गायसने आपल्या बांधवांना कशी मदत केली
पहिल्या शतकाच्या शेवटी गायसला आणि इतर ख्रिश्चनांना मंडळीत काही आव्हानांचा सामना करावा लागला. मंडळीतील काही व्यक्ती खोट्या शिकवणी पसरवत होत्या आणि मंडळीला कमजोर करण्याचा व तिच्यात फुटी पाडण्याचा प्रयत्न करत होत्या. (१ योहा. २:१८, १९; २ योहा. ७) दियत्रफेस नावाचा एक मनुष्य प्रेषित योहानची आणि इतरांची “बदनामी” करण्याच्या हेतूने त्यांच्याविषयी वाईट गोष्टी पसरवत होता. तसंच, बाहेरगावावरून येणाऱ्या बांधवांचा तो पाहुणचार करत नव्हता. यासोबतच, आपल्या वाईट उदाहरणाचं अनुकरण करण्यासही तो मंडळीतील इतरांना प्रवृत्त करत होता. (३ योहा. ९, १०) योहानने गायसला पत्र लिहिलं तेव्हा तिथल्या मंडळीची परिस्थिती अशी होती. प्रेषित योहानने हे पत्र इ.स. ९८ मध्ये लिहिलं, आणि ख्रिस्ती ग्रीक शास्त्रामध्ये याला “योहान याचे तिसरे पत्र” म्हणून ओळखलं जातं.
गायसला मंडळीमध्ये आव्हानांचा सामना करावा लागत असला, तरी तो यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहिला. त्याने कसं दाखवून दिलं की तो यहोवाला विश्वासू आहे? आज आपण त्याच्या चांगल्या उदाहरणाचं अनुकरण का केलं पाहिजे? आणि यासाठी योहानचं पत्र आपल्याला कशी मदत करू शकतं?
एका प्रेमळ मित्राला लिहिलेलं पत्र
पत्राच्या सुरुवातीला योहान स्वतःची ओळख एक ‘वडीलधारा माणूस’ अशी करून देतो. पत्र लिहिणारा हा प्रेषित योहानच आहे हे समजण्यासाठी त्याच्या प्रिय आध्यात्मिक मुलाला, गायसला ही ओळख पुरेशी होती. योहान त्याच्या पत्रात गायसला उद्देशून म्हणतो: “प्रिय गायस . . . ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करतो.” त्यानंतर, गायसच्या आध्यात्मिक आरोग्याप्रमाणेच त्याचं शारीरिक आरोग्यही चांगलं असेल, अशी आशा तो व्यक्त करतो. खरंच, किती प्रेमळ आणि प्रशंसनीय पत्र योहानने गायसला लिहिलं!—३ योहा. १, २, ४.
गायस हा कदाचित मंडळीची देखरेख करणारा एक जबाबदार बांधव असावा. पण याबद्दल योहानच्या पत्रात आपल्याला कोणताही स्पष्ट उल्लेख आढळत नाही. गायस अनोळखी बांधवांनाही आदरातिथ्य दाखवायचा आणि त्याबद्दल योहानने त्याची प्रशंसा केली. आदरातिथ्य दाखवण्याची ही वृत्ती योहानच्या दृष्टीने गायसच्या विश्वासूपणाचा एक पुरावाच होता. कारण, अगदी सुरुवातीपासूनच आदरातिथ्य करणं हे देवाच्या लोकांचं ओळखचिन्ह राहिलं आहे.—उत्प. १८:१-८; १ तीम. ३:२; ३ योहा. ५.
ख्रिस्ती बांधवांना दाखवत असलेल्या आदरातिथ्यामुळे योहानने गायसची स्तुती केली; यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे प्रेषित योहान जिथं राहत होता तिथून ख्रिस्ती बांधव वेळोवेळी इतर ठिकाणी प्रवास करायचे आणि तिथल्या मंडळ्यांना भेट द्यायचे. साहजिकच त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल ते योहानला सांगत असावेत. कदाचित याच मार्गाने योहानला मंडळ्यांबद्दलची माहिती मिळत असावी.
प्रवास करणारे बांधव आपल्या ख्रिस्ती बांधवांसोबतच राहणं पसंत करायचे. कारण त्या वेळेच्या धर्मशाळांमध्ये राहण्याची चांगली व्यवस्था नसायची. तसंच, तिथं सर्व प्रकारची अनैतिक कामंही चालायची. या धर्मशाळा फार बदनाम होत्या. त्यामुळे शक्य असेल तेव्हा सुज्ञ प्रवासी आपल्या मित्रांकडे आणि ख्रिस्ती बांधव आपल्या इतर विश्वासू बांधवांकडे राहायचे.
“ते त्याच्याच नावाने बाहेर पडले”
योहानने आपल्या पत्रात गायसला पाहुणचार दाखवण्याचं प्रोत्साहन दिलं. तो म्हणाला: “जाताना त्यांना [प्रवास करणाऱ्या ख्रिश्चनांना] देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल अशा पद्धतीने निरोप दे.” या ठिकाणी ‘योग्य ठरेल अशा पद्धतीने निरोप’ देण्याचा अर्थ, प्रवाशांना त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी लागणाऱ्या गरजा पुरवणं असा होतो. गायसने नक्कीच याआधीही त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यांसाठी हे केलं असेल. म्हणूनच तर त्याच्याकडे राहिलेल्यांनी, त्याने घेतलेल्या काळजीविषयी आणि त्याच्या विश्वासाविषयी योहानला सांगितलं होतं.—३ योहा. ३, ६.
हे पाहुणे कदाचित मिशनरी, योहानचा संदेश घेऊन जाणारे किंवा प्रवासी पर्यवेक्षक असावेत. ते कोणीही असोत, एक मात्र खरं, ते सर्व आनंदाच्या संदेशासाठी प्रवास करत होते. योहानने म्हटलं, की “ते त्याच्याच नावाने बाहेर पडले.” (३ योहा. ७) योहानने आपल्या पत्रात नुकताच देवाचा उल्लेख केला होता. (वचन ६ पाहा) त्यामुळे “त्याच्याच नावाने” असं जे त्याने लिहिलं, ते यहोवाच्या नावाला सूचित करत असावं असं दिसतं. प्रवास करणारे हे बांधव ख्रिस्ती मंडळीचाच एक भाग होते आणि त्यामुळे त्यांचं मनापासून स्वागत करणं गरजेचं होतं. योहानने लिहिलं त्याप्रमाणे: “अशा बांधवांचा पाहुणचार करण्याचे आपले कर्तव्यच आहे. असे केल्याने आपण सत्यात त्यांचे सहकारी बनू.”—३ योहा. ८.
एका गंभीर समस्येचा सामना करण्यासाठी मदत
योहानने केवळ गायसचे आभार मानण्यासाठी त्याला पत्र लिहिलं होतं असं नाही. तर, एका गंभीर समस्येचा सामना करण्यास गायसला मदत व्हावी यासाठीसुद्धा त्याने हे पत्र लिहिलं होतं. ही समस्या काय होती? काही कारणास्तव, मंडळीतील दियत्रफेस नावाचा एक सदस्य प्रवास करणाऱ्या ख्रिश्चनांचं मुळीच आदरातिथ्य करत नव्हता. इतकच नाही, तर इतरांना आदरातिथ्य दाखवणाऱ्या बांधवांनाही तो ‘अडवत’ होता.—३ योहा. ९, १०.
त्यामुळे, शक्य असतं तरी विश्वासू ख्रिश्चनांनी नक्कीच त्याच्याकडे राहणं पसंत केलं नसतं. दियत्रफेस मंडळीत इतरांपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करत होता. योहानने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची तो कदर करत नव्हता, आणि प्रेषितांची तसंच इतर बांधवांची बदनामी करण्यासाठी तो त्यांच्याविषयी वाईट गोष्टी पसरवत होता. दियत्रफेस हा खोटा शिक्षक आहे असं योहानने कधीही म्हटलं नव्हतं, तरी तो प्रेषितांच्या अधिकाराला आव्हान देत होता. दियत्रफेसला मंडळीमध्ये मोठं पद हवं होतं आणि त्याची मनोवृत्ती जगातील लोकांप्रमाणे होती, त्यामुळे त्याच्या एकनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दियत्रफेसच्या उदाहरणावरून दिसून येतं, की महत्त्वाकांक्षी आणि गर्विष्ठ व्यक्ती मंडळीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळेच योहानने गायसला आणि आपल्यापैकी प्रत्येकालाच इशारा देताना म्हटलं: “वाइटाचे अनुकरण करू नकोस.”—३ योहा. ११.
चांगलं करत राहण्याचं उत्तम कारण
दियत्रफेसच्या अगदी विरुद्ध असलेलं उदाहरण म्हणजे देमेत्रिय या बांधवाचं. त्याच्या चांगल्या उदाहरणाबद्दल लिहिताना योहानने म्हटलं: “देमेत्रिय याच्याविषयी सगळे बांधव चांगलेच बोलले आहेत . . . खरेतर, आम्हीसुद्धा त्याच्याविषयी साक्ष देत आहोत, आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला माहीत आहे.” (३ योहा. १२) देमेत्रियला कदाचित गायसची मदत हवी होती असं दिसतं. आणि ‘योहान याचं तिसरं पत्र’ हे देमेत्रियचा परिचय करून देण्यासाठी व त्याची शिफारस करण्यासाठी लिहिलं असावं. योहानने लिहिलेलं हे पत्र देमेत्रियने स्वतः गायसपर्यंत पोहचवलं असावं. योहानचा संदेश घेऊन जाणारा, किंवा कदाचित एक प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने देमेत्रिय याने प्रेषित योहानने लिहिलेला प्रत्येक शब्द खरा असल्याचं दाखवून दिलं.
गायस आधीपासूनच बांधवांना आदरातिथ्य दाखवत होता, तरीसुद्धा योहानने त्याला आदरातिथ्य दाखवत राहण्यास का आर्जवलं? कारण त्या वेळी परिस्थिती अशी होती, की आदरतिथ्य दाखवणाऱ्या मंडळीतील बांधवांना दियत्रफेस फूट पाडून मंडळीतून बाहेर घालवत होता. त्यामुळे देमेत्रियला आपल्या घरात घेण्यास गायस मागेपुढे पाहील असं योहानला वाटलं असावं का? आणि म्हणून गायसचं धैर्य वाढवण्यासाठी योहानने त्याला पत्र लिहिलं असावं का? कारण काहीही असो, गायसला धीर देण्यासाठी योहानने लिहिलं: “जो चांगले करतो तो देवापासून आहे.” (३ योहा. ११) खरंच, चांगलं करत राहण्याचं यापेक्षा उत्तम कारण काय असू शकतं!
मग, योहानच्या पत्रामुळे बांधवांना आदरातिथ्य दाखवत राहण्याचं प्रोत्साहन गायसला मिळालं का? योहानने लिहिलेलं तिसरं पत्र, हे इतरांना “चांगल्याचे अनुकरण” करत राहण्यासाठी बायबलच्या पुस्तकांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलं आहे. आणि हीच गोष्ट दाखवते की या पत्रामुळे गायसला नक्कीच प्रोत्साहन मिळालं असेल.
योहानच्या तिसऱ्या पत्रातून शिकण्यासाठी धडे
गायस या पहिल्या शतकातील आपल्या बांधवाबद्दल बायबलमध्ये अधिक माहिती देण्यात आलेली नाही. पण
योहानच्या या पत्रातून त्याच्या जीवनाची जी छोटीशी झलक आपल्याला पाहायला मिळते, त्यातूनही आपल्याला बरेचसे धडे शिकायला मिळतात.पहिला धडा म्हणजे, आपल्यापैकी बरेच जण सत्याचं ज्ञान इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रवास करायला तयार असलेल्या विश्वासू ख्रिश्चनांचे काही प्रमाणात का होईना ऋणी आहेत. कारण, त्यांनी केलेल्या प्रवासामुळेच सत्य आपल्यापर्यंत पोहोचलं. हे खरं आहे, की आज ख्रिस्ती मंडळीतील सर्वच जण आनंदाचा संदेश इतर ठिकाणी पोहचवण्यासाठी दूरच्या क्षेत्रांमध्ये प्रवास करत नाहीत. पण जे बांधव प्रवास करतात, जसं की प्रवासी पर्यवेक्षक आणि त्यांची पत्नी, यांना आपल्यापैकी प्रत्येक जण गायसप्रमाणे मदत आणि प्रोत्साहन देऊ शकतो. किंवा आपण अशा काही बंधुभगिनींना व्यावहारिक मदत पुरवू शकतो, जे प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्याकरता देशातील इतर भागांत किंवा परदेशात जातात. त्यामुळे बायबलमध्ये आर्जवल्याप्रमाणे आपण बांधवांचा “पाहुणचार” करत राहू या.—रोम. १२:१३; १ तीम. ५:९, १०.
शिकायला मिळणारा दुसरा धडा म्हणजे, मंडळीत बांधवांच्या अधिकाराला आव्हान दिलं जातं अशा घटना. या घटना फार क्वचितच घडतात, पण मंडळीत जेव्हा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होतात, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटू नये. कारण, पहिल्या शतकात योहानच्या आणि प्रेषित पौलच्याही अधिकाराला आव्हान देण्यात आलं होतं. (२ करिंथ. १०:७-१२; १२:११-१३) पण अशा प्रकारची घटना आपल्या स्वतःच्या मंडळीत घडली, तर आपण काय केलं पाहिजे? पौलने तिमथ्यला जो सल्ला दिला त्याकडे लक्ष द्या. त्याने म्हटलं: “प्रभूच्या दासाला भांडण करण्याची गरज नाही, तर तो सर्वांशी सौम्यतेने वागणारा, शिकवण्याची योग्यता असलेला, तसेच इतरांनी त्याचे वाईट केले, तरी स्वतःवर नियंत्रण ठेवणारा असा असावा; याशिवाय, ज्यांची योग्य मनोवृत्ती नाही अशांना त्याने सौम्यतेने शिकवावे.” आपल्याला चिथवलं जातं किंवा संताप येईल असं काही केलं जातं, तेव्हाही जर आपण सौम्य व शांत मनोवृत्ती दाखवली, तर मंडळीची शांती भंग करणाऱ्यांना स्वतःमध्ये सुधारणा करण्यास हळूहळू मदत मिळू शकते. अशांना कदाचित यहोवासुद्धा “सत्याचे अचूक ज्ञान मिळवण्यासाठी पश्चात्ताप करण्याची संधी देईल”.—२ तीम. २:२४, २५.
योहानच्या पत्रातून आपल्याला आणखी एक धडा शिकायला मिळतो, तो म्हणजे विरोधाचा सामना करत असतानाही जे ख्रिस्ती बंधुभगिनी यहोवाची विश्वासूपणे सेवा करत राहतात त्यांच्या मेहनतीची आपण जाणीव बाळगली पाहिजे आणि त्यांची कदर केली पाहिजे. प्रेषित योहाननेही गायसला प्रोत्साहन दिलं आणि तो करत असलेली सेवा योग्य आहे याची खात्री दिली. आज मंडळीतील वडिलांनी योहानच्या उदाहरणाचं अनुकरण केलं पाहिजे. त्यांनी बंधुभगिनींना उत्तेजन आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे बंधुभगिनी यहोवाच्या सेवेत “दमणार नाहीत.” —यश. ४०:३१; १ थेस्सलनी. ५:११.
मूळ ग्रीक भाषेमध्ये योहानचं तिसरं पत्र फक्त २१९ शब्दांमध्ये लिहिण्यात आलं आहे. आणि हे बायबल पुस्तकांमधील सर्वात लहान पुस्तक आहे. पण असं असलं तरी, आजच्या ख्रिश्चनांसाठी हे पुस्तक म्हणजे एक अनमोल ठेवा आहे.