“सर्व जगाचा न्यायाधीश” नेहमी योग्य न्याय करतो
“तो दुर्ग आहे; त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.”—अनु. ३२:४.
१. यहोवा योग्य न्याय करेल यावर भरवसा असल्याचं अब्राहामने कसं दाखवलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)
“सर्व जगाचा न्यायाधीश योग्य न्याय करणार नाही काय?” (उत्प. १८:२५) अब्राहामने जेव्हा असं म्हटलं तेव्हा यहोवाच्या न्यायीपणाविषयी त्याच्या मनात काही शंका होती असं नाही. याउलट, त्याने विचारलेल्या या प्रश्नावरून दिसून येतं की सदोम आणि गमोरा या शहरांचा न्याय यहोवा देव अगदी योग्यपणे करेल, यावर त्याला पूर्ण भरवसा होता. यहोवा “दुर्जनाबरोबर नीतिमानांचा वध” कधीही होऊ देणार नाही यावर त्याला पूर्ण विश्वास होता. यहोवा अयोग्यपणे न्याय करेल असा विचारही अब्राहामच्या मनात आला नाही. बायबल यहोवाविषयी असं म्हणतं: “तो दुर्ग आहे; त्याची कृती परिपूर्ण आहे; त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत; तो विश्वसनीय देव आहे; त्याच्या ठायी अनीती नाही; तो न्यायी व सरळ आहे.” (अनु. ३१:१९; ३२:४) या वचनांतून खरंतर यहोवा देव त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आपल्याला सांगतो.
२. यहोवा कधीही अन्यायीपणे वागणार नाही असं का म्हणता येईल?
२ यहोवा नेहमी योग्य न्याय करेल यावर अब्राहामला इतका भरवसा का होता? कारण न्याय आणि नीतिमत्त्व यांविषयीचे स्तर यहोवा देव ठरवतो. खरंतर, “न्याय” आणि “नीती” या शब्दांचा अर्थ जवळजवळ सारखाच असल्यामुळे इब्री शास्त्रवचनांत बहुतेक वेळा हे दोन्ही शब्द सोबत वापरण्यात आले आहेत. यहोवाचे स्तर हे नेहमी स्तो. ३३:५.
योग्य असतात आणि त्यामुळेच तो प्रत्येक बाबतीत योग्य न्याय करेल, अशी खात्री आपण बाळगू शकतो. बायबल म्हणतं: “त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत.”—३. आज जगात लोकांना जे अन्याय सहन करावे लागतात त्याचं एक उदाहरण द्या.
३ यहोवा कधीही अन्याय करणार नाही, ही गोष्ट खरंच किती दिलासा देणारी आहे. पण, आजचं जग मात्र अन्यायानं भरलेलं आहे. उदाहरणार्थ, काही लोकांसोबत असं घडलं आहे की त्यांच्याकडून गुन्हा झालेला नसतानाही, त्यांना दोषी ठरवून तुरुंगात टाकण्यात आलं. पण मग नंतर अधिक खोल तपास आणि डीएनए चाचणी केल्यानंतर त्यांपैकी काही जण निर्दोष असल्याचं सिद्ध झालं. पण, हे सिद्ध होईपर्यंत या निर्दोष लोकांना तुरुंगवास सहन करावा लागला. अशा प्रकारचा अन्याय होतो तेव्हा लोकांमध्ये नैराश्य व राग उत्पन्न होतो. पण, यापेक्षा आणखी एक असा अन्याय आहे, जो सहन करणं कदाचित आणखी जास्त कठीण असू शकतं. तो अन्याय कोणता आहे?
मंडळीमध्ये सहन करावा लागणारा अन्याय
४. ख्रिश्चनांच्या विश्वासाची परीक्षा केव्हा होऊ शकते?
४ या जगात आपल्याला काही प्रमाणात अन्याय सहन करावा लागू शकतो, याची ख्रिश्चनांना पूर्ण जाणीव आहे. पण, जेव्हा ख्रिस्ती मंडळीत स्वतःवर किंवा इतरांवर अन्याय होत आहे असं वाटतं, तेव्हा आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते. असं घडल्यास तुमची प्रतिक्रिया काय असेल? या गोष्टीला तुम्ही अडखळण्याचं कारण बनू द्याल का?
५. मंडळीत आपल्यासोबत किंवा इतरांसोबत अन्याय होतो तेव्हा आपल्याला आश्चर्य का वाटू नये?
५ आपण सर्व जण अपरिपूर्ण आहोत आणि चुका करतो. त्यामुळे, मंडळीतील एखादा बांधव किंवा बहीण आपल्यासोबत अन्यायानं वागण्याची किंवा आपण इतर बंधुभगिनींसोबत अन्यायानं वागण्याची शक्यता आहे. (१ योहा. १:८) अशा घटना ख्रिस्ती मंडळीत फार क्वचितच घडतात. पण, जेव्हा अन्याय होतो तेव्हा विश्वासू ख्रिश्चन अडखळत नाहीत किंवा त्याबद्दल त्यांना आश्चर्यही वाटत नाही. बंधुभगिनींकडून जेव्हा आपल्याला अन्याय सहन करावा लागतो, तेव्हा विश्वासात टिकून राहता यावं म्हणून बायबलमध्ये काही व्यावहारिक सल्ले दिले आहेत.—स्तो. ५५:१२-१४.
६, ७. एका बांधवाला कशा प्रकारे अन्यायाचा सामना करावा लागला, आणि कोणत्या गुणांमुळे त्यांना मदत झाली?
६ विली डेल या आपल्या एका बांधवाच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. बंधू डेल १९३१ सालापासून स्वित्झर्लंडमधील बेर्न इथं असलेल्या शाखा कार्यालयात विश्वासूपणे सेवा करत होते. त्यानंतर, १९४६ साली ते अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं झालेल्या आठव्या गिलियड प्रशालेला उपस्थित राहिले. प्रशालेतून पदवीधर झाल्यानंतर त्यांना स्वित्झर्लंडमध्ये विभागीय कार्यासाठी नेमण्यात आलं. जीवन कथेत आपला अनुभव सांगताना बंधू डेल म्हणतात: “१९४९ च्या मे महिन्यात मी बेर्न इथल्या शाखा कार्यालयाला कळवलं की मी लग्न करणार आहे.” मग शाखा कार्यालयाने त्यांना काय उत्तर दिलं? जबाबदारीच्या पदावर असलेल्या बांधवांनी बंधू डेल यांना सांगितलं, की त्यांच्या सगळ्या नेमणुका काढून घेण्यात येतील. आणि ते फक्त पायनियर सेवा करू शकतील. बंधू डेल यांनी म्हटलं: “मला भाषण देण्याची परवानगी नव्हती . . . अनेक बंधुभगिनी तर आमच्यासोबत बोलायचेही नाहीत व आमच्याशी बहिष्कृत झालेल्या लोकांसारखे वागायचे.”
७ यावर बंधू डेल यांची प्रतिक्रिया कशी होती? ते म्हणतात: “एक गोष्ट आम्ही जाणून होतो ती म्हणजे, लग्न करून आम्ही देवाच्या वचनांच्या विरोधात काही करत नव्हतो. त्यामुळे आम्ही प्रार्थनेद्वारे यहोवावर विसंबून राहिलो आणि त्याच्यावर पूर्ण भरवसा ठेवला.” काही बांधवांना विवाहाप्रती असलेला देवाचा दृष्टिकोन समजला नसला, तरी नंतर मात्र त्यांच्या चुकीच्या समजुती सुधारण्यात आल्या. आणि बंधू डेल यांना पूर्वी असलेल्या त्यांच्या जबाबदाऱ्या पुन्हा देण्यात आल्या. यहोवाने त्यांना त्यांच्या एकनिष्ठतेचं प्रतिफळ दिलं. * आपणही स्वतःला विचारलं पाहिजे: ‘समजा माझ्यासोबत अशा प्रकारचा अन्याय झाला तर मीसुद्धा धीर दाखवेल का, आणि यहोवा परिस्थितीत बदल करेल यावर भरवसा ठेवेल का? की, मी स्वतःवर निर्भर राहील आणि झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याचा प्रयत्न करेल?’—नीति. ११:२; मीखा ७:७ वाचा.
८. आपल्यासोबत किंवा इतरांसोबत अन्याय झाला आहे असा गैरसमज आपल्याला का होऊ शकतो?
८ तुम्हाला जर वाटलं की मंडळीमध्ये काही अन्याय झाला आहे, तर हे नेहमी लक्षात असू द्या की कदाचित तो तुमचा गैरसमजही असू शकतो. असं का म्हणता येईल? कारण आपण अपरिपूर्ण आहोत आणि कदाचित परिस्थितीचा आपण चुकीचा अर्थ काढला असेल. तसंच, घडलेल्या सर्वच गोष्टींची पूर्ण माहिती आपल्याकडे असेलच असं नाही. आपल्याला गैरसमज झाला असो अथवा नसो, त्या परिस्थितीबद्दल आपण यहोवाला प्रार्थना करण्याची, त्याच्यावर विसंबून राहण्याची आणि त्याला एकनिष्ठ राहण्याची गरज आहे. असं केल्याने आपलं मन “परमेश्वरावर रुष्ट” होणार नाही किंवा रागावणार नाही.—नीतिसूत्रे १९:३ वाचा.
९. या लेखात आणि पुढील लेखात आपण कोणत्या उदाहरणांवर चर्चा करणार आहोत?
९ आता आपण बायबल काळातील अशा तीन घटनांचा विचार करू, ज्यांत यहोवाच्या लोकांसोबत अन्याय झाला. या लेखात आपण पाहणार आहोत की अब्राहामचा पणतू योसेफ याच्यासोबत त्याचे भाऊ कसे वागले. पुढच्या लेखात आपण इस्राएलचा राजा अहाब याच्या उदाहरणावर चर्चा करणार आहोत आणि यहोवा त्याच्यासोबत कसा वागला हे पाहणार आहोत. तसंच, प्रेषित पेत्रला सिरीयातील अंत्युखिया इथे आलेल्या अनुभवावरदेखील आपण चर्चा करणार आहोत. या उदाहरणांवर चर्चा करताना, आपण अशा काही गोष्टी पाहू ज्यांमुळे यहोवा देवावर आणि त्याच्यासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधावर लक्ष केंद्रित करण्यास आपल्याला मदत होईल; खासकरून जेव्हा आपल्यासोबत अन्याय होत आहे असं आपल्याला वाटतं तेव्हा.
योसेफसोबत अन्याय झाला
१०, ११. (क) योसेफला कशा प्रकारचा अन्याय सहन करावा लागला? (ख) तुरुंगात असताना योसेफला कोणती संधी मिळाली?
१० यहोवाचा विश्वासू सेवक असलेल्या योसेफला अनोळखी लोकांकडून अन्याय सहन करावा लागला. पण, फक्त अनोळखी लोकच नाही, तर त्याचे स्वतःचे भाऊदेखील त्याच्यासोबत अन्यायानं वागले याचं त्याला सर्वात जास्त दुःख वाटलं. योसेफ जेव्हा १७ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या भावांनी त्याचं अपहरण करून त्याला गुलाम म्हणून विकलं. त्यानंतर त्याला इजिप्तमध्ये नेण्यात आलं. (उत्प. ३७:२३-२८; ४२:२१) त्या परकीय देशात असताना एका स्त्रीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याचा खोटा आरोप योसेफवर लावण्यात आला. आणि कोणतीही चौकशी न करता त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. (उत्प. ३९:१७-२०) योसेफला जवळजवळ १३ वर्षं एक गुलाम आणि कैदी म्हणून त्रास सहन करावा लागला. आज आपल्याला जर आपल्या बांधवांकडून अन्याय सहन करावा लागला, तर आपल्याला मदत करतील अशा कोणत्या गोष्टी आपण योसेफच्या उदाहरणावरून शिकू शकतो?
११ योसेफ तुरुंगात होता तेव्हा राजाच्या प्रमूख प्यालेबरदारालाही तुरुंगात टाकण्यात आलं होतं. तुरुंगात असताना एका रात्री प्यालेबरदाराला एक स्वप्न पडलं. मग यहोवाच्या मदतीनं योसेफने त्या स्वप्नाचा अर्थ त्याला समजावून सांगतो. योसेफ राजाच्या त्या सेवकाला सांगतो की त्याला तुरुंगातून सुटका मिळेल आणि तो पुन्हा एकदा फारो राजाची सेवा करेल. या संधीचा उपयोग करून योसेफ त्याला स्वतःच्या परिस्थितीविषयी सांगतो. आपल्या परिस्थितीविषयी सांगताना योसेफ जे म्हणाला आणि ज्या गोष्टी सांगण्याचं त्याने टाळलं, त्यावरून आपण बरंच काही शिकू शकतो.—उत्प. ४०:५-१३.
१२, १३. (क) योसेफने त्याच्यासोबत जे घडलं त्याविषयी काहीही न करता परिस्थितीचा स्वीकार केला होता, असं आपण का म्हणू शकत नाही? (ख) राजाच्या सेवकासोबत बोलताना योसेफने कोणती गोष्ट त्याला सांगण्याचं टाळलं?
१२ उत्पत्ति ४०:१४, १५ वाचा. आपल्यासोबत काय झालं हे सांगताना योसेफ म्हणाला, की त्याला “चोरुन” आणण्यात आलं आहे. यावरून दिसून येतं की तो खरोखर अन्यायाला बळी पडला होता. योसेफने हेदेखील सांगितलं की त्याच्यावर जो आरोप लावण्यात आला होता तो खोटा आहे. त्यामुळे राजाच्या सेवकाने त्याविषयी राजाला सांगावं असं योसेफ सुचवतो. आपल्याला तरुंगातून सुटका मिळावी हा योसेफचा त्यामागचा उद्देश होता.
१३ योसेफने त्याच्यासोबत जे घडलं त्याविषयी काहीही न करता परिस्थितीचा स्वीकार केला होता का? नाही. योसेफला याची पूर्ण जाणीव होती की त्याच्यासोबत बराच अन्याय झाला आहे. त्यामुळे राजाचा सेवक आपली मदत करू शकेल अशी आशा ठेवून योसेफने त्याला स्वतःच्या परिस्थितीविषयी समजावून सांगितलं. पण, त्याच्या स्वतःच्या भावांनी त्याचं अपहरण करून त्याला विकलं होतं, ही गोष्ट त्याने कोणाला सांगितली असल्याचं बायबलमध्ये कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याने ही गोष्ट फारोलादेखील सांगितली नाही. म्हणूनच, जेव्हा योसेफचे भाऊ इजिप्तमध्ये आले आणि योसेफकडे माफी मागून त्यांनी त्याच्यासोबत समेट केला, तेव्हा फारोने त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना इजिप्तमध्ये येऊन राहण्याचं निमंत्रण दिलं. तो त्यांना म्हणाला: “साऱ्या मिसर देशात [इजिप्तमध्ये] जे काही उत्कृष्ट आहे ते तुमचेच आहे.”—१४. आपल्यासोबत मंडळीत अन्याय झाला आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हा कोणत्या गुणांमुळे इतरांबद्दल नकारात्मक बोलण्याचं टाळण्यास आपल्याला मदत मिळेल?
१४ आपल्याला जेव्हा असं वाटतं की आपल्यावर अन्याय झाला आहे, तेव्हा आपण त्याविषयी मंडळीतील इतर बंधुभगिनींना सांगत फिरणार नाही. पण, यासोबतच हेदेखील खरं आहे की कोणी आपल्याविरुद्ध एखादं गंभीर पाप केलं असेल, तर त्याविषयी आपण मंडळीतील वडिलांना सांगितलं पाहिजे आणि त्यांच्याकडून मदतही मागितली पाहिजे. (लेवी. ५:१) पण, बहुतेक वेळा बंधुभगिनींनी आपल्याविरुद्ध गंभीर पाप केलेलं नसतं. अशा वेळी मंडळीतील वडिलांना सांगण्याची गरज नाही. आपण आपसांतच मतभेद सोडवून शांतीपूर्ण नातेसंबंध प्रस्थापित केले पाहिजेत. (मत्तय ५:२३, २४; १८:१५ वाचा.) अशा परिस्थितीत आपण एकनिष्ठता दाखवून बायबल तत्त्वांचं पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचा आपल्यालाच फायदा होतो. कारण काही वेळा गैरसमज झाल्यामुळे आपल्याला वाटू शकतं की आपल्यावर अन्याय होत आहे. पण, नंतर आपल्याला कळतं की खरंतर आपल्यावर अन्याय झालाच नव्हता. मग, अशा वेळी आपण आपल्या बंधुभगिनींबद्दल इतरांकडे नकारात्मक बोलून परिस्थिती आणखी खराब केलेली नाही या गोष्टीचं समाधान आपल्याला वाटेल. हे नेहमी लक्षात असू द्या की आपल्यासोबत अन्याय झालेला असो किंवा नसो, इतरांबद्दल नकारात्मक बोलल्याने परिस्थितीत कधीही सुधार होत नाही. जेव्हा आपण यहोवाला आणि आपल्या बंधुभगिनींना एकनिष्ठ राहतो, तेव्हा आपण अशा चुका करण्यापासून बचावतो. स्तोत्रकर्त्याने म्हटलं की जो मनुष्य सरळपणाने चालतो तो “आपल्या जिभेने चुगली करत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करत नाही.”—स्तो. १५:२, ३; याको. ३:५.
यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध सर्वात मौल्यवान आहे हे नेहमी लक्षात ठेवा
१५. यहोवासोबत असलेला चांगला नातेसंबंध योसेफसाठी एक आशीर्वाद कसा ठरला?
१५ योसेफच्या उदाहरणावरून आपण आणखी एक गोष्ट शिकतो. ती म्हणजे, १३ वर्षं अन्याय सहन करत असताना त्याने नेहमी यहोवाचा दृष्टिकोन लक्षात ठेवला. (उत्प. ४५:५-८) आपल्या परिस्थितीसाठी त्याने कधीही यहोवाला दोष दिला नाही. हे खरं आहे की योसेफ त्याच्यासोबत झालेला अन्याय विसरू शकला नाही. पण, यामुळे तो इतरांवर नाराज झाला नाही किंवा रागावला नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, इतरांच्या अपरिपूर्णतेमुळे किंवा वाईट वागणुकीमुळे तो यहोवापासून दूर गेला नाही. योसेफ यहोवाला एकनिष्ठ राहिला आणि त्यामुळे यहोवाने परिस्थितीत कशी सुधारणा केली आणि त्याच्या कुटुंबाला कसं आशीर्वादित केलं हे तो पाहू शकला.
१६. मंडळीत अन्याय सहन करावा लागतो, तेव्हा आपण यहोवासोबत असलेला आपला नातेसंबंध मजबूत ठेवण्याचा प्रयत्न का केला पाहिजे?
१६ योसेफप्रमाणे आपणही यहोवासोबत असलेल्या आपल्या नातेसंबंधाला मौल्यवान लेखलं पाहिजे आणि तो मजबूत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्या देवावर आपलं प्रेम आहे आणि आपण ज्याची उपासना करतो त्या यहोवा देवासोबत असलेल्या नातेसंबंधाच्या आड, आपण बंधुभगिनींच्या अपरिपूर्णतेला कधीही येऊ देता कामा नये. (रोम. ८:३८, ३९) त्याऐवजी, जेव्हा आपल्याला मंडळीत अन्याय सहन करावा लागतो, तेव्हा योसेफचं अनुकरण करून आपण यहोवाच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिस्थितीकडे आपण यहोवाच्या दृष्टिकोनाने पाहिलं पाहिजे. बायबल तत्त्वांचं पालन करून समस्या सोडवण्यासाठी आपण आपल्या परीने सर्व प्रयत्न केल्यानंतर, सर्वकाही यहोवाच्या हातात सोपवलं पाहिजे. आपण ही खात्री बाळगली पाहिजे की तो योग्य वेळी आणि योग्य प्रकारे परिस्थितीत नक्कीच सुधारणा करेल.
“सर्व जगाचा न्यायाधीश” असलेल्या यहोवावर भरवसा ठेवा
१७. “सर्व जगाचा न्यायाधीश” असलेल्या यहोवावर भरवसा असल्याचं आपण कसं दाखवू शकतो?
१७ आपण जोपर्यंत या दुष्ट जगात राहत आहोत, तोपर्यंत आपल्यावर अन्याय होणं हे अपेक्षितच आहे. आणि मंडळीत अशा गोष्टी फार क्वचितच घडतात. पण, समजा मंडळीत तुमच्यासोबत किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत अन्याय झाला तर तुमची प्रतिक्रिया कशी असेल? किंवा मग इतरांसोबत अन्याय होत आहे असं तुम्हाला वाटतं तेव्हा काय? अशा वेळी या गोष्टींना अडखळण्याचं कारण बनू देऊ नका. (स्तो. ११९:१६५) तर देवाला एकनिष्ठ राहा, मदतीसाठी त्याला प्रार्थना करा आणि त्याच्यावर पूर्णपणे निर्भर राहा. हे लक्षात असू द्या की अपरिपूर्णतेमुळे कदाचित तुमचा काही गैरसमज झाला असेल, किंवा तुम्हाला परिस्थितीची पूर्ण माहिती नसेल. त्यामुळे, अशा परिस्थितीत योसेफच्या उदाहरणाचं अनुकरण करा. इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलण्याचं टाळा; कारण यामुळे परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. तसंच, फक्त स्वतःवर निर्भर राहून परिस्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा आणि तो परिस्थितीत सुधार करेपर्यंत धीरानं वाट पाहण्याचा निर्धार करा. असं केल्यानं तुम्हालाही योसेफप्रमाणे देवाची स्वीकृती आणि आशीर्वाद मिळेल. तसंच, तुम्ही ही खात्री बाळगू शकता की “सर्व जगाचा न्यायाधीश” असलेला यहोवा देव नेहमी योग्य न्याय करेल. कारण, “त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत.”—उत्प. १८:२५; अनु. ३२:४.
१८. पुढच्या लेखात आपण कशाविषयी चर्चा करणार आहोत?
१८ यहोवाच्या लोकांसोबत अन्याय झाला, अशा बायबल काळातील आणखी दोन उदाहरणांवर आपण पुढच्या लेखात चर्चा करणार आहोत. या उदाहरणांवर चर्चा करताना आपण शिकणार आहोत, की नम्रता आणि क्षमाशीलता आपल्याला न्यायाबद्दल यहोवासारखाच दृष्टिकोन बाळगण्यास कशी मदत करते.
^ परि. 7 “जेहोवा इज माय गॉड, इन हूम आय विल ट्रस्ट” ही बंधू विली डेल यांची जीवन कथा, १ नोव्हेंबर १९९१ च्या टेहळणी बुरूज अंकात देण्यात आली आहे.