व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिस्त स्वीकार आणि सुज्ञपणे वाग

शिस्त स्वीकार आणि सुज्ञपणे वाग

“शिक्षण [शिस्त, NW] स्वीकार, म्हणजे . . . तू सुज्ञपणे वागशील.”—नीति. १९:२०.

गीत क्रमांक: ३४, 

१. आपण बुद्धी कशी मिळवू शकतो आणि त्यामुळे आपल्याला कसा फायदा होईल?

बुद्धी यहोवाकडून येते आणि तो उदारतेने ती इतरांना देतो. याकोब १:५ म्हणतं: “तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असल्यास त्याने ती देवाजवळ मागत राहावी म्हणजे त्याला ती दिली जाईल, कारण देव कोणालाही कमी न लेखता सर्वांना उदारपणे बुद्धी देतो.” देव लावत असलेली शिस्त स्वीकारणं हा खरंतर बुद्धी मिळवण्याचा एक मार्ग आहे. अशी बुद्धी मिळवल्यामुळे चुकीच्या गोष्टी करण्यापासून दूर राहण्यासाठी आणि यहोवाच्या जवळ राहण्यासाठी आपल्याला मदत होते. (नीति. २:१०-१२) तसंच, सर्वकाळाच्या जीवनाची सुंदर आशाही आपल्याला मिळते.—यहू. २१.

२. देव जी शिस्त लावतो तिच्याबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो?

आपल्या अपरिपूर्णतेमुळे किंवा पार्श्‍वभूमीमुळे शिस्त स्वीकारणं आपल्याला कठीण जातं. तसंच, तिच्याबद्दल एक योग्य दृष्टिकोन बाळगणंही आपल्याला अवघड जातं. पण देव लावत असलेली शिस्त आपल्या फायद्याची आहे हे जेव्हा आपण अनुभवतो, तेव्हा देवाचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला समजतं. नीतिसूत्रे ३:११, १२ म्हणतं: “माझ्या मुला, परमेश्‍वराचे शिक्षण तुच्छ मानू नको . . . परमेश्‍वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन करतो.” जे सर्वोत्तम आहे ते आपल्याला मिळावं अशी यहोवाची इच्छा आहे. (इब्री लोकांना १२:५-११ वाचा.) देव आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखत असल्यामुळे आपल्यासाठी काय योग्य आणि आवश्‍यक आहे हे लक्षात ठेवूनच तो शिस्त लावतो. या लेखात आपण शिस्त लावण्याच्या चार पैलूंबद्दल चर्चा करणार आहोत: (१) स्वतःला लावलेली शिस्त, (२) पालक मुलांना लावत असलेली शिस्त, (३) आपल्याला मंडळीत लावली जाणारी शिस्त आणि (४) शिस्त मोडल्यामुळे होणारं दुःख.

स्वतःला शिस्त लावण्यात सुज्ञता आहे

३. मूल स्वतःला शिस्त लावायला कसं शिकतं? उदाहरण द्या.

आपण स्वतःला शिस्त लावतो तेव्हा आपल्या वागण्या-बोलण्यावर आपला ताबा असतो. स्वतःला शिस्त लावणं आपल्याला शिकावं लागतं, ते आपल्यात जन्मतःच नसतं. उदाहरणार्थ, मूल सायकल चालवायला शिकतं, तेव्हा मुलाचे पालक सुरुवातीला सायकल धरतात. मग मूल सायकलवर थोडा तोल सांभाळायला शिकलं, की पालक काही सेकंद आपला हात काढून घेतात आणि त्याचा तोल जाऊ लागला की लगेच परत सायकल पकडतात. एकदा का मूल तोल सांभाळायला शिकलं की मग पालक सायकल धरत नाही, ते ती सोडून देतात. अगदी याच प्रकारे धीराने प्रशिक्षण देण्याद्वारे पालक मुलांना “यहोवाच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवतात. मुलांना स्वतःला शिस्त लावण्याच्या बाबतीत आणि बुद्धिमान बनण्याच्या बाबतीत पालक मदत करतात.—इफिस. ६:४.

४, ५. (क) स्वतःला शिस्त लावणं “नवे व्यक्‍तिमत्त्व” धारण करण्याचा एक भाग कसा आहे? (ख) आपण चुका करतो तेव्हा आपण निराश होण्याची गरज का नाही?

मोठेपणी यहोवाबद्दल शिकणाऱ्‍या लोकांच्या बाबतीतही हे खरं आहे. त्यांच्यापैकी काहींनी कदाचित स्वतःला शिस्त लावली नसेल किंवा ते अजून प्रौढ ख्रिस्ती बनले नसतील. पण जेव्हा ते “नवे व्यक्‍तिमत्त्व” धारण करतात आणि ख्रिस्तासारखं बनण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते आणखी प्रौढ बनतात. (इफिस. ४:२३, २४) स्वतःला शिस्त लावल्यामुळे आपण देवाच्या इच्छेविरुद्ध असलेल्या सर्व गोष्टींचा व जगाच्या वासनांचा धिक्कार करण्यासाठी, या जगाच्या व्यवस्थेत समंजसपणे, नीतीने आणि सुभक्‍तीने जीवन जगण्यासाठी शिकू शकतो.—तीत २:१२.

आपण सर्व पापी आहोत. (उप. ७:२०) त्यामुळे जेव्हा आपण एखादी चूक करतो तेव्हा त्याचा असा अर्थ होतो का, की आपल्याला जराही शिस्त नाही? असं आपण म्हणू शकत नाही. नीतिसूत्रे २४:१६ म्हणतं: “धार्मिक सात वेळा पडला तरी पुनः उठतो.” या वचनात सांगितल्याप्रमाणे आपल्याला ‘पुन्हा उठणं’ कशामुळे शक्य होतं? हे आपल्या ताकदीने नव्हे, तर देवाच्या पवित्र आत्म्यामुळे शक्य होतं. (फिलिप्पैकर ४:१३ वाचा.) देवाच्या आत्म्याच्या फळाचा भाग असलेल्या आत्मसंयम या गुणाचा आणि स्वतःला शिस्त लावण्याचा खूप जवळचा संबंध आहे.

६. आपण देवाच्या वचनाचे चांगले विद्यार्थी कसे बनू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

बायबल अभ्यास, मनन आणि मनापासून केलेल्या प्रार्थनेमुळे स्वतःला शिस्त लावणं तुम्हाला शक्य होईल. पण बायबलचा अभ्यास करणं तुम्हाला कठीण जात असेल किंवा ते मुळीच आवडत नसेल तेव्हा काय? अशा वेळी तुम्हाला निराश होण्याची गरज नाही. तुम्ही जर यहोवाला मदत मागितली, तर तो नक्कीच तुमची मदत करेल हे लक्षात असू द्या. तो तुम्हाला त्याच्या वचनासाठी “तीव्र लालसा” निर्माण करायला मदत करू शकतो. (१ पेत्र २:२) बायबलचा अभ्यास करण्याची स्वतःला शिस्त लागावी म्हणून तुम्ही सर्वात आधी प्रार्थना करू शकता. मग तुमच्या प्रार्थनेनुसार कार्यही करा. सुरुवातीला तुम्ही थोड्या वेळासाठी अभ्यास करू शकता. मग हळूहळू अभ्यास करणं तुम्हाला सोपं आणि आनंददायीही वाटेल. शांत वातावरणात देवाच्या मौल्यवान विचारांवर मनन करण्यासाठी तुम्ही जो वेळ द्याल, त्यामुळे तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल.—१ तीम. ४:१५.

७. स्वतःला शिस्त लावल्यामुळे यहोवाच्या सेवेतले ध्येयं गाठण्यासाठी आपल्याला कशी मदत होऊ शकते?

स्वतःला शिस्त लावल्यामुळे यहोवाच्या सेवेतले ध्येयं गाठायला आपल्याला मदत होते. उदाहरणार्थ, एका पित्याला असं वाटलं, की सेवेतला त्याचा आवेश कमी होत आहे. म्हणून मग त्याने पायनियर बनायचं ध्येय ठेवलं. स्वतःला शिस्त लावण्याच्या सवयीचा त्याला कसा फायदा झाला? त्याने पायनियरिंग संबंधित असलेले आपल्या मासिकातले सर्व लेख वाचले आणि याबद्दल प्रार्थनाही केली. असं केल्यामुळे यहोवासोबतचा त्याचा नातेसंबंध दृढ बनला. तो शक्य असेल तेव्हा साहाय्यक पायनियरिंगही करायचा. तो नेहमी आपल्या ध्येयावर लक्ष ठेऊन होता. त्याने त्याच्यामध्ये कोणताच अडथळा येऊ दिला नाही. नंतर काही काळाने तो पायनियर बनला.

यहोवाच्या शिस्तीत मुलांना वाढवत राहा

मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांना चांगल्या-वाइटाची समज नसते, म्हणून त्यांना प्रशिक्षणाची गरज असते (परिच्छेद ८ पाहा)

८-१०. मुलांनी यहोवाची सेवा करावी अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पालकांना कशामुळे मदत होऊ शकते? उदाहरण द्या.

यहोवाने पालकांना आपल्या मुलांना त्याच्या “शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्याची जबाबदारी दिली आहे. (इफिस. ६:४) आजच्या जगात ही जबाबदारी पार पाडणं खूप कठीण आहे. (२ तीम. ३:१-५) मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा त्यांना चांगल्या-वाइटाची समज नसते, त्यांचा विवेक प्रशिक्षित नसतो. म्हणून त्यांच्या विवेकाला प्रशिक्षित करण्यासाठी त्यांना शिस्त लावण्याची गरज असते. (रोम. २:१४, १५) एक बायबल विद्वान सांगतो, की “शिस्त लावणं” यासाठी जो ग्रीक शब्द वापरण्यात आला आहे, त्याचा अर्थ “बाल विकास” किंवा मुलाला जबाबदार प्रौढ बनण्यासाठी मदत करणं असा होतो.

पालक मुलांना प्रेमाने शिस्त लावतात तेव्हा त्यांना सुरक्षित वाटतं. आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा आहेत आणि आयुष्यात आपण जे काही निर्णय घेऊ त्याच्या बऱ्‍या-वाईट परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागेल, हे मुलं शिकतात. त्यामुळे आपल्या मुलांना वाढवताना ख्रिस्ती पालकांनी यहोवाकडून बुद्धी मागणं महत्त्वाचं आहे. मुलांना कसं वाढवावं याबद्दल वेगवेगळ्या धारणा असू शकतात आणि त्या बदलत राहतात. पण जे पालक यहोवाचं ऐकतात, त्यांना स्वतःच्या अनुभवावर किंवा मानवी बुद्धीवर अवलंबून राहण्याची किंवा निर्णय घेण्यासाठी अंदाज बांधत बसण्याची गरजच पडत नाही.

१० आपण नोहाच्या उदाहरणातून बरंच काही शिकू शकतो. यहोवाने त्याला जहाज बांधायला सांगितलं होतं. ते कसं बांधायचं हे त्याला माहीत नव्हतं. त्याला याबाबतीत यहोवावर अवलंबून राहणं गरजेचं होतं. बायबल म्हणतं: “देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्प. ६:२२) त्याचा काय परिणाम झाला? त्या जहाजामुळे नोहा आणि त्याच्या कुटुंबाचा बचाव झाला. नोहा एक यशस्वी पालक होता. असं आपण का म्हणू शकतो? कारण देवाच्या बुद्धीवर त्याचा पूर्ण विश्‍वास होता. नोहाने त्याच्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकवलं होतं आणि तो स्वतः त्यांच्यासाठी एक चांगलं उदाहरण होता. खरंतर जलप्रलयाच्या आधी त्या दुष्ट काळात असं चांगलं उदाहरण ठेवणं खूप कठीण होतं.—उत्प. ६:५.

११. मुलांना प्रशिक्षण देताना पालकांनी मेहनत घेणं का गरजेचं आहे?

११ पालक या नात्याने आपण देवाची आज्ञा कशी पाळू शकतो? यहोवाचं ऐकण्याद्वारे. तुमच्या मुलांचं पालनपोषण करताना यहोवाची मदत घ्या. त्याच्या वचनातल्या आणि त्याच्या प्रकाशनातल्या सल्ल्यांचा वापर करा. असं केल्यामुळे पुढे जाऊन तुमची मुलं याबद्दल तुमचे आभार मानतील. एक बांधव लिहितो: “माझ्या पालकांनी मला जसं वाढवलं त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. माझ्या अंतःकरणापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.” तो सांगतो, की यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडायला त्याला त्याच्या पालकांनी मदत केली. पण हेही खरं आहे की पालकांनी मुलांना सत्य शिकवण्याचे कितीही चांगले प्रयत्न केले, तरी कधीकधी मूल यहोवाला सोडून जाऊ शकतं. पण ज्या पालकांनी मुलाच्या मनात सत्य ठसवण्याचा पूर्ण प्रयत्न केला होता ते एक शुद्ध विवेक बाळगू शकतात आणि एक दिवस त्यांचं मूल पुन्हा सत्यात येईल अशी आशा ते ठेवू शकतात.

१२, १३. (क) मूल बहिष्कृत झाल्यावरही पालक यहोवाच्या आज्ञेत कसं राहू शकतात? (ख) पालकांनी यहोवाच्या आज्ञा पाळल्यामुळे एका कुटुंबाला कसा फायदा झाला?

१२ मुलाला बहिष्कृत केलं जातं, तेव्हा काही पालकांसाठी ती एक कठीण परीक्षा ठरू शकते. एका बहिणीचा अनुभव लक्षात घ्या. तिची बहिष्कृत झालेली मुलगी घर सोडून गेली होती. ती बहीण म्हणते: “माझ्या मुलीसोबत आणि नातीसोबत मला वेळ घालवता यावा, म्हणून मी आपल्या प्रकाशनांत पळवाटा शोधायचे.” पण तिच्या पतीने तिला प्रेमळपणे मदत केल्यामुळे ती हे समजू शकली, की तिच्या मुलीची जबाबदारी आता त्यांची नाही आणि त्यांनी यहोवाला एकनिष्ठ राहणं गरजेचं आहे.

१३ काही वर्षांनी त्या बहिणीच्या मुलीला पुन्हा मंडळीत घेण्यात आलं. ती बहीण म्हणते: “आता ती मला जवळजवळ रोज फोन करते किंवा मेसेज करते. तसंच ती माझा आणि माझ्या पतीचा आदर करते कारण आम्ही यहोवाच्या आज्ञेत राहिलो होतो. आता आमचा एकमेकांसोबत चांगला नातेसंबंध आहे.” तुमचा मुलगा किंवा मुलगी बहिष्कृत झाली असेल तरीही तुम्ही “अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव” ठेवाल का? तुम्ही ‘आपल्याच बुद्धीवर अवलंबून’ राहत नाही हे यहोवाला दाखवाल का? (नीति. ३:५, ६) यहोवा आपल्याला जी शिस्त लावतो त्यावरून तो किती बुद्धिमान आहे आणि त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे हे दिसून येतं. त्याने सर्व मानवांसाठी, तुमचा मुलगा किंवा मुलगी यांच्यासाठीही आपल्या पुत्राचे बलिदान दिले आहे हे विसरू नका. सगळ्यांना सर्वकाळाचं जीवन मिळावं अशी देवाची इच्छा आहे. (२ पेत्र ३:९ वाचा.) त्यामुळे पालकांनो, यहोवाची आज्ञा पाळणं कठीण असलं तरीही तो ज्या प्रकारे शिस्त लावतो आणि जे मार्गदर्शन देतो ते योग्यच आहे हा भरवसा बाळगा. देव लावत असलेली शिस्त स्वीकारा, तिचा विरोध करू नका

मंडळीत जेव्हा शिस्त लावली जाते

१४. यहोवा ‘विश्‍वासू कारभारी’ यांच्या माध्यमाने ज्या सूचना आपल्याला देतो, त्याचा आपल्याला कसा फायदा होतो?

१४ ख्रिस्ती मंडळीची काळजी घेण्याचं, संरक्षण करण्याचं आणि तिला प्रशिक्षित करण्याचं यहोवाने वचन दिलं आहे. वेगवेगळ्या मार्गांनी त्याने हे वचन पूर्ण केलं आहे. उदाहरणार्थ, मंडळीची काळजी घेण्यासाठी त्याने आपल्या पुत्राला नेमलं आहे आणि येशूने आपल्याला विश्‍वासू राहता यावं म्हणून आध्यात्मिक अन्‍न पुरवण्यासाठी ‘विश्‍वासू कारभारी’ याला नेमलं आहे. (लूक १२:४२) हा “कारभारी” आपल्याला शिस्त लावतो व महत्त्वाच्या सूचनाही देतो. तुम्ही कधी असं भाषण ऐकलं आहे का किंवा असा एखादा लेख वाचला आहे का, ज्यामुळे तुमच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये बदल करायला तुम्हाला मदत झाली आहे? तुम्ही हे बदल केले आहेत म्हणून आनंद माना. कारण असं करण्याद्वारे तुम्ही खरंतर यहोवाची शिस्त स्वीकारली आहे.—नीति. २:१-५.

१५, १६. (क) वडील करत असलेल्या कामापासून आपल्याला फायदा कसा होऊ शकतो? (ख) वडिलांना त्यांचं काम करणं सोपं जावं म्हणून आपण काय करू शकतो?

१५ मंडळीची प्रेमळपणे काळजी घेण्यासाठी ख्रिस्ताने वडिलांना नेमलं आहे. बायबल या बांधवांना “माणसांच्या रूपात देणग्या” असं म्हणतं. (इफिस. ४:८, ११-१३) वडील करत असलेल्या कामापासून आपल्याला फायदा कसा होऊ शकतो? आपण त्यांच्या विश्‍वासाचं आणि चांगल्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो. तसंच, ते देत असलेल्या बायबल आधारित सल्ल्याचं पालनही करू शकतो. (इब्री लोकांना १३:७, १७ वाचा.) वडिलांचं आपल्यावर प्रेम आहे आणि आपला देवाशी चांगला नातेसंबंध असावा असं त्यांना वाटतं. आपण सभा चुकवत आहोत किंवा सेवेतला आपला उत्साह कमी झाला आहे हे त्यांच्या लक्षात येताच ते आपली मदत करायचा प्रयत्न करतात. ते आपलं म्हणणं ऐकतात व प्रेमळपणे बायबलमधून आपल्याला उत्तेजन आणि सुज्ञ सल्ला देतात. वडील आपल्याला जी मदत करतात ती यहोवाच्या प्रेमाचा पुरावा आहे हे तुम्हाला जाणवतं का?

१६ आपल्याला सल्ला देणं वडिलांसाठी सोपं नसतं हे लक्षात ठेवा. गंभीर पाप लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या दावीद राजासोबत बोलताना नाथान संदेष्ट्याला कसं वाटलं असेल याचा विचार करा. (२ शमु. १२:१-१४) १२ प्रेषितांपैकी एक असलेला पेत्र, यहुदी ख्रिस्ती बांधवांना गैरयहुदी बांधवांपेक्षा जास्त महत्त्व देत होता. याबद्दल त्याला सल्ला देताना पौलला कसं वाटलं असावं? हा सल्ला देताना पौलला खूप धैर्याची गरज होती. (गलती. २:११-१४) तुम्हाला सल्ला देताना वडिलांना सोपं जाईल म्हणून तुम्ही काय करू शकता? नम्र असा, कृतज्ञ राहा आणि त्यांना तुम्हाला सल्ला देणं सोपं जाईल असं वागा. वडील करत असलेली मदत ही यहोवाच्या प्रेमाचा पुरावा आहे असं समजा. यामुळे वडिलांना त्यांचं काम करताना आनंद वाटेल आणि तुम्हीही आनंदित व्हाल.

१७. मंडळीतल्या वडिलांकडून एका बहिणीला मदत कशी मिळाली?

१७ एक बहीण सांगते की तिने आधी ज्या चुका केल्या होत्या, त्यामुळे यहोवावर प्रेम करणं तिला कठीण जात होतं आणि ती खूप निराश झाली होती. ती म्हणते: “मला माहीत होतं की मला वडिलांशी बोलणं गरजेचं आहे. त्यांनी माझी टीका केली नाही किंवा मला कमी लेखलं नाही. उलट त्यांनी मला प्रोत्साहन दिलं आणि धीर दिला. प्रत्येक सभेनंतर ते कितीही बीझी असले तरी वडिलांपैकी एक जण तरी माझ्याकडे येऊन माझी विचारपूस करायचा. आधी केलेल्या चुकांमुळे मी यहोवाच्या प्रेमाच्या लायक नाही असं मला वाटायचं. पण यहोवाने वेळोवेळी मंडळी आणि वडिलांचा उपयोग करून मला हे दाखवून दिलं की त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मी नेहमी हीच प्रार्थना करते की यहोवासोबत माझा नातेसंबंध असाच टिकून राहो.”

शिस्त मोडल्यामुळे होणारं दुःख

१८, १९. शिस्त नाकारल्यामुळे कोणते दुःखद परिणाम होऊ शकतात? उदाहरण दया.

१८ शिस्त लावली गेल्यामुळे कधीकधी दुःख होऊ शकतं, पण देव लावत असलेली शिस्त नाकारल्यामुळे जास्त दुःख होतं. (इब्री १२:११) काइन आणि सिदकीया राजा यांच्या वाईट उदाहरणांपासून आपण बरंच काही शिकू शकतो. काइन आपल्या भावाचा द्वेष करत आहे आणि त्याला ठार मारण्याची त्याची इच्छा आहे, हे देवाने पाहिलं. म्हणून त्याने काइनला इशारा दिला: “तुला राग का आला? तुझे तोंड का उतरले? तू जर बरे करशील तर तू मान्य केला जाणार नाहीस काय? आणि तू बरे करणार नाहीस, तर पाप दाराशी टपून बसले आहे; आणि त्याची इच्छा तुझ्यावर होईल; परंतु तू त्यावर अधिकार कर.” (उत्प. ४:६, ७, पं.र.भा.) काइनने यहोवा लावत असलेली शिस्त नाकारली आणि आपल्या भावाचा खून केला. त्यामुळे आयुष्यभर त्याला अतिशय भयानक परिणामांना सामोरं जावं लागलं. (उत्प. ४:११, १२) जर काइनने देवाचं ऐकलं असतं, तर त्याला इतकं दुःख अनुभवावं लागलं नसतं.

१९ सिदकीया एक वाईट राजा होता आणि तो धाडसी नव्हता. त्याच्या राज्यात लोकांची स्थिती खूप वाईट होती. सिदकीयाने स्वतःला बदलावं अशी ताकीद यिर्मया संदेष्ट्याने त्याला वारंवार दिली होती. पण यहोवा जी शिस्त लावू पाहत होता ती त्याने नाकारली आणि त्याचे परिणाम खूप दुःखदायक झाले. (यिर्म. ५२:८-११) आपण विनाकारण अशा प्रकारचं दुःख भोगावं अशी यहोवाची मुळीच इच्छा नाही.—यशया ४८:१७, १८ वाचा.

२०. देव लावत असलेली शिस्त स्वीकारणाऱ्‍यांना आणि नाकारण्यारांना कोणत्या परिणामांचा सामना करावा लागेल?

२० आज जगात अनेक जण देव लावत असलेल्या शिस्तीची टिंगल उडवतात आणि ती नाकारतात. पण लवकरच देव लावत असलेली शिस्त जे नाकारतील त्यांना दुःखदायक परिणामांना तोंड द्यावं लागेल. (नीति. १:२४-३१) नीतिसूत्रे ४:१३ म्हणतं: “तू शिक्षण दृढ धरून ठेव; सोडू नको; ते जवळ राख; कारण ते तुझे जीवन आहे.” त्यामुळे आपण सर्व जण शिस्त स्वीकारू या आणि सुज्ञपणे वागू या.