व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवा देवाची सेवा करा

स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवा देवाची सेवा करा

“जिथे कुठे यहोवाचा आत्मा आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.”—२ करिंथ. ३:१७.

गीत क्रमांक: ११, ३३

१, २. (क) पौलच्या दिवसांत गुलामगिरी आणि स्वातंत्र्य महत्त्वाचे विषय का होते? (ख) पौलनुसार खरं स्वातंत्र्य कुठून मिळू शकतं?

पहिल्या शतकातील ख्रिस्ती, रोमी साम्राज्यात राहत होते. रोमी लोकांना आपल्या न्यायव्यवस्थेबद्दल, कायद्यांबद्दल आणि त्यांना असलेल्या स्वातंत्र्याबद्दल खूप अभिमान होता. असं असलं तरी कष्टाचं बहुतेक काम रोमी लोक गुलामांकडूनच करून घ्यायचे. एक वेळ अशी होती जेव्हा रोमी साम्राज्यात सरासरी प्रत्येक ३ मधील १ व्यक्‍ती गुलाम होती. अशी परिस्थिती असल्यामुळे साहजिकच गुलामगिरी आणि स्वातंत्र्य हे त्या काळच्या सामान्य लोकांसाठी आणि ख्रिश्‍चनांसाठी महत्त्वाचे विषय होते.

प्रेषित पौलने बऱ्‍याच वेळा आपल्या पत्रांत स्वातंत्र्याबद्दल लिहिलं. पण असं करून तो त्या काळच्या इतर लोकांसारखं जगातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत नव्हता. याउलट पौल आणि इतर ख्रिश्‍चनांनी देवाच्या राज्याची आनंदाची बातमी सांगण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसंच, ख्रिस्त येशूने दिलेली खंडणी किती मौल्यवान आहे हे समजण्यासाठीही त्यांनी लोकांना मदत केली. खरं स्वातंत्र्य कुठून मिळू शकतं हे पौलने ख्रिश्‍चनांना सांगितलं. त्याने म्हटलं: “यहोवा आत्मिक व्यक्‍ती आहे आणि जिथे कुठे यहोवाचा आत्मा आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.”—२ करिंथ. ३:१७.

३, ४. (क) पौलने २ करिंथकर ३:१७ या वचनाआधी कशाचा उल्लेख केला? (ख) यहोवाकडून मिळणारं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे?

करिंथकरांना लिहिलेल्या दुसऱ्‍या पत्रात पौलने मोशेचा उल्लेख केला. यहोवाच्या स्वर्गदूतासोबत काही दिवस राहिल्यानंतर मोशे सीनाय पर्वतावरून खाली उतरला त्या घटनेबद्दल पौलने सांगितलं. त्या वेळी मोशेच्या चेहऱ्‍यातून तेजाचे किरण निघत होते. इस्राएली लोकांनी मोशेला पाहिलं तेव्हा ते खूप घाबरले. यामुळे मग मोशेने आपला चेहरा पडद्याने झाकला. (निर्ग. ३४:२९, ३०, ३३; २ करिंथ. ३:७, १३) पौलने सांगितलं: “पण, जेव्हा कोणी यहोवाकडे वळतो तेव्हा हा पडदा काढून टाकला जातो.” (२ करिंथ. ३:१६) पौलच्या शब्दांचा काय अर्थ होतो?

मागच्या लेखात आपण शिकलो की सर्व सृष्टीची रचना करणाऱ्‍या यहोवाजवळच पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याला कोणत्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे हे समजण्यासारखं आहे की यहोवाच्या सान्‍निध्यात आणि “जिथे कुठे यहोवाचा आत्मा आहे, तिथे स्वातंत्र्य आहे.” पण पौलने स्पष्ट केलं की जर आपल्याला हे स्वातंत्र्य हवं असेल तर आपला यहोवासोबत एक जवळचा नातेसंबंध असला पाहिजे. ओसाड प्रदेशात असताना इस्राएली लोकांनी यहोवाच्या नाही, तर मानवी दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहिलं. एका अर्थाने त्यांच्या मनावर आणि हृदयावर पडदा होता. गुलामगिरीतून मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग त्यांना स्वतःच्या स्वार्थी इच्छा पूर्ण करण्यासाठी करायचा होता.—इब्री ३:८-१०.

५. (क) यहोवाचा आत्मा कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य देतो? (ख) एखाद्या व्यक्‍तीला गुलामीत किंवा तुरुंगात राहूनसुद्धा स्वातंत्र्य मिळू शकतं असं का म्हणता येईल? (ग) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

यहोवाचा आत्मा आपल्याला जे स्वातंत्र्य देतो त्यात गुलामीतून सुटका याव्यतिरिक्‍त इतर गोष्टीही सामील आहेत. मानव देऊ शकतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त स्वातंत्र्य देवाचा आत्मा आपल्याला देतो. तो आपल्याला पाप आणि मृत्यूच्या गुलामीतून सोडवू शकतो. तसंच, तो आपल्याला खोटी उपासना आणि त्याच्या चालीरिती यांपासूनही सोडवू शकतो. (रोम. ६:२३; ८:२) हे स्वातंत्र्य खरंच खूप मोठं आहे! एखादी व्यक्‍ती गुलामीत किंवा तुरुंगात असली तरीही तिला देवाचा आत्मा देत असलेलं स्वातंत्र्य मिळू शकतं. (उत्प. ३९:२०-२३) बंधू एरिक फ्रॉस्ट आणि बंधू हॉर्स्ट हेन्शल या बांधवांनी आपल्या विश्‍वासामुळे अनेक वर्ष तुरुंगात काढली. असं असलं तरी त्यांच्याजवळ देवाच्या आत्म्याने दिलेलं स्वातंत्र्य होतं. त्यांना आलेले अनुभव जाणून घेण्यासाठी तुम्ही JW Library मध्ये असलेल्या त्यांच्या मुलाखती पाहू शकता. (INTERVIEWS AND EXPERIENCES > ENDURING TRIALS इथे पाहा.) आता आपण दोन प्रश्‍नांवर चर्चा करू या. मिळालेल्या स्वातंत्र्याला आपण खूप मौल्यवान समजतो हे आपण कसं दाखवू शकतो? आणि, मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण सुज्ञपणे उपयोग कसा करू शकतो?

यहोवाने दिलेलं स्वातंत्र्य खूप मौल्यवान आहे

६. यहोवाने दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल आपल्याला कदर नाही हे इस्राएली लोकांनी कसं दाखवलं?

आपल्याला जर कोणी खूप मौल्यवान भेटवस्तू दिली तर आपण त्या व्यक्‍तीबद्दल खूप कदर बाळगू. पण यहोवाने दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल इस्राएली लोकांच्या मनात जराही कदर नव्हती. यहोवाने इजिप्तमधून त्यांना बाहेर आणलं त्याच्या काही महिन्यांतच ते लोक इजिप्तमध्ये मिळणाऱ्‍या अन्‍नाबद्दल सारखं बोलू लागले. यहोवा त्यांना देत असलेल्या मान्‍नाबद्दल ते कुरकुर करू लागले. आपण इजिप्तला परत जाऊ असंदेखील ते म्हणू लागले. यहोवाने त्यांना त्याची उपासना करण्यासाठी दिलेल्या स्वातंत्र्यापेक्षा, इजिप्तमधील ‘मासे, काकड्या, खरबूजे, भाजी, कांदे, लसूण’ त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचे होते. यामुळेच यहोवाचा क्रोध या लोकांवर भडकला. (गण. ११:५, ६, १०; १४:३, ४) आपण यातून एक महत्त्वाचा धडा शिकतो.

७. पौलने २ करिंथकर ६:१ मध्ये दिलेला सल्ला स्वतः कसा लागू केला आणि आपणही तो कसा लागू करू शकतो?

यहोवाने येशू ख्रिस्ताद्वारे दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल आपण कदर बाळगायचं कधीही सोडू नये असा आर्जव पौलने केला. (२ करिंथकर ६:१ वाचा.) पौल अपरिपूर्ण होता आणि पाप व मृत्यूच्या गुलामीत होता. यामुळे तो निराश झाला. पण तरीही त्याने म्हटलं: “आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मी देवाचे आभार मानतो!” त्याने देवाचे आभार का मानले? याचं कारण त्याने ख्रिश्‍चनांना सांगितलं. त्याने म्हटलं: “पवित्र आत्म्याचा जो नियम ख्रिस्त येशूद्वारे जीवन देतो, त्याने तुम्हाला पापाच्या व मृत्यूच्या नियमातून स्वतंत्र केले आहे.” (रोम. ७:२४, २५; ८:२) पौलसारखंच आपणही हे नेहमी लक्षात ठेवावं की यहोवाने आपल्याला पाप आणि मृत्यूच्या गुलामीतून सोडवलं आहे. खंडणीमुळे आपल्याला देवाची शुद्ध अंतःकरणाने सेवा करणं शक्य होतं आणि यामुळे आपल्याला मनापासून आनंद होतो.—स्तो. ४०:८.

तुम्ही तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करत आहात की यहोवाची सेवा करण्यासाठी? (परिच्छेद ८-१० पाहा)

८, ९. (क) मिळालेल्या स्वातंत्र्याच्या उपयोगाबद्दल प्रेषित पेत्रने कोणता इशारा दिला? (ख) एखादी व्यक्‍ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग कसा करू शकते?

स्वातंत्र्य दिल्याबद्दल यहोवाचे आभार मानण्यासोबतच आपण त्याचा दुरुपयोग तर करत नाही याची खबरदारीही बाळगली पाहिजे. उदाहरणार्थ, प्रेषित पेत्रने सांगितलं की मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण पाप करण्यासाठी सबब म्हणून करू नये. (१ पेत्र २:१६ वाचा.) ही ताकीद आपल्याला ओसाड रानात इस्राएली लोकांसोबत जे घडलं त्याची आठवण करून देते. आज आपल्यालादेखील या इशाऱ्‍याची गरज आहे, खरंतर आजचा काळ पाहता आपल्याला याची जास्त गरज आहे. सैतान आणि त्याचं जग आपल्याला वेगवेगळ्या फॅशनचे कपडे, खाण्या-पिण्याच्या वस्तू आणि विविध प्रकारचं मनोरंजन यांचं आमिष दाखवतं. जाहिरात करणारे सुंदर दिसणाऱ्‍या लोकांचा उपयोग करून चलाखीने गरज नसलेल्या गोष्टीही घेण्यास आपल्याला भाग पाडतात. आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग करण्यासाठी हे जग आपल्याला अगदी सहज भुलवू शकतं.

पेत्रने दिलेला सल्ला जीवनातील जास्त महत्त्वाच्या गोष्टींनाही लागू होतो, जसं की शिक्षण, नोकरीधंदा किंवा करिअर. उदाहरणार्थ, आजकाल बरेच लोक तरुणांना सांगतात की त्यांनी उच्च शिक्षण घेतलं तरच त्यांना चांगली नोकरी मिळेल, ते भरपूर पैसा कमवू शकतील आणि समाजात त्यांचं मोठं नावही होईल. यामुळे बऱ्‍याच तरुणांवर चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी मेहनत करण्याचा खूप दबाव असतो. तरुणांना मार्गदर्शन देणारे असे लोक कदाचित माहिती अशा प्रकारे सांगतील, ज्यावरून भासेल की इतर शिक्षणाच्या तुलनेत उच्च शिक्षण घेणारे तरुण खूप जास्त पैसा कमवतात. यामुळे शिक्षणाच्या बाबतीत निर्णय घेताना तरुणांना उच्च शिक्षण घेणं जास्त फायद्याचं वाटेल. पण तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनी कोणती गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे?

१०. वैयक्‍तिक गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे?

१० काही लोकांना वाटेल की हे वैयक्‍तिक निर्णय आहेत आणि जर त्यांचा विवेक त्यांना दोषी ठरवत नसेल, तर मग ते हवा तसा निर्णय घेऊ शकतात. असे लोक कदाचित विचार करतील: “माझ्या स्वातंत्र्याचा न्याय दुसऱ्‍याच्या विवेकाने का करावा?” (१ करिंथ. १०:२९) हे खरं आहे की शिक्षण आणि करिअर यांविषयी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे. पण आपण हे कधीही विसरू नये की आपल्या स्वातंत्र्याला मर्यादा आहेत आणि आपल्या निर्णयाचे चांगले किंवा वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळेच पौलने म्हटलं: “सर्व गोष्टी कायदेशीर असल्या, तरी सर्वच गोष्टी हिताच्या आहेत असे नाही. सर्व गोष्टी कायदेशीर असल्या, तरी सर्व गोष्टी उन्‍नती करणाऱ्‍या नाहीत.” (१ करिंथ. १०:२३, तळटीप) म्हणून आपल्याजवळ वैयक्‍तिक गोष्टींच्या बाबतीत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असलं, तरी आपली इच्छा पूर्ण करणं हे कधीच सर्वात महत्त्वाचं नसलं पाहिजे.

स्वातंत्र्याचा सुज्ञ वापर करून देवाची सेवा करा

११. यहोवाने आपल्याला गुलामीतून मुक्‍त का केलं आहे?

११ पेत्रने स्वातंत्र्याचा दुरुपयोग करण्याबद्दल इशारा देण्यासोबतच, त्याचा योग्य उपयोग करण्याबद्दलही सांगितलं. त्याने म्हटलं की आपण स्वातंत्र्याचा उपयोग “देवाचे दास” बनण्यासाठी करावा. आपण आपलं जीवन यहोवाच्या सेवेसाठी द्यावं यासाठीच त्याने येशूचा वापर करून आपल्याला पाप आणि मृत्यूच्या गुलामीतून सोडवलं आहे.

१२. नोहा आणि त्याच्या कुटुंबाने आपल्यासाठी कोणतं उदाहरण मांडलं?

१२ आपल्या स्वातंत्र्याचा सर्वात चांगला वापर आपण आपला वेळ आणि शक्‍ती यहोवाच्या सेवेत लावण्याद्वारे करू शकतो. असं केल्यामुळे आपल्या इच्छा आणि जगीक ध्येयं आपल्या जीवनात कधीच सर्वात महत्त्वाचे बनणार नाहीत. (गलती. ५:१६) नोहा आणि त्याच्या कुटुंबाने काय केलं याचा विचार करा. त्यांच्या काळचे लोक हिंसक आणि अनैतिक झाले होते. पण त्यांच्या ध्येयांमध्ये आणि कामांमध्ये नोहा आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य कधीच सामील झाले नाहीत. यहोवाने दिलेलं काम करण्यात व्यस्त राहणं त्यांनी पसंत केलं. त्यांनी जहाज बांधलं, त्यांना व प्राण्यांना लागणारं अन्‍न गोळा केलं आणि येणाऱ्‍या जलप्रलयाबद्दल इतरांना इशारा दिला. म्हणूनच बायबल सांगतं: “नोहाने तसे केले; देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.” (उत्प. ६:२२) यामुळेच नोहा आणि त्याच्या कुटुंबाचा जलप्रलयातून बचाव झाला.—इब्री ११:७.

१३. यहोवाने आपल्याला कोणती आज्ञा दिली आहे?

१३ यहोवाने आपल्याला आज काय करण्याची आज्ञा दिली आहे? देवाने दिलेली प्रचार करण्याची व शिष्य बनवण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी येशूचे शिष्य या नात्याने आपण पूर्णपणे सज्ज आहोत. (लूक ४:१८, १९ वाचा.) सैतानाने आज लोकांची मने आंधळी केली आहेत. लोकांना याची जाणीव नाही की ते पूर्णपणे खोट्या धर्माच्या, भौतिक गोष्टींच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या गुलामीत आहेत. (२ करिंथ. ४:४) येशूसारखंच आपल्यालाही इतरांना स्वातंत्र्य देणाऱ्‍या यहोवा देवाची ओळख करून देण्याचा आणि त्याची उपासना करण्यासाठी मदत करण्याचा बहुमान आहे. (मत्त. २८:१९, २०) पण प्रचार करणं नेहमीच सोपं नसतं. काही ठिकाणी लोकांना देवाबद्दल जाणून घेण्यात आस्था नसते आणि काही लोकांना तर आपला संदेश ऐकून रागदेखील येतो. असं असलं तरी यहोवाने आपल्याला प्रचार करण्याची आज्ञा दिली असल्यामुळे आपण स्वतःला पुढील प्रश्‍न विचारला पाहिजे: ‘मी माझ्या स्वातंत्र्याचा उपयोग यहोवाची सेवा जास्त प्रमाणात करण्यासाठी करू शकतो का?’

१४, १५. यहोवाच्या बऱ्‍याच सेवकांनी काय करण्याची निवड केली आहे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेलं चित्र पाहा.)

१४ दुष्ट व्यवस्थेचा अंत जवळ आला आहे हे ओळखून आज बऱ्‍याच बंधुभगिनींनी आपली जीवनशैली साधी करून पायनियर सेवा सुरू केली आहे. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. (१ करिंथ. ९:१९, २३) काही बंधुभगिनी आपल्या मंडळीच्या क्षेत्रात, तर इतर काही जास्त गरज असलेल्या मंडळीत जाऊन पायनियर सेवा करतात. मागच्या ५ वर्षांत जवळपास २,५०,००० बंधुभगिनी पायनियर बनले आहेत. आणि आजच्या तारखेला जगभरात ११ लाखापेक्षा जास्त पायनियर आहेत. आज इतक्या जास्त प्रमाणात लोक आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग यहोवाची सेवा करण्यासाठी करत आहेत ही किती प्रशंसनीय गोष्ट आहे!—स्तो. ११०:३.

१५ आपल्या स्वातंत्र्याचा सुज्ञपणे उपयोग करण्यास कोणत्या गोष्टीने या बंधुभगिनींना मदत केली? जॉन आणि जुडीथ यांच्या उदाहरणाचा विचार करा. मागील ३० वर्षांपासून ते वेगवेगळ्या देशात सेवा करत आहेत. ते सांगतात की १९७७ मध्ये जेव्हा पायनियर सेवा प्रशाला सुरू झाली तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचं प्रोत्साहन देण्यात आलं होतं. हे ध्येय गाठण्यासाठी जॉन आणि जुडीथला आपली जीवनशैली साधी ठेवावी लागणार होती. यामुळे जॉनला सारखी नोकरी बदलावी लागली. कालांतराने ते एका दुसऱ्‍या देशात प्रचार करण्यासाठी गेले. नवीन भाषा, वेगळी संस्कृती आणि वेगळं हवामान, अशा आव्हानांना सामोरं जाण्यासाठी कोणत्या गोष्टीने त्यांना मदत केली? त्यांनी यहोवाला प्रार्थना केली आणि मदतीसाठी ते त्याच्यावर अवलंबून राहिले. इतकी वर्षं यहोवाची अशा प्रकारे सेवा केल्याबद्दल त्यांना कसं वाटतं? जॉन म्हणतात: “मला माहीत असलेल्या किंवा मी अनुभवलेल्या सर्वात चांगल्या कामात मी व्यस्त आहे. एका प्रेमळ पित्याप्रमाणे मला यहोवाची आणखी जवळून ओळख झाली आहे. मला याकोब ४:८ मधील शब्द आणखी चांगल्या प्रकारे समजले आहेत, त्यात म्हटलं आहे की ‘देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.’ माझ्या जीवनाला उद्देश मिळाला आहे आणि यातून मला खूप समाधान मिळतं.”

१६. हजारो बंधुभगिनींनी आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग सुज्ञपणे कसा केला आहे?

१६ जॉन आणि जुडीथसारखं काही बंधुभगिनी बरीच वर्षं पायनियर सेवा करू शकतात. पण परिस्थितीमुळे कदाचित काही बंधुभगिनींना इतकी वर्षं सेवा करणं शक्य होणार नाही. असं असलं तरी बरेच बंधुभगिनी जगभरात चाललेल्या बांधकाम प्रकल्पांवर स्वयंसेवक म्हणून काम करतात. उदाहरणार्थ, न्यूयॉर्क मधील वॉरविक इथे आपल्या नवीन जागतिक मुख्यालयाच्या बांधकामात हातभार लावण्यासाठी जवळपास २७,००० बंधुभगिनी स्वेच्छेने पुढे आले. यातील काही दोन आठवड्यांसाठी, काही बंधुभगिनी काही महिन्यांसाठी तर इतर काही एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळासाठी आले. वॉरविकला येऊन या कामात सहभाग घेण्यासाठी बऱ्‍याच बंधुभगिनींना जीवनात त्याग करावे लागले. स्वातंत्र्य देणारा देव यहोवा, याला स्तुती आणि आदर देण्यासाठी या सर्व बंधुभगिनींनी आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग केला. या सर्वांनीच आपल्यासाठी एक उत्तम उदाहरण मांडलं आहे!

१७. आपण जर आपल्या स्वातंत्र्याचा चांगला उपयोग केला तर भविष्यात आपल्याला काय मिळेल?

१७ आपल्याला यहोवाची ओळख झाली आहे आणि त्याची उपासना केल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे, यासाठी आपण खूप कृतज्ञ आहोत. म्हणून मग आपण जी निवड करतो त्यावरून आपण दाखवून देऊ या की मिळालेल्या स्वातंत्र्याला आपण खूप मौल्यवान समजतो. त्याचा दुरुपयोग करण्यापेक्षा, आपण त्याचा होता होईल तितका उपयोग यहोवाची सेवा करण्यासाठी करू या. असं केल्यामुळे यहोवाने आपल्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद आपल्याला मिळतील. यहोवाने अभिवचन दिलं: “सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्‍त केली जाईल आणि तिला देवाच्या मुलांचे गौरवी स्वातंत्र्य मिळेल.”—रोम. ८:२१.