व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा योग्यपणे वापर करत आहात का?

तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा योग्यपणे वापर करत आहात का?

साधारणतः १.४ किलो वजनाची, पण “संपूर्ण विश्वात सर्वात किचकट” म्हणून ओळखली जाणारी गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? ती गोष्ट आहे आपला मेंदू! खरंच एखाद्याला चकित करून सोडेल अशीच आपल्या मेंदूची कार्यक्षमता आहे. आपल्या मेंदूविषयी आपण जितकं जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करू, तितकी यहोवाच्या “अद्‌भुत” निर्मितीबद्दल असणारी आपली कदर आणखी वाढत जाईल. (स्तो. १३९:१४) आपल्या मेंदूच्याच एका क्षमतेचा, म्हणजे कल्पनाशक्तीचा विचार करा.

कल्पनाशक्ती म्हणजे काय? एका शब्दकोशात कल्पनाशक्तीची व्याख्या, “नावीन्यपूर्ण व उत्तेजित करणाऱ्या किंवा कधीच न अनुभवलेल्या गोष्टींचं चित्र आपल्या मनात उभं करण्याची किंवा त्याबद्दल विचार करण्याची क्षमता,” अशी करण्यात आली आहे. ही व्याख्या लक्षात घेतल्यास, तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा नेहमीच वापर करत असता असं तुम्हाला वाटत नाही का? उदाहरणार्थ, तुम्ही कधी एखाद्या अनोळखी ठिकाणाबद्दल वाचलं किंवा ऐकलं आहे का? ते ठिकाण कधी पाहिलं नसलं तरी त्या ठिकाणाची कल्पना करणं तुम्हाला कधी अवघड गेलं का? नक्कीच नाही. यावरून पाहण्याच्या, ऐकण्याच्या, चव घेण्याच्या, स्पर्श करण्याच्या आणि गंध घेण्याच्या कोणत्याही संवेदनांचा वापर न करता, एखाद्या गोष्टीविषयी जेव्हा तुम्ही विचार करता, तेव्हा तुमच्या कल्पनाशक्तीचाच वापर होत असतो, हे स्पष्ट आहे.

बायबल आपल्याला हे समजून घेण्यास मदत करतं, की देवानं मानवाची निर्मिती आपल्या प्रतिरूपात आणि आपल्याशी सदृश अशी केली आहे. (उत्प. १:२६, २७) यावरून हेच कळत नाही का, की स्वतः यहोवादेखील कल्पनाशक्तीचा वापर करतो. त्यामुळे, ज्याअर्थी त्यानं आपल्याला या क्षमतेनं बनवलं आहे, त्याअर्थी आपण या क्षमतेचा वापर करून त्याची इच्छा काय आहे ते समजून घ्यावं, अशी अपेक्षा तो आपल्याकडून करतो. (उप. ३:११) मग हे करण्याकरता, आपल्या कल्पनाशक्तीचा योग्य वापर कसा करता येईल आणि तिचा दुरुपयोग करण्याचं कसं टाळता येईल, ते आता आपण पाहू या.

कल्पनाशक्तीचा अयोग्य वापर

(१) चुकीच्या वेळी आणि चुकीच्या गोष्टींचं स्वप्नं रंगवणं.

स्वप्न रंगवणं ही काही चुकीची गोष्ट नाही. उलट स्वप्न रंगवल्यामुळे फायदा होतो, असं सांगणारा पुरावादेखील आहे. पण उपदेशक ३:१ मध्ये प्रत्येक गोष्टीला “उचित काळ” असतो, असं म्हटलं आहे. त्यामुळे या वचनाच्या आधारावर आपण असं म्हणू शकतो, की एखादी व्यक्ती चुकीच्या वेळी एखादी गोष्ट करण्यात गुरफटण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, असा विचार करा की तुम्ही मंडळीच्या सभेत बसला आहात किंवा व्यक्तिगत बायबल अभ्यास करत आहात; मग अशा वेळी जर तुमचं मन कल्पनेच्या जगात भरकटत असेल, तर तुमची कल्पनाशक्ती फायद्याची म्हणता येईल की तोट्याची? स्वतः येशूनंदेखील अनैतिक गोष्टींसारख्या चुकीच्या विचारांमध्ये रमण्याच्या धोक्याबद्दल स्पष्टपणे इशारा दिला होता. (मत्त. ५:२८) यावरून, आपण हे समजून घेतलं पाहिजे, की अशा काही गोष्टींच्या कल्पनेत आपण गुंग होऊ शकतो, ज्यामुळे यहोवाचं मन दुखावेल. अनैतिक गोष्टींच्या कल्पनेत रमणं ही वास्तविकतेत अनैतिक गोष्टी आचरण्याची पहिली पायरी असू शकते. तेव्हा यहोवापासून दूर नेईल, अशा प्रकारे आपल्या कल्पनाशक्तीचा वापर न करण्याचा निर्धार करा!

(२) भौतिक गोष्टींची विपुलता सुरक्षिततेची हमी आहे, अशी चुकीची कल्पना करणं.

भौतिक गोष्टींची प्रत्येकालाच गरज असते. पण, त्यामुळे खरी सुरक्षितता आणि आनंद मिळेल अशी कल्पना जेव्हा एक व्यक्ती करते, तेव्हा घोर निराशा ठरलेलीच आहे. बुद्धिमान राजा शलमोनानं असं लिहिलं: “धनवानाचे द्रव्य त्याचे बळकट नगर आहे, आणि त्याच्या कल्पनेने ते उंच कोट असे आहे.” (नीति. १८:११, पं.र.भा.) फिलिपीन्झमधल्या मनिला या शहरात काय झालं त्याचा विचार करा. सप्टेंबर २००९ मध्ये झालेल्या वादळी पावसामुळे या शहराचा जवळपास ८० टक्के भाग पुराच्या विळख्यात अडकला. पण म्हणून भौतिक रीत्या समृद्ध असलेल्या लोकांना या पुराच्या तडाख्यातून वाचता आलं का? पुरानं झालेल्या नुकसानाला बळी पडलेल्या एका श्रीमंत माणसानं म्हटलं: “या पुरानं श्रीमंत आणि गरीब यांच्यातलं अंतरच मिटवून टाकलं आहे. केवळ गरीबच नव्हे तर श्रीमंत लोकांनाही यामुळे हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं आहे.” यावरून कळतं की भौतिक गोष्टींमुळे खरी सुरक्षा मिळते अशी कल्पना करणं सोपं असलं, तरी वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे.

(३) न घडणाऱ्या गोष्टींबद्दल उगाचच चिंता करत बसण्याची सवय.

अवास्तव “चिंता” करत बसू नका, असा सल्ला येशूनं दिला होता. (मत्त. ६:३४) कल्पकतेचा जास्त उपयोग केला तर धास्ती निर्माण करणाऱ्या चिंता उत्पन्न होतात. शिवाय, अजूनही आल्या नाहीत किंवा कधी येणारही नाहीत अशा समस्यांबद्दल काळजी करत बसण्यात आपली बरीच शक्ती विनाकारण खर्च होऊ शकते. शास्त्रवचनं दाखवून देतात की अशा प्रकारच्या चिंतांमुळे एखादी व्यक्ती दबून जाते आणि शेवटी निराशेला बळी पडू शकते. (नीति. १२:२५) तेव्हा विनाकारण चिंता करत बसण्याऐवजी “उद्याची चिंता उद्याला,” या येशूच्या सल्ल्याप्रमाणे वागणं किती महत्त्वाचं आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल.

कल्पनाशक्तीचा योग्य वापर

(१) घातक गोष्टींना टाळण्याकरता वेळीच अंदाज बांधण्याची कला.

पुढे होणाऱ्या गोष्टींचा अंदाज बांधण्याचं चातुर्य दाखवण्याकरता शास्त्रवचनं आपल्याला प्रोत्साहन देतात. (नीति. २२:३) आपण घेतलेल्या निर्णयांचा पुढे काय परिणाम होऊ शकतो याचा अंदाज बांधण्यासाठी आपण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करू शकतो. उदाहरणार्थ, असा विचार करा की तुम्हाला एका कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं आहे. आता या कार्यक्रमाला जायचं की नाही हे ठरवण्यासाठी तुमची कल्पनाशक्ती तुम्हाला कशी मदत करू शकते? या कार्यक्रमाला कोण-कोण आणि किती लोक येणार आहेत? शिवाय, हा कार्यक्रम कुठे व कोणत्या वेळेला होणार आहे? अशा गोष्टींचा प्रथम विचार करा. मग तिथं काय होऊ शकतं? शिवाय, त्या ठिकाणी जे काही होईल ते बायबल तत्त्वांनुसार असेल का? अशा प्रश्नांवर तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करून थोडा विचार करा. असं केल्यामुळे त्या कार्यक्रमाचं एकंदर चित्र तुमच्या मनात उभं राहील. अशा प्रकारे योग्य निर्णय घेण्यासाठी जेव्हा तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर कराल, तेव्हा आपल्या आध्यात्मिकतेला धोकादायक ठरतील अशा परिस्थितींना टाळणं तुम्हाला शक्य होईल.

(२) कल्पनाशक्तीचा वापर करून कठीण समस्यांना हाताळण्याचा सराव करणं.

आपल्या कल्पनाशक्तीमध्ये “समस्यांचा सामना करण्याच्या” क्षमतेचाही समावेश होतो. असा विचार करा की मंडळीतील एका बांधवाशी किंवा बहिणीशी तुमचं बिनसलं आहे. मग त्या व्यक्तीसोबत असणारा तुमचा नातेसंबंध पुन्हा पहिल्यासारखा व्हावा म्हणून तुम्ही काय कराल? यासाठी तुम्हाला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. जसं की, त्याची किंवा तिची बोलण्याची पद्धत कशी आहे? त्या व्यक्तीशी केव्हा बोलणं जास्त योग्य ठरेल? शिवाय कसं आणि काय बोलणं योग्य राहील? अशा सर्व प्रश्नांवर विचार केल्यानंतर, या परिस्थितीला वेगवेगळ्या मार्गानं कसं हाताळता येईल याचा आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर तुम्ही सराव करू शकता. आणि मग ज्या-ज्या पद्धती तुम्हाला सुचतील, त्यातली सर्वात चांगली पद्धत, म्हणजे त्या व्यक्तीलाही संकोच वाटणार नाही अशी पद्धत तुम्हाला निवडता येईल. (नीति. १५:२८) अशा प्रकारे विचारपूर्वकपणे समस्या हाताळल्यास, मंडळीतील शांती टिकवून ठेवण्यास आपला हातभार लागेल. मग हा आपल्या कल्पनाशक्तीचा एक चांगलाच वापर नाही का?

(३) तुमचं व्यक्तिगत बायबल वाचन आणि अभ्यास आणखी अर्थपूर्ण बनवण्यासाठी.

बायबलचं दररोज वाचन करणं खूप गरजेचं आहे. पण बायबलच्या एखाद्या भागाचं नुसतंच वरवर वाचन करून फायदा नाही. उलट, बायबलच्या वचनातून मिळणाऱ्या व्यावहारिक धड्यांना ओळखून, त्यांना आपल्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्नही आपण केला पाहिजे. अशा प्रकारे यहोवाच्या मार्गांबद्दल असणारी आपली कदर बायबलच्या वाचनामुळे आणखी वाढत गेली पाहिजे. या ठिकाणीही आपण आपल्या कल्पनाशक्तीचा चांगला वापर करू शकतो. तो कसा? त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करा या पुस्तकाचाच विचार करा. या पुस्तकातील अहवाल तुमच्या कल्पनाशक्तीला अक्षरशः उत्स्फूर्त करणारे आहेत. बायबलमधील पात्रांच्या पार्श्‍वभूमीचा अंदाज येण्यासाठी आणि त्या वेळच्या परिस्थितीचं चित्र आपल्या मनात ताजं करण्यासाठी तुम्ही तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर करू शकता. कल्पनाशक्तीच्या ताकदीनं जणू तुमच्या डोळ्यांसमोर त्या वेळचं पूर्ण दृश्यच उभं राहील आणि तिथल्या लोकांच्या बोलण्याचा आवाज, वेगवेगळ्या गोष्टींचा गंध आणि लोकांच्या भावना तुम्हाला समजून घेता येतील. त्यामुळे या अहवालातून पूर्वी कधीच जाणवले नसतील असे महत्त्वपूर्ण धडे समजून घेण्यास आणि बायबलमधील प्रोत्साहनदायक विचारांना आत्मसात करण्यास तुम्हाला मदत होईल. अशा प्रकारे आपलं व्यक्तिगत बायबल वाचन आणि अभ्यास आणखी अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली कल्पनाशक्ती नक्कीच एक मदतदायी साधन ठरू शकेल.

(४) इतरांप्रती सहानुभूती प्रदर्शित करण्यासाठी.

दुसऱ्याच्या मनातलं दुःख स्वतः अनुभवण्याची कला म्हणजे सहानुभूती. हा खरंच एक सुंदर गुण आहे. स्वतः यहोवा आणि येशूलाही इतरांबद्दल सहानुभूती होती. त्यामुळे साहजिकच आपल्यामध्येही हा गुण असला पाहिजे. (निर्ग. ३:७; स्तो. ७२:१३) मग हा गुण आपल्याला कसा विकसित करता येईल? एखाद्याच्या भावना समजून घेण्याची कला विकसित करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आपली कल्पनाशक्ती! आपले बंधुभगिनी कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे स्वतःला अनुभवता येत नसलं, तरी काही प्रश्न स्वतःला विचारून आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतो. जसं की, ‘मी जर या बांधवाच्या किंवा बहिणीच्या ठिकाणी असतो, तर मला कसं वाटलं असतं? या परिस्थितीत मला कशाची गरज भासली असती?’ अशा प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी जर आपण आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करू, तर इतरांबद्दल सहानुभूती बाळगणं आपल्याला शक्य होईल. असं केल्यामुळे, आपल्या ख्रिस्ती जीवनाच्या प्रत्येक पैलूवर त्याचा चांगला परिणाम होईल. यात आपलं सेवाकार्य आणि इतर बंधुभगिनींसोबतचा आपला नातेसंबंधही गोवलेला आहे.

(५) नवीन जगातील जीवनाचं चित्रं आपल्या मनाच्या पडद्यावर रेखाटण्यासाठी.

देवानं अभिवचन दिलेल्या नवीन जगातलं जीवन कसं असेल याचं सुंदर वर्णन शास्त्रवचनांत दिलं आहे. (यश. ३५:५-७; ६५:२१-२५; प्रकटी. २१:३, ४) आणि याला अगदी पूरक ठरतील अशी सुंदर कलात्मक चित्रं आपल्या साहित्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पण ते कशासाठी? कारण अशी चित्रं आपल्या कल्पनाशक्तीसाठी इंधनाचं काम करतात. देवानं दिलेल्या अभिवचनांची पूर्णता जणू आपण स्वतः अनुभवत आहोत, अशी कल्पना करण्यास आपल्याला त्यामुळे मदत होते. ही क्षमता मुळात यहोवानं आपल्याला दिली आहे. या क्षमतेचा रचनाकार तो आहे, त्यामुळे कल्पनाशक्तीची ताकद किती जबरदस्त आहे हे त्याच्यापेक्षा आणखी चांगलं कोणाला माहीत असेल? यहोवानं दिलेल्या अभिवचनांवर विचार करण्यासाठी जेव्हा आपण या क्षमतेचा वापर करतो तेव्हा त्या अभिवचनांच्या पूर्णतेवरील आपली खात्री आणखी पक्की होते. शिवाय यामुळे सध्याच्या जीवनातील समस्यांना तोंड देत असतानाही यहोवाला विश्वासू राहण्यास आपल्याला मदत होते.

खरंच, यहोवानं अगदी उदारतेनं आपल्याला कल्पनाशक्तीची आश्चर्यकारक क्षमता दिली आहे. दररोजच्या जीवनात त्याची सेवा चांगल्या प्रकारे करण्यासाठी या क्षमतेमुळे आपल्याला मदत होऊ शकते. तेव्हा या क्षमतेचा योग्य वापर करण्याद्वारे, हे उत्तम दान देणाऱ्या यहोवाला मनापासून कृतज्ञता दाखवत राहा.