व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जीवन कथा

मला आध्यात्मिक बांधवांसोबत काम करण्याची सुसंधी लाभली

मला आध्यात्मिक बांधवांसोबत काम करण्याची सुसंधी लाभली

माझे आईवडील, जेम्स आणि जेस्सी सिंक्लेअर हे सुमारे १९३५ साली न्यूयॉर्कमधल्या ब्राँक्झ या भागात राहायला आले. तिथं त्यांची काही लोकांशी ओळख झाली; त्यांच्यापैकी स्कॉटलंडचा विली स्नेडन हादेखील एक होता. त्यांची भेट झाली तेव्हा पहिल्याच भेटीत ते तिघं आपापल्या कुटुंबांविषयी बोलू लागले. ही घटना माझ्या जन्माच्या काही वर्षांआधीची आहे.

माझ्या आईने विलीला सांगितलं, की महायुद्धाच्या काही काळाआधी, तिच्या वडिलांचा आणि तिच्या मोठ्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यांची मासेमारीची बोट उत्तर समुद्रात एका सुरुंगाला धडकून बुडाली होती. त्यावर विली म्हणाला: “तुझे वडील नरकात आहेत!” * विली हा एक यहोवाचा साक्षीदार होता. आणि अशा धक्कादायक रीतीने माझी आई बायबल सत्याशी परिचित झाली!

विली आणि लिझ स्नेडन

विली जे काही म्हणाला त्यामुळे माझ्या आईला फार वाईट वाटलं. कारण, आपले वडील स्वभावाने खूप चांगले होते हे तिला माहीत होतं. पण विली पुढे म्हणाला: “येशूही नरकात होता असं जर मी तुला सांगितलं तर तुला बरं वाटेल का?” त्यावरून माझ्या आईला चर्चच्या शिकवणी आठवल्या. त्या शिकवणींप्रमाणे येशू नरकात गेला होता आणि तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आलं होतं. माझी आई विचार करू लागली, की ‘जर नरक हे दुष्टांना यातना देण्यासाठी असलेलं धगधगत्या अग्नीचं ठिकाण आहे, तर मग येशू तिथं का गेला?’ अशा प्रकारे बायबलची सत्यं शिकण्याची माझ्या आईची इच्छा जागृत झाली. मग, ती ब्राँक्झमधल्या मंडळीच्या सभांना हजर राहू लागली आणि तिने १९४० मध्ये बाप्तिस्मा घेतला.

ााझ्या आईसोबत आणि नंतर माझ्या वडिलांसोबत

त्या काळात ख्रिस्ती पालकांनी आपल्या मुलांसोबत बायबलचा अभ्यास करावा म्हणून त्यांना खास उत्तेजन दिलं जात नव्हतं. मी लहान असताना, जेव्हा आई शनिवारी-रविवारी ख्रिस्ती सभांना आणि प्रचारकार्याला जायची, तेव्हा माझे वडील मला सांभाळायचे. काही वर्षांनंतर मग माझे वडील आणि मीसुद्धा आईसोबत ख्रिस्ती सभांना हजर राहू लागलो. माझी आई आनंदाचा संदेश सांगणारी एक आवेशी प्रचारक होती आणि ती अनेक आस्थेवाईक लोकांचा बायबल अभ्यास चालवायची. खरंतर, अशीही एक वेळ होती, जेव्हा ती अनेकांचा बायबल अभ्यास एकत्रच चालवायची. कारण, ते सर्व जवळजवळच राहायचे. मला शाळेला सुटी असायची तेव्हा मीही तिच्यासोबत प्रचारकार्याला जायचो. अशा प्रकारे मला बायबलमधल्या बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. तसंच, इतरांना बायबल कसं शिकवावं तेही शिकायला मिळालं.

लहान असताना मला सत्याप्रती तेवढी कदर वाटायची नाही, याचं आता मला दुःख होतं. पण नंतर, मी १२ वर्षांचा झालो तेव्हा राज्य प्रचारक बनलो आणि मग नियमितरीत्या प्रचारकार्यात सहभागी होऊ लागलो. १६ वर्षांचा असताना मी यहोवाला माझं जीवन समर्पित केलं. आणि २४ जुलै १९५४ मध्ये कॅनडामधल्या टोरंटो या शहरात झालेल्या अधिवेशनात बाप्तिस्मा घेतला.

बेथेलमध्ये सेवा करताना

आमच्या मंडळीत असे काही बांधव होते ज्यांनी आधी बेथेलमध्ये सेवा केली होती. आणि काही असेही होते जे अजूनही बेथेलमध्ये सेवा करत होते. या बांधवांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव पडला. त्यांच्या बोलण्याची आणि बायबल सत्यं शिकवण्याच्या पद्धतीची माझ्या मनावर मोठी छाप पडली. माझ्या शाळेतल्या शिक्षकांची अशी इच्छा होती, की मी युनिव्हर्सिटीत शिकण्यासाठी जावं. पण माझं ध्येय बेथेल सेवा करण्याचं होतं. त्यामुळे, टोरंटोमध्ये माझा बाप्तिस्मा झाला तेव्हा त्या अधिवेशनात मी बेथेल सेवेसाठी अर्ज भरला. १९५५ मध्ये न्यूयॉर्क शहरातल्या यांकी स्टेडियममध्ये झालेल्या अधिवेशनातही मी पुन्हा एकदा बेथेलसेवेसाठी अर्ज भरला. त्यानंतर काही काळातच, म्हणजे १९ सप्टेंबर १९५५ ला मला ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा करण्यासाठी बोलावण्यात आलं. त्या वेळी मी १७ वर्षांचा होतो. बेथेलमध्ये दुसऱ्या दिवशी मी, ११७ अॅडम स्ट्रिट या ठिकाणी असलेल्या बाईंडरीमध्ये (पुस्तकं बांधण्याच्या ठिकाणी) सेवा करू लागलो. त्यानंतर, मी पुस्तकाचा एक भाग म्हणजे त्यातली ३२ पानं एकत्र करणाऱ्या मशीनवर काम करू लागलो. आणि हे भाग मशीनमध्ये शिवून त्यांची पुस्तकं तयार केली जायची.

वयाच्या १७ व्या वर्षी मी ब्रुकलिन बेथेलमध्ये सेवा सुरू केली

बाईंडरीमध्ये एक महिना काम केल्यानंतर मला मासिक विभागात पाठवण्यात आलं. कारण मला टाईपिंग करणं जमायचं. त्या काळात बंधुभगिनी, टेहळणी बुरूज आणि सावध राहा! या मासिकांच्या वर्गणीधारकांचा पत्ता एका स्टेन्सिलवर (धातूने बनवलेली लहान पट्टी) टाईप करायचे. या विभागात काही महिने काम केल्यानंतर मला शिपिंग विभागात नेमण्यात आलं. बंधू क्लाउस जेन्सेन हे त्या विभागाचे पर्यवेक्षक म्हणून काम पाहत होते. जगभरात प्रकाशनं पाठवण्याकरता शिपिंग विभागातून सर्व प्रकाशनांचे बॉक्स बंदरावर एका ट्रकने नेले जायचे. यासोबतच संपूर्ण अमेरिकेतल्या मंडळ्यांना पाठवण्यासाठी मासिकांचे असे कितीतरी गठ्ठे पोस्ट ऑफिसपर्यंत पोचवावे लागायचे. ‘ट्रक चालवणाऱ्या बांधवासोबत जायला आवडेल का?’ असं बंधू जेन्सेन यांनी मला विचारलं. हे खूप कष्टाचं काम होतं आणि ते माझ्यासाठी चांगलं राहील असं बंधू जेन्सेन म्हणाले. खरंतर, मी खूप बारीक होतो आणि माझं वजन फक्त ५७ किलो होतं. पण पोस्ट ऑफिस आणि बंदरावर प्रकाशनांचे ते बॉक्स घेऊन जाण्याचं काम केल्यामुळे माझी शारीरिक ताकद वाढली. खरंच, माझ्यासाठी कोणतं काम योग्य ठरेल हे बंधू जेन्सेन यांना चांगल्या प्रकारे माहीत होतं.

मंडळ्यांकडून प्रकाशनांची जी मागणी करण्यात यायची, त्याचंही काम मासिक विभाग पाहायचा. त्यामुळे ब्रुकलिन बेथेलमध्ये कोणकोणत्या भाषांत आपली प्रकाशनं छापून जगभरात पाठवली जातात याची मला माहिती मिळाली. या भाषांपैकी अनेक भाषा मला तर त्याआधी माहीतही नव्हत्या. पण, लाखोंच्या संख्येने आपली मासिकं छापली जात आहेत आणि ती जगातल्या कानाकोपऱ्यांत पोचवली जात आहेत, हे पाहून मला खूप आनंद झाला. खरंतर, येणाऱ्या वर्षांमध्ये मला जगातल्या या ठिकाणांपैकी बऱ्याच ठिकाणी जाण्याची संधी मिळेल याची कल्पनाही त्या वेळी नव्हती.

रॉबर्ट वॉलन, चार्ल्स मॉलहन आणि डॉन अॅडम्स यांच्यासोबत

१९६१ साली मला ट्रेजरी विभागात (पैशांची व्यवस्था पाहणारा विभाग) सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं. या विभागाचे पर्यवेक्षक बंधू ग्रँट सूटर हे होते. या विभागात काही वर्षं सेवा केल्यानंतर एक दिवस मला बंधू नेथन नॉर यांच्या ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. बंधू नॉर हे त्या वेळी जगभरात चाललेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाचं नेतृत्व करायचे. बंधू नॉर यांनी मला सांगितलं, की त्यांच्या ऑफिसमध्ये सेवा करणारा एक बांधव महिनाभर राज्य सेवा प्रशालेसाठी जाणार आहे. आणि त्यानंतर त्याची नेमणूक सेवा विभागात करण्यात येईल. त्यामुळे त्याच्या जागी मी बंधू डॉन अॅडम्स यांच्यासोबत काम करावं असं त्यांनी सांगितलं. खरंतर, १९५५ मध्ये झालेल्या अधिवेशनात बंधू डॉन यांनीच माझा बेथेल सेवेसाठी असलेला अर्ज स्वीकारला होता. त्या विभागात, बंधू रॉबर्ट वॉलन आणि चार्ल्स मॉलहन हे आणखी दोन बांधव आधीपासूनच सेवा करत होते. आम्ही चौघांनी ५० पेक्षा जास्त वर्षं सोबत मिळून काम केलं. खरंच, अशा विश्वासू आणि आध्यात्मिक बांधवांसोबत काम करण्याचा आनंद मी शब्दांमध्ये व्यक्त करू शकत नाही!—स्तो. १३३:१.

माझी पहिली झोन व्हिसिट, व्हेनिझुएला, १९७० मध्ये

१९७० पासून, मला दरवर्षी किंवा दोन वर्षांतून एकदा काही आठवड्यांसाठी वॉच टॉवर सोसायटीच्या अनेक शाखा कार्यालयांना भेटी देण्यासाठी नेमण्यात यायचं. अशा प्रकारे दिलेल्या भेटींना त्या वेळी झोन व्हिसिट म्हटलं जायचं. यामध्ये जगभरातल्या बेथेल कुटुंबाची आणि मिशनरी सेवा करणाऱ्यांची भेट घेणं, त्यांना आध्यात्मिक प्रोत्साहन देणं आणि शाखा कार्यालयांचे रेकॉर्ड तपासणं अशी कामं सामील होती. गिलियड प्रशालेच्या पहिल्या काही वर्गांतून पदवीधर होऊन, दुसऱ्या देशांत मिशनरी म्हणून गेलेल्या अनेक बंधुभगिनींना मी भेटलो. नेमणूक झालेल्या त्या देशांत हे बंधुभगिनी इतक्या वर्षांनंतरही पूर्ण विश्वासानं आपली सेवा करत असल्याचं पाहून मला खूप आनंद वाटायचा. या कामानिमित्त मी ९० पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. हा माझ्यासाठी खरोखर आनंद देणारा अनुभव आणि खूप मोठा बहुमान होता.

९० हून जास्त देशांतल्या बांधवांना भेटण्याचा आनंद खूप विलक्षण होता!

आयुष्यभर साथ देणारी एक विश्वासू सोबती मिळाली

ब्रुकलिन बेथेल कुटुंबातल्या सर्वांना न्यूयॉर्क शहराच्या क्षेत्रात असलेल्या मंडळ्यांमध्ये नेमण्यात आलं होतं. माझी नेमणूक ब्राँक्झमधल्या एका मंडळीत करण्यात आली. या क्षेत्रातल्या त्या सुरुवातीच्या मंडळीची वाढ होऊन तिच्या दोन मंडळ्या झाल्या होत्या. त्या सुरुवातीच्या मंडळीला अप्पर ब्राँक्झ मंडळी म्हणून ओळखलं जायचं. मला त्याच मंडळीत नेमण्यात आलं होतं.

१९६५ च्या आसपास लॅट्‌वीयन देशातलं एक साक्षीदार कुटुंब दक्षिण ब्राँक्झमधल्या मंडळीच्या क्षेत्रात राहायला आलं. याच मंडळीच्या क्षेत्रात त्यांना पहिल्यांदा सत्य मिळालं होतं. त्यांची सर्वात मोठी मुलगी, लिवीया हिने शाळा पूर्ण केल्यानंतर लगेचच पायनियर सेवा सुरू केली होती. त्याच्या काही महिन्यांनंतर ती प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी, म्हणजे मॅसेच्यूसिट्‌स या ठिकाणी गेली. मी तिला आमच्या मंडळीचा हालहवाल पत्रांद्वारे कळवायचो, आणि ती मला बॉस्टनमध्ये सेवाकार्यात आलेल्या तिच्या चांगल्या अनुभवांबद्दल लिहून कळवायची.

लिवीयासोबत

काही वर्षांनंतर लिवीयाला खास पायनियर म्हणून नेमण्यात आलं. यहोवाच्या सेवेत जास्तीत जास्त करण्याची तिची मनापासून इच्छा होती. त्यामुळे तिने बेथेल सेवेसाठी अर्ज भरला आणि तिला १९७१ साली बेथेल सेवेसाठी बोलावण्यात आलं. असं वाटत होतं जणू आम्ही भेटावं ही यहोवाचीच इच्छा होती! २७ ऑक्टोबर १९७३ मध्ये आमचं लग्न झालं. बंधू नॉर यांनी स्वतः आमच्या लग्नाचं भाषण दिलं, हा आमच्यासाठी खरंच खूप मोठा सन्मान होता. नीतिसूत्रे १८:२२ मध्ये म्हटलं आहे: “ज्याला गृहिणी लाभते त्यास उत्तम लाभ घडतो. त्यास परमेश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो.” लिवीया आणि मला ४० वर्षं सोबत मिळून बेथेलमध्ये सेवा करण्याचा आशीर्वाद मिळाला. आणि आम्ही आजही ब्राँक्झमधल्या मंडळीमध्ये सेवा करत आहोत.

ख्रिस्ताच्या बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून केलेली सेवा

बंधू नॉर यांच्यासोबत काम करण्याची मिळालेली संधी माझ्यासाठी एक चांगला अनुभव होता. ते फार मेहनती होते आणि मिशनरी सेवा करणाऱ्या जगभरातल्या बंधुभगिनींप्रती त्यांना खूप कदर वाटायची. मिशनरी सेवा करणाऱ्या या बंधुभगिनींपैकी अनेक जण, ते सेवा करत असलेल्या देशातले पहिलेच साक्षीदार होते. बंधू नॉर हे १९७६ पासून कॅन्सरचा सामना करत होते. त्यांना होत असलेला त्रास पाहून फार वाईट वाटायचं. एकदा ते अंथरुणाला खिळलेले असताना, छपाई करण्यासाठी असलेलं प्रकाशन त्यांनी मला वाचायला सांगितलं. त्यांनी मला बंधू फ्रेडरिक फ्रांझ यांनाही बोलावून आणायला सांगितलं, म्हणजे प्रकाशन वाचलं जात असताना तेही ऐकू शकतील. नंतर मला कळलं की बंधू फ्रांझ यांना नीट दिसत नसल्यामुळे बंधू नॉर हे वेळोवेळी त्यांना अशा प्रकारे छपाईसाठी असलेली प्रकाशनं वाचून दाखवायचे.

१९७७ मध्ये डॅनियेल आणि मरीना सिडलीक यांच्यासोबत झोन व्हिसिटच्या वेळी

बंधू नॉर यांचा १९७७ मध्ये मृत्यू झाला. त्यांनी पृथ्वीवरची आपली सेवा विश्वासाने पूर्ण केली हे माहीत असल्यामुळे, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्यांना ओळखणाऱ्या लोकांना दिलासा मिळाला. (प्रकटी. २:१०) त्यानंतर बंधू फ्रांझ संघटनेचं नेतृत्व करू लागले.

त्या वेळी मी बंधू मिल्टन हेन्शेल यांचा सचिव म्हणून काम पाहायचो. बंधू हेन्शेल यांनी बंधू नॉर यांच्यासोबत बरीच वर्षं काम केलं होतं. हेन्शेल यांनी मला सांगितलं की यानंतर बंधू फ्रांझ यांना बेथेलमध्ये हवी असलेली कोणतीही मदत पुरवण्याची जबाबदारी माझी असेल. त्यामुळे मी नियमित रीत्या छपाईसाठी असलेली प्रकाशनं त्यांना वाचून दाखवायचो. बंधू फ्रांझ यांची स्मरणशक्ती खूप चांगली होती, आणि जे वाचून दाखवलं जात आहे त्यावर ते बारकाईनं लक्ष द्यायचे. डिसेंबर १९९२ मध्ये त्यांनी पृथ्वीवरची आपली सेवा पूर्ण केली. प्रकाशनं वाचण्याद्वारे मी त्यांना जी मदत केली, त्यामुळे मला खरंच खूप आनंद मिळाला.

१२४ कोलंबिया हाईट्‌स, इथं मी अनेक दशकं सेवा केली

मी ६१ वर्षं बेथेलमध्ये सेवा केली आहे. आणि ही वर्षं फार लवकर सरली असं मला वाटतं. माझे आईवडील शेवटपर्यंत यहोवाला विश्वासू राहिले. नवीन जगात त्यांचं स्वागत करण्याची मी आतुरतेनं वाट पाहात आहे. (योहा. ५:२८, २९) देवाच्या लोकांसाठी जगभरात अनेक बंधुभगिनी विश्वासाने यहोवाचं कार्य करत आहेत. अशा विश्वासू बंधुभगिनींसोबत मिळून काम करण्याच्या संधीची, या जगातल्या कोणत्याही गोष्टीशी तुलना करता येणार नाही. पूर्णवेळेच्या सेवेमध्ये मला आणि लिवीयाला जो काही अनुभव आला त्यावरून आम्ही एक गोष्ट खात्रीने म्हणू शकतो. ती म्हणजे: ‘परमेश्वराविषयीचा जो आनंद आहे तोच आमचा आजवर आश्रयदुर्ग राहिला आहे.’—नहे. ८:१०.

आज जगभरात आनंदाच्या संदेशाचा प्रसार होत आहे आणि हे कार्य देवाच्या संघटनेत काम करत असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर अवलंबून नाही. विश्वासात खंबीर असलेल्या आणि देवाला एकनिष्ठ असलेल्या अनेक बंधुभगिनींसोबत मिळून मी आजपर्यंत जी सेवा केली, तो माझ्यासाठी खरंच खूप मोठा सन्मान आहे. ज्या अभिषिक्त लोकांसोबत मी सेवा केली त्यांपैकी अनेक जण आज या पृथ्वीवर नाहीत. पण, अशा विश्वासू आणि आध्यात्मिक जणांसोबत काम करण्याची मला सुसंधी मिळाली यासाठी मी खरंच खूप कृतज्ञ आहे.

^ परि. 5 बायबलमध्ये आढळणारे शिओल आणि हेडीस हे मूळ हिब्रू व ग्रीक भाषेतले शब्द, मानवांच्या सर्वसाधारण कबरेला सूचित करतात. पण बायबलच्या काही भाषांतरांमध्ये यांचा अनुवाद “नरक” असा करण्यात आला आहे.