तरुणांनो, आपला विश्वास मजबूत करा
“विश्वास हा . . . न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खातरी आहे.”—इब्री ११:१.
१, २. तरुणांना कोणता प्रश्न पडू शकतो, आणि त्यांना कशामुळे मदत होऊ शकते?
ब्रिटनमधील एका तरुण बहिणीला तिच्या वर्गसोबतीने म्हटलं: “तू देवावर विश्वास ठेवतेस! हा तर मूर्खपणा झाला.” जर्मनीमधील एक बांधव लिहितो: “आमच्या शाळेतील शिक्षकांना वाटतं बायबलमध्ये सृष्टीच्या निर्मितीबद्दल जे सांगितलं आहे, ती फक्त एक कहाणी आहे. आणि सर्व विद्यार्थी उत्क्रांतिवादावरच विश्वास ठेवत असतील असा ते विचार करतात.” फ्रांसमधील आपली एक तरुण बहीण म्हणते: “जेव्हा आमच्या शाळेतील शिक्षकांना समजलं की काही विद्यार्थी आजही बायबलवर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटलं.”
२ देवाने आपल्याला निर्माण केलं आहे, यावर अनेक जण विश्वास ठेवत नाहीत. जर तुम्ही तरुण आहात व यहोवाचे सेवक आहात किंवा त्याच्याबद्दल शिकत आहात, तर तुम्हालाही अनेकदा असा प्रश्न पडला असेल की, ‘यहोवा देवानेच सर्व काही निर्माण केलं आहे हे इतरांना कसं पटवून द्यावं?’ आपण जे शिकतो, ऐकतो किंवा वाचतो त्यावर विचार करण्यासाठी आणि तर्क करण्यासाठी बायबल आपल्याला मदत करतं. देवाचं वचन म्हणतं: “विवेक तुझे रक्षण करेल.” या वचनात ‘विवेक’ या शब्दासाठी मूळ इब्री भाषेत जो शब्द वापरण्यात आला आहे त्याचा अर्थ ‘विचार करण्याची क्षमता’ असा होतो. मग बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे विचार करण्याची क्षमता आपलं संरक्षण कशी करू शकते? या क्षमतेमुळे आपल्याला खोट्या शिकवणींना बाजूला सारून देवावरील आपला विश्वास आणखी मजबूत करण्यास मदत मिळते.—नीतिसूत्रे २:१०-१२ वाचा.
३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?
३ पण यहोवावरचा आपला विश्वास मजबूत होण्यासाठी, आपण त्याच्याविषयी आणखी १ तीम. २:४) यासाठी जेव्हा तुम्ही बायबल किंवा आपली प्रकाशनं वाचता, तेव्हा थोडं थांबून वाचलेल्या गोष्टींवर विचार करणं फार गरजेचं आहे. तुम्ही जे वाचत आहात ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. (मत्त. १३:२३) जेव्हा तुम्ही अशा प्रकारे अभ्यास कराल तेव्हा यहोवाच निर्माणकर्ता असल्याचा आणि बायबल हे देवाचं वचन असल्याचे भरपूर पुरावे तुम्हाला मिळतील. (इब्री ११:१) तुम्हाला हे कसं करता येईल याबद्दल आपण आता पाहू.
जाणून घेणं महत्त्वाचं आहे. (तुम्ही तुमचा विश्वास मजबूत कसा करू शकता?
४. उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्यांमध्ये कोणतं साम्य आहे? आणि आपण काय करण्याची गरज आहे?
४ कदाचित तुम्हाला कोणी असं म्हणेल, “मी उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवतो, कारण शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की उत्क्रांतिवाद खरा आहे. पण तू देवावर कसा विश्वास ठेवू शकतो? कारण, देवाला तर कोणीही बघितलेलं नाही.” आज बरेच लोक असा विचार करतात. हे खरं आहे की आपल्यापैकी कोणीही देवाला पाहिलेलं नाही किंवा एखाद्या गोष्टीची निर्मिती होताना पाहिलेली नाही. (योहा. १:१८) पण हीच गोष्ट उत्क्रांतिवादावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या बाबतीतदेखील खरी नाही का? तेदेखील अशा एका गोष्टीवर विश्वास ठेवतात, जी घडताना त्यांनी कधीही पाहिलेली नाही. आजवर असा एकही शास्त्रज्ञ किंवा माणूस नाही, ज्याने स्वतः एक सजीव उत्क्रांती होऊन दुसऱ्या प्रकारच्या सजीवामध्ये रूपांतरित होताना पाहिला आहे. उदाहरणार्थ, कोणी सापासारख्या सरपटणाऱ्या प्राण्याला कधी हत्ती किंवा सिंह बनताना पाहिलं आहे का? नाही. (ईयो. ३८:१, ४) म्हणून आपण पुराव्यांना पडताळून पाहणं आणि त्यांवर खोल विचार करणं गरजेचं आहे. अनेकांनी सृष्टीतील गोष्टींचं बारकाईनं परीक्षण केलं आणि ते या निष्कर्षावर पोहचले की या सृष्टीचा कोणी एक निर्माणकर्ता आहे. त्यांना या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव झाली की त्याने या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत, तो फार सामर्थ्यशाली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक चांगले गुणदेखील आहेत.—रोम. १:२०.
५. सृष्टीतील निर्मित गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्याकडे कोणकोणतं साहित्यं उपलब्ध आहे?
५ जेव्हा आपण सृष्टीतील गोष्टींकडे पाहतो आणि त्यांवर विचार करतो, तेव्हा आपल्याला कळून येतं की या सगळ्या गोष्टींची रचना फार विलक्षण व अद्भुत रीतीने करण्यात आली आहे. आपल्याला जरी दिसत नसला तरी या विश्वाचा कोणी एक निर्माता आहे, हे “विश्वासाने आपल्याला कळते.” आपल्याला हेदेखील जाणवतं की त्याच्याकडे अफाट बुद्धी आहे आणि त्याचं व्यक्तिमत्त्व फार सुंदर आहे. (इब्री ११:३, २७) शास्त्रज्ञांनी लावलेल्या वेगवेगळ्या शोधांबद्दल वाचून निर्माणकर्त्याने बनवलेल्या या सृष्टीबद्दल आपण अधिक जाणून घेऊ शकतो. यांपैकी काही माहिती आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या काही प्रकाशनांद्वारे देखील मिळवू शकतो. जसं की, द वंडर्स ऑफ क्रियेशन रिविल्स गॉड्स ग्लोरी या व्हिडिओद्वारे, वॉज लाईफ क्रियेटेड? आणि जीवन की शुरूआत पाँच सवाल—जवाब पाना ज़रूरी या माहितीपत्रकांद्वारे किंवा इज देअर अ क्रियेटर हू केअर्स अबाऊट यू? या पुस्तकाद्वारे. तसंच, सावध राहा! या आपल्या नियतकालिकातदेखील अनेकदा शास्त्रज्ञांच्या आणि इतरांच्या मुलाखती छापून येतात. ते देवावर का विश्वास ठेवू लागले हे या मुलाखतींमध्ये सांगण्यात येतं. यासोबतच त्यातील “उत्क्रांती की निर्मिती?” या लेखमालेत वेगवेगळ्या प्राण्यांविषयी आणि निसर्गात आढळणाऱ्या गोष्टींविषयी माहिती दिली जाते. आणि निसर्गात आढळणाऱ्या गोष्टींपासून प्रेरित होऊन शास्त्रज्ञांनी कोणते शोध लावले त्याबद्दलही सांगितलं जातं.
६. आपल्या प्रकाशनांमधील माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो?
६ वर सांगितलेल्या दोन माहितीपत्रकांबाबत अमेरिकेत राहणारा १९ वर्षांचा एक बांधव म्हणतो: “या माहितीपत्रकांतील माहितीचा मला खूप फायदा झाला आहे. मी ती अनेकदा वाचून काढली आहे.” फ्रांन्समधील एक बहीण म्हणते: “सावध राहा! मधील ‘उत्क्रांती की निर्मिती?’ ही लेखमाला मला फार आवडते. त्यातील लेखांवरून हे स्पष्ट होतं की आजच्या काळातील मोठमोठे इंजिनिअर्स जरी निसर्गातील गोष्टींच्या रचनेपासून प्रेरित होऊन वस्तु बनवत असले, तरी ते त्याची बरोबरी कधीही करू शकणार नाहीत.” दक्षिण आफ्रिकेमध्ये राहणारं एक जोडपं ज्यांना १५ वर्षांची मुलगी आहे, असं म्हणतं: “आमच्या मुलीला सावध राहा! या मासिकांत सहसा सगळ्यात पहिलं काही वाचायला आवडत असेल तर ते म्हणजे त्यातील मुलाखती.” या बंधुभगिनींप्रमाणेच ही प्रकाशनं तुम्हालादेखील या गोष्टीचा पुरावा देतील की, या सृष्टीचा एक निर्माणकर्ता आहे आणि खोट्या शिकवणींना बाजूला सारण्यास ती तुम्हाला मदत करतील. यामुळे तुमचा विश्वास इतका मजबूत होईल की तुम्ही अशा एका झाडाप्रमाणे व्हाल, ज्याची मूळं जमिनीत खोलवर रुजलेली असतात आणि मोठ्या वादळातही जे स्थिर राहतं.—यिर्म. १७:५-८.
बायबलवरील तुमचा विश्वास
७. तुम्ही सर्व गोष्टींची चांगली पारख करावी अशी अपेक्षा यहोवा का करतो?
७ कोणी म्हणेल, “बायबलमध्ये जे सांगितलं आहे त्यावर मी का विश्वास ठेवू?” मग अशा प्रकारचे प्रश्न विचारणं चुकीचं आहे का? नक्कीच नाही. कारण, फक्त दुसरे विश्वास ठेवतात म्हणून तुम्हीदेखील विश्वास ठेवावा अशी यहोवा देव अपेक्षा करत नाही. बायबल हे देवाकडूनच आहे यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही “सर्व गोष्टींची पारख” करावी, अशी त्याची इच्छा आहे. बायबलविषयी जितकी जास्त माहिती तुम्हाला मिळेल, तितकाच त्यावरचा तुमचा विश्वास आणखी मजबूत होईल. (१ थेस्सलनीकाकर ५:२१; १ तीमथ्य २:४ वाचा.) बायबलविषयी आणखी जास्त माहिती मिळवण्याचा एक मार्ग म्हणजे तुम्हाला त्यातील जो विषय आवडतो त्याचा चांगला अभ्यास करणं.
८, ९. (क) काहींना बायबलमधील कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायला आवडतं? (ख) अभ्यास केलेल्या गोष्टीवर मनन केल्याने काहींना कसा फायदा झाला आहे?
८ काहींना बायबलमधील भविष्यवाण्यांचा अभ्यास करायला आवडतं. किंवा बायबलमधील अहवाल इतिहासकारांच्या, शास्त्रज्ञांच्या किंवा पुरातत्व शास्त्रज्ञांच्या लिखाणांशी कसे जुळतात याचं परीक्षण करायला आवडतं. उत्पत्ति ३:१५ मधील भविष्यवाणीचं उदाहरण घ्या. आदाम आणि हव्वेने केलेल्या बंडानंतर लगेचच यहोवाने ही भविष्यवाणी केली. बायबलमधील पहिल्या काही महत्त्वाच्या भविष्यवाण्यांपैकी ही एक भविष्यवाणी आहे. या भविष्यवाणीमुळे आपल्याला हे समजण्यास मदत होते की, देवाच्या राज्यामुळेच मानवजातीच्या समस्या पूर्णपणे नाहीशा होतील आणि हे सिद्ध होईल की मानवांवर राज्य करण्याचा अधिकार फक्त यहोवालाच आहे. मग, उत्पत्ति ३:१५ या वचनातील भविष्यवाणीचा तुम्ही कशा प्रकारे अभ्यास करू शकता? यासाठी तुम्ही बायबलच्या अशा काही वचनांची यादी तयार करू शकता, ज्यांमध्ये ही भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण होईल याबद्दलची अधिक माहिती सापडते. त्यानंतर तुम्ही बायबलमधील ही सगळी वचनं कोणत्या काळात लिहिण्यात आली ते शोधू शकता. आणि ती वचनं ज्या काळात लिहिली गेली त्या काळाप्रमाणे मांडू शकता. असं केल्याने तुम्हाला हे दिसून येईल की, बायबलचं लिखाण केलेले लेखक वेगवेगळ्या काळात जरी जीवन जगले असले, तरी त्या प्रत्येकाने जी माहिती लिहिली त्यावरून ही भविष्यवाणी अधिकच स्पष्ट होत गेली. अशा प्रकारे अभ्यास केल्यानं तुम्हाला हे सिद्ध करण्यास मदत मिळेल की, यहोवाच्या पवित्र आत्म्यानेच या लेखकांना बायबल लिहिण्यास प्रेरित केलं होतं.—२ पेत्र १:२१.
९ बायबलमधील वेगवेगळ्या पुस्तकांत देवाच्या राज्याबद्दल असलेल्या माहितीमध्ये जी सुसंगतता आढळते त्याचं जर्मनीतील एका बांधवाने परीक्षण केलं. तो म्हणतो: “जवळजवळ ४० वेगवेगळ्या लोकांनी बायबलमधील पुस्तकं लिहिली आहेत. आणि त्यांपैकी अनेक जण वेगवेगळ्या काळात जगत होते व त्यांची एकमेकांशी ओळखदेखील नव्हती. तरीदेखील बायबलमध्ये सुसंगतता दिसून येते.” ऑस्ट्रेलियातील एका बहिणीनं १५ डिसेंबर २०१३ च्या टेहळणी बुरूजमधील एका लेखाचा सखोल अभ्यास केला. वल्हांडणाच्या सणाचा, मसीहा आणि उत्पत्ति ३:१५ यांच्याशी कसा संबंध आहे हे तिने पाहिलं. ती म्हणते: “या अभ्यासामुळे मला खोल समज मिळाली. खरंच यहोवा किती अद्भुत रीत्या कार्य करतो. इस्राएली लोकांसाठी अशा प्रकारे तरतूद करणं आणि येशू ख्रिस्ताद्वारे ती तरतूद पूर्णत्वास नेणं, खरंच खूप विलक्षण आहे. या लेखाचा अभ्यास केल्यानंतर जेव्हा वल्हांडणाच्या सणाचा मसीहाशी कसा संबंध आहे याचा मी विचार केला, तेव्हा मी थक्क झाले!” या बहिणीला असं का वाटलं? कारण, ती जे वाचत होती त्यावर तिने खोलवर विचार केला आणि ते समजून घेतलं. यामुळे तिचा विश्वास आणि यहोवासोबतचा तिचा नातेसंबंध आणखी मजबूत झाला.—मत्त. १३:२३.
१०. बायबल लेखकांनी ज्या प्रामाणिकतेनं बायबलचं लिखाण केलं, त्यावरून बायबलवरचा आपला विश्वास आणखी कसा मजबूत होतो?
१० बायबलच्या लेखकांनी ज्या प्रामाणिकतेनं बायबलचं लिखाण केलं त्याचादेखील विचार करा. त्यांनी नेहमी जे सत्य आहे तेच लिहिलं आणि यासाठी कोणाचंही भय बाळगलं नाही. त्या काळातील इतर लेखकांनी सहसा आपल्या देशाबद्दल किंवा आपले राजे व नेते यांच्याबद्दल फक्त चांगल्याच गोष्टी लिहिल्या. पण यहोवाच्या संदेष्ट्यांनी मात्र तसं केलं नाही. त्यांनी त्यांच्या देशातील लोकांनी आणि राजांनी केलेल्या चांगल्या कृत्यांबद्दलच नाही तर त्यांच्या चुकीच्या कामांबद्दलदेखील लिहिलं. (२ इति. १६:९, १०; २४:१८-२२) त्यांनी स्वतःकडून झालेल्या आणि यहोवाच्या इतर सेवकांकडून झालेल्या चुकादेखील नम्रपणे कबूल केल्या. (२ शमु. १२:१-१४; मार्क १४:५०) याबाबतीत बोलताना ब्रिटनमधील एक तरुण बांधव म्हणतो, “अशा प्रकारची प्रामाणिकता फार क्वचितच पाहायला मिळते. आणि यामुळे बायबल हे यहोवाकडूनच आहे यावरचा आपला भरवसा आणखी वाढतो.”
११. बायबलमध्ये जे मार्गदर्शन दिलं आहे त्यावरून बायबल हे देवाकडून आहे याची खात्री आपल्याला कशी पटते?
११ जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या जीवनात बायबलमधील सल्ल्यांचं आणि तत्त्वांचं पालन करू लागते, तेव्हा ती स्वतःच्या जीवनात बरेच चांगले बदल अनुभवते. यामुळे बायबल हे देवाकडून असलेलं पुस्तक आहे याची तिला खात्री पटते. (स्तोत्र १९:७-११ वाचा.) जपानमधील एक तरुण बहीण म्हणते: “जेव्हा मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांनी बायबलमधील शिकवणींना लागू करण्यास सुरवात केली, तेव्हा आम्ही खऱ्या अर्थानं आनंदित झालो. आम्ही खरी शांती, एकता आणि प्रेम अनुभवलं.” बायबलमुळे अनेकांना हे समजण्यास मदत झाली की ते पूर्वी विश्वास ठेवत असलेल्या गोष्टी खऱ्या नाहीत. (स्तो. ११५:३-८) बायबलमुळे लोकांना विश्वाचा निर्माणकर्ता यहोवा, याच्यावर निर्भर राहण्यास मदत झाली आहे. आणि भविष्यामध्ये आपल्याला अनेक आशीर्वाद मिळतील असं वचनदेखील बायबल देतं. दुसरीकडे पाहता, आज जे लोक देवावर विश्वास ठेवण्याऐवजी उत्क्रांतीवर विश्वास ठेवतात, ते एक प्रकारे निसर्गालाच आपला देव बनवतात. इतर काही जण असे आहेत जे, मनुष्यच मानवजातीसाठी एक चांगलं भविष्य देऊ शकतील असा भरवसा बाळगतात. पण आजवरचा इतिहास पाहिल्यास आपल्याला कळून येतं की हे साफ खोटं आहे. मानव एक चांगलं भविष्य देऊ शकत नाहीत, ते जगातील समस्यांचा अंत करू शकत नाहीत.—स्तो. १४६:३, ४.
इतरांसोबत तर्क कसा कराल
१२, १३. इतरांसोबत बायबल किंवा निर्मितीवर चर्चा करताना आपण कसा तर्क करू शकतो?
१२ जेव्हा तुम्ही बायबलवर किंवा निर्मितीवर इतरांसोबत चर्चा करता, तेव्हा प्रथम हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा की समोरच्या व्यक्तीचा काय विश्वास आहे. लक्षात ठेवा, काही लोक असेही आहेत जे उत्क्रांती आणि देव या दोन्ही गोष्टींवर विश्वास ठेवतात. देवाने उत्क्रांतीद्वारे जगाची निर्मिती केली असं ते मानतात. काही जण उत्क्रांतीवर यासाठी विश्वास ठेवतात कारण ती शाळा-कॉलेजात शिकवली जाते. तर काही जण देवावर विश्वास ठेवण्याचं कालांतरानं सोडून देतात, कारण त्यांच्या धर्मामुळे त्यांची निराशा झालेली असते. म्हणून प्रथम हे जाणून घ्या की समोरची व्यक्ती का आणि कशावर विश्वास ठेवते. त्यानंतर तिचं म्हणणं लक्षपूर्वक ऐका. कारण असं केल्याने ती व्यक्तीदेखील कदाचित तुमचं ऐकून घ्यायला तयार होईल.—तीत ३:२.
१३ जर कोणी तुम्हाला म्हटलं की तुम्ही देवावर विश्वास ठेवणारे लोक मूर्ख आहात, तर तुम्ही त्याला कसं उत्तर द्याल? तुम्ही आदरानं त्या व्यक्तीला विचारू शकता की जीवनाची सुरवात कशी झाली याबद्दल त्याचे काय विचार आहेत. तुम्ही त्याच्यासोबत पुढील प्रमाणे तर्क करू शकता. जर उत्क्रांतीने सृष्टीची निर्मिती झाली असती, तर पहिल्या सजीवाला इतर सजीव निर्माण करण्यासाठी काही गोष्टींची आधीच गरज पडली असती. रसायनशास्त्राचे एक प्रोफेसर याविषयी म्हणतात, की पहिल्या सजीवाला आपल्यापासून इतर सजीव निर्माण करण्याआधी पुढील गोष्टींची गरज पडली असती, (१) त्वचेसारखी एखादी गोष्ट जी शरीराचं संरक्षण करू शकेल, (२) निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टींपासून उर्जा मिळवून ती वापरण्याची क्षमता, (३) शरीराची वाढ किती आणि कोणत्या प्रमाणात व्हावी यावर नियंत्रण करण्याची क्षमता, आणि (४) या सर्व माहितीची नक्कल करून साठवण्याची व ती पुढच्या सजीवामध्ये पाठवण्याची क्षमता. पुढे हे प्रोफेसर म्हणतात: “निसर्गात आढळणाऱ्या सर्वात लहान आणि साध्या सजीवांमध्ये देखील जी जटिल प्रक्रिया पाहायला मिळते, त्याने एखादी व्यक्ती विस्मित झाल्याशिवाय राहणार नाही.”
१४. निर्मितीवर चर्चा करताना तुम्ही कसा तर्क करू शकता?
१४ निर्मितीवर चर्चा करताना तुम्ही पौलासारखं साध्या आणि सोप्या भाषेत तर्क करू शकता. पौलाने ज्या उदाहरणाचा उपयोग केला त्याचा तुम्हीदेखील उपयोग करू शकता. पौल म्हणाला: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री ३:४) आपण ज्या घरांमध्ये राहतो त्याची रचना आणि बांधकाम करणारा कोणीतरी असतो. मग निसर्गातील जीवसृष्टी, ज्याची रचना एखाद्या घरापेक्षा कितीतरी पटींनी अधिक जटिल आणि गुंतागुंतीची आहे, त्याला बनवणारादेखील कोणीतरी असेलच, नाही का? तर्क करताना तुम्ही आपल्याकडे उपलब्ध असलेली प्रकाशनंदेखील वापरू शकता. आपली एक बहीण एकदा एका अशा तरुणाला भेटली जो देवावर नाही तर उत्क्रांतीवर विश्वास ठेवत होता. मग तिने त्याला या लेखात आधी उल्लेख करण्यात आलेली दोन माहितीपत्रकं वाचायला दिली. याच्या जवळपास एका आठवड्यानंतर त्या तरुणानं कबूल केलं की, तो आता देवावर विश्वास ठेवू लागला आहे. त्या तरुणानं नंतर यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास सुरू केला आणि बाप्तिस्मादेखील घेतला.
१५, १६. बायबल हे देवाकडून आहे, हे पटवून देण्यापूर्वी तुम्ही काय करणं गरजेचं आहे? आणि आपण कोणती गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे?
१५ बायबलवर विश्वास का ठेवावा, अशी शंका कोणाच्या मनात असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला कशी मदत करू शकता? याआधी सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथम त्या व्यक्तीचे विचार जाणून घ्या, ती काय विश्वास ठेवते हे तिला विचारा. तसंच तिला कोणत्या विषयांमध्ये आवड आहे ते विचारा. (नीति. १८:१३) जर त्या व्यक्तीला विज्ञानात आवड असेल, तर तिला बायबलमधील असे काही अहवाल दाखवा ज्यांवरून बायबल हे वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे हे सिद्ध होईल. जर त्या व्यक्तीला इतिहासात आवड असेल, तर इतिहासात घडलेली एखादी घटना तिला सांगा आणि बायबलमध्ये याविषयी करण्यात आलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली ते समजावून सांगा. काही लोकांना एक आनंदी आणि समाधानी जीवन जगण्याची इच्छा असते. अशा वेळी तुम्ही त्यांना बायबलमधील डोंगरावरील प्रवचनासारखे अहवाल दाखवू शकता, ज्यांत जीवनात लागू करण्यासाठी उपयुक्त सल्ले किंवा तत्त्वं दिली आहेत.
१६ हे नेहमी लक्षात असू द्या की आपल्याला लोकांना सत्याकडे आकर्षित करायचं आहे, त्यांच्यासोबत वादविवाद करायचा नाही. त्यांनी बायबलबद्दल शिकावं आणि आपल्यासोबत आनंदानं या गोष्टींविषयी चर्चा करावी अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे प्रश्न विचारताना आदरानं विचारा आणि त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घ्या. तुम्ही तुमचे विचार मांडत असताना शांतपणे व नम्रपणे मांडा; खासकरून समोरची व्यक्ती तुमच्यापेक्षा वयानं मोठी असते त्या वेळी. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदर देता, तेव्हा ती व्यक्तीदेखील तुमच्याशी आदरानं वागण्याची जास्त शक्यता आहे. आणि त्यांना हेदेखील समजेल की तुम्ही वयानं लहान जरी असला, तरी या गोष्टींवर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवलेला नाही. पण काही लोक असेही असतात जे उगाचच वाद घालतात किंवा तुमची थट्टा करतात. अशा लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्ही बांधील नाही.—नीति. २६:४.
बायबलमधील सत्य शोधा आणि तुमचा विश्वास आणखी मजबूत करा
१७, १८. (क) बायबलवरील तुमचा विश्वास आणखी मजबूत करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते? (ख) पुढील लेखात आपण काय पाहणार आहोत?
१७ आपल्याला कदाचित बायबलच्या मूलभूत शिकवणी माहीत असतील. पण विश्वासात मजबूत राहण्याकरता आपल्याला यापेक्षाही आणखी जास्त करण्याची गरज आहे. आपल्याला बायबलचा आणखी खोलवर अभ्यास करण्याची आणि त्यामध्ये दडलेला सत्याचा खजिना शोधून काढण्याची गरज आहे. (नीति. २:३-६) असं करण्याचा एक मार्ग म्हणजे, संपूर्ण बायबलचं वाचन करणं. कदाचित एका वर्षात पूर्ण बायबल वाचून काढण्याचा तुम्ही निश्चय करू शकता. एका विभागीय पर्यवेक्षकाला त्याच्या तरुणपणी या गोष्टीमुळे यहोवाच्या आणखी जवळ जाण्यास मदत झाली. तो म्हणतो: “बायबलचं वाचन केल्यामुळे मला या गोष्टीची जाणीव आणखी स्पष्टपणे झाली की बायबल हे देवाचंच वचन आहे. आणि त्याबद्दलची माझी कदरदेखील वाढली. लहान असताना मी बायबलमधील ज्या कथा ऐकल्या होत्या, त्या आता आणखी अर्थपूर्ण वाटू लागल्या.” तुम्ही तुमच्या भाषेमध्ये उपलब्ध असलेल्या संशोधन साहित्यांचा वापरदेखील करू शकता. त्यामुळे तुम्ही वाचत असलेल्या अहवालाची आणखी खोलवर समज मिळवण्यास तुम्हाला मदत मिळेल. तुमच्याकडे कदाचित वॉचटॉवर लायब्ररी डीव्हीडी, वॉचटॉवर ऑनलाईन लायब्ररी, वॉचटॉवर पब्लिकेशन इंडेक्स किंवा यहोवाच्या साक्षीदारांसाठी संशोधन मार्गदर्शक ही प्रकाशनं उपलब्ध असतील.
१८ तरुणांना यहोवाविषयी शिकवण्याची खास जबाबदारी त्यांच्या पालकांवर आहे. मग पालक आपल्या मुलांचा विश्वास आणखी मजबूत करण्यासाठी त्यांना कशी मदत करू शकतात? याबद्दल आपण पुढील लेखामध्ये पाहू.