व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख ३६

हर्मगिदोनची आतुरतेने वाट पाहा!

हर्मगिदोनची आतुरतेने वाट पाहा!

“त्यांनी . . . हर्मगिदोन म्हटलेल्या ठिकाणी सर्व राजांना एकत्र आणले.” —प्रकटी. १६:१६.

गीत ४९ यहोवा आमचा दुर्ग!

सारांश *

१-२. (क) हर्मगिदोनमुळे मानवांना आशा कशी मिळते? (ख) या लेखात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

काही लोक असा विचार करतात की अणुबॉम्बमुळे किंवा एका मोठ्या नैसर्गिक विपत्तीमुळे या जगाचा विनाश होईल. पण बायबल असं सांगत नाही. याउलट ते सांगतं की लवकरच एक युद्ध होईल आणि त्याचे चांगले परिणाम होतील. या युद्धाला बायबलमध्ये हर्मगिदोन म्हटलं आहे. या युद्धाबद्दल बायबलमध्ये जे सांगितलं आहे ते जाणून घेतल्यामुळे आपल्याला आशा मिळते. (प्रकटी. १:३) हर्मगिदोनच्या युद्धामुळे मानवांचा नाश नाही, तर त्यांचा बचाव होईल. हे कसं घडेल?

बायबल सांगतं की मानवी राज्यांचा अंत करण्याद्वारे हर्मगिदोनचं युद्ध मानवांचा बचाव करेल. तसंच जे नीतिमान आहेत अशा लोकांना वाचवलं जाईल. पण या युद्धामुळे सर्व दुष्ट लोकांचा आणि पृथ्वीची नासधूस करणाऱ्‍यांचा नाश केला जाईल. यामुळे पृथ्वीवर मानवांसाठी चांगली परिस्थिती असेल. (प्रकटी. ११:१८) हे मुद्दे आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण आता चार प्रश्‍नांची उत्तरं पाहू या: हर्मगिदोन म्हणजे काय? ते सुरू होण्याआधी कोणत्या घटना घडतील? हर्मगिदोनमधून आपल्याला जर आपला बचाव करायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? आणि हर्मगिदोन जवळ येत असताना विश्‍वासू राहण्यासाठी आपण काय करू शकतो?

हर्मगिदोन म्हणजे काय?

३. (क) “हर्मगिदोन” या शब्दाचा काय अर्थ होतो? (ख) प्रकटीकरण १६:१४, १६ या वचनांच्या आधारावर आपण असं का म्हणू शकतो की हर्मगिदोन हे खरोखरचं ठिकाण नाही?

प्रकटीकरण १६:१४, १६ वाचा. “हर्मगिदोन” हा शब्द बायबलमध्ये फक्‍त एकदाच येतो आणि तो ज्या मूळ इब्री शब्दापासून आला आहे त्याचा अर्थ “मगिद्दोचे पर्वत” असा होतो. (प्रकटी. १६:१६, तळटीप) मगिद्दो हे प्राचीन इस्राएलमध्ये असलेलं एक शहर होतं. (यहो. १७:११) पण हर्मगिदोन खरोखरच्या ठिकाणाला सूचित करत नाही. खरंतर, हर्मगिदोन एका अशा परिस्थितीला सूचित करतं ज्यात पृथ्वीवरील राजांना “सर्वसमर्थ देवाच्या मोठ्या दिवसाच्या युद्धासाठी एकत्र” करणं सामील आहे. (प्रकटी. १६:१४) पण या लेखात “हर्मगिदोन” हा शब्द पृथ्वीवरच्या राजांना एकत्र केल्यानंतर लगेच जे युद्ध सुरू होईल त्याला सूचित करण्यासाठीही वापरण्यात आला आहे. हर्मगिदोन हे लाक्षणिक ठिकाण आहे हे आपण कशावरून म्हणू शकतो? याची आपण तीन कारणं पाहू या. पहिलं म्हणजे, मगिद्दोचं पर्वत हे खरोखरचं नसून लाक्षणिक आहे. दुसरं म्हणजे, मगिद्दोच्या आसपासची जागा खूप लहान आहे आणि त्यात “संबंध पृथ्वीवरील” राजे त्यांच्या सैन्यासोबत आणि हत्यारांसोबत एकत्र येऊ शकत नाहीत. तिसरं कारण म्हणजे, जेव्हा जगभरातील राजे देवाच्या लोकांवर हल्ला करतील तेव्हा हर्मगिदोनची सुरुवात होईल. पण देवाचे लोक तर संपूर्ण पृथ्वीवर पसरलेले आहेत. त्यामुळे हा हल्ला एका विशिष्ट ठिकाणी होणार नाही.

४. यहोवाने आपल्या शेवटच्या मोठ्या युद्धाचा संबंध मगिद्दोशी का जोडला?

यहोवाने त्याच्या शेवटच्या मोठ्या युद्धाचा संबंध मगिद्दोशी का जोडला? मगिद्दो आणि त्याच्या जवळपास असलेल्या इज्रेलच्या खोऱ्‍यात बरीच युद्धं लढली गेली. यांपैकी काही युद्धात यहोवा आपल्या लोकांच्या वतीने लढला होता. उदाहरणार्थ, “मगिद्दोच्या जलप्रवाहांपाशी” यहोवाने इस्राएलचा शास्ता बाराक याला सीसराच्या कनानी सैन्याला हरवायला मदत केली. चमत्कारिक रीत्या हा विजय मिळवून दिल्याबद्दल बाराक आणि संदेष्ट्री दबोरा यांनी यहोवाचे आभार मानले. त्यांनी गीतात म्हटलं: “आकाशांतून तारे लढले; त्यांनी . . . सीसराशी लढाई केली. कीशोन नदीने . . . त्यांना वाहून नेले.”—शास्ते ५:१९-२१.

५. बाराक जे युद्ध लढला आणि हर्मगिदोन यात एक महत्त्वाचा फरक काय असेल?

बाराक आणि दबोरा यांनी आपल्या गीताचा शेवट पुढील शब्दांनी केला: “हे परमेश्‍वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावोत; पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्‍या सूर्यासमान होवोत.” (शास्ते ५:३१) हर्मगिदोनमध्ये देवाच्या विरोधकांचीही हीच दशा होईल. मात्र देवावर प्रेम करणाऱ्‍या लोकांना वाचवलं जाईल. पण आधीच्या आणि हर्मगिदोनच्या युद्धामध्ये एक महत्त्वाचा फरक असेल. हर्मगिदोनमध्ये देवाच्या लोकांना लढावं लागणार नाही. त्यांच्याजवळ तर हत्यारंदेखील नसतील. याउलट ते शांत राहतील आणि यहोवा व त्याच्या स्वर्गीय सैन्यावर पूर्ण भरवसा ठेवतील.—यश. ३०:१५; प्रकटी. १९:११-१५.

६. हर्मगिदोनमध्ये आपल्या शत्रूंचा विनाश करण्यासाठी यहोवा कोणती पद्धत वापरू शकतो?

यहोवा आपल्या शत्रूंचा हर्मगिदोनमध्ये विनाश कसा करेल? तो असं वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. उदाहरणार्थ, तो भूकंपांचा, गारांचा किंवा विजांचा उपयोग करून असं करू शकतो. (ईयो. ३८:२२, २३; यहे. ३८:१९-२२) तसंच, तो त्याच्या शत्रूंना आपसातच लढायला लावू शकतो. (२ इति. २०:१७, २२, २३) किंवा तो दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी आपल्या देवदूतांचाही उपयोग करू शकतो. (यश. ३७:३६) शत्रूंचा विनाश करण्यासाठी यहोवाने कोणतीही पद्धत वापरली, तरी शेवटी त्याचाच विजय होईल. त्याच्या सर्व शत्रूंचा विनाश होईल आणि नीतिमान लोकांना वाचवलं जाईल.—नीति. ३:२५, २६.

हर्मगिदोनच्या आधी कोणत्या घटना घडतील?

७-८. (क) १ थेस्सलनीकाकर ५:१-६ या वचनांनुसार जगातले राजकीय नेते कोणती अनपेक्षित घोषणा करतील? (ख) ही घोषणा लोकांसाठी धोक्याची का ठरेल?

“यहोवाचा दिवस” येण्याआधी “शांती आहे, सुरक्षा आहे!” ही घोषणा. (१ थेस्सलनीकाकर ५:१-६ वाचा.) १ थेस्सलनीकाकर ५:२ मध्ये उल्लेख केलेला “यहोवाचा दिवस” हा मोठ्या संकटाला सूचित करतो. (प्रकटी. ७:१४) मोठं संकट सुरू होणार आहे हे आपल्याला कसं कळेल? बायबल आपल्याला सांगतं की तेव्हा एक खूप अनपेक्षित घोषणा केली जाईल. ही घोषणा आपल्यासाठी एक चिन्ह असेल की मोठं संकट आता सुरू होणार आहे.

“शांती आहे, सुरक्षा आहे!” हीच ती भविष्यवाणीत सांगितलेली घोषणा असेल. जगातले राजकीय नेते अशी घोषणा का करतील? यात धार्मिक पुढारीही सहभाग घेतील का? कदाचित. पण ही घोषणा खोटी असेल आणि याचा उगम दुरात्म्यांकडून असेल. ही घोषणा मानवी इतिहासात आतापर्यंत कधीही न झालेल्या मोठ्या संकटाच्या आधी करण्यात येईल. पण ती लोकांसाठी धोक्याची ठरेल कारण या खोट्या घोषणेमुळे लोकांना सुरक्षित वाटू लागेल. त्याबद्दल बायबल सांगतं की “गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे प्रसूतिवेदना सुरू होतात, त्याप्रमाणे त्यांच्यावर अचानक नाश येईल.” मग त्या वेळी यहोवाच्या विश्‍वासू सेवकांचं काय होईल? यहोवाचा दिवस अचानक आला आहे हे पाहून त्यांना आश्‍चर्य वाटेल. पण याबद्दल आधीच माहीत असल्यामुळे ते या घटनेसाठी तयार असतील.

९. देव सैतानाच्या जगाचा कशा प्रकारे विनाश करेल?

यहोवाने नोहाच्या दिवसांत सैतानाच्या जगाचा एकाच वेळी संपूर्ण विनाश केला होता. पण आता तो असं करणार नाही. यहोवा सैतानाच्या जगाचा दोन टप्प्यात विनाश करेल. आधी तो मोठ्या बाबेलचा, म्हणजेच खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्याचा विनाश करेल. आणि मग हर्मगिदोनमध्ये तो सैतानाच्या उरलेल्या जगाचा, म्हणजेच राजकीय, सैन्य आणि व्यापार जगताचा विनाश करेल. या दोन महत्त्वाच्या घटनांवर आता आपण चर्चा करू या.

१०. प्रकटीकरण १७:१, ६ आणि १८:२४ या वचनांनुसार यहोवा मोठ्या बाबेलचा विनाश का करेल?

१० “मोठ्या वेश्‍येवर न्यायदंड.” (प्रकटीकरण १७:१, ६; १८:२४ वाचा.) मोठ्या बाबेलने देवाच्या नावावर कलंक लावला आहे. तिने लोकांना देवाबद्दल खोट्या गोष्टी शिकवल्या आहेत. जगातील राजकीय नेत्यांसोबत संबंध जोडून तिने एका अर्थी व्यभिचार केला आहे. खोट्या धर्माने आपल्या शक्‍तीचा गैरवापर करून आपल्या सदस्यांचा छळ केला आहे आणि त्यांची संपत्ती लुटली आहे. तसंच, मोठ्या बाबेलने बऱ्‍याच लोकांना जिवे मारलं आहे आणि यात देवाच्या काही विश्‍वासू सेवकांचाही समावेश होतो. (प्रकटी. १९:२) मग यहोवा मोठ्या बाबेलचा विनाश कसा करेल?

११. “गडद लाल रंगाचा जंगली” पशू कोणाला सूचित करतो आणि मोठ्या बाबेलबद्दल देवाचा उद्देश पूर्ण करण्यात या पशूचा कसा सहभाग आहे?

११ “गडद लाल रंगाच्या जंगली” पशूच्या दहा शिंगांचा उपयोग करून यहोवा ‘मोठ्या वेश्‍येचा’ विनाश करेल. हा लाक्षणिक जंगली पशू संयुक्‍त राष्ट्राला सूचित करतो. त्या पशूचे दहा शिंग या संघटनेला समर्थन देणाऱ्‍या सध्याच्या राजकीय शक्‍तींना सूचित करतात. देवाच्या नियुक्‍त वेळी या राजकीय शक्‍ती लाक्षणिक बाबेलवर, म्हणजेच खोट्या धर्मावर हल्ला करतील. ते “तिला उद्ध्‌वस्त व नग्न करतील” आणि तिची संपत्ती लुटून घेतील. तसंच, ती किती दुष्ट होती याबद्दल ते इतरांना सांगतील. (प्रकटी. १७:३, १६) हा विनाश अचानक, जणू एका दिवसात येईल आणि यामुळे तिचं समर्थन करणाऱ्‍या लोकांना मोठा धक्का बसेल. कारण तिने बऱ्‍याच वेळा गर्वाने असं म्हटलं आहे: “मी तर राणीसारखी बसले आहे. मी काही विधवा नाही आणि माझ्या वाट्याला कधीही दुःख येणार नाही.”—प्रकटी. १८:७, ८.

१२. यहोवा राष्ट्रांना काय करू देणार नाही आणि का?

१२ यहोवा राष्ट्रांना त्याच्या लोकांचा विनाश करू देणार नाही. कारण आज यहोवाचे सेवक अभिमानाने इतरांना त्याच्या नावाबद्दल सांगतात आणि ‘मोठ्या बाबेलमधून निघा’ या त्याने दिलेल्या आज्ञेचं मनापासून पालन करतात. (प्रे. कार्ये १५:१६, १७; प्रकटी. १८:४) तसंच, तिच्यापासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी त्यांनी बरेच त्याग केले आहेत आणि मेहनत घेतली आहे. त्यामुळे यहोवाच्या सेवकांवर “तिच्या कोणत्याही पीडा” येणार नाहीत. असं असलं तरी, यानंतर घडणाऱ्‍या घटनांमुळे त्यांच्या विश्‍वासाची परीक्षा होईल.

देवाचे लोक जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी हल्ला झाल्यावर ते त्याच्यावर भरवसा ठेवतील! (परिच्छेद १३ पाहा) *

१३. (क) गोग कोणाला सूचित करतो? (ख) यहेज्केल ३८:२, ८, ९ या वचनांनुसार गोग देवाच्या लोकांवर हल्ला का करेल?

१३ गोगचा हल्ला. (यहेज्केल ३८:२, ८, ९ वाचा.) खोट्या धर्माच्या संघटनांचा संपूर्ण विनाश झाल्यानंतर, पृथ्वीवर फक्‍त एकच धर्म उरेल. फक्‍त यहोवाचे सेवक त्याची सेवा करत राहतील. पण हे पाहून सैतान खूप क्रोधित होईल. त्यामुळे तो “अशुद्ध प्रेरित वचने” वापरून राष्ट्रांच्या समूहाला यहोवाच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी प्रेरित करेल. (प्रकटी. १६:१३, १४) राष्ट्रांच्या या समूहाला “मागोगचा गोग” असं म्हटलं आहे. राष्ट्रांचा हा समूह यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल तेव्हा हर्मगिदोनच्या युद्धाला सुरुवात होईल.—प्रकटी. १६:१६.

१४. गोगला कोणती गोष्ट लक्षात येईल?

१४ गोगला आपल्या “मांसमय भुजांचा” आधार असेल, म्हणजे तो आपल्या सैन्याच्या ताकदीवर भरवसा ठेवेल. (२ इति. ३२:८) आपण मात्र आपल्या यहोवा देवावर भरवसा ठेवू. पण ही गोष्ट राष्ट्रांना मूर्खपणाची वाटेल. असं का? कारण एके काळी खूप शक्‍तिशाली असलेल्या मोठ्या बाबेलचे देव तिला “जंगली पशू” आणि त्याच्या “दहा शिंगे” यांपासून वाचवू शकले नाही. (प्रकटी. १७:१६) म्हणून गोगला म्हणजे राष्ट्रांना वाटेल की ते आपला अगदी सहज रीत्या नाश करू शकतील. गोग “अभ्राने देश झाकावा” तसा यहोवाच्या लोकांवर हल्ला करेल. (यहे. ३८:१६) पण त्याच्या लवकरच लक्षात येईल की तो स्वतःच्याच जाळ्यात अडकला आहे. प्राचीन काळातल्या फारोला जसं कळलं तसं गोगलाही कळेल की तो यहोवाच्या विरोधात लढत आहे.—निर्ग. १४:१-४; यहे. ३८:३, ४, १८, २१-२३.

१५. येशू हर्मगिदोनच्या लढाईत काय करेल?

१५ ख्रिस्त व त्याचं स्वर्गातलं सैन्य देवाच्या वतीने लढेल आणि राष्ट्रे आणि त्यांच्या सैन्यांचा पूर्णपणे नाश करेल. (प्रकटी. १९:११, १४, १५) पण यहोवाच्या मुख्य शत्रूबद्दल, सैतानाबद्दल काय? तो राष्ट्रांशी खोटं बोलला आणि त्याने त्यांना हर्मगिदोनच्या लढाईत देवाच्या लोकांवर हल्ला करायला लावला. येशू त्याला आणि दुरात्म्यांना “अथांग डोहात टाकून” देईल आणि त्यांना तिथे हजार वर्षांसाठी कैद करण्यात येईल.—प्रकटी. २०:१-३.

हर्मगिदोनमधून तुम्ही कसे वाचाल?

१६. (क) आपण देवाला ओळखतो हे आपण कसं दाखवू शकतो? (ख) हर्मगिदोनच्या वेळी यहोवाला ओळखणाऱ्‍या लोकांचं काय होईल?

१६ आपण सत्यात नवीन असो अथवा बऱ्‍याच वर्षांपासून, हर्मगिदोनमधून वाचण्यासाठी आपल्याला दाखवून द्यावं लागेल की आपण ‘देवाला ओळखतो’ आणि “आपल्या प्रभू येशूविषयीचा आनंदाचा संदेश” मानतो. (२ थेस्सलनी. १:७-९) आपल्याला देवाची पसंती-नापंसती आणि त्याचे स्तर माहीत असतात तेव्हा आपण म्हणू शकतो की आपण देवाला ओळखतो. आपण त्याच्यावर प्रेम करण्याद्वारे, त्याची आज्ञा पाळण्याद्वारे आणि फक्‍त त्याचीच उपासना करण्याद्वारेही दाखवून देऊ शकतो की आपण त्याला ओळखतो. (१ योहा. २:३-५; ५:३) आपण जेव्हा दाखवून देतो की आपल्याला त्याची ओळख आहे तेव्हा तोही आपल्याला “ओळखतो” आणि ही खरंच खूप सन्मानाची गोष्ट आहे. हर्मगिदोनमध्ये याच गोष्टीमुळे आपला जीव वाचेल! (१ करिंथ. ८:३) ते कसं? कारण त्याने आपल्याला ओळखणं म्हणजेच त्याची पसंती असणं. आणि यामुळेच आपला जीव वाचेल.

१७. “आपल्या प्रभू येशूविषयीचा आनंदाचा संदेश” मानणं याचा काय अर्थ होतो?

१७ आपल्या “प्रभू येशूविषयीचा आनंदाचा संदेश” यात येशूने शिकवलेली सर्व सत्यं यांचा समावेश होतो. त्यांबद्दल आपल्याला देवाच्या वचनात वाचायला मिळतं. आपण ही सत्यं जीवनात लागू करण्याद्वारे दाखवतो की आपण आनंदाचा संदेश मानतो. आनंदाचा संदेश मानणं यात देवाच्या राज्याला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व देणं, देवाच्या नीतिमान स्तरांनुसार जगणं आणि देवाच्या राज्याबद्दल प्रचार करणं या गोष्टी सामील आहेत. (मत्त. ६:३३; २४:१४) तसंच, यात ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांना आपली महत्त्वपूर्ण जबाबदारी पूर्ण करण्यात साहाय्य करणंही सामील आहे.—मत्त. २५:३१-४०.

१८. दुसऱ्‍या मेंढरांनी पुरवलेल्या मदतीबद्दल देवाचे अभिषिक्‍त सेवक लवकरच त्यांना कसं प्रतिफळ देतील?

१८ देवाचे अभिषिक्‍त सेवक, दुसऱ्‍या मेंढरांनी पुरवलेल्या मदतीबद्दल लवकरच त्यांना प्रतिफळ देतील. (योहा. १०:१६) ते कसं? हर्मगिदोनचं युद्ध सुरू होण्याआधी सर्व १,४४,००० जण स्वर्गात असतील. देवाची आत्मिक मुलं म्हणून त्यांना अमर जीवन दिलं जाईल. त्यानंतर ते स्वर्गातल्या सैन्याचे भाग असतील. गोगचा नाश करण्यात आणि मेंढरांसमान असलेल्या मोठ्या लोकसमुदायाचं संरक्षण करण्यात त्यांचा वाटा असेल. (प्रकटी. २:२६, २७; ७:९, १०) मोठ्या लोकसमुदायाला खरंच खूप आनंद होईल, कारण त्यांनी यहोवाच्या अभिषिक्‍त सेवकांना साथ दिली होती.

हर्मगिदोन जवळ येत असताना विश्‍वासू राहण्यासाठी आपण काय करू शकतो?

१९-२०. समस्या असल्या तरी आपण हर्मगिदोन येईपर्यंत विश्‍वासात टिकून कसे राहू शकतो?

१९ या शेवटच्या कठीण दिवसांत यहोवाच्या सेवकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. असं असलं तरी ते आपला आनंद टिकवून ठेवू शकतात. (याको. १:२-४) असं करण्याचा एक मार्ग म्हणजे मनापासून प्रार्थना करत राहणं. (लूक २१:३६) त्यासोबतच आपण दररोज देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यावर मनन केलं पाहिजे. तसंच, लवकरच पूर्ण होणाऱ्‍या भविष्यवाण्यांचाही आपण अभ्यास केला पाहिजे. (स्तो. ७७:१२) या गोष्टी करण्यासोबत आपण सेवाकार्यातही आवेशाने भाग घेतला तर आपला विश्‍वास आणि आशा टिकवून ठेवायला आपल्याला मदत होईल.

२० त्या काळाची कल्पना करा जेव्हा मोठ्या बाबेलचा नाश झालेला असेल आणि हर्मगिदोनचं युद्ध संपलेलं असेल. खरंच तो काळ खूप रोमांचक असेल! आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तेव्हा सर्व लोक देवाच्या नावाचा आणि त्याच्या राज्य करण्याच्या अधिकाराचा आदर करतील. तो क्षण खरंच खूप आनंददायी असेल. (यहे. ३८:२३) देवाला ओळखणाऱ्‍यांसाठी, त्याच्या मुलाची आज्ञा पाळणाऱ्‍यांसाठी आणि ज्यांनी शेवटपर्यंत धीर धरला त्यांच्यासाठी हर्मगिदोनचं युद्ध आनंद घेऊन येणारं ठरेल.—मत्त. २४:१३.

गीत ३२ निर्भय व निश्‍चयी राहा!

^ परि. 5 यहोवाचे सेवक हर्मगिदोनची अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत. या लेखात आपण पाहणार आहोत की हर्मगिदोन म्हणजे काय, ते सुरू होण्याआधी कोणत्या घटना घडतील आणि अंत जवळ येत असताना आपण यहोवाला विश्‍वासू कसे राहू शकतो.

^ परि. 71 चित्रांचं वर्णन: “शांती आहे, सुरक्षा आहे!” अशी घोषणा केली जाईल तेव्हा आपण शक्य होईल तोपर्यंत प्रचार करत राहू. खोट्या धर्मांचा नाश झाल्यावरही आपण अभ्यास चालू ठेवू. मागोगचा गोग आपल्यावर हल्ला करेल तेव्हाही आपल्या संरक्षणासाठी आपण देवावर निर्भर राहू.

^ परि. 85 चित्रांचं वर्णन: पोलीस एका ख्रिश्‍चन कुटुंबाच्या घरावर धाड टाकायला तयार आहेत. पण येशू आणि त्याचे देवदूत या सर्व गोष्टी पाहत आहेत हा भरवसा त्या कुटुंबाला आहे.