व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमचं सेवाकार्य दहिवराप्रमाणे आहे का?

तुमचं सेवाकार्य दहिवराप्रमाणे आहे का?

आपलं सेवाकार्य ही एक खूप महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान गोष्ट आहे. पण, आपण ज्यांना प्रचार करतो त्या सर्वांनाच त्याची कदर असेलच असं नाही. किंवा बायबलच्या संदेशात लोक आस्था दाखवतील, पण बायबलचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे असं कदाचित त्यांना वाटणार नाही.

गॅविनच्या बाबतीत हेच झालं. तो सभांना येऊ लागला, पण बायबल अभ्यास घ्यायला तो तयार नव्हता. तो म्हणतो: “बायबलबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं, पण ते कबूल करायलाही मी तयार नव्हतो. माझी फसवणूक तर होणार नाही ना, अशी भीती मला होती आणि बायबल अभ्यास करण्याचं आश्वासनही मला कोणाला द्यायचं नव्हतं. यामुळेच बायबल अभ्यास घ्यायला मी कचरत होतो.” तुम्हाला काय वाटतं? गॅविन कधीच प्रगती करणार नाही असा निष्कर्ष तुम्ही काढला असता का? देवाच्या वचनाचा एका व्यक्तीवर कशा प्रकारे चांगला परिणाम होऊ शकतो याचा विचार करा. यहोवानं इस्राएलांना असं म्हटलं: “माझे भाषण दहिवराप्रमाणे ठिबको; कोवळ्या गवतावर जशी पावसाची झिमझिम . . . तसे ते वर्षो.” (अनु. ३१:१९, ३०; ३२:२) आपण आता दहिवराच्या, म्हणजे दवबिंदूंच्या काही वैशिष्ट्यांवर चर्चा करू या. यामुळे सेवाकार्यात भेटणाऱ्या सर्व लोकांना आपण चांगल्या रीतीनं कशी मदत करू शकतो हे आपल्याला समजेल.—१ तीम. २:३, ४.

आपलं सेवाकार्य कशा प्रकारे दहिवरासारखं असू शकतं?

दवबिंदू सौम्य असतात. दवबिंदू अगदी हळूवारपणे तयार होतात. वातावरणात असलेले पाण्याचे बाष्प हळूहळू एकत्र येऊन त्यांचा एक थेंब तयार होतो. यहोवाचे शब्द ‘दहिवराप्रमाणे पाझरत होते,’ याचा अर्थ इस्राएली लोकांना यहोवाचे शब्द दयाळू, सौम्य आणि कोमल असे वाटत होते. आपणही जेव्हा सेवाकार्यादरम्यान भेटणाऱ्या लोकांच्या विचारांचा आदर करतो तेव्हा यहोवाचं अनुकरण करत असतो. लोकांनी स्वतः तर्क करावा आणि स्वतःहून एखाद्या निष्कर्षावर पोचावं असं उत्तेजन आपण त्यांना देतो. अशा प्रकारे आपण जेव्हा समजूतदारपणा दाखवतो, तेव्हा आपण जे बोलतो ते ऐकून घेण्यास लोक तयार असतात आणि आपलं सेवाकार्य आणखी परिणामकारक बनतं.

दवबिंदू तजेला देणारे असतात. लोकांची आस्था आणखी कशी वाढवता येईल यावर जेव्हा आपण सातत्यानं विचार करतो, तेव्हा आपल्या सेवाकार्यामुळे इतरांना तजेला मिळतो. सुरवातीला उल्लेख करण्यात आलेल्या गॅविनला कोणीही बायबल अभ्यास घेण्यास जबरदस्ती केली नाही. याउलट, गॅविनला बायबलवर चर्चा करायला आवडावं म्हणून क्रिसनं वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला. क्रिसनं त्याला समजावून सांगितलं की बायबलचा एक मुख्य विषय आहे आणि तो जर त्यानं समजून घेतला, तर त्याला सभांमध्ये सांगण्यात येणाऱ्या गोष्टी आणखी चांगल्या प्रकारे समजतील. त्यानंतर, क्रिसनं त्याला सांगितलं की बायबलच्या भविष्यवाण्यांमुळे खरंतर त्याला स्वतःलाच बायबलच्या सत्यतेविषयी खात्री पटली होती. याचा परिणाम असा झाला की त्या दोघांमध्ये भविष्यवाण्यांच्या पूर्णतेविषयी कितीतरी चर्चा झाल्या. या चर्चा गॅविनसाठी तजेला देणाऱ्या ठरल्या. आणि शेवटी तो बायबल अभ्यास घेण्यासाठी तयार झाला.

दवबिंदू जीवनदायी असतात. इस्राएलमध्ये काही महिन्यांसाठी अतिशय उष्ण वातावरण असतं. यादरम्यान तिथं सहसा बरेच महिने पाऊस पडत नाही. अशा वेळी दवामुळे मिळणारा ओलावा नसल्यामुळे तिथल्या वनस्पती कोमजतात आणि वाळून जातात. यहोवानं सांगितल्याप्रमाणे आज आपल्या काळात आध्यात्मिक दुष्काळ आहे. (आमो. ८:११) पण, अभिषिक्त जन राज्याचा संदेश घोषित करतील आणि ‘परमेश्वरापासून येणारा दहिवर’ ठरतील; शिवाय, “दुसरी मेंढरे” असलेले त्यांचे साथीदार त्यांना या कार्यात साथ देतील असं अभिवचन यहोवानं दिलं आहे. (मीखा ५:७; योहा. १०:१६) मग, यहोवा पुरवत असलेल्या जीवनदायी आध्यात्मिक ओलाव्याचा एक भाग असणाऱ्या या राज्याच्या सुवार्तेला आपण महत्त्वपूर्ण लेखतो का?

दवबिंदू यहोवाकडून एक आशीर्वादच आहे. (अनु. ३३:१३) जे लोक आपल्याला चांगला प्रतिसाद देतात त्यांच्यासाठी आपलं सेवाकार्य एक आशीर्वाद ठरू शकतं. गॅविननं हा आशीर्वाद अनुभवला. बायबल अभ्यासामुळे त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. त्यानं खूप कमी वेळात प्रगती केली, बाप्तिस्मा घेतला आणि आता तो आणि त्याची पत्नी जॉईस प्रचारकार्यात आनंदानं सहभाग घेत आहेत.

यहोवाचे साक्षीदार संपूर्ण जगभरात राज्याच्या संदेशाचे आध्यात्मिक दव पसरवत आहेत

आपल्या सेवाकार्याची कदर करा

दवबिंदूंच्या वैशिष्ट्यांवर विचार केल्यामुळे सेवाकार्यातला आपला व्यक्तिगत सहभाग किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतं आणि त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळतं. दवाच्या एका थेंबामुळे खूप कमी गोष्टी साध्य होतात, पण लाखो दवबिंदूंमुळे संपूर्ण वातावरणात ओलावा पसरतो. अगदी त्याच प्रकारे सेवाकार्यातील आपला व्यक्तिगत सहभाग आपल्याला कदाचित खूप क्षुल्लक वाटेल. पण, यहोवाचे सर्व सेवक एकत्र मिळून घेत असलेल्या परिश्रमामुळेच “सर्व राष्ट्रांस” साक्ष देणं शक्य झालं आहे. (मत्त. २४:१४) आपलंही सेवाकार्य इतरांकरता यहोवाकडून येणारा आशीर्वाद ठरू शकतो का? हो नक्कीच, जर आपलाही संदेश दहिवराप्रमाणे सौम्य, तजेला देणारा आणि जीवनदायी असेल तर!