व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी झगडत राहा

यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी झगडत राहा

“तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”—उत्प. ३२:२८.

गीत क्रमांक: २३, ३८

१, २. यहोवाच्या सेवकांना कोणकोणत्या गोष्टींशी झगडावं लागतं?

नीतिमान हाबेलापासून आजपर्यंत यहोवाच्या सर्वच विश्वासू सेवकांना विश्वासात टिकून राहण्यासाठी झगडावं लागलं आहे. प्रेषित पौलाने सांगितलं की यहोवाची स्वीकृती आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी इब्री ख्रिश्चनांनी “दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली.” (इब्री १०:३२-३४) या ख्रिश्चनांच्या झगडण्याची तुलना पौलाने जुन्या काळात ग्रीकमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना जी झुंज द्यावी लागत होती त्याच्याशी केली. जसं की धावण्याच्या, कुस्तीच्या आणि मुष्टीयुद्धाच्या स्पर्धांमध्ये खेळाडूंना द्यावी लागणारी झुंज. (इब्री १२:१, ४) आज आपणदेखील जीवनाच्या शर्यतीत आहोत. पण, आपलं लक्ष विचलित होऊन आपण निराश व्हावं आणि भविष्यात मिळणाऱ्या बक्षिसाला गमावून बसावं अशी आपल्या शत्रूंची इच्छा आहे.

आपली सगळ्यात मोठी ‘झुंज’ सैतान आणि त्याच्या जगाशी आहे. (इफिस. ६:१२) यामुळेच हे फार महत्त्वाचं आहे, की आपण स्वतःवर या जगाच्या शिकवणींचा आणि त्याच्या विचारसरणीचा प्रभाव पडू देऊ नये. तसंच, अनैतिक वर्तन, धूम्रपान, अतिमद्यपान किंवा ड्रग्सचं सेवन यांसारख्या वाईट सवयीदेखील आपण पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. यासोबतच, आपल्याला निराशा आणि स्वतःच्या अपरिपूर्णतेशीही सतत झुंज देत राहणं गरजेचं आहे.—२ करिंथ. १०:३-६; कलस्सै. ३:५-९.

३. आपल्या शत्रूंशी यशस्वी रीत्या लढा देण्यासाठी यहोवा आपल्याला कोणत्या मार्गांनी प्रशिक्षण देतो?

या शक्तिशाली शत्रूंच्या विरोधात असलेल्या लढाईत विजयी होणं खरंच शक्य आहे का? हो नक्कीच आहे. पण, हे म्हणावं तितकं सोपं नाही. पौलाने स्वतःची तुलना मुष्टीयुद्ध करणाऱ्याशी केली. तो म्हणाला: मी “मुष्टियुद्धही करतो,” पण “वाऱ्यावर मुष्टिप्रहार करत नाही.” (१ करिंथ. ९:२६) ज्या प्रकारे मुष्टीयुद्ध करणारा आपल्या प्रतिस्पर्ध्यावर हल्ला करतो, त्याच प्रकारे आपणही आपल्या शत्रूंशी लढा देणं गरजेचं आहे. आपल्याला यात विजय मिळावा म्हणून यहोवा आपल्याला मदत करतो आणि आपल्याला प्रशिक्षणही देतो; खासकरून तो हे बायबलद्वारे देतो. तसंच, बायबलवर आधारित प्रकाशनांचा, ख्रिस्ती सभांचा, अधिवेशनांचा आणि संमेलनांचाही तो वापर करतो. यांद्वारे यहोवा तुम्हाला जे मार्गदर्शन पुरवत आहे त्याचं तुम्ही पालन करत आहात का? जर तुम्ही त्याचं पालन करत नसाल, तर आपल्या शत्रूंचा यशस्वी रीत्या प्रतिकार करणं तुम्हाला शक्य होणार नाही. हे जणू मुष्टीयुद्ध करणाऱ्या अशा एका खेळाडूसारखं होईल जो आपल्या प्रतिस्पर्ध्यावर नाही तर वाऱ्यावर मुष्टीप्रहार करतो.

४. वाइटाला आपल्यावर प्रबळ होऊ न देण्यासाठी आपण काय करू शकतो?

आपले शत्रू आपल्यावर केव्हाही हल्ला करू शकतात. त्यामुळे आपण नेहमी सतर्क राहणं गरजेचं आहे. कारण, आपण बेसावध किंवा कमजोर असतानाच आपल्यावर हल्ला होण्याची जास्त शक्यता असते. बायबल आपल्याला अशी ताकीद देतं: “वाइटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाइटाला जिंक.” (रोम. १२:२१) पण, या वचनातून आपल्याला ताकीदच नाही तर उत्तेजनही मिळतं. “बऱ्याने वाइटाला जिंक” या शब्दांतून आपल्याला कळतं की आपल्या शत्रूंवर विजय मिळवणं आपल्याला शक्य आहे. पण समजा आपण सावध राहिलो नाही आणि लढा देण्याचं थांबवलं, तर सैतान आणि त्याचं जग आपल्यावर प्रबळ होऊ शकतं. त्यामुळे कधीही हार मानू नका आणि निराश होऊन आपले हात गळू देऊ नका.—१ पेत्र ५:९.

५. (क) देवाची स्वीकृती आणि आशीर्वाद मिळवायचा असेल तर कोणती गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे? (ख) आपण कोणाच्या उदाहरणांवर चर्चा करणार आहोत?

आपल्याला या लढाईत विजयी व्हायचं असेल तर आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण ही लढाई देवाची स्वीकृती आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लढत आहोत. इब्री लोकांस ११:६ मध्ये म्हटलं आहे: “देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.” यहोवाचा शोध झटून करणे याचा अर्थ असा होतो की, देवाची स्वीकृती मिळवण्यासाठी बरीच मेहनत घेणं. (प्रे. कृत्ये १५:१७) याबाबतीत चांगलं उदाहरण मांडणाऱ्या बऱ्याच स्त्री-पुरुषांची उदाहरणं आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतात. यांपैकी काही लोक म्हणजे याकोब, राहेल, योसेफ आणि पौल. या सर्वांच्या जीवनात कठीण प्रसंग आले आणि त्यांतून जाताना ते भावनिक आणि शारीरिक रीत्या फार खचून गेले. पण, शेवटी मात्र ते विजयी ठरले. त्यांच्या उदाहरणावरून हे दिसून येतं की आपणही जर परिश्रम घेतले तर यहोवाकडून आशीर्वाद मिळवू शकतो. आपण हे कसं करू शकतो यावर आता थोडी चर्चा करू या.

परिश्रम घेत राहिल्याने आशीर्वाद नक्कीच मिळेल

६. कोणत्या गोष्टीमुळे याकोबाला टिकून राहण्यास मदत झाली आणि त्याला त्याचं काय प्रतिफळ मिळालं? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.)

याकोबाचं यहोवावर खूप प्रेम होतं आणि यहोवासोबतचा नातेसंबंध त्याच्यासाठी खूप मौल्यवान होता. यामुळेच त्याने भरपूर परिश्रम घेतले आणि तो शेवटपर्यंत टिकून राहिला. यहोवा आपल्या संततीला आशीर्वादित करेल या अभिवचनावर त्याला पूर्ण भरवसा होता. (उत्प. २८:३, ४) जवळजवळ १०० वर्षांचा असताना देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याने एका देवदूतासोबत कुस्तीदेखील लढली. (उत्पत्ति ३२:२४-२८ वाचा.) याकोब स्वतःच्या बळावर या देवदूतासोबत कुस्ती लढू शकला असेल का? नक्कीच नाही! पण, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, आशीर्वाद मिळवण्यासाठी परिश्रम घेण्याचा याकोबाचा दृढ निश्चय होता. याकोबाने परिश्रम घेतले आणि तो टिकून राहिला. म्हणूनच देवाने त्याला इस्राएल असं नाव दिलं. या नावाचा अर्थ, “देवासोबत झगडणारा किंवा टिकून राहणारा,” असा होतो. याकोबाला देवाकडून जे हवं होतं ते त्याला मिळालं. अर्थात, त्याची स्वीकृती आणि त्याचा आशीर्वाद. आज आपल्यालाही हाच प्रतिफळ हवा आहे, नाही का?

७. (क) राहेलसमोर कोणती निराश करणारी परिस्थिती होती? (ख) आशीर्वाद मिळवण्यासाठी ती कशा प्रकारे झगडत राहिली?

यहोवा याकोबाला दिलेलं अभिवचन कसं पूर्ण करेल हे पाहण्यासाठी याकोबाची पत्नी राहेल हीदेखील खूप आतुर होती. पण, एक समस्या होती. राहेलला एकही मूल नव्हतं. बायबलच्या काळात एखाद्या स्त्रीला मूल नसणं, हे तिच्यासाठी खूप दुःखाची गोष्ट असायची. अशा निराश करणाऱ्या परिस्थितीतही टिकून राहणं राहेलला कशामुळे शक्य झालं? तिने कधीही हार मानली नाही. याउलट ती यहोवाला कळकळीने प्रार्थना करत राहिली आणि त्याच्याशी झगडत राहिली. राहेलने मनापासून केलेल्या प्रार्थना यहोवाने ऐकल्या आणि तिला आशीर्वाद दिला. तिला शेवटी मुलं झाली. याच कारणामुळे ती म्हणाली: “मी . . . प्रचंड झोंबी करून [लढा देऊन] यश मिळवले आहे.”—उत्प. ३०:८, २०-२४.

८. योसेफाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला आणि त्याने कोणतं चांगलं उदाहरण मांडलं?

यहोवाला विश्वासू राहण्याबाबत याकोब आणि राहेल यांच्या चांगल्या उदाहरणाचा त्यांचा मुलगा योसेफ याच्यावर नक्कीच चांगला प्रभाव पडला असेल. त्यामुळे जीवनात समस्यांचा सामना करताना त्याला खूप मदत झाली. तो १७ वर्षांचा असताना असं काहीतरी घडलं ज्यामुळे त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. त्याचे भाऊ त्याचा द्वेष करत असल्यामुळे त्यांनी त्याला गुलाम म्हणून विकलं. त्यानंतर, काहीही चूक नसताना त्याला इजिप्तमध्ये बरीच वर्षं तुरुंगात राहावं लागलं. (उत्प. ३७:२३-२८; ३९:७-९, २०, २१) पण, या काळादरम्यान तो निराश झाला नाही किंवा त्याने मनात कटुता बाळगली नाही. शिवाय, त्याने बदला घेण्याचा प्रयत्नही केला नाही. कारण, त्याच्यासाठी यहोवासोबत असलेला त्याचा नातेसंबंध जास्त मौल्यवान होता आणि तो टिकून ठेवण्यावरच त्याने आपलं लक्ष केंद्रित केलं. (लेवी. १९:१८; रोम. १२:१७-२१) योसेफाच्या उदाहरणामुळे आपल्यालाही मदत होऊ शकते. आपल्यापैकी काही जण कदाचित अशा कुटुंबात लहानाचे मोठे झाले असतील, जिथं त्यांना प्रेम मिळालं नाही आणि बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला. तर काही असेही असतील ज्यांना असं वाटू शकतं की त्यांच्या सध्याच्या जीवनात काहीच आशा नाही. अशा वेळी योसेफाप्रमाणे परिस्थितीशी लढा देऊन ते टिकून राहू शकता. असं केल्यास यहोवा नक्की त्यांना आशीर्वादित करेल असा भरवसा ते बाळगू शकतात.—उत्पत्ति ३९:२१-२३ वाचा.

९. आपण कशा प्रकारे याकोब, राहेल आणि योसेफ यांच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतो?

आज आपल्या जीवनातही समस्या असू शकतात आणि त्यात टिकून राहणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. उदाहरणार्थ, कदाचित तुमच्यावर कोणी अन्याय केला असेल, तुमच्यासोबत पक्षपात झाला असेल, किंवा कोणी तुमची थट्टा केली असेल. किंवा मग, तुमचा हेवा वाटत असल्यामुळे कोणी तुमच्यावर खोटा आरोप लावला असेल. अशा वेळी निराश होऊ नका, तर यहोवाची आनंदाने सेवा करत राहण्यास याकोब, राहेल आणि योसेफ यांना कशामुळे मदत झाली हे लक्षात ठेवा. यहोवासोबत असलेल्या नातेसंबंधाला त्यांनी मौल्यवान लेखलं आणि म्हणून यहोवाने त्यांना सहन करण्यासाठी ताकद दिली आणि आशीर्वादित केलं. ते लढा देत राहिले आणि अनेक परिश्रम घेऊन आपल्या प्रार्थनेनुसार जीवन जगत राहिले. शेवटल्या काळात जगत असल्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की आपण भविष्यात मिळणाऱ्या आशीर्वादांवर आपलं लक्ष केंद्रित करावं. यहोवाची स्वीकृती मिळवण्यासाठी झगडण्याची म्हणजेच परिश्रम घेण्याची तुमची तयारी आहे का?

आशीर्वाद मिळवण्यासाठी झगडण्याची तयारी दाखवा

१०, ११. (क) देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला का झगडावं लागू शकतं? (ख) योग्य निवड करण्यासाठी आपल्याला कशामुळे मदत होईल?

१० देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला झगडण्याची गरज का पडू शकते? एक कारण म्हणजे, अपरिपूर्ण असल्यामुळे काही चुकीच्या इच्छांशी आपल्याला सतत लढत राहावं लागतं. काही लोकांना सेवाकार्याप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं कठीण जातं, तर काहींना आरोग्याच्या समस्या आहेत. तसंच, काहींना एकटेपणाचाही सामना करावा लागतो. काही जण असेही आहेत ज्यांना इतरांना क्षमा करणं खूप कठीण जातं. विश्वासू लोकांना प्रतिफळ देणाऱ्या यहोवा देवाची आपण कितीही काळापासून सेवा करत असलो, तरी त्याची सेवा करण्यापासून आपलं लक्ष विचलित करतील अशा अनेक गोष्टींशी आपल्या सर्वांनाच लढा द्यावा लागतो.

यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही झगडत आहात का? (परिच्छेद १०, ११ पाहा)

११ एक ख्रिस्ती या नात्याने जीवन जगणं आणि योग्य निर्णय घेणं सोपं नाही. खासकरून अशा वेळी जेव्हा आपण आपल्या मनात असलेल्या चुकीच्या इच्छांना लढा देत असतो. (यिर्म. १७:९) तुमच्याही मनात काही चुकीच्या इच्छा आहेत असं जाणवल्यास यहोवाला प्रार्थना करा आणि त्याच्या पवित्र आत्म्याची मदत मागा. असं केल्यामुळे, योग्य ते करण्यासाठी लागणारं धैर्य आणि देवाचा आशीर्वाद मिळवणं तुम्हाला शक्य होईल. आपल्या प्रार्थनेनुसार जीवन जगण्याचा निश्चय करा. दररोज बायबल वाचण्याचा प्रयत्न करा आणि व्यक्तिगत अभ्यास व कौटुंबिक उपासनेसाठी वेळ काढा.—स्तोत्र ११९:३२ वाचा.

१२, १३. चुकीच्या इच्छांवर मात करण्यासाठी आपल्या एका बांधवाला आणि बहिणीला कशी मदत झाली?

१२ असे बरेच बंधुभगिनी आहेत ज्यांना देवाच्या वचनामुळे, त्याच्या पवित्र आत्म्यामुळे आणि आपल्या ख्रिस्ती प्रकाशनांमुळे चुकीच्या इच्छांवर मात करण्यास मदत झाली आहे. एका तरुणाने ८ डिसेंबर २००३ च्या अवेक! मासिकातील “तुम्ही चुकीच्या इच्छांचा प्रतिकार कसा करू शकता?” हा लेख वाचला. तो वाचल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती? तो म्हणतो: “मनात येणाऱ्या चुकीच्या विचारांवर ताबा मिळवण्यासाठी मला रोज झगडावं लागतं. लेखात जेव्हा मी वाचलं की अनेकांना आपल्या चुकीच्या इच्छांवर ताबा मिळवणं अतिशय कठीण जातं, तेव्हा मला जाणवलं की मी एकटा नाही. जगभरात इतरही असे बंधुभगिनी आहेत ज्यांना हा लढा द्यावा लागत आहे.” या तरुण बांधवाला ८ ऑक्टोबर २००३ च्या अवेक! मासिकातील एका लेखातूनही खूप मदत झाली. तो लेख समलैंगिकतेसारख्या गोष्टींप्रती यहोवाचा दृष्टिकोन काय आहे याबद्दल होता. लेखात सांगण्यात आलं होतं की काहींसाठी अशा समस्या “शरीरात एक काटा” असल्यासारख्याच आहेत आणि म्हणून त्यांना सतत त्यांच्याशी झगडावं लागतं. (२ करिंथ. १२:७) पण, अशा परिस्थितीतही आपलं आचरण चांगलं ठेवण्यासाठी ते लोक जे परिश्रम घेतात, त्यामुळे भविष्यासाठी ते एक चांगली आशा बाळगू शकतात. तो तरुण पुढे म्हणतो: “या आशेवर आपलं लक्ष केंद्रित केल्यामुळे मला खूप मदत होते. माझ्या चुकीच्या इच्छांशी दररोज लढा देऊन देवाला विश्वासू राहणं मला शक्य आहे असं मला वाटतं. यहोवा त्याच्या संघटनेद्वारे मला जी मदत पुरवत आहे त्यासाठी मी खूप आभारी आहे. कारण, त्यामुळेच या दुष्ट जगात प्रत्येक दिवशी या इच्छांना झुंज देऊन विश्वासू राहणं मला शक्य होतं.”

१३ अमेरिकेत राहणाऱ्या एका बहिणीच्या उदाहरणाकडेही लक्ष द्या. तिने असं लिहिलं: “आम्हाला ज्या आध्यात्मिक अन्नाची गरज आहे ते तुम्ही अगदी योग्य वेळी पुरवता, यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. बऱ्याच वेळा एखादा लेख वाचल्यावर मला असं वाटतं, जणू तो माझ्यासाठीच लिहिण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून मी एका अशा तीव्र इच्छेशी लढा देत आहे, जिचा यहोवाला वीट आहे. कधीकधी मला असं वाटतं, की बस आता मला जमणार नाही. मला माहीत आहे की यहोवा खूप दयाळू आणि क्षमाशील आहे. पण मला असंही वाटतं की मी त्याची मदत मिळवण्यास पात्र नाही. कारण माझ्या मनात चुकीची इच्छा आहे आणि यहोवासारखं मी त्या गोष्टीची मनापासून घृणा करत नाही. सततच्या या लढाईमुळे माझ्या जीवनातील प्रत्येक पैलूवर प्रभाव पडला आहे. पण, १५ मार्च २०१३ च्या टेहळणी बुरूजमधील यहोवाला “ओळखणारे हृदय” तुमच्याजवळ आहे का?’ हा लेख वाचल्यानंतर मला याची खात्री पटली की मला मदत करण्याची यहोवाची मनापासून इच्छा आहे.”

१४. (क) पौलाला त्याच्या समस्यांबद्दल कसं वाटलं? (ख) आपणही आपल्या कमतरतांवर कशा प्रकारे मात करू शकतो?

१४ रोमकर ७:२१-२५ वाचा. आपल्या चुकीच्या इच्छांशी आणि कमतरतांशी लढा देणं किती कठीण असू शकतं हे पौलाने स्वतः अनुभवलं होतं. पण, त्याला याचीही खात्री होती की जर त्याने यहोवाला प्रार्थना केली, मदतीसाठी त्याच्यावर निर्भर राहिला आणि येशूच्या खंडणीवर विश्वास ठेवला तर तो या लढाईत नक्कीच विजयी होईल. आपल्याबाबतीत काय? आपणही आपल्या कमतरतांवर मात करू शकतो का? हो, नक्कीच. यासाठी आपल्यालाही पौलाप्रमाणे स्वतःच्या ताकदीवर नाही, तर यहोवावर पूर्णपणे निर्भर राहावं लागेल आणि खंडणीवर विश्वास ठेवावा लागेल.

१५. विश्वासू राहण्यासाठी आणि परीक्षेत टिकून राहण्यासाठी यहोवा आपल्याला कशी मदत करतो?

१५ एखादी समस्या आल्यावर आपण कशी प्रतिक्रिया दाखवतो, त्याबद्दल आपल्याला किती काळजी वाटते आणि त्यादरम्यान यहोवावर निर्भर राहण्याची आपली इच्छा आहे का, हे तो पाहत असतो. उदाहरणार्थ, समजा आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाला किंवा आपल्यासोबत कोणी अन्यायीपणे वागलं तर आपली प्रतिक्रिया काय असेल? जर यहोवावर आपला पूर्ण भरवसा असेल तर विश्वासू राहण्यासाठी, आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याच्यासोबतचा आपला नातेसंबंध आणखी घनिष्ठ करण्यासाठी आपण त्याच्याकडे मदतीची याचना करू. (फिलिप्पै. ४:१३) गतकाळातील आणि आपल्या काळातील बऱ्याच विश्वासू ख्रिश्चनांच्या उदाहरणावरून हे दिसून येतं, की प्रार्थनेमुळे आपल्याला हिम्मत मिळते आणि परीक्षेत टिकून राहण्यासाठी लागणारं धैर्यदेखील मिळतं.

यहोवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी झगडत राहा

१६, १७. तुम्ही काय करण्याचा निश्चय केला आहे?

१६ सैतानाची अशी इच्छा आहे की आपण निराश व्हावं आणि लढा देणं सोडून द्यावं. त्यामुळे तुमचा निर्धार पक्का असू द्या, “चांगले ते बळकट धरा.” (१ थेस्सलनी. ५:२१) सैतान, त्याचं दुष्ट जग आणि कोणत्याही चुकीच्या इच्छांविरुद्ध असलेल्या लढाईत तुम्ही नक्कीच विजयी होऊ शकता. तुम्ही जर देवावर पूर्ण भरवसा ठेवला तर तो तुम्हाला ताकद देईल आणि मदत करेल. याचा परिणाम म्हणजे तुम्ही तुमच्या लढाईत विजयी व्हाल!—२ करिंथ. ४:७-९; गलती. ६:९.

१७ तेव्हा आपली लढाई थांबवू नका. परिश्रम घेत राहा, झगडत राहा, त्यात टिकून राहा. मग पाहा, यहोवा “आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद” तुम्हाला नक्की देईल.—मला. ३:१०.