व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रोत्साहन देणाऱ्‍या यहोवा देवाचं अनुकरण करा

प्रोत्साहन देणाऱ्‍या यहोवा देवाचं अनुकरण करा

“आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव व पिता . . . त्याची स्तुती असो. तो आपल्या सर्व परीक्षांमध्ये आपले [प्रोत्साहन] करतो.”—२ करिंथ. १:३, ४.

गीत क्रमांक: २३, 

१. आदाम-हव्वाने पाप केल्यानंतर यहोवाने मानवजातीला आशा आणि प्रोत्साहन कसं दिलं?

यहोवा हा प्रोत्साहन देणारा देव आहे. मानव पाप करून अपरिपूर्ण बनले तेव्हापासूनच तो प्रोत्साहन देत आला आहे. आदाम-हव्वाने देवाविरुद्ध बंड केल्यानंतर लगेच यहोवाने एक भविष्यवाणी केली. त्यांच्या येणाऱ्‍या संततीला या भविष्यवाणीचा अर्थ समजल्यामुळे आशा आणि धैर्य मिळणार होतं. उत्पत्ती ३:१५ या वचनात ही भविष्यवाणी देण्यात आली आहे. यात अभिवचन देण्यात आलं आहे की सैतान आणि त्याच्या सर्व दुष्ट कामांचा पूर्णपणे नाश केला जाईल.—१ योहा. ३:८; प्रकटी. १२:९.

यहोवाने प्राचीन काळातील सेवकांना प्रोत्साहन दिलं

२. यहोवाने नोहाला प्रोत्साहन कसं दिलं?

यहोवाने नोहाला कसं प्रोत्साहन दिलं त्यावर विचार करा. त्याच्या काळातील लोक खूप हिंसक आणि अनैतिक बनले होते. त्या काळात फक्‍त नोहा व त्याचं कुटुंबच यहोवाची उपासना करत होतं. आजूबाजूची परिस्थिती पाहून नोहा कदाचित निराश झाला असता. (उत्प. ६:४, ५, ११; यहू. ६) पण यहोवाने नोहाला उपासना आणि योग्य ते करत राहण्यासाठी लागणारं धैर्य दिलं. (उत्प. ६:९) त्याने नोहाला सांगितलं की तो या दुष्ट जगाचा विनाश करणार आहे. तसंच, नोहा आणि त्याच्या कुटुंबाला वाचण्यासाठी काय करण्याची गरज आहे हेदेखील यहोवाने त्याला सांगितलं. (उत्प. ६:१३-१८) यहोवा नोहासाठी प्रोत्साहन देणारा देव ठरला.

३. यहोवाने यहोशवाला कसं प्रोत्साहन दिलं? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

यहोवाने यहोशवालाही प्रोत्साहन दिलं. त्याला एक खूप मोठी जबाबदारी देण्यात आली होती. ती म्हणजे, त्याला देवाच्या लोकांना वचन दिलेल्या देशात घेऊन जायचं होतं आणि तिथे राहणाऱ्‍या शक्‍तिशाली शत्रूंवर विजय मिळवायचा होता. यहोशवाला भीती वाटू शकते याची जाणीव यहोवाला होती, म्हणून त्याने मोशेला म्हटलं: “यहोशवाला अधिकारारूढ कर व त्याला धीर देऊन दृढ कर कारण तोच या लोकांचा पुढारी होऊन त्यांना पलीकडे नेईल आणि जो देश तुझ्या दृष्टीस पडेल तो त्यांना वतन म्हणून मिळवून देईल.” (अनु. ३:२८) यानंतर यहोवाने स्वतः यहोशवाला प्रोत्साहन दिलं. त्याने यहोशवाला म्हटलं: “मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरू नको; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्‍वर तुझ्याबरोबर असेल.” (यहो. १:१, ९) हे शब्द ऐकून यहोशवाला किती प्रोत्साहन मिळालं असेल.

४, ५. (क) यहोवाने प्राचीन काळातील आपल्या लोकांना कसं प्रोत्साहन दिलं? (ख) यहोवाने येशूला कसं प्रोत्साहन दिलं?

यहोवाने आपल्या लोकांना एक समूह या नात्यानेही प्रोत्साहन दिलं. उदाहरणार्थ, बाबेलच्या बंदिवासात असल्यामुळे यहुद्यांना प्रोत्साहनाची गरज आहे हे यहोवाला माहीत होतं. यामुळेच यहोवाने त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन देणारी भविष्यवाणी केली. त्याने म्हटलं: “तू भिऊ नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे; घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे; मी तुला शक्‍ती देतो; मी तुझे साहाय्यही करतो; मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरतो.” (यश. ४१:१०) नंतर यहोवाने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनाही प्रोत्साहन दिलं आणि आज आपल्यालाही तो तसंच प्रोत्साहन देतो.—२ करिंथकर १:३, ४ वाचा.

यहोवाने आपल्या पुत्राला, येशूलाही प्रोत्साहन दिलं. येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर त्याला स्वर्गातून एक आवाज ऐकू आला: “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” (मत्त. ३:१७) या शब्दांमुळे येशूला आपलं सेवाकार्य करण्यासाठी किती प्रोत्साहन मिळालं असेल याची कल्पना करा.

येशूने इतरांना प्रोत्साहन दिलं

६. येशूने दिलेल्या तालान्तांच्या दाखल्यामुळे आपल्याला प्रोत्साहन कसं मिळू शकतं?

येशूने आपल्या पित्याचं अनुकरण करत इतरांना विश्‍वासू राहण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तालान्तांचा दाखला देताना मालक आपल्या विश्‍वासू सेवकांना कसं प्रोत्साहन देतो याबद्दल येशूने सांगितलं. त्याने म्हटलं: “शाब्बास, चांगल्या व विश्‍वासू दासा! तू थोड्या गोष्टींविषयी विश्‍वासू ठरला. मी तुला पुष्कळ गोष्टींवर अधिकार देईन. आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो.” (मत्त. २५:२१, २३) यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहण्यासाठी या शब्दांमुळे त्याच्या शिष्यांना प्रोत्साहन मिळालं.

७. येशूने आपल्या प्रेषितांना, खासकरून पेत्रला कसं प्रोत्साहन दिलं?

आपल्यात मोठा कोण याविषयी प्रेषितांमध्ये नेहमीच वाद व्हायचा. असं असलं तरी येशू त्यांच्यासोबत नेहमी धीराने वागला. इतरांनी आपली सेवा करावी अशी चुकीची अपेक्षा न ठेवता, आपण नम्र राहून नेहमी इतरांची सेवा करावी, असं प्रोत्साहन येशूने प्रेषितांना दिलं. (लूक २२:२४-२६) पेत्रने बऱ्‍याच चुका करून येशूचं मन दुखावलं. (मत्त. १६:२१-२३; २६:३१-३५, ७५) पण येशूने त्याला कधीच नाकारलं नाही. उलट त्याने पेत्रला प्रोत्साहन दिलं आणि त्याच्यावर इतरांना उत्तेजन देण्याची जबाबदारीही सोपवली.—योहा. २१:१६.

प्रोत्साहन देणाऱ्‍या लोकांची उदाहरणं

८. हिज्कीयाने सैन्याच्या प्रमुखांना आणि यहूदातील लोकांना प्रोत्साहन कसं दिलं?

येशूने प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत एक उत्तम उदाहरण मांडलं. पण तो पृथ्वीवर येण्याआधीही देवाच्या सेवकांना याची जाणीव होती की त्यांनी इतरांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. हिज्कीया राजाच्या उदाहरणावर विचार करा. अश्‍शूरी लोक यरुशलेमवर हल्ला करणार होते तेव्हा हिज्कीयाने त्याच्या सैन्याच्या प्रमुखांना बोलावून त्यांना प्रोत्साहन दिलं. त्याच्या शब्दांवर सर्वांनी भरवसा ठेवला आणि त्यांना धैर्य मिळालं.—२ इतिहास ३२:६-८ वाचा.

९. प्रोत्साहन देण्याबाबत आपण ईयोबकडून काय शिकू शकतो?

आपण प्रोत्साहन देण्याबद्दल ईयोबकडूनही शिकू शकतो. खरं पाहिलं तर त्यालाच प्रोत्साहनाची गरज होती, पण तरी त्याने प्रोत्साहन कसं द्यायचं हे इतरांना शिकवलं. ईयोबला सांत्वन देण्यासाठी आलेल्या लोकांना त्याने म्हटलं, की तो जर त्यांच्या जागी असता तर त्याने सांत्वन देण्यासाठी उत्तेजन देणाऱ्‍या शब्दांचा उपयोग केला असता. त्यांना दुःख होईल असं काहीही तो बोलला नसता. (ईयो. १६:१-५) त्या लोकांनी ईयोबला सांत्वन दिलं नसलं, तरी अलीहू आणि यहोवा यांच्याकडून मात्र त्याला सांत्वन मिळालं.—ईयो. ३३:२४, २५; ३६:१, ११; ४२:७, १०.

१०, ११. (क) इफ्ताहच्या मुलीला प्रोत्साहनाची गरज का होती? (ख) आज आपण कोणाला प्रोत्साहन देऊ शकतो?

१० इफ्ताहच्या मुलीलादेखील प्रोत्साहनाची गरज होती. इफ्ताह हा शास्ता या नात्याने सेवा करत होता आणि तो अम्मोनी लोकांसोबत लढायला जाणार होता. त्याने यहोवाची मदत मागून त्याला वचन दिलं की जर यहोवाने त्याला विजय मिळवून दिला, तर परतल्यावर घरातून बाहेर येणाऱ्‍या पहिल्या व्यक्‍तीला तो निवासमंडपात सेवा करण्यासाठी देईल. इस्राएली लोकांनी ते युद्ध जिंकलं आणि घरातून इफ्ताहला भेटायला आलेली पहिली व्यक्‍ती त्याची एकुलती एक मुलगी होती. तिला पाहून इफ्ताह खचून गेला. पण त्याने आपलं वचन पाळलं आणि तिला आयुष्यभर निवासमंडपात यहोवाची सेवा करण्यासाठी पाठवलं.—शास्ते ११:३०-३५.

११ इफ्ताहसाठी हे नक्कीच सोपं नसेल. पण कल्पना करा की त्याच्या मुलीला आपल्या वडिलांचं वचन पाळणं किती कठीण गेलं असेल. असं असलं तरी ती निवासमंडपात जायला तयार झाली. (शास्ते ११:३६, ३७) हे वचन पाळण्याचा अर्थ असा होता की तिला लग्न करणं, मुलांना जन्म देणं आणि वंश पुढे चालवणं शक्य होणार नव्हतं. म्हणूनच तिला सांत्वनाची आणि प्रोत्साहनाची खूप गरज होती. बायबल सांगतं: “इस्राएल लोकांत अशी चाल पडली की, इस्राएल मुलींनी इफ्ताह गिलादी याच्या मुलीच्या स्मरणार्थ शोक करण्यासाठी प्रतिवर्षी चार दिवस जात जावे.” (शास्ते ११:३९, ४०) तिच्या उदाहरणाचं अनुकरण करून आज बरेच बंधुभगिनी यहोवाची सेवा करण्यासाठी अविवाहित राहतात. अशा बंधुभगिनींची प्रशंसा करून आपण त्यांना प्रोत्साहन देऊ शकतो.—१ करिंथ. ७:३२-३५.

प्रेषितांनी बांधवांना प्रोत्साहन दिलं

१२, १३. पेत्रने बांधवांचा विश्‍वास दृढ कसा केला?

१२ येशूच्या मृत्यूच्या आदल्या रात्री त्याने प्रेषित पेत्रला म्हटलं: “शिमोन, शिमोन, पाहा! सैतानाने तुम्हा सर्वांना गव्हाप्रमाणे पाखडण्याची मागणी केली आहे. पण तुझा विश्‍वास खचू नये म्हणून मी तुझ्यासाठी याचना केली आहे; आणि तू मागे फिरल्यावर आपल्या बांधवांचा विश्‍वास दृढ कर.”—लूक २२:३१, ३२.

प्रेषितांच्या पत्रांमुळे पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना खूप प्रोत्साहन मिळालं, आणि आजही ती पत्रं आपल्याला प्रोत्साहन देतात (परिच्छेद १२-१७ पाहा))

१३ सुरुवातीला स्थापित झालेल्या मंडळ्यांमध्ये पुढाकार घेणाऱ्‍यांपैकी पेत्र एक होता. (गलती. २:९) पेन्टेकॉस्टच्या दिवशी आणि त्यानंतर आपल्या धाडसी कार्यांद्वारे पेत्रने बांधवांना प्रोत्साहन दिलं. बरीच वर्ष सेवा केल्यानंतर त्याने एका पत्रात बांधवांना म्हटलं: “मी थोडक्यात तुम्हाला हे पत्र लिहिले आहे, यासाठी की तुम्हाला प्रोत्साहन द्यावे आणि हीच देवाची खरी अपार कृपा आहे अशी प्रामाणिक साक्ष द्यावी. या अपार कृपेत तुम्ही स्थिर राहा.” (१ पेत्र ५:१२) पेत्रने लिहिलेल्या पत्रांमुळे त्या काळच्या ख्रिश्‍चनांना खूप प्रोत्साहन मिळालं. आणि आज यहोवाने दिलेल्या अभिवचनांच्या पूर्णतेची वाट पाहत असताना ही पत्रं आपल्यालाही प्रोत्साहन देतात.—२ पेत्र ३:१३.

१४, १५. प्रेषित योहानने जी पुस्तकं लिहिली त्यामुळे आपल्याला प्रोत्साहन कसं मिळतं?

१४ प्रेषित योहाननेही सुरुवातीच्या मंडळ्यांमध्ये पुढाकार घेतला. त्याने येशूच्या सेवाकार्याचा एक रोमांचक अहवाल लिहिला. यालाच आपण योहानचं शुभवर्तमान असं म्हणतो. या पुस्तकाने मागील दोन हजार वर्षांपासून ख्रिश्‍चनांना प्रोत्साहन दिलं आहे आणि आजही ते तितकंच प्रोत्साहनदायक आहे. उदाहरणार्थ, प्रेम या गुणावरून इतर लोक ओळखतील की आपण येशूचे शिष्य आहोत, हे शब्द फक्‍त योहानच्या पुस्तकातच आपल्याला वाचायला मिळतात.—योहान १३:३४, ३५ वाचा.

१५ योहानने लिहिलेल्या तीन पत्रांतूनही आपल्याला मौल्यवान सत्यं शिकायला मिळतात. आपल्या हातून होणाऱ्‍या चुकांमुळे आपण जेव्हा निराश होतो, तेव्हा येशूचं खंडणी बलिदान “आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते,” हे वाचून आपल्याला सांत्वन मिळतं. (१ योहा. १:७) तरीही आपल्याला दोषी वाटत असेल तर “देव आपल्या मनापेक्षा मोठा आहे” हे वाचून आपल्या मनावरचं ओझं हलकं होतं. (१ योहा. ३:२०) “देव प्रेम आहे” हे शब्द आपल्याला योहानच्या पत्रातच वाचायला मिळतात. (१ योहा. ४:८, १६) त्याने त्याच्या दुसऱ्‍या आणि तिसऱ्‍या पत्रांत “सत्याच्या मार्गावर चालत” राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांची प्रशंसा केली.—२ योहा. ४; ३ योहा. ३, ४.

१६, १७. सुरुवातीच्या ख्रिश्‍चनांना पौलने कसं प्रोत्साहन दिलं?

१६ बांधवांना उत्तेजन देण्याच्या बाबतीत प्रेषित पौलनेही उत्तम उदाहरण मांडलं. येशूच्या मृत्यूच्या काही काळानंतर बरेचसे प्रेषित यरुशलेममधेच राहिले. तिथूनच नियमन मंडळ काम करत होतं. (प्रे. कार्ये ८:१४; १५:२) यहूदीयामधल्या ख्रिश्‍चनांनी अशा लोकांना ख्रिस्ताबद्दल प्रचार केला ज्यांचा एकाच देवावर विश्‍वास होता. पण पवित्र आत्म्याने पौलला अनेक दैवतांची उपासना करणाऱ्‍या ग्रीक, रोमी आणि इतर लोकांना प्रचार करण्यासाठी पाठवलं.—गलती. २:७-९; १ तीम. २:७.

१७ आज टर्की, ग्रीस आणि इटली या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या देशांत पौलने प्रचारासाठी प्रवास केला होता. या ठिकाणी राहणाऱ्‍या गैर-यहुदी लोकांना त्याने प्रचार केला आणि तिथे मंडळ्याही स्थापित केल्या. नुकतेच ख्रिस्ती झालेल्या या लोकांना समस्यांचा सामना करावा लागला. तिथल्या लोकांनी त्यांचा छळ केला आणि यामुळे त्यांना प्रोत्साहनाची खूप गरज होती. (१ थेस्सलनी. २:१४) म्हणून इ.स. ५० च्या आसपास पौलने थेस्सलनीकामधल्या नवीन मंडळीला एक प्रोत्साहन देणारं पत्र लिहिलं. या पत्रात त्याने म्हटलं: “आम्ही आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हा सर्वांचा उल्लेख करून नेहमी देवाचे आभार मानतो, कारण तुम्ही विश्‍वासूपणे जे कार्य केले आणि प्रेमळपणे जे परिश्रम घेतले; तसेच, . . . तुम्ही जो धीर धरला, त्याची आम्ही सतत आपला देव व पिता याच्यासमोर आठवण करतो.” (१ थेस्सलनी. १:२, ३) त्याने त्या बंधुभगिनींना एकमेकांना दृढ करण्याचंही प्रोत्साहन दिलं. त्याने म्हटलं: “एकमेकांना प्रोत्साहन देत आहात व एकमेकांची उन्‍नती करत आहात, तसेच पुढेही करत राहा.”—१ थेस्सलनी. ५:११.

नियमन मंडळाने प्रोत्साहन दिलं

१८. पहिल्या शतकातील नियमन मंडळाने फिलिप्पला प्रोत्साहन कसं दिलं?

१८ पहिल्या शतकात मंडळीमधील पुढाकार घेणाऱ्‍यांना आणि इतर बंधुभगिनींना प्रोत्साहन देण्यासाठी यहोवाने नियमन मंडळाचा उपयोग केला. शोमरोनी लोकांना फिलिप्पने जेव्हा ख्रिस्ताबद्दल प्रचार केला, तेव्हा त्याला नियमन मंडळाने मदत केली. त्यांनी मंडळाच्या दोन सदस्यांना, म्हणजेच पेत्र आणि योहान यांना ख्रिस्ती झालेल्या बांधवांवर पवित्र आत्मा यावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी पाठवलं. (प्रे. कार्ये ८:५, १४-१७) नियमन मंडळाकडून मिळालेल्या या मदतीमुळे फिलिप्पला आणि नवीनच बनलेल्या ख्रिश्‍चनांना खूप प्रोत्साहन मिळालं.

१९. नियमन मंडळाकडून मिळालेलं पत्र वाचून बांधवांना प्रोत्साहन कसं मिळालं?

१९ एका प्रसंगी नियमन मंडळाला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. तो म्हणजे: मोशेच्या नियमांनुसार यहुदी लोक करतात, तसं यहुदी नसलेल्या ख्रिश्‍चनांनाही सुंता करण्याची गरज आहे का? (प्रे. कार्ये १५:१, २) हे ठरवण्यासाठी नियमन मंडळाने प्रार्थना करून पवित्र आत्मा मागितला आणि शास्त्रवचनांच्या आधारावर चर्चा केली. या चर्चेवरून त्यांनी हा निष्कर्ष काढला की आता हे गरजेचं नाही. मग त्यांनी मंडळ्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यात त्यांच्या निर्णयाचं कारण समजावलं. हे पत्र मंडळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काही बांधवांना पाठवलं. मंडळीमध्ये हे प्रोत्साहनदायक पत्र वाचण्यात आलं तेव्हा “बांधवांना अतिशय आनंद झाला.”—प्रे. कार्ये १५:२७-३२.

२०. (क) आज नियमन मंडळ आपल्याला कसं प्रोत्साहन देतं? (ख) आपण पुढच्या लेखात कोणत्या प्रश्‍नावर चर्चा करणार आहोत?

२० आजच्या काळातलं नियमन मंडळदेखील बेथेलमध्ये काम करणाऱ्‍यांना, क्षेत्रांत काम करणाऱ्‍या खास पूर्ण वेळच्या सेवकांना आणि आपल्या सर्वांनाच प्रोत्साहन देतं. पहिल्या शतकातील बांधवांसारखंच, आपल्यालाही या प्रोत्साहनामुळे आनंद होतो. तसंच जे लोक सत्य सोडून गेले आहेत किंवा अक्रियाशील झाले आहेत अशांना प्रोत्साहन देण्यासाठी नियमन मंडळाने २०१५ सालच्या अधिवेशनात यहोवाकडं परत या हे माहितीपत्रक प्रकाशित केलं. पण फक्‍त पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांवरच इतरांना प्रोत्साहन देण्याची जबाबदारी आहे का? की आपण सर्वांनीच त्यात हातभार लावला पाहिजे? या प्रश्‍नांवर आपण पुढच्या लेखात चर्चा करू या.