‘विदेशी लोकांना’ आनंदाने यहोवाची सेवा करण्यास मदत करा
“परमेश्वर उपऱ्यांचे [विदेशी लोकांचे] रक्षण करतो.”—स्तो. १४६:९.
१, २. (क) आपल्या काही बंधुभगिनींना कोणत्या परिस्थितीचा आणि समस्यांचा सामना करावा लागतो? (ख) आपण कोणत्या काही प्रश्नांवर विचार करणार आहोत?
लीजे नावाचा आपला एक बांधव त्याच्या अनुभवाविषयी सांगतो: “बुरुंडी या देशात जेव्हा यादवी युद्ध सुरू झालं, तेव्हा मी आणि माझं कुटुंब आम्ही सर्व एका संमेलनात होतो. बाहेर लोक पळत असल्याचं आणि गोळीबार करत असल्याचं आम्ही पाहिलं. मग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी माझे आईवडील आणि आम्ही ११ भावंडं घरातील थोड्याफार वस्तू घेऊन त्या देशातून पळालो. १,६०० किलोमीटरचा प्रवास करून आमच्या कुटुंबापैकी काही जण मलावी या देशातील निर्वासितांच्या छावणीत पोहोचले; तर बाकीच्यांची आमच्यापासून ताटातूट झाली.”
२ आज युद्धामुळे किंवा छळामुळे जगभरात ६ करोड ५० लाखांपेक्षा अधिक लोक निर्वासित झाले आहेत. हा आकडा आजवर नोंदवण्यात आलेला सर्वात मोठा आकडा आहे. * या निर्वासितांमध्ये हजारो जण यहोवाचे साक्षीदार आहेत. यांच्यापैकी अनेकांनी त्यांच्याकडे असलेलं जवळजवळ सर्वकाही गमावलं आहे. तर अनेकांनी यासोबतच त्यांच्या प्रियजनांनाही गमावलं आहे. या निर्वासितांना आणखी कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो? त्यांच्यामध्ये असलेल्या आपल्या बंधुभगिनींना, यहोवाची सेवा करण्यासाठी आणि कठीण परिस्थितीतही आनंद टिकवून ठेवण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो? (स्तो. १००:२) तसंच, निर्वासित झालेल्या या लोकांपैकी ज्यांना यहोवा देवाविषयी माहीत नाही, त्यांना प्रचार करण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे?
निर्वासितांचं जीवन
३. येशूला आणि त्याच्या अनेक शिष्यांना निर्वासितांचं जीवन का जगावं लागलं?
३ हेरोद राजा बाळ येशूचा जीव घेण्यास पाहत आहे, असं एका देवदूताने योसेफला सांगितलं. त्यानंतर मरीया व येशू यांना घेऊन योसेफ इजिप्तमध्ये निर्वासित म्हणून राहिला; ते सर्व हेरोदचा मृत्यू होईपर्यंत तिथेच राहिले. (मत्त. २:१३, १४, १९-२१) याच्या अनेक वर्षांनंतर, येशूचे बरेच शिष्यही छळ होत असल्यामुळे “यहूदीया व शोमरोनच्या प्रदेशांत विखुरले गेले.” (प्रे. कार्ये ८:१) आपल्या शिष्यांपैकी अनेकांना आपलं घरदार सोडावं लागेल याची येशूला पूर्ण कल्पना होती. तो म्हणाला: “जेव्हा ते एका शहरात तुमचा छळ करतील तेव्हा दुसऱ्या शहरात पळून जा.” (मत्त. १०:२३) एखाद्याला कोणत्याही कारणामुळे आपलं घरदार सोडावं लागत असलं, तरी तसं करणं मुळीच सोपं नाही.
४, ५. निर्वासितांना आपलं घरदार सोडून पळून जात असताना किंवा छावण्यांमध्ये राहत असताना, कोणकोणत्या धोक्यांना आणि समस्यांना तोंड द्यावं लागतं?
४ घरदार सोडून पळून जात असताना किंवा छावण्यांमध्ये राहत असताना, निर्वासितांना अनेक प्रकारच्या धोक्यांना आणि समस्यांना तोंड द्यावं लागतं. लीजे या बांधवाचा धाकटा भाऊ गॅड म्हणतो: “आम्ही कित्येक आठवडे चालत होतो. जाताना शेकडो मृतदेह इकडे-तिकडे पडलेले आम्हाला दिसले.” पुढे तो म्हणतो: “त्या वेळी मी फक्त १२ वर्षांचा होतो. चालून-चालून माझे पाय इतके सुजले होते की मी माझ्या घरच्यांना, मला तिथंच सोडून पुढं जायला सांगितलं. पण काहीही झालं तरी माझे वडील मला त्या बंडखोर सैनिकांच्या हाती पडू देणार नव्हते. म्हणून त्यांनी मला उचलून घेतलं आणि पुढे चालू लागले. आम्ही यहोवाकडे प्रार्थना करत, त्याच्यावर भरवसा ठेवत आणि कधीकधी वाटेने जाताना फक्त झाडांवरील आंबे खात एकेक दिवस काढत होतो.”—फिलिप्पै. ४:१२, १३.
५ लीजेच्या कुटुंबातील बहुतेक जण संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्वासितांच्या छावण्यांमध्ये अनेक वर्षं राहिले. पण तिथेही बऱ्याच समस्या होत्या. आज विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करणारा लीजे म्हणतो: “या छावण्यांमध्ये राहणाऱ्या अनेकांकडे कोणतंही काम नव्हतं. बरेच जण आपला वेळ गप्पा मारण्यात, जुगार खेळण्यात व दारू पिण्यात घालवायचे. तसंच, काही जण चोऱ्या-माऱ्या करण्यात आणि अनैतिक कामांतही गुंतलेले होते.” या सर्व वाईट प्रभावांपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी साक्षीदारांना मंडळीच्या कार्यांत व्यस्त राहण्याची गरज होती. (इब्री ६:११, १२; १०:२४, २५) या साक्षीदारांनी स्वतःला विश्वासात मजबूत ठेवण्यासाठी आपल्या वेळेचा सदुपयोग केला. अनेकांनी पायनियर सेवादेखील सुरू केली. साक्षीदारांनी स्वतःला या गोष्टीची आठवण करून दिली, की ओसाड प्रदेशात इस्राएली लोकांना घालवावे लागणारे दिवस जसे संपले, तसे छावण्यांमध्ये आपल्याला घालवावे लागणारे दिवसही कधी ना कधी संपतील. या गोष्टीमुळे त्यांना सकारात्मक मनोवृत्ती बाळगण्यास मदत मिळाली.—२ करिंथ. ४:१८.
निर्वासितांना आपलं ख्रिस्ती प्रेम दाखवा
६, ७. (क) ‘देवावरील प्रेम’ आपल्याला काय करण्यास प्रवृत्त करतं? (ख) उदाहरण द्या.
६ ‘देवावरील प्रेम’ आपल्याला आपल्या बांधवांना प्रेम दाखवण्यास प्रवृत्त करतं; खासकरून जेव्हा ते समस्यांचा सामना करत असतात तेव्हा. (१ योहान ३:१७, १८ वाचा.) उदाहरणार्थ, पहिल्या शतकात दुष्काळामुळं यहुदातील ख्रिश्चनांना खाण्यापिण्याच्या गोष्टींची गरज पडली, तेव्हा इतर मंडळ्यांनी त्यांच्यासाठी मदत पुरवण्याची व्यवस्था केली. (प्रे. कार्ये ११:२८, २९) प्रेषित पौल आणि पेत्र यांनीही खऱ्या ख्रिश्चनांना एकमेकांचा पाहुणचार करण्याचं प्रोत्साहन दिलं. (रोम. १२:१३; १ पेत्र ४:९) बायबलमध्ये ख्रिश्चनांना जर आपल्या बांधवांचा पाहुणचार करण्याचं प्रोत्साहन दिलं गेलं आहे, तर मग ज्या आपल्या बांधवांचा जीव धोक्यात आहे आणि विश्वासामुळे ज्यांचा छळ होत आहे अशांचा आपण अधिक पाहुणचार करू नये का? *—नीतिसूत्रे ३:२७ वाचा.
७ काही दिवसांपूर्वी पूर्व युक्रेनमध्ये झालेल्या युद्धामुळे व छळामुळे, हजारो साक्षीदारांना आपलं घरदार आणि सर्वकाही सोडून पळावं लागलं. दुःखाची गोष्ट म्हणजे काहींना आपला जीवही गमवावा लागला. पण पळून आलेल्या इतर बऱ्याच साक्षीदारांना, रशियातील आणि युक्रेनच्या इतर भागांतील बंधुभगिनींनी आपल्या घरात आश्रय दिला. या युद्धात दोन्ही देशांतील आपल्या बांधवांनी दाखवून दिलं, की ते या ‘जगाचा भाग नाहीत.’ त्यांनी आपली ख्रिस्ती तटस्थता राखली आणि ते मोठ्या आवेशानं “आनंदाचा संदेश” सांगत राहिले.—योहा. १५:१९; प्रे. कार्ये ८:४.
निर्वासित साक्षीदारांना विश्वास मजबूत करण्यास मदत करा
८, ९. (क) नवीन देशात निर्वासितांना कोणत्या काही समस्यांचा सामना करावा लागतो? (ख) त्यांना आपण धीराने मदत करण्याची गरज का आहे?
८ काही निर्वासितांना त्यांच्याच देशात इतर ठिकाणी जाऊन राहावं लागतं; तर अनेकांना त्यांचा देश सोडून दुसऱ्या देशात जाऊन राहावं लागतं. सरकार कदाचित त्यांच्या अन्नाची, कपड्यांची आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करेल. पण निर्वासितांना आणखीनही बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, कदाचित त्यांना मिळत असलेलं अन्न हे त्यांच्या देशातील अन्नापेक्षा फार वेगळं असेल. किंवा काही निर्वासित उष्ण हवामान असलेल्या देशांतून आलेले असतील, त्यामुळे त्यांना थंड प्रदेशात कशा प्रकारचे कपडे वापरावेत हे माहीत नसेल. तर काहींसाठी, घरात सहसा वापरली जाणारी उपकरणं नवीन असल्यामुळे, ती कशी वापरावीत हे माहीत नसेल.
९ निर्वासितांना नवीन वातावरणाशी आणि संस्कृतीशी जुळवून घेता यावं म्हणून काही सरकारे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवतात. पण काही महिन्यांनंतर निर्वासितांनी स्वतः आपल्या गरजा भागवाव्यात अशी अपेक्षाही सहसा केली जाते. अनेकांसाठी हे एक मोठं आव्हान ठरू शकतं. विचार करा, नवीन भाषा, नवीन संस्कृती, तसंच बिल किंवा टॅक्स भरणं, शाळेतील हजेरी आणि मुलांना शिस्त लावणं यांबद्दलचे कायदेकानून जाणून घेणं, या सर्व गोष्टी एकाच वेळी शिकणं किती अवघड असू शकतं! आणि निर्वासितांनी या सर्व गोष्टी लवकरात लवकर शिकून घ्यावात अशी अपेक्षा केली जाते. निर्वासित झालेल्या आपल्या बंधुभगिनींना अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तर मग, तुम्ही त्यांना धीराने आणि आदराने या गोष्टी शिकण्यास मदत करू शकता का?—फिलिप्पै. २:३, ४.
१०. आपल्या देशात जेव्हा निर्वासित झालेले बंधुभगिनी येतात, तेव्हा यहोवावरील त्यांचा विश्वास मजबूत करण्यास आपण काय करू शकतो? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
१० निर्वासित असलेल्या आपल्या बांधवांनी स्थानिक मंडळीशी संपर्क साधू नये, म्हणून काही वेळा सरकारी अधिकाऱ्यांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही वेळा, ख्रिस्ती संभांच्या उपस्थितीच्या आड येणाऱ्या नोकऱ्या स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे, आपल्या बांधवांना कोणत्याही प्रकारची मदत पुरवली जाणार नाही किंवा देशात त्यांना आश्रय दिला जाणार नाही अशी धमकीही काही अधिकाऱ्यांनी दिली आहे. अशा धमक्यांना घाबरून काही बांधवांनी त्या नोकऱ्या स्वीकारल्या आहेत. म्हणूनच निर्वासित झालेले आपले बंधुभगिनी आपल्या देशात येतात, तेव्हा त्यांना शक्य तितक्या लवकर भेटण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. यामुळे आपल्याला त्यांची काळजी आहे हे त्यांना जाणवेल. अशा प्रकारे दाखवलेली काळजी आणि दिलेली व्यावहारिक मदत यांमुळे त्यांना आपला विश्वास मजबूत ठेवण्यास मदत मिळेल.—नीति. १२:२५; १७:१७.
निर्वासितांना व्यावहारिक मदत पुरवा
११. (क) सुरुवातीला निर्वासितांना कोणत्या काही गोष्टींची गरज असते? (ख) मिळालेल्या मदतीची आपल्याला कदर आहे, हे निर्वासित बंधुभगिनी कसं दाखवू शकतात?
११ व्यावहारिक मदत पुरवताना, सुरुवातीला आपल्याला कदाचित आपल्या बांधवांना खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे किंवा इतर काही गरजेच्या गोष्टी पुरवाव्या लागतील. * अगदी लहानसहान मार्गांनीही आपण त्यांना मदत करू शकतो; जसं की संभांमध्ये वापरण्यासाठी एखाद्या बांधवाला दिलेला टाय, ही त्याच्यासाठी फार मोठी मदत ठरू शकते. अर्थात, इतरांनी आपल्याला मदत केलीच पाहिजे, अशी अपेक्षा निर्वासित बांधव कधीही करणार नाहीत. त्याऐवजी, मिळालेल्या मदतीसाठी जेव्हा ते आपली कदर दाखवतात, तेव्हा मदत करणाऱ्या बांधवानाही आनंद मिळतो. तसंच, नेहमीच इतरांवर अवलंबून न राहता, निर्वासित बांधवांनी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचा स्वाभिमान आणि इतरांसोबत चांगले नातेसंबंध टिकवून ठेवता येतात. (२ थेस्सलनी. ३:७-१०) असं असलं, तरी आपल्या निर्वासित बांधवांना पुढेही आपल्या मदतीची गरज असू शकते.
१२, १३. (क) निर्वासित बांधवांना आपण कोणत्या काही व्यावहारिक मार्गांनी मदत करू शकतो? (ख) उदाहरण द्या.
१२ निर्वासितांना मदत करण्यासाठी आपल्याकडे भरपूर पैसा असण्याची गरज नाही. कारण त्यांना खरंतर आपल्या प्रेमाची, आपलेपणाची आणि वेळेची जास्त गरज असते. उदाहरणार्थ, तुम्ही त्यांना तुमच्या क्षेत्रात बस, लोकल ट्रेन इत्यादी सार्वजनिक वाहनांतून प्रवास कसा करावा याची माहिती देऊ शकता. तसंच, आरोग्यासाठी चांगल्या असलेल्या खाण्यापिण्याच्या वस्तू कमी दरात कशा खरेदी करता येतील, याचीही माहिती तुम्ही त्यांना देऊ शकता. स्वतःचा खर्च भागवता यावा म्हणून तुम्ही त्यांना काही काम शिकवू शकता; किंवा त्यासाठी लागणारी उपकरणं, जसं की
शिलाई मशीन वगैरे, खरेदी करण्यासाठी मार्गदर्शन देऊ शकता. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यांना तुमच्या मंडळीचा एक भाग बनण्यासाठी तुम्ही मदत करू शकता. शक्य असल्यास मंडळीच्या सभांना येण्या-जाण्यासही तुम्ही त्यांना साहाय्य करू शकता. यासोबतच, ते तुमच्या क्षेत्रात कशा प्रकारे परिणामकारक रितीने प्रचार करू शकतात हे तुम्ही त्यांना सांगू शकता. शिवाय, तुम्ही स्वतःदेखील त्यांच्यासोबत प्रचार कार्याला जाऊ शकता.१३ एका मंडळीत जेव्हा चार निर्वासित तरुण आले, तेव्हा तिथल्या मंडळीतील वडिलांनी त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी व्यावहारिक मदत पुरवली. वडिलांनी त्यांना कार कशी चालवायची, कॉम्प्युटरवर आपला बायो-डेटा कसा टाईप करायचा आणि नोकरीसाठी अर्ज कसा पाठवायचा हे शिकवलं. तसंच, यहोवाच्या सेवेला जीवनात प्रथम स्थान देता यावं, यासाठी वडिलांनी त्यांना वेळेचं नियोजन करण्यासही शिकवलं. (गलती. ६:१०) मग याचा परिणाम काय झाला? काही काळातच ते चारही तरुण पायनियर बनले. मंडळीतील वडिलांनी केलेल्या मदतीमुळे आणि आध्यात्मिक ध्येय गाठण्यासाठी त्यांनी स्वतः केलेल्या प्रयत्नांमुळे, त्यांना चांगले ख्रिस्ती बनण्यास आणि सैतानाच्या जगापासून दूर राहण्यास मदत मिळाली.
१४. (क) निर्वासित बांधवांनी कोणत्या प्रकारच्या मोहांचा प्रतिकार करणं गरजेचं आहे? (ख) याचं एक उदाहरण द्या.
१४ इतर ख्रिश्चनांप्रमाणेच निर्वासित बांधवांनाही, यहोवाच्या सेवेला जीवनात प्रथम स्थानी ठेवण्यास आणि भौतिक गोष्टींच्या मोहाचा प्रतिकार करण्यास प्रयत्न करावे लागतात. * या लेखात आधी उल्लेख केलेला लीजे आणि त्याची भावंडं यांना आठवतं, की पळून जात असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना विश्वासाबद्दल एक महत्त्वाचा धडा शिकवला होता. ते म्हणतात: “आम्ही सोबत घेतलेल्या सर्व अनावश्यक वस्तू आमच्या वडिलांनी एकेक करून फेकून दिल्या. शेवटी रिकामी बॅग हातात धरून ते म्हणाले, ‘पाहिलंत, खरंतर आपल्याला या गोष्टींची गरजच नव्हती!’”—१ तीमथ्य ६:८ वाचा.
निर्वासितांची सर्वात महत्त्वाची गरज
१५, १६. (क) आपण निर्वासित बांधवांना आध्यात्मिक आणि भावनिक रीत्या कशी मदत करू शकतो?
१५ निर्वासितांना अन्न आणि कपडे अशा भौतिक गोष्टींव्यतिरिक्त इतर गोष्टींचीही गरज असते. त्यांना भावनिक आधाराची आणि बायबलमधून मिळणाऱ्या प्रोत्साहानाची गरज असते. (मत्त. ४:४) यासाठी मंडळीतील वडील निर्वासितांसाठी त्यांच्या भाषेतील प्रकाशनं मागवू शकतात. तसंच, त्यांची भाषा बोलणाऱ्या एखाद्या बांधवाशी संपर्क साधण्यासाठीही ते त्यांना मदत करू शकतात. अनेक निर्वासितांना त्यांचं सर्वकाही मागे सोडून द्यावं लागलेलं असतं. त्यांना त्यांचं कुटुंब, मित्रपरिवार आणि मंडळी मागे सोडावी लागलेली असते. त्यामुळे ख्रिस्ती मंडळीमध्ये त्यांना यहोवाची काळजी आणि प्रेम जाणवलं पाहिजे. कारण, जर अशा प्रकारचं प्रेम आणि आपलेपणा त्यांना मंडळीत मिळाला नाही, तर त्यासाठी यहोवाचे सेवक नसलेल्या लोकांकडे किंवा त्यांच्याच देशातील इतर निर्वासितांकडे ते वळतील. (१ करिंथ. १५:३३) आपण जेव्हा निर्वासित बांधवांना या गोष्टीची जाणीव करून देतो की तेदेखील मंडळीचाच एक भाग आहेत, तेव्हा खरंतर आपण ‘विदेशी लोकाचं’ रक्षण करण्याच्या कार्यात यहोवासोबत काम करत असतो.—स्तो. १४६:९.
१६ येशूला आणि त्याच्या कुटुंबाला ज्यांपासून धोका होता, ते लोक जोपर्यंत सत्तेवर होते तोपर्यंत येशू आणि त्याचं कुटुंब आपल्या मायदेशी परत जाऊ शकत नव्हते. अशाच काही कारणांमुळे निर्वासितांनाही आपल्या मायदेशी परत जाणं शक्य नसतं. तर, काही असेही असतात ज्यांना मायदेशी परतण्याची इच्छा नसते. याविषयी बोलताना लीजे म्हणतो, की ‘निर्वासितांपैकी अनेकांनी त्यांच्या मायदेशात कुटुंबातील सदस्यांवर बलात्कार झाल्याचं किंवा त्यांचा खून झाल्याचं पाहिलं आहे. त्यामुळे आपल्या मुलांना त्या देशात परत घेऊन जाण्याची त्यांची इच्छा नाही.’ निर्वासित झालेल्या आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी आपण त्यांच्याशी वागताना “सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा व नम्रता” दाखवली पाहिजे. (१ पेत्र ३:८) छळ सोसल्यामुळे निर्वासित झालेले अनेक जण इतरांमध्ये सहज मिसळत नाहीत. तसंच, सोसलेल्या छळाबद्दल त्यांना इतरांशी बोलायला, विशेषकरून आपल्या मुलांसमोर बोलायला संकोच वाटू शकतो. स्वतःला विचारा: ‘मला जर अशा दुःखद परिस्थितीतून जावं लागलं असतं, तर इतरांनी माझ्याशी कसं वागावं अशी अपेक्षा मी केली असती?’—मत्त. ७:१२.
साक्षीदार नसलेल्या निर्वासितांना प्रचार करताना
१७. आपल्या प्रचार कार्यामुळे निर्वासितांना कसा फायदा होत आहे?
१७ निर्वासितांपैकी अनेक जण जगातील अशा भागांतून आलेले असतात जिथं आपल्या कार्यांवर बंदी आहे. पण आज अनेक आवेशी साक्षीदारांमुळे हजारो निर्वासितांना पहिल्यांदाच “राज्याचं वचन” ऐकण्याची संधी मिळत आहे. (मत्त. १३:१९, २३) तसंच “ओझ्याने दबलेल्या” अनेकांना आपल्या राज्य सभागृहात सांत्वन व दिलासा मिळत असल्यामुळे, “देव खरोखर तुमच्यामध्ये आहे” असं म्हणण्यासही ते प्रवृत्त होत आहेत.—मत्त. ११:२८-३०; १ करिंथ. १४:२५.
१८, १९. निर्वासितांना प्रचार करताना आपण सावध व चतुर असणं गरजेचं का आहे, समजावून सांगा?
१८ निर्वासितांना प्रचार केल्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळत असले, तरी प्रचार करताना आपण सावध व “चतुर” असणंही गरजेचं आहे. (मत्त. १०:१६; नीति. २२:३) त्यांच्याशी संभाषण करताना त्यांचं म्हणणं धीराने ऐका, पण राजनैतिक विषयांवर चर्चा करण्याचं टाळा. आपल्या शाखा कार्यालयातून तसंच स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या सूचनांचं पालन करा. यामुळे तुम्ही स्वतःला आणि इतरांना कोणत्याही प्रकारच्या धोक्यात घालणार नाही. निर्वासित झालेल्यांची धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगवेगळी असते. त्यामुळे आपण त्यांच्या भावना आणि मतं समजून त्यांचा आदर केला पाहिजे. उदाहरणार्थ, स्त्रियांनी कशा प्रकारे पेहराव करावा, याबद्दल काही देशांतील लोकांचं फार ठाम मत आहे. म्हणून त्यांना प्रचार करताना त्यांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशा प्रकारचा पेहराव करणं नेहमी योग्य ठरेल.
१९ खरंतर, त्रासात आणि दुःखात असलेल्या लोकांना मदत करण्याची आपली इच्छा आहे; मग ते यहोवाचे सेवक नसले तरीही. आपण असं करतो, तेव्हा येशूने सांगितलेल्या उदाहरणातील चागंल्या शोमरोनी व्यक्तीचं आपण अनुकरण करत असतो. (लूक १०:३३-३७) लोकांना मदत करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे, त्यांना आनंदाचा संदेश सांगणं. अनेक निर्वासितांना मदत केलेले मंडळीतील एक वडील असं म्हणतात, की आपण यहोवाचे साक्षीदार आहोत हे सुरुवातीलाच त्यांना सांगणं फार महत्त्वाचं आहे. तसंच, आपला प्राथमिक उद्देश त्यांना भौतिक गोष्टींची मदत करण्याचा नसून बायबलमधील आशेचा संदेश समजावण्याचा आहे, हेही आपण त्यांना सांगितलं पाहिजे.
चांगले परिणाम
२०, २१. (क) निर्वासितांना ख्रिस्ती प्रेम दाखवल्याने कोणते चांगले परिणाम पाहायला मिळतात? (ख) पुढील लेखात आपण कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत?
२० आपण ‘विदेशी लोकांना’ ख्रिस्ती प्रेम दाखवतो, तेव्हा त्याचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. एरिट्रियातील आपल्या एका बहिणीचं उदाहरण लक्षात घ्या. एरिट्रियामध्ये छळ सुरू झाला तेव्हा तिच्या कुटुंबाला त्या देशातून पळून जावं लागलं. तिची चार मुलं ओसाड प्रदेशातून आठ दिवस अतिशय खडतर प्रवास करत सुदान या देशात पोहचली. ती म्हणते, “तिथल्या बांधवांनी स्वतःच्या घरच्या लोकांप्रमाणेच त्यांची काळजी घेतली. त्यांनी त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे आणि राहण्यासाठी जागा दिली; तसंच प्रवासासाठी खर्चही दिला.” पुढे ही बहीण म्हणते: “असे कोण आहेत, जे फक्त आपण सारख्याच देवाची उपासना करत असल्यामुळे, परक्यांना आपल्या घरात आश्रय देतील? असं फक्त यहोवाचे साक्षीदारच करतात.”—योहान १३:३५ वाचा.
२१ पण, निर्वासितांसोबत तसंच स्थलांतर केलेल्या लोकांसोबत आलेल्या त्यांच्या मुलांबद्दल काय? त्यांनाही आनंदाने यहोवाची सेवा करण्यासाठी आपण कशी मदत करू शकतो, याविषयी आपण पुढील लेखात पाहू.
^ परि. 2 या लेखात “निर्वासित” असा जो शब्द वापरण्यात आला आहे, तो अशा लोकांना सूचित करतो ज्यांना युद्धामुळे, छळामुळे किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपलं घरदार सोडावं लागलं आहे. असे लोक नाईलाजाने एखाद्या परक्या देशात किंवा त्यांच्याच देशातील इतर भागात निर्वासित म्हणून राहतात. संयुक्त राष्ट्रसंघाचे निर्वासितविषयक उच्चायुक्त (UNHCR) असे म्हणते, की जगातील ११३ व्यक्तींपैकी एका व्यक्तीला आपलं घर सोडून निर्वासित व्हावं लागतं.
^ परि. 6 टेहळणी बुरूज ऑक्टोबर २०१६ मधील पृष्ठे ८-१२ वरील “विदेशी लोकांवर दया दाखवा” हा लेख पाहा.
^ परि. 11 आपल्या क्षेत्रात निर्वासित व्यक्ती येते, तेव्हा मंडळीतील वडिलांनी “यहोवा की इच्छा पूरी करने के लिए संगठित” या पुस्तकातील अध्याय ८, पृ. ८७ वरील उपशीर्षक “कलीसिया प्रचारक रिकॉर्ड कार्ड” मध्ये दिलेल्या सूचनांनुसार करावे. निर्वासित व्यक्तीच्या मंडळीशी संपर्क साधण्याकरता, मंडळीतील वडील त्यांच्या स्वतःच्या शाखा कार्यालयाला jw.org या आपल्या वेबसाईटचा वापर करून लिहू शकतात. शाखा कार्यालयाकडून उत्तर मिळेपर्यंत वडील निर्वासित व्यक्तीच्या भावना न दुखावता तिला तिच्या मंडळीविषयी आणि सेवाकार्याविषयी प्रश्न विचारू शकतात.
^ परि. 14 १५ एप्रिल २०१४ टेहळणी बुरूज अंकातील पृ. १७-२६ वरील “कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही” आणि “कसलीही शंका व भीती बाळगू नका—यहोवा आपला साहाय्यक आहे!” हे लेख पाहा.