व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”

“हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”

“हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर; भिऊ नको, खचू नको, कारण परमेश्वर देव . . . तुझ्याबरोबर आहे.”—१ इति. २८:२०.

गीत क्रमांक: २३, २९

१, २. (क) शलमोनवर कोणती खास जबाबदारी सोपवण्यात आली? (ख) दावीदला शलमोनबद्दल कोणती काळजी वाटली?

शलमोनवर एक खास जबाबदारी सोपवण्यात आली. यरुशलेममध्ये बांधण्यात येणाऱ्या मंदिराची देखरेख करण्याचं काम यहोवाने त्याच्यावर सोपवलं होतं. खरंतर, मंदिर बांधण्याचं हे काम आजवर झालेल्या सगळ्यात महत्त्वाच्या बांधकामांपैकी एक होतं! देवाचं हे मंदिर “अत्यंत भव्य” असणार होतं आणि ते सौंदर्यासाठी ओळखलं जाणार होतं. पण याहूनही महत्त्वाचं म्हणजे ते यहोवा देवाचं मंदिर असणार होतं.—१ इति. २२:१, ५, ९-११.

यहोवा देव शलमोनला मदत करेल याची दावीद राजाला पूर्ण खातरी होती. पण शलमोन तर तरुण होता आणि त्याला कोणताही अनुभव नव्हता. मग, मंदिर बांधण्याच्या कामाची जबाबदारी स्वीकारण्याचं धैर्य त्याच्याकडे होतं का? की, तरुण असल्यामुळे आणि अनुभव नसल्यामुळे तो ही जबाबदारी स्वीकारण्यापासून दूर राहणार होता? मंदिर बांधण्याच्या कामात यश मिळवण्यासाठी शलमोनला धैर्य धरून कार्य करण्याची गरज होती.

३. धैर्य दाखवण्याच्या बाबतीत शलमोन आपल्या वडिलांकडून काय शिकला असावा?

धैर्य दाखवण्याच्या बाबतीत शलमोन आपल्या वडिलांकडून, दावीदकडून बरंच काही शिकला असावा. कारण, दावीद जेव्हा तरुण होता तेव्हा आपल्या वडिलांच्या मेंढरांचं रक्षण करण्यासाठी त्याने जंगली प्राण्यांशी लढा दिला होता. (१ शमु. १७:३४, ३५) तसंच, कोणालाही भीती वाटेल अशा धिप्पाड व प्रचंड गल्याथशी लढताना त्याने मोठं धैर्य दाखवलं होतं. देवाच्या मदतीमुळे दावीदने फक्त एका गुळगुळीत दगडाच्या साहाय्याने गल्याथला हरवलं होतं.—१ शमु. १७:४५, ४९, ५०.

४. शलमोनला धैर्याची गरज का होती?

शलमोनला धैर्य व मंदिर बांधायला प्रोत्साहन देण्यासाठी दावीदच योग्य होता हे आपल्याला या गोष्टींवरून समजतं. (१ इतिहास २८:२० वाचा.) मंदिर बांधण्याच्या कामासाठी शलमोनने जर धैर्य दाखवलं नसतं, तर कदाचित भीतीने त्याला ग्रासून टाकलं असतं. म्हणजे, भीतीमुळे त्याने मंदिर बांधण्याचं काम सुरूच केलं नसतं. आणि ही गोष्ट नेमलेल्या कामात अपयश येण्यापेक्षाही वाईट ठरली असती.

५. आपल्याला धैर्याची गरज का आहे?

आज आपल्यालाही धैर्य दाखवण्यासाठी आणि यहोवाने आपल्यावर सोपवलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी त्याच्या मदतीची गरज आहे. आता आपण धैर्य दाखवलेल्या प्राचीन काळातल्या काही लोकांच्या उदाहरणांचा अभ्यास करू. त्यानंतर, आपल्याला धैर्य कसं दाखवता येईल आणि आपल्यावर सोपवलेलं कार्य कसं पूर्ण करता येईल हेसुद्धा पाहू.

धैर्य दाखवलेल्या लोकांची उदाहरणं

६. योसेफने जे धैर्य दाखवलं त्यातली कोणती गोष्ट तुम्हाला प्रभावित करते?

पोटीफरच्या पत्नीने जेव्हा योसेफला अनैतिक लैंगिक कृत्य करण्यासाठी भुलवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा योसेफने धैर्य दाखवलं. तिला नाकारून आपण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहोत हे कदाचित योसेफला माहीत असावं. पण, मोहाला बळी पडण्याऐवजी, योसेफने धैर्य दाखवलं आणि तिला लगेच नकार दिला.—उत्प. ३९:१०, १२.

७. राहाबने धैर्य कसं दाखवलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

धैर्य दाखवण्याच्या बाबतीत राहाबनेही एक उल्लेखनीय उदाहरण मांडलं. यरीहो या शहरात इस्राएलचे गुप्तहेर जेव्हा राहाबच्या घरी गेले, तेव्हा भीतीमुळे ती त्यांना मदत करण्याचं नाकारू शकली असती. पण, यहोवावर असलेल्या भरवशामुळे तिने धैर्य दाखवलं आणि त्या दोन पुरुषांना लपण्यासाठी मदत केली. तसंच, सुरक्षित रीत्या शहराबाहेर जाण्यासाठीही तिने त्यांना मदत केली. (यहो. २:४, ५, ९, १२-१६) यहोवा हाच खरा देव आहे यावर राहाबचा विश्वास होता. आणि यहोवा इस्राएली लोकांना त्या देशावर कोणत्या न कोणत्या प्रकारे विजय मिळवून देईल याची तिला पूर्ण खातरी होती. तिने कोणाचीही भीती बाळगली नाही; अगदी यरीहोच्या राजाची आणि त्याच्या माणसांचीही भीती बाळगली नाही. त्याऐवजी, तिने धैर्य दाखवलं आणि स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव केला.—यहो. ६:२२, २३.

८. येशूने दाखवलेल्या धैर्याचा त्याच्या प्रेषितांवर कसा प्रभाव पडला?

येशूच्या विश्वासू प्रेषितांनीही मोठं धैर्य दाखवलं. पृथ्वीवर असताना येशूने कसं धैर्य दाखवलं हे त्यांनी स्वतः पाहिलं होतं. आणि त्यामुळे पुढे त्यांनाही धैर्य दाखवण्यास खूप मदत मिळाली. (मत्त. ८:२८-३२; योहा. २:१३-१७; १८:३-५) सदुकी लोकांनी जेव्हा प्रेषितांना येशूविषयी शिकवण्यास मनाई केली, तेव्हा प्रेषितांनी तसं करण्यास साफ नकार दिला.—प्रे. कार्ये ५:१७, १८, २७-२९.

९. आपल्याला धैर्य कुठून मिळू शकतं हे समजण्यासाठी २ तीमथ्य १:७ हे वचन कशी मदत करतं?

योसेफ, राहाब, येशू आणि त्याचे प्रेषित या सर्वांचा योग्य ते करण्याचा ठाम निश्चय होता. पण, त्यांना स्वतःच्या क्षमतांवर भरवसा होता म्हणून ते धैर्य दाखवू शकले असं नाही. तर, यहोवावर पूर्णपणे विसंबून राहिल्यामुळे ते धैर्य दाखवू शकले. कधीकधी आपल्यालाही जीवनात धैर्य दाखवण्याची गरज पडू शकते. अशा वेळी आपणही स्वतःच्या क्षमतांवर नाही, तर यहोवावर पूर्णपणे विसंबून राहणं गरजेचं आहे. (२ तीमथ्य १:७ वाचा.) आता आपण जीवनातली अशी दोन क्षेत्रं पाहू ज्यांमध्ये आपल्याला धैर्य दाखवण्याची गरज पडते. (१) आपल्या कुटुंबात आणि (२) मंडळीमध्ये.

धैर्य दाखवण्याची गरज पडेल अशा काही परिस्थिती

१०. ख्रिस्ती तरुणांना धैर्य दाखवण्याची गरज का आहे?

१० यहोवाची सेवा करताना ख्रिस्ती तरुणांना अशा अनेक परिस्थितींना सामोरं जावं लागतं, ज्यांत त्यांना धैर्य दाखवण्याची गरज पडते. अशा वेळी ते शलमोनच्या उदाहरणाचं अनुकरण करू शकतात आणि त्याच्या उदाहरणावरून बरंच काही शिकू शकतात. शलमोनने देवाचं मंदिर बांधून पूर्ण करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला आणि धैर्य दाखवलं. ख्रिस्ती तरुणांनी त्यांच्या पालकांकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनानुसार चालण्याची गरज असली, तरी अशीही काही क्षेत्रं आहेत ज्यांमध्ये ख्रिस्ती तरुणांना महत्त्वाचे निर्णय स्वतः घ्यावे लागतात. (नीति. २७:११) जसं की, मित्र किंवा मनोरंजन निवडताना, नैतिक रीत्या शुद्ध कसं राहता येईल हे ठरवताना, आणि बाप्तिस्मा कधी घ्यायचा हे ठरवताना. जीवनातले असे निर्णय सुज्ञपणे घेण्यासाठी ख्रिस्ती तरुणांना धैर्य दाखवण्याची गरज पडते. देवाला दोष लावणाऱ्या सैतानाच्या इच्छेविरुद्ध ख्रिस्ती तरुणांना असे अनेक निर्णय घ्यावे लागतात, त्यामुळेच त्यांना धैर्याची मोठी गरज आहे.

११, १२. (क) मोशेने धैर्य कसं दाखवलं? (ख) आजचे ख्रिस्ती तरुण मोशेच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतात?

११ जीवनात आपण कोणती ध्येयं ठरवणार आहोत, हासुद्धा ख्रिस्ती तरुणांना घ्यावा लागणारा एक महत्त्वाचा निर्णय आहे. काही देशांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि जास्त पगाराची नोकरी मिळवण्यासाठी तरुणांवर दबाव आणला जातो. तर, इतर काही देशांत आर्थिक परिस्थिती फार बिकट आहे. त्यामुळे तिथल्या ख्रिस्ती तरुणांना असं वाटू शकतं, की कुटुंबाला आर्थिक रीत्या हातभार लावण्यासाठी त्यांनी नोकरीधंद्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तुमचीही परिस्थिती अशी असली, तर मोशेच्या उदाहरणावर विचार करा. त्याला फारोच्या मुलीने लहानाचा मोठा केला होता. त्यामुळे आणखी श्रीमंत होण्याचं किंवा इजिप्तमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती होण्याचं ध्येय तो समोर ठेवू शकला असता. त्याच्या इजिप्तमधल्या कुटुंबाचा, शिक्षकांचा आणि सल्लागारांचा त्याच्यावर किती दबाव असेल याची तुम्ही कल्पना करू शकता! पण मोशे धाडसी होता आणि त्याने यहोवाच्या लोकांसोबत राहण्याचं निवडलं. इजिप्त आणि त्यातलं ऐश्वर्य सोडल्यानंतर मोशे पूर्णपणे यहोवावर अवलंबून राहिला. (इब्री ११:२४-२६) याचा परिणाम म्हणजे, यहोवाने त्याला खूप आशीर्वादित केलं, आणि येणाऱ्या नवीन जगातही तो त्याला आणखी भरभरून आशीर्वाद देईल.

१२ मोशेप्रमाणेच, आजच्या तरुणांनीही धैर्य दाखवून यहोवाची आणखी जास्त सेवा करण्याचं ध्येय समोर ठेवलं, तसंच देवाच्या राज्याला जीवनात पहिलं स्थान दिलं, तर यहोवा नक्कीच त्यांना आशीर्वाद देईल. तो त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यासही मदत करेल. पहिल्या शतकात, तरुण असलेल्या तीमथ्यने त्याच्या जीवनात देवाच्या सेवेवर लक्ष केंद्रित केलं होतं आणि आज तुम्हीही तसं करू शकता. *फिलिप्पैकर २:१९-२२ वाचा.

जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात धैर्य दाखवण्याचा तुमचा निश्चय पक्का आहे का? (परिच्छेद १३-१७ पाहा)

१३. धैर्य दाखवल्यामुळे एका बहिणीला तिचं आध्यात्मिक ध्येय गाठण्यास कशी मदत मिळाली?

१३ अमेरिकेतल्या अॅलाबॅमा या शहरात राहणाऱ्या आपल्या एका बहिणीला आध्यात्मिक ध्येय ठेवण्यासाठी धैर्याची गरज होती. ती म्हणते: “मी लहान असताना खूप लाजाळू स्वभावाची होते. मंडळीत आणि प्रचारकार्यात मी फार कमी लोकांशी बोलायचे.” मग, पायनियर सेवा करण्याचं ध्येय गाठण्यासाठी या बहिणीला कशामुळे मदत मिळाली? मंडळीतल्या बंधुभगिनींनी आणि तिच्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे या तरुण बहिणीला मदत मिळाली. ती म्हणते, की उच्च शिक्षणाला, प्रसिद्धीला, पैशाला आणि इतर भौतिक गोष्टींना सैतानाच्या जगात चांगली ध्येयं मानली जातात. पण तरी अनेकांना ही ध्येय मिळवणं कधीही शक्य होत नाही. आणि सैतानाच्या जगातल्या या ध्येयांमुळे निराशा व दुःखच पदरी पडतं. पुढे ती म्हणते: “पण यहोवाची सेवा केल्यामुळे मी खूप आनंदी व समाधानी आहे.”

१४. ख्रिस्ती पालकांना कोणकोणत्या परिस्थितींमध्ये धैर्य दाखवण्याची गरज पडू शकते?

१४ ख्रिस्ती पालकांनासुद्धा धैर्य दाखवण्याची गरज पडते. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी मालक तुम्हाला वारंवार ओव्हरटाईम करण्यासाठी सांगत असेल. पण, कदाचित तो दिवस तुम्ही कौटुंबिक उपासनेसाठी, सभेसाठी किंवा प्रचारासाठी राखून ठेवला असेल. अशा वेळी ओव्हरटाईम करण्यास मालकाला नकार देण्यासाठी व तुमच्या मुलांसमोर चांगलं उदाहरण मांडण्यासाठी तुम्हाला धैर्याची गरज पडू शकते. किंवा मग, मंडळीतल्या काही पालकांनी त्यांच्या मुलांना अशा काही गोष्टी करण्यास अनुमती दिली असेल, ज्या आपल्या मुलांनी करू नयेत असं तुम्हाला वाटत असेल. अशा वेळी, ‘तुम्ही आपल्या मुलांना या गोष्टी का करू देत नाहीत?’ असं जेव्हा ते पालक तुम्हाला विचारतील, तेव्हा आदराने त्यांना समजावून सांगण्याचं धैर्य तुम्ही दाखवाल का?

१५. स्तोत्र ३७:२५ आणि इब्री १३:५ या वचनांमुळे पालकांना कशी मदत होते?

१५ मुलांना आध्यात्मिक ध्येयं ठेवण्यास आणि ते मिळवण्यास मदत करण्यासाठी पालकांना धैर्याची गरज पडते. उदाहरणार्थ, करियर म्हणून आपल्या मुलांनी पायनियर सेवा निवडावी, यासाठी त्यांना उत्तेजन देण्याची काही पालकांना भीती वाटते. किंवा प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यासाठी, बेथेल सेवा करण्यासाठी, राज्य सभागृह किंवा इतर बांधकाम प्रकल्पांवर सेवा करण्यासाठी जाण्याचं उत्तेजन देण्याची पालकांना भीती वाटते. आपण वयोवृद्ध झाल्यानंतर मुलं आपला सांभाळ करू शकणार नाहीत, अशी भीती त्यांना कदाचित वाटत असेल. पण, सुज्ञ पालक धैर्य दाखवतात आणि यहोवा त्याचं अभिवचन नक्की पूर्ण करेल असा भरवसा ठेवतात. (स्तोत्र ३७:२५; इब्री लोकांना १३:५ वाचा.) जे पालक धैर्य दाखवतात आणि यहोवावर भरवसा ठेवतात, त्यांच्या मुलांनाही जीवनात धैर्य दाखवण्यास व देवावर भरवसा ठेवण्यास मदत मिळते.—१ शमु. १:२७, २८; २ तीम. ३:१४, १५.

१६. (क) काही पालकांनी आपल्या मुलांना आध्यात्मिक ध्येय ठेवण्यासाठी कशी मदत केली आहे? (ख) यामुळे त्यांच्या मुलांना कोणता फायदा झाला?

१६ अमेरिकेत राहणाऱ्या एका साक्षीदार जोडप्यानं आपल्या मुलांना यहोवाच्या सेवेला जीवनात पहिल्या स्थानी ठेवण्यास मदत केली. त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणतो: “आमची मुलं बोलू-चालू लागली, त्याच्या आधीपासूनच आम्ही त्यांच्याशी पायनियर सेवेतून आणि मंडळीच्या सेवेतून मिळणाऱ्या आनंदाविषयी बोलायचो. आणि आता तेच त्यांच्या जीवनाचं ध्येय बनलं आहे.” पुढे हा बांधव म्हणतो, की त्यांच्या मुलांनी अशा प्रकारची आध्यात्मिक ध्येयं ठेवली आणि ती मिळवलीही. असं केल्यामुळे त्यांना सैतानाच्या जगातल्या मोहांचा प्रतिकार करण्यास आणि यहोवाच्या सेवेवर आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळाली. आणखी एक बांधव ज्याला दोन मुलं आहेत, तो म्हणतो: “मुलांना स्पोर्ट्‌स, मनोरंजन, छंद आणि शिक्षण यांमध्ये ध्येयं गाठता यावीत म्हणून अनेक पालक खूप मेहनत घेतात आणि बराच पैसा खर्च करतात. पण खरंतर, मुलांना आध्यात्मिक ध्येयं गाठता यावीत म्हणून पालकांनी मेहनत घेणं आणि त्यांच्याकडे असलेल्या साधनांचा उपयोग करणं हे किती सुज्ञतेचं ठरेल! कारण, त्यामुळे मुलांना यहोवासोबत चांगला नातेसंबंध जोपासता येईल. आमच्या मुलांना आध्यात्मिक ध्येयं गाठण्यासाठी मदत करताना आणि ती गाठण्यास ते करत असलेली मेहनत पाहताना आम्हाला जो आनंद झाला, त्याची तुलना आम्ही कोणत्याही गोष्टीशी करू शकत नाही.” खरंच, जे पालक आपल्या मुलांना आध्यात्मिक ध्येयं ठेवण्यासाठी आणि ती गाठण्यासाठी मदत करतात त्यांना यहोवा आशीर्वाद देतो.

मंडळीत दाखवावं लागणारं धैर्य

१७. ख्रिस्ती मंडळीत कोणकोणत्या बाबतींत धैर्य दाखवण्याची गरज पडू शकते याची काही उदाहरणं द्या.

१७ मंडळीमध्येही आपल्याला धैर्य दाखवण्याची गरज पडते. उदाहरणार्थ, मंडळीतली न्यायिक प्रकरणं हाताळताना किंवा वैद्यकीय उपचारांमध्ये उद्‌भवलेल्या तातडीच्या प्रसंगात एखाद्याला मदत करताना मंडळीतल्या वडिलांना धैर्य दाखवण्याची गरज पडते. तसंच, काही वडील तुरुंगांमध्ये बायबल अभ्यास चालवतात आणि सभा भरवतात. त्यांनाही धैर्य दाखवण्याची गरज पडते. आणि अविवाहित बहिणींबद्दल काय? त्यांच्या समोरही धैर्य दाखवण्याच्या अनेक संधी आहेत. त्या पायनियर सेवा करू शकतात, प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्यासाठी जाऊ शकतात, स्थानिक बांधकाम किंवा डिझाईन प्रकल्पांवर मदत करू शकतात, आणि सुवार्तिकांसाठी असलेल्या प्रशालेसाठी अर्ज भरू शकतात. काहींना तर गिलियड प्रशालेसाठीसुद्धा आमंत्रित करण्यात आलं आहे!

१८. वयस्कर बहिणी धैर्य कसं दाखवू शकतात?

१८ वृद्ध बहिणीही मंडळीसाठी एक मोठा आशीर्वाद आहेत. आणि आपलं सर्वांचं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. या बहिणींपैकी काही बहिणी कदाचित पूर्वीप्रमाणे यहोवाच्या सेवेत जास्त करू शकणार नाहीत. असं असलं तरी, त्यासुद्धा धैर्य दाखवून कार्य करू शकतात. (तीत २:३-५ वाचा.) उदाहरणार्थ, सभ्य पेहराव करण्याच्या बाबतीत मंडळीतल्या तरुण बहिणीसोबत बोलण्यासाठी वडील एखाद्या वयस्कर बहिणीला सांगतील. अशा वेळी त्या वयस्कर बहिणीला धैर्य दाखवण्याची गरज पडू शकते. तरुण बहिणीसोबत पेहरावाविषयी बोलताना वयस्कर बहीण तिला ओरडणार नाही किंवा रागावणार नाही. याउलट, ती अगदी प्रेमाने त्या तरुण बहिणीला हे समजण्यास मदत करेल, की तिच्या पेहरावाच्या निवडींमुळे इतरांवर कसा प्रभाव पडू शकतो. (१ तीम. २:९, १०) अशा प्रकारे वयस्कर बहिणी जेव्हा आपलं प्रेम दाखवतात, तेव्हा त्या मंडळीच्या ऐक्याला हातभार लावण्यास मदत करतात.

१९. (क) बाप्तिस्माप्राप्त बांधव धैर्य कसं दाखवू शकतात? (ख) फिलिप्पैकर २:१३ आणि ४:१३ या वचनांमुळे बांधवांना धैर्य दाखवण्यास कशी मदत मिळते?

१९ मंडळीतल्या बाप्तिस्माप्राप्त बांधवांनासुद्धा धैर्य दाखवून कार्य करण्याची गरज आहे. धैर्य दाखवून मंडळीच्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी पुढे येणारे बांधव हेसुद्धा मंडळीसाठी मोठा आशीर्वाद आहेत. (१ तीम. ३:१) असं असलं तरी, काही बांधवांना जबाबदारी घेण्यासाठी संकोच वाटतो. कदाचित एखाद्या बांधवाकडून पूर्वी एखादी चूक झालेली असेल, आणि आता आपण साहाय्यक सेवक किंवा वडील या नात्यानं मंडळीची सेवा करण्यास पात्र नाही असं त्याला वाटत असेल. किंवा एखाद्याला असं त्याला वाटत असेल, की जबाबदारी हाताळण्यासाठी असलेलं कौशल्य आपल्याकडे नाही. जर तुम्हालाही असंच वाटत असेल, तर लक्षात ठेवा की धैर्य दाखवण्यासाठी यहोवा तुम्हाला मदत करेल. (फिलिप्पैकर २:१३; ४:१३ वाचा.) मोशेचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवा. यहोवाने सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण पात्र नाही, असं त्यालाही वाटलं होतं. (निर्ग. ३:११) पण, धैर्य दाखवण्यासाठी आणि आवश्यक ते कार्य करण्यासाठी यहोवाने त्याला मदत पुरवली. मग, बाप्तिस्माप्राप्त बांधव अशा प्रकारचं धैर्य कसं मिळवू शकतो? त्यासाठी तो यहोवाकडे मदतीसाठी प्रार्थना करू शकतो आणि दररोज बायबलचं वाचन करू शकतो. तसंच, धैर्य दाखवलेल्या देवाच्या विश्वासू सेवकांच्या उदाहरणांवर तो मनन करू शकतो. यासोबतच, आपल्याला प्रशिक्षित करण्यासाठी तो मंडळीच्या वडिलांना विनंतीही करू शकतो. आणि मंडळीच्या कोणत्याही कामांमध्ये मदत करण्याची तो तयारी दाखवू शकतो. आम्ही सर्व बाप्तिस्माप्राप्त बांधवांना आर्जव करतो, की त्यांनी धैर्य दाखवावं आणि मंडळीच्या सेवेमध्ये मेहनत घ्यावी.

“परमेश्वर देव . . . तुझ्याबरोबर आहे”

२०, २१. (क) दावीदने शलमोनला कशाची आठवण करून दिली? (ख) आपण कोणती खातरी बाळगू शकतो?

२० राजा दावीदने शलमोनला आठवण करून दिली होती, की मंदिराच्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत यहोवा त्याच्याबरोबर राहील. (१ इति. २८:२०) दावीदच्या या शब्दांवर शलमोनने नक्कीच मनन केलं असावं. शलमोन तरुण होता आणि त्याला कोणताही अनुभव नव्हता. पण, त्याने या गोष्टींना मंदिर बांधण्याच्या कार्याच्या आड येऊ दिलं नाही. याउलट, त्याने मोठं धैर्य दाखवलं आणि यहोवाच्या मदतीने फक्त साडे सात वर्षांत यहोवाच्या “अत्यंत भव्य” मंदिराचं काम पूर्ण केलं.

२१ यहोवाने शलमोनला मदत केली, आणि आज तो आपल्यालाही कुटुंबात आणि मंडळीत धैर्य दाखवण्यासाठी, तसंच कार्य पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतो. (यश. ४१:१०, १३) यहोवाची सेवा करत असताना आपण धैर्य दाखवलं, तर यहोवा आपल्याला आता आणि येणाऱ्या भविष्यातही नक्कीच आशीर्वादित करेल. म्हणूनच, ‘हिंमत बांधा, धैर्य धरा आणि कार्य करा.’

^ परि. 12 आपण आध्यात्मिक ध्येयं कशी ठेवू शकतो आणि त्या ध्येयांपर्यंत पोचण्यासाठी आपण कोणती व्यावहारिक पावलं उचलू शकतो, याबद्दल जास्त माहिती पाहण्यासाठी १५ जुलै २००४ च्या टेहळणी बुरूज अंकातला “आध्यात्मिक ध्येयांद्वारे निर्माणकर्त्याचे गौरव करा” हा लेख पाहा.