वाचकांचे प्रश्न
अभिषिक्तांना देवाकडून मिळणारा “विसार” आणि त्यांना मुद्रांकित करण्यासाठी मारण्यात येणारा “शिक्का” काय आहे?—२ करिंथ. १:२१, २२.
विसार: एका संदर्भग्रंथानुसार २ करिंथकर १:२२ मध्ये ज्या ग्रीक संज्ञेचं भाषांतर “विसार” असं करण्यात आलं आहे, ती “कायद्याशी आणि व्यापाराशी संबंधित असणारी एक तांत्रिक संज्ञा होती.” या संज्ञेचा अर्थ सांगताना हा संदर्भग्रंथ पुढे म्हणतो, “एखादी गोष्ट खरेदी करताना त्या वस्तूच्या एकूण किंमतीतील काही रक्कम सुरवातीला दिली जाते. या रक्कमेला पहिला हप्ता, ठेव, डाउन पेमेंट किंवा तारण असं म्हटलं जातं. या रकमेमुळे त्या गोष्टीवरील मालकी हक्क कायदेशीर बनतो किंवा झालेल्या व्यवहाराला कायदेशीर स्वरूप मिळतं.” त्यामुळे जेव्हा एका ख्रिस्ती व्यक्तीला पवित्र आत्म्याद्वारे अभिषिक्त करण्यात येतं, तेव्हा ती गोष्ट त्या व्यक्तीकरता विसार ठरते. या अभिषिक्तांना मिळणाऱ्या पूर्ण रकमेविषयी किंवा बक्षिसाविषयी २ करिंथकर ५:१-५ मध्ये सांगण्यात आलं आहे. त्यात म्हटलं आहे की या बक्षिसामध्ये, त्यांना मिळणाऱ्या अविनाशी शरीराचा आणि अमर जीवनाचा समावेश होतो.—१ करिंथ. १५:४८-५४.
आधुनिक ग्रीक भाषेत, अशा प्रकारचा शब्द विवाह निश्चित करताना दिल्या जाणाऱ्या अंगठीसाठी वापरण्यात आला आहे. ख्रिस्ताची लाक्षणिक वधू होणाऱ्यांकरता हे किती योग्य उदाहरण आहे!—२ करिंथ. ११:२; प्रकटी. २१:२, ९.
शिक्का: एखाद्या गोष्टीवरील मालकी हक्काचं, त्या गोष्टीच्या सत्यतेचं किंवा झालेल्या कराराचं प्रमाण देण्याकरता खूण किंवा चिन्ह म्हणून पूर्वी शिक्क्याचा वापर केला जायचा. अभिषिक्तांच्या बाबतीत, त्यांना पवित्र आत्म्याद्वारे देवाची संपत्ती म्हणून मुद्रांकित करण्यासाठी लाक्षणिक रीत्या त्यांच्यावर “शिक्का” मारण्यात आला. (इफिस. १:१३, १४) अभिषिक्तांवर शेवटला शिक्का एकतर विश्वासात मृत्यू होण्याच्या काही काळाआधी किंवा मोठं संकट येण्याच्या काही काळाआधी मारण्यात येतो.—इफिस. ४:३०; प्रकटी. ७:२-४.