व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण करा

यहोवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण करा

“परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव.”—निर्ग. ३४:६.

गीत क्रमांक: १८, १२

१. यहोवाने एका प्रसंगी मोशेला स्वतःची ओळख कशी करून दिली? आणि त्यावरून काय दिसून येतं?

एका प्रसंगी, मोशेला स्वतःची ओळख करून देताना देवाने आपलं नाव व आपले काही गुण सांगितले. यहोवा देव खरंतर आपल्या शक्तीच्या आणि बुद्धीच्या गुणांवर भर देऊ शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. त्याने आधी आपल्या दयाळूपणाच्या आणि कृपाळूपणाच्या गुणांवर भर दिला. (निर्गम ३४:५-७ वाचा.) त्या वेळी मोशेला या गोष्टीचं आश्वासन हवं होतं, की यहोवा त्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे, यहोवाने आपल्या अशा गुणांवर भर दिला ज्यांवरून त्याला आपल्या सेवकांना मदत करण्याची मनापासून इच्छा आहे हे दिसून येईल. (निर्ग. ३३:१३) यहोवाला आपली किती काळजी आहे हे जाणून तुम्हाला कसं वाटतं? या लेखात आपण कनवाळूपणाच्या गुणावर चर्चा करणार आहोत. कनवाळूपणा म्हणजे, दुःखात किंवा त्रासात असलेल्या व्यक्तीबद्दल सहानुभूती वाटणं आणि तिला मदत करण्याची मनापासून इच्छा असणं.

२, ३. (क) मानव स्वभावतःच कनवाळू असतात हे कशावरून दिसून येतं? (ख) कनवाळूपणाबद्दल आपण अधिक जाणून का घेतलं पाहिजे?

यहोवा अतिशय कनवाळू आहे. आणि मानवांना त्याच्याच प्रतिरूपात निर्माण करण्यात आलं आहे. त्यामुळे मानव स्वभावतःच इतरांची काळजी घेतात. अगदी यहोवाला न ओळखणारे लोकसुद्धा सहसा कनवाळूपणा दाखवतात. (उत्प. १:२७) याची कितीतरी उदाहरणं बायबलमध्ये आपल्याला वाचायला मिळतात. उदाहरणार्थ शलमोन राजाने, दोन स्त्रियांपैकी बाळाची खरी आई कोण आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांची परीक्षा घेतली. त्याने बाळाचे दोन तुकडे करण्याची आज्ञा दिली. ते ऐकून, बाळाच्या आईच्या मनात ममतेची भावना दाटून आली आणि बाळ दुसऱ्या स्त्रीला देण्यात यावं अशी तिने कळकळून राजाला विनंती केली. (१ राजे ३:२३-२७) कनवाळूपणा दाखवलेली आणखी एक व्यक्ती म्हणजे फारोची मुलगी, जिने बाळ मोशेचा जीव वाचवला होता. तिला सापडलेलं बाळ खरंतर एका इब्री व्यक्तीचं असून त्याला मारून टाकलं जावं, हे तिला माहीत होतं. पण “तिला त्याचा कळवळा आला” आणि स्वतःचं मूल म्हणून त्याचं संगोपन करण्याचं तिने ठरवलं.—निर्ग. २:५, ६.

पण, कनवाळूपणाबद्दल आपण अधिक जाणून का घेतलं पाहिजे? कारण, यहोवाप्रमाणे आपणसुद्धा कनवाळूपणा दाखवावा असं त्याला वाटतं. (इफिस. ५:१) कनवाळूपणा हा गुण आपल्यामध्ये स्वभावतःच असला, तरी अपरिपूर्ण असल्यामुळे स्वार्थीपणे वागण्याकडेच आपला जास्त कल असतो. कधीकधी इतरांना मदत करावी, की स्वतःचा विचार करावा हे ठरवणं कठीण वाटू शकतं. मग, इतरांबद्दल आपल्याला अधिक आस्था कशी दाखवता येईल? त्यासाठी आधी आपण हे पाहू, की यहोवा आणि इतर काही जणांनी कशा प्रकारे कनवाळूपणा दाखवला. मग आपण हे पाहू, की देवाच्या कनवाळूपणाचं अनुकरण आपण कसं करू शकतो आणि असं करणं आपल्याच फायद्याचं का आहे.

यहोवा—कनवाळूपणाचं सर्वोत्कृष्ट उदाहरण

४. (क) यहोवाने सदोममध्ये स्वर्गदूत का पाठवले? (ख) लोटच्या वृत्तान्तातून आपण काय शिकू शकतो?

यहोवाने कनवाळूपणा कसा दाखवला याची अनेक उदाहरणं बायबलमध्ये दिली आहेत. उदाहरणार्थ, लोटच्या बाबतीत त्याने कनवाळूपणा कसा दाखवला त्यावर विचार करा. लोट एक नीतिमान मनुष्य होता आणि सदोम व गमोरा शहरांतल्या लोकांच्या अनैतिक वागण्यामुळे “अतिशय दुःखी होता.” त्या लोकांना देवाबद्दल जरासुद्धा आदर नव्हता. त्यामुळे यहोवाने त्यांचा नाश करण्याचं ठरवलं. (२ पेत्र २:७, ८) सदोम आणि गमोराचा नाश होण्याआधी लोटने त्या शहरांतून पळून जावं, हे सांगण्यासाठी यहोवाने लोटकडे स्वर्गदूत पाठवले. बायबलमध्ये म्हटलं आहे: “पण तो [लोट] दिरंगाई करू लागला, तेव्हा परमेश्वराची करुणा त्याजवर होती म्हणून त्या पुरुषांनी [स्वर्गदूतांनी] त्याच्या, त्याच्या बायकोच्या आणि त्याच्या दोघी मुलींच्या हातास धरून त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले.” (उत्प. १९:१६) यहोवाने लोटला समजून घेतलं, तशी तो आपलीही कठीण परिस्थिती समजून घेणार नाही का?—यश. ६३:७-९; याको. ५:११; २ पेत्र २:९.

५. कनवाळूपणा कसा दाखवावा हे आपण बायबलमधून कसं शिकतो?

यहोवाने आपल्या लोकांनाही कनवाळूपणा दाखवण्यास शिकवलं. त्याने इस्राएली लोकांना दिलेला एक नियम विचारात घ्या. एखादा मनुष्य, त्याच्याकडून पैसे उसने घेणाऱ्याचं पांघरूण गहाण म्हणून ठेवू शकत होता. (निर्गम २२:२६, २७ वाचा.) असं असलं, तरी सूर्यास्तापूर्वी त्याला ते पांघरूण परत करणं आवश्यक होतं. म्हणजे मग, पैसे उसने घेणाऱ्याला रात्री झोपताना त्याचा उपयोग होऊ शकेल. पण, दयामाया नसलेल्या मनुष्याला मात्र ते पांघरूण परत न करण्याची कदाचित इच्छा होऊ शकली असती. म्हणून, यहोवाने आपल्या लोकांना कनवाळूपणा दाखवण्यास शिकवलं. देवाने दिलेल्या या नियमामागे असलेल्या तत्त्वातून आपण काय शिकतो? हेच, की आपल्या बंधुभगिनींच्या गरजांकडे आपण कधीही डोळेझाक करू नये. दुःखात किंवा त्रासात असलेल्या एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीला आपण जर मदत करू शकत असलो, तर आपण ती आवर्जून करावी.—कलस्सै. ३:१२; याको. २:१५, १६; १ योहान ३:१७ वाचा.

६. यहोवाने इस्राएली लोकांबद्दल जो कनवाळूपणा दाखवला त्यावरून आपण काय शिकू शकतो?

इस्राएली लोकांनी वारंवार पाप केलं, तरीसुद्धा यहोवाने त्यांना कनवाळूपणा दाखवला. बायबल म्हणतं: “त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते त्यांस आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा होती.” (२ इति. ३६:१५) अगदी त्याचप्रमाणे, यहोवाची ओळख नसणाऱ्या लोकांबद्दल आपणसुद्धा कनवाळूपणा दाखवला पाहिजे. कारण, ते पश्‍चात्ताप करून यहोवाचे मित्र बनू शकतात. कोणाचाही नाश होऊ नये अशी यहोवाची इच्छा आहे. (२ पेत्र ३:९) त्यामुळे, वेळ आहे तोपर्यंत आपण प्रत्येकाला देवाचा इशारेवजा संदेश सांगितला पाहिजे आणि त्याच्या कनवाळूपणाचा लाभ घेण्यास होता होईल तितक्या लोकांना मदत केली पाहिजे.

७, ८. यहोवाने आपल्याला कनवाळूपणा दाखवला याची एका कुटुंबाला कशी खातरी पटली?

आजही यहोवाच्या अनेक सेवकांनी त्याचा कनवाळूपणा अनुभवला आहे. उदाहरणार्थ, १९९० च्या दशकात बोस्नियामध्ये, वेगवेगळे वांशिक गट एकमेकांसोबत लढत होते व एकमेकांच्या जिवावर उठले होते. तिथे राहणाऱ्या एका कुटुंबात १२ वर्षांचा एक मुलगा होता. आपण त्याला मिलान म्हणू या. मिलान, त्याचा भाऊ, त्याचे आईवडील आणि आणखी काही साक्षीदार बंधुभगिनी एका अधिवेशनासाठी बोस्नियाहून सर्बियाला बसने चालेले होते. त्या अधिवेशनात मिलानच्या आईवडिलांचा बाप्तिस्मा होणार होता. ते सीमेजवळ आले तेव्हा काही सैनिकांनी पाहिलं, की मिलानचं कुटुंब एका वेगळ्या वांशिक गटाचं आहे. त्यामुळे त्यांनी त्या कुटुंबाला बसमधून खाली उतरवलं आणि बसमधल्या बाकीच्या साक्षीदारांना पुढे पाठवून दिलं. मग, दोन दिवस त्या कुटुंबाला तिथंच थांबवून ठेवल्यानंतर त्या कुटुंबाचं काय करावं हे विचारण्यासाठी एका अधिकाऱ्याने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन केला. अधिकाऱ्याने फोन केला तेव्हा ते कुटुंब तिथंच उभं होतं आणि त्यांनी त्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं उत्तर ऐकलं. तो म्हणाला: “त्यांना बाहेर काढून सरळ गोळ्या घाला!”

सैनिक आपसात बोलत असताना, दोन अनोळखी व्यक्ती त्या कुटुंबाजवळ आल्या आणि आपणही साक्षीदार असल्याचं त्यांनी हळूच त्या कुटुंबाला सांगितलं. ते म्हणाले, की बसमधल्या साक्षीदारांनी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला होता. सीमा पार करण्यासाठी सैनिक मुलांची कागदपत्रं तपासत नसल्यामुळे, त्या दोन साक्षीदारांनी मिलानला आणि त्याच्या भावाला त्यांच्या कारमध्ये बसायला सांगितलं. मग, बांधवांनी मिलानच्या आईवडिलांना सीमा पोस्टच्या मागून चालत जाऊन सीमेच्या पलीकडे भेटायला सांगितलं. मिलान इतका घाबरला होता, की हसावं की रडावं हेच त्याला समजत नव्हतं. त्याच्या आईवडिलांनी त्या बांधवांना विचारलं, “ते आम्हाला इतकं सहज जाऊ देतील असं तुम्हाला वाटतं?” पण ते जाऊ लागले तेव्हा असं वाटलं जणू सैनिकांना ते दिसलेसुद्धा नाहीत. मिलान आणि त्याच्या भावाला त्यांचे आईवडील सीमेच्या पलीकडे भेटले आणि ते सगळे अधिवेशनाला उपस्थित राहिले. त्यांची पूर्ण खातरी पटली, की यहोवाने त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं होतं. अर्थात, यहोवा नेहमीच अशा प्रकारे आपल्या सेवकांचं संरक्षण करत नाही, हे बायबलमधून आपल्याला समजतं. (प्रे. कार्ये ७:५८-६०) पण या प्रसंगाबद्दल बोलताना मिलान म्हणतो: “मला असं वाटलं, जणू स्वर्गदूतांनी सैनिकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती आणि यहोवानेच आम्हाला वाचवलं होतं.”—स्तो. ९७:१०.

९. येशूच्या मागे येणाऱ्या लोकसमुदायाबद्दल त्याला कसं वाटलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

कनवाळूपणा दाखवण्याच्या बाबतीत येशूनेसुद्धा एक उत्कृष्ट उदाहरण मांडलं. त्याच्या मागे येणाऱ्या लोकसमुदायाबद्दल त्याला कळवळा वाटला, कारण “ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे जखमी झालेले व भरकटलेले होते.” मग त्याने काय केलं? “तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.” (मत्त. ९:३६; मार्क ६:३४ वाचा.) पण, परूशी मात्र त्याच्या अगदी उलट होते. लोकांबद्दल त्यांना थोडीसुद्धा दयामाया नव्हती. शिवाय, लोकांना मदत करण्याचीही त्यांची इच्छा नव्हती. (मत्त. १२:९-१४; २३:४; योहा. ७:४९) येशूप्रमाणे, तुम्हाला लोकांना मदत करायची आणि त्यांना यहोवाबद्दल शिकवायची मनापासून इच्छा आहे का?

१०, ११. कनवाळूपणा दाखवणं नेहमीच योग्य आहे का? स्पष्ट करा.

१० अर्थात, कनवाळूपणा दाखवणं नेहमीच योग्य नाही. उदाहरणार्थ, शौल राजाला कदाचित असं वाटलं असावं, की अमालेकचा राजा, अगाग याचा जीव वाचवून आपण कनवाळूपणा दाखवत आहोत. पण, मुळात अगाग राजा हा देवाच्या लोकांचा शत्रू होता. तसंच, यहोवाने खरंतर शौलला अमालेकी लोकांसह त्यांच्या सर्व पशूंचाही नाश करायला सांगितलं होतं. पण, शौलने अमालेकी लोकांच्या पशूंचा नाश केला नाही. शौलने यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे यहोवाने त्याला राजा म्हणून नाकारलं. (१ शमु. १५:३, ९, १५) यहोवा सर्वात नीतिमान न्यायाधीश असून तो लोकांची मने ओळखू शकतो. त्यामुळे, कनवाळूपणा केव्हा दाखवायचा आणि केव्हा नाही हे त्याला चांगलं माहीत आहे. (विलाप. २:१७; यहे. ५:११) त्याच्या आज्ञांचं पालन न करणाऱ्या लोकांचा तो लवकरच नाश करेल; दुष्टांना दयामाया दाखवण्याची ती वेळ नसेल. (२ थेस्सलनी. १:६-१०) उलट दुष्टांचा नाश करण्याद्वारे, यहोवा नीतिमान लोकांवर करुणाच करेल.

११ अर्थात, कोणाचा नाश करण्यात यावा आणि कोणाला वाचवण्यात यावं, हे ठरवणं आपलं काम नाही. त्याऐवजी, लोकांना मदत करण्यासाठी आपल्याकडून जे काही होईल ते करण्याची ही वेळ आहे. आपण कोणत्या काही व्यावहारिक मार्गांनी इतरांना कनवाळूपणा दाखवू शकतो? असं करण्याचे काही मार्ग पुढे सुचवण्यात आले आहेत.

आपण कनवाळूपणा कसा दाखवू शकतो?

१२. रोजच्या जीवनात इतरांशी व्यवहार करताना आपण कनवाळू वृत्ती कशी दाखवू शकतो?

१२ रोजच्या जीवनात इतरांना मदत करा. ख्रिश्चनांनी आपल्या बांधवांना आणि इतरांनाही कनवाळूपणा दाखवावा अशी अपेक्षा यहोवा करतो. (योहा. १३:३४, ३५; १ पेत्र ३:८) कनवाळूपणाचा एक अर्थ, “इतरांच्या दुःखात सहभागी होणं” असाही होतो. कनवाळू वृत्ती असलेली व्यक्ती, दुःखात किंवा त्रासात असलेल्यांना मदत करण्यास नेहमी प्रयत्नशील असते. त्यामुळे, इतरांना मदत करण्याची संधी आपण नेहमी शोधली पाहिजे. उदाहरणार्थ, मदतीची गरज असलेल्या व्यक्तींच्या घरातली छोटीमोठी कामं करण्याद्वारे किंवा लहानसहान खरेदी करण्याद्वारे आपण त्यांना मदत करू शकतो.—मत्त. ७:१२.

इतरांना व्यावहारिक मार्गांनी मदत करण्याद्वारे कनवाळूपणा दाखवा (परिच्छेद १२ पाहा)

१३. नैसर्गिक आपत्ती ओढवते तेव्हा देवाचे लोक काय करतात?

१३ मदतकार्यात हातभार लावा. एखादी आपत्ती ओढवते तेव्हा दुःखात व त्रासात असलेल्यांना पाहून आपल्याला त्यांचा कळवळा येतो. अशा गरजेच्या वेळी, इतरांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे येणारे म्हणून यहोवाचे साक्षीदार ओळखले जातात. (१ पेत्र २:१७) उदाहरणार्थ, २०११ साली जपानमध्ये झालेल्या भूकंपामुळे व त्सुनामीमुळे तिथल्या एका भागाचे भयंकर नुकसान झाले होते. त्याच भागात आपली एक बहीण राहत होती. त्या वेळी, जपानमधल्या वेगवेगळ्या भागांतून व इतर देशांतून घरांची आणि राज्य सभागृहांची दुरुस्ती करण्यासाठी स्वयंसेवक आले होते. ते पाहून ती बहीण म्हणते, की तिला “खूप धीर आणि सांत्वन मिळालं.” ती पुढे म्हणते: “या अनुभवामुळे मला जाणीव झाली, की यहोवाला आपली खरोखर काळजी आहे. आणि साक्षीदार बंधुभगिनीसुद्धा एकमेकांची खूप काळजी करतात. तसंच, जगभरातले सर्व बंधुभगिनी आमच्यासाठी प्रार्थनाही करत आहेत.”

१४. तुम्ही आजारी व वयोवृद्ध असलेल्यांना कशी मदत करू शकता?

१४ आजारी व वयोवृद्ध असलेल्यांना मदत करा. आजारपणाचा व म्हातारपणाचा सामना करत असलेल्या लोकांना पाहून आपल्याला त्यांच्याविषयी कळवळा वाटतो. या समस्यांचा अंत होण्याची आपण आतुरतेनं वाट पाहत आहोत आणि त्यामुळे देवाचं राज्य लवकर यावं अशी प्रार्थनासुद्धा आपण करतो. पण तोपर्यंत, आजारी व वयस्कर असलेल्यांना जमेल ती मदत करण्याचा आपण प्रयत्न करतो. एका लेखकाने त्याला आलेल्या एका अनुभवाबद्दल काय लिहिलं ते विचारात घ्या. त्याची आई वयोवृद्ध असून तिला स्मृतिम्रंश (अल्झायमर्स) नावाचा आजार होता. एकदा, तिने आपले कपडे मळवले आणि ते धुण्याचा ती कसाबसा प्रयत्न करत होती. त्याच वेळी, दारावरची बेल वाजली. तिला नेहमी भेटायला येणाऱ्या दोन साक्षीदार बहिणी दारात उभ्या होत्या. ती स्त्री आपले कपडे धुण्याचा कसाबसा प्रयत्न करत असल्याचं पाहून, ‘काही मदत हवी आहे का?’ असं त्यांनी तिला विचारलं. त्यावर ती स्त्री म्हणाली: “खरंतर, तुम्हाला सांगायला मला फार कसंतरी वाटतंय, पण मदत केली तर बरं होईल.” त्यामुळे त्या बहिणींनी तिचे कपडे धुण्यास तिला मदत केली. मग, तिच्यासाठी चहा बनवला आणि तिच्यासोबत छान गप्पाही मारल्या. त्या स्त्रीच्या मुलाला हे समजलं तेव्हा त्याने त्यांचे फार आभार मानले आणि साक्षीदारांबद्दल तो म्हणाला, “खरंच, ते जसं शिकवतात तसं वागतातही.” आजारी व वयोवृद्ध असलेल्यांबद्दल कळवळा वाटत असल्यास त्यांना मदत करण्यासाठी तुम्हीसुद्धा जमेल ते कराल का?—फिलिप्पै. २:३, ४.

१५. आपल्या प्रचारकार्याद्वारे इतरांना कशी मदत होते?

१५ यहोवाला ओळखण्यास लोकांना मदत करा. इतरांना मदत करण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे, त्यांना देवाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दल शिकवणं. याशिवाय, मदत करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे, यहोवाच्या स्तरांचं पालन करणं आपल्याच हिताचं कसं आहे हे समजण्यास त्यांना मदत करणं. (यश. ४८:१७, १८) खरंच, सेवाकार्य हे यहोवाचा गौरव करण्याचा आणि इतरांना कनवाळूपणा दाखवण्याचा एक उत्कृष्ट मार्ग आहे. तेव्हा, सेवाकार्यातला तुमचा सहभाग तुम्ही आणखी वाढवू शकता का?—१ तीम. २:३, ४

कनवाळूपणा दाखवल्याने आपलाच फायदा होतो!

१६. कनवाळूपणा दाखवल्यामुळे आपल्याला कसा फायदा होतो?

१६ मनोविकार-तज्ज्ञांच्या मते, इतरांना कनवाळूपणा दाखवल्याने आपलं आरोग्य आणि इतरांसोबतचे आपले नातेसंबंध सुधारतात. दुःखात किंवा त्रासात असलेल्यांना आपण मदत करतो, तेव्हा आपल्याला आनंद मिळतो आणि आपण अधिक आशावादी होतो; तसंच, आपला एकटेपणा आणि मनातल्या नकारार्थी भावनाही नाहीशा होतात. खरंच, इतरांना कनवाळूपणा दाखवल्याने आपलाच फायदा होतो. (इफिस. ४:३१, ३२) आपण प्रेमापोटी इतरांना मदत करण्यास तयार होतो, तेव्हा आपला विवेक शुद्ध राहतो; कारण, यहोवा आपल्याकडून जे अपेक्षितो तेच आपण करत आहोत, हे आपल्याला माहीत असतं. कनवाळू वृत्तीमुळे आपण अधिक चांगले पालक, विवाहसोबती आणि मित्र बनतो. शिवाय, कनवाळूपणा दाखवणाऱ्या लोकांना गरज असते, तेव्हा इतर जण त्यांना मदत करण्यास सहसा तयार होतात.मत्तय ५:७; लूक ६:३८ वाचा.

१७. कनवाळू असण्यामागचं मुख्य कारण काय?

१७ कनवाळूपणा दाखवल्याने आपला फायदा होत असला, तरी कनवाळूपणा दाखवण्यामागचं मुख्य कारण म्हणजे, आपल्याला यहोवाचं अनुकरण करण्याची आणि त्याचा गौरव करण्याची इच्छा आहे. यहोवा हा प्रेमाचा आणि कनवाळूपणाचा स्रोत आहे. (नीति. १४:३१) कनवाळू असण्याच्या बाबतीत तो सर्वोत्कृष्ट उदाहरण मांडतो. त्यामुळे, कनवाळूपणा दाखवण्याच्या बाबतीत देवाचं अनुकरण करण्याचा आपण होता होईल तितका प्रयत्न करू या. असं केल्यास, बंधुभगिनींसोबतचं आपलं नातं आणखी घट्ट होईल आणि इतर लोकांसोबतही आपल्याला अधिक चांगले नातेसंबंध जोपासता येतील.—गलती. ६:१०; १ योहा. ४:१६.