व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुणांनो आध्यात्मिक ध्येयं मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का?

तरुणांनो आध्यात्मिक ध्येयं मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का?

“आपली सर्व कार्ये परमेश्‍वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.”—नीति. १६:३.

गीत क्रमांक: ११, २४

१-३. (क) आजच्या तरुणांची तुलना कोणत्या परिस्थितीशी करता येईल? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.) (ख) तरुणांना कोणत्या गोष्टीमुळे मदत होईल?

कल्पना करा की तुम्हाला दुसऱ्‍या शहरात होणाऱ्‍या एका खास कार्यक्रमाला जायचं आहे. तिथे जाण्यासाठी तुम्ही बसचं तिकिट काढता. बस स्थानकावर असलेली गर्दी आणि गाड्यांची वर्दळ पाहून तुम्ही सुरुवातीला जरा गोंधळून जाता. पण कुठे जायचं आहे आणि कोणत्या बसमध्ये चढायचं आहे हे माहीत असल्यामुळे तुम्ही योग्य ठिकाणी जाऊन बसची वाट पाहता. या गोष्टी माहीत असल्यामुळे तुम्ही दिसेल त्या बसमध्ये चढणार नाही, कारण असं केल्यामुळे तुम्ही चुकीच्या ठिकाणी पोहचाल.

आपलं जीवनही एका प्रवासासारखंच आहे आणि तरुण लोक त्या बस स्थानकावर थांबलेल्या लोकांसारखे. कधीकधी आयुष्यात इतके पर्याय असतात की निवड करताना आपण गोंधळून जातो. पण तुम्हाला कुठे जायचं आहे हे जर आधीच माहीत असलं, तर मग योग्य निवड करणं सोपं जाईल. तुम्ही जीवनात कोणता मार्ग निवडला पाहिजे?

या प्रश्‍नाचं उत्तर मिळवण्यासाठी हा लेख तुम्हाला मदत करेल. तसंच, यहोवाचं मन आनंदित करण्यासाठी तुम्ही जीवनात काय करू शकता हे समजायलादेखील हा लेख तुम्हाला मदत करेल. यामुळे जीवनात कोणतेही निर्णय घेताना, जसं की शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं या सर्व गोष्टींबद्दल तुम्ही यहोवाचं मार्गदर्शन स्वीकाराल. तसंच, आध्यात्मिक ध्येयं मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. यामुळे यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध आणखी मजबूत होईल. यहोवाची सेवा करण्यावर तुम्ही आपलं लक्ष केंद्रित केलं, तर खात्री बाळगा की तो तुम्हाला आशीर्वाद देईल आणि यश मिळवण्यास मदत करेल.—नीतिसूत्रे १६:३ वाचा.

आध्यात्मिक ध्येयं ठेवणं का गरजेचं?

४. या लेखात आपण काय पाहणार आहोत?

आध्यात्मिक ध्येयं ठेवणं आपल्या फायद्याचं आहे. असं का म्हणता येईल? याच्या तीन कारणांवर आपण चर्चा करू या. पहिल्या दोन कारणांमुळे तुम्हाला हे समजायला मदत होईल की आध्यात्मिक ध्येयं मिळवण्याचा प्रयत्न केल्यामुळे यहोवासोबतची मैत्री आणखी घनिष्ठ होते. तिसरं कारण तुम्हाला हे समजायला मदत करेल की कमी वयातच आध्यात्मिक ध्येयं ठेवणं फायद्याचं का आहे.

५. आध्यात्मिक ध्येयं ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे?

आध्यात्मिक ध्येयं ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे यहोवाने दाखवलेल्या प्रेमासाठी त्याचे आभार मानणं. यहोवाने आपल्या सर्वांसाठी खूप काही केलं आहे. बायबल म्हणतं: “परमेश्‍वराचे उपकारस्मरण करणे . . . चांगले आहे. कारण हे परमेश्‍वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहे; तुझ्या हातच्या कृत्यांचा मी जयजयकार करतो.” (स्तो. ९२:१, ४) यहोवाने आपल्याला कायकाय दिलं आहे याचा जरा विचार करा: जीवन, त्याची ओळख, त्याच्याबद्दलचं सत्य, बायबल, मंडळी आणि नंदनवनात सदासर्वकाळ राहण्याची आशा. आध्यात्मिक ध्येयं ठेवल्यामुळे तुम्ही यहोवाला दाखवता की या सर्व गोष्टींसाठी तुम्ही त्याचे मनापासून आभारी आहात. यामुळे यहोवासोबतचं तुमचं नातं आणखी मजबूत होतं.

६. (क) आध्यात्मिक ध्येयांमुळे यहोवासोबतच्या तुमच्या नातेसंबंधावर कसा परिणाम होतो? (ख) कमी वयातच तुम्ही कोणती ध्येयं ठेवू शकता?

आध्यात्मिक ध्येयं ठेवण्याचं दुसरं कारण म्हणजे जेव्हा आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा आपण यहोवासाठी चांगली कार्यं करत असतो. यामुळे यहोवासोबतचा तुमचा नातेसंबंध आणखी मजबूत होईल. प्रेषित पौलने अभिवचन दिलं: “तुमचे काम व देवाच्या नावाबद्दल तुम्ही दाखवलेले प्रेम विसरून जाण्यासाठी देव अन्यायी नाही.” (इब्री ६:१०) अगदी कमी वयातही तुम्ही आध्यात्मिक ध्येयं ठेवू शकता. उदाहरणार्थ, फक्‍त १० वर्षांची असताना क्रिस्टीनने ठरवलं की ती नियमितपणे विश्‍वासू बंधुभगिनींच्या जीवनकथा वाचणार. १२ वर्षांच्या टोबीने ठरवलं की तो बाप्तिस्मा घेण्याआधी पूर्ण बायबल वाचून काढणार. मॅक्सिम नावाच्या मुलाने ११ वर्षांचा असताना बाप्तिस्मा घेतला, तर त्याची बहीण नाओमी हिने फक्‍त १० वर्षांची असताना. या दोघांनी बेथेलमध्ये जाण्याचं ध्येय ठेवलं. हे ध्येय डोळ्यांपुढे ठेवण्यासाठी त्यांनी बेथेलचा फॉर्म भिंतीवर लावला. तुमच्या बाबतीत काय? तुम्ही एखादं ध्येयं ठेवून ते मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता का?—फिलिप्पैकर १:१०, ११ वाचा.

७, ८. (क) ध्येयं ठेवल्यामुळे निर्णय घेताना कशी मदत होते? (ख) आपल्या तरुण बहिणीने युनिवर्सिटीचं शिक्षण का घेतलं नाही?

कमी वयातच आध्यात्मिक ध्येयं ठेवण्याचं तिसरं कारण काय आहे? तरुण वयात तुम्हाला बरेच निर्णय घ्यावे लागतात. तुम्ही कोणतं शिक्षण घ्याल, कशा प्रकारची नोकरी कराल आणि अशा इतर गोष्टींबद्दल तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय जणू प्रवासात येणाऱ्‍या एखाद्या चौकासारखे आहेत जिथून बरेच फाटे फुटतात. तुम्हाला कुठे जायचं आहे हे जर तुम्हाला माहीत असेल, तर मग योग्य रस्त्यावर जाणं तुम्हाला सोपं जाईल. या सारखंच तुमची ध्येयं काय आहेत हे जर तुम्ही आधीच ठरवलं, तर मग तुम्हाला निर्णय घेणं सोपं जाईल. बायबल म्हणतं: “काळजीपूर्वक केलेल्या योजनांमुळे फायदा होतो.” (नीति. २१:५, ईझी-टू-रीड व्हर्शन) तुम्ही जीवनात जितकं लवकर ध्येयं ठेवाल, तितकं लवकर तुम्हाला यश मिळेल. याचा अनुभव दमारिस नावाच्या बहिणीने घेतला. तरुण वयातच तिच्यावर एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ आली.

कॉलेजमध्ये असताना दमारिसला परीक्षेत खूप चांगले टक्के मिळाले. यामुळे तिला युनिवर्सिटीमध्ये कायद्याचं शिक्षण मोफत घेता आलं असतं. पण ते निवडण्याऐवजी तिने बँकेत पार्ट-टाइम नोकरी करायचं ठरवलं. असं का? कारण अगदी कमी वयात तिने पायनियर बनण्याचं ध्येय ठेवलं होतं. ती म्हणते: “म्हणून मला पार्ट-टाइम नोकरी हवी होती. कायद्याचं शिक्षण घेतल्यामुळे मला भरपूर पैसा कमवता आला असता हे खरं, पण मग मला पार्ट-टाइम नोकरी नसती मिळाली.” दमारिस मागच्या २० वर्षांपासून पायनियर सेवा करत आहे. तरुणपणात आपण ठेवलेलं ध्येय आणि घेतलेले निर्णय योग्य होते असं तिला वाटतं का? हो नक्कीच. ती ज्या बँकेत कामाला आहे तिथे तिची भेट बऱ्‍याच वकिलांशी होते. तिने युनिवर्सिटीचं शिक्षण घेतलं असतं, तर आज तीदेखील त्यांच्यासारखी काम करत असती. ती म्हणते की त्या लोकांपैकी बरेच जण आपल्या नोकरीत मुळीच खूश नाहीत. दमारिस म्हणते की इतकी वर्षं पायनियर सेवा केल्यामुळे तिला खूप आनंद मिळाला आहे. यामुळे तिला त्या लोकांसारखं निराश होणं टाळता आलं आहे.

९. संघटनेतील तरुणांबद्दल आपल्याला अभिमान का वाटतो?

या बाबतीत जगभरातील हजारो तरुण बंधुभगिनी खूप चांगलं उदाहरण मांडत आहेत आणि यासाठी आपण त्यांची प्रशंसा केली पाहिजे. यहोवासोबतची मैत्री आणि आध्यात्मिक ध्येयं यांना त्यांच्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व आहे. हे तरुण जीवनाचा आनंद तर घेतातच, पण यासोबतच ते प्रत्येक गोष्टीत, म्हणजे शिक्षण, नोकरी, कुटुंब या बाबतीतही यहोवाच्या इच्छेनुसार निर्णय घ्यायला शिकत आहेत. शलमोनने म्हटलं: “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्‍वरावर भाव ठेव.” त्याने पुढे म्हटलं: “तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” (नीति. ३:५, ६) तरुणांनो यहोवाचं तुमच्यावर खूप प्रेम आहे! तुम्ही त्याच्या नजरेत खूप मौल्यवान आहात. म्हणून तो तुमचं रक्षण करेल, तुम्हाला मार्गदर्शन देईल आणि आशीर्वाद देईल.

यहोवाबद्दल सांगण्यासाठी चांगली तयारी करा

१०. (क) प्रचारकार्याला आपल्या जीवनात महत्त्वाचं स्थान का असलं पाहिजे? (ख) आपल्या विश्‍वासाबद्दल समजावून सांगण्यात तुम्ही आणखी कुशल कसं बनू शकता?

१० यहोवाचं मन आनंदित करण्यावर तुम्ही आपलं लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल इतरांनाही सांगावसं वाटेल. “सर्व राष्ट्रांत आधी राज्याविषयीच्या आनंदाच्या संदेशाची घोषणा केली” जावी असं येशूने जोर देऊन सांगितलं. (मार्क १३:१०) यावरून आपल्याला कळतं की प्रचारकार्य करणं खूप गरजेचं आहे आणि त्याला आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे. तुम्ही तुमची सेवा वाढवण्याचं ध्येय ठेवू शकता का? तुम्ही पायनियर बनू शकता का? तुम्ही इतरांना आपला बायबल आधारित विश्‍वास आणखी चांगल्या प्रकारे समजावून कसा सांगू शकता? प्रचार करणं तुम्हाला इतकं आवडत नसेल तेव्हा काय? दोन गोष्टींमुळे तुम्हाला मदत मिळेल: चांगली तयारी करा, आणि यहोवाबद्दल तुम्हाला जे काही माहीत आहे ते इतरांना सांगत राहा. असं केलं तर प्रचारकार्य करणं तुम्हाला आवडू लागेल.

इतरांना यहोवाबद्दल सांगण्यासाठी तुम्ही तयारी कशी करता? (परिच्छेद ११, १२ पाहा)

११, १२. (क) इतरांना यहोवाबद्दल सांगता यावं म्हणून तयारी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? (ख) एका तरुण बांधवाने संधीचा उपयोग करून यहोवाबद्दल साक्ष कशी दिली?

११ तुमचे मित्र सहसा तुम्हाला जे प्रश्‍न विचारतात किंवा ज्या विषयांवर बोलतात त्यांचं उत्तर तुम्ही आधीच तयार करून ठेवू शकता. आपल्या वेबसाईटवर आणि प्रकाशनांत असे बरेच लेख आहेत जे तरुणांच्या प्रश्‍नांची उत्तरं देतात. उदाहरणार्थ, समजा तुमच्या एखाद्या मित्राने विचारलं की, ‘तुझे आईबाबा कसं ऐकून घेतात तुझं, माझे तर कधीच ऐकत नाही?’ तर तुम्ही तरुणांच्या मनात येणाऱ्‍या १० प्रश्‍नांची उत्तरं या माहितीपत्रकातून मी माझ्या आई-बाबांशी कसं जुळवून घेऊ शकतो? हा धडा वाचू शकता. यामुळे तुम्हाला त्याला योग्यपणे उत्तर द्यायला मदत होईल.—१ पेत्र ३:१५ वाचा.

१२ तुम्ही आपल्या मित्रांना jw.org वेबसाईटवर माहिती वाचायला सांगू शकता. लूका नावाच्या बांधवाने हेच केलं. त्याच्या वर्गातील मुलं वेगवेगळ्या धर्मांबद्दल बोलत होती. शाळेच्या पुस्तकात यहोवाच्या साक्षीदारांबद्दल चुकीची माहिती दिली आहे हे लूकाच्या लक्षात आलं. त्याच्या मनात भीती असली, तरी लिहिलेल्या गोष्टी का चुकीच्या आहेत हे सर्व वर्गासमोर सांगण्याबद्दल त्याने आपल्या टिचरला विचारलं. टिचरने त्याला आपल्या विश्‍वासांबद्दल सांगण्याची परवानगी दिली. लूकाने वर्गातील मुलांना आपली वेबसाईट दाखवली. टिचरला ती वेबसाईट इतकी आवडली की तिने वर्गातील सर्वांना एक होमवर्क दिला. टिचरने आपल्या वेबसाईटवरचा हात न उचलता, त्रास देणाऱ्‍यांचा सामना करा! हा व्हिडिओ मुलांना पाहायला सांगितला. कल्पना करा की शाळेत यहोवाबद्दल साक्ष दिल्यामुळे लूकाला किती आनंद झाला असेल.

१३. आव्हानं येतात तेव्हादेखील आपण ध्येय पूर्ण करण्याचं का सोडू नये?

१३ तुमच्या समोर कदाचित आव्हानं येतील, पण तरी निराश होऊ नका. तुम्ही ठेवलेलं ध्येय मिळवण्यासाठी प्रयत्न करत राहा. (२ तीम. ४:२) कॅथरिना नावाच्या बहिणीने हेच केलं. १७ वर्षांची असताना तिने ध्येय ठेवलं की तिच्यासोबत काम करणाऱ्‍या सर्वांना ती प्रचार करेल. यामुळे तिच्या एका सोबत्याने तर तिचा बऱ्‍याच वेळा अपमान केला. पण तिने प्रयत्न सोडले नाहीत आणि आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी ती मेहनत करत राहिली. तिच्या चांगल्या वागण्याचा हान्स नावाच्या एका सोबत्यावर खूप चांगला प्रभाव पडला. हळूहळू तो आपली प्रकाशनं वाचू लागला, मग त्याने बायबल अभ्यास केला आणि बाप्तिस्माही घेतला. पण हान्सच्या या प्रगतीबद्दल कॅथरिनाला माहीत नव्हतं, कारण तोपर्यंत ती दुसरीकडे राहायला गेली होती. तिने साक्ष दिल्याच्या १३ वर्षांनंतर हान्ससोबत तिची भेट झाली. तेव्हा ती व तिचं कुटुंब सभेसाठी एका मंडळीत गेलं होतं आणि त्या दिवशी हान्स जाहीर भाषण देत होता. कल्पना करा की हान्सने इतकी प्रगती केली आहे हे पाहून कॅथरिनाला किती आनंद झाला असेल. आपल्या सोबत्यांना प्रचार करण्याचं ध्येयं तिने कधीच सोडलं नाही याचं तिला खूप समाधान वाटलं.

आपल्या ध्येयांपासून विचलित होऊ नका

१४, १५. (क) इतर जण तुमच्यावर दबाव आणतात तेव्हा काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? (ख) दबावाचा सामना करण्यासाठी तुम्ही तयारी कशी करू शकता?

१४ आतापर्यंत आपण पाहिलं की आपण यहोवाचं मन आनंदित करण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आध्यात्मिक ध्येयं ठेवली पाहिजेत. पण तुमच्या वयाच्या बऱ्‍याच मुलामुलींना जीवनात फक्‍त मजा करायची असते. आणि असं करण्यासाठी ते तुम्हालादेखील म्हणतील. कधी ना कधी अशी परिस्थिती येईल जेव्हा तुम्हाला मित्रांना सांगावं लागेल की तुम्ही ठेवलेली ध्येयं तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहेत. तुम्हाला तुमच्या ध्येयांपासून विचलित करण्याची संधी इतरांना देऊ नका. लेखाच्या सुरुवातीला आपण बस स्थानकाचं उदाहरण पाहिलं. एखाद्या बसमध्ये लोक खूप मजा करत आहेत म्हणून तुम्हीही त्या बसमध्ये चढाल का? असं करणं नक्कीच शहाणपणाचं नसणार.

१५ सोबत्यांनी तुमच्यावर दबाव आणल्यावर तुम्ही त्याला बळी पडू नये, यासाठी तुम्ही आधीच काय करू शकता? असे प्रसंग टाळा जिथे दबावाचा सामना करणं तुम्हाला कठीण जाईल. (नीति. २२:३) चुकीच्या गोष्टी केल्याचे कोणते वाईट परिणाम होतील याचा आधीच विचार करा. (गलती. ६:७) तसंच, तुम्हाला सल्ल्याची गरज आहे याची नेहमी जाणीव असू द्या. तुमचे आईवडील आणि मंडळीतले अनुभवी बंधुभगिनी तुम्हाला जे सल्ले देतात ते ऐकून त्यांवर विचार करा.—१ पेत्र ५:५, ६ वाचा.

१६. नम्र राहणं किती गरजेचं आहे हे क्रिसटॉफच्या उदाहरणावरून कसं कळतं?

१६ नम्र असल्यामुळे क्रिसटॉफला सल्ला स्वीकारायला मदत झाली. बाप्तिस्म्यानंतर व्यायाम करण्यासाठी तो एका जीममध्ये नियमितपणे जाऊ लागला. तिथे येणाऱ्‍या इतर तरुणांनी त्याला स्पोर्ट्‌स क्लबला यायला सांगितलं. याबद्दल तो मंडळीतल्या एका वडिलांशी बोलला. त्या वडिलांनी त्याला असं करण्याच्या काही संभाव्य धोक्यांबद्दल विचार करायला सांगितलं. जसं की तिथे गेल्यामुळे त्याच्यात स्पर्धात्मक वृत्ती येऊ शकते. पण तरीही क्रिसटॉफने स्पोर्ट्‌स क्लबला जायचं ठरवलं. काही दिवसांतच त्याच्या लक्षात आलं की तो खेळत असलेला खेळ खूप हिंसक आणि धोकेदायक आहे. तो याबद्दल परत वडिलांशी बोलला आणि त्यांनी त्याला बायबलमधून चांगला सल्ला दिला. क्रिसटॉफ म्हणतो की, “यहोवाने मला मदत करण्यासाठी चांगले सल्लागार पाठवले, आणि थोडा वेळ लागला तरी मी त्याचं ऐकलं.” सल्ला स्वीकारण्यासाठी लागणारी नम्रता तुमच्यामध्ये आहे का?

१७, १८. (क) तरुणांसाठी यहोवाची काय इच्छा आहे? (ख) आपण केलेल्या निवडींमुळे मोठं झाल्यावर पस्तावा करण्याचं आपण कसं टाळू शकतो? उदाहरण द्या.

१७ बायबल म्हणतं: “हे तरुणा [किंवा तरुणी], आपल्या तारुण्यात आनंद कर; तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्लास देवो.” (उप. ११:९) तरुणपणात तुम्ही आनंदी असावं अशी यहोवाची इच्छा आहे. या लेखात तुम्ही पाहिलं की आनंदी राहण्याचा एक मार्ग म्हणजे, आध्यात्मिक ध्येयांवर नेहमी आपलं लक्ष केंद्रित करून ठेवणं आणि योजना करताना व निर्णय घेताना यहोवाचं मार्गदर्शन स्वीकारणं. तुम्ही जितक्या कमी वयात हे कराल, तितकं लवकर तुम्ही यहोवाच्या मार्गदर्शनाचा, संरक्षणाचा आणि त्याच्या आशीर्वादांचा अनुभव घेऊ शकाल. बायबलमध्ये तुमच्यासाठी दिलेल्या सर्व सल्ल्यांवर विचार करा आणि पुढील सल्ला लागू करा: “आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.”—उप. १२:१.

१८ तारुण्य जास्त काळ टिकत नाही. वयासोबत तुम्ही प्रौढ व्हाल. पण दुःखाची गोष्ट ही आहे की बरेच प्रौढ लोक चुकीची ध्येयं ठेवल्यामुळे किंवा मग तरुणपणात काहीच ध्येयं न ठेवल्यामुळे नंतर पस्तावतात. तुम्ही जर तुमची आध्यात्मिक ध्येयं मिळवण्यासाठी नेहमी प्रयत्न केले, तर मोठं झाल्यावर तुम्हाला पस्तावा होणार नाही. उलट तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे तुम्हाला जीवनात आनंदच मिळेल. मिरयाना नावाच्या बहिणीला आता खूप समाधान वाटतं. तरुण असताना ती खेळांमध्ये खूप पुढे असायची. तिला तर बऱ्‍याच देशांच्या खेळाडूंमध्ये होणाऱ्‍या विंटर ऑलंपिक्समध्येही भाग घेण्याची संधी मिळाली होती. पण तिने ती संधी नाकारली आणि यहोवाची पूर्णवेळ सेवा करण्याची निवड केली. मागच्या ३० पेक्षा जास्त वर्षांपासून ती पूर्णवेळच्या सेवेत आहे आणि आपल्या पतीसोबत सेवा करत आहे. ती म्हणते की ज्या लोकांना मोठं नाव, पैसा, हुद्दा आणि लोकांची वाहवा हवी असते ते मनापासून कधीच आनंदी नसतात. ती म्हणते की यहोवाची सेवा करणं आणि इतरांना त्याच्याबद्दल जाणून घ्यायला मदत करणं हेच सर्वात चांगलं ध्येय आहे.

१९. तरुणपणात आध्यात्मिक ध्येयं ठेवून त्यांवर लक्ष केंद्रित करणं फायद्याचं का आहे?

१९ तरुणांनो, अनेक दबावांचा सामना करूनही, तुम्ही यहोवाची सेवा करण्यासाठी आपल्या वेळेचा उपयोग करत आहात, यासाठी आम्ही मनापासून तुमची प्रशंसा करतो. तुम्ही आध्यात्मिक ध्येयं ठेवली आहेत आणि प्रचारकार्याला तुम्ही खूप महत्त्वाचं समजता. तसंच, तुम्हाला आपल्या ध्येयांपासून विचलित करण्याची संधी तुम्ही जगाला देत नाही. या सर्व गोष्टी इतरांच्या लक्षात येतात याची खात्री बाळगा. मंडळीत अनेक बंधुभगिनी आहेत जे तुमच्यावर प्रेम करतात आणि तुम्हाला मदत करायची त्यांची इच्छा आहे. म्हणून मग बायबलमधील सल्ला आपण नेहमी पाळू शकतो. त्यात म्हटलं आहे: “आपली सर्व कार्ये परमेश्‍वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.”