व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३५

यहोवा आपल्या नम्र सेवकांची कदर करतो

यहोवा आपल्या नम्र सेवकांची कदर करतो

“परमेश्‍वर . . . दीनाकडे लक्ष देतो.”—स्तो. १३८:६.

गीत ४८ प्रतिदिनी यहोवासोबत चालू या

सारांश *

१. नम्र लोकांबद्दल यहोवाला काय वाटतं? स्पष्ट करा.

यहोवा नम्र लोकांवर प्रेम करतो. जे लोक मनापासून नम्र आहेत तेच यहोवासोबत वैयक्‍तिक नातं जोडू शकतात. याउलट, यहोवा “गर्विष्ठाला दुरून ओळखतो.” (स्तो. १३८:६) आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की आपण यहोवाला खूश करावं आणि त्याचं प्रेम अनुभवावं. म्हणून नम्रता हा गुण विकसित करण्याची आपल्याकडे बरीचशी चांगली कारणं आहेत.

२. आपण या लेखात कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

या लेखात आपण तीन प्रश्‍नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत: (१) नम्रता म्हणजे काय? (२) आपण हा गुण का विकसित केला पाहिजे? (३) कोणत्या परिस्थितींमुळे आपल्या नम्रतेची परीक्षा होऊ शकते? या लेखात आपण पाहू की नम्रता विकसित केल्याने आपण यहोवाचं मन कसं आनंदित करू शकतो. तसंच, त्यामुळे आपल्यालाही कसा फायदा होतो हेही आपण पाहू.—नीति. २७:११; यश. ४८:१७.

नम्रता म्हणजे काय?

३. नम्रता म्हणजे काय?

नम्र असणं म्हणजे मनापासून लीन असणं आणि इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजणं. नम्र व्यक्‍तीमध्ये गर्विष्ठपणा नसतो. बायबलनुसार नम्र व्यक्‍तीला जाणीव असते की यहोवा कितीतरी पटीने तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तसंच, सर्व जण कोणत्या न्‌ कोणत्या बाबतीत तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत हेही तिला माहीत असतं.—फिलिप्पै. २:३, ४.

४-५. एक व्यक्‍ती नम्र आहे की नाही हे आपण वरवर पाहून का ठरवू शकत नाही?

काही लोक नम्र आहेत असं आपल्याला वाटू शकतं पण मुळात ते तसे नसतात. कदाचित ते बोलके नसतील किंवा त्यांच्या पालकांनी त्यांना इतरांशी आदराने आणि सभ्यतेने वागायला शिकवल्यामुळे ते तसे वागत असतील. पण मुळात पाहिलं तर ते खूप गर्विष्ठ असू शकतात. आणि आज नाहीतर उद्या त्यांचं खरं व्यक्‍तीमत्व समोर येईल.—लूक ६:४५.

दुसरीकडे पाहता, आपल्याला वाटतं की आत्मविश्‍वास बाळगणारे आणि आपलं मत स्पष्टपणे व्यक्‍त करणारे लोक गर्विष्ठ असतात, पण हे खरं नाही. (योहा. १:४६, ४७) असं असलं तरी अशा लोकांनी आपल्या कौशल्यांवर अवलंबून राहू नये. आपण लाजाळू असलो किंवा नसलो तरी आपल्या सगळ्यांना नम्रता विकसित करण्यासाठी मेहनत करणं गरजेचं आहे.

प्रेषित पौल नम्र होता आणि त्याने कधीच स्वतःला श्रेष्ठ समजलं नाही (परिच्छेद ६ पाहा) *

६. १ करिंथकर १५:१० या वचनानुसार आपण प्रेषित पौलच्या उदाहरणावरून काय शिकू शिकतो?

प्रेषित पौलच्या उदाहरणाचा विचार करा. एका नंतर एक बऱ्‍याच शहरांमध्ये नवीन मंडळ्या सुरू करण्यासाठी यहोवाने प्रेषित पौलचा मोठ्या प्रमाणात वापर केला. येशूच्या इतर प्रेषितांच्या तुलनेत त्याने जास्त शहरांमध्ये जाऊन प्रचार केला असावा. पण असं असलं तरी त्याने इतर बांधवांपेक्षा स्वतःला जास्त महत्त्व दिलं नाही. त्याने नम्रपणे म्हटलं, की “प्रेषितांमध्ये माझी योग्यता सगळ्यात कमी आहे; इतकेच काय, तर प्रेषित म्हणवून घेण्याचीसुद्धा माझी लायकी नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.” (१ करिंथ. १५:९) पौलने प्रामाणिकपणे मान्य केलं की त्याचं यहोवासोबत असलेलं चांगलं नातं, हे त्याच्या गुणांमुळे किंवा सेवेत साध्य केलेल्या गोष्टींमुळे नाही तर यहोवाच्या अपार कृपेमुळे आहे. (१ करिंथकर १५:१० वाचा.) नम्रतेच्या बाबतीत पौलचं आपल्यासमोर खरंच किती चांगलं उदाहरण आहे! करिंथ मंडळीतले काही जण स्वतःला पौलपेक्षा श्रेष्ठ समजत होते, पण असं असूनसुद्धा पौलने त्या मंडळीला पत्र लिहिलं तेव्हा त्याने स्वतःबद्दल बढाई मारली नाही.—२ करिंथ. १०:१०.

बंधू कार्ल एफ. क्लाईन नम्र होते आणि त्यांनी नियमन मंडळाचे सदस्य म्हणून सेवा केली (परिच्छेद ७ पाहा)

७. आधुनिक काळातल्या जबाबदारी मिळालेल्या एका बांधवाने कशा प्रकारे नम्रता दाखवली?

बंधू कार्ल एफ. क्लाईन यांच्या जीवन कथेमुळे बऱ्‍याच बांधवांना प्रोत्साहन मिळालं आहे. ते नियमन मंडळाचे सदस्य होते. आपल्या कथेत त्यांनी नम्रपणे आणि प्रामाणिकपणे आपल्या कमतरतांबद्दल आणि समस्यांबद्दल सांगितलं आहे. उदाहरणार्थ, १९२० मध्ये पहिल्यांदा ते घरोघरच्या प्रचाराला गेले तेव्हा त्यांना प्रचार करणं कठीण वाटलं आणि यामुळे त्यांनी पुढे दोन वर्षं प्रचारच केला नाही. मग पुढे ते बेथेलमध्ये सेवा करू लागले तेव्हा त्यांना एका बांधवाने सल्ला दिला आणि यामुळे त्यांनी त्या बांधवाबद्दल काही काळापर्यंत मनात राग बाळगला. तसंच त्यांना पुढे जाऊन मानसिक आजाराचाही सामना करावा लागला, पण नंतर ते बरे झाले. या सगळ्या समस्या असल्या तरी त्यांना बऱ्‍याच महत्त्वाच्या नेमणुका मिळाल्या आणि त्यांनी त्या आनंदाने पूर्णही केल्या. बंधू क्लाईन यांना बरेचसे भाऊबहीण ओळखत होते, तरीसुद्धा त्यांनी आपल्या कमतरतांबद्दल सांगितलं. यावरून ते नम्र होते हे दिसून आलं. बरेचसे भाऊबहीण बंधू क्लाईन आणि त्यांच्या प्रामाणिक व प्रोत्साहनदायक जीवन कथेची नेहमी आठवण काढतात. *

आपण नम्रता विकसित का केली पाहिजे?

८. नम्रता दाखवल्यामुळे यहोवा खूश होतो हे आपल्याला १ पेत्र ५:६ या वचनातून कसं कळतं?

नम्रता विकसित करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यामुळे यहोवाचं मन आनंदित होतं. हीच गोष्ट प्रेषित पेत्रने स्पष्ट केली. (१ पेत्र ५:६ वाचा.) “मेरा चेला बन जा और मेरे पीछे हो ले” या पुस्तकात पेत्रने सांगितलेल्या शब्दांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यात म्हटलं आहे: “गर्व हा विषासारखा आहे आणि याचे परिणाम खूप भयानक होऊ शकतात. गर्विष्ठ व्यक्‍तीकडे कितीही कौशल्यं असली तरी यहोवासाठी ती व्यक्‍ती काहीच कामाची नसते. याउलट, नम्र व्यक्‍तीकडे कमी कौशल्यं असली तरी ती यहोवासाठी खूप मौल्यवान असते. . . .  तुम्ही दाखवत असलेल्या नम्रतेसाठी यहोवा तुम्हाला आशीर्वाद देईल.” * खरंच, यहोवाचं मन आनंदित करण्यापेक्षा मोठा आनंद असूच शकत नाही!—नीति. २३:१५.

९. आपण नम्र राहिलो तर इतर जण आपल्याला का पसंत करतील?

नम्रता विकसित केल्यामुळे यहोवाचं मन आनंदित तर होतंच पण त्यासोबत आपल्याला बरेचसे फायदेही होतात. आपण नम्र असल्यामुळे इतर जण आपल्याला पसंत करतात. हे समजण्यासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या लोकांसोबत वेळ घालवायला आवडतं याबद्दल विचार करा. (मत्त. ७:१२) सहसा आपल्याला अशा लोकांसोबत वेळ घालवायला आवडत नाही ज्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायचं असतं आणि जे इतरांचा सल्ला ऐकून घेत नाहीत. याउलट, आपल्याला अशा भाऊबहिणींसोबत वेळ घालवायला आवडतं जे “एकमेकांशी वागताना सहानुभूती, बंधुप्रेम, जिव्हाळा व नम्रता” दाखवतात. (१ पेत्र ३:८) आपल्याला नम्र लोकांसोबत राहायला आवडतं. आणि आपण नम्र असलो तरच इतरांनाही आपल्यासोबत राहायला आवडेल.

१०. नम्र असल्यामुळे आपल्याला जीवन जगणं कसं सोपं जातं?

१० नम्र असल्यामुळे आपल्याला जीवन जगणंसुद्धा सोपं जातं. खरंतर, कधीकधी आपल्याला अशा गोष्टी घडताना दिसतात ज्या आपल्याला योग्य वाटत नाहीत. एखाद्यावर अन्याय झाला आहे असं आपल्याला वाटतं. बुद्धिमान राजा शलमोन याने मान्य केलं: “चाकर घोड्यावर बसताना व सरदार चाकराप्रमाणे जमिनीवर पायी चालताना मी पाहिले.” (उप. १०:७) कधीकधी ज्यांच्याकडे कौशल्यं असतात त्यांची नेहमीच प्रशंसा होते असं नाही आणि ज्यांच्याकडे कमी कौशल्यं असतात त्यांना कधीकधी बराच मान दिला जातो. असं असलं तरी शलमोन राजाने मान्य केलं की आपल्या जीवनातल्या नकारात्मक गोष्टींमुळे चिंतित होण्यापेक्षा आपण आपलं जीवन जसं आहे तसं स्वीकारलं पाहिजे. (उप. ६:९) नम्रता असल्यामुळे आपण असा विचार करणार नाही की सगळं आपल्याच इच्छेप्रमाणे असावं, तर याऐवजी आपण जीवन आहे तसं स्वीकारू.

कोणत्या परिस्थितींमुळे आपल्या नम्रतेची परीक्षा होऊ शकते?

यासारख्या परिस्थितीमध्ये आपल्या नम्रतेची परीक्षा कशी होऊ शकते? (परिच्छेद ११-१२ पाहा) *

११. आपल्याला जेव्हा सल्ला दिला जातो तेव्हा आपली प्रतिक्रिया कशी असली पाहिजे?

११ आपल्याकडे दररोज नम्रता दाखवण्याच्या बऱ्‍याच संधी असतात. त्यांपैकी आता आपण काही परिस्थितींचा विचार करू या. पहिली म्हणजे, आपल्याला सल्ला दिला जातो तेव्हा. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे एखादी व्यक्‍ती आपल्याला सल्ला देते तर याचा अर्थ आपल्याकडून कदाचित अशी काहीतरी चूक झाली आहे ज्याची आपल्याला जाणीव नाही. अशा वेळी कदाचित आपण सल्ला लगेच नाकारू. तसंच, सल्ला देणाऱ्‍याबद्दल किंवा ज्या प्रकारे सल्ला देण्यात आला त्याबद्दल कदाचित टीका करू. पण आपण नम्र असलो तर योग्य मनोवृत्ती बाळगण्याचा प्रयत्न करू.

१२. नीतिसूत्रे २७:५, ६ या वचनांनुसार सल्ला देणाऱ्‍या भाऊबहिणीबद्दल आपण कदर का बाळगली पाहिजे? उदाहरण द्या.

१२ नम्र व्यक्‍ती दिलेल्या सल्ल्याची कदर करते. उदाहरणार्थ, विचार करा की तुम्ही ख्रिस्ती सभेमध्ये आहात. भाऊबहीणींशी बोलल्यानंतर त्यांच्यापैकी एक जण तुम्हाला जरा बाजूला घेऊन म्हणतो की तुमच्या दातात काहीतरी अडकलं आहे. यात काही शंका नाही की हे ऐकून तुम्हाला नक्कीच अवघडल्यासारखं वाटेल. पण त्या व्यक्‍तीने तुम्हाला त्याबद्दल सांगितलं म्हणून तुम्ही तिचे आभार मानणार नाही का? खरंतर, तुम्हाला असंही वाटेल की आधीच कुणीतरी याबद्दल सांगितलं असतं तर बरं झालं असतं! त्याचप्रमाणे, आपल्याला गरज असताना जर एका भावाने किंवा बहिणीने धैर्य दाखवून सल्ला दिला, तर त्या वेळी आपण नम्रपणे त्यांच्याबद्दल कदर बाळगली पाहिजे. कारण आपण त्या व्यक्‍तीला आपला शत्रू नाही तर मित्र समजतो.नीतिसूत्रे २७:५, ६ वाचा; गलती. ४:१६.

इतरांना जबाबदारी मिळते तेव्हा आपल्याला नम्रता या गुणाची का गरज असते? (परिच्छेद १३-१४ पाहा) *

१३. इतरांना यहोवाच्या संघटनेत जबाबदारी देण्यात येते तेव्हा आपण नम्रता कशी दाखवू शकतो?

१३ दुसरी म्हणजे, इतरांना यहोवाच्या संघटनेत जबाबदारी मिळते तेव्हा. जेसन नावाचे वडील म्हणतात: “इतरांना जबाबदारी मिळते तेव्हा कधीकधी मला वाटतं की ती जबाबदारी मला का दिली नाही.” तुम्हाला पण असंच वाटतं का? यहोवाच्या सेवेत जास्तीत जास्त “प्रयत्न” करणं चुकीचं नाही. (१ तीम. ३:१) पण आपण काय विचार करतो याबद्दल आपण नेहमी दक्षता बाळगली पाहिजे. जर आपण असं केलं नाही तर आपल्या मनात गर्व निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, एका विशिष्ट कामासाठी सर्वात निपुण मीच आहे असा विचार एका ख्रिस्ती बांधवाच्या मनात येऊ शकतो. किंवा एका ख्रिस्ती पत्नीच्या मनात असा विचार येऊ शकतो, की अमुक बांधवापेक्षा माझे पती जास्त निपुण आहेत! पण जर आपण नम्र असू तर आपण अशी गर्विष्ठ मनोवृत्ती बाळगणार नाही.

१४. इतरांना जबाबदारी मिळाल्यावर मोशेने जी प्रतिक्रिया दिली त्यावरून आपण काय शिकतो?

१४ इतरांना जबाबदारी देण्यात आल्यावर मोशेने जी प्रतिक्रिया दाखवली त्यावरून आपण बरंच काही शिकू शकतो. मोशेला इस्राएल राष्ट्राचं नेतृत्व करण्याची नेमणूक मिळाली होती आणि त्याबद्दल त्याने कदर बाळगली. पण जेव्हा यहोवाने मोशेची काही कामं इतरांनाही करू दिली तेव्हा त्याने कशी प्रतिक्रिया दाखवली? त्याने मनात हेवा बाळगला का? नाही. (गण. ११:२४-२९) मोशे नम्र असल्यामुळे न्याय करण्याच्या कामात त्याने इतरांची मदत घेतली. (निर्ग. १८:१३-२४) न्याय करण्यासाठी आता जास्त माणसं असल्यामुळे इस्राएली लोकांना बराच वेळ थांबून राहण्याची गरज नव्हती. मोशे ज्या प्रकारे वागला त्यावरून दिसून येतं की त्याने आपल्याजवळ असलेल्या अधिकाराला महत्त्व देण्यापेक्षा लोकांच्या भल्याचा विचार केला. खरंच, आपल्यासमोर त्याचं किती चांगलं उदाहरण आहे! जर आपली इच्छा आहे की यहोवाच्या सेवेत आपला वापर व्हावा तर आपल्याकडे बरीच कौशल्यं असण्यापेक्षा नम्रता असणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण “परमेश्‍वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो.”—स्तोत्र. १३८:६.

१५. बऱ्‍याच भाऊबहिणींना कोणत्या बदलांचा सामना करावा लागला आहे?

१५ तिसरी म्हणजे, आपली परिस्थिती बदलते तेव्हा. अलीकडच्या काही वर्षांमध्ये, अनेक दशकांपासून यहोवाची सेवा करणाऱ्‍या बऱ्‍याच भाऊबहिणींना नवीन नेमणुका मिळाल्या आहेत. उदाहरणार्थ, २०१४ मध्ये संघटनेद्वारे सांगण्यात आलं की प्रांतीय पर्यवेक्षक ही नेमणूक नसणार. म्हणून प्रांतीय पर्यवेक्षक आणि त्यांची पत्नी यांना पूर्ण वेळेच्या सेवेत दुसरी नेमणूक देण्यात आली. तसंच, बांधव ७० वर्षांचे झाल्यावर त्यांना विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करता येणार नाही असंही त्याच वर्षी सांगण्यात आलं. आणखी एक बदल म्हणजे, ८० किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले बांधव वडील वर्गाचे संयोजक म्हणून सेवा करू शकणार नाहीत. त्यासोबतच, मागच्या काही वर्षांमध्ये बेथेल सेवा करणाऱ्‍यांना पायनियरींग करण्यासाठी पाठवण्यात आलं. आणि काही जणांना आजारपण, कुटुंबाच्या जबाबदाऱ्‍या आणि इतर कारणांमुळे खास पूर्ण वेळेची सेवा सोडावी लागली आहे.

१६. बदलत्या परिस्थितींशी जुळवून घेण्यासाठी भाऊबहिणींनी कशा प्रकारे नम्रता दाखवली?

१६ बऱ्‍याच भाऊबहिणींना या बदलांशी जुळवून घेणं कठीण गेलं आहे. कारण त्यांना त्यांच्या कामामुळे खूप आनंद मिळायचा. अनेक भाऊबहिणींच्या बाबतीत पाहिलं तर बऱ्‍याच वर्षांपासून असलेली त्यांची नेमणूक त्यांना खूप आवडायची. काहींना बदलत्या परिस्थितींशी जुळवून घेताना खूप दुःख झालं, पण कालांतराने त्यांनी बदलांशी जुळवून घेतलं. त्यांना असं का करता आलं? कारण त्यांचं यहोवावर सर्वात जास्त प्रेम आहे. त्यांना माहीत आहे की त्यांनी कोणत्याही कामाला, पदवीला किंवा नेमणुकीला नाही, तर यहोवाला आपलं जीवन समर्पित केलं आहे. (कलस्सै. ३:२३) ते नम्रपणे यहोवाची सेवा आनंदाने करण्यासाठी तयार आहेत, मग त्यांना कुठलीही नेमणूक मिळाली तरीही. ते “आपल्या सर्व चिंता” देवावर टाकून देतात, कारण त्यांना माहीत आहे की त्याला त्यांची काळजी आहे.—१ पेत्र ५:६, ७.

१७. देवाचं वचन आपल्याला नम्र राहण्यासाठी प्रोत्साहन देतं याबद्दल आपण का आभारी आहोत?

१७ देवाचं वचन आपल्याला नम्र राहण्यासाठी प्रोत्साहन देतं याबद्दल आपण खूप आभारी आहोत. आपण नम्रता हा सुंदर गुण विकसित करतो तेव्हा आपल्याला आणि इतरांनाही याचा फायदा होतो. तसंच, आपल्याला जीवनातल्या समस्यांचा चांगल्या प्रकारे सामना करणंही शक्य होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या स्वर्गीय पित्याच्या जवळ येतो. आपल्याला हे जाणून खूप आनंद होतो की यहोवा “उच्च, परम थोर आहे” तरी तो आपल्या नम्र सेवकांना मौल्यवान समजतो.—यश. ५७:१५.

गीत २२ “यहोवा माझा मेंढपाळ”

^ परि. 5 आपण नम्र असणं महत्त्वाचं आहे. नम्रता म्हणजे काय? आपण हा गुण विकसित का केला पाहिजे? आणि परिस्थिती बदलल्यामुळे आपल्या नम्रतेची परीक्षा कशी होऊ शकते? या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर या लेखात चर्चा केली जाईल.

^ परि. 7जेहोवा हॅझ डेल्ट रिवॉर्डिंगली विथ मी” हा लेख वाचटॉवर १ ऑक्टोबर, १९८४ आणि “यहोवानं माझ्यावर खूप दया केली आहे!” हा लेख टेहळणी बुरूज १ मे, २००१ यांत पाहा.

^ परि. 53 चित्रांचं वर्णन: प्रेषित पौल एका बांधवाच्या घरी असताना इतरांशी व लहान मुलांशी नम्रपणे वागतो आणि त्याला त्यांच्याशी बोलताना आनंद होतो.

^ परि. 57 चित्रांचं वर्णन: एका तरुण बांधवाने बायबलवर आधारित दिलेला सल्ला एक बांधव स्वीकारतो.

^ परि. 59 चित्रांचं वर्णन: तरुण बांधवाला मंडळीत जबाबदारी मिळते तेव्हा वृद्ध बांधव त्याच्याबद्दल मनात हेवा बाळगत नाही.