व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“तुझे हात गळू देऊ नको”

“तुझे हात गळू देऊ नको”

“तुझे हात गळू देऊ नको.”—सफ. ३:१६.

गीत क्रमांक: ५४, ३२

१, २. (क) आज अनेकांना कोणत्या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो, आणि त्याचा परिणाम काय होतो? (ख) यशया ४१:१०, १३ या वचनांतून आपल्याला कोणत्या गोष्टीची खात्री मिळते?

मंडळीत वडील म्हणून सेवा करणाऱ्या एका बांधवाची पत्नी, जी स्वतः एक पायनियर आहे असं म्हणते: “मी जीवनात नेहमी आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थानी ठेवते आणि त्याबाबतीत माझा एक चांगला नित्यक्रम आहे. पण असं असलं, तरी कित्येक वर्षांपासून मी चिंतांचादेखील सामना करत आहे. त्यामुळे माझी रात्रीची झोप नाहीशी झाली, माझ्या तब्येतीवर विपरीत परिणाम झाला आणि इतरांसोबतच्या माझ्या वागणुकीवरही फरक पडला. कधीकधी तर मला असं वाटतं, बस आता पुरे झालं, मी अजून सहन करू शकत नाही.”

या बहिणीच्या भावना कदाचित तुम्हीदेखील समजू शकत असाल. कारण, आज आपण सैतानाच्या दुष्ट जगात राहात असल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर दबावांचा सामना करावा लागतो. ज्या प्रकारे एक नांगर होडीला धरून ठेवतो—तिला पुढे जाऊ देत नाही—अगदी त्याच प्रकारे आपल्या चिंतांच्या ओझ्यामुळे आपण दबून जाऊ शकतो किंवा निराश होऊ शकतो. (नीति. १२:२५) अशी कोणती काही कारणं आहेत ज्यांमुळे आपण निराश किंवा चिंतीत होऊ शकतो? कदाचित आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा एखाद्या गंभीर स्वरूपाच्या आजाराचा किंवा परीक्षेचा आपल्याला सामना करावा लागत असेल. किंवा मग आपली आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे कुटुंबाचा सांभाळ करणं आपल्याला कठीण जात असेल. बऱ्याच काळापासून अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे आपला मानसिक तणाव इतका वाढू शकतो, की कदाचित आपण आध्यात्मिक रीत्या खचून जाऊ आणि आपला आनंददेखील आपण गमावून बसू. पण अशा वेळीही एका गोष्टीची आपण सर्व जण खात्री बाळगू शकतो. ती म्हणजे, आपल्याला मदत करण्यासाठी यहोवा देव नेहमी तयार आहे.—यशया ४१:१०, १३ वाचा.

३, ४. (क) बायबलमध्ये ‘हात’ या शब्दाचा कधीकधी कोणत्या अर्थाने वापर करण्यात आला आहे? (ख) कोणत्या कारणांमुळे आपले हात लाक्षणिक अर्थाने गळू शकतात?

बायबलमध्ये सहसा शरीराच्या अवयवांच्या उदाहरणांचा उपयोग, व्यक्तीच्या वेगवेगळ्या गुणांना किंवा कार्यांना दर्शवण्यासाठी केला गेला आहे. उदाहरणार्थ, बायबलमध्ये हाताचा शेकडो वेळा उल्लेख करण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीच्या हाताला बळकटी देणं असं जेव्हा बायबलमध्ये सांगितलं जातं, तेव्हा त्याचा अर्थ त्या व्यक्तीला उत्तेजन देणं, तिची हिम्मत वाढवणं आणि तिला एखाद्या कामासाठी सज्ज करणं असा होतो. (१ शमु. २३:१६; एज्रा १:६) तसंच, याचा अर्थ असाही होऊ शकतो की एखाद्या व्यक्तीला सकारात्मक बनण्यास मदत मिळाली आहे आणि तिला भविष्यासाठी एक आशा आहे.

बायबलमध्ये काही ठिकाणी हात गळून पडणे असाही शब्दप्रयोग करण्यात आला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत असं म्हटलं जातं, तेव्हा ती व्यक्ती निराश झाली आहे किंवा खचून गेली आहे असा त्याचा अर्थ होतो. (२ इति. १५:७; इब्री १२:१२) आपण जेव्हा तणावाखाली असतो, फार खचून जातो किंवा मग यहोवासोबतचा आपला नातेसंबंध कमकुवत होत आहे असं आपल्याला जाणवतं, तेव्हा आपण निराश होऊ शकतो आणि परिस्थितीसमोर हार मानू शकतो. मग अशा वेळी आपल्याला प्रोत्साहन कुठून मिळू शकेल? समस्येचा धीरानं सामना करून आनंद टिकवून ठेवण्यासाठी लागणारी ताकद आणि प्रेरणा आपल्याला कुठून मिळू शकेल?

“उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही”

५. (क) समस्या येतात तेव्हा आपल्याला कसं वाटू शकतं, आणि आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? (ख) या लेखात आपण कोणत्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत?

सफन्या ३:१६, १७ वाचा. आपल्यावर समस्या येतात तेव्हा आपण आपले ‘हात गळू देऊ’ नयेत. म्हणजेच आपण घाबरून जाण्याची किंवा निराश होण्याची गरज नाही. कारण आपला प्रेमळ पिता यहोवा, आपली सगळी चिंता त्याच्यावर टाकण्यास आपल्याला आर्जवतो. (१ पेत्र ५:७) ज्या प्रकारे इस्राएल राष्ट्राची यहोवाला काळजी होती त्याच प्रकारे तो आज आपलीदेखील काळजी करतो. इस्राएली लोकांना त्याने म्हटलं: “पाहा, उद्धार करवत नाही इतका परमेश्वराचा हात तोकडा झाला नाही.” (यश. ५९:१) आपल्या विश्वासू सेवकांची मदत करण्यासाठी यहोवा नेहमी तयार असतो. या लेखात आपण बायबलमधील तीन उदाहरणांवर चर्चा करणार आहोत. या उदाहरणांवरून आपल्याला हे समजण्यास मदत होईल, की परिस्थिती कितीही कठीण असली तरी यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याच्या लोकांना ताकद देऊ शकतो. आणि असं करण्याची त्याच्याजवळ फक्त क्षमताच नाही तर त्याची इच्छादेखील आहे. बायबलमधील या उदाहरणांचं परीक्षण केल्यामुळे आपल्याला उत्तेजन कसं मिळू शकतं, ते आता आपण पाहू या.

६, ७. इस्राएली लोकांनी अमालेकी लोकांविरुद्ध जो विजय मिळवला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

इस्राएली लोकांची इजिप्तच्या गुलामीतून सुटका झाल्यानंतर काही काळातच अमालेकी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. तेव्हा, मोशेने यहोशवा या धाडसी मनुष्याला इस्राएली लोकांचं युद्धात नेतृत्व करण्यास सांगितलं. त्यानंतर, अहरोन व हूर यांना घेऊन मोशे अशा एका टेकडीवर गेला जिथून त्यांना ते युद्ध दिसू शकेल. हे तिघंही घाबरून गेल्यामुळे युद्धापासून पळ काढत होते का? नक्कीच नाही!

इस्राएली लोकांना अमालेकी लोकांविरुद्ध युद्धात विजय मिळावा यासाठी मोशेने एक योजना केली. त्याने आपल्या हातात देवाची काठी घेऊन ती वर स्वर्गाकडे धरली. जेव्हा मोशेने असं केलं तेव्हा यहोवाने इस्राएली लोकांना अमालेकी लोकांविरुद्ध लढण्याचं बळ दिलं. पण, जेव्हा मोशेचे हात थकून गेले आणि गळू लागले, तेव्हा अमालेकी लोक युद्धात इस्राएली लोकांवर वरचढ ठरू लागले. मग, अहरोन आणि हूर यांनी मोशेला मदत करण्यासाठी लगेच पावलं उचलली. “त्यांनी एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेवला व तो त्यावर बसला आणि अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूंनी त्याचे हात वर उचलून धरले म्हणून सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले.” यहोवाच्या पराक्रमी हातामुळे इस्राएली लोक युद्ध जिंकू शकले.—निर्ग. १७:८-१३.

८. (क) कूशी लोकांनी यहूदावर हल्ला केला तेव्हा आसाने कशी प्रतिक्रिया दाखवली? (ख) आपण आसाचं अनुकरण कसं करू शकतो?

आसा राजाच्या दिवसांतही यहोवाने त्याच्या पराक्रमी हाताने आपल्या लोकांचा बचाव केला. बायबलमध्ये अनेक सैन्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. पण, त्यांपैकी सर्वात मोठं सैन्य होतं जेरह नावाच्या एका कूशीचं. त्याच्या सैन्यात १०,००,००० कसलेले योद्धे होते. आसाच्या सैन्याच्या तुलनेत कूशी लोकांचं सैन्य दुप्पट होतं. केवळ लष्करी दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर कूशी लोकांविरुद्ध असलेलं हे युद्ध जिंकणं अशक्यच होतं. मग, आसा चिताक्रांत झाला का? तो घाबरून अगदी खचून गेला का? त्याने आपले हात गळू दिले का? नाही! आसाने लगेच यहोवाकडे मदत मागितली. कारण, “देवाला तर सर्व शक्य आहे.” (मत्त. १९:२६) देवाने आपल्या शक्तीचा वापर केला आणि “आसा व यहुदी यांच्यापुढे कुशी लोकांस असा मार दिला” की ते युद्ध हारले. आसा या देवाच्या विश्वासू सेवकाचे “मन साऱ्या हयातीत परमेश्वराकडे पूर्णपणे लागलेले होते.”—२ इति. १४:८-१३; १ राजे १५:१४.

९. (क) कोणत्या गोष्टीमुळे नहेम्याला भिंत बांधण्याचं काम सुरू ठेवण्यास मदत मिळाली? (ख) यहोवा देवाने नहेम्याच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं?

नहेम्या जेव्हा यरुशलेममध्ये गेला, तेव्हा त्याने काय पाहिलं? त्याने पाहिलं की यहुदी लोकांचे शत्रू त्यांना धमकावत असल्यामुळे त्यांनी यरुशलेमची भिंत बांधण्याचं काम थांबवलं आहे. शहराभोवती भिंत नसल्यामुळे ते शहर सुरक्षित नव्हतं आणि यामुळे यहुदी लोक निराश झाले होते. हे सगळं पाहून नहेम्याला कसं वाटलं? तोही निराश झाला का? त्याने आपले हात गळू दिले का? नाही! मोशे, आसा आणि यहोवाच्या इतर विश्वासू सेवकांप्रमाणेच नहेम्यादेखील यहोवाचा एक विश्वासू सेवक होता. तो नेहमी यहोवावर निर्भर राहिला. या परिस्थितीतदेखील त्याने मदतीसाठी यहोवाकडे प्रार्थना केली आणि यहोवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं. यहोवाने आपल्या “महासामर्थ्याने व प्रबल हस्ताने” यहुदी लोकांची मदत केली आणि त्यांना लागणारं बळ दिलं. (नहेम्या १:१०; २:१७-२०; ६:९ वाचा.) आजदेखील यहोवा आपल्या ‘महासामर्थ्याने’ व ‘प्रबल हाताने’ आपल्या सेवकांना मदत पुरवतो यावर तुमचा भरवसा आहे का?

यहोवा तुमच्या हातांना बळकटी देईल

१०, ११. (क) कोणती गोष्ट दाखवते की सैतानदेखील त्याचे हात गळू देत नाही? (ख) यहोवा कोणकोणत्या मार्गांनी आपल्याला आध्यात्मिक रीत्या मजबूत करतो? (ग) यहोवाकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा तुम्हाला कसा फायदा झाला आहे?

१० सैतानदेखील त्याचे हात गळू देणार नाही ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. तो आपल्या ख्रिस्ती कार्यांना थांबवण्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहतो व आपल्यावर हल्ले करत राहतो. यासाठी तो सरकार, धार्मिक पुढारी आणि धर्मत्यागी लोकांचा वापर करून आपल्याबद्दल अफवा पसरवतो आणि आपल्याला धमकावतो. यामागचा त्याचा उद्देश म्हणजे संपूर्ण जगभरात चाललेलं प्रचारकार्य पूर्णपणे थांबवणं. पण, यहोवा त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मदत पुरवतो. आणि असं करण्याची यहोवाची इच्छा आहे व त्याच्यात ती क्षमताही आहे. (१ इति. २९:१२) सैतान आणि त्याच्या दुष्ट जगाशी लढा देण्यासाठी आपण देवाकडे त्याचा पवित्र आत्मा मागितला पाहिजे. (स्तो. १८:३९; १ करिंथ. १०:१३) तसंच, देवाच्या वचनांतूनही आपल्याला आध्यात्मिक रीत्या बरीच मदत मिळते. दर महिन्याला प्रकाशित होणाऱ्या आपल्या प्रकाशनांतून आपल्याला किती गोष्टी शिकायला मिळतात याचाही विचार करा. जखऱ्या ८:९, १३ (वाचा.) या वचनांतील शब्द यरुशलेमच्या मंदिराची पुनर्बांधणी केली जात होती तेव्हा म्हटले गेले होते, तरी त्या वचनांतून आज आपल्यालाही मदत होते.

११ यहोवा आज आपल्याला ख्रिस्ती सभांद्वारे, संमेलनांद्वारे, अधिवेशनांद्वारे आणि वेगवेगळ्या प्रशालांद्वारे मार्गदर्शन पुरवतो. यामुळे आपण आध्यात्मिक रीत्या मजबूत होतो. त्याच्याकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनामुळे आपल्याला त्याची सेवा करताना योग्य हेतू बाळगण्यास, आध्यात्मिक ध्येयं ठेवण्यास आणि आपल्या ख्रिस्ती जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यास मदत होते. (स्तो. ११९:३२) यहोवाच्या मार्गदर्शनाद्वारे बळ मिळवण्यास तुम्हीही उत्सुक आहात का?

१२. आध्यात्मिक रीत्या मजबूत राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे?

१२ अमालेकी आणि कूशी लोकांविरुद्ध झालेल्या युद्धात विजय मिळवण्यास यहोवाने आपल्या लोकांना मदत केली. तसंच, त्याने नहेम्या आणि यहुदी लोकांना यरुशलेमची भिंत बांधून पूर्ण करण्याचं बळ दिलं. यहोवा आज आपल्यालाही प्रचार करण्यासाठी बळ देतो. त्यामुळे, आपण कितीही चिंतांचा सामना करत असलो, आपला विरोध होत असला आणि लोक सुवार्तेत आस्था दाखवत नसले, तरीही प्रचारकार्य करत राहण्यास आपल्याला मदत होते. (१ पेत्र ५:१०) यहोवा चमत्कारिक रीत्या आपल्या समस्या काढून टाकणार नाही. तर यासाठी आपल्यालाही कार्य करण्याची गरज आहे. आपण दररोज देवाचं वचन वाचलं पाहिजे, सभांची चांगली तयारी करून त्यात नियमितपणे हजर राहिलं पाहिजे, नियमित रीत्या वैयक्तिक आणि कौटुंबिक अभ्यास केला पाहिजे आणि प्रार्थनेद्वारे नेहमी यहोवावर निर्भर राहिलं पाहिजे. यहोवाने आपल्याला उत्तेजन देण्यासाठी आणि आपलं बळ वाढवण्यासाठी ज्या गोष्टींची तरतूद केली आहे, तिच्या आड आपण कोणतीही गोष्ट येऊ देता कामा नये. तुम्हाला जर जाणवलं की याबाबतीत तुम्ही कमी पडत आहात किंवा तुमचे हात गळाले आहेत तर देवाकडे मदत मागा. कारण “देवच असा आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो.” (फिलिप्पै. २:१३, ईझी-टू-रीड व्हर्शन) पण, यासोबतच इतरांच्या हातांनाही बळकटी देणं कसं शक्य आहे, ते आता आपण पाहू.

आपल्या बांधवांच्या हातांना बळकटी द्या

१३, १४. (क) आपल्या एका बांधवाला त्याच्या पत्नीच्या मृत्यूनंतर कशा प्रकारे सांत्वन मिळालं? (ख) आपण कोणकोणत्या मार्गांनी इतरांना मदत करू शकतो?

१३ यहोवाने आपल्याला पुरवलेली आणखी एक मदत म्हणजे, आपल्याला उत्तेजन देणारे आणि आपली काळजी करणारे जगभरातील आपले बंधुभगिनी. प्रेषित पौलाने असं म्हटलं: “लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा, आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा.” (इब्री १२:१२, १३) सुरवातीच्या बऱ्याच ख्रिश्चनांना आपल्या बंधुभगिनींकडून अशाच प्रकारे मदत मिळाली. आज आपल्याबाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. एका उदाहरणाकडे लक्ष द्या. आपल्या एका बांधवाच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्याला इतर बऱ्याच दुःखद प्रसंगांनाही तोंड द्यावं लागलं. तो असं म्हणतो: “मला एक गोष्ट शिकायला मिळाली. ती म्हणजे आपल्यावर कोणती परीक्षा यावी, केव्हा यावी आणि ती कितपत कठीण असावी हे निवडणं आपल्या हातात नाही. माझ्यावर आलेल्या परीक्षांमध्ये टिकून राहण्यासाठी प्रार्थना आणि वैयक्तिक अभ्यासामुळे मला फार मदत झाली. दुःखसागरात बुडत असताना या गोष्टींनी एका लाईफ जॅकेटप्रमाणे काम केलं. यासोबतच, मंडळीतील बंधुभगिनींकडून मिळालेल्या साहाय्यामुळेही मला खूप सांत्वन मिळालं. आयुष्यात कठीण प्रसंग येण्यापूर्वीच यहोवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत करणं खरंच किती महत्त्वाचं आहे हे मला जाणवलं.”

मंडळीतील सर्व जण एकमेकांना उत्तेजन देऊ शकतात (परिच्छेद १४ पाहा)

१४ अमालेकी लोकांविरुद्ध चाललेल्या युद्धादरम्यान अहरोन आणि हूर यांनी मोशेच्या हाताला आधार देऊन त्याच्या हाताला बळकटी दिली. आज आपणदेखील आपल्या बंधुभगिनींना मदत करण्यासाठी संधी शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्यापैकी काही बांधवांना आजारपणाचा, कुटुंबातील लोकांच्या विरोधाचा, एकटेपणाचा, प्रिय व्यक्तीला गमावल्याच्या दुःखाचा किंवा वाढत्या वयामुळे येणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागतो. तसंच, अनेक तरुणांना चुकीच्या गोष्टी करण्याच्या दबावाला किंवा करियर करण्याच्या दबावाला तोंड द्यावं लागतं. (१ थेस्सलनी. ३:१-३; ५:११, १४) म्हणून राज्य सभागृहामध्ये, एकत्र मिळून प्रचारकार्य करताना, पाहुणचार दाखवताना किंवा फोनवर बोलताना बंधुभगिनींमध्ये खरी आस्था दाखवून आपण त्यांना मदत केली पाहिजे.

१५. आपल्या सकारात्मक बोलण्याचा आपल्या बंधुभगिनींवर कोणता चांगला परिणाम होऊ शकतो?

१५ कूशी लोकांच्या मोठ्या सैन्यावर जबरदस्त विजय मिळवल्यानंतर, संदेष्टा अजऱ्याने आसाला आणि त्याच्या लोकांना उत्तेजन दिलं. तो म्हणाला: “तुम्ही हिंमत धरा, तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल.” (२ इति. १५:७) या उत्तेजनामुळे आसाला खरी उपासना पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रेरणा मिळाली. खरी उपासना प्रस्थापित करण्यासाठी त्याने बरेच मोठमोठे बदल केले. आज आपल्याही सकारात्मक बोलण्यामुळे इतरांना उत्तेजन मिळू शकतं आणि यहोवाची सेवा करत राहण्यासाठी त्यांना मदत होऊ शकते. (नीति. १५:२३) तसंच, सभांमध्ये आपण दिलेल्या सकारात्मक उत्तरांमुळेही बंधुभगिनींना उत्तेजन मिळतं, ही गोष्टदेखील आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.

१६. मंडळीतील वडील नहेम्याचं अनुकरण कसं करू शकतात? बंधुभगिनींनी तुम्हाला व्यक्तिगत रीत्या कशी मदत केली आहे ते सांगा.

१६ यहोवाच्या मदतीमुळे नहेम्या आणि यहुदी लोकांच्या हाताला बळकटी मिळाली. त्यांनी यरुशलेमची भिंत फक्त ५२ दिवसांत बांधून तयार केली! (नहे. २:१८; ६:१५, १६) पण, जेव्हा इतर जण भिंत बांधण्याचं काम करत होते तेव्हा नहेम्या फक्त त्यांच्यावर देखरेख करत बसला नाही, तर त्याने स्वतःही भिंत बांधण्याच्या कामात हातभार लावला. (नहे. ५:१६) आज मंडळीतील बरेच वडील राज्य सभागृहाच्या बांधकामात किंवा त्यांच्या दुरुस्तीच्या आणि साफसफाईच्या कामात सहभाग घेऊन नहेम्याचं अनुकरण करतात. हे प्रेमळ ख्रिस्ती वडील तणावाखाली असलेल्या बंधुभगिनींना भेट देऊन आणि त्यांच्यासोबत सेवाकार्य करण्याद्वारे त्यांना उत्तेजन देतात.—यशया ३५:३, ४ वाचा.

“तुमचे हात गळू देऊ नका”

१७, १८. समस्यांचा सामना करताना किंवा चिंतेत असताना आपण कोणत्या गोष्टीची खात्री बाळगू शकतो?

१७ आपण जेव्हा आपल्या बंधुभगिनींसोबत मिळून काम करतो, तेव्हा आपल्यामध्ये असलेली एकता आणखी मजबूत होते. तसंच, आपल्या बंधुभगिनींसोबत आपले मैत्रीपूर्ण नातेसंबंध निर्माण होतात. आणि देवाच्या राज्याद्वारे आपल्याला जे आशीर्वाद मिळणार आहेत त्यांच्यावरचा आपला विश्वासदेखील आणखी मजबूत होतो. आपण जेव्हा इतरांच्या हाताला बळकटी देतो, तेव्हा समस्येत टिकून राहण्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यासाठी आपण त्यांना मदत करत असतो. यासोबतच, इतरांना मदत केल्यामुळे आपलेही हात बळकट होतात आणि भविष्यावर लक्ष केंद्रित करण्यास आपल्याला मदत होते.

१८ गतकाळात यहोवाने आपल्या विश्वासू सेवकांना ज्या प्रकारे मदत केली त्याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा त्याच्यावरील आपला विश्वास आणि भरवसा आणखी वाढतो. जेव्हा तुम्ही समस्यांचा आणि चिंतांचा सामना करता तेव्हा “तुमचे हात गळू देऊ नका.” अशा वेळी यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल याची खात्री बाळगा. तुम्ही त्याला प्रार्थना केली तर तो आपल्या पराक्रमी हाताने तुम्हाला नक्कीच साहाय्य करेल आणि भविष्यात तुमच्यावर राज्याच्या आशीर्वादांचा वर्षाव करेल.—स्तो. ७३:२३, २४.