुटुंबात शिस्त लावण्याबद्दल आणि प्रशिक्षण देण्याबद्दल काय? यहोवा कुटुंबप्रमुखांना म्हणतो: “आपल्या मुलांना चीड आणू नका, तर त्यांना यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवत राहा.” (इफिस. ६:४) पण प्रशिक्षण देणं आणि शिस्त लावणं खरंच गरजेचं आहे का? नीतिसूत्रे १९:१८ म्हणतं: “काही आशा असेल तर आपल्या पुत्राला शासन कर; त्याचे वाटोळे व्हावे अशी इच्छा धरू नको.” आपल्या मुलांना शिस्त लावण्याची जबाबदारी यहोवाने पालकांना दिली आहे. जर त्यांनी ती जबाबदारी नीट पार पाडली नाही तर त्यांना यहोवाला जाब द्यावा लागेल. (१ शमु. ३:१२-१४) जेव्हा पालक यहोवाला प्रार्थनेत मदत मागतात, त्याच्या वचनावर आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहतात, तेव्हा यहोवा त्यांना आवश्‍यक असलेली बुद्धी आणि ताकद पुरवतो.—याकोब १:५ वाचा.

नेहमी शांतीने राहायला शिकणं

१९, २०. (क) देव लावत असलेली शिस्त आपण स्वीकारतो तेव्हा कोणते आशीर्वाद आपल्याला मिळतात? (ख) पुढच्या लेखात आपण काय पाहणार आहोत?

१९ देवाकडून मिळणारी शिस्त जर आपण स्वीकारली आणि शिस्त लावताना यहोवाच्या व येशूच्या उदाहरणाचं अनुकरण केलं, तर आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील. तसंच, आपल्या कुटुंबात आणि मंडळीत शांती असेल. शिवाय आपसांत प्रेम असेल, आपण मौल्यवान आहोत ही जाणीव प्रत्येकाला असेल आणि सर्व जण सुरक्षितता अनुभवतील. भविष्यात अनुभवायला मिळणाऱ्‍या शांतीची आणि आनंदाची ही तर फक्‍त एक झलक आहे. (स्तो. ७२:७) आपण सर्व मिळून आपला पिता यहोवा याच्यासोबत एका कुटुंबाप्रमाणे शांतीने आणि एकतेने राहण्यासाठी तयार होत आहोत. यहोवा लावत असलेल्या शिस्तीमुळे हे शक्य होत आहे. (यशया ११:९ वाचा.) यामुळे आपल्याला हे स्पष्ट होतं, की यहोवा लावत असलेली शिस्त ही त्याच्या प्रेमाचाच पुरावा आहे!

२० पुढच्या लेखात आपण कुटुंबात आणि मंडळीत शिस्त लावण्याबद्दल आणखी माहिती पाहणार आहोत. तसंच, आपण स्वतःला शिस्त कशी लावू शकतो आणि शिस्त लावल्यामुळे थोड्या वेळासाठी जे दुःख होतं त्यापेक्षा जास्त दुःख देणारी गोष्ट आपण कशी टाळू शकतो हेदेखील आपण पाहणार आहोत.