व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?

उपासनेकरता एकत्र जमणं महत्त्वाचं का आहे?

“ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, . . . तत्पर असत.”—प्रे. कृत्ये २:४२.

गीत क्रमांक: २०, ३४

१-३. (क) यहोवाचे सेवक एकत्र मिळण्याकरता नेहमी आतुर असतात हे त्यांनी कसं दाखवून दिलं आहे? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?

कोरिन्ना १७ वर्षांची असताना तिच्या आईला अटक करण्यात आली आणि अतिशय लांब असलेल्या एका छळ छावणीत तिला टाकण्यात आलं. नंतर, कोरिन्नालासुद्धा तिच्या घरापासून हजारो मैल लांब असलेल्या सायबेरियात नेण्यात आलं. तिथं एका गुलामासारखं तिला शेतावर काम करावं लागायचं. कधीकधी तर तिला अतिशय कडाक्याच्या थंडीत जबरदस्तीनं बाहेर काम करावं लागायचं आणि पुरेसे गरम कपडेही तिला दिले जायचे नाहीत. असं असूनही, कोरिन्ना आणि तिच्यासोबत असणाऱ्या एका बहिणीनं ठरवलं की काहीही करून या शेतातून बाहेर पडायचं आणि मंडळीच्या सभेला उपस्थित राहायचं.

कोरिन्नानं म्हटलं: “आम्ही संध्याकाळी शेतातून बाहेर पडलो आणि २५ किलोमीटर चालत रेल्वे स्टेशनकडे गेलो. तिथून पहाटे दोन वाजता आमची ट्रेन निघाली. सहा तास प्रवास केल्यानंतर आम्ही ट्रेनमधून उतरलो आणि सभागृहापर्यंत जाण्यासाठी पुन्हा दहा किलोमीटर चालत गेलो.” इतकी मोठी मजल मारून सभेला उपस्थित राहिल्यामुळे कोरिन्नाला खूप आनंद झाला होता. तिनं म्हटलं: “सभेत आम्ही टेहळणी बुरूज मासिकाचा अभ्यास केला आणि राज्य गीतं गायिली. हा अनुभव आमच्यासाठी खरंच खूप उभारणीकारक आणि विश्वासाला बळकटी देणारा ठरला.” या दोघी बहिणी तीन दिवसांनंतर शेतावर परतल्या. पण, ही गोष्ट तिथल्या शेतमालकाच्या जराही लक्षात आली नाही!

यहोवाचे सेवक उपासनेकरता एकत्र जमण्यासाठी नेहमीच आतुर असतात. पहिल्या शतकातील ख्रिश्चन, यहोवाची उपासना करण्याकरता आणि त्याच्याविषयी शिकण्याकरता एकत्र जमण्यास खूप उत्सुक असायचे. (प्रे. कृत्ये २:४२) तुम्हालाही नेहमी सभांना उपस्थित राहण्याची उत्सुकता असते यात काहीच शंका नाही. पण, कदाचित काही बंधुभगिनींप्रमाणे तुम्हालाही नियमित रीत्या सभांना उपस्थित राहणं कठीण जात असेल. कदाचित, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला जास्त वेळ काम करावं लागत असेल. किंवा मग तुम्हाला इतर बरीच कामं करावी लागत असतील किंवा दिवसभराच्या दगदगीमुळे तुम्ही पार थकून जात असाल. मग, अशा परिस्थितीत काहीही करून सभांना उपस्थित राहण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल? [1] आपण आपल्या बायबल विद्यार्थ्यांना आणि इतरांना नियमित रीत्या सभांना उपस्थित राहण्याचं प्रोत्साहन कसं देऊ शकतो? या लेखात आपण सभांना उपस्थित का राहिलं पाहिजे याच्या आठ कारणांवर चर्चा करणार आहोत. या आठ कारणांना तीन भागांत विभागता येईल: (१) आपल्याला होणारा फायदा, (२) इतरांना होणारा फायदा, आणि (३) यहोवाला होणारा आनंद. [2]

सभांमुळे आपल्याला होणारा फायदा

४. सभांना उपस्थित राहिल्यामुळे आपल्याला यहोवाबद्दल शिकण्यास कशी मदत होते?

सभांमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. प्रत्येक सभेत आपल्याला यहोवाविषयी नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. उदाहरणार्थ, अनेक मंडळ्यांमध्ये अलिकडेच यहोवा के करीब आओ या पुस्तकावर चर्चा करण्यात आली होती. यहोवाच्या गुणांवर चर्चा केल्यामुळे आणि इतर बांधवांनी मनापासून दिलेल्या उत्तरांमुळे यहोवावर असणारं तुमचं प्रेम आणखी वाढलं आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? सभांमध्ये होणाऱ्या भाषणांकडे आणि प्रात्यक्षिकांकडे बारकाईनं लक्ष दिल्यामुळे, तसंच बायबल वाचलं जात असताना लक्षपूर्वक ऐकल्यानं आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. (नहे. ८:८) यासोबतच, आठवड्याच्या बायबल वाचनाची तयारी करताना आणि इतरांची उत्तरं ऐकताना बायबलच्या वचनातून आपल्याला ज्या नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, त्यांचाही विचार करा!

५. ख्रिस्ती सभांमुळे, बायबलमधून शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्यासाठी आणि सेवाकार्यातील कौशल्य सुधारण्यासाठी तुम्हाला कशी मदत झाली आहे?

सभांदरम्यान आपल्याला बायबलमधील तत्त्वं जीवनात कशी लागू करता येतील हे शिकायला मिळतं. (१ थेस्सलनी. ४:९, १०) तुम्हाला असा एखादा टेहळणी बुरूज अभ्यास आठवतो का, ज्यामुळे यहोवाच्या सेवेत आणखी जास्त परिश्रम करण्याची, आपल्या प्रार्थनांचा दर्जा वाढवण्याची किंवा एखाद्याला क्षमा करण्याची तुम्हाला प्रेरणा मिळाली होती? शिवाय, आठवड्यादरम्यानच्या सभांमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे सुवार्ता सांगण्याचं आणि बायबलमधील सत्य समजून घेण्यास इतरांना मदत करण्याचं प्रशिक्षणही मिळतं.—मत्त. २८:१९, २०.

६. ख्रिस्ती सभांमुळे आपल्याला कशा प्रकारे प्रोत्साहन मिळतं आणि आपला विश्वास मजबूत होतो?

सभांमध्ये आपल्याला उत्तेजन मिळतं. सैतानाचं जग आपल्याला मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक रीत्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतं. याच्या अगदी उलट सभांमध्ये आपल्याला प्रोत्साहन मिळतं आणि यहोवाची सेवा करत राहण्यासाठी लागणारी शक्ती मिळते. (प्रेषितांची कृत्ये १५:३०-३२ वाचा.) उदाहरणार्थ, बऱ्याच वेळा आपण बायबलमधील भविष्यवाण्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या आहेत याविषयी चर्चा करत असतो. त्यामुळे, भविष्यासाठी यहोवानं दिलेली अभिवचनं नक्की पूर्ण होतील याविषयीची आपली खात्री आणखी पक्की होते. यासोबतच, आपल्या बांधवांकडून आपल्याला केवळ भाषणांद्वारेच नाही तर त्यांच्या उत्तरांद्वारे आणि यहोवाच्या उपासनेत ते मनापासून जी गीतं गातात त्यातूनही उत्तेजन मिळतं. (१ करिंथ. १४:२६) तसंच, सभा सुरू होण्याआधी आणि संपल्यानंतर जेव्हा आपण त्यांच्याशी बोलतो, तेव्हा मनापासून काळजी करणारे मित्र आपल्याला आहेत या गोष्टीची जाणीव झाल्यामुळे आपल्याला तजेला मिळतो.—१ करिंथ. १६:१७, १८.

७. सभांना उपस्थित राहणं इतकं महत्त्वाचं का आहे?

सभांमध्ये आपल्याला देवाच्या पवित्र आत्म्याची मदत मिळते. येशू ख्रिस्त याच पवित्र आत्म्याचा वापर करून मंडळीचं नेतृत्व करतो. त्यानं तर असंही सांगितलं, की “आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.” (प्रकटी. २:७) पवित्र आत्मा आपल्याला प्रलोभनांचा प्रतिकार करण्यास आणि धैर्यानं प्रचारकार्य करण्यास मदत करतो. तसंच, योग्य निर्णय घेण्यासही तो आपल्याला मदत करतो. यामुळे, देवाच्या पवित्र आत्म्याची मदत मिळवण्यासाठी आपण काहीही करून सभांना उपस्थित राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

इतरांना होणारा फायदा

८. सभांमधील आपल्या उपस्थितीमुळे, उत्तरांमुळे आणि गीत गायल्यामुळे इतरांना कसा फायदा होतो? (“सभेत असणं हा त्यांच्यासाठी खूप आनंद देणारा अनुभव आहे!” ही चौकटदेखील पाहा.)

आपलं आपल्या बंधुभगिनींवर प्रेम आहे हे दाखवण्याची संधी आपल्याला सभांमध्ये मिळते. आपल्या मंडळीत असे अनेक जण आहेत जे मोठमोठ्या समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळे, आपण एकमेकांकडे खास लक्ष दिलं पाहिजे असं उत्तेजन प्रेषित पौलानं आपल्याला दिलं. आणि असं करण्यासाठी आपण नियमित रीत्या सभांना उपस्थित राहिलं पाहिजे, असं पौलानं पुढे स्पष्ट केलं. (इब्री १०:२४, २५) आपल्या बांधवांना उत्तेजन देण्यासाठी आपण जेव्हा सभांमध्ये एकत्र येतो, तेव्हा आपल्याला त्यांची मनापासून काळजी आहे हे आपण दाखवून देत असतो. आपण सभांना जातो तेव्हा आपल्याला आपल्या बांधवांसोबत वेळ घालवण्याची, त्यांच्यासोबत बोलण्याची आणि त्यांच्या भावना काय आहेत ते समजून घेण्याची इच्छा आहे हे दिसून येतं. शिवाय, जेव्हा आपण सभांमध्ये उत्तरं देतो आणि मनापासून स्तुती गीतं गातो तेव्हाही त्यांना उत्तेजन मिळतं.—कलस्सै. ३:१६.

९, १०. (क) आपल्या बांधवांसोबत एकत्र येणं महत्त्वाचं का आहे, हे योहान १०:१६ मधील येशूच्या शब्दांवरून कसं स्पष्ट होतं? (ख) आपण सभांना नियमित रीत्या उपस्थित राहिलो तर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सत्यात नाहीत त्यांना कसा फायदा होईल?

आपण सभांना जातो तेव्हा मंडळीतील सर्वांना एकत्र राहण्यास मदत होते. (योहान १०:१६ वाचा.) येशूनं स्वतःची तुलना मेंढपाळाशी आणि त्याच्या अनुयायांची तुलना मेंढरांच्या कळपाशी केली. पण असं समजा, की दोन मेंढरं डोंगरावर आहेत, दुसरी दोन दरीत आहेत आणि एक मेंढरू दुसऱ्या एखाद्या ठिकाणी आहे, तर या पाच मेंढरांना एक ‘कळप’ म्हणता येईल का? नक्कीच नाही. कारण, मेंढरांचा कळप नेहमी एकत्र असतो आणि तो आपल्या मेंढपाळाच्या मागे-मागे जात असतो. त्याच प्रकारे, आपणही नियमित रीत्या सभांना येऊन आपल्या बांधवांसोबत एकत्र राहण्याचा प्रयत्न करू या. कारण, एक कळप या नात्यानं आपल्या मेंढपाळाचं अनुकरण करण्यासाठी आपण एकत्र असणं खूप महत्त्वाचं आहे.

१० प्रेमळ कुटुंब या नात्यानं एकत्र राहण्यासही सभांमुळे आपल्याला मदत होते. (स्तो. १३३:१) आपल्या मंडळीत असेही काही जण आहेत ज्यांच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यांनी त्यांच्याशी नातं तोडलं आहे. पण, येशूनं अभिवचन दिलं होतं की तो अशांना एक प्रेमळ आणि काळजी घेणारं कुटुंब देईल. (मार्क १०:२९, ३०) तुम्ही जर नियमित रीत्या सभांना उपस्थित राहिला, तर तुम्हीही अशा बंधुभगिनींसाठी एका पित्याची, एका आईची, एका भावाची किंवा बहिणीची भूमिका पार पाडू शकता. मग, या गोष्टींचा विचार केल्यामुळे तुम्हाला नियमित रीत्या सभांना उपस्थित राहण्याचं उत्तेजन मिळत नाही का?

यहोवाला होणारा आनंद

११. सभांमध्ये उपस्थित राहण्याद्वारे आपण यहोवाला कोणत्या गोष्टी देत असतो?

११ यहोवा ज्या गोष्टींसाठी पात्र आहे, त्या गोष्टी त्याला देण्यास सभा आपल्याला मदत करतात. आपला निर्माणकर्ता या नात्यानं आपण त्याचे आभार मानले पाहिजेत, आणि त्याचा गौरव व त्याची स्तुती केली पाहिजे. (प्रकटीकरण ७:१२ वाचा.) सभांमध्ये प्रार्थना करण्याद्वारे, स्तुती गीतं गाण्याद्वारे आणि त्याच्याविषयी बोलण्याद्वारे आपण असं करू शकतो. खरंच, दर आठवडी यहोवाची उपासना करण्याची किती सुंदर संधी आपल्याला मिळते!

१२. सभांना उपस्थित राहण्याविषयी यहोवानं दिलेली आज्ञा जेव्हा आपण पाळतो तेव्हा त्याला कसं वाटतं?

१२ यहोवानं आपल्याला निर्माण केलं आहे त्यामुळे आपण त्याची आज्ञा पाळली पाहिजे. आणि त्यानं आपल्याला नियमित रीत्या सभांना उपस्थित राहण्याची आज्ञा दिली आहे. खासकरून, आपण जसजसं अंताच्या जवळ जात आहोत, तसतसं हे करणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे, जेव्हा आपण त्याची आज्ञा पाळतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. (१ योहा. ३:२२) सभांना उपस्थित राहण्यासाठी आपण मनापासून जे प्रयत्न करतो त्यांची तो नेहमी दखल घेतो.—इब्री ६:१०.

१३, १४. सभांद्वारे आपण कशा प्रकारे यहोवा आणि येशूच्या आणखी जवळ जातो?

१३ आपण सभांना जातो तेव्हा आपल्याला यहोवाच्या आणि येशूच्या जवळ जाण्याची इच्छा असल्याचं दिसून येतं. सभांमध्ये आपण बायबलचा अभ्यास करण्याद्वारे आपलं जीवन कसं असलं पाहिजे हे यहोवाकडून शिकत असतो. (यश. ३०:२०, २१) जे यहोवाचे सेवक नाहीत असे लोक जेव्हा आपल्या सभांना येतात तेव्हा त्यांनाही हे जाणवतं की यहोवाच आपलं मार्गदर्शन करत आहे. (१ करिंथ. १४:२३-२५) सभांचं मार्गदर्शन करण्यासाठी तो आपल्या पवित्र आत्म्याचा वापर करत असतो. त्यामुळे, तिथं आपण जे काही शिकत असतो ते खरंतर त्याच्याकडूनच असतं. म्हणूनच, जेव्हा आपण सभांना जातो तेव्हा आपण यहोवाचं म्हणणं ऐकत असतो, त्याचं आपल्यावर किती प्रेम आहे याची जाणीव आपल्याला होते आणि त्याच्या आणखी जवळ जाण्यास आपल्याला मदत होते.

१४ मंडळीचे मस्तक असणाऱ्या येशूनं म्हटलं: “जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे.” (मत्त. १८:२०) बायबल असंही म्हणतं की येशू स्वतः मंडळ्यांमधून “चालतो.” (प्रकटी. १:२०–२:१) यावरून स्पष्ट होतं की यहोवा आणि येशू हे दोघं आपल्यासोबत आहेत आणि सभांद्वारे ते आपल्याला विश्वासात आणखी मजबूत करतात. यहोवाच्या आणि येशूच्या आणखी जवळ जाण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेत आहात ते पाहून यहोवाला किती आनंद होत असेल याचा विचार करा!

१५. सभांना उपस्थित राहण्याद्वारे, आपल्याला यहोवाच्या आज्ञेत राहण्याची इच्छा आहे हे आपण कसं दाखवून देतो?

१५ आपण सभांना जातो तेव्हा आपल्याला यहोवाच्या आज्ञेत राहण्याची इच्छा असल्याचं दिसून येतं. यहोवा आपल्याला त्याच्या इच्छेनुसार करण्याची जबरदस्ती करत नाही. (यश. ४३:२३) त्यामुळे जेव्हा आपण त्याच्या आज्ञेनुसार सभांना उपस्थित राहण्याचं निवडतो, तेव्हा त्याच्यावर आपलं प्रेम असल्याचं आपण दाखवत असतो. तसंच, आपण काय केलं पाहिजे हे सांगण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे हेदेखील आपण मान्य करत असतो. (रोम. ६:१७) उदाहरणार्थ, समजा तुमच्या मालकानं तुम्हाला जास्त वेळ काम करण्यासाठी सांगितलं आणि त्यामुळे तुम्हाला नियमित रीत्या सभांना उपस्थित राहायला जमणार नसेल, तर काय? किंवा मग, तुमच्या देशातील सरकारनं असा कायदा केला की जर कोणी उपासनेकरता एकत्र जमलं तर त्याला दंड भरावा लागेल, तुरुंगात जावं लागेल किंवा त्याहूनही मोठी शिक्षा त्याला दिली जाईल, तेव्हा काय? किंवा असंही होऊ शकतं की तुम्हाला सभांना जाण्याऐवजी दुसरं काहीतरी करावंसं वाटेल. अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे हे आपण स्वतःच ठरवण्याची गरज आहे. (प्रे. कृत्ये ५:२९) पण, एक मात्र खरं आहे की जेव्हा जेव्हा आपण यहोवाच्या इच्छेनुसार करण्याची निवड करतो, तेव्हा तेव्हा आपण त्याचं मन आनंदित करत असतो.—नीति. २७:११.

बांधवांसोबत एकत्र मिळणं सोडू नका

१६, १७. (क) पहिल्या शतकातील ख्रिश्चनांकरता सभा खूप महत्त्वाच्या होत्या हे कशावरून दिसून येतं? (ख) सभांविषयी बंधू जॉर्ज गँगस यांच्या भावना काय होत्या?

१६ पहिल्या शतकातील ख्रिस्ती फक्त ३३ सालच्या पेन्टेकॉस्टलाच एकत्र जमले नाहीत, तर त्यानंतरही ते नियमित रीत्या उपासनेसाठी एकत्र जमायचे. बायबल म्हणतं, की “ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, . . . प्रार्थना करण्यात तत्पर असत.” (प्रे. कृत्ये २:४२) रोमी अधिकाऱ्यांकडून आणि यहुदी धर्मपुढाऱ्यांकडून विरोध आणि छळ होत असतानाही त्यांनी आपलं एकत्र येणं सोडलं नाही. त्यांच्यासाठी हे सोपं नव्हतं, पण तरीही ते नियमित रीत्या एकत्र येण्यासाठी होता होईल तितका प्रयत्न करायचे.

१७ आजदेखील यहोवाचे सेवक आपल्या ख्रिस्ती सभांना खूप मौल्यवान समजतात आणि तिथं उपस्थित राहण्यात त्यांना आनंद मिळतो. जॉर्ज गँगस यांनी २२ वर्षांपेक्षा जास्त काळ नियमन मंडळाचे सदस्य या नात्यानं काम केलं. त्यांनी असं म्हटलं: “बांधवांसोबत एकत्र जमणं माझ्या आयुष्यातील सगळ्यात जास्त आनंद देणारी गोष्ट आहे. त्यामुळे मला प्रोत्साहन मिळतं. शक्य असेल तर सगळ्यांच्या आधी सभागृहात पोचायला आणि सगळ्यांच्या शेवटी निघायला मला आवडतं. देवाच्या लोकांमध्ये वेळ घालवण्यात मला खूप आनंद मिळतो. मला जणू कुटुंबात, अगदी आध्यात्मिक नंदनवनात असल्यासारखं वाटतं. सभांना उपस्थित राहण्याची इच्छा माझ्या अंतःकरणात अगदी खोलवर रुजलेली आहे.”

१८. सभांविषयी तुम्हाला काय वाटतं, आणि तुम्ही काय करण्याचा निर्धार केला आहे?

१८ यहोवाच्या उपासनेविषयी तुमच्याही भावना अशाच आहेत का? जर असतील, तर कठीण परिस्थितीतही आपल्या बांधवांसोबत एकत्र जमण्यासाठी होता होईल तितका प्रयत्न करा. यावरून तुम्हालाही दावीद राजाप्रमाणेच वाटतं हे दिसून येईल. त्यानं म्हटलं: “हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत.”—स्तो. २६:८.

^ [१] (परिच्छेद ३) आपल्या काही बंधुभगिनींना त्यांच्या परिस्थितीमुळे नियमित रीत्या सभांना उपस्थित राहणं जमत नाही. कदाचित त्यांना एखाद्या गंभीर आजाराचा सामना करावा लागत असेल. पण, असे बंधुभगिनी या गोष्टीची खात्री बाळगू शकतात की यहोवा त्यांची परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणतो आणि त्याची उपासना करण्यासाठी ते जे काही प्रयत्न करत आहेत त्यांची तो मनापासून कदर करतो. अशा बंधुभगिनींना सभांचा फायदा व्हावा म्हणून मंडळीतील वडील त्यांच्यासाठी या सभा रेकॉर्ड करू शकतात किंवा घरीच फोनद्वारे सभा ऐकण्याची व्यवस्था करू शकतात.

^ [२] (परिच्छेद ३) “सभांना उपस्थित राहण्याची कारणं” असं शीर्षक असलेली चौकट पाहा.