व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आपल्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते”

“आपल्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते”

“गवत सुकते; फूल कोमेजते, पण आपल्या देवाचे वचन सर्वकाळ कायम राहते.”—यश. ४०:८.

गीत क्रमांक: ४३, ४८

१, २. (क) आपल्याकडे जर बायबल नसतं तर आपलं जीवन कसं असतं? (ख) देवाच्या वचनाचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा केव्हा होऊ शकतो?

आपल्याकडे जर बायबल नसतं तर आपलं जीवन कसं असतं याची तुम्ही कल्पना करू शकता का? दैनंदिन जीवनातले निर्णय घेण्यासाठी आपल्याला सुज्ञ सल्ला मिळाला नसता. देवाविषयी, जीवनाविषयी किंवा भविष्याविषयी असलेलं सत्य आपल्याला कळालं नसतं. तसंच, प्राचीन काळात यहोवाने मानवजातीसाठी कोणत्या गोष्टी केल्या, हेही आपल्याला कळालं नसतं.

पण, आनंदाची गोष्ट म्हणजे आपण अशा वाईट परिस्थितीत नाही. यहोवाने आपल्याला त्याचं वचन, बायबल दिलं आहे. आणि त्याचं हे वचन सदासर्वकाळ कायम राहील असं अभिवचनही त्याने दिलं आहे. यशया ४०:८ मध्ये लिहिलेल्या शब्दांचा प्रेषित पेत्रने उल्लेख केला. त्याने जे लिहिलं ते खासकरून बायबलविषयी लिहिलेलं नसलं, तरी बायबलमधल्या संदेशाला मात्र ते नक्कीच लागू होतं. (१ पेत्र १:२४, २५ वाचा.) आपण जेव्हा स्वतःच्या भाषेत बायबल वाचतो, तेव्हा आपल्याला त्याचा जास्तीत जास्त फायदा होतो. आणि ही गोष्ट देवाच्या वचनावर प्रेम करणाऱ्या लोकांना चांगली माहीत होती. त्यामुळेच, तीव्र विरोध होत असतानाही बायबलचं भाषांतर करण्यासाठी आणि ते सर्वांना उपलब्ध करून देण्यासाठी, गेली कित्येक शतकं अनेकांनी फार मेहनत घेतली. कारण, “सर्व प्रकारच्या लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्याचे अचूक ज्ञान मिळावे,” अशी यहोवाची इच्छा आहे.—१ तीम. २:३, ४

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

या लेखात आपण पाहणार आहोत, की (१) भाषेमध्ये बदल झाला असतानाही, (२) राजकीय क्षेत्रात बदल झाले असतानाही, आणि (३) बायबलच्या भाषांतराला विरोध झाला असतानाही, देवाचं वचन कसं कायम राहिलं. या गोष्टींवर चर्चा केल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल? यामुळे बायबलविषयी आणि ज्याने आपल्याला बायबल दिलं त्या यहोवा देवाविषयी असलेली आपली कदर आणखी वाढेल.—मीखा ४:२; रोम. १५:४.

भाषेमध्ये बदल झाला असतानाही

४. (क) काळानुसार भाषा कशी बदलते? (ख) यहोवा देव कोणत्याही एका भाषेला महत्त्व देत नाही हे आपण कशावरून म्हणू शकतो? आणि हे माहीत असल्यामुळे तुम्हाला कसं वाटतं?

काळ बदलतो, तशी भाषाही बदलते. एके काळी एखाद्या शब्दाचा जो अर्थ होता तो काळानुसार बदलूही शकतो. तुमच्या भाषेतलं असं एखादं उदाहरण कदाचित तुम्हाला आठवत असेल. हीच गोष्ट प्राचीन काळातल्या भाषेबद्दलही खरी आहे. आज बोलली जाणारी हिब्रू व ग्रीक भाषा, आणि बायबल लिहिलं गेलं ती हिब्रू व ग्रीक भाषा यांत खूप फरक आहे. ज्या जुन्या हिब्रू आणि ग्रीक भाषेत बायबल लिहिण्यात आलं होतं त्या भाषा आज अनेकांना समजत नाहीत; आणि त्यामुळे त्यांना भाषांतर केलेल्या बायबलची गरज पडते. काहींनी असा विचार केला, की जर त्यांनी प्राचीन काळातली हिब्रू आणि ग्रीक भाषा शिकून घेतली, तर त्यांना बायबल अधिक चांगल्या रीतीने समजेल. पण खरंतर, त्या प्राचीन भाषा शिकून घेतल्यानंतरही त्यांना वाटते तितकी मदत होऊ शकणार नाही. म्हणूनच, आज संपूर्ण बायबलचं किंवा बायबलच्या काही भागांचं जवळजवळ ३,००० भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलं आहे, याबद्दल आपण खरंच किती कृतज्ञ आहोत! यावरून दिसून येतं की “प्रत्येक राष्ट्राच्या, वंशाच्या, भाषेच्या” लोकांना आपल्या वचनापासून फायदा व्हावा अशी यहोवाची इच्छा आहे. (प्रकटीकरण १४:६ वाचा.) ही गोष्ट तुम्हाला, आपल्या निःपक्षपाती आणि प्रेमळ देवाच्या आणखी जवळ जाण्याचं प्रोत्साहन देत नाही का?—प्रे. कार्ये १०:३४

५. किंग जेम्स व्हर्शन हे बायबल इतकं महत्त्वाचं का ठरलं?

काळानुसार भाषा बदलत असल्यामुळे, बायबलच्या भाषांतरावरसुद्धा त्याचा परिणाम होतो. एखादं बायबल भाषांतर जेव्हा पहिल्यांदा छापण्यात येतं तेव्हा ते समजण्यास सोपं असतं. पण, काळ बदलतो तसं तेच भाषांतर समजण्यास कदाचित तितकं सोपं वाटणार नाही. याचं एक उदाहरण म्हणजे, १६११ मध्ये पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आलेलं किंग जेम्स व्हर्शन. त्या काळात सर्वात प्रचलित असलेल्या बायबलच्या इंग्रजी भाषांतरांपैकी ते एक होतं. किंग जेम्स व्हर्शन या भाषांतरात ज्या इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आला आहे, त्यांचा आजच्या आधुनिक इंग्रजी भाषेवरही प्रभाव पडला आहे. * पण, त्या भाषांतरात मात्र फार कमी वेळा यहोवा देवाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मूळ हिब्रू शास्त्रवचनांत जिथे-जिथे देवाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे, तिथे-तिथे त्या भाषांतरात बहुतेक वेळा मोठ्या अक्षरांत “प्रभू” हा शब्द वापरण्यात आला आहे. शिवाय याच भाषांतराच्या, नंतर प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रीक शास्त्रवचनांच्या प्रतींमध्येही, देवाच्या नावाच्या ठिकाणी मोठ्या अक्षरांत “प्रभू” असा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून खरंतर किंग जेम्स व्हर्शन हे बायबल कबूल करतं, की ग्रीक शास्त्रवचनांतही देवाच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

६. आज आपल्याकडे नवे जग भाषांतर उपलब्ध आहे यासाठी आपण कृतज्ञ का आहोत?

किंग जेम्स व्हर्शन हे बायबल जेव्हा पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आलं, तेव्हा त्यातली इंग्रजी भाषा ही त्या काळी आधुनिक वाटायची. पण काळ बदलला तशी ती जुनी आणि वापरात नसलेली वाटू लागली; आणि आजच्या काळात तर ती समजायलाही कठीण आहे. हीच गोष्ट इतर भाषांमधल्या बायबल भाषांतरांच्या बाबतीतही घडली. त्यामुळेच आज आपल्याकडे आधुनिक भाषांमध्ये नवे जग भाषांतर उपलब्ध आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! बायबलचं हे संपूर्ण भाषांतर किंवा त्याचे काही भाग १५० पेक्षा जास्त भाषांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. याचाच अर्थ जगातले बहुतेक लोक स्वतःच्या भाषेमध्ये हे भाषांतर वाचू शकतात. या भाषांतरात आधुनिक आणि लगेच समजतील असे शब्द वापरण्यात आले आहेत. त्यामुळे देवाचं वचन सहज आपल्या हृदयापर्यंत पोचू शकतं. (स्तो. ११९:९७) पण याहून उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, मूळ भाषेत ज्या-ज्या ठिकाणी देवाच्या नावाचा उल्लेख आढळतो त्या-त्या ठिकाणी या भाषांतरात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

राजकीय क्षेत्रात बदल झाले असतानाही

७, ८. (क) इ.स.पू. तिसऱ्या शतकात अनेक यहुद्यांना हिब्रू शास्त्रवचनं समजणं कठीण का होतं? (ख) ग्रीक सेप्टुअजिंट काय आहे?

जागतिक पातळीवर राजकीय क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे काही वेळा लोकांच्या भाषेत बदल झाला. पण अशा वेळीही लोकांना समजेल अशा भाषेत बायबल उपलब्ध होईल याची यहोवाने खात्री केली. उदाहरणार्थ, बायबलमधली पहिली ३९ पुस्तकं यहुदी किंवा इस्राएली लोकांनी लिहिली होती. सुरुवातीला त्यांनाच “देवाची पवित्र वचने” सोपवण्यात आली होती. (रोम. ३:१, २) त्यांनी बायबलमधली ही पुस्तकं हिब्रू किंवा अरामी भाषेत लिहिली. पण, इ.स.पू. तिसऱ्या शतकापर्यंत अशी वेळ आली, जेव्हा बहुतेक यहुदी लोकांना हिब्रू भाषा समजत नव्हती. का? कारण, ग्रीसचा सम्राट सिकंदर याने जगाच्या बऱ्याचशा भागावर आपलं राज्य स्थापन केलं होतं; आणि त्यामुळे जिथे-जिथे ग्रीक लोकांचं राज्य होतं तिथे-तिथे ग्रीक भाषा प्रचलित झाली. अनेक लोक स्वतःच्या भाषेऐवजी ग्रीक भाषाच बोलू लागले. (दानी. ८:५-७, २०, २१) आणि अनेक यहुदीही ग्रीक भाषाच बोलायचे. त्यामुळे हिब्रू भाषेत लिहिलेलं बायबल समजणं त्यांना कठीण जायचं. मग यावर उपाय काय होता?

येशू ख्रिस्ताच्या जन्माआधी साधारण २५० वर्षांपूर्वी बायबलच्या पहिल्या पाच पुस्तकांचं ग्रीक भाषेत भाषांतर करण्यात आलं. कालांतराने, संपूर्ण हिब्रू शास्त्रवचनांचंही भाषांतर केलं गेलं. हे भाषांतर ग्रीक सेप्टुअजिंट म्हणून ओळखलं जातं. आजवर माहीत असलेल्या संपूर्ण हिब्रू शास्त्रवचनांचं हे सगळ्यात पहिलं लिखित भाषांतर आहे.

९. (क) सेप्टुअजिंटमुळे आणि सुरुवातीच्या इतर भाषांतरांमुळे लोकांना कशी मदत झाली? (ख) हिब्रू शास्त्रवचनांतला कोणता भाग किंवा वचनं तुम्हाला सर्वात जास्त आवडतात?

सेप्टुअजिंटमुळे ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहुदी लोकांना इब्री शास्त्रवचनांचं वाचन करणं शक्य झालं. देवाचं वचन समजेल अशा भाषेत वाचता किंवा ऐकता आल्यामुळे या लोकांना किती आनंद झाला असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता का? कालांतराने, बायबलच्या काही भागांचं सर्वसामान्यपणे बोलल्या जाणाऱ्या इतर भाषांमध्येही भाषांतर करण्यात आलं. उदाहरणार्थ, सिरियाक, गॉथिक आणि लॅटिन भाषेत. अधिकाधिक लोक देवाचं वचन वाचू व समजू लागले, आणि त्यांना ते आवडू लागलं. आपल्याप्रमाणे त्यांचीही काही आवडती वचनं असतील. (स्तोत्र ११९:१६२-१६५ वाचा.) खरंच, राजकीय क्षेत्रातल्या बदलांमुळे लोकांच्या सर्वसामान्य भाषेत बदल झाला, पण देवाचं वचन मात्र कायम राहिलं.

बायबलच्या भाषांतराला विरोध झाला असतानाही

१०. जॉन विक्लिफ यांच्या जीवनकाळात बहुतेक लोक बायबल का वाचू शकत नव्हते?

१० सर्वसामान्य लोकांपासून बायबल दूर ठेवण्यासाठी आजवर अनेक शक्तिशाली व मोठ्या नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. पण, देवाला भिऊन वागणाऱ्या लोकांनी सर्वांपर्यंत बायबल पोचावं यासाठी प्रयत्न करण्याचं थांबवलं नाही. याचं एक उदाहरण म्हणजे, १४ व्या शतकात इंग्लंडमध्ये राहत असलेले जॉन विक्लिफ. सर्वांना बायबल वाचता यावं असं त्यांना वाटायचं. विक्लिफ यांच्या जीवनकाळात इंग्लंडमध्ये बहुतेक लोकांनी कधीही बायबलचा संदेश स्वतःच्या भाषेत ऐकला नव्हता. शिवाय, बायबल हे अतिशय महाग होतं आणि त्याची प्रत्येक प्रत हाताने लिहून काढावी लागायची. त्यामुळे फार कमी लोकांकडे बायबल होतं. तसंच अनेकांना वाचताही येत नव्हतं. जे लोक चर्चमध्ये जायचे त्यांनी कदाचित बायबल लॅटिन भाषेत मोठ्याने वाचलं जात असताना ऐकलं असेल. पण, ती फार जुनी भाषा होती आणि सर्वसामान्य लोकांना समजायचीसुद्धा नाही. मग लोकांकडे स्वतःच्या भाषेत बायबल असावं यासाठी यहोवाने काय केलं?—नीति. २:१-५.

देवाचं वचन सर्वांकडे असावं अशी जॉन विक्लिफ आणि इतर काहींची इच्छा होती. तुमचीही अशीच इच्छा आहे का? (परिच्छेद ११ पाहा)

११. विक्लिफ यांच्या बायबलमुळे कोणते चांगले परिणाम घडून आले?

११ जॉन विक्लिफ आणि त्यांच्यासोबत आणखी काही लोकांनी १३८२ सालामध्ये बायबलचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं. विक्लिफ यांनी भाषांतर केलेलं बायबल, लॉलड्‌र्स म्हटल्या जाणाऱ्या गटामध्ये खूप प्रसिद्ध झालं. लॉलड्‌र्स हे इंग्लंडमधल्या गावागावांत पायी फिरून लोकांना विक्लिफचं बायबल वाचून दाखवायचे आणि बायबलमधल्या भागांच्या हाताने लिहिलेल्या प्रतीही द्यायचे. त्यांच्या या कार्यांमुळे लोकांची बायबलमधली आस्था पुन्हा जागृत झाली.

१२. विक्लिफ यांच्याबद्दल पाळकवर्गाच्या काय भावना होत्या?

१२ पाळकवर्गाने मात्र विक्लिफचा, त्यांच्या बायबलचा आणि त्यांच्या अनुयायांचा द्वेष केला. त्यांनी लॉलड्‌र्स या गटाचा छळ करण्यास सुरुवात केली; तसंच विक्लिफ यांच्या बायबलच्या ज्या प्रती त्यांना सापडल्या त्याही त्यांनी नष्ट केल्या. विक्लिफ यांचा खरंतर मृत्यू झाला होता, पण तरीसुद्धा पाळकवर्गाने त्यांना पाखंडी आणि चर्चचा शत्रू म्हणून घोषित केलं. त्यांना विक्लिफबद्दल एवढा द्वेष होता, की त्यांनी विक्लिफची कबर खोदून हाडं बाहेर काढली आणि ती जाळून त्यांची राख वाहत्या नदीमध्ये फेकली. पण अनेक लोकांना देवाचं वचन वाचण्याची आणि ते समजून घेण्याची इच्छा होती आणि ही गोष्ट पाळकवर्ग थांबवू शकला नाही. त्यानंतरच्या शतकांमध्ये युरोपमधल्या आणि जगातील इतर भागांतल्या लोकांनी, सर्वसामान्यांना समजेल अशा भाषांत बायबलचं भाषांतर करण्यास आणि त्याची छपाई करण्यास सुरुवात केली.

“तुला जे हितकारक ते मी परमेश्वर तुझा देव तुला शिकवतो”

१३. बायबलच्या भाषांतरांवरून कोणती गोष्ट स्पष्ट होते? आणि यामुळे आपला विश्वास अधिक मजबूत होण्यास कशी मदत होते?

१३ बायबल हे देवाचं प्रेरीत वचन आहे. पण याचा असा अर्थ होत नाही, की सेप्टुअजिंट, विक्लिफचं बायबल, किंग जेम्स व्हर्शन किंवा बायबलची इतर भाषांतरंसुद्धा थेटपणे देवाच्या पवित्र आत्म्याने प्रेरित केलेली आहेत. असं असलं, तरी ही भाषांतरं कशा प्रकारे उपलब्ध करून देण्यात आली त्याचं जेव्हा आपण परीक्षण करतो, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, यहोवाने अभिवचन दिल्यानुसार त्याचं वचन कायम राहिलं आहे. त्यामुळे, देवाने दिलेली इतर सर्व अभिवचनंही नक्कीच पूर्ण होतील यावरचा आपला विश्वास अधिक मजबूत होत नाही का?—यहो. २३:१४.

१४. देवाविषयी आपण जे शिकतो त्यामुळे त्याच्यावरचं आपलं प्रेम कसं वाढतं?

१४ यहोवाने त्याचं वचन कशा प्रकारे सुरक्षित ठेवलं हे जेव्हा आपण पाहतो, तेव्हा त्याच्यावरचा आपला विश्वास आणि आपलं प्रेम अधिक वाढतं. * पण देवाने आपल्याला त्याचं वचन का दिलं? आणि ते कायम राहील असं का सांगितलं? कारण, यहोवाचं आपल्यावर खूप प्रेम आहे आणि आपलं हित होईल अशा गोष्टी आपल्याला शिकवण्याची त्याची इच्छा आहे. (यशया ४८:१७, १८ वाचा.) यामुळे आपणही त्याच्यावर प्रेम करण्यास आणि त्याच्या आज्ञा पाळण्यास प्रवृत्त होतो.—१ योहा. ४:१९; ५:३.

१५. पुढच्या लेखात आपण कोणत्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत?

१५ देवाच्या वचनावर आपलं प्रेम आहे. मग, आपल्या वैयक्तिक अभ्यासादरम्यान त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल? आणि प्रचारकार्यात भेटणाऱ्या लोकांना बायबलबद्दल कदर दाखवण्यास आपण कशी मदत करू शकतो? तसंच, मंडळीमध्ये जे शिकवण्याचं काम करतात ते आपली शिकवण बायबलवर आधारित आहे याची खातरी कशी करू शकतात? या प्रश्नांची उत्तरं आपण पुढच्या लेखात पाहणार आहोत.

^ परि. 5 आज इंग्रजी भाषेत प्रचलित असलेले अनेक वाक्प्रचार हे किंग जेम्स व्हर्शन यातून आले आहेत.

^ परि. 14 स्वतः येऊन पाहा!” ही चौकट पाहा.