व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३७

स्वेच्छेने यहोवाच्या अधीन राहा

स्वेच्छेने यहोवाच्या अधीन राहा

“पित्याच्या आपण आणखी . . . अधीन राहिले पाहिजे.” —इब्री १२:९.

गीत ४६ यहोवा राजा बनला आहे!

सारांश *

१. आपण यहोवाच्या अधीन का राहिलं पाहिजे?

यहोवा देव आपला निर्माणकर्ता असल्यामुळे आपण त्याच्या अधीन * राहिलं पाहिजे. आपल्यासाठी काय योग्य आहे याचे स्तर ठरवण्याचा अधिकार त्याला आहे. (प्रकटी. ४:११) पण फक्‍त याच कारणामुळे आपण त्याच्या अधीन राहत नाही, तर राज्य करण्याची त्याचीच पद्धत योग्य आहे यामुळेही आपण त्याच्या अधीन राहतो. मानव इतिहासात पाहिल्यावर आपल्याला कळतं की मानवांवर राज्य करणारे अनेक शासक किंवा राजे होऊन गेले. पण त्यांच्या तुलनेत यहोवा हाच सर्वात बुद्धिमान, प्रेमळ, दयाळू आणि कृपाळू राजा आहे.—निर्ग. ३४:६; रोम. १६:२७; १ योहा. ४:८.

२. इब्री लोकांना १२:९-११ या वचनांत यहोवाच्या अधीन राहण्याची कोणती कारणं दिली आहेत?

आपण यहोवाची आज्ञा भीतीपोटी पाळावी अशी त्याची इच्छा नाही, तर तो आपला पिता आहे आणि त्याचं आपल्यावर प्रेम आहे या जाणिवेमुळे आपण त्याची आज्ञा पाळावी असं त्याला वाटतं. पौलने इब्रीकरांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, की आपला पिता “आपल्या भल्यासाठी” आपल्याला प्रशिक्षण देतो म्हणून आपण स्वेच्छेने त्याच्या “अधीन राहिले पाहिजे.”—इब्री लोकांना १२:९-११ वाचा.

३. (क) आपण यहोवाच्या अधीन आहोत हे आपण कसं दाखवतो? (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

सर्व बाबतींत यहोवाची आज्ञा पाळण्यासाठी पुरेपूर मेहनत घेण्याद्वारे आपण यहोवाच्या अधीन राहतो. तसंच, चांगलं काय आणि वाईट काय हे स्वतः ठरवण्याच्या इच्छेचा प्रतिकार करण्याद्वारेही आपण यहोवाच्या अधीन राहतो. (नीति. ३:५) यहोवाच्या सुंदर गुणांबद्दल आपण जितकं जास्त शिकत जातो तितकं जास्त आपल्याला त्याच्या अधीन राहणं सोपं जातं. असं का? कारण त्याची सर्व कार्यं याच गुणांवर आधारित आहेत. (स्तो. १४५:९) आपण जितकं जास्त यहोवाबद्दल शिकत जाऊ तितकं आपलं त्याच्यावर असलेलं प्रेम वाढत जाईल. आणि यहोवावर प्रेम असल्यामुळे, काय करावं आणि काय करू नये यांबद्दल आपल्याला नियमांच्या सूचीची गरज पडणार नाही. याउलट, चांगलं काय आणि वाईट काय यांबद्दल आपण यहोवासारखाच विचार करण्याचा प्रयत्न करू. (स्तो. ९७:१०) पण कधीकधी यहोवाची आज्ञा पाळणं आपल्याला कठीण वाटू शकतं. असं का? राज्यपाल नहेम्या, राजा दावीद आणि येशूची आई मरीया यांच्याकडून मंडळीतले वडील आणि पालक काय शिकू शकतात? या लेखात या प्रश्‍नांची उत्तरं दिली जातील.

यहोवाच्या अधीन राहणं कठीण का वाटू शकतं?

४-५. रोमकर ७:२१-२३ या वचनांनुसार यहोवाच्या अधीन राहणं कठीण का वाटू शकतं?

यहोवाच्या अधीन राहायला कठीण वाटण्याचं एक कारण म्हणजे आपण अपरिपूर्ण आहोत आणि वारशाने आपल्याला पाप मिळालं आहे. यामुळे आपल्यात बंडखोर वृत्ती आहे. आदाम आणि हव्वा यांनी देवाविरुद्ध बंड केलं, मनाई केलेलं फळ खाल्लं आणि स्वतःसाठी चांगल्या-वाइटाचे स्तर ठरवले. (उत्प. ३:२२) आज जगात पाहिलं तर बरेच लोक यहोवाला नाकारतात आणि आदाम-हव्वासारखं चांगलं काय आणि वाईट काय हे स्वतः ठरवतात.

यहोवाला जाणणाऱ्‍या आणि त्याच्यावर प्रेम करणाऱ्‍या लोकांनाही, पूर्णपणे त्याच्या अधीन राहणं कठीण वाटू शकतं. प्रेषित पौललाही हा अनुभव आला. (रोमकर ७:२१-२३ वाचा.) पौलप्रमाणे आपल्याला यहोवाच्या नजरेत जे चांगलं ते करण्याची इच्छा आहे. पण यासाठी आपल्याला वाईट करण्याच्या आपल्या इच्छेला सतत लढा देत राहायला हवं.

६-७. आणखी कोणत्या कारणामुळे यहोवाच्या अधीन राहणं आपल्याला कठीण वाटू शकतं? एक उदाहरण द्या.

आपण ज्या संस्कृतीत आणि लोकांमध्ये लहानाचे मोठे झालो आहोत त्यांचा आपल्या विचारांवर प्रभाव असतो. या कारणामुळेही आपल्याला यहोवाच्या अधीन राहणं कठीण वाटू शकतं. बरेच मानवी विचार यहोवाच्या इच्छेविरुद्ध आहेत. आणि सहसा लोक जसा विचार करतात तशा विचारांच्या विरुद्ध विचार करण्यासाठी आपल्याला सतत संघर्ष करावा लागू शकतो. हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू या.

काही ठिकाणी तरुणांवर जास्त पैसा कमवण्याचा दबाव टाकला जातो. मेरी * नावाच्या बहिणीला अशाच आव्हानाचा सामना करावा लागला. यहोवाबद्दल शिकण्याआधी तिने तिच्या देशातल्या खूप नावाजलेल्या विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं होतं. तिला लठ्ठ पगाराची आणि चांगल्या पदावर नोकरी मिळावी असा दबाव तिच्या कुटुंबाने तिच्यावर टाकला. आपल्याला अशीच नोकरी मिळावी असं तिलाही वाटत होतं. पण यहोवाबद्दल जाणून घेतल्यावर तिचं त्याच्यावरचं प्रेम वाढलं आणि तिने आपलं ध्येय बदललं. असं असलं तरी ती म्हणते: “कधीकधी जास्त पैसे कमवण्याची संधी समोर येते, पण मला माहीत आहे की ती स्वीकारल्याने मी यहोवासाठी आता जे करत आहे ते करू शकणार नाही. मी ज्या वातावरणात वाढले त्यामुळे मला ‘नाही’ म्हणण्यासाठी आजही संघर्ष करावा लागतो. यहोवाच्या सेवेपासून मी दूर जाईन अशा कामाच्या प्रलोभनाचा प्रतिकार करण्यासाठी मला यहोवाला अगदी कळकळून प्रार्थना करावी लागते.”—मत्त. ६:२४.

८. आता आपण कशावर चर्चा करणार आहोत?

यहोवाच्या अधीन राहिल्याने आपल्यालाच फायदा होतो हे आपण शिकलो. पण ज्यांना काही प्रमाणात अधिकार देण्यात आले आहेत, जसं की मंडळीतले वडील आणि आईवडील हे जेव्हा देवाच्या मार्गदर्शनानुसार चालतात तेव्हा ते इतरांना मदत करू शकतात. आता आपण बायबलमध्ये दिलेल्या अशा काही उदाहरणांवर चर्चा करू या ज्यांनी यहोवाला आनंद होईल अशा पद्धतीने आपल्या अधिकाराचा वापर केला.

नहेम्याकडून मंडळीतले वडील काय शिकू शकतात?

नहेम्याने ज्या प्रकारे यरुशलेमच्या भिंतीच्या बांधकामात स्वतः हातभार लावला, त्याच प्रकारे मंडळीतले वडील राज्य सभागृहाच्या कामांत हातभार लावतात (परिच्छेद ९-११ पाहा) *

९. नहेम्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला?

यहोवाने मंडळीतल्या वडिलांवर आपल्या लोकांची काळजी घेण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. (१ पेत्र ५:२) नहेम्या यहोवाच्या लोकांशी जसा वागला त्याचं परीक्षण केल्यामुळे वडील खूपकाही शिकू शकतात. यहूदाचा प्रांताधिपती म्हणजे राज्यपाल या नात्याने नहेम्याकडे खूप अधिकार होते. (नहे. १:११; २:७, ८; ५:१४) नहेम्याला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला याचा जरा विचार करा. त्याला समजलं की यहुदी लोक मंदिरात, यहोवाचा अनादर करणाऱ्‍या काही गोष्टी करत होते. आणि ते यहोवाच्या नियमानुसार लेव्यांना अनुदानही देत नव्हते. तसंच, यहुदी शब्बाथाचा नियम पाळत नव्हते आणि काही पुरुषांनी तर विदेशी स्त्रियांशी लग्नही केलं होतं. राज्यपाल नहेम्याला ही कठीण समस्या सोडवावी लागणार होती.—नहे. १३:४-३०.

१०. नहेम्याने समस्यांचा सामना कसा केला?

१० नहेम्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर करून देवाच्या सेवकांवर आपले विचार लादले नाहीत. याउलट, त्याने मनापासून प्रार्थना करून यहोवाकडे मार्गदर्शन मागितलं आणि लोकांना यहोवाचे नियम शिकवले. (नहे. १:४-१०; १३:१-३) नहेम्याने नम्रपणे लोकांसोबत मिळून काम केलं. यरुशलेमच्या पडलेल्या भिंतीची पुनर्बांधणी करण्यासाठी त्याने लोकांना मदतसुद्धा केली.—नहे. ४:१५.

११. १ थेस्सलनीकाकर २:७, ८ या वचनांनुसार वडिलांनी मंडळीतल्या भाऊबहिणींशी कसं वागलं पाहिजे?

११ आज मंडळीतल्या वडिलांना कदाचित नहेम्याला कराव्या लागल्या तशा समस्यांचा सामना करावा लागणार नाही. पण अनेक बाबतीत ते त्याचं अनुकरण करू शकतात. उदाहरणार्थ, ते भाऊबहिणींना मदत करण्यासाठी खूप मेहनत घेऊ शकतात. आणि आपल्याला मिळालेल्या अधिकारामुळे ते स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणार नाहीत. याउलट, ते भाऊबहिणींशी दयाळूपणे वागतील. (१ थेस्सलनीकाकर २:७, ८ वाचा.) ते नम्र असल्यामुळे आणि त्यांचं लोकांवर खरं प्रेम असल्यामुळे ते त्यांच्याशी सौम्यतेने बोलतील. ॲलेक्स नावाचे बांधव बऱ्‍याच वर्षांपासून मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहेत. ते म्हणतात: “वडील जेव्हा दयाळू आणि प्रेमळ स्वभावाचे असतात तेव्हा भाऊबहिणींच्या मनाला या गोष्टी भिडतात. या गुणांमुळे त्यांना वडिलांना सहकार्य देण्याचं प्रोत्साहन मिळतं.” टोनी नावाचे बांधवही अनेक वर्षांपासून मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहेत. ते म्हणतात: “मी फिलिप्पैकर २:३ मध्ये दिलेला सल्ला लागू करण्याचा प्रयत्न करतो आणि इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजण्यासाठी सतत मेहनत घेतो. यामुळे मला एका हुकूमशहासारखं वागण्याचं टाळायला मदत होते.”

१२. वडिलांनी नम्र राहणं महत्त्वाचं का आहे?

१२ यहोवा जसा नम्र आहे तसं वडिलांनीही नम्र असणं गरजेचं आहे. यहोवा या विश्‍वाचा सर्वोच्च अधिकारी असला तरी तो “कंगालांस धुळींतून” उठवण्यासाठी “लवतो” किंवा खाली वाकतो. (स्तो. १८:३५; ११३:६, ७) पण याउलट यहोवा गर्विष्ठ आणि उद्धट लोकांची घृणा करतो.—नीति. १६:५.

१३. मंडळीतल्या वडिलांनी “आपल्या जिभेला लगाम” घालणं का गरजेचं आहे?

१३ यहोवाच्या अधीन असणाऱ्‍या मंडळीतल्या वडिलांनी “आपल्या जिभेला लगाम” घालणं गरजेचं आहे, नाहीतर त्यांच्याशी अनादाराने वागणाऱ्‍यासोबत ते कदाचित सौम्यपणे बोलणार नाहीत. (याको. १:२६; गलती. ५:१४, १५) आधी उल्लेख केलेले अलेक्स म्हणतात: “काही वेळा मला वाटायचं जे मला वडील म्हणून आदर देत नाहीत त्या भाऊबहिणींशी मी दयाळूपणे बोलणार नाही. पण मग मी बायबलमध्ये दिलेल्या विश्‍वासू पुरुषांच्या उदाहरणांवर मनन केलं आणि यामुळे मला नम्र आणि दीन राहण्याचं महत्त्व समजायला मदत झाली.” मंडळीतल्या भाऊबहिणींशी आणि इतर वडिलांशी प्रेमळपणे आणि दयाळूपणे बोलल्याने एक वडील यहोवाच्या अधीन असल्याचं दाखवतो.—कलस्सै. ४:६.

दावीद राजाकडून कुटुंबप्रमुख काय शिकू शकतात?

१४. यहोवाने कुटुंबप्रमुखांना कोणती भूमिका दिली आहे आणि तो त्यांच्याकडून कोणती अपेक्षा करतो?

१४ यहोवाने कुटुंबाचा प्रमुख म्हणून पित्यावर जबाबदारी सोपवली आहे. आणि देवाची इच्छा आहे त्यांनी आपल्या मुलांना शिकवावं, मार्गदर्शन द्यावं आणि त्यांना शिस्त लावावी. (१ करिंथ. ११:३; इफिस. ६:४) पण त्यांनी असा विचार करू नये की ते आपल्या मनाप्रमाणे त्यांच्या अधिकाराचा वापर करू शकतात. यहोवाने कुटुंबाची रचना केली आहे. यामुळे एक पिता आपल्या कुटुंबातल्या लोकांशी जसं वागतो याचा त्याला यहोवाला जाब द्यावा लागेल. (इफिस. ३:१४, १५) देवाचं मन आनंदित होईल अशाच पद्धतीने कुटुंबप्रमुखांनी आपल्या अधिकाराचा वापर केला तर ते यहोवाला अधीनता दाखवत असतील. दावीद राजाच्या जीवनाबद्दल अभ्यास करून ते खूपकाही शिकू शकतात.

एक वडील ज्या प्रकारे प्रार्थना करतो त्यावरून कुटुंबाला त्याची नम्रता दिसून येते (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५. दावीद राजा हा कुटुंबप्रमुखांसाठी एक चांगलं उदाहरण का आहे?

१५ यहोवाने दावीदला फक्‍त आपल्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून नाही, तर संपूर्ण इस्राएल राष्ट्राचा प्रमुख म्हणून नेमलं होतं. एक राजा या नात्याने दावीदकडे मोठा अधिकार होता. काही वेळा त्याने आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आणि गंभीर अपराधही केले. (२ शमु. ११:१४, १५) पण त्याने यहोवाला अधीनता दाखवली. ती कशी? यहोवाने त्याला सुधारलं तेव्हा त्याने शिस्त स्वीकारली. त्याने प्रार्थनेत आपल्या मनातल्या सर्व भावना व्यक्‍त केल्या. (स्तो. ५१:१-४) त्यासोबतच तो नम्र होता. त्याने फक्‍त पुरुषांनी दिलेले सल्लेच नाही तर स्त्रियांनी दिलेले सल्लेही स्वीकारले. (१ शमु. १९:११, १२; २५:३२, ३३) दावीद आपल्या चुकांतून शिकला आणि यहोवाच्या सेवेला त्याने आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवलं.

१६. कुटुंबप्रमुख दावीदकडून कोणते धडे शिकू शकतात?

१६ दावीद राजाकडून कुटुंबप्रमुख कोणते धडे शिकू शकतात याची आपण काही उदाहरणं पाहू या. यहोवाने तुम्हाला दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करू नका. आपली चूक कबूल करा आणि इतरांनी बायबलमधून दिलेला सल्ला स्वीकारा. जर तुम्ही असं केलं तर तुम्ही दाखवलेल्या नम्रतेसाठी तुमचं कुटुंब तुमचा आदर करेल. तुमच्या कुटुंबासोबत प्रार्थना करताना आपल्या भावना अगदी मनमोकळेपणाने यहोवाला सांगा. तुम्हाला यहोवाच्या मदतीची आणि मार्गदर्शनाची किती गरज आहे हे तुमच्या कुटुंबाला पाहू द्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथमस्थानी ठेवा. (अनु. ६:६-९) तुमचं चांगलं उदाहरण हे तुमच्या कुटुंबासाठी एक मौल्यवान भेटवस्तू ठरू शकते.

मरीयाकडून आई काय शिकू शकते?

१७. यहोवाने आईला कुटुंबात कोणती भूमिका दिली आहे?

१७ यहोवाने आईला कुटुंबात एक आदरणीय भूमिका दिली आहे आणि तिला आपल्या मुलांवर काही प्रमाणात अधिकारही दिला आहे. (नीति. ६:२०) तसं पाहायला गेलं तर एक आई जशी बोलते आणि वागते त्याचा जबरदस्त प्रभाव मुलांवर आयुष्यभर राहू शकतो. (नीति. २२:६) येशूची आई, मरीया हिच्याकडून एक आई काय शिकू शकते हे आता आपण पाहू या.

१८-१९. मरीयाच्या उदाहरणावरून एक आई काय शिकू शकते?

१८ मरीयाला शास्त्रवचनांबद्दल सखोल समज होती. ती मनापासून यहोवाचा आदर करायची आणि त्याच्यासोबत तिचं घनिष्ठ नातं होतं. ती स्वेच्छेने यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करायला व त्याच्या अधीन राहायला तयार होती, मग यामुळे तिच्या जीवनात खूप मोठे बदल झाले तरीही.—लूक १:३५-३८, ४६-५५.

दमलेली किंवा चिडलेली असताना एका आईला आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम व्यक्‍त करायला आणखी जास्त मेहनत घेण्याची गरज असते (परिच्छेद १९ पाहा) *

१९ आज एक आई अनेक बाबतीत मरीयाचं अनुकरण करू शकते. ते कसं? अनुकरण करण्याचा पहिला मार्ग म्हणजे, वैयक्‍तिक बायबल अभ्यास करणं आणि स्वतः यहोवाला प्रार्थना करून त्याच्यासोबतची मैत्री टिकवून ठेवणं. दुसरा मार्ग म्हणजे, यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी आपल्या जीवनात बदल करणं. उदाहरणार्थ, तुम्ही कदाचित अशा परिस्थितीत लहानाचे मोठे झाले असाल जिथे आईवडिलांना लगेच राग येतो आणि ते आपल्या मुलांशी खूप चिडून बोलतात. यामुळे तुम्हाला वाटेल की आपल्या मुलांचं अशाच प्रकारे संगोपन करायचं असतं. यहोवाचे स्तर शिकून घेतल्यानंतरही तुम्हाला कदाचित शांतीने आणि धीराने आपल्या मुलांशी वागणं कठीण जात असेल. जसं की, थकलेले असताना मुलं तुमचं ऐकत नसतील किंवा बेशिस्तपणे वागत असतील तेव्हा. (इफिस. ४:३१) खरंतर, अशा वेळी तुम्हाला यहोवावर आणखी जास्त विसंबून राहावं लागेल आणि यासाठी तुम्ही यहोवाला प्रार्थना करू शकता. लिडिया नावाची आई म्हणते: “मला आठवतं जेव्हा कधी माझा मुलगा माझं ऐकत नव्हता, तेव्हा मी त्याच्याशी रागावून बोलू नये म्हणून मला खूप कळकळून प्रार्थना करावी लागायची. इतकंच काय तर मी बोलताना मध्येच थांबून यहोवाला मनातल्या मनात प्रार्थना करायचे. यामुळे मला शांत व्हायला मदत व्हायची.”—स्तो. ३७:५.

२०. काही स्त्रियांना कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो आणि ते यावर कशी मात करू शकतात?

२० काही स्त्रियांना एका वेगळ्याच समस्येचा सामना करावा लागतो. आपल्या मुलांबद्दल असलेलं प्रेम व्यक्‍त करायला त्यांना कठीण वाटतं. (तीत २:३, ४) कारण काही स्त्रियांचं संगोपन अशा कुटुंबात झालेलं असतं जिथे पालकांचं आपल्या मुलांसोबत प्रेमळ नातं नव्हतं. तुम्ही जर अशा कुटुंबात वाढला असाल तर तुम्हाला तुमच्या पालकांसारखी चूक करण्याची गरज नाही. यहोवाच्या अधीन राहणाऱ्‍या एका आईला कदाचित आपल्या मुलांवर असलेलं प्रेम व्यक्‍त करायला शिकून घ्यावं लागेल. तिला आपले विचार, वागणं आणि भावना यांत बदल करायला कठीण वाटू शकतं. पण हे बदल करणं शक्य आहे आणि या बदलांमुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला, दोघांना फायदा होईल.

यहोवाच्या अधीन राहण्याचं सोडू नका

२१-२२. यशया ६५:१३, १४ या वचनांनुसार यहोवाच्या अधीन राहिल्याने आपल्याला कोणते फायदे होतात?

२१ यहोवाच्या अधीन राहण्याचे कोणते फायदे आहेत हे दावीद राजाला माहीत होतं. त्याने लिहिलं: “परमेश्‍वराचे विधि सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्‍वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो; ते पाळल्याने मोठी फलप्राप्ति होते.” (स्तो. १९:८, ११) यहोवाच्या अधीन राहणारे आणि त्याचा प्रेमळ सल्ला न ऐकणारे यांमधला फरक आपल्याला स्पष्टपणे दिसतो. आज यहोवाच्या अधीन राहणारे “हर्षित चित्ताने जयजयकार” करतात.—यशया ६५:१३, १४ वाचा.

२२ मंडळीतले वडील आणि आईवडील हे जेव्हा यहोवाला स्वेच्छेने अधीनता दाखवतात तेव्हा त्यांचं जीवन सुधारतं, कुटुंबात सौख्य नांदतं आणि संपूर्ण मंडळीतला एकोपा आणखी वाढतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे यहोवाचं मन हर्षित होतं. (नीति. २७:११) खरंच, यापेक्षा मोठा आनंद कोणताच असू शकत नाही!

गीत ४३ अविचल, सावध व बलशाली व्हा!

^ परि. 5 आपण यहोवाच्या अधीन का राहतो यावर या लेखात चर्चा करण्यात आली आहे. या लेखात आपण हेही पाहणार आहोत की ज्यांना काही प्रमाणात अधिकार देण्यात आले आहेत, म्हणजे मंडळीतले वडील आणि आईवडील, हे राज्यपाल नहेम्या, राजा दावीद आणि येशूची आई मरीया यांच्या उदाहरणांवरून काय शिकू शकतात.

^ परि. 1 वाक्यांशांचं स्पष्टीकरण: बळजबरीने एखादी गोष्ट करायला सांगण्यात येते तेव्हा त्या व्यक्‍तीला आज्ञा पाळणं आणि अधीन राहणं हे शब्द नकारात्मक वाटू शकतात. पण देवाचे लोक स्वतः देवाची आज्ञा पाळण्याची निवड करतात आणि त्यामुळे अधीन राहण्याला ते नकारात्मक दृष्टिकोनाने पाहत नाहीत.

^ परि. 7 या लेखात काही नावं बदलण्यात आली आहेत.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: नहेम्याने यरुशलेमच्या भिंतीच्या बांधकामात स्वतः हातभार लावला, त्याच प्रकारे मंडळीतले एक वडील आपल्या मुलासोबत राज्य सभागृहाच्या दुरुस्तीच्या कामात हातभार लावत आहे.

^ परि. 64 चित्रांचं वर्णन: एक वडील आपल्या कुटुंबाच्या वतीने यहोवाला मनापासून प्रार्थना करतो.

^ परि. 66 चित्रांचं वर्णन: एक मुलगा बराच वेळ व्हिडिओ गेम खेळत असतो आणि आपला होमवर्क किंवा स्वतःची कामं करत नाही. त्याची आई कामामुळे पार दमून गेली असते तेव्हा ती ते पाहते आणि त्याला न रागावता आणि न ओरडता शिस्त लावते.