व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या”

“धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या”

“धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.”—याको. १:४.

गीत क्रमांक: २४, 

१, २. (क) गिदोन आणि त्याच्या ३०० लोकांनी ज्या प्रकारे धीर दाखवला त्यावरून आपण काय शिकू शकतो? (लेखाच्या सुरवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) लूक २१:१९ नुसार धीर धरणं आपल्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे?

इस्राएली सैनिक त्यांच्या शत्रूंविरुद्ध लढा देत होते. कठीण आणि थकवून टाकणारं ते युद्ध धुमसत चाललं होतं. गिदोन शास्त्याच्या नेतृत्वाखाली संपूर्ण रात्र इस्राएली सैनिकांनी मिद्यानी लोकांचा आणि त्यांच्या साथीदारांचा जवळपास ३२ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला होता. त्यानंतर काय झालं याबद्दल बायबल असं सांगतं: “गिदोन व त्याच्याबरोबरचे तीनशे लोक थकून भागून गेले होते तरी ते तसेच पाठलाग करत यार्देनेवर येऊन पलीकडे गेले.” पण अजूनही युद्ध बाकी होतं. त्यांना अजून १५,००० सैनिकांचा सामना करायचा होता. कित्येक वर्षं या शत्रूंनी इस्राएली लोकांना त्रास देऊन त्यांचा छळ केला होता. त्यामुळे आता माघार घेणं इस्राएलांना शक्य नव्हतं. म्हणूनच गिदोन आणि त्याच्या लोकांनी आपल्या शत्रूंचा खातमा करेपर्यंत त्यांचा पाठलाग केला.—शास्ते ७:२२; ८:४, १०, २८.

आज आपणही एक अतिशय कठीण आणि थकवून टाकणारं युद्ध लढत आहोत. सैतान, त्याचं जग आणि आपली अपरिपूर्णता हे आपले शत्रू आहेत. आपल्यामध्ये असे बरेच जण आहेत जे कित्येक दशकांपासून हे युद्ध लढत आले आहेत. आणि यहोवाच्या मदतीनं आपण अशी बरीच युद्ध जिंकली आहेत. पण अजूनही अंतिम विजय मिळवणं बाकी आहे. सतत चाललेल्या या युद्धामुळे साहजिकच आपल्याला थकून गेल्यासारखं वाटेल किंवा या दुष्ट जगाचा नाश होईपर्यंत वाट पाहत राहणं आपल्याला कठीण वाटेल. शिवाय, येशूनंदेखील असा इशारा दिला होता, की शेवटच्या काळात आपल्याला अतिशय वाईट परीक्षांना आणि क्रूर छळाला तोंड द्यावं लागेल. पण त्यानं असंही म्हटलं होतं, की या सर्व गोष्टींत जर आपण धीरानं तग धरून राहिलो तर हे युद्ध आपल्याला जिंकता येईल. (लूक २१:१९ वाचा.) मग धीर धरणं म्हणजे काय? धीर धरण्यास आपल्याला कशामुळे मदत होईल? ज्यांनी धीर धरला त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला काय शिकता येईल? आणि धीराला त्याचं काम करू देणं म्हणजे काय?—याको. १:४.

धीर म्हणजे काय?

३. धीर म्हणजे काय?

बायबलच्या दृष्टिकोनातून धीर दाखवण्यात केवळ कठीण परिस्थितीला सहन करणंच नव्हे, तर त्यापेक्षाही बरंच काही गोवलेलं आहे. यामध्ये आपल्यावर येणाऱ्या समस्यांबद्दल आपण कसा विचार करतो आणि त्याबद्दल आपल्या काय भावना आहेत, यांचादेखील समावेश होतो. धीरामुळे आपल्याला धाडस दाखवण्यास, विश्वासू राहण्यास आणि कठीण परिस्थितीतही आपली शांती टिकवून ठेवण्यास मदत होते. एका संदर्भग्रंथानुसार धीर हा एक असा गुण आहे ज्यामुळे आपल्याला पक्की आशा बाळगण्यास मदत होते. तसंच छळ होत असताना हार न मानण्यासही आपल्याला मदत होते. अतिशय कठीण परीक्षांमध्येही खंबीर आणि तटस्थ भूमिका घेण्यास आपल्याला धीरामुळे मदत होते. त्यामुळे अशा परीक्षांनाही विजयात रूपांतरित करण्याची आणि वेदना व त्रास होत असतानाही ध्येयावर आपली नजर टिकवून ठेवण्यास मदत करण्याची किमया धीरामध्ये आहे.

४. प्रेमामुळे धीर उत्पन्न होतो, असं का म्हणता येईल?

प्रेमामुळे धीर उत्पन्न होतो. (१ करिंथकर १३:४,  वाचा.) उदाहरणार्थ, यहोवाप्रती जर आपल्या मनात प्रेम असेल तर तो ज्या-ज्या परिस्थितींना आपल्यावर येऊ देतो, त्या-त्या परिस्थितींमध्ये टिकून राहणं आपल्याला शक्य होतं. (लूक २२:४१, ४२) आपल्या बांधवांप्रती असणाऱ्या आपल्या प्रेमामुळे त्यांच्या अपरिपूर्णतेला सहन करणं आपल्याला शक्य होतं. (१ पेत्र ४:८) तसंच, विवाहसोबत्याप्रती असणाऱ्या आपल्या प्रेमामुळे, अगदी आनंदी विवाहातही येणाऱ्या “हालअपेष्टा” सहन करणं आपल्याला शक्य होतं आणि त्यामुळे विवाह आणखी मजबूत होतो.—१ करिंथ. ७:२८.

धीर धरण्यास कशामुळे मदत होईल?

५. धीरानं सहन करण्यासाठी केवळ यहोवाच आपल्याला मदत करू शकतो, असं का म्हणता येईल?

धीर धरता यावा म्हणून यहोवाकडे मदत मागा. यहोवा “धीर व उत्तेजन देणारा देव” आहे. (रोम. १५:५) तो एकमेव असा आहे जो आपली परिस्थिती, आपल्या भावना आणि आपली जडणघडण पूर्णपणे ओळखतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीत धीर धरून राहण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, हे तो अगदी अचूकपणे ओळखू शकतो. बायबल म्हणतं: “तो आपले भय धरणाऱ्यांची इच्छा पुरवतो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारतो.” (स्तो. १४५:१९) पण धीरासाठी आपण करत असलेल्या प्रार्थनांचं तो कसं उत्तर देतो?

६. बायबलमध्ये दिलेल्या अभिवचनानुसार, यहोवा कशा प्रकारे आपल्याला संकटातून सोडवतो?

परीक्षा-प्रसंगांना तोंड देत असताना, धीर दाखवण्यास मदत व्हावी म्हणून जेव्हा आपण यहोवाला विनंती करतो, तेव्हा तो आपल्याला याची खात्री देतो की त्यातून “निभावण्याचा उपायही” तो नक्कीच करेल. (१ करिंथकर १०:१३ वाचा.) पण हे तो कसं करतो? कधीकधी त्या संकटातून आपली सुटका करण्याद्वारे तो असं करतो. किंवा बहुतेक वेळा येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी “सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती” देण्याद्वारे तो आपल्याला मदत करतो. (कलस्सै. १:११) शिवाय, त्याला आपल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक मर्यादा चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळे, आपल्याला विश्वासू राहणं खूपच कठीण जाईल अशी कोणतीही परिस्थिती तो आपल्यावर येऊ देत नाही.

७. धीर दाखवण्याकरता आपल्याला आध्यात्मिक अन्नाची गरज का आहे, ते उदाहरण देऊन स्पष्ट करा.

आध्यात्मिक अन्नाद्वारे आपला विश्वास आणखी बळकट करा. आध्यात्मिक अन्न आपल्याकरता इतकं महत्त्वाचं का आहे? हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण घ्या: माऊंट एव्हरेस्ट हा जगातला सर्वात उंच पर्वत चढण्याकरता एका गिर्यारोहकाला दिवसाला ६,००० कॅलरींची आवश्यकता असते. हे प्रमाण एका सर्वसामान्य व्यक्तीला लागणाऱ्या कॅलरींच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यामुळे धीर न सोडता पर्वताच्या शिखरावर पोचण्याकरता शक्ती मिळावी म्हणून त्या व्यक्तीला जास्तीतजास्त कॅलरींचा आहार घेण्याची गरज असते. त्याचप्रमाणे आपल्यालाही धीर न सोडता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याकरता भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्नाची गरज आहे. म्हणूनच आपल्या सभांकरता आणि व्यक्तिगत अभ्यासाकरता पुरेसा वेळ काढण्याचा निश्चय आपण केला पाहिजे. असं केल्यामुळे आपल्या विश्वासाला मजबूत करण्याकरता आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे आध्यात्मिक अन्न आपल्याला मिळत राहील.—योहा. ६:२७.

८, ९. (क) ईयोब २:४, ५ नुसार परीक्षांचा सामना करण्यात कोणत्या गोष्टीचा समावेश आहे? (ख) परीक्षा-प्रसंगांचा सामना करत असताना, तुम्ही कोणत्या गोष्टींची कल्पना करू शकता?

देवाप्रती असणाऱ्या तुमच्या एकनिष्ठेला विसरू नका. जेव्हा आपल्यासमोर परीक्षा-प्रसंग येतात, तेव्हा आपल्याला कठीण परिस्थितीला सहन करावं लागतं. पण ही केवळ सहन करण्याची गोष्ट नसते, तर देवाप्रती असणाऱ्या आपल्या एकनिष्ठेची त्या वेळी परीक्षा होत असते. अशा वेळी आपल्या समोर असणाऱ्या परीक्षा-प्रसंगांना आपण कसं तोंड देतो, यावरून केवळ यहोवाच सर्व विश्वावर अधिकार चालवण्यास पात्र आहे हे आपण मानतो की नाही, ते स्पष्ट होतं असतं. कसं बरं? देवाचा शत्रू सैतान देवाच्या विरोधात उभा आहे. मानव केवळ स्वार्थासाठी देवाची उपासना करतात असा दावा करण्याद्वारे त्यानं यहोवाचा अपमान केला आहे. कारण त्यानं म्हटलं: “मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल.” आणि नंतर ईयोबाबद्दल त्यानं असं म्हटलं: “तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करेल.” (ईयो. २:४, ५) सैतानानं हा दावा केला, त्या दिवसापासून आजपर्यंत त्याच्यात काहीच बदल झालेला नाही. याच्या बऱ्याच काळानंतरही जेव्हा त्याला स्वर्गातून खाली टाकण्यात आलं, तेव्हादेखील तो रात्रंदिवस देवाच्या विश्वासू सेवकांची निंदा करत होता. (प्रकटी. १२:१०) आणि अगदी आजही मानव देवाची भक्ती केवळ स्वार्थापोटी करत आहे, असा त्याचा दावा आहे. त्यामुळे, आपण कधी एकदाचं देवाच्या अधिकाराला नाकारून त्याची भक्ती करण्याचं सोडून देतो हे पाहण्यासाठी तो आतुर असतो.

जेव्हा एखाद्या परीक्षा-प्रसंगातून तुम्हाला जावं लागतं, तेव्हा आत्मिक जगातील एक दृश्य डोळ्यासमोर आणा. असा विचार करा, की एका बाजूला सैतान आणि त्याचे दुरात्मे आहेत. आणि अशा परिस्थितीत तुम्ही काय करणार हे पाहण्याचा ते प्रयत्न करत आहेत. तुम्ही लवकरच हार मानाल असा त्यांचा दावा आहे. तर दुसऱ्या बाजूला, यहोवाला आणि त्याच्यासोबत आपला राजा येशू, पुनरुत्थित झालेले अभिषिक्त जन आणि हजारो देवदूत आहेत. ते सर्व तुम्ही करत असलेला संघर्ष पाहत आहेत आणि तुमचा उत्साह वाढवण्यासाठी ते तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत! तुम्ही यहोवाला एकनिष्ठ राहण्यासाठी ज्या प्रकारे धीरानं प्रयत्न करत आहात, ते पाहून त्यांना खूप आनंद होत आहे. आणि इतक्यात तुमच्या कानावर यहोवाचे शब्द पडतात. तो म्हणतो: “माझ्या मुला, सुज्ञ होऊन माझे मन आनंदित कर, म्हणजे माझी निंदा करणाऱ्यास मी प्रत्युत्तर देईन.”—नीति. २७:११.

१०. परीक्षेला धीरानं सहन करत असताना आपण येशूच्या उदाहरणाचं कशा प्रकारे अनुकरण करू शकतो?

१० तुम्हाला मिळणाऱ्या प्रतिफळावर लक्ष केंद्रित करा. असा विचार करा की तुम्ही एका लांबच्या प्रवासाला निघाला आहात. मार्गात असताना तुम्हाला एक मोठा बोगदा लागतो. त्या बोगद्यातून जाताना तुमच्या अवतीभोवती तुम्हाला फक्त काळोख दिसतो. पण तुम्हाला याची खात्री असते, की तुम्ही जर असंच पुढे जात राहिला तर त्या बोगद्याच्या शेवटी तुम्हाला पुन्हा प्रकाश दिसेल. आपल्या जीवनाचा प्रवासही असाच आहे. कधीकधी तुम्हाला खूप कठीण परिस्थितीतून जावं लागतं आणि अशा वेळी तुम्हाला ही परिस्थिती अगदी असह्य होते. येशूला जेव्हा वधस्तंभावर खिळलं जात होतं तेव्हा त्याला होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक यातनांचा विचार करा. त्या वेळी त्यालाही कदाचित असंच वाटलं असेल. ती वेळ त्याच्या आयुष्यातली सर्वात कठीण वेळ असेल! मग या सर्व गोष्टींना धीरानं सहन करण्यास त्याला कशामुळे मदत झाली? बायबल सांगतं की “जो आनंद त्याच्यापुढे होता” त्यावर त्यानं आपलं लक्ष केंद्रित केलं. (इब्री १२:२, ३) या कठीण परिस्थितीला धीरानं सहन केल्यामुळे मिळणाऱ्या प्रतिफळावर त्याचं लक्ष होतं. आणि याहूनही महत्त्वाचं म्हणजे देवाचं नाव पवित्र करण्यात आणि त्याच्या अधिकाराचं समर्थन करण्यात त्याला जी भूमिका मिळाली होती त्यावर त्यानं आपलं लक्ष केंद्रित केलं. त्याला हे चांगलं माहीत होतं, की त्याला सहन कराव्या लागणाऱ्या या परीक्षा केवळ तात्पुरत्या काळासाठीच आहेत. पण त्यानंतर स्वर्गात त्याला जे प्रतिफळ मिळणार होतं, ते मात्र सदासर्वकाळ असेल. आज, आपल्यावर येणाऱ्या परीक्षा-प्रसंगांमुळे आपल्यालाही कदाचित ‘आता मी काहीच सहन करू शकत नाही,’ असं वाटू लागेल. पण या गोष्टी केवळ तात्पुरत्या आहेत, हे आपण कधीच विसरता कामा नये.

ज्यांनी धीरानं सहन केलं

११. ज्यांनी धीरानं परीक्षांना तोंड दिलं, त्यांची उदाहरणं आपल्यासाठी फायद्याची का आहेत?

११ परीक्षांना तोंड देण्याची वेळ फक्त आपल्यावरच येते असं नाही. सैतानाकडून येणाऱ्या परीक्षांना धीरानं तोंड देता यावं म्हणून पौलानं ख्रिश्चनांना प्रोत्साहन देत असं म्हटलं: “त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हाला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत.” (१ पेत्र ५:९) यावरून कळतं, की आपल्या अनेक बंधुभगिनींनाही अशा परीक्षांना तोंड द्यावं लागलं आहे. पण, या परीक्षांना त्यांनी धीरानं ‘सहन केलं’ आहे. त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला विश्वासू राहण्यास आणि परीक्षांमध्ये असताना यशस्वी होण्याची खात्री बाळगण्यास मदत होते. शिवाय देवाप्रती असणाऱ्या आपल्या एकनिष्ठेचं प्रतिफळ आपल्याला जरूर मिळेल अशी आशा बाळगण्यासही आपण त्यांच्या उदाहरणावरून शिकू शकतो. (याको. ५:११) म्हणून काही उदाहरणांचा आता आपण विचार करू या. [1]

१२. एदेन बागेत असणाऱ्या करूबांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

१२ करूब. हे अतिशय उच्च पदावर असणारे देवदूत आहेत. जेव्हा आदाम आणि हव्वेनं देवाविरुद्ध पाप केलं, तेव्हा यहोवा देवानं काही करूबांना पृथ्वीवर एक नवीन नेमणूक दिली. स्वर्गातील त्यांच्या जबाबदारीपेक्षा ही जबाबदारी खूपच वेगळी होती. जेव्हा आपल्यावर एखादी कठीण जबाबदारी सोपवण्यात येते, तेव्हा या देवदूतांचं उदाहरण आपल्याला धीरानं आपली जबाबदारी पार पाडण्यास मदत करेल. बायबल सांगतं, की देवानं “जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गाची राखण करण्यासाठी एदेन बागेच्या पूर्व भागी करूबीम व गरगर फिरणारी ज्वालारूप तरवार ठेवली.” [2] (उत्प. ३:२४) देवानं त्यांना ही जबाबदारी सोपवल्यानंतर, हे काम त्यांच्यासाठी अत्यंत क्षुल्लक आहे किंवा कमी दर्जाचं आहे अशी तक्रार त्यांनी यहोवाकडे केली, असं बायबलमध्ये कुठंही सांगितलेलं नाही. तसंच आपली जबाबदारी पार पाडत असताना त्यांना कधीच आपल्या कामाचा कंटाळा आला नाही. याउलट, ते आपली जबाबदारी पूर्ण होईपर्यंत तिथंच राहिले. १,६०० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यावर जेव्हा जलप्रलय आला तेव्हा कदाचित त्यांची ही जबाबदारी संपली असावी!

१३. परीक्षांचा धीरानं सामना करण्यास ईयोबाला कशामुळे मदत झाली?

१३ विश्वासू पुरुष ईयोब. कधीकधी जेव्हा आपल्या कुटुंबातील किंवा आपल्या ओळखीच्या लोकांपैकी कोणीतरी आपलं मन दुखावतं, तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं. शिवाय खूप आजारी असल्यामुळे किंवा प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे कदाचित आपल्याला खूप दुःख होत असेल. पण या परिस्थितीत ईयोबाच्या उदाहरणावर विचार केल्यामुळे आपल्याला नक्कीच खूप सांत्वन मिळेल. (ईयो. १:१८, १९; २:७, ९; १९:१-३) आपल्यावर एका-मागून एक संकटं का येत आहेत, हे ईयोबाला कळत नव्हतं. पण त्यानं हार मानली नाही. मग कोणत्या गोष्टीमुळे त्याला धीरानं सहन करण्यास मदत झाली? सर्वात प्रथम, त्याचं यहोवावर प्रेम होतं. त्यामुळे यहोवाचं मन दुखावेल अशी कोणतीही गोष्ट आपल्या हातून घडू नये, अशी काळजी त्याला होती. (ईयो. १:१) परिस्थिती चांगली असो किंवा वाईट ईयोबाला देवाचं मन आनंदित करण्याची इच्छा होती. शिवाय, यहोवानं त्याच्या निर्मितीमधील काही अद्‌भुत गोष्टींविषयी त्याला सांगितलं आणि आपल्या सामर्थ्याची त्याला जाणीव करून दिली. त्यामुळे आपल्यावर आलेल्या सर्व संकटांना यहोवा योग्य वेळी काढून टाकेल, याची पूर्ण खात्री ईयोबाला होती. (ईयो. ४२:१, २) आणि तसंच झालं! यहोवानं “ईयोबाच्या दुःखाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली.” आणि शेवटी ईयोबाला एक समाधानकारक आणि दीर्घ आयुष्य लाभलं.—ईयो. ४२:१०, १७.

१४. दुसरे करिंथकर १:६ नुसार, पौलाच्या सहनशीलतेमुळे इतरांना कसा फायदा झाला?

१४ प्रेषित पौल. तुम्हाला विरोधाचा किंवा छळाचा सामना करावा लागत आहे का? तुम्ही मंडळीतील एक वडील किंवा एक विभागीय पर्यवेक्षक आहात का? मग तुम्हाला कधी तुमच्या जबाबदाऱ्यांमुळे दबून गेल्यासारखं वाटतं का? जर खरंच वाटत असेल, तर पौलाचं उदाहरण तुमच्यासाठी फायद्याचं ठरेल. पौलाला अत्यंत क्रूरपणे छळण्यात आलं होतं. यासोबतच, मंडळीतील आपल्या बांधवांची त्याला नेहमी काळजी वाटायची. (२ करिंथ. ११:२३-२९) तरीदेखील, तो मागे हटला नाही आणि त्याच्या उदाहरणामुळे इतरांनाही फायदा झाला. (२ करिंथकर १:६ वाचा.) त्याचप्रमाणे आपणही आपल्यावर येणाऱ्या संकटांना धीरानं सहन केलं, तर इतरांनाही तसंच करण्याचं प्रोत्साहन मिळेल.

तुम्ही धीराला आपलं कार्य पूर्ण करू देत आहात का?

१५, १६. (क) धीरामुळे कोणतं “कार्य” पूर्ण होतं? (ख) धीराला त्याचं कार्य पूर्ण करू देणं कशामुळे शक्य होतं, हे उदाहरण देऊन स्पष्ट करा.

१५ शिष्य याकोबानं पवित्र आत्म्याच्या प्रेरणेनं असं लिहिलं: “धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या, यासाठी की, तुम्ही कशातही उणे न होता तुम्हाला अखंड परिपूर्णता प्राप्त व्हावी.” (याको. १:४) मग आपल्याबाबतीत धीराला त्याचं “कार्य” पूर्ण करू देण्यास, आपण कशी मदत करू शकतो? जेव्हा आपल्यावर परीक्षा-प्रसंग येतात, तेव्हा आपण परिस्थितीला धीरानं हाताळलं पाहिजे. शिवाय अशा वेळी प्रेम आणि कृतज्ञता दाखवणंही महत्त्वाचं आहे. जेव्हा येणाऱ्या संकटांना आपण धीरानं सहन करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा हे गुण आणखी चांगल्या प्रकारे दाखवण्यास आपल्याला मदत होते. असं करण्याद्वारे एका अर्थानं आपण आपल्या ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वालाच आणखी सुधारत असतो.

धीरानं सहन करत राहिल्यामुळे, आपण आपल्या ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वाला आणखी सुधारत असतो (परिच्छेद १५, १६ पाहा)

१६ धीरामुळे आपल्या ख्रिस्ती व्यक्तिमत्त्वात आणखी सुधारणा करण्यास आपल्याला मदत होते. म्हणून आपल्यावर येणाऱ्या परीक्षा-प्रसंगांना टाळण्यासाठी यहोवाच्या तत्त्वांशी तडजोड करू नका. उदाहरणार्थ, जर तुम्ही अनैतिक इच्छांशी झगडत असाल, तर त्या इच्छांना आपल्यावर वर्चस्व मिळवू देऊ नका. उलट अशा वाईट इच्छांना आपल्या मनातून काढून टाकण्यासाठी यहोवाकडे मदत मागा. तुमच्या कुटुंबातून तुम्हाला विरोध होत आहे का? मग हार मानू नका! यहोवाची सेवा करत राहण्याचा निश्चय करा. त्यामुळे यहोवावरील तुमचा भरवसा आणखी मजबूत होईल. नेहमी लक्षात ठेवा: देवाची स्वीकृती मिळवायची असेल तर धीर धरण्यास आपण शिकलंच पाहिजे.—रोम. ५:३-५; याको. १:१२.

१७, १८. (क) शेवटपर्यंत धीर दाखवत राहणं का महत्त्वाचं आहे ते उदाहरण देऊन स्पष्ट करा. (ख) शेवट जवळ येत असताना आपण कोणता भरवसा बाळगला पाहिजे?

१७ आपण केवळ काही काळासाठीच नव्हे तर शेवटपर्यंत धीर धरला पाहिजे. एक जहाज बुडत असल्याची कल्पना करा. त्यातील प्रवाशांना आपला जीव वाचवायचा असेल, तर त्यांनी किनाऱ्याला पोहचेपर्यंत पोहत राहिलं पाहिजे. सुरवातीलाच पोहायचं सोडून देणारी व्यक्ती नक्कीच वाचणार नाही. पण अगदी किनाऱ्याजवळ असतानादेखील एखाद्यानं पोहायचं सोडून दिलं, तर तीदेखील बुडून जाईल. तसंच, आपल्याला जर नवीन जगात पोचायचं असेल, तर धीरानं सहन करत राहण्याची आपल्याला गरज आहे. तेव्हा पौलानं दाखवलेल्या मनोवृत्तीचं आपण अनुकरण करत राहू या. त्यानं म्हटलं: “आम्ही धीर सोडत नाही.”—२ करिंथ. ४:१, १६, ईझी-टू-रीड व्हर्शन.

१८ पौलाप्रमाणे आपल्याला याची पूर्ण खात्री आहे, की शेवटपर्यंत धीर धरण्यास यहोवा आपल्याला नक्की मदत करेल. पौलानं म्हटलं: “ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्या योगे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की, मरण, जीवन, देवदूत, अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, बले, उंची, खोली, किंवा दुसरी कोणतीही सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभू याच्यामध्ये देवाची आपल्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आपल्याला विभक्त करावयाला समर्थ होणार नाही.” (रोम. ८:३७-३९) हे खरं आहे, की कधीकधी आपल्याला थकून गेल्यासारखं वाटेल. पण गिदोन आणि त्याच्या साथीदारांचं आपण अनुकरण करण्याचा प्रयत्न करू या. ते पार थकून गेले होते, पण त्यांनी हार मानली नाही. उलट “ते तसेच पाठलाग करत” राहिले.—शास्ते ८:४.

^ [१] (परिच्छेद ११) आधुनिक दिवसातील देवाच्या लोकांनी कशा प्रकारे छळ आणि संकटांचा सामना केला हे पाहणंदेखील तुमच्यासाठी खूप उत्तेजन देणारं ठरू शकतं. उदाहरणार्थ इथियोपिया, मलावी आणि रशियामधल्या आपल्या बांधवांचे प्रोत्साहनदायक अहवाल तुम्हाला १९९२, १९९९ आणि २००८ च्या इयरबुक मध्ये वाचायला मिळतील.

^ [२] (परिच्छेद १२) या जबाबदारीसाठी देवानं किती करूबांची नेमणूक केली होती, याविषयी बायबल काहीच सांगत नाही.