व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“देवाचे वचन जिवंत व प्रभावशाली” आहे

“देवाचे वचन जिवंत व प्रभावशाली” आहे

“देवाचे वचन जिवंत व प्रभावशाली” आहे.—इब्री ४:१२.

गीत क्रमांक: ३७, १३

१. देवाचं वचन प्रभावशाली आहे असं तुम्ही खातरीने का म्हणू शकता? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

यहोवाचं वचन, अर्थात मानवांसाठी असलेला त्याचा संदेश “जिवंत व प्रभावशाली” आहे, याची त्याच्या लोकांना पूर्ण खातरी आहे. (इब्री ४:१२) बायबलचं सामर्थ्य आपण स्वतःच्या जीवनात अनुभवलं आहे आणि इतरांच्या जीवनावरही त्याचा प्रभाव झाल्याचं पाहिलं आहे. उदाहरणार्थ, साक्षीदार होण्याआधी काही जण चोऱ्यामाऱ्या करणारे, ड्रग्ज घेणारे किंवा अनैतिक लैंगिक कृत्यं करणारे होते. तर, इतर काहींकडे भरपूर पैसा किंवा प्रतिष्ठा असूनही, जीवनात काहीतरी कमी असल्याचं त्यांना जाणवायचं. (उप. २:३-११) पण आनंदाची गोष्ट म्हणजे, एकेकाळी कोणतीही आशा नसलेल्या आणि भरकटलेल्या अनेकांना जीवनात योग्य दिशा व आशा मिळाली आहे. असे कितीतरी अनुभव आपण टेहळणी बुरूज मासिकातल्या, “बायबलने बदललं जीवन” या लेखमालेत वाचले आहेत. अर्थात, ख्रिस्ती बनल्यानंतरही एका व्यक्तीने बायबलच्या साहाय्याने यहोवासोबतचा तिचा नातेसंबंध मजबूत करत राहण्याची गरज आहे.

२. पहिल्या शतकातल्या लोकांवर देवाच्या वचनाच्या सामर्थ्याचा कसा प्रभाव पडला?

बायबलमधलं सत्य शिकल्यावर अनेकांनी जीवनात मोठे बदल केले याचं आपल्याला आश्चर्य वाटत नाही. कारण, स्वर्गीय जीवनाची आशा असलेल्या पहिल्या शतकातल्या आपल्या बंधुभगिनींनीसुद्धा त्यांच्या जीवनात अनेक बदल केले होते. (१ करिंथकर ६:९-११ वाचा.) देवाच्या राज्याचे वारसदार कोण होतील हे सांगताना पौल म्हणाला: “तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते.” पण, ते देवाच्या वचनाच्या आणि पवित्र आत्म्याच्या मदतीने आपल्या जीवनशैलीत बदल करू शकले. अर्थात, ख्रिस्ती बनल्यानंतरसुद्धा त्यांच्यापैकी काहींनी गंभीर चुका केल्या आणि त्यामुळे यहोवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर परिणाम झाला. उदाहरणार्थ, बायबलमध्ये अशा एका अभिषिक्त बांधवाबद्दल सांगण्यात आलं आहे ज्याला मंडळीतून बहिष्कृत करण्याची गरज पडली. पण, त्याने नंतर आपल्या जीवनात योग्य ते बदल केले आणि तो पुन्हा ख्रिस्ती मंडळीचा भाग बनला. (१ करिंथ. ५:१-५; २ करिंथ. २:५-८) आपले बंधुभगिनी देवाच्या वचनाच्या सामर्थ्याने जीवनात अनेक बदल करू शकले ही आपल्यासाठी किती प्रोत्साहनदायक गोष्ट आहे!

३. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

देवाचं वचन खरंच खूप प्रभावशाली आहे. यहोवाने त्याचं जे वचन आपल्याला दिलं आहे त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्याची आपली इच्छा आहे. (२ तीम. २:१५) या लेखात आपण हे पाहणार आहोत, की आपण देवाच्या वचनाच्या सामर्थ्याचा (१) आपल्या वैयक्तिक जीवनात, (२) सेवाकार्यात आणि (३) व्यासपीठावरून शिकवताना उपयोग कसा करू शकतो? आपला स्वर्गीय पिता, यहोवा आपल्या हितासाठीच आपल्याला शिकवत असतो. तेव्हा, या लेखातून आपण जे काही शिकणार आहोत त्यामुळे यहोवाबद्दल प्रेम आणि कदर व्यक्त करण्यास आपल्याला मदत मिळेल.—यश. ४८:१७.

वैयक्तिक जीवनात

४. (क) जीवनात देवाच्या वचनाचा प्रभाव अनुभवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? (ख) आपण बायबलचं वाचन करण्यासाठी वेळ कसा काढू शकतो?

वैयक्तिक जीवनात देवाच्या वचनाचा प्रभाव अनुभवण्यासाठी आपण नियमितपणे त्याचं वाचन केलं पाहिजे. खरंतर, आपण दररोज बायबलचं वाचन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (यहो. १:८) हे खरं आहे, की आपल्यापैकी अनेक जण खूप व्यस्त असतात. पण, आपण कोणत्याच गोष्टीला, अगदी आपल्या जबाबदाऱ्यांनासुद्धा बायबल वाचनाच्या आड येऊ देऊ नये. (इफिसकर ५:१५, १६ वाचा.) आपण कदाचित सकाळच्या वेळी, दिवसा कधीतरी किंवा मग रात्री झोपण्याआधी बायबलचं वाचन करू शकतो. आपल्यालासुद्धा स्तोत्रकर्त्याप्रमाणेच वाटतं. त्याने म्हटलं: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.”—स्तो. ११९:९७.

५, ६. (क) आपण मनन का केलं पाहिजे? (ख) आपल्याला अधिक अर्थपूर्ण रीतीने मनन कसं करता येईल? (ग) बायबलचं वाचन केल्याने आणि त्यावर मनन केल्याने तुम्हाला कसा फायदा झाला आहे?

अर्थात, बायबलचं केवळ वाचन करणं पुरेसं नाही. त्यासोबत आपण वाचलेल्या माहितीवर मनन किंवा सखोल विचारसुद्धा केला पाहिजे. (स्तो. १:१-३) असं केलं तरच, बायबलमधून मिळणाऱ्या बुद्धीचा आपण आपल्या जीवनात उपयोग करू शकू. त्यामुळे, आपण बायबलचं वाचन इलेक्ट्रॉनिक उपकरणावर करत असू किंवा छापील स्वरूपात करत असू, देवाचं वचन आपल्या हृदयापर्यंत पोचवणं हाच आपला उद्देश असला पाहिजे.

आपल्याला अधिक अर्थपूर्ण रीतीने मनन कसं करता येईल? त्यासाठी, बायबलचा काही भाग वाचल्यावर आपण थोडं थांबून स्वतःला हे विचारू शकतो: ‘या माहितीवरून मी यहोवाबद्दल काय शिकतो? या भागात दिलेलं तत्त्व मी आधीपासूनच कशा प्रकारे लागू करत आहे? मला आणखी कुठे सुधारणा करण्याची गरज आहे?’ आपण देवाच्या वचनावर मनन करतो आणि प्रार्थना करतो, तेव्हा वाचलेली माहिती जीवनात लागू करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते. आणि मग, बायबलच्या सामर्थ्याचा प्रभाव आपण आपल्या वैयक्तिक जीवनात अनुभवतो.—२ करिंथ. १०:४, ५.

सेवाकार्यात

७. आपण सेवाकार्यात देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे उपयोग कसा करू शकतो?

प्रचारकार्य करताना आणि लोकांना शिकवताना बायबलचा वारंवार उपयोग करणं खूप महत्त्वाचं आहे. याविषयी बोलताना एका बांधवाने म्हटलं: “तुम्ही जर यहोवासोबत घरोघरचं कार्य करत असता, तर नेहमी स्वतःच बोलला असता की यहोवालासुद्धा बोलण्याची संधी दिली असती?” आपण एखाद्या व्यक्तीला बायबलमधून वचन वाचून दाखवतो तेव्हा खरंतर आपण यहोवाला बोलण्याची संधी देत असतो. विचारपूर्वक निवडलेलं एखादं शास्त्रवचन, आपल्या बोलण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक प्रभावशाली ठरू शकतं. (१ थेस्सलनी. २:१३) तेव्हा स्वतःला विचारा: ‘सेवाकार्यात असताना एखादं शास्त्रवचन वाचून दाखवण्याची संधी मी नेहमी शोधतो का?’

८. प्रचारकार्यात शास्त्रवचनं नुसतीच वाचणं पुरेसं का नाही?

पण, बायबलमधून एखादं वचन नुसतंच वाचून दाखवणं पुरेसं नाही. बऱ्याच लोकांना बायबल समजत नाही. पहिल्या शतकातसुद्धा अनेकांना त्याचा अर्थ समजत नव्हता आणि आजसुद्धा तेच पाहायला मिळतं. (रोम. १०:२) आपण वाचलेलं शास्त्रवचन घरमालकाला नक्कीच समजलं असेल, असं आपण गृहीत धरू नये. तर, आपण वचनातल्या मुख्य शब्दांचा किंवा मुद्द्‌यांचा पुन्हा उल्लेख करून त्यांचा अर्थही घरमालकाला समजावून सांगितला पाहिजे. असं केल्यास, देवाचं वचन लोकांच्या हृदयापर्यंत पोचू शकेल.लूक २४:३२ वाचा.

९. एखादं शास्त्रवचन वाचून दाखवण्याआधी आपण जे काही बोलतो त्यामुळे घरमालकाच्या मनात बायबलविषयी आदर कसा निर्माण होऊ शकतो?

एखादं शास्त्रवचन वाचून दाखवण्याआधी आपण जे काही बोलतो, त्यामुळेसुद्धा घरमालकाच्या मनात बायबलविषयी आदर निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, आपण असं म्हणू शकतो: “याविषयी आपला निर्माणकर्ता काय म्हणतो ते आपण पाहू.” किंवा मग, ख्रिस्ती नसलेल्या एखाद्या व्यक्तीशी जर आपण बोलत असू, तर आपण असं म्हणू शकतो: “याबद्दल पवित्रशास्त्रात काय म्हटलं आहे ते आपण पाहू.” आणि जर धर्माबद्दल आस्था नसलेली व्यक्ती आपल्याला भेटली, तर आपण तिला असं म्हणू शकतो: “प्राचीन काळातला हा सुविचार तुम्ही कधी ऐकला आहे का?” प्रत्येक व्यक्तीची पार्श्‍वभूमी आणि विश्वास वेगळा असतो ही गोष्ट जर आपण लक्षात ठेवली, तर एखादं शास्त्रवचन वाचून दाखवण्याआधी आपण जे काही बोलू त्याचा चांगला विचार करू.—१ करिंथ. ९:२२, २३.

१०. (क) एका बांधवाला कोणता अनुभव आला? (ख) देवाचं वचन सेवाकार्यात प्रभावशाली ठरतं याचा तुम्हाला अनुभव आला आहे का?

१० सेवाकार्यात देवाच्या वचनाचा उपयोग केल्याने लोकांच्या मनावर किती जबरदस्त प्रभाव पडू शकतो, हे अनेकांनी अनुभवलं आहे. असाच एक अनुभव विचारात घ्या. एक वयस्कर मनुष्य गेली अनेक वर्षं आपली मासिकं वाचता होता. एकदा आपला एक बांधव त्याची पुन्हा भेट घेण्यासाठी गेला, तेव्हा नुसतंच टेहळणी बुरूज मासिक देण्याऐवजी त्याने एक शास्त्रवचनसुद्धा वाचून दाखवण्याचं ठरवलं. त्याने २ करिंथकर १:३, ४ हे वचन वाचलं. त्यात म्हटलं आहे: “जो अतिशय करुणामय असा पिता आहे, आणि सर्व प्रकारच्या सांत्वनाचा देव आहे, . . . तो आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपले सांत्वन करतो.” या शब्दांचा त्या माणसाच्या मनावर इतका प्रभाव पडला, की त्याने त्या बांधवाला ते वचन पुन्हा वाचून दाखवायला सांगितलं. त्यानंतर त्याने म्हटलं, की त्याला आणि त्याच्या पत्नीला सांत्वनाची खरंच खूप गरज होती. बांधवाने हे वचन वाचल्यामुळे त्या मनुष्याला बायबलबद्दल अधिक जाणून घ्यावंसं वाटलं. देवाचं वचन सेवाकार्यात नक्कीच प्रभावशाली ठरू शकतं असं तुम्हाला वाटत नाही का?—प्रे. कार्ये १९:२०.

व्यासपीठावरून शिकवताना

११. व्यासपीठावरून शिकवणाऱ्या बांधवांवर कोणती जबाबदारी आहे?

११ आपल्या सर्वांनाच ख्रिस्ती सभांना, संमेलनांना आणि अधिवेशनांना उपस्थित राहायला आवडतं. आपण मुळात यहोवाची उपासना करण्यासाठी तिथे उपस्थित राहतो. शिवाय, त्या ठिकाणी आपण जे काही शिकतो त्याचा आपल्याला फायदाच होतो. म्हणूनच, व्यासपीठावरून शिकवणाऱ्या बांधवांसाठी हा एक मोठा बहुमान असला, तरी ती एक मोठी जबाबदारीही आहे. (याको. ३:१) ते जे काही शिकवतात ते पूर्णपणे देवाच्या वचनावर आधारित आहे, याची त्यांनी खातरी केली पाहिजे. तुम्हाला हा बहुमान मिळाला असल्यास, व्यासपीठावरून शिकवताना तुम्ही देवाच्या वचनाच्या सामर्थ्याचा उपयोग कसा करू शकता?

१२. आपलं भाषण शास्त्रवचनांवर आधारित आहे याची खातरी एक वक्ता कशी करू शकतो?

१२ शास्त्रवचनं ही कोणत्याही भाषणाचा सगळ्यात मुख्य भाग असला पाहिजे. (योहा. ७:१६) त्यामुळे, भाषण देताना बायबलपेक्षा जास्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे, म्हणजे तुम्ही जे अनुभव किंवा उदाहरणं वापरता किंवा ज्या पद्धतीनं भाषण देता, त्यांकडे श्रोत्यांचं लक्ष आकर्षित होणार नाही याची काळजी घ्या. तसंच, बायबलमधून वाचणं आणि बायबलमधून शिकवणं यात खूप फरक आहे हेसुद्धा लक्षात असू द्या. खरंतर, तुम्ही खूप जास्त शास्त्रवचनं वापरली, तर अनेकांच्या ती लक्षातही राहणार नाहीत. त्यामुळे, शास्त्रवचनांची काळजीपूर्वक निवड करा. मग ती वाचण्यासाठी, त्यांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी, त्यावर उदाहरण देण्यासाठी आणि ती कशी लागू करता येतील हे शिकवण्यासाठी पुरेसा वेळ द्या. (नहे. ८:८) एखाद्या भाषणाची रूपरेषा दिलेली असेल, तर त्या रूपरेषाचा आणि तिच्यातल्या सर्व शास्त्रवचनांचा चांगला अभ्यास करा. शास्त्रवचनं रूपरेषेशी कशी जुळतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग, रूपरेषेतले मुद्दे शिकवण्यासाठी काही शास्त्रवचनांचा उपयोग करा. (या विषयीचे काही चांगले मुद्दे तुम्हाला परमेश्वर की सेवा स्कूल से फायदा उठाइए पुस्तकातले अध्याय २१, २२ आणि २३ मध्ये मिळू शकतात.) आणि सगळ्यात मुख्य म्हणजे, यहोवाचे मौल्यवान विचार बायबलच्या साहाय्याने श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचवण्यासाठी प्रार्थना करा.एज्रा ७:१०; नीतिसूत्रे ३:१३, १४ वाचा.

१३. (क) सभेमध्ये ऐकलेल्या शास्त्रवचनाचा एका बहिणीच्या मनावर कसा प्रभाव पडला? (ख) सभांमध्ये ज्या पद्धतीने बायबलचा उपयोग केला जातो त्यामुळे तुमच्या मनावर कसा प्रभाव पडला आहे?

१३ ऑस्ट्रेलियातली आपली एक बहीण लहान होती तेव्हा तिच्यासोबत अनेक वाईट घटना घडल्या होत्या. त्यामुळे पुढे यहोवाची ओळख झाल्यानंतरसुद्धा, त्याचं आपल्यावर प्रेम आहे यावर ती पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नव्हती. पण, एकदा तिने सभेत एक शास्त्रवचन ऐकलं आणि ते वचन तिच्या मनाला खूप भिडलं. तिने त्यावर मनन केलं आणि आपल्या प्रकाशनांत संशोधनही केलं. त्यामुळे, त्या शास्त्रवचनाशी संबंधित असलेली आणखी शास्त्रवचनं तिला सापडली. आणि तिची खातरी पटली की यहोवा खरोखर तिच्यावर प्रेम करतो. * तुम्हीसुद्धा कधी एखाद्या सभेत, संमेलनात किंवा अधिवेशनात तुमच्या मनावर खोल परिणाम करणारं एखादं शास्त्रवचन ऐकलं आहे का?—नहे. ८:१२.

१४. यहोवाच्या वचनाबद्दल आपल्याला कदर व प्रेम आहे हे आपण कसं दाखवून देऊ शकतो?

१४ यहोवाने आपल्याला त्याचं लिखित वचन दिलं आहे, याबद्दल आपण खरंच किती कृतज्ञ आहोत! यहोवाने अभिवचन दिलं होतं, की त्याचं वचन कायम राहील आणि ते अभिवचन त्याने पूर्ण केलं आहे. (१ पेत्र १:२४, २५) त्यामुळे, आपण नियमितपणे बायबलचं वाचन केलं पाहिजे, ते जीवनात लागू केलं पाहिजे आणि इतरांना मदत करण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. असं करण्याद्वारे आपण दाखवून देऊ, की या मौल्यवान वचनासाठी, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे त्याचा लेखक, यहोवा याच्यासाठी आपल्या मनात खरं प्रेम आणि कदर आहे.