व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नियुक्‍त बांधवांनो—तीमथ्यकडून शिका

नियुक्‍त बांधवांनो—तीमथ्यकडून शिका

मागच्या वर्षी जगभरात यहोवाच्या साक्षीदारांमधल्या हजारो बांधवांना वडील आणि साहाय्यक सेवक म्हणून नियुक्‍त करण्यात आलं. तुम्हीदेखील जर या बांधवांपैकी एक असाल, तर तुमच्या नवीन नेमणुकीबद्दल तुम्हाला नक्कीच आनंद झाला असेल.

पण यासोबतच तुम्हाला थोडी चिंताही वाटत असेल. जेसन नावाच्या एक तरुणाला वडील म्हणून नेमण्यात आलं तेव्हा त्यालाही असंच वाटलं होतं. तो म्हणतो: “जेव्हा मला नियुक्‍त करण्यात आलं तेव्हा नवीन जबाबदाऱ्‍यांमुळे मला चिंता वाटू लागली.” मोशे आणि यिर्मया यांना यहोवाने नवीन जबाबदाऱ्‍या दिल्या तेव्हा त्यांना वाटलं की ते त्यासाठी अजून तयार नाहीत. (निर्ग. ४:१०; यिर्म. १:६) जर तुम्हालाही त्यांच्यासारखंच वाटत असेल, तर अशा भावनांवर तुम्ही मात कशी कराल? तुम्ही प्रगती कशी करत राहाल? यासाठी तीमथ्य नावाच्या ख्रिस्ती शिष्याच्या उदाहरणाचा विचार करा.—प्रे. कार्ये १६:१-३.

तीमथ्यच्या उदाहरणाचं अनुकरण करा

पौलने तीमथ्यला त्याच्यासोबत प्रवासी कार्य करण्यासाठी आमंत्रण दिलं, तेव्हा तीमथ्य कदाचित तरुण असावा. यामुळे तीमथ्यमध्ये कदाचित आत्मविश्‍वासाची कमी असेल आणि नवीन जबाबदारी हाताळण्यासाठी तो जरा कचरलाही असेल. (१ तीम. ४:११, १२; २ तीम. १:१, २, ७) असं असलं तरी, दहा वर्षांनंतर पौल फिलिप्पैमधल्या मंडळीला म्हणू शकला: “तीमथ्यला तुमच्याकडे लवकरच पाठवण्याची मी प्रभू येशूमध्ये आशा करतो. कारण . . . त्याच्या स्वभावाचा दुसरा कोणीही माझ्याजवळ नाही.”—फिलिप्पै. २:१९, २०.

पण कोणत्या गोष्टींमुळे तीमथ्य एक उल्लेखनीय वडील बनू शकला? त्याच्या उदाहरणावरून आपण सहा धडे शिकू शकतो.

१. त्याला मनापासून लोकांची काळजी होती. पौल फिलिप्पैच्या बांधवांना म्हणाला: “[तीमथ्य] तुमची अगदी मनापासून काळजी घेईल.” (फिलिप्पै. २:२०) तीमथ्यला खरंच लोकांची काळजी होती. लोकांनी यहोवासोबत घनिष्ठ नातेसंबंध जोडावा अशी त्याची इच्छा होती. त्यांना मदत करण्यासाठी त्याने स्वेच्छेने स्वतःला वाहून घेतलं.

अशा बस ड्रायव्हरप्रमाणे होऊ नका जो प्रवाशांना स्टॉपवरून घेण्यापेक्षा प्रत्येक बसस्टॉपवर वेळेवर पोहोचायला जास्त महत्त्व देतो. वीसपेक्षा जास्त वर्षं वडील म्हणून सेवा करत असलेले बंधू विल्यम, नवीनच नियुक्‍त झालेल्या बांधवांना सल्ला देताना म्हणतात: “बांधवांवर प्रेम करा. कामाच्या व्यवस्थेपेक्षा बंधुभगिनींच्या गरजांकडे लक्ष द्या.”

२. त्याने आध्यात्मिक गोष्टींना पहिलं स्थान दिलं. तीमथ्यच्या उदाहरणाचा उपयोग करून पौलने आवेशी नसलेल्या बांधवांबद्दल म्हटलं: “बाकीचे सर्व जण येशू ख्रिस्ताच्या नाही, तर स्वतःच्याच हिताचा विचार करत आहेत.” (फिलिप्पै. २:२१) पौलने रोममधून पत्र लिहिलं तेव्हा त्याने पाहिलं, की तिथले बांधव वैयक्‍तिक कामांमध्ये खूप जास्त गुंतले होते. ते आध्यात्मिक गोष्टी करण्यासाठी मेहनत घेत नव्हते. पण तीमथ्य तसा नव्हता. जेव्हा सुवार्तेचं काम वाढवण्याची संधी आली तेव्हा त्याने यशयाप्रमाणे मनोवृत्ती दाखवली. यशयाने म्हटलं होतं: “हा मी आहे, मला पाठव.”—यश. ६:८.

तुम्ही वैयक्‍तिक आणि आध्यात्मिक जबाबदाऱ्‍यांमध्ये समतोल कसा राखू शकता? सर्वात आधी, महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत ते ठरवा. पौलने म्हटलं: “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.” (फिलिप्पै. १:१०) देवाच्या नजरेत ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याला प्राधान्य द्या. मग दुसरी गोष्ट म्हणजे, आपलं जीवन साधं करा. तुमचा वेळ आणि शक्‍ती वाया जाईल अशा गोष्टी तुमच्या जीवनातून काढून टाका. पौलने तीमथ्यला प्रोत्साहन देत म्हटलं: “तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि त्याऐवजी . . . न्याय, विश्‍वास, प्रेम व शांती हे गुण उत्पन्‍न करण्याचा प्रयत्न कर.”—२ तीम. २:२२.

३. पवित्र सेवेत त्याने खूप मेहनत घेतली. पौलने फिलिप्पैच्या लोकांना आठवण करून देत म्हटलं: “तीमथ्यबद्दल तुम्हाला स्वतःला हे माहीत आहे की जसा एखादा मुलगा आपल्या वडिलांना मदत करतो, तशीच त्याने माझ्यासोबत आनंदाच्या संदेशाच्या वाढीसाठी मेहनत केली आहे.” (फिलिप्पै. २:२२) तीमथ्य आळशी नव्हता. त्याने पौलच्या खांद्याला खांदा लावून खूप मेहनत केली आणि यामुळे त्यांचं नातं घनिष्ठ झालं.

आज देवाच्या संघटनेत भरपूर काम आहे. या कामामुळे आपल्याला समाधान मिळतं आणि बंधुभगिनींसोबत आपलं नातं आणखी घनिष्ठ होतं. त्यामुळे “प्रभूचे काम जास्तीत जास्त प्रमाणात करत” राहण्याचं ध्येय ठेवा.—१ करिंथ. १५:५८.

४. शिकलेल्या गोष्टी त्याने लागू केल्या. पौलने तीमथ्यला लिहिलं: “तू मात्र माझी शिकवण, माझे जीवन, माझे ध्येय, माझा विश्‍वास, माझी सहनशीलता, माझे प्रेम व माझा धीर यांचे जवळून अनुकरण केले आहे.” (२ तीम. ३:१०) शिकलेल्या गोष्टी लागू केल्यामुळे तीमथ्य मोठ्या जबाबदाऱ्‍या हाताळण्याच्या पात्रतेचा ठरला.—१ करिंथ. ४:१७.

वयाने मोठा आणि अनुभवी असा तुमचा एखादा मित्र आहे का ज्याला तुम्ही आदर्श मानता? जर नसेल तर तुम्ही तसा बांधव शोधण्याचा प्रयत्न करू शकता. टॉम नावाचा बांधव बऱ्‍याच वर्षांपासून एक वडील म्हणून सेवा करत आहे. तो आपला अनुभव सांगतो: “एका अनुभवी वडिलांनी मला त्यांच्या पंखांखाली घेतलं आणि खूप चांगलं प्रशिक्षण दिलं. मी नेहमी त्यांच्याकडे सल्ला मागायचो आणि त्यांनी दिलेला सल्ला लागू करायचो. यामुळे माझा आत्मविश्‍वास भराभर वाढला.”

५. तो स्वतःला प्रशिक्षण देत राहिला. पौलने तीमथ्यला प्रोत्साहन देत म्हटलं: “सुभक्‍तीचे ध्येय ठेवून त्यानुसार स्वतःला प्रशिक्षित कर.” (१ तीम. ४:७) एका खेळाडूला प्रशिक्षण देण्यासाठी कोच असतो, पण त्यासोबतच त्याने स्वतःही मेहनत घेणं आवश्‍यक आहे. पौलने तीमथ्यला आर्जव केला: “सार्वजनिक वाचन, मार्गदर्शन देणे व शिकवणे यांत स्वतःला वाहून घे. . . . या गोष्टींवर सखोल विचार करत राहा; त्यांत अगदी गढून जा, म्हणजे तुझी प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल.”—१ तीम. ४:१३-१५.

तुम्हालादेखील तुमची कौशल्यं आणि आध्यात्मिकता वाढवत राहण्याची गरज आहे. मंडळीच्या व्यवस्थेबद्दल जी नवनवीन माहिती मिळते ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहा. तसंच, फाजील आत्मविश्‍वास बाळगण्याचं टाळा; तुम्हाला बऱ्‍याच वर्षांचा अनुभव आहे आणि तुम्ही कुठलीही समस्या काळजीपूर्वक संशोधन केल्याशिवाय सहज हाताळू शकता, असा विचार करण्याचं टाळा. तीमथ्यसारखं स्वतःकडे आणि तुम्ही देत असलेल्या “शिक्षणाकडे सतत लक्ष” द्या.—१ तीम. ४:१६.

६. तो यहोवाच्या पवित्र आत्म्यावर विसंबून राहिला. तीमथ्यच्या सेवाकार्याबद्दल आठवून पौलने त्याला म्हटलं: “आपल्यामध्ये राहणाऱ्‍या पवित्र आत्म्याद्वारे हा अमूल्य ठेवा जतन कर.” (२ तीम. १:१४) सेवाकार्याला जतन करून ठेवण्यासाठी तीमथ्यला देवाच्या आत्म्यावर विसंबून राहावं लागणार होतं.

बरीच दशकं वडील म्हणून सेवा करत असलेले डोनाल्ड नावाचे बांधव म्हणतात: “नियुक्‍त असलेल्या बांधवांनी यहोवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधाला खूप मौल्यवान समजलं पाहिजे. आणि असं केल्यामुळे ‘ते अधिकाधिक शक्त्ति पावत जातात.’ जर त्यांनी देवाचा आत्मा मिळवण्यासाठी प्रार्थना केली आणि त्याचे पैलू विकसित करण्याचा प्रयत्न केला तर ते इतर बांधवांसाठी एक आशीर्वाद ठरतील.”—स्तो. ८४:७; १ पेत्र ४:११.

मिळालेल्या बहुमानाची कदर करा

तुमच्यासारखे अनेक नियुक्‍त झालेले बांधव आध्यात्मिक प्रगती करत आहेत हे पाहून आम्हाला खरंच खूप आनंद होतो. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख करण्यात आलेला जेसन म्हणतो: “वडील बनल्यापासून मला खूप काही शिकायला मिळालं आहे आणि माझा आत्मविश्‍वासदेखील वाढला आहे. मला मिळालेली जबाबदारी माझ्यासाठी एक बहुमान आहे आणि आता मी खूप आनंदाने ती पार पाडतो.”

तुम्ही आध्यात्मिक प्रगती करत राहाल का? तीमथ्यकडून शिकण्याचं ध्येय ठेवा. मग तुम्हीदेखील देवाच्या लोकांसाठी एक आशीर्वाद ठराल.