व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास लेख १४

आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा

आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करा

“आनंदाचा संदेश घोषित करत राहा आणि आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण कर.”​—२ तीम. ४:५, तळटीप.

गीत १८ देवाचे खरे प्रेम

सारांश *

पुनरुत्थानानंतर येशू त्याच्या शिष्यांना भेटला आणि त्याने त्यांना “जा आणि. . . शिष्य करा” अशी आज्ञा दिली (परि १ पाहा)

१. देवाच्या सर्व विश्‍वासू सेवकांना काय करण्याची इच्छा आहे आणि का? (मुखपृष्ठावरचं चित्र पाहा.)

“जा आणि सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा” अशी आज्ञा येशूने आपल्या अनुयायांना दिली. (मत्त. २८:१९) देवाने त्याच्या सर्व विश्‍वासू सेवकांना सेवाकार्याची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी “चांगल्या प्रकारे पूर्ण” कशी करता येईल याबद्दल त्यांना शिकून घ्यायची इच्छा आहे. (२ तीम. ४:५) कारण कोणत्याही कामापेक्षा हे काम खूप महत्त्वाचं, अर्थपूर्ण आणि निकडीचं आहे. आपली इच्छा आहे की आपण जास्तीत जास्त वेळ सेवाकार्यात द्यावा, पण तसं करणं आपल्याला नेहमीच शक्य होत नाही.

२. सेवाकार्य चांगल्या प्रकारे पूर्ण करताना आपल्याला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?

इतर काही गोष्टींमागे आपला वेळ आणि शक्‍ती खर्च होऊ शकते. जसं की, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला बरेच तास काम करावं लागू शकतं. तसंच, कुटुंबातल्या इतर जबाबदाऱ्‍या, आजारपण, निराशा किंवा वाढत्या वयामुळे येणाऱ्‍या समस्या यांमुळे आपल्याला जीवनात बराच संघर्ष करावा लागू शकतो. मग अशा कठीण परिस्थितीचा सामना करत असताना आपण आपलं सेवाकार्य चांगल्या प्रकारे कसं पूर्ण करू शकतो?

३. मत्तय १३:२३ या वचनातल्या येशूच्या शब्दांवरून आपण कोणता निष्कर्ष काढू शकतो?

आपल्या परिस्थितीमुळे यहोवाच्या सेवेत आपल्याला जास्त वेळ देता येत नसेल, तर आपण निराश होऊ नये. येशूला माहीत आहे की आपण सर्व जण सारख्याच प्रमाणात राज्याचं फळ देऊ शकत नाही. याचा अर्थ, आनंदाचा संदेश सांगण्यासाठी सगळे जण सारख्याच प्रमाणात वेळ आणि शक्‍ती खर्च करतीलच असं नाही. (मत्तय १३:२३ वाचा.) यहोवाच्या सेवेत आपण सर्वोत्तम देतो तेव्हा तो आपल्या मेहनतीला खूप मौल्यवान लेखतो. (इब्री ६:१०-१२) आता आपण पाहू या की आपण कशा प्रकारे सेवाकार्याला जीवनात प्रथमस्थान देऊ शकतो, आपलं जीवन साधं ठेवू शकतो आणि प्रचाराचं व शिकवण्याचं कौशल्य वाढवू शकतो. पण त्याआधी आपण पाहू या की आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करणं म्हणजे नेमकं काय?

४. आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करणं याचा काय अर्थ होतो?

सोप्या शब्दांत सांगायचं, तर आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी प्रचारात आणि शिकवण्याच्या कामात आपण जास्तीत जास्त सहभाग घेतला पाहिजे. पण या कार्यात फक्‍त वेळ देणं महत्त्वाचं नाही तर, आपण कोणत्या हेतूने यहोवाची सेवा करतो हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. आपण यहोवावर आणि शेजाऱ्‍यांवर प्रेम करत असल्यामुळे पूर्ण जिवाने सेवाकार्याचं काम करतो. * (मार्क १२:३०, ३१; कलस्सै. ३:२३) पूर्ण जिवाने यहोवाची सेवा करणं म्हणजे स्वतःला झोकून देणं आणि त्याच्या सेवेसाठी आपल्या शक्‍तीचा व क्षमतांचा वापर करणं. आपण सेवाकार्य करण्याच्या बहुमानाची कदर करतो तेव्हा आपण जास्तीत जास्त लोकांना प्रचार करण्याचा प्रयत्न करतो.

५-६. एका व्यक्‍तीकडे कमी वेळ असला तरी ती कशा प्रकारे प्रचारकार्याला प्रथमस्थानी ठेवू शकते? उदाहरण द्या.

एका अशा तरुणाचा विचार करा ज्याला गिटार वाजवायला आवडतं. जेव्हा कधी संधी मिळते तेव्हा तो गिटार वाजवतो. शेवटी त्याला एका ठिकाणी शनिवारी-रविवारी गिटार वाजवण्याचं काम मिळतं. पण तिथे मिळत असलेल्या पगारातून त्याचा खर्च भागत नाही. म्हणून तो एका दुकानात सोमवार ते शुक्रवार कॅशियर म्हणून काम करू लागतो. त्याचा जास्तीत जास्त वेळ त्या दुकानात जात असला, तरी त्याच्या मनात संगीत हा त्याचा आवडीचा विषय सतत चालू असतो. त्याची मनापासून इच्छा असते की त्याने त्याचं कौशल्य वाढवावं आणि त्या क्षेत्रातच करियर करावं. म्हणून जरी त्याला गिटार वाजवण्याची कमी संधी मिळत असली तरी तो प्रत्येक संधीचा फायदा करून घेतो.

त्याचप्रमाणे कदाचित आपल्याकडे प्रचारकार्याला देण्यासाठी हवा तितका वेळ नसेल. पण असं असलं तरी प्रचारकार्य करणं आपल्याला आवडतं. आनंदाचा संदेश लोकांच्या मनापर्यंत पोचवता यावा म्हणून आपण आपलं कौशल्य वाढवण्यासाठी खूप मेहनत घेतो. पण इतर जबाबदाऱ्‍या हाताळण्यात आपला बराचसा वेळ जात असल्यामुळे आपण कदाचित विचार करू की प्रचारकार्याला जीवनात प्रथमस्थान कसं देता येईल.

सेवाकार्य प्रथमस्थानी कसं ठेवता येईल?

७-८. सेवाकार्याप्रती योग्य मनोवृत्ती बाळगण्याबद्दल आपण येशूचं अनुकरण कसं करू शकतो?

येशूने सेवाकार्याप्रती योग्य मनोवृत्ती बाळगण्याबाबतीत आपल्यासाठी सर्वोत्तम उदाहरण मांडलं आहे. देवाच्या राज्याबद्दल इतरांना सांगणं ही गोष्ट त्याच्या जीवनात सर्वात महत्त्वाची होती. (योहा. ४:३४, ३५) जास्तीत जास्त लोकांना देवाच्या राज्याबद्दल कळावं म्हणून तो शेकडो किलोमीटर चालला. त्याने प्रत्येक संधीचा वापर करून घरोघरी आणि सार्वजनिक रीत्या लोकांना देवाच्या राज्याबद्दल सांगितलं. अशा प्रकारे, येशूने आपल्या जीवनात सेवाकार्याला प्रथमस्थानी ठेवलं.

येशूचं अनुकरण करून आपण कधीही आणि कुठेही आनंदाचा संदेश सांगण्यासाठी तयार असलं पाहिजे. प्रचारकार्यासाठी आपण आपल्या सुखसोयींचा स्वेच्छेने त्याग करतो. (मार्क ६:३१-३४; १ पेत्र २:२१) काही जण मंडळीमध्ये खास पायनियर, नियमित पायनियर आणि सहायक पायनियर या नात्याने सेवा करतात. तसंच काही जण दुसरी भाषा शिकतात किंवा प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करतात. पण असं असलं तरी प्रचाराचं जास्त कार्य मंडळीतल्या प्रचारकांद्वारे केलं जातं. त्यांना जरी पायनियरिंग किंवा इतर ठिकाणी जाऊन सेवा करणं शक्य नसलं, तरी ते सेवाकार्यासाठी आपलं सर्वोत्तम देतात. आपण सेवा जास्त करत असू किंवा कमी, आपल्याला शक्य आहे तितकीच यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. यहोवाची इच्छा आहे की ‘आनंदी देवाने सोपवलेल्या त्याच्या गौरवी आनंदाचा संदेश’ सांगताना आपल्या सर्वांनाच आनंद व्हावा.​—१ तीम. १:११; अनु. ३०:११.

९. (क) पौलला काम करावं लागलं तरीही त्याने कशा प्रकारे प्रचारकार्याला त्याच्या जीवनात प्रथमस्थानी ठेवलं? (ख) प्रेषितांची कार्ये २८:१६, ३०, ३१ या वचनांनुसार पौलने सेवाकार्याप्रती कशी मनोवृत्ती बाळगली?

सेवाकार्याला जीवनात प्रथमस्थान देण्याबाबतीत पौलने चांगलं उदाहरण मांडलं. दुसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यादरम्यान करिंथमध्ये असताना त्याच्यासमोर आर्थिक समस्या आली आणि यामुळे त्याला काही वेळेसाठी तंबू बनवण्याचं काम करावं लागलं. असं असलं तरी त्याने तंबू बनवण्याच्या कामाला आपल्या जीवनात पहिलं स्थान दिलं नाही. सेवाकार्यादरम्यान स्वतःचा खर्च भागवता यावा म्हणून त्याने हे काम केलं आणि यामुळे “कोणताही मोबदला न घेता” तो करिंथच्या लोकांना आनंदाचा संदेश सांगू शकला. (२ करिंथ. ११:७) पौलला जरी काम करावं लागलं तरी त्याने सेवाकार्याला प्रथमस्थानी ठेवलं आणि प्रत्येक शब्बाथाच्या दिवशी प्रचार केला. परिस्थिती सुधारल्यानंतर पौलला प्रचारकार्यावर जास्तीत जास्त लक्ष देणं शक्य झालं. “यहुद्यांना साक्ष देऊन येशू हाच ख्रिस्त आहे याची तो त्यांना खातरी पटवून देऊ लागला.” (प्रे. कार्ये १८:३-५; २ करिंथ. ११:९) नंतर रोममध्ये दोन वर्षांसाठी त्याला नजरकैद करण्यात आलं, तेव्हा त्याला भेटायला येणाऱ्‍या लोकांना त्याने साक्ष दिली आणि इतर वेळी त्याने पत्रंही लिहिली. (प्रेषितांची कार्ये २८:१६, ३०, ३१ वाचा.) कोणत्याही गोष्टीला आपल्या सेवाकार्याच्या आड न येऊ देण्याचा पौलचा पक्का निर्धार होता. त्याने म्हटलं: “सेवा आमच्यावर सोपवली असल्यामुळे आम्ही धैर्य सोडत नाही.” (२ करिंथ. ४:१) पौलप्रमाणे जरी आपल्याला नोकरीमुळे कमी वेळ मिळत असेल, तरीही आपण आपल्या जीवनात राज्याच्या कार्याला प्रथमस्थानी ठेवू शकतो.

आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचे अनेक मार्ग आहेत (परिच्छेद १०-११ पाहा)

१०-११. शारीरिक समस्या असल्या तरी आपण आपली सेवा चांगल्या प्रकारे कशी पूर्ण करू शकतो?

१० आपल्या वाढत्या वयामुळे किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे आपल्याला घरोघरचं प्रचारकार्य करणं शक्य होतं नसलं, तरीही आपण इतर मार्गांद्वारे सेवाकार्याचा आनंद घेऊ शकतो. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांना जिथे कुठे लोक भेटायचे तिथे ते प्रचार करायचे. सत्याबद्दल सांगण्यासाठी त्यांनी प्रत्येक संधीचा वापर केला म्हणजे घरोघरी, सार्वजनिक रीत्या, अनौपचारिक रीत्या “जे कोणी भेटायचे” त्या सर्वांना त्यांनी प्रचार केला. (प्रे. कार्ये १७:१७; २०:२०) त्याच प्रकारे, आपल्याला जास्त चालणं शक्य नसलं, तर आपण सार्वजनिक ठिकाणी बसून ये-जा करणाऱ्‍या लोकांना प्रचार करू शकतो. आपण अनौपचारिक रीत्या, पत्रांद्वारे किंवा फोनद्वारेही साक्ष देऊ शकतो. बऱ्‍याच प्रचारकांना आपल्या आरोग्यामुळे किंवा इतर समस्यांमुळे घरोघरच्या प्रचारकार्यात भाग घेता येत नसला, तरीही ते या मार्गांद्वारे प्रचारकार्याचा आनंद घेतात.

११ आपल्याला आजारपण किंवा शारीरिक समस्या असल्या तरीही आपण आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. पुन्हा एकदा पौलचा विचार करा. त्याने म्हटलं: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सर्व गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.” (फिलिप्पै. ४:१३) एका मिशनरी दौऱ्‍यादरम्यान तो आजारी पडला तेव्हा त्याला याच शक्‍तीची गरज होती. त्याने गलतीकरांना म्हटलं: “माझ्या आजारामुळेच मला पहिल्यांदा तुम्हाला आनंदाचा संदेश घोषित करण्याची संधी मिळाली होती.” (गलती. ४:१३) त्याचप्रमाणे, आपल्या शारीरिक समस्यांमुळे आपल्यालाही आनंदाचा संदेश सांगण्याची संधी मिळू शकते. जसं की आपण डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय मदत पुरवणाऱ्‍या इतर लोकांना प्रचार करू शकतो कारण घरोघरचं प्रचारकार्य करताना यांपैकी बरेचसे लोक घरी नसतात.

आपण आपलं जीवन साधं कसं ठेवू शकतो?

१२. आपली नजर “एकाग्र” ठेवणं याचा काय अर्थ होतो?

१२ येशूने म्हटलं: “डोळा हा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमची नजर एकाग्र असेल [किंवा “साधी,” तळटीप] तर तुमचं संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल.” (मत्त. ६:२२) येशूच्या म्हणण्याचा काय अर्थ होता? हाच की आपलं जीवन साधं ठेवणं किंवा लक्ष विचलित होऊ न देता एकाच ध्येयावर किंवा उद्देशावर लक्ष केंद्रित करणं. सेवाकार्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या बाबतीत येशूने एक चांगलं उदाहरण मांडलं, आणि त्याने आपल्या शिष्यांना यहोवाच्या सेवेवर आणि त्याच्या राज्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी शिकवलं. येशूसारखंच आपणही आपल्या जीवनात सेवाकार्याला प्रथमस्थान देऊन “देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्त्व मिळवण्याचा प्रयत्न” करतो.​—मत्त. ६:३३

१३. सेवाकार्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करू शकते?

१३ आपल्या सेवाकार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा एक मार्ग म्हणजे कमी महत्त्वाच्या गोष्टींना जास्त वेळ न देणं. असं केल्यामुळे आपण इतरांना मदत करण्यात जास्त वेळ देऊ शकतो. यामुळे लोकांना यहोवाबद्दल जाणून घ्यायला आणि त्याच्यावर प्रेम करायला मदत होऊ शकते. * उदाहरणार्थ, आठवड्यादरम्यान सेवाकार्यात जास्त वेळ देण्यासाठी आपण आपल्या नोकरीच्या वेळेत फेरबदल करू शकतो का? तसंच, मनोरंजन करण्यात आपला जास्त वेळ जात असेल तर आपण तो कमी करू शकतो का?

१४. सेवाकार्यात जास्त वेळ आणि लक्ष देता यावं यासाठी एका जोडप्याने कोणते फेरबदल केले?

१४ सेवाकार्याला प्रथमस्थानी ठेवण्यासाठी एलीयास नावाच्या एका वडिलांनी आणि त्यांच्या पत्नीने आपल्या जीवनात काही फेरबदल केले. ते म्हणतात: “आम्ही पायनियरिंग सुरू करायचं ठरवलं तेव्हा आम्ही ती लगेच सुरू करू शकलो नाही. असं असलं तरी आम्हाला कुठूनतरी सुरुवात करायचीच होती. म्हणून मग आम्ही सेवाकार्य वाढवण्यासाठी काही छोटी-छोटी पावलं उचलली. जसं की आम्ही खर्च कमी केला, मनोरंजनासाठी बराच वेळ जायचा तोही आम्ही कमी केला. तसंच, बॉसला आमच्या कामाच्या वेळेत फेरबदल करण्यासाठीही आम्ही विनंती केली. यामुळे आम्ही संध्याकाळी प्रचारात भाग घेऊ शकलो, बायबल अभ्यास चालवू शकलो आणि महिन्यातून दोनदा आठवड्याच्या मधल्या दिवसांमध्ये प्रचारासाठी जाऊ शकलो. यामुळे आम्हाला खरंच खूप आनंद झाला.”

प्रचार आणि शिकवण्याचं कौशल्य आपण कसं वाढवू शकतो?

आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत शिकलेल्या गोष्टी लागू केल्याने सेवाकार्यात सतत प्रगती करण्यासाठी आपल्याला मदत होईल (परिच्छेद १५-१६ पाहा) *

१५-१६. १ तीमथ्य ४:१३, १५ या वचनांनुसार प्रचारक या नात्याने आपण आपलं कौशल्य कसं वाढवू शकतो? (“ सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करण्यासाठी मदतीची ठरणारी काही ध्येयं” ही चौकट पाहा.)

१५ प्रचारकार्यात आपलं कौशल्य वाढवण्याद्वारेही आपण आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो. काही व्यावसायिकांना किंवा नोकरी करणाऱ्‍यांना आपलं ज्ञान आणि कौशल्य वाढवण्यासाठी सतत प्रशिक्षण घ्यावं लागतं. आणि प्रचारकांच्या बाबतीतही हीच गोष्ट खरी आहे. प्रचारकार्यात कौशल्य वाढवण्यासाठी आपल्याला सतत शिकत राहण्याची गरज आहे.​—नीति. १:५; १ तीमथ्य ४:१३, १५ वाचा.

१६ आपण कशा प्रकारे सेवाकार्यात प्रगती करत राहू शकतो? यासाठी आपण दर आठवडी होणाऱ्‍या जीवन आणि सेवाकार्य सभेत मिळणाऱ्‍या मार्गदर्शनाकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. या सभेतून मिळणाऱ्‍या उपयुक्‍त प्रशिक्षणामुळे आपण प्रचारकार्याचं कौशल्य प्रगतिशीलपणे वाढवू शकतो. उदाहरणार्थ, जीवन आणि सेवाकार्य सभेचे अध्यक्ष विद्यार्थ्यांना सल्ला देतात, तेव्हा त्यातला कोणता सल्ला आपलं सेवाकार्य सुधारण्यासाठी मदतीचा ठरू शकतो हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर तो सल्ला आपण प्रचारकार्यात लागू करू शकतो. तसंच, आपण मदतीसाठी किंवा आपल्यासोबत प्रचारकार्य करण्यासाठी सेवाकार्याच्या गट पर्यवेक्षकाला विचारू शकतो. किंवा आपण अनुभवी प्रचारकाला, पायनियरला किंवा विभागीय पर्यवेक्षकालाही आपल्यासोबत प्रचार करण्यासाठी विचारू शकतो. त्यासोबतच, आपण जर प्रत्येक शिकवण्याच्या साधनाचा कुशलतेने वापर करायला शिकलो तर प्रचार आणि शिकवण्याच्या कार्यात जास्त आनंद अनुभवू.

१७. आपली सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण केल्यामुळे आपल्याला काय अनुभवता येईल?

१७ यहोवाने आपल्याला त्याचे “सहकारी” बनण्याची संधी दिली आहे आणि हा आपल्यासाठी खरंच एक मोठा बहुमान आहे! (१ करिंथ. ३:९) “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची [आपण] नेहमी खातरी करून” घेतली आणि सेवाकार्यावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला “हर्षाने परमेश्‍वराची सेवा” करता येईल. (फिलिप्पै. १:१०; स्तो. १००:२) देवाचे सेवक या नात्याने आपण खातरी बाळगू शकतो, की आपल्यात कोणत्याही कमतरता असल्या किंवा आपल्याला कोणत्याही समस्या आल्या तरी आपली सेवा पूर्ण करण्यासाठी लागणारी शक्‍ती यहोवा आपल्याला नक्कीच देईल. (२ करिंथ. ४:१, ७; ६:४) आपल्या परिस्थितीनुसार आपण प्रचारकार्यात कमी किंवा जास्त प्रमाणात भाग घेत असलो, तरी पूर्ण जिवाने केलेल्या सेवेमुळे आपण “आनंदी” होऊ शकतो. (गलती. ६:४) आपण सेवा चांगल्या प्रकारे पूर्ण करतो तेव्हा आपण यहोवावर आणि शेजाऱ्‍यावर प्रेम असल्याचं दाखवतो कारण बायबल असं म्हणतं: “असे केल्याने तू स्वतःला आणि जे तुझे ऐकतात त्यांनाही वाचवशील.”​—१ तीम. ४:१६

गीत ४७ सुवार्ता घोषित करा!

^ परि. 5 आपल्याला राज्याचा आनंदाचा संदेश सांगण्याची आणि शिष्य बनवण्याची आज्ञा देण्यात आली आहे. आपल्या जीवनात समस्या असल्या तरीही आपण आपलं सेवाकार्य चांगल्या प्रकारे कसं पूर्ण करू शकतो याबद्दल या लेखात चर्चा करण्यात आली आहे. तसंच, आपण प्रभावीपणे आणि यशस्वीपणे प्रचार कसा करू शकतो याबद्दलही या लेखात चर्चा करण्यात आली आहे.

^ परि. 4 वाक्यांशाचं स्पष्टीकरण: आपल्या ख्रिस्ती सेवाकार्यामध्ये प्रचार करणं व शिकवणं, संघटनेच्या बांधकामात व इमारतीच्या दुरुस्ती कामात सहभाग घेणं आणि आपत्तीच्या वेळी मदतकार्यात भाग घेणं या गोष्टींचा समावेश होतो.​—२ करिंथ. ५:१८, १९; ८:४

^ परि. 13 टेहळणी बुरूज  जुलै २०१६ या अंकातल्या पृष्ठ १० वर “आपलं जीवन साधं कसं बनवावं?” या चौकटीत दिलेले सात मुद्दे पाहा.

^ परि. 62 चित्रांचं वर्णन: आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत एक बहीण पुनर्भेट हा भाग सादर करत आहे. नंतर सभेचे अध्यक्ष सल्ले देतात तेव्हा ती आपल्या शिकवणे  या माहितीपत्रकात नोंद करते. नंतर शिकलेल्या गोष्टी ती प्रचारकार्यात लागू करते.